काशी खंड - अध्याय १४ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
हुडे उभविले रत्नमाणिकांचे ॥ कळस मिरवती चौसष्टीचे ॥ दिसती मंडप पाचूचे ॥ सोम-सूर्यांसमान ॥३॥
भूमिका बांधिली सोमकांतीं ॥ त्यामाजीं प्रासादधामें बिंबती ॥ जैसा जळीं दिसे तारापती ॥ नक्षत्रांसह ॥४॥
ऐसी ते अलकापुरी सगुण ॥ तेरा सहस्त्र योजनें विस्तीर्ण ॥ शिवशर्म्यासी विष्णुगण ॥ सांगते झाले प्रीतीनें ॥५॥
नवनिधी जयाच्या हातीं ॥ तो कुबेर येथींचा अधिपती ॥ ऐसी ते पुरी अलकावती ॥ किती वर्णावी कैसी हो ॥६॥
अवधी हेमरत्नांची उभवणी ॥ तेजें लोपती शत एक तरणी ॥ कल्पतरु कामधेनु चिंतामणी ॥ घरोघरीं सर्वांचे ॥७॥
तैं शिवशर्मा पुसे गणांसी ॥ हा कुबेर अलकापुरनिवासी ॥ हें कवण पुण्यसामर्थ्यें जोडलें यासी ॥ तें सांगा जी गणोत्तमा ॥८॥
कुबेर हा कोण कवणाचा ॥ कवण माता पिता असे याचा ॥ हा झाला सखा शिवाचा ॥ कैशा गुणें सांगा तें ॥९॥
ऐसें याचें कवण तप ॥ जेणें जोडलें शिवस्वरूप ॥ ऐकोनि म्हणती बरा प्रश्न केला साक्षेप ॥ शिवशर्म्या सर्वज्ञा ॥१०॥
प्रश्न नव्हे गा सोपा ॥ जेणें पराभविलें महापापा ॥ उघडिल्या तुवां कुलुपा ॥ पुण्यमांदुसेचिया ॥११॥
तोडूनि कर्मबंधनश्रृंखळा ॥ निर्वाणमार्ग केला मोकळा ॥ तुझे प्रश्न गंगाजळा ॥ परीस अधिक वाटती ॥१२॥
जरी तेथें घडे श्रवणस्नान ॥ महापापा होतसे दहन ॥ आणि पतित होती पावन ॥ कैवल्यपदा पावती ते ॥१३॥
आतां परियेसीं कुबेराची कथा ॥ जेणें हरेल भवभयव्यथा ॥ ऐशिया पुण्य परमार्था ॥ अंगीकारावें सकळिकीं ॥१४॥
कलिंगदेशामाझारीं ॥ कांपिल्या नामें असे नगरी ॥ तेथें कपिलेश्वर त्रिपुरारी ॥ असे महास्थावर ॥१५॥
त्या कांपिल्यनगरीं असे ब्राह्मण एक ॥ यज्ञदत्तनामें पुण्यश्लोक ॥ कर्मकाष्ठांवरी पावक ॥ होता तो अग्निहोत्री ॥१६॥
दीक्षितायणी नामें ब्राह्मणी ॥ ती यज्ञदत्तची कुटुंबिनी ॥ एक पुत्र झाला तिजलागुनी ॥ तया नाम गुणनिधी ॥१७॥
ते पतिव्रता गुणसुंदरी ॥ यज्ञदत्त तो महासुशीलाचारी ॥ आणि पुत्र झाला तो दुराचारी ॥ सप्त दुर्व्यसनी जाण पां ॥१८॥
झाला परद्वारी आणि तस्कर ॥ सुरापानी खेळे जुगार ॥ षट्कर्में आणि सुशीलाचार ॥ प्रहरिला तेणें सर्वदा ॥१९॥
न करी शौचविधी संध्या स्नान ॥ अध्ययन यजन याजन याजन ॥ विश्वदेव ना भिक्षाटन ॥ सर्व त्यजिलें तेणें ॥२०॥
सद्बुद्धीचा मानी त्रास ॥ कुबुद्धीचा धरी हव्यास ॥ सप्त व्यसनी निंद्य तामस ॥ सद्गुण एकही नसेचि ॥२१॥
गुणनिधीसी उपदेशी पितर ॥ म्हणे न टाकीं रे कुलाचार ॥ कुलधर्म प्रहरी जो नर ॥ तो जाय अधःपातासी ॥२२॥
ऐसें उपदेशूनि पुत्रासी ॥ यज्ञदत्त जाय स्नानानुष्ठानासी ॥ मागें पुत्र जाय खेळावयासी ॥ द्यूतकर्म सर्वदा ॥२३॥
तो स्वगृहींचें द्रव्य चोरी ॥ द्यूतकमीं नेऊनि हारी ॥ माताही शिकवी परोपरी ॥ परी तो नायके सर्वथा ॥२४॥
जैसा क्षीरें प्रक्षाळिला वायस ॥ परी तो वर्ण सांडूनि न होय हंस ॥ तैसें सांगतां गुणनिधीस ॥ न सांडी तो देहस्वभाव ॥२५॥
इक्षुदंडाविण न होय शर्करा ॥ उत्तम गुण कैंचे दुराचारा ॥ जैसा पुष्पीं सुंदर पांगारा ॥ परी तो न ये उपयोगातें ॥२६॥
तैसा तो नामें गुणनिधी ॥ परी नामासारखी नाहीं बुद्धी ॥ ऐसा तो दुष्ट कुबुद्धी ॥ जन्मला पुत्र ॥२७॥
यज्ञदत्त येऊनि गृहासी ॥ मग पुसे दीक्षितायणीसी ॥ पुत्र काय करितो आम्हांसी ॥ तें सांग समूळ तूं ॥२८॥
मग ती वदली पतिव्रता ॥ पूत्रें देवार्चन सारिलें आतां ॥ भोजन करोनि तत्त्वतां ॥ गेला बाहेर मित्रांसहित ॥२९॥
मग यज्ञदत्त म्हणे कांतेसी ॥ जो उपदेश पुत्रातें करिसी ॥ तें शुभाशुभ तुमचें तुम्हांसी ॥ उपयोगातें येईल ॥३०॥
आतां करावया स्नान ॥ कांते देईं वेगीं जीवन ॥ आम्हां साधावया अनुष्ठान ॥ होतसे विलंब ॥३१॥
आम्हां त्वरा असे अनुष्ठानाची ॥ हे मुद्रिका ठेवीं नव रत्नांची ॥ यज्ञदत्तें काढोनि करींची ॥ दिधली कांतेपासीं ॥३२॥
मग कांतेनें घातलें स्नान ॥ देवार्चन सारी ब्राह्मण ॥ जप तप अनुष्ठान ॥ वैश्वदेव पूजन करी मंत्रविधी ॥३३॥
मग यज्ञदत्त गेला जप करूं ॥ तंव गृहासी आला तो कुमरू ॥ मातेसी म्हणे आहारू ॥ घालीं शीघ्न मजलागीं ॥३४॥
तंव बोलिली दीक्षितायणी ॥ पुत्रा तूं जन्मलासी जैंपासूनी ॥ तैंपासूनी भंडवणी ॥ जगामाजीं जाहाली ॥३५॥
पाहें मात तव पित्याची ॥ उपमे समता विरिंचीची ॥ आणि त्याचिया योग्यतेची ॥ हानी केली सर्वस्वें ॥३६॥
स्वायंभु नामें महाऋषी ॥ दो कन्या झाल्या तयासी ॥ एक दिधली अत्रीसी ॥ तियेसी नाम अनसूया ॥३७॥
दुसरी दिधली तुझिया पितामहचरणा ॥ तिचें नाम शुभलोचना ॥ ती सासू होती सगुणा उपमेसी ॥३९॥
तैसा सर्व पदार्थीं अधिक ॥ सर्वज्ञ असे तुझा जनक ॥ याचे उदरीं तूं एकुलता एक ॥ ऐसा कैसा झालासी ॥४०॥
जैसें मंदाकिनीचें निर्मळ जळ ॥ तैसें द्विपक्षीं शुद्धकुळ ॥ तें जन्मांपरींचेंही दुर्बल ॥ नसेचि जाण सर्वथा ॥४१॥
परी तूं कवणासारिखा जाहलासी ॥ परम दुर्गुणी जन्मलासी आमुचे कुशीं ॥ अहोरात्र जातसे तुजसी ॥ दोषीं दारुणीं वर्ततां ॥४२॥
जैं तूं संभवलासी उदरीं ॥ तैं मी दुश्चित्त नव्हतें क्षणभरी ॥ ते घटिका पळाक्षरी ॥ होती वेळा सुलग्नाची ॥४३॥
मग जाहलिया प्रातःकाळ ॥ पाहिलें स्वामीचें मुखकमळ ॥ तथापि तूं दुरात्मा अमंगळ ॥ झालासी कोणासारिखा ॥४४॥
ऐसा तूं लाजिरवाणा कुमर ॥ तुवां प्रहरिला सर्व कुलाचार ॥ तुझे दोष परिसतील जरी पितर ॥ तरी ठाव नाहीं मजलागीं ॥४५॥
किती संपादूं तुझे अवगुण ॥ शिकवितां न लागे अल्पही गुण ॥ वर्तसी अपवित्र अवगुण ॥ निर्माण झालासीं आमुचे कुळीं ॥४६॥
जळीं असतां पाथर ॥ तो अंतरीं न भिजे अणुमात्र ॥ कीं शुद्ध भूमिका सांडूनि खर ॥ लोळे स्मशानीं राखेवरी ॥४७॥
जैसें अमंगळ प्रिय सूकरासी ॥ तैशापरी सप्त व्यसनें प्रिय तुजसी ॥ जन्मलासी माझिये कुशीं ॥ महाचांडाळ अपवित्र ॥४८॥
तुझें विलोकी जो वदन ॥ तोही पुरुष होय अवलक्षण ॥ मग तो गुणनिधी धांवोन ॥ झोंबला कंठीं मातेच्या ॥४९॥
म्हणे क्षुधा लागली दारुण ॥ तुझें राहूं दे शास्त्रपुराण ॥ मज घाली वो शीघ्र भोजन ॥ म्हणोनि ओढी तियेसी ॥५०॥
म्हणे भोजन घालीं झडकरी ॥ आजपासून न जाय मी बाहेरी ॥ आतां तुझी जरी अवज्ञा करीं ॥ तरी मी मात्रागमनी साचार ॥५१॥
मग माता भोजन देत कुमरा ॥ बरबें घृत क्षीर शर्करा ॥ महामिष्टान्न जें सुरवरां ॥ दुर्लभ तें अन्न वोगरिलें ॥५२॥
मग म्हणे ते दीक्षितायणी ॥ त्या गुणनिधि पुत्रालागुनी ॥ कुकर्म करितां या त्रिभुवनीं ॥ सांग कोण उद्धरला ॥५३॥
तुवां करावें वेदाध्ययन ॥ आणि त्रिकाळ संध्यास्नान ॥ यजन याजन भिक्षाटन ॥ वर्तावा कुळधर्म आपुला ॥५४॥
जेणें विबुधजनां संतोष ॥ ते बुद्धीं वर्तावें विशेष ॥ जन बोले जयां निर्दोष ॥ ते देवासी प्रिय सर्वदा ॥५५॥
ऐसी ते दीक्षितायणी ॥ शिकवी गुणनिधि पुत्रालागुनी ॥ त्या श्रमें खिन्न होऊनी ॥ निद्रित झाली नावेक ॥५६॥
तंव ते श्रमनिद्रेची लहरी ॥ सुषुप्ति प्रकटली शरीरीं ॥ नवरत्नांची मुद्रिका करीं ॥ होती तियेच्या ॥५७॥
पुत्रें शीध्र सारूनि भोजन ॥ पूर्ण न करितां मुखप्रक्षालन ॥ मुद्रिका घेतली काढून ॥ मातेचे करींची ॥५८॥
मग तो निघाला झडकरोनी ॥ नेऊनि हारविली द्यूतव्यसनीं ॥ मग ते जागृत झाली ब्राह्मणी ॥ तंव न देखे पुत्रासी ॥५९॥
करीं जंव पाहे दीक्षितायणी ॥ तंव मुद्रिका न देखे नयनीं ॥ म्हणे नेली अर्भकें काढुनी ॥ आतां कैसें करावें ॥६०॥
मग ते पुत्राचिया अवगुणा ॥ उघड न करीच जाणा ॥ तंव करावया भोजना ॥ ऋषि येत गृहासी ॥६१॥
दीक्षितायणीसी म्हणे ब्राह्मण ॥ पुत्र न देखों करितां अध्ययन ॥ श्रवणीं ऐकतों त्याचे अवगुण ॥ सर्व जनांच्या मुखेंसीं ॥६२॥
आम्हां येणें होतांचि गृहासी ॥ गृहीं न देखों कधीं पुत्रासी ॥ त्याचे अवगुण ठाउके तुजसी ॥ ते आम्हांसी न बोलसी कां ॥६३॥
मग ते म्हणे स्वामीसी कांती ॥ पुत्रें देवतार्चन केलें आतां ॥ भोजनविधी सारोनि तत्त्वतां ॥ मित्रांसमवेत गेला तो ॥६४॥
यज्ञदत्त म्हणे वो कांते ॥ शुभलक्षणे पतिव्रते ॥ तूं असत्य बोलसी गुणवंते ॥ न मानिसी आमुचिया शब्दासी ॥६५॥
अस्तु बरा शिकवा कुमर ॥ अथवा करा त्याचा अव्हेर ॥ जरी करिसी त्याचा अंगिकार ॥ तरी तूं मुकसीं निजहिता ॥६६॥
मग यज्ञदत्तें शांतवूनि मन ॥ केलें वैश्वदेव पूजन ॥ मग नैमित्तिक अनुष्ठान ॥ साधावया निघाला ॥६७॥
तंव कांपिल्य नगरीचा चौधरी ॥ यज्ञदत्तें देखिला जुंवारी ॥ तंव ते मुद्रिका त्याचे करीं ॥ देखिली ब्राह्मणें अवचित ॥६८॥
ते मुद्रिका देखूनि नवरत्नांची ॥ द्विज म्हणे हे तुम्हांसी प्राप्त कैंची ॥ हे तुम्हीं चोरिली आमुची ॥ महातस्कर होसी तूं ॥६९॥
येरवीं हे तुम्हां कैंची प्राप्त ॥ आतां सांपडलेति अकस्मात ॥ तुम्हांसी नेऊनि आतां त्वरित ॥ करीन प्राप्त बंदिखाना ॥७०॥
तो ब्राह्मणासी म्हणे जुंवार ॥ तुझा पुत्र कां नव्हे तस्कर ॥ तेणें आणोनि साचार ॥ द्युतकर्मीं हरियेली ॥७१॥
तूं शिकवीं रे तुझ्या पुत्रासी ॥ तस्कर न म्हणावें आम्हांसी ॥ तव पुत्राचे अवगुण तुजसी ॥ करूं आतां निरूपण ॥७२॥
आम्ही असतां आपुले घरीं ॥ तुझा पुत्र आम्हांतें पाचारीं ॥ स्वगृहींच्या वस्तु आणोनि हारी ॥ द्यूतकर्मीं नित्य नित्य ॥७३॥
माझे मातेचा पीतांबर ॥ काल जिंकी तुझा कुमार ॥ तें उचित दिधलें चीर ॥ वृषलीसी नेऊनियां ॥७४॥
आज मीं ही जिंकिली मुद्रिका ॥ तुझा पुत्र तुज असे ठाउका ॥ आणि तस्कर म्हणसी आम्हां निका ॥ कवण्या गुणें ॥७५॥
तूं ब्राह्मण सुशीलाचारी ॥ आणि तुझा पुत्र तस्कर जुगारी ॥ आणि सप्त व्यसनें करी ॥ शूद्रिणीसमागमें ॥७६॥
तूं तरी महायोग्य ब्राह्मण ॥ परी महानष्ट तुझा नंदन ॥ क्षणभरी कुकर्मावांचून ॥ नव्हे स्थिर मन त्याचें ॥७७॥
तूं सत्कमीं नित्याचारी ॥ आणि तुझा पुत्र मत्स्याहारी ॥ दुष्ट वृषलीचे घरीं ॥ अन्न भक्षी निरंतर ॥७८॥
तुझे धरींच्या वस्तु तत्त्वतां ॥ त्या पुत्रें खेळूनि हारदिल्या द्यूता ॥ विस्तार सांगतां यज्ञदत्ता ॥ परम खेद पावशील ॥७९॥
देवांसी प्रिय जीं नाना वस्त्रें ॥ हेममंडित यागपात्रें ॥ हिरे अविंध मुक्तें विचित्रें ॥ हारविली तव पुत्रें खेळूनी ॥८०॥
ऐसीं जुगारीं तुझिया पुत्रें ॥ द्रव्यें वेंचिलीं अपारें ॥ यापरी निंद्य कुकर्म सारें ॥ स्वीकारिलें जाण पां ॥८१॥
यापरी तुझा कुमर ॥ करीतसे अनाचार ॥ मग वदनीं लावोनियां पदर ॥ निघाला तेथूनि यज्ञदत्त ॥८२॥
मग मनीं करीतसे विचार ॥ म्हणे म्यां कैंचा हटकिला जुंवार ॥ तस्कर झालों देतां परिहार ॥ माझाचि मी ॥८३॥
मनीं प्रज्वळला कोधाग्न ॥ तेणें टाकिलें ध्यानधारण ॥ त्यजूनि होम अनुष्ठान ॥ निघता झाला तेधवां ॥८४॥
नाना सुगंध सेवितां घ्राणीं ॥ दुर्गंधी उपजे जैसी कोठूनी ॥ तैसा खोंचला मनीं ॥ यज्ञदत्त विप्र तो ॥८५॥
मग अधोद्दष्टी पाहे भूमंडळीं ॥ अंचळ घालोनियां मौळीं ॥ क्रोधाग्नीनें व्यापिला ह्रदयकमळीं ॥ गंगातीरीं आला सत्वर ॥८६॥
दुष्ट शब्द झाले श्रवण ॥ म्हणोनि स्नान करो तो ब्राह्मण ॥ मग धरोनियां मौन ॥ बैसला थोर चिंता करीत ॥८७॥
तंव तो पुत्र आला घरासी ॥ भोजन मागे मातेपासीं ॥ ते शिकविती झाली पुत्रासी ॥ या गुणनिधीकारणें ॥८८॥
अरे सर्वज्ञ तुझा पितर ॥ त्यासी मानिती लोक समग्र ॥ आणि विद्येसी प्रहारूनि अनाचार ॥ धरिला तुवां हें काय ॥८९॥
अरे विद्येसारिखें निधान ॥ प्रहरोनि स्वीकारिसी दुर्गुण ॥ विद्येविरहित सर्व शरीर शून्य ॥ जैसें कटु तुबिनीफळ ॥९०॥
अरे विद्या म्हणिजे अमृतवल्ली ॥ इच्छाफळें अवकाळीं फळली ॥ म्हणोनि स्पर्धा पावली ॥ कामधेनूची ॥९१॥
राजा पूज्य आपुले मंडळीं ॥ विद्या पूज्य भूमंडळीं ॥ ऐसा उपदेश मूर्खाजवळी ॥ करूनि काय साफल्य ॥९२॥
आतां मुद्रिका नवरत्नांची ॥ त्वां नेली माझिया करींची ॥ ते देईं गा तुझिया पितयाची ॥ आधीं आणोनि मजलागीं ॥९३॥
परी तो न सांडी दुष्टबुद्धी ॥ मातेसी म्हणे तो गुणनिधी ॥ मज भोजन घालिसी आधीं ॥ तरी मी देईन मुद्रिका ॥९४॥
मग मातेनें दिधलें भोजन ॥ तें अंगीकारी कंठप्रमाण ॥ मौनेंचि करोनि आचमन ॥ गेला पळोनि बाहेरी ॥९५॥
यज्ञदत्त न करी अनुष्ठान ॥ पुत्राचे परिसोनि अवगुण ॥ परम खेदें झाला क्षीण ॥ आला परतोनि सदनासी ॥९६॥
मग म्हणतसे कांतेसी ॥ पुत्र कोठें तो न सांगसीं आम्हांसी ॥ तूं मजसीं असत्य बोलसी ॥ न होसी जाण पतिव्रता ॥९७॥
आतां आम्ही न बोलों सर्वथाही ॥ आणि तुजही न म्हणों कांहीं ॥ पुत्र दुराचारी परम अन्यायी ॥ न सांगसी हित त्यातें ॥९८॥
आम्ही करितां अनुष्ठान ॥ कोणें मुद्रिका दिधली दान ॥ ते तुजजवळ दिधली आणून ॥ ते मज देईं झडकरी ॥९९॥
तंव ती म्हणे मी असें सोंवळी ॥ मुद्रिका बांधिलीसे पट्टकूलीं ॥ मज अन्नपाकाचिये वेळीं ॥ मागतां तरी काय करावें ॥१००॥
आतां मी नसें स्वस्थ मनें ॥ निपजवीतसें पक्वान्नें ॥ मुद्रिका तुमची तुम्हांकारणें ॥ पाहोनियां देईन ॥१०१॥
तंव कोपला तो यज्ञदत्त ॥ म्हणे पाक राहों देईं समस्त ॥ तू आणि तुझा पुत्र त्वरित ॥ जावें गृहाबाहेरी ॥१०२॥
तूं आणि तुझे पुत्रासी ॥ सर्वथा कारण नाहीं आम्हांसी ॥ तुम्ही तरी आजिचे दिवशीं ॥ मेलांच सर्वथा आम्हांतें ॥१०३॥
म्हणोनि दर्भ आणोनि वेगवत्तर ॥ स्त्रीपुत्रांचें केलें कर्मांतर ॥ पिंडदान करूनि द्विजवर ॥ काय करी तेधवां ॥१०४॥
बाहेर घातलीं स्त्रीसुत ॥ मग पाहिला लग्नमुहूर्त ॥ विवाह केला जी त्वरित ॥ यज्ञदत्तें दुसरा ॥१०५॥
स्त्रीपुत्रांचा करोनि अव्हेर ॥ आणिक केला गृहाचार ॥ बाहेर घातला कुमर ॥ गुणनिधी तो ॥१०६॥
मग तो जातसे जनांच्या द्वारीं ॥ हटवटीया चौबारीं ॥ मग चिंता उपजली शरीरीं ॥ त्या गुणनिधीतें ॥१०७॥
जैसा रंकाचा नेतां चिंतामणी ॥ कीं दुर्बळाची हरितां गृहिणी ॥ किंवा दोषें दुखविजे जन सदगुणी ॥ तैसें वाटलें गुणनिधीसी ॥१०८॥
आतां मातेसी नाहीं भोजन ॥ मग आम्हांसी कैचें अन्न ॥ आम्ही सुखी असतां हें विघ्न ॥ झालें कैसे मद्दोषें ॥१०९॥
मी न करींच विद्याभ्यास ॥ मनुष्यवेषें आलों पशुजन्मास ॥ आतां कोणासीं मागावा ग्रास ॥ काय म्हणोनि ॥११०॥
दुसरे मातेसी मागावें भोजन ॥ तरी ते म्हणे हा कोठील कोण ॥ जरी करावें भिक्षाटन ॥ तरी विद्या नेणें सर्वथा ॥१११॥
ऐसा करितां विचार ॥ आजचि नाहीं मज आहार ॥ ऐसा झाला चिंतातुर ॥ गुणनिधी तो ॥११२॥
ऐसें विचारितां प्रयास ॥ तेणें क्रमिले पांच दिवस उपवास ॥ तंव माघ वद्य चतुर्दशीस ॥ आली शिवरात्री ॥११३॥
ते परम असे पुण्यनिशी ॥ म्हणूनि शिवभक्त शिवभक्त नेमेंसीं ॥ जात असती पूजा जागरणासी ॥ कपिलेश्वेरी ॥११४॥
ते कनकपरिमेळीं सहजा ॥ षोडशोपचार घेऊनि पूजा ॥ मिष्टान्न नैवेद्य बरवे वोजा ॥ नेते झाले शिवालयीं ॥११५॥
ऐसा पूजावया धूर्जटी ॥ मिष्टान्नें वोगरोनि कनकताटीं ॥ ऐसें देखोनियां द्दष्टीं ॥ संतोषला तो गुणनिधी ॥११६॥
तंव तो विचारतीसे मनीं ॥ हे शिवभक्त पूजिती शूलपाणी ॥ नैवेद्य जातील ठेवूनी ॥ मग मी घेईन तो ॥११७॥
दिवसा लोकांची होईल कीं भुक्ती ॥ ते जाणवेल पुढती ॥ ऐसें कल्पोनियां चित्तीं ॥ निघाला शिवभक्तांमागें तो ॥११८॥
मग जाऊनि कपिलेश्वरसी ॥ जागरण मांडिलें अहर्निशीं ॥ पूजा अर्पिली शिवासी ॥ दिधलीं नाना दिव्यांबरे ॥११९॥
हेमरत्नें पीतांबरें शूलपाणी ॥ पूजिती आणि करिती शिवस्तोत्रध्वनी ॥ त्या शिवालयीं राहिला जपोनी ॥ गुणनिधी बाळ तो ॥१२०॥
जैसा मंदिरीं प्रवेशोनि तस्कर ॥ वस्तु हरावया करी विचार ॥ तैसा लक्षीतसे द्विजकुमर ॥ नैवेद्य शिवाचा ॥१२१॥
केव्हां होईल शिवपूजन ॥ आणि हे शिवभक्त जातील येथून ॥ ऐसें उत्कंठित झालें मन ॥ त्या गुणनिधीचें ॥१२२॥
ऐसी प्रहर एक रजनी ॥ त्यांहीं क्रमिली हरिजागरणीं ॥ मग ते शिवभक्त शिवभुवनीं ॥ निद्रित जाहाले ॥१२३॥
ऐसा झाला हरिजागर ॥ तंव गुणनिधी पाहे तो अवसर ॥ शिवभक्तांसी निद्रेचा भर ॥ प्रवर्तला थोर ते काळी ॥१२४॥
हरावया गेला शिवाचा नैवेद्य ॥ भोंवतें भयभीत पाहतसे प्रसाद ॥ तंव दीपक झालासे मंद ॥ न देखेचि कोणी तयातें ॥१२५॥
मग फाडोनि प्रावरणपदर ॥ दीपकीं घाली तो तस्कर ॥ ज्योती करूनियां थोर ॥ प्रकाश केला तेधवां ॥१२६॥
दीपिकांचे मंदत्वपणें ॥ नैवेद्य देखिला नाहीं तेणें ॥ म्हणोनि दीपक सरसावून ॥ नैवेद्य देखे निवाडें ॥१२७॥
तो सर्वही घेतला उपाहार ॥ पालवीं बांधोनि निघे तस्कर ॥ तंव शिवालयीं झाला गजर ॥ पदध्वनींचा ॥१२८॥
तंव जागृत झाले शिवभक्त ॥ तस्कर म्हणोनि धांवती समस्त ॥ तंव तो जात होता पळत ॥ नगरामाजीं त्वरेनें ॥१२९॥
तंव धांविन्नले हेर ॥ त्यांहीं येतां देखिला तो तस्कर ॥ मग धनुष्यां लावूनियां शर ॥ विंधिला त्यांहीं तेधवां ॥१३०॥
कुबुद्धीचिया वृत्तीं ॥ जे नर सैरावैरा धांवती ॥ ते तत्काळ मृत्यु पावती ॥ अल्प दिवसांत निश्चयें ॥१३१॥
कुबुद्धीस्तव वज्रपाणी ॥ ऋषिशापें झाला भक्तलांछनी ॥ कुबुद्धीस्तव पडला व्यसनीं ॥ दशग्रीव तो सर्वस्वें ॥१३२॥
कुबुद्धीस्तव सहस्त्रार्जुनु ॥ ऋषीची हरी कामधेनु ॥ म्हणोनि तया रेणुकानंदनु ॥ अंतक जाहला ॥१३३॥
कुबुद्धी उपजली द्दयग्रीवाप्रती ॥ तेणें विधीसी केली विपत्ती ॥ हरूनि नेल्या महाश्रुती ॥ जीवनीं त्या ॥१३४॥
त्यासी मत्स्यरूपें नारायण ॥ मारूनि तोषवी चतुरानन ॥ म्हणोनि दुरात्मिकपणें वर्तन ॥ तोचि प्राणान्त जाणावा ॥१३५॥
आतां गुणनिधीचा पुढार ॥ कैसा करील तो शंकर ॥ तें ऐका जी सविस्तर ॥ श्रोतेजन आदरेंसीं ॥१३६॥
शिवदास गोमा विनवी श्रोतयांसी ॥ संख्या नाहीं त्याच्या पुण्यासी ॥ तो वंद्य होईल जी यमासी ॥ तें परिसावे पुढारी ॥१३७॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे अलकापुरीवर्णने गुणनिधिचरित्रवर्णनं नाम चतुर्दशाध्यायः ॥१४॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ॐ॥
॥ इति चतुर्दशाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 27, 2011
TOP