मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग

विविध विषय - भक्तिपर अभंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


४६१ .

गजेंद्र सावजे धरिला पानेडी । रामे तेथे उडी टाकियेली ॥१॥

प्रल्हाद गांजिला तया कोण सोडी । रामे० ॥२॥

तेहतिस कोटि देव पडिले बांदोडी । रामे० ॥३॥

क्षत्रिये पीडिली ब्राह्मणे बापुडी । रामे० ॥४॥

दासापायी पडली देहबुद्धी बेडी । रामे० ॥५॥

रामदास म्हणे का करिसी वणवण । रामे भक्ते कोण उपेक्षिले ॥६॥

४६२ .

अंतीचा सोयरा राम मनी धरा । सोईर्‍या इतरां चाड नाही ॥१॥

सोयरे जिवलग मुरडती जेथूनी । राम तये स्थानी जिवलग ॥२॥

जीवांतील जीव स्वजन राघव । माझा अंतर्भाव सर्व जाणे ॥३॥

सोयर्‍याचे सुख वैभव साजणे । रामे आपंगणे दगदल्या ॥४॥

अनन्यशरण जावे तया एका । रामदासरंकाचिय स्वामी ॥५॥

४६३ .

अनन्याचे पाळी लळे ॥ पायी ब्रीद वळी रुळे ॥१॥

महामुद्गालाचे प्रेभे ॥ रणछोडी आला राम ॥२॥

तारी तुकयाचे पुस्तक ॥ देव ब्रह्मांड नायक ॥३॥

कृष्णातीरी हाका मारी ॥ दासा भेटी द्या अंतरी ॥४॥

४६४ .

राम दीनाचा कैवारी । सेवकाचा अंगिकारी ॥१॥

अंगिकारिले वानर । त्यांची ख्याति जाली थोर ॥२॥

स्वये निजधामा जाणे । राज्य कीजे बिभीषणे ॥३॥

मज वैर केले साहे । परी भक्तांचे न साहे ॥४॥

रामीरामदास म्हणे । दृढ भक्तीचेनि गुणे ॥५॥

४६५ .

शिरी आहे रामराज । औषधाचे कोण काज ॥१॥

जो जो प्रयत्न रामावीण । तो तो दुःखासी कारण ॥ध्रु०॥

शंकराचे हळाहळ । जेणे केले सुशीतळ ॥२॥

आम्हां तोचि तो रक्षिता ॥ रामदासी नाही चिंता ॥३॥

४६६ .

रे मनुष्ये काय द्यावे । एका रघुविरा मागावे ॥ध्रु०॥

उपमन्ये धांवा केला । क्षीरसिंधु त्या दिधला ॥१॥

धुरु शरण चक्रपाणी । अढळ शोभे तारांगणी ॥२॥

राम म्हणतां वदनी । गणिका बैसली विमानी ॥३॥

बाळमित्र निष्कांचन । त्याचे दरिद्र विच्छिन्न ॥४॥

दासी कुब्जा म्हातारी । केली लावण्य सुंदरी ॥५॥

शुकमिषे रामवाणी । म्हणतां पावन कुंटणी ॥६॥

शरणांगत निशाचर । राज्य देऊनी अमर ॥७॥

होता बंधूने गांजिला । तो सुग्रीव राजा केला ॥८॥

तया अंबरीषाकारणे । दहा वेळा येणे जाणे ॥९॥

रामदासी रामराव । निजपदी जाला ठाव ॥१०॥

४६७ .

धन्य धन्य ते वानर । जवळी राम निरंतर ॥१॥

ब्रह्मादिकां नातुडे ध्यानी । तो राम वानरी गोठणी ॥२॥

वेदश्रुतीस नाकळे महिमा । तो गुज सांगे प्लवंगमा ॥३॥

वानरवेषधारी देव । भाग्ये लाधला केशव ॥४॥

दास म्हणे दैवाचे । आवडते रघुरायाचे ॥५॥

४६८ .

हरि माझे जीवींचे जीवन । हरि माझे मनींचे मोहन ।

हरि माझे सर्व तनुमन । हरि वर देव पुरातन ॥१॥

हरि मज अंतरी भरला । भरोनियां उदंड उरला ।

सकळ देहधारकी पुरला । सेखी आपेआपचि मुरला ॥२॥

देह धरी त्यागी नानापरी । बहुगुण ते कळाकुसरी ।

लीळा ऐसी न दिसे दुसरी । येकला चि करी भरोवरी ॥३॥

आपणचि उंच नीच जाला । आपण चि तो भला शोभला ।

कितीएक वोळला क्षोभला । जगदंतरी तो भला लाभला ॥४॥

तरुवर शोभताती जळे । डोलताती पाने फूल फळे ।

कितीएक निवळ निवळे । तयांपरि पाळिजे गोवळे ॥५॥

तोचि एक गातो तो ऐकतो । वाजवी तो तोचि तो नाचतो ।

तिन्ही लोक कोण वर्तवीतो । आपणांसि आपण स्तवितो ॥६॥

दास म्हणे हे एक नवल । खोल तरी खोलाहुनी खोल ।

परोपरी बोलवितो बोल । तयावीण सर्व कांही फोल ॥७॥

४६९ .

भुकेल्यां भोजन तान्हेल्यां जीवन । देतो नारायण रे कृपाळूपणे ॥१॥

मनाची वासना पुरती कामना । धन्य जगज्जीवना कृपाळूपणे ॥२॥

धन्य विश्वंभरा धन्य जगदंतरा । ऐसा न दिसे दुसरा कृपाळूपणे ॥३॥

वेद नेति नेति सांगावे ते किती । दास म्हणे हे प्रचिती कृपाळुपणे ॥४॥

४७० .

संसारीचे दुःख मज वाटे सुख । राघवाचे मुख पाहतांचि ॥१॥

माझे सुख माझ्या राघवाच्या पायी । तेणे मी हृदयी निवईन ॥२॥

आम्हां नाही चिंता संसारी असतां । वाचे गुणे गातां राघवाचे ॥३॥

रामदास म्हणे राम सीतापति । तेथे मी विश्रांति पावईन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP