मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
वैराग्य

विविध विषय - वैराग्य

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


३९९ .

वैराग्येविण ज्ञान । दंभासी कारण । व्यर्थचि थोरपण । वर्तल्याविण ॥१॥

प्रत्ययाचे ज्ञान । तेथे चि समाधान । पाविजेतो ॥२॥

दास म्हणे जना । भक्ति उपासना । भावे भजावे सगुणा । तेणे निर्गुणा ॥३॥

४०० .

प्रपंच केला तडातोडी । पडिली परमार्थी जीवडी ॥१॥

सावधान होई जीवा । त्याग केलाचि करावा ॥ध्रु०॥

काम क्रोध राग द्वेष । आंगी जडले निःशेष ॥२॥

रामदासे बरे केले । अवघे जाणोनि त्यागिले ॥३॥

४०१ .

प्रपंच सांडुनियां बुद्धी । जडली परमार्थउपाधि ॥१॥

मना होई सावचित्त । त्याग करणे उचित ॥२॥

संप्रदाय समुदाव । तेणे जडे अहंभाव ॥३॥

रामदास म्हणे नेमे । भिक्षा मागणे उत्तम ॥४॥

४०२ .

नको ओळखीचे जन । आंगी जडे अभिमान ॥१॥

आतां तेथे जावे मना । जेथे कोणी ओळखेना ॥२॥

लोक म्हणती कोण आहे । पुसो जातां सांगो नये ॥३॥

रामदास म्हणे पाही तेथे कांही चिंता नाही ॥४॥

४०३ .

कोण कैंच रे भिकारी । भीक मागे दारोदारी ॥१॥

ऐसे म्हणती तेथे जावे । सुखे वैराग्य करावे ॥२॥

आहे ब्राह्मण विदेशी । नाही ठाऊक आम्हांसी ॥३॥

रामीरामदास म्हणे । कोण आहे कोण जाणे ॥४॥

४०४ .

देह चिरकाल राहो । अथवा शीघ्रकाळी जावो ॥१॥

आम्ही वस्ती केली रामी । आस्था नाही देहधामी ॥२॥

देहासि होवो उत्तम भोग । अथवा जडोत दुःख रोग ॥३॥

रामीरामदास मीनला । देहदुःखावेगळा जाला ॥४॥

४०५ .

देह जावो अथवा राहो । रामे फेडिला संदेहो ॥१॥

श्रीपतीचे परिजन । आम्ही स्वानंदसंपन्न ॥२॥

समाधान ते सभाग्य । असमाधान ते अभाग्य ॥३॥

रामीरामदास देव । सख्यासहित स्वानुभव ॥४॥

४०६ .

आम्ही मोक्षलक्ष्मीवंत । भवदरिद्र कैचे तेथे ॥१॥

श्रीपतीचे परिजन । आम्ही स्वानंदसंपन्न ॥२॥

समाधान ते सभाग्य । असमाधान ते अभाग्य ॥३॥

रामीरामदास देव सख्यासहित स्वानुभव ॥४॥

४०७ .

मोक्षश्री ते आम्हांपाशी । द्रव्याश्रिया तिच्या दासी ॥१॥

आम्ही परमार्थसंपन्न । अर्थ काय परिच्छिन्न ॥२॥

रामीरामदासी भाग्य । चढते वाढते वैराग्य ॥३॥

४०८ .

प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य । दोन्ही यथायोग्य दोहीकडे ॥१॥

दोहीकडे सांग होतां ते समर्थ । नाही तरी व्यर्थ तारांबळी ॥२॥

तारांबळी होते विचार नसतां । दास म्हणे आतां सावधान ॥३॥

४०९ .

विषयांची सोयरी प्रपंचाची सखी । मिळोनी एकमेकी करिती मात ॥१॥

यासी काय जाले धड चि कां विघडले । वयेवीण लागले देवपीसे ॥२॥

देव काय आम्हां सकळांपासी नसे । जनावेगळे कैसे भजन याचे ॥३॥

हे आधी चि विषयसंसारा उबगले । पुरुषार्थे सांडवले अहंतेच्या ॥४॥

यासि कोण्हि मोहाचे वडिलधारे नाही । म्हणउनियां पाही छंद करी ॥५॥

न करवे म्हणउनि त्यजिला विषयधंदा । जल्पतसे सदा रामनाम ॥६॥

रामीरामदास पिसाळले माय । म्हणौनि मोकली धाय विषयजनु ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP