विविध विषय - उपदेशपर
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
६२१.
धान्य अवघेंचि टाकिती । बळथ खातां तोंडी माती ॥१॥
देव सर्वांचे अंतरी । सोडूं जातां तैसा परी ॥२॥
तूप सांडोनी आपण । खाऊं पाहे सांठवण ॥३॥
रामदास म्हणे राउळा । सांडुनि पूजिती देउळा ॥४॥
६२२.
कांही दिसे अकस्मात । तेथे आले वाटे भूत ॥१॥
वायां पडावे संदेही । मुळी तेथे कांही नाही ॥२॥
पुढे देखतां अंधार । तेथे आला वाटे भार ॥३॥
झाडझुडूप देखिले । तेथे वाटे कोणी आले ॥४॥
पुढे रोविलासे डांभा । त्यासी म्हणे कोण उभा ॥५॥
रामदास सांगे खूण । भितो आपणा आपण ॥६॥
६२३.
छाया देखूनी आपुली । शंका अंतरी वाटली ॥१॥
ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणा आपण ॥ध्रु०॥
मुखे बोलतां उत्तर । तेथे जाले प्रत्युत्तर ॥२॥
डोळां घालितां अंगुळी । एकाची ते दोन जाली ॥३॥
पोटी आपण कल्पिले । तेंचि आलेसे वाटले ॥४॥
दास म्हणे रे उपाधी । शंका धरितां अधिक बाधी ॥५॥
६२४.
वाजे पाऊल आपुले । म्हणे मागे कोण आले ॥१॥
कोण धांवतसे आड । पाहो जातां जाले झाड ॥२॥
भावितसे अभ्यंतरी । कोण चाले बरोबरी ॥३॥
शब्दपडसाद ऊठिला । म्हणे कोण रे बोलिला ॥४॥
रामीरामदास म्हणे । ऐसी शंकेची लक्षणे ॥५॥
६२५.
वड पिंपळ वाढले । बहुसाल विस्तारले ॥१॥
परि ते जाणावे निर्फळ । त्याचे खातां नये फळ ॥ध्रु०॥
नाना वृक्ष फळेविण । परि ते जाणा निःकारण ॥२॥
दास म्हणे रे विचार । नसतां तैसे होती नर ॥३॥
६२६.
नेला संसारे अभ्यास । केला आयुष्याचा नाश ॥१॥
सदा उठतां बैसतां । लाभेंविण केली चिंता ॥२॥
नाही साक्षेपाच वेग । उगेचि मांडिले उद्वेग ॥३॥
रामीरामदास म्हणे । ऐसे जीतचि मरणे ॥४॥
६२७.
तीस लक्ष योनि वृक्षामाजी घ्यावा । जळचरी भोगाव्या नव लक्ष ॥१॥
अकरा लक्ष योनि किड्यांमाजी घ्याव्या । दश लक्ष भोगाव्या पक्ष्यांमाजी ॥२॥
वीस लक्ष योनी पशूंचिया घरी । मानवाभीतरी चारी लक्ष ॥३॥
एक एक योनी कोटि कोटि फेरा । मनुष्याचा वारा लागेंचिना ॥४॥
दास म्हणे तया संसारिया नरा । तयाचा मातेरा केला मूढे ॥५॥
६२८.
कांही कळेना विचार । अवघा जाला शून्याकार ॥१॥
उमजेना संसारिक । आठवेना परलोक ॥२॥
अंध विवरी पडले । अंधकारी सांपडले ॥३॥
मायजाळे गुंडाळले । वासनेने वेंटाळले ॥४॥
कामक्रोधे जाजावले । मदे मत्सरे पीडिले ॥५॥
रामीरामदास म्हणे । अज्ञानाची ही लक्षणे ॥६॥
६२९.
अंध अंधारी बैसले । त्यासि हाते खुणाविले ॥१॥
त्यास कळेना कळेना । त्याचि वृत्तिच वळेना ॥२॥
संतसंगाचे बोलणे । संसारिक काय जाणे ॥३॥
म्हणे रामीरामदास । केला नसतां अभ्यास ॥४॥
६३०.
मूर्ख तो संसारी माझे माझे करी । मृत्यु बरोबरी हिंडतसे ॥१॥
हिंडतसे काळ सांगाती सरिसा । मनी भरंवसा नेणोनियां ॥२॥
नेणोनियां प्राणी संसारासी आला । आला तैसा गेला दैन्यवाणा ॥३॥
दैन्यवाणा गेला सर्वही सांडोनी । ठेविले जोडुनी जनालागी ॥४॥
लागी हे लागली दोषांची सुटेना । अभक्ति तुटेना अंतरीची ॥५॥
अंतरीची मूर्ति अंतरली दुरी । कदाकाळी हरि आठवेना ॥६॥
आठवेना अंतकाळी रामेवीण । धन्य ते मरण दास म्हणे ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : January 26, 2011
TOP