विविध विषय - पादसेवन.
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
५८१.
भवव्यथेसि वैद्यराज । सद्गुरुचे पादांबुज ॥१॥
शरण जाई कां तयासी । आरोग्य दर्शनेंचि होसी ॥२॥
पाहोनि अधिकार हस्तका । तैसीच देताती मातृका ॥३॥
भाग्य जरि तो जोडे । पृथ्वीवरी भोंदु वाड ॥४॥
द्रव्यासाठी भोंदू भोंदू । त्यासी न करी संबंधु ॥५॥
रामीरामदास शरण । हरिल्या भवव्याधि दारुण ॥६॥
५८२.
विषयरुदन सोडूनियां द्यावे । त्वां निजी निजावे संतसंगे ॥१॥
संतसंगे बापा होई रे निश्चळ । मग तळमळ विसरसी ॥२॥
विसरसी दुःख संतांचे संगती । चुके अधोगती गर्भवास ॥३॥
गर्भवास आतां चुकवी आपुले । धरावी पाउले राघवाची ॥४॥
राघवाचे भक्त राघवी मिळती । भेटे सीतापती दास म्हणे ॥५॥
५८३.
अहो सद्गुरुची कृपा । जेणे दाखवी स्वरुपा ॥१॥
तो हा गुरु परब्रह्म । जेणे केले स्वयं ब्रह्म ॥२॥
धरा सद्गुरुचरण । जेणे चुकती जन्ममरण ॥३॥
अहो सद्गुरु तोचि देव । दास म्हणे धरा भाव ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 26, 2011
TOP