१९६ .
म्हणे मी एक चांगला । शब्द ठेवी पुढिलांला ॥१॥
नाक नाही कान नाही । जिव्हा नाही डोळे नाही ॥२॥
हात लुले पाय लुले । अवघे दंत उन्मळले ॥३॥
अवगुणी कुलक्षणी ॥ दास म्हणे केली हानी ॥४॥
१९७ .
नाना प्रकारीचे गाणे । मीच बाळपणी जाणे ॥१॥
काय जाहले कळेना । एक तेहि आठवेना ॥२॥
मज पाठांतर होते । इतुके कोणासी नव्हते ॥३॥
रामदास म्हणे आतां । जीव जाहला दुश्चिता ॥४॥
१९८ .
आतां गाती नानापरी । परि ते नये माझी सरी ॥१॥
माझे गाणे कोणीकडे । काय गातील बापुडे ॥२॥
आतां पडला विसरु । आठवेना काय करुं ॥३॥
दास म्हणे भक्ति कैंची । ऐसी जाति अभिमानाची ॥४॥
१९९ .
संसाराचे दुःख आले । गाणे अवघेचि बुडाले ॥१॥
आतां आठवेना कांही । पडिले चिंतेचे प्रवाही ॥२॥
गाणे नाचणे सुखाचे । जिणे जाले ते दुःखाचे ॥३॥
म्हणे रामीरामदास । कोण करीतो सायास ॥४॥
२०० .
गाणे कांहीच येईना । तरि अभिमान जाईना ॥१॥
आले निकट मरण । तरि सोडिना मीपण ॥२॥
देह जाहले पंजर । म्हणे होतो मी सुंदर ॥३॥
रामदास म्हणे रिते । वेडे अभिमान धरिते ॥४॥
२०१ .
जेथूनियां प्रबळता । केली तेथेचि अहंता ॥१॥
ते सर्व हि जाणार । पुढे घातचि होणार ॥२॥
होतां वैभवाचा भर । जाली वृत्ति अनावर ॥३॥
दास म्हणे एकसरां । पडे देवासी का तरा ॥४॥
२०२ .
ओढवले पूर्वपाप । नाना प्रकारी संताप ॥१॥
तेणे शुद्धिच उडाली । नीति अवघीच बुडाली ॥२॥
केली क्रिया ते कळेना । मन विवेके वळेना ॥३॥
भरी भरले असे मन । अवघे ते चि कारण ॥४॥
झोंबे विकल्पाचे श्वान । देहबुद्धि घेते रान ॥५॥
रामीरामदास म्हणे । अवघी जाली कुलक्षणे ॥६॥
२०३ .
उगमी विष कालवले । तेंचि प्रवाही पडिले ॥१॥
आतां कोणीकडे जावे । कोण्या प्रकारे असावे ॥२॥
होता भूषणाचा ठाव । तेथे जाहला अभाव ॥३॥
मूळ अंतरी नावडे । जाले अवघेंचि वावडे ॥४॥
छाया शांतीची नावडे । क्रोध वणवा आवडे ॥५॥
रामदास म्हणे जल्प । जाला अंतरी विकल्प ॥६॥
२०४ .
सन्निपाताचे लक्षण । अवघे जाले कुलक्षण ॥१॥
जन कोणीच नावडे । आणि कल्पना आवडे ॥ध्रु०॥
अव्हासव्हाच बडबडी । होऊं पाहे देशोधडी ॥२॥
आणि क्रोधे पिसाळले । त्यासी कोण म्हणे भले ॥३॥
मना आले ते करावे । बळेंचि अव्हाटी भरावे ॥४॥
रामदास म्हणे खरे । ज्याचे त्यास वाटे बरे ॥५॥
२०५ .
करितां सांभाळा आपुला । दुःखे जीव भांबावला ॥१॥
पाहो जातां सारासार । कांही कळेना विचार ॥२॥
लोभे वृत्ति लांचावली । क्षोभे बुद्धि हे भंगली ॥३॥
रामीरामदास म्हणे । कोण उपाय करणे ॥४॥