काशीखंड - अध्याय ५९ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ स्वामी म्हणेगा महामुनिवरा ॥ महाऋषींमध्यें ऋषीश्वरा ॥ आतां शिव येईल काशीपुरा ॥ मंदराचलाहूनि ॥१॥
अगस्ती वदे जी शिवसुता ॥ तूं मज अनाथाचा पूर्ण दाता ॥ काशीमार्गाची देवांसी जाहाली मुक्तता ॥ तैसी मज कैसी प्राप्त ॥२॥
मी पृच्छा करितों तुम्हांसी ॥ झणीं कोप धराल मानसीं ॥ दिवोदास राजा वैकुंठासी ॥ कैसा जाईल पैं आतां ॥३॥
स्वामी म्हणे गा ऋषि अवधारीं ॥ दिवोदास राजाच्या दोन सुंदरी ॥ लीलावती आणि काममोहिनी कुमरी ॥ सहस्त्रफणीचिया ॥४॥
ललिवितीचे शत एक कुमर ॥ काममोहिनीचा एकचि वीर ॥ तो करूं आरंभिला राज्यधर ॥ दिवोदासें पैं ॥५॥
मग राजा वदे मंत्रियांसी ॥ वेगें पाचारावें जोशियांसी ॥ शुभ लग्न पाहोनि हे काशी ॥ शृंगारावी तुम्हीं ॥६॥
काममोहिनीचा जो कुमर ॥ तो सर्व लक्षणी पूर्ण धीर ॥ आणि पराक्रमी महाशूर ॥ तयासी जय असे ॥७॥
शत पुत्रांमाजी तो श्रेष्ठ ॥ यौवनाश्वनामें गुणसुभट ॥ त्यासी दिधला राज्यपट ॥ सप्तद्वीपवतीचा ॥८॥
आतां येथें येईल शूलपाणी ॥ आम्हांसी जाणें वैकुंठभुवनीं ॥ आतां अयोध्य कीजे राजधानी ॥ मंत्री हो तुम्हीं ॥९॥
मग यौवनाश्वपुत्र राज्यपटीं ॥ तो अयोध्येसी स्थापिला सुमुहूर्तीं ॥ सर्वही निरविली राज्यस्थिती ॥ यौवनाश्वासी ॥१०॥
ऐशा अयोध्येसी पाठविल्या पुत्रप्रजा ॥ तंव गंगास्नानासी आला राजा ॥ अहंभाव अव्हेरूनि वृषमध्वजा ॥ स्मरता जाहाला ॥११॥
मग स्तविता जाहाला पंचानना ॥ प्रवर्तला शिवनाम उच्चारणा ॥ म्हणे जी भक्ति तुमची त्रिनयना ॥ त्रिलोकीं समर्थ ॥१२॥
सचैल स्नान करूनि गंगेसी ॥ मग प्रवर्तला शिवनाम उच्चारणासी ॥ म्हणे जय जय काशीनिवासी ॥ त्रैलोक्यसंहारा ॥१३॥
मी द्रोही जाहालो जी नीलकंठा ॥ तुम्हांसी प्रहरिलें जटाजूटा ॥ मंदराचलाचिया मुकुटा ॥ वास केला शिवा तुवां ॥१४॥
तुम्हांसी वियोग जाहाला शूलपाणी ॥ काशी तुमची निजधामिनी ॥ तरी हे भोगावया तुम्हांवांचुनी ॥ कोण असे समर्थ ॥१५॥
मी परम अन्यायी अपराधी पूर्ण ॥ तुम्हींसी घेतलें जी भाषादान ॥ ते तुम्हीं इच्छा केली माझी पूर्ण ॥ दिधलें राज्य पृथ्वीचे ॥१६॥
काशीखंड हें अलिप्त पृथ्वीसीं ॥ तुम्हीं निर्मिलें जी राहावयासी ॥ येथें कवण अमान्य तुम्हांसी ॥ परी मीचि कपटी ॥१७॥
अचल जी भाषादान साचार ॥ तरी न चळे अहोरात्र पळाक्षर ॥ तुम्हांसी उपमा बोलों प्रत्युत्तर ॥ तरी हे नाहीं वेदीं ॥१८॥
ऐसा कवण असे जी महिमा ॥ तुम्हांसी समता कीजे उपमा ॥ महादेव ऐसें तुमचिया नामा ॥ परीस दीर्घ नाहीं ॥१९॥
तुमचे वाखाणितां शुभगुण ॥ तरी मुकीं जाहालीं वेदपुराण ॥ कोटि कल्प जयाचें किंचित ध्यान ॥ तें स्वरूप अकथ्य ॥२०॥
तुमची निर्धारूं तेजोदीप्ती ॥ तरी सोम-सूर्यांसीं तुमची ज्योती ॥ काय कराव्या लखलखिती ॥ कोटि पद्में विद्युल्लता ॥२१॥
जेथें सोमसूर्याचें तेज अल्प ॥ तेथें उडुगणांसी कैंचे रूप ॥ मग कोणीकडे ग्रामदीप ॥ किमर्थ ते खद्योत ॥२२॥
पाहातां पसर तुमचा स्थूल ॥ रोमाग्रीं हरपे ब्रह्मांडगोल ॥ सूक्ष्म म्हणों तरी सोमसूर्यमंडल ॥ तरळले चक्षू ॥२३॥
तुमचे वाखाणूं प्रतापगुण ॥ तरी प्रलर्यी त्रैलोक्याचें दहन ॥ संहार करितां न लगे क्षण ॥ असंख्य ब्रह्मांडांचा ॥२४॥
असो हें कासया बोलावें अगम्य ॥ तुमचें स्वरूप कोणा कीजे सौम्य ॥ हें भूत भविष्य तुम्हांसी अकथ्य आणिकां ॥२५॥
वेदवाक्यें न वर्णवे पुरुषार्थ ॥ कवण जाणे कृपा समर्थ ॥ हें बोलावया उपमेसी अर्थ ॥ न भूतो न भविष्यति ॥२६॥
तुमचें महिमगुणवर्णन ॥ हें अकथ्य आरुष भाषण ॥ स्फटिक तो चिंतामाणिप्रमाण ॥ केवीं समता कीजे ॥२७॥
जेथें सुदर्शनचक्राचा मार ॥ तेथें शुष्क तृणाचा केवीं बडिवार ॥ ऐरावतीसी तो वनकुंजर ॥ केवीं पां उपमे तुळे ॥२८॥
तरी शिवा तूं कैसा कवण ॥ तुम्हांसी जाणावयाचें ज्ञान ॥ हे तुमचिया कृपेवांचून ॥ प्राप्त नव्हे कवणासी ॥२९॥
ऐसा तूं विश्वंभर अगोचर ॥ कवणा लक्षवे जी क्षराक्षर ॥ हा तुमचे स्वरूपाचा निर्धार ॥ अगम्य ब्रह्मादिकांसी ॥३०॥
मग दिवोदास प्रार्थी नारायणा ॥ मज क्षमा कीजे कमललोचना ॥ अंतकाळींचिया साध्य निधाना ॥ तो तूं लक्ष्मीपती ॥३१॥
मी परम अन्यायी अपराधी ॥ परम द्रोही मंदबुद्धी ॥ ऐशीं सहस्त्र वर्षें काशीमधीं ॥ अप्राप्त शिवचरण ॥३२॥
मग दिवोदास करी लिंगस्थापना ॥ तें लिंग आहे प्रसिद्ध पुराणां ॥ मग त्यासी केली नामधारणा ॥ दिवोदासेश्वर ॥३३॥
मग त्या लिंगासी केलें स्नपन ॥ अष्टगंधादि द्रव्यें संपूर्ण ॥ मग आरंभिता जाहाला महादान ॥ भारहिरण्यादिकें ॥३४॥
ऐसीं शिवपूजनें शिवस्तोत्रें ॥ सुमनें समर्पिलीं शिवमंत्रें ॥ शिव पूजिला सप्त अहोरात्रें ॥ दिवोदासें निजांगें ॥३५॥
ऐसी दिवोदासासी पूजानीती ॥ साक्ष ठेविला तो कमलापती ॥ हरि म्हणे गा महानृपती ॥ अपार भाग्य पैं तुझें ॥३६॥
तुवां अहोरात्र नित्याचारीं ॥ भावपूर्वक पूजिला त्रिपुरारी ॥ मग तो गणाधीश काय करी ॥ तें परिसा आतां ॥३७॥
पुष्पकें आणिलीं वैकुंठींहुनी ॥ दिवोदास घातला विमानीं ॥ तो हरीनें स्थापिला निजभुवनीं ॥ आपणांजवळी ॥३८॥
मग तो हरि आणि लंबोदर ॥ दोघीं स्थापिला एक विचार ॥ हरीनें पाचारिला पक्षीश्वर ॥ निजवहन सुपर्ण तो ॥३९॥
मग पक्षींद्रासी म्हणे तो सांवळा ॥ तुम्हीं वेगें जावें मंदराचळा ॥ तेथें शिवासी वंदूनि क्षितीं मौळा ॥ घालिजे साष्टांग माझें ॥४०॥
कथिजे गणाधीशाचा विचार ॥ त्यानें मोहिला तो राजेश्वर ॥ मग वैकुंठासी नृपवर ॥ नेला श्रीहरीनें ॥४१॥
काशीमार्ग केला गणेशें मुक्त ॥ सर्व देवेंसीं यावें त्वरावंत ॥ ऐसी आज्ञा करी लक्ष्मीकांत ॥ गरुडाप्रति पैं ॥४२॥
ऐसी हरीचा आज्ञा स्वीकारूनी ॥ ताराक्ष उडाला गगनीं ॥ उत्तरदिशा धरोनि मनीं ॥ जातसे मंदराचला ॥४३॥
तंव अगस्ति स्वामीसी प्रश्न करी ॥ मज क्षमा कीजे पूर्ण ब्रह्मचारी ॥ विश्वनाथ जंव ये काशीपुरीं ॥ तंव असे प्रश्न एक ॥४४॥
तूं माझे इच्छेचा कल्पतरू ॥ तूं माझिये मनींचा अमृततरू ॥ तूं षोडशकळीं तुषारू ॥ मज चकोरासी करिसी ॥४५॥
तरी हाचि प्रश्न शिवात्मजा ॥ विष्णूसी कैशा जाहाल्या चार भुजा ॥ हा संकल्पसंदेह माझा ॥ फेडावा तुम्हीं ॥४६॥
तंव स्वामी म्हणे गा मैत्रावरुणा ॥ तूं प्रश्नगुणाचिया निधाना ॥ जैसी काशी देखोनि पंचानना ॥ वर्तला आनंद ॥४७॥
तैसा आनंद माझिया शरीरीं ॥ तुझें प्रश्न जैसे महाकेसरी ॥ जैसे दोष मदोन्मताचे शरीरीं ॥ दोर्दंड त्याचे ॥४८॥
अगस्तीसी निरूपीतसे स्वामी ॥ अमोघ शिवकथा या त्रिभुवनभूमीं ॥ त्या पडलिया असती माझ्या तमीं ॥ अद्दश्य जैशा ॥४९॥
तेथें तुझा प्रश्न जैसा सविता ॥ तो अंधकाराची नेणे वार्ता ॥ त्यासी क्षण न लागे विध्वंसितां ॥ माझा हेतुतम ॥५०॥
कीं शिवकथा सहस्त्रकर ॥ परी आडवी अभ्र माझा विसर ॥ तेथें तुझा तो प्रश्नसमीर ॥ विध्वंसी समस्त ॥५१॥
आतां असो हे द्दष्टांतयुक्ती ॥ तुवां प्रश्निलें गा अगस्ती ॥ चतुर्भुत कैसा झाला श्रीपती ॥ ते कथा परिसां आतां ॥५२॥
वैकुंठ प्राप्त करूनि भूपाळा ॥ ताराक्ष पाठविला मंदराचळा ॥ वृत्तांत कथावया जाश्वनीळा ॥ दिवोदासाचा पैं ॥५३॥
तंव लक्मीकांत आणि लंबोदर ॥ एकांतीं कथिते झाले विचार ॥ मग विज्ञापिता झाला श्रीवर ॥ गणाधीशा पैं ॥५४॥
पुरुषोत्तमें प्रार्थिला गजाननु ॥ जी तूं भक्तांचा दाता पूर्णघनु ॥ कीं तूं दुर्बळाघरीं कामधेनु ॥ प्राप्त होसी पूर्वभाग्यें ॥५५॥
तरी दधीचि ऋषीचा कुमर ॥ अग्निबिंदुनामें महाऋषीश्वर ॥ तेणें हरि उपासनीं योगीश्वर ॥ चिंतामणि माझाचि ॥५६॥
माझेंचि अहोरात्र स्मरण ॥ माझेंचि संकल्पी अनुष्ठान ॥ ऐशीं सहस्त्र वर्षें पूर्ण ॥ झालीं तपासी ॥५७॥
तो पंचगंगेचिया तीरीं ॥ कष्टला वर्ततां नित्याचारीं ॥ त्यासी देईन आजि इच्छावरी ॥ तुमचिये आज्ञें ॥५८॥
तंव लंबोदर म्हणे गा हरी ॥ जाय तो ब्राह्मण निर्मय करीं ॥ वर भासतसे माझा शरीरीं ॥ तो करीं तुजहूनि मान्य ॥५९॥
ऐसी गजेंद्राची आज्ञा घेऊन ॥ मग तो निजगणेंसीं नारायण ॥ निघाला वर द्यावयाकारण ॥ अग्निबिंदूसी पैं ॥६०॥
तंव तो पंचगंगेच्या तीरीं ॥ हरीनें देखिला ब्रह्मचारी ॥ तपें कृश जाहाला शरीरीं ॥ महाऋषीश्वर तो ॥६१॥
तेणें ध्यानीं लक्षिला नारायण ॥ द्दढ धरिले हरिचे चरण ॥ श्रीहरिनामीं मिश्रित केलें मन ॥ जैसें दधि नवनीत ॥६२॥
तेणें कैसा देखिला तो चक्रपाणी ॥ जवळी कैसा आकर्षी मनीं ॥ जैसी ते गौ भक्षितां तृण वनीं ॥ चित्त असे वत्सापाशीं ॥६३॥
मग ते महाअरण्याहूनि महत्त्वें ॥ वत्साजवळीं धांवूनि ये सत्त्वें ॥ मग ते पीयूषाचे पूर्णत्वें ॥ वत्सा वरपडे ॥६४॥
तैसा देखोनि पूर्ण भक्तीचा भावो ॥ ह्र्दयीं संतोषला श्रीरावो ॥ म्हणोनि आला फेडावया संदेहो ॥ अग्निबिंदूचा पैं ॥६५॥
तंव सिंधुजा म्हणे नारायणा ॥ आतां आश्वासा जी या ब्राह्मणा ॥ याचिया तप अनुष्ठाना ॥ कीजे फळप्राप्ती ॥६६॥
लक्ष्मीचिया वचनें श्रीअनंत ॥ उठावला आनंदभरित ॥ जैसा उचंबळे सरिताकांत ॥ शशी देखोनि व्योमीं ॥६७॥
तैसा आनंद जाहाला शार्ङ्गधरा ॥ देखोनि भक्तीच्या पूर्णसागरा ॥ श्रीहरीनें उभारिलें दक्षिणकरा ॥ प्रसन्न तो ब्राह्मणा ॥६८॥
म्हणे उठीं गा भक्तवरा ॥ तपें कृशत्व आलें शरीरा ॥ प्राप्त जाहालासी गा अभयवरा ॥ मजपासाव तूं ॥६९॥
तंव तो दधीचि ऋषीचा कुमर ॥ ध्यान विसर्जन करी सत्वर ॥ मग ऊर्ध्वचक्षु शार्ङ्गधर ॥ अवलोकिता जाहाला ॥७०॥
जया लक्षीत होता ध्यानीं ॥ हरिनाम जपत होता मनीं ॥ तो साक्षात देखिला चक्रपाणी ॥ लक्ष्मीसहित ॥७१॥
मग उठिला जी पूर्णप्रेमभरित ॥ हरीसी अभिवंदन करीत ॥ हरीनें उभारिला वरदहस्त ॥ आश्वासिला अग्निबिंदु ॥७२॥
जैसी जननी कुरवाळी अपत्यासी ॥ ओसंगीं उचलूनि घे बाळकासी ॥ तैसें हरीनें घेललें भक्तासी ॥ आयुले स्वहस्तें ॥७३॥
मग वदता जाहाला शार्ङ्गधर ॥ म्हणे माग रे इच्छावर ॥ मीं झालों प्रसन्न उदार ॥ तुझिया तपसामध्यें ॥७४॥
तंव अग्निबिंदु म्हणे माधवा ॥ मज वैकुंठीं वास करवावा ॥ सर्वकाळ तुमची सेवा ॥ मग हास्य करी गोविंद ॥७५॥
म्हणे दीर्घतप आणि अल्पमती ॥ हा वर भासला तुझे चित्तीं ॥ परी नाठवे मंदमती ॥ पूर्ण वर तुजला ॥७६॥
हरि तुझिया तपासारिखा वरू ॥ लक्षितां अशक्त तो सृष्टिकरू ॥ तुळितां स्पर्धेसी न तुळे मेरू ॥ हें न कळें तुज ॥७७॥
हरि म्हणे पोखराचियासाठीं ॥ देतां दाक्षमंडपांची थाटी ॥ चिंतामणी देऊनि गारगोटी ॥ मगतोसी केवीं ॥७८॥
कल्पद्रुम समर्पिजे महेशा ॥ कीजे पांगारवृक्षाची आशा ॥ मुक्ताहर देऊनि वायसा ॥ केवीं अंगीकारिजे ॥७९॥
ऐसें तुझें तप अपार ॥ आणि तुज नाठवेचि पूर्णवर ॥ तुझिया पुण्या दीजे अधिकार ॥ ब्रह्मादिकां सृष्टिकर्या ॥८०॥
हें पंचक्रोशीचें पुण्यबळ ॥ तुवां तप साधिलें सर्वकाळ ॥ काशी हें अविमुक्तिस्थळ ॥ सेविलें तुवां ॥८१॥
स्वर्ग-मृत्यु-पाताळभुवनीं ॥ नाहीं काशीऐसी राजधानी ॥ येथें महातीर्थ शिवभुवनीं ॥ मणिकर्णिका ते ॥८२॥
सहस्त्र जन्मींचीं पापें दारुणें ॥ तीं पराभवती एकाचि स्नानें ॥ मातृपितृपक्ष होती पावनें ॥ कैलासपदीं ॥८३॥
उडुगणीं वेष्टिला शीतकर ॥ कीं शैल वाहे वनस्पतींचा भार ॥ कीं चौसष्ट गणांमध्यें शंकर ॥ वेष्टिला असे ॥८४॥
तैसीं या मणिकर्णिकेवेष्टित ॥ तीर्थें ओळंगताती बहुत ॥ तीं अग्निबिंदु माझिया मनोमतें ॥ करूं तुज निरूपण ॥८५॥
जैसा गणांमध्यें मान त्र्यंबका ॥ निवासांमध्यें निवास काशिका ॥ सर्व तीर्थांमध्यें मणिकर्णिका ॥ किती सांगों दीर्घत्व ॥८६॥
मजसीं प्रतिवादला चतुरानन ॥ तैं मज भेटला पाताळकंदगण ॥ तेणें आम्हां द्दश्य केला पंचानन ॥ गुरुत्वपणें ॥८७॥
ऐसा तो पाताळकंदेश्वरु ॥ तो मज जोडला पूर्ण गुरु ॥ मणिकर्णिकेचा पूर्ण सामर्थ्यविचारु ॥ मज कथिला तेणें ॥८८॥
स्वर्गमृत्युपाताळींचीं जीं तीर्थें ॥ अगाध अनुपम जीं सामर्थ्यें ॥ तीं मणिकर्णिकेसी महास्वार्थें ॥ माध्यान्हीं येत नित्य स्नाना ॥८९॥
म्हणोनि मणिकर्णिकेमाझारी ॥ माध्यान्हीं स्नान पूजाविवि करी ॥ तो समर्थ त्रैलोक्यामाझारी ॥ त्यासी ब्रह्मादिक वंदिती ॥९०॥
तेथें महालिंग ज्योतिरूपेश्वर ॥ जो गणेशें स्थापिला त्रिशृलधर ॥ त्यासी मी पूजीं प्रत्यक्ष शंकर ॥ शुक्रेश्वर तो ॥९१॥
शुक्रेश्वराच्या पश्चिमभागीं भवानी ॥ ते विश्वनाथाची कुटुंबिनी ॥ ते भुक्तिमुक्तींची पूर्ण खाणी ॥ आनंदवनाचे ठायीं ॥९२॥
ते सर्व जंतूची जनिती तत्त्वतां ॥ त्रिलोकीं नाहीं ऐसी भक्तमाता ॥ तियेची जरी स्तुति सांगों आतां ॥ तरी विलंब कथेसी ॥९३॥
ना तरी श्रोते कोपाल अंतःकरणीं ॥ जे त्रैलोक्यजंतूंसी मुक्तिजननी ॥ तियेची स्तुति वाखाणितां पुराणीं ॥ हितार्थचि कीं ॥९४॥
तरी पुढें सांगणें असे समूळ ॥ त्या भवानीचा जन्मवृत्तांत सकळ ॥ ते कथा फेडावया मनाचा मळ ॥ पुढें निरोपूं श्रोतयां ॥९५॥
येथें ईशानेश्वरपूजन ॥ ईशानतीर्थीं कीजे स्नान दान ॥ मग त्या पुण्यें होइजे पावन ॥ रुद्र्लोकासी ॥९६॥
ईशानरुद्र आला आनंदवना ॥ तो मणिकर्णिके माध्यान्हस्नाना ॥ ईशानेश्वरलिंगस्थापना ॥ तेणें केली पैं ॥९७॥
तेथेंचि ज्ञानेश्वरलिंग महासिद्धि ॥ ज्ञानवापीतीर्थीं कीजे स्नानविधि ॥ तरी प्राप्त होय ज्ञानबुद्धि ॥ आणि शिवलोक ॥९८॥
शिवाचा निजगण जो शैलाद ॥ तेथें शैलादेश्वरलिंग प्रसिद्ध ॥ तें लिंग पूजिलिया शिव वरद ॥ तत्काळ होय पैं ॥९९॥
ऐसा त्या लिंगाचा प्रादुर्भाव ॥ तो प्राप्त करी मुक्तीचा ठाव ॥ ऐसें तें लिंग महादेव ॥ ज्ञानवापी उत्तरभागीं ॥१००॥
सदाशिवाचाजो निजवाहन ॥ तेणें लिंग स्थापिलें पंचानन ॥ नंदीतीर्थस्नानदर्शन ॥ पाविजे कैलास ॥१०१॥
शिवदक्षिणभागीं महासमर्थ ॥ विष्णुमूर्ति असे विष्णुतीर्थ ॥ तें पूजिलिया वैकुंठ प्राप्त ॥ सर्व प्राणियांसी ॥१०२॥
भवानीदक्षिणभागीं महाथोर ॥ प्रसिद्ध लिंग असे पितामहेश्वर ॥ तें पूजिलिया उद्धरती पितर ॥ द्विपक्षींचे पैं ॥१०३॥
तेथें पितामहेश्वरतीर्थ जाण ॥ तेथें करी जो स्नानविधि तर्पण ॥ तो सुटला संसारभयापासून ॥ दर्शनमात्रें ॥१०४॥
तेथेंचि ब्रह्मेश्वर उमाकांत ॥ तेथें ब्रह्मतीर्थ असे महाद्भुत ॥ तेथें दान कीजे न्यायउपार्जित ॥ तें फळ कोटिगुणें ॥१०५॥
पूजाविधीनें ब्रह्मेश्वर पूजिजे ॥ मनेच्छा जें तें दान कीजे ॥ जें समर्पिजे तें पाविजे ॥ कोटिफळीं ॥१०६॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ ऐसी ते मणिकर्णिका काशीप्रती ॥ तेथींच्या दानाची अगाध प्राप्ती ॥ प्रळयीं न सरे ॥१०७॥
तेथेंचि ब्रह्मनाळ तीर्थ असे ॥ दर्शनेंचि संसारभय नासे ॥ सर्व जन्मांचे दोष नासोनियां वसे ॥ सत्यलोकीं तो ॥१०८॥
ब्रह्मनाळदक्षिणभागी हर ॥ भगीरथें स्थापिला भगीरथेश्वर ॥ तेथींचिया पूजेचा अधिकार ॥ तो ऐका आतां ॥१०९॥
भगीरथेश्वराचें पूजन ॥ भगीरथतीर्थीं कीजे स्नान दान ॥ तरी त्या महारौरवापासून ॥ सुटती पूर्वज ॥११०॥
तेथेंचि मार्कंडेयेश्वर अगाघ ॥ मार्कंडेय ऋषीनें स्थापिला योगसिद्ध ॥ येथें त्यासी ज्ञानी स्फुरलें शुद्ध ॥ जाहाला कल्पायुषी तो ॥१११॥
त्या मार्कंडेयेश्वरीं पूजानीती ॥ मार्कंडेयतीर्थीं स्नानदानें मुक्ती ॥ सहस्त्र जन्मींचीं पापें दहती ॥ निमिषमात्रें ॥११२॥
येथेंचि वसिष्ठतीर्थ वसिष्ठेश्वर ॥ तो पूजिलिया होय ज्ञानस्मर ॥ चतुर्वेदांसी सत्य अधिकार ॥ त्या लिंगाचे पैं ॥११३॥
त्या वसिष्ठऋषीची जी कांता ॥ अरुंधतीनामें पतिव्रता ॥ तिनें स्थापना केली उमाकांता ॥ त्या लिंगा नाम अरुंधतीश्वर ॥११४॥
त्या लिंगाची पूजाविधीनें करितां ॥ अरुंधतीतीर्थीं स्नान दान देतां ॥ तरी कोटि परद्वारांची होय मुक्तता ॥ त्या महादोषांपासाव ॥११५॥
मातृ-कन्यागमनी असेल जो नर ॥ तेणें पूजावा अरुंधतीश्वर ॥ ऐसा त्या लिंगासी अगाध वर ॥ दिधलासे शंकरें ॥११६॥
तेथेंचि नर्मदेश्वर त्रिपुरारी ॥ नर्मदातीर्थीं जो स्नान दान करी ॥ तरी त्याहूनि त्रैलोक्यामाझारी ॥ उत्तम नाहीं ॥११७॥
तेथेंचि सर्वेश्वर त्रिशुद्धेश्वर ॥ तो पूजिलिया हरती सर्व ज्वर ॥ तेथेंचि योगिनीतीर्थ अपार ॥ अगाध महिमा पैं ॥११८॥
तेथेंचि पुराणप्रसिद्ध ईश्वर ॥ अगस्तीनें स्थापिला अगस्तीश्वर ॥ तेथींचे स्नानदानें पावेनर ॥ कैलासपद ॥११९॥
आणिक तेथेंचि असे केशवमूर्ती ॥ तो पूजिलिया महापुण्यप्रप्ती ॥ मातृपितृपक्ष उद्धरती ॥ आणि विकुंठवास ॥१२०॥
हरि म्हणे गा अग्निबिंदु अवधारीं ॥ इतुकीं तीर्थीं मणिकर्णिकातीरीं ॥ आणिक तीर्थीं कथितों पुढारीं ॥ ऐक तीं आतां ॥१२१॥
आणिक विरोचनतीर्थ परियेसीं ॥ वीरमाधव असे तयापासीं ॥ जे पूजिती विरोचनलिंगासी ॥ ते वंद्य ब्रह्मादिकां ॥१२२॥
तेथें काळमाधव पूजोनि ॥ सोडवीं महाकाळापासोनी ॥ ऐसा वर बोलिला तो शूळपाणी ॥ त्या काळमाधवासी ॥१२३॥
तेथेंचि निर्वाण नृसिंहमूर्ति ॥ महाबळनामें नृसिंह अद्भूतशक्ति ॥ प्रंचड नृसिंह विकटाकृति ॥ गंडभैरव पैं ॥१२४॥
तेथें नृसिंह उग्र महावीर ॥ काळनृसिंह चक्रधर ॥ कोल्हाळनृसिंह लक्ष्मीवर ॥ आनंदमाधव तो ॥१२५॥
तेथेंचि सप्तसागरेश्वर ॥ त्यासी शंकरें दिधला पूर्ण वर ॥ तेथें पूजाविधि करी जो नर ॥ तो होय समुद्राऐसा ऐश्वर्यें ॥१२६॥
तेथेंचि विक्रमवामन ॥ त्या दक्षिणभागीं बळिवामन ॥ तेथेंचि वराहनारायण ॥ मधुकैटभहंता ॥१२७॥
वराहतीर्थीं स्नान दान कीजे ॥ किंचित न्यायिक द्रव्य वेंचिजे ॥ तरी तेणें फलप्राप्ति पाविजे ॥ समुद्रातुल्य ॥१२८॥
हरि म्हणे गा अग्निबिंदु अवधारीं ॥ माझें रूप मणिकर्णिकेमाझारीं ॥ ऐसी हे मणिकर्णिका पूर्वापारीं ॥ ते परियेसीं आतां ॥१२९॥
सहस्त्र एक जाहाले नरनारायण ॥ कूर्मरूपें जाहालीं सहस्त्र तीन ॥ तीस सहस्त्र परशुराम नंदन ॥ जमदग्नीवे पैं ॥१३०॥
एक सहस्त्र शत जाहाले राम ॥ ऐसी हे मणिकर्णिका पूर्वागम ॥ अग्निबिंदूसी म्हणे पुरुषोत्तम ॥ परियेसीं एकचितें ॥१३१॥
एक लक्षकोटि चक्रधारी ॥ अरे या मणिकर्णिकेच्या तीरीं ॥ इतुके विष्णु जाहाले पुढारी ॥ नेणिजे भविष्य ॥१३२॥
हे काशीखंडकथा स्कंदपुराण ॥ भवानीसी कथी त्रिनयन ॥ तेचि विष्णूसी पाताळकंदगण ॥ निरूपी सविस्तर ॥१३३॥
तेचि कथा अग्निबिंदूप्रती ॥ भावपूर्वक निरूपी लक्ष्मीपती ॥ तेचि कथा स्वामीपाशीं अगस्ती ॥ पृच्छा करीतसे ॥१३४॥
श्रीहरि म्हणे अग्निबिंदा ॥ म्यां प्रार्थिलें श्रीगुरुपाताळकंदा ॥ चतुराननाचिया प्रतिवादा ॥ तो मज साध्य जाहाला ॥१३५॥
आतां अग्निबिंदु तुज नाठवे वर ॥ विष्णुतीर्थींमध्यें तूं केलासी थोर ॥ नामधारण बोलिला चक्रधर बिंदुमाधव ऐसें ॥१३६॥
दक्षिणमानसीं जे मूर्ति मुरारी ॥ ते सदाशिवाची शंखचक्रधारी ॥ उत्तरमानसीं जे मूर्ति हरी ॥ बिंदुमाधव ॥१३७॥
मग हरीनें त्या अग्निबिंदूसी ॥ आलिंगिलें ह्र्दयमानसीं ॥ तेव्हां चतुर्भुज जाहालिया विष्णूसी ॥ हारपला अग्निबिंदु ॥१३८॥
माधव हीं तीन अक्षरें विष्णुनामाचीं ॥ बिंदु हीं द्वय अक्षरें अग्निबिंदूचीं ॥ ऐसी मूर्ति पंचाक्षरनामाची ॥ तोचि बिंदुमाधव ॥१३९॥
अगस्ति पंचगंगेच्या तीरीं ॥ भक्तांसीं ऐक्य पावला हरी ॥ तैंहूनि चतुर्भुज चक्रधारी ॥ जाहाला विष्णु ॥१४०॥
अगस्तीसी म्हणे शिवकुमर ॥ ऐसा अग्निबिंदूसी झाला वर ॥ तंव मंदराचलाहूनि पक्षींद्र ॥ गरुड आला ॥१४१॥
या अध्यायाची फलश्रुति सांगो जरी ॥ जैसा अग्निबिंदूसी भेटला हरी ॥ हा अध्याय श्रवण पठण जो करी ॥ त्याजवळी मुरारी वसे सदा ॥१४२॥
या अध्यायामाजी सांगितलीं तीर्थें ॥ तीं सर्वही घडती परमार्थें ॥ सर्व देवांसी महासामर्थ्यें ॥ अध्याय श्रवणपठण झालिया ॥१४३॥
पूर्वजांसी प्राप्त वैकुंठवास ॥ आणि योनिमार्ग चुकवी महेश ॥ दीर्घदोषियांचा चुके यमपाश ॥ अनुवादला पार्वतीप्रती ॥१४४॥
शिवदास गोमा विचारी ॥ बद्धांजळीं श्रोतयांसी नमस्कारी ॥ आरुष जी माझी वैखरी ॥ परी श्लाघ्य तुम्हीं कीजे ॥१४५॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते वैकुंठप्रवेश-बिंदुमाधवाख्यानं नाम एकोनषष्टितमाध्यायः ॥५९॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति एकोनषष्टितमाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP