मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय १ ला

काशी खंड - अध्याय १ ला

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
॥ श्लोक॥
भस्मोद्धूलितगात्रं तु सूर्यकोटिसमप्रभम् ॥ एवंरुपं महादेवमुमाराघ्यं त्रिलोचनम् ॥१॥
विश्वरुपं महादेवं चंद्रार्धकृतशेखरम् ॥ नीलकंठं वृषारुढं शूलपार्णि महाबलम् ॥२॥
भुजाभिर्दशभिर्युक्तं पंचवक्त्रं दिगंबरम् ॥ उमया सहितं देवं नमामि वृषभध्वजम् ॥३॥

ॐ नमोजी गिरिजासुता ॥ तूं सर्व कार्यकारणकर्ता ॥ क्षरांक्षर पूर्ण भरिता ॥ तूंचि स्वामी मज ॥१॥
जयजयाजी विनायका ॥ एकदंता लंबोष्ठका ॥ भाललोचना गजमस्तका ॥ गजेंद्रा तूं एक ॥२॥
जो नरधड-मुंडवारण ॥ कटीं वासुकी वेष्टिला पूर्ण ॥ मस्तकीं मिरवे सिंदूरवर्ण ॥ अरुण रंग ज्यापरी ॥३॥
त्रयोदश चौकांची अंगीं उटी ॥ काद्रवयेसुतांचीं भूषणें कंठीं ॥ रत्नमणि प्रकाशले मुकुटीं ॥ अर्धचंद्र मस्तकीं ॥४॥
जयजयाजी गुणाब्धि ॥ चतुर्दशविद्यांचा क्षीराब्धि ॥ पूर्ण शीतकर व्योमंसांधि ॥ कृपाळू कविचकोरा ॥५॥
स्वामी तुझ्यां अनुग्रहें पूर्ण ॥ कवींस प्रकाशे पूर्ण ज्ञान ॥ जैसें तरुमूळीं घालितां जीवन ॥ पोषी नवपल्लवांते ॥६॥
जी तूं शब्द ना स्पर्श ॥ स्थूल ना सूक्ष्मांश ॥ जी तू गंध ना रसस्वरुपांश ॥ धुंडिराजा गजवदना ॥७॥
तुज शरण जी शिवनंदना ॥ मज वैखरी व्हावी जी प्राज्ञा ॥ प्रसन्न न होतां काव्यरचना ॥ आरुष सर्वथा दिसेल ॥८॥
जयजयाजी अव्यक्तअंकुरा ॥ जयजयाजी सिद्धिबुद्धिवरा ॥ जयजयाजी तूं निर्गुणाक्षरा ॥ स्वामी विनायका तूं ॥९॥
आता असो जी वर्णिता गणपती ॥ मी हीन दीन मंदमती॥ जैशी मार्तंडासी पंचारती ॥ कीजे कवण तेजें ॥१०॥
कीं तूं सर्व रत्नांचा सागर ॥ तुजसी केवीं कीजे शृंगार ॥ येणें शंकें बाधलों थोर ॥ तुझ वर्णितां गणाधीशा ॥११॥
ऐशिया गणा तुज प्रणाम ॥ जी तुम्ही स्वयंप्रकाश अगम्य अनाम ॥ परी तुम्ही भक्तांसी होतां सुगम ॥ कवित्वरचनेस्तव ॥१२॥
आतां नमूं देवी सरस्वती ॥ जी ब्रह्मात्मजा वीणा हातीं ॥ जी सर्व विद्या असे देती ॥ कविबाळकांसी ॥१३॥
तूं ज्ञानमूळ सर्वां निरंतर ॥ तूं निर्गुण निराकार ॥ परी भक्तीस्तव साकार ॥ होसी तूं ब्रह्मात्मजे ॥१४॥
तांबूल मिरवी अधरपुटीं ॥ क्षीरोदक शोभला कटितटीं ॥ उंचावळी दिसे पीन कुटीं ॥ हेमप्रभा कंचुकीची पैं ॥१५॥
खोपा भरिला मालतीबकुळीं ॥ सप्त स्वर गायनमंजुळी ॥ कीं तो समुद्र नवरसजळीं ॥ देतसे लहरी कृपेची ॥१६॥
कुंकुममळवट ॐकारभ्रुकुटीं ॥ रत्नप्रभा फांकतसे दशनदाटीं ॥ त्या गर्भी दिसे अधरपुटीं ॥ धरिले तेव्हां शुकें मुक्त ॥१७॥
ऐसी तूं परम योगिनी ॥ तूं विद्यारत्नांची पूर्ण खाणी ॥ तरी तूं कविकाजीं हंसवाहिनी ॥ धांवणे करीं लवलाहें ॥१८॥
तूं सर्व विद्यांचा अंकुरु ॥ शंकलों मी स्तुति केवीं करुं ॥ मुक्तहिर्‍यांपुढें मृन्मयं खापरुं ॥ विशोभित जयापरी ॥१९॥
ऐसी नमिली ते सरस्वती ॥ माझी हीन वैखरी नव्हे स्तुती ॥ जैसें गंगोदक गंगेप्रती ॥ तेणोंचि अर्घ्य देइजे ॥२०॥
आतां नमूं तो परम सद्‌गुरु ॥ जयासी न तुळती चिंतामणी कल्पतरु ॥ जो या भवममुद्राचें तारुं ॥ परात्पर अनादि जो ॥२१॥
ऐसा नमिला कैवल्यंदानी ॥ जो शब्दांजनें लेववी श्रवणीं ॥ तेणें दृश्य होतसे खाणी ॥ विद्यारत्नांची ॥२२॥
जैसा देखंणा अंधांतें चाळी ॥ कीं सूत्रधारी खेळवी काष्टबाहुली ॥ तैसी बोलवी नव्हाळी ॥ नवरसांची पैं ॥२३॥
ऐसा तो नमिला पूर्ण गुरु ॥ तेणें मज दिधला अभयकरु ॥ म्हणे आतां कथीं रे पुढारु ॥ पुराणप्रसिद्ध पैं ॥२४॥
आतां नमूं तो वसिष्ठ वेदमूर्ति ॥ जयाची परम पतिव्रता अरुंधती ॥ त्रिभुवनी जयाची पुत्रसंतती ॥ पराशरादिक ॥२५॥
तयापासूनि कृष्ण्द्वैपायन ॥ जेणें कथिलीं अष्टादश पुराणें ॥ तो नमिला व्यास वैशंपायन ॥ आणि वाल्मीक महामुनी ॥२६॥
आतां नमूं श्रोतेजन ॥ मूढ अथवा महाविचक्षण ॥ परिपूर्ण शास्त्रश्रवण ॥ देती जे अहर्निशीं ॥२७॥
जो कां व्यास सत्यवतीसुत ॥ अष्टादश पुराणें कथीत ॥ त्यानें संतोषविला भवानीकांत ॥ होऊनि वक्ता सर्वांपरी ॥२८॥
चार वेदांचे केलें मथन ॥ कथिलीं अष्टादश पुराणें ॥ तरी तीं आतां कवण कवण ॥ व्यासवाक्य कथिते जाहले ॥२९॥
प्रथम भवानीनें प्रश्न केलें ॥ मग शंकरें तियेसी निरुपिलें ॥ तें वेदशास्त्रे मथूनि काढिलें ॥ सत्यवतीसुतें ॥३०॥
प्रथम शिवपुराण कथिलें ॥ तें चोवीस सहस्त्र संख्येसी आलें ॥ व्यासाच्या निजमुखें व्यक्त झालें ॥ त्रैलोक्यमंडळामाजी ॥३१॥
दुसरें तें विष्णुपुराण ॥ तें तेवीस सहस्त्र संख्या जाण ॥ तें महाशक्तीप्रती पंचानन ॥ निवेदित सविस्तर ॥३२॥
आतां तृतीय ब्रह्मपुराणाची संख्या ॥ दश सहस्त्र असे देखा ॥ तेथें गिरिजेची आशंका ॥ म्हणोनि शिवें कथियेलें ॥३३॥
मग चौथें पुराण भविष्योत्तर ॥ त्याची संख्या केली जे साचार ॥ चौदा सहस्त्र सविस्तर ॥ आणिक वरी पांचशतें ॥३४॥
मग पांचवें तें लिंगपुराण ॥ जें बहुप्रीतीं प्रश्न केला गिरिजेन ॥ तें एकादश सहस्त्र संख्या संपूर्ण ॥ गणित असे सर्व ॥३५॥
आतां ब्रह्मांडपुराण जें सहावें ॥ त्याची संख्या जाहलीसे स्वभावें ॥ तें द्वादश सहस्त्र महादेवें ॥ कथिलें जाण गिरिजेसी ॥३६॥
आतां सार सर्व पुराणांसी ॥ तया स्कंदपुराणाची संख्या ऐसी ॥ तें एकशत सहस्त्र एक्यायशीं ॥ कथिलें शिवें साक्षेपें ॥३७॥
आतां आठवें पद्मपुराण ॥ त्याची संख्या सहस्त्र छप्पन्न ॥ तें भवानीप्रती पंचानन ॥ निरुपीतसे आदरेंसी ॥३८॥
नव सहस्त्र पांच शतें ॥ तें मार्कंडेयपुराण निगुतें ॥ शिवें शक्तीस निरुपिलें निश्चितें ॥ तें नवम पुराण जाणीजे ॥३९॥
यानंतर पुराण जें दहावें ॥ त्या नाम मत्स्य ऐसें जाणावें ॥ तें गिरिजेप्रती सदाशिवें ॥ चतुर्दश सहस्त्र कथियेलें ॥४०॥
आतां एकादशावें कूर्म पुराण ॥ तें चोवीस सहस्त्र संख्या जाण ॥ दाक्षायणीप्रती भाललोचन ॥ कथिता जाहला साक्षेपें ॥४१॥
आतां द्वादशावें वाराहपुराण ॥ तें चोवीस सहस्त्र संख्या पूर्ण ॥ तें हैमवतीप्रती पंचानन ॥ निरुपिता जाहला पूर्वीच ॥४२॥
आतां त्रयोदशाची व्याख्या ॥ भवानीप्रती सांगे संख्या ॥ त्या अग्निपुराणाची लेखा ॥ पंधरा सहस्त्र चार शतें ॥४३॥
चतुर्दशावें ब्रह्मवैवर्तक ॥ तें अष्टादश सहस्त्र सम्यक ॥ तें दाक्षायणीप्रती त्र्यंबक ॥ विज्ञापीत पूर्वीच ॥४४॥
पंचदशावें नारदपुराण ॥ पंचवीस सहस्त्र संख्या पूर्ण ॥ मग षोडशावें तें वामन ॥ दश सहस्त्र संख्या नेमस्त ॥४५॥
आतां नवदश सहस्त्र जाणावें ॥ तें गरुडपुराण असे सतरावेंम ॥ अष्टादश सहस्त्र अठरावें ॥ श्रीमद्भागवत तें ॥४६॥
ऐसी अठरा पुराणांची संख्या ॥ चार लक्ष सात सहस्त्र परीक्षा ॥ आणि पांच शत हे शिवमुखा- ॥ पासाव जाहली ॥४७॥
परी या सर्वांचें सार ॥ अनुवादले उमा हर ॥ ते व्यासवाणी परिकर ॥ सांगों महाराष्ट्रभाषा ॥४८॥
नाना सुमनांचा आमोद आणून ॥ मधुमक्षिकीं रचिलें जीवन ॥ तैप्तें स्कंडपुराणींचे वेंचून ॥ काढिलें काशीखंड हें ॥४९॥
श्रोते ऐका एकाग्र श्रवणीं ॥ काशीखंडकथा त्रिभुवनीं ॥ हें बोलिले स्कंदपुराणीं ॥ महाअनुपम श्रेष्ठ जें ॥५०॥
आर्ष माझें जी वक्त्र ॥ परी काशीखंडंकथा पवित्र ॥ दाक्षायणी आणि त्रिनेत्र ॥ अनुवादले थोर संतोषें ॥५१॥
पहाहो सुवर्ण पवित्र शरीरीं ॥ त्यासी पिटिती लोष्टलोहावरी ॥ इतुकियानें अलंकारी ॥ विशोभित काय जाहलें ॥५२॥
नानावर्ण धेनु भलती असे ॥ परी पयोमृतांत फेर नसे ॥ तरी तें आरोग्य पयपीयूषें ॥ प्रिय असे महाजनां ॥५४॥
ऐसी माझी आर्ष वैखरी ॥ लाख घालिजे कनकउदरीं ॥ रत्नमणि जडिजे तयेवरी ॥ तैंच शोभा पावती ते ॥५५॥
असो आतां हें दृष्टांतवर्णन ॥ आरसा केवीं पाहिजे कंकण ॥ तरी प्रत्यक्षासी प्रमाण ॥ करणें केवीं असे पैं ॥५६॥
श्रोतीं व्हावें सावधान ॥ कथेसी लाविजे श्रवण ॥ तेणें होतसे गा दहन ॥ मनोमळांचें पैं ॥५७॥
जें चतुर्वेदांसी अगोचर ॥ क्षीरार्णवाहूनि गंभीर ॥ सुवर्णाचळाहूनि निर्धार ॥ अगम्य अमृत जीवांसी ॥५८॥
तरी ते स्कंडपुराणीं ॥ काशीखंडकथा त्रिभुवनीं ॥ कीं जैसा प्रकटलिया वन्ही ॥ निर्दाळी तैसें पापांतें ॥५९॥
श्रोती व्यर्थ न म्हणिजेति शब्द ॥ हा उमाशंकरांचा पूर्ण संवाद ॥ श्रवणें पठणें होय आनंद ॥ श्रोतयागृहीं सर्वदा ॥६०॥
तंव प्रश्न करी शैलबाळी ॥ तियेसी कथीतसे चंद्रमौळी ॥ ऐक म्यां निर्मिल पृथ्वीतळीं ॥ काशीखंड दहावें ॥६१॥
तरी सप्तद्वीपवतीमाझारीं ॥ त्या सुवर्णाचळाचे दक्षिणापारीं ॥ उत्तम असे प्राणेश्वरी ॥ जंबुदीप सर्वांमाजी श्रेष्ठ ॥६२॥
तयामध्यें असती दोन गिरी ॥ तव पिता आणि विंध्याद्रि ॥ त्या दोहोंमध्यें असे सुंदरी ॥ आनंदवन सुसेव्य ॥६३॥
ऐसें तें व्यासाचें प्रिय वचन ॥ पंचक्रोशी केलें प्रमाण ॥ तरी ही व्यापूनियां त्रिभुवन ॥ अलिप्त असे वाराणसी ॥६४॥
क्षितीमाजीं अर्ध काशी ॥ आणि अर्ध असे आकाशीं ॥ हे आपुली इच्छा राहावयासी ॥ निर्माण केली शंकरें ॥६५॥
तरी त्या विश्वनाथाची इच्छा पूर्ण ॥ वाराणसी जाहली निर्माण ॥ तेथें नारदाचें जाहलें येणें ॥ कोणे एके काळांतरीं ॥६६॥
तेणें मणिकर्णिकेंत केलें स्नान ॥ विश्वनाथासी केलें अभिनंदन ॥ मग करिता जाहला गमन ॥ ॐकारेश्वरासी ॥६७॥
शिवदास प्रार्थी श्रोतां ॥ कथेसी सादर असावें आतां ॥ स्थिर करुनियां चित्ता ॥ परिसा आतां अहर्निशीं ॥६८॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे मंगलाचरणवर्णनं नाम प्रथमाध्यायः ॥१॥
॥ इति प्रथमाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP