मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
देव

विविध विषय - देव

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


१९५ प्रेत्न आहे थोर पहावा विचार ॥ येण पैलपार पाविजेतो ॥१॥

पाविजे तो पार प्रारब्धेकरुनी । यत्न केल्या जनी होत नाही ॥२॥

होत नाही प्रेत्ने ऐसे काय आहे ॥ विचारुनी पाहे आलया रे ॥३॥

आलया रे प्रेत्न करितां फळेना ॥ होणार टळेना कांही केल्या ॥४॥

कांही तरे केले पाहिजे संसारी ॥ कांहीच न करी ऐसा कोण ॥५॥

ऐस कोण आहे प्रारब्धावेगळा ॥ होणाराची कळा वेगळी ते ॥६॥

वेगळीच कळा जाण जाणत्याची ॥ केल्याही होतेचि विवंचना ॥७॥

विवंचना नाना प्रकारे धांवती ॥ होणाराची गती भिन्न आहे ॥८॥

भिन्न आहे कळा धूर्त मनुष्याची ॥ तूर्त प्रेत्नाची फळश्रुती ॥९॥

फळश्रुती कैची पूर्वदत्तावीण । वाउगाचि शीण होत असे ॥१०॥

वेर्थ होतो शीण शोधिल्यावांचुनी । कांही केल्या जनी होत नाही ॥११॥

होत नाही परी अदृष्ट पाहिजे । तरीच लाहिजे सर्व कांही ॥१२॥

सर्व कांही प्रेत्न केलियाने होतो । आळशी पडतो सावकाश ॥१३॥

सावकाश जरी आळशी पडला । होणार ते त्याला होत आहे ॥१४॥

होत आहे परी प्रेत्नेवीण नसे । केल्यावीण होती अकस्मात ॥१५॥

भोग हे होताती पाठी लागताती । यत्नेवीण होती अकस्मात ॥१६॥

अकस्मात तरी प्रेत्नेचि भोगील । आळशी पडेल सावकाश ॥१७॥

सावकाश पडे तेथेचि होईल । होणारे येईल पूर्वदत्ते ॥१८॥

पूर्वदत्त केले प्रेत्न करुनियां । वाउगेचि वायां बोलतोसी ॥१९॥

बोलतोसी परी प्रारब्ध सोडीना ॥ धांवतीने जना होत नाही ॥२०॥

होत नाही जरी कां येत्न करिसी ॥ खातो जेवितोसी कासयासी ॥२१॥

कासयासी आतां वाउगे बोलणे ॥ खाणे हो जेवणे पूर्वरेखा ॥२२॥

पूर्वरेखा कोणी लिहिली अदृष्टी । हेच एक गोष्टी बरी पाहे ॥२३॥

पाहील कवण संचितावांचून । देहे कर्माधीन चालतसे ॥२४॥

चालतसे परी चालवावे लागे । कांही तरी मागे कोणीयेक ॥२५॥

कोणी येक मागे तो कैचे देईल । होणार होईल निश्चयेसी ॥२६॥

निश्चयेसी आतां होणार म्हणसी । कांहीच यत्नासी करुं नको ॥२७॥

करुं नको ऐसे व्यर्थचि उत्तर । पूर्वीच होणार होऊनी गेले ॥२८॥

होऊनी गेले आतां तरी कां करावे । उगेचि रहावे पडोनिया ॥२९॥

पडावे मरावे कपाळासारिखे । कपाळीचे चुके ऐसे नाही ॥३०॥

नाही नाही ऐसे त्वां तरी देखिले । कपाळ वाचीले कोणेपरी ॥३१॥

कोणेपरी आतां नवे होईना की । निर्मिले लोकिकी होत आहे ॥३२॥

होत आहे तो गे तोचि प्रेत्न जाण । प्रेत्नेवीण कोण जन्मा आला ॥३३॥

जन्मा आला नादाबिंदा भेटी जाली । विधिने लिहीली ओळी तेव्हा ॥३४॥

तेव्हां विधी कोणे स्थळी उभा होता । काशाने लिहितां होय तेथ ॥३५॥

तेथे काय होते हे कळे कोणासी । मानवी जिवासी काय ठावे ॥३६॥

ठावे नाही तरी ऐकेनासी कैसा । नेणोनि वळसा करितोसी ॥३७॥

करितोसी वायां व्यर्थ खटपट । लिहीले अदृष्ट पालटेना ॥३८॥

पालटेना तरी करंटे जाणावे । पापी पालटावे कोणेपरी ॥३९॥

कोणेपरी आतां अदृष्ट चुकते । न पेरितां होते धान्य कैसे ॥४०॥

कैसे होते आतां पेरिल्यावांचून । बोलिले वचन सांडूं नको ॥४१॥

सांडू नको ऐसे पालटते कैसे । सांगता ते कैसे कोणेपरी ॥४२॥

कोणेपरी आतां तुजसी बोलावे । निश्चयाच्या नंवे सुन्याकार ॥४३॥

सुन्याकार जाला प्रारब्धाने केला । पालटीतो याला कोण आतां ॥४४॥

कोण आतां करी सदैव निर्दैव । ब्रह्मादिक देव जोपारिले ॥४५॥

जोपारिले कैसे आहे ते बोलतो । कर्मे पालटीतो ऐसा कोण ॥४६॥

ऐसा कोण आहे जो वर्ते विचारे । मूर्ख अविचारे वर्तताती ॥४७॥

वर्तताती काय करिती प्रारब्धा । त्यासी बोल कदा ठेऊं नये ॥४८॥

ठेऊं नये ऐसे कोणासी म्हणावे । मूढ लोक देवे निंदीयेले ॥४९॥

निंद्य आणी वंद्य प्रारब्धाचा ठेवा । बोल काय देवा ठेवूनियां ॥५०॥

ठेऊनियां बोल देवासी भजावे । पाषांड त्यजावे विषयांचे ॥५१॥

विषय सोडुनी भजावे देवाला । देव होणाराला पालटीना ॥५२॥

पालटीना देव ऐसे म्हणो नये । देवचि उपाय भक्तजनां ॥५३॥

भक्तजन कष्टी होऊनियां गेले । देवें सोडविले नाहीत की ॥५४॥

नाही ते बोलतां अभक्त होइज । यातना भोगिजे परोपरी ॥५५॥

परोपरी मज कां भय सांगतां । कर्मे विघडितां देव कैचां ॥५६॥

कैचा देव ऐसे आम्हां ऐको नये । प्राप्त होती ठाय रौरवाचे ॥५७॥

रौरवाचे ठाय आपुली करणी । कर्मआचरणी ब्रह्मप्राप्ती ॥५८॥

गर्भवास होती पूर्वीच्या संचिते । आतां काही येथे यत्न नाही ॥६०॥

यत्न नाही कोण ज्या नाही कैपक्षी । भक्तजना रक्षी देवराणा ॥६१॥

देवराणा रक्षी हे कई घडावे । संचित जाणावे आपुलेचि ॥६२॥

आपुलाले पाप देव सोडविता । जाण हे तत्त्वतां निश्चयेसी ॥६३॥
निश्चयेसी देव प्रारब्धा आधीन । येथे भक्तजन काय करी ॥६४॥

काय करितोसी भक्ताचा कंटाळा । अहा रे चांडाळा कर्मबद्धा ॥६५॥

कर्माचे बांधले हरिहरदिक । मानवी हे रंक केवि सुटे ॥६६॥

केविं सुटे मूढ अभाविक जन । अपार पावन देवे केले ॥६७॥

देवासी बंधन ते कर्मा लागले । बंद सोडिविले देवे कैसे ॥६८॥

कैसे बोलतोसे मर्यादा सांडुनी । रावण मारुनी मुक्त देव ॥६९॥

देव मुक्त केले या रघुनायके । रावण कौतुके रक्षियेले ॥७०॥

रक्षीयेले तेणे दोषेचि बुडाला । पुरुषार्थ गेला एकाएकी ॥७१॥

एकाएकी जातो उपजला प्राणी । कर्माची करणी ऐसी आहे ॥७२॥

आहे यत्न कर्म तोडावयालागी । मुक्तीचे विभागी भक्तजन ॥७३॥

भक्त जन दोनी प्रारब्धापासूनी । प्रारब्धावांचूनी थोर नाही ॥७४॥

थोर नाही ऐसे कैसेनी जाणावे । रुप ओळखावे उभयांचे ॥७५॥

उभयता कोण प्रारब्ध प्रयत्न । आधी जे निर्माण तेंचि थोर ॥७६॥

थोर मूळमाया निराकारी जाली । प्रारब्धाची ओळी तेथे नाही ॥७७॥
नाही क्रियमाण तै शब्दस्फुरण । जे महाकारण ब्रह्मांडीचे ॥७८॥

ब्रह्मांडीचे महाकारण शरीर । मूळ निराकार परब्रह्म ॥७९॥

परब्रह्मी जाली मुळी मूळमाया । पुढे गुणमाया गुण करी ॥८०॥

गुण सत्व रज तम हे जाणावे । तेथुनी स्वभावे पंचभूत ॥८१॥

आकाशी पवन पवनी तो अग्न । आपोनारायण तेथूनीयां ॥८२॥

तेथूनियां पुढे अवनी जाहली । पुढे नाना वल्ली भूमिपोटी ॥८३॥

भूमिपोटी जाल्या औषधी निर्माण । तेथुनीयां अन्न प्रगटले ॥८४॥

प्रगटले अन्न प्रगटले रेत । तेथुनी जीवित्व पुरुषाचे ॥८५॥
पुरुषापासोनी उत्पत्ति वाढली । वेदशास्त्री बोली ऐसी आहे ॥८६॥

ऐसी बोली सत्य वेदशास्त्रवाणी । पुढे चारी खाणी प्रगटल्या ॥८७॥

प्रगटल्या वाणी तयांची प्रारब्धे । पुढे नाना भेदे जीवसृष्टि ॥८८॥

जीवसृष्टि जाली उत्पत्ति संहार । प्रारब्धवेव्हार ऐलीकडे ॥८९॥

ऐलीकडे कर्म मुळीचा तो प्रेत्न । श्रोती सावधान विवरावे ॥९०॥

विवरावे आधी प्रेत्न की प्रारब्ध । शास्त्रांतरी भेद ऐसा आहे ॥९१॥

आहे निराकार निर्मळ निश्चळ । तेथुनी चंचळ प्रेत्न जाला ॥९२॥

प्रेत्न जाला आधी म्हणोनियां थोर । प्रारब्ध विचार ऐलीकडे ॥९३॥

ऐलीकडे कर्म पाहतां भूतळी । प्रेत्न अंतराळी मुळारंभ ॥९४॥

आरंभापासूनी सर्वहि शोधावे । कर्म पडे ठावे विवरतां ॥९५॥

विवरतां सर्व आशंका फिटली । जाणतया भली विवंचना ॥९६॥

विवंचना अष्ट देहाची करितां । होय सार्थकता ज्ञानबोधे ॥९७॥

ज्ञानबोधे स्थूळ सूक्ष्म कारण । तो महाकारण चौथा देह ॥९८॥

विराटहिरण्य अव्याकृति जाण । मूळमाया खूण अष्ट देह ॥९९॥

अष्ट देह ऐसे पिंडब्रह्मांडीचे । निरसितां विवंचे दृश्य माया ॥१००॥

दृश्य माया मिथ्या साच परब्रह्म । दास म्हणे भ्रम मावळला ॥१०१॥

मावळला भ्रम रामगुण गातां । उपासना आतां सोडूं नये ॥१०२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP