मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय १६ वा

काशी खंड - अध्याय १६ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ ॥
विमान जातसे गगनोदरीं ॥ तंव पुढें देखिली रुद्रपुरी ॥ ते वाखाणितां हे वैखरी ॥ पांगुळे मंदत्वपणेंसीं ॥१॥
एकादश सहस्त्र योजन ॥ ते रुद्रपुरी असे विस्तीर्ण ॥ तेथें अकरा रुद्र शिवासमान ॥ असती थोर अगाध ॥२॥
शिवशर्मा पुसे गणांसी ॥ हे पुरी पुढें दिसते कैसी ॥ धामीं धामीं रविशशीं ॥ प्रकाशले काय साक्षात ॥३॥
चौसष्टी कस जें हमे ॥ तेणें रचिलेंसे उत्तम ॥ स्वहस्तें निर्मी विधि अनुपम ॥ रुद्रांसी राहावया ॥४॥
दिव्य पद्मराग जडले स्तंभा ॥ स्तंभा ॥ मंडप चुबिती कळसें नभा ॥ त्यावरी फांकती दिव्य प्रभा ॥ पुष्कराज गोमेदांच्या ॥५॥
सहस्त्रकरतुल्य दिव्य ध्वज ॥ कळसाग्रीं झळके सतेज ॥ वातस्पर्शेंकरूनि सहज ॥ जेवीं आकाशीं विद्युल्लहरी ॥६॥
ते पुरी श्रृंगारावयाकारण ॥ आले असती कोण कोण ॥ तें शिवशर्म्याप्रती विष्णुगण ॥ सांगते झाले आदरें ॥७॥
तेथें आलिया नवनिधी ॥ अष्टमातृका अष्टमहासिद्धी ॥ मग ते पुरी निर्मी विधी ॥ करी रचना सुंदर ॥८॥
नाना मुक्तें दिव्य तेजांचीं ॥ आरक्त वैदुर्य सुरंगांचीं ॥ स्तंभीं प्रभा शुद्ध जयांची ॥ तीं आणिलीं सागरें ॥९॥
रत्नमणी दिव्य तेजाचे ॥ महाप्रकाश हिरे जयांचे ॥ तेज मिरवे जैसे सोमसूर्यांचें ॥ कळसीं परम सुसेव्य ॥१०॥
ते आणिले जी वरुणें ॥ तेजदीप्ति दिधली देवगणें ॥ वनस्पति आल्या घेऊनि लेणें ॥ सर्वही रंग अनेकापरी ॥११॥
अष्टगंध घेऊनि आला समीर ॥ संपत्तीसहित आला वज्रधर ॥ कामधेनु आणि कल्पतरुवर ॥ आणिले तेणें ॥१२॥
सर्व विद्या घेऊनि आली सरस्वती ॥ गणांसह आला गणपती ॥ तेणें शृंगारिल्या वनस्पती ॥ येऊनियां वसंतें ॥१३॥
पंचमस्वर आणिले कोकिळीं ॥ गंगा आलिया पूर्ण जळीं ॥ सत्त्वधीरीं समर्पिले दिक्पाळीं ॥ पुष्पांजळी रुद्रसेवेसी ॥१४॥
असो हे प्रकार सांगतां ॥ कथेसी होईल विस्तीर्णता ॥ श्रुति सांडोनि घेईजे आतां ॥ मुक्तमणी आदरेंसीं ॥१५॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ हे अकरा रुद्र आले वाराणशीसी ॥ स्नानें करूनि मणिकर्णिकेसी ॥ बैसले तपा सत्वर ॥१६॥
अकरा अयुतें केली तपसाधना ॥ त्यांहीं संतोषविलें त्रिनयना ॥ मग एकचि वर अकरा जणां ॥ दिधला शिवें सत्वर ॥१७॥
त्रिशूळ डमरू त्र्यंबकधारी ॥ फणिभूषणी गजचर्मांबरी ॥ नीलकंठ मौलीवरी ॥ शीतकर आणि गंगा ते ॥१८॥
अवघे भस्मधारी त्रिनेत्र ॥ वृषभवाहन पंचवक्र ॥ उमेसहित परम पवित्र ॥ रुद्राक्षमाळा सर्वांसी ॥१९॥
जैसा सर्पभूषणी त्रिनयन ॥ तैसेचि केले अकरा जण ॥ त्यांसी दिधलें राज्यभुवन ॥ रुद्रपुरी ईशानकोणींची ॥२०॥
हे स्वयंभू शिवाचे अवतार ॥ अकराही उमेसहित शंकर ॥ बारावा तो कर्पूरगौर ॥ स्मरारि जो म्हणवीतसे ॥२१॥
ऐसी हे महारुद्रपुरी ॥ इच्या उपमेसी नाहीं दुसरी ॥ परी ते अविमुक्तीची थोरी ॥ अनारिसी असे ॥२२॥
ऐसें हें जाणावें शिवभुवन ॥ महासिद्धिदायक पूर्ण ॥ तेथें अमरादिकही मरण ॥ इच्छिताती सर्वकाळ ॥२३॥
पाहातां त्रैलोक्याची सामुग्री ॥ ब्रह्मांड तुळेना जयाचे नखाग्रीं ॥ कल्पतरु कामधेनु ज्याचे घरीं ॥ त्यासी उपमा काय दीजे ॥२४॥
म्हणोनि अगाध आनंदवनीं ॥ विश्वनाथाची निजधामिनी ॥ जेथें स्वर्गंगा पुण्यतोयतरंगिणी ॥ धूतपापा वाराणसी ते ॥२५॥
तियेचे गुणनाम वाराणसी ॥ तेथें वर जोडले रुद्रांसी ॥ गण सांगती शिवशर्म्यासी ॥ पुण्यस्थान काशी हे ॥२६॥
जरी हे वाखाणूं पुण्यस्वार्था ॥ तरी पुढें असे संपूर्ण कथा ॥ जेणें हरे महाव्यथा ॥ चौर्‍यायशीं लक्ष जन्मांची ॥२७॥
अभेद्य अच्छेद्य अमरमूर्ती ॥ अविकल अनुपम ज्योती ॥ नाना मतें वर्णिताती ॥ तया पुण्यपुरीसी ॥२८॥
गगनीं जातां विमान ॥ शिवशर्मा आणि विष्णुगण ॥ तंव पुढें देखिला लोक कवण ॥ ते परिसा श्रोते हो ॥२९॥
शिवशर्मा पुसे विष्णुदूतां ॥ हे पुढें दिसताहे अपूर्वता ॥ हा कवण लोक याची महिता ॥ सांगा कैसी काय ते ॥३०॥
हरिगण म्हणती गा द्विजा ॥ हा शीतकर येथींचा राजा ॥ ग्रहनक्षत्रें याची प्रजा ॥ हा तंव चंद्रलोक म्हणवितो ॥३१॥
परिसें चंद्राचा उपकार ॥ अमृतमय हा शीतकर ॥ सर्वही कामाचा श्रमभार ॥ हाचि फेडी मयंक ॥३२॥
परियेसीं याची महिता ॥ हा त्रिभुवनासी आनंदकर्ता ॥ देवां दिक्पाळांचिया मन्मथा ॥ संतोष करी ॥३३॥
हा चंद्र प्रकाशलिया गगनीं ॥ तेव्हां आनंदती कुमुदिनी ॥ कमळीं उल्लासती पद्मिनी ॥ चंद्र आदृश्य झालिया ॥३४॥
सुर्यें कोमावे वनस्पती ॥ तेचि उल्लासे उगवतां तारापती ॥ तैसाचि हेलावे सरितापती ॥ चंद्र देखोनि आनंदें ॥३५॥
व्योमीं बिंब चंद्राचें ॥ देखोनि ह्रदय उचंबळे सिंधूचें ॥ उदय देवोनियां पुत्राचे ॥ पिता केवी न हर्षे ॥३६॥
माध्यान्हीं प्रकाशतां रविकर ॥ तेणें उष्ण होतसे शैलपाठार ॥ मग प्रकाशलिया शीतकर ॥ ते पावती थोर सुखातें ॥३७॥
हा दृश्य झालिया इंदु ॥ कुमुदिनींसी होय आनंदू ॥ चकोरांचा श्रमखेदू ॥ पराभवी हा ॥३८॥
याचें होतां पूर्ण दर्शन ॥ आनंद पावती पाषाण ॥ म्हणोनियां स्त्रवती जीवन ॥ सोमकांत ते ॥३९॥
मध्यरजनी हा शशी ॥ मार्ग दावीतसे जनांसी ॥ हा महाप्रिय नरेंद्रांसी ॥ सुखशयनमंदिरीं ॥४०॥
तेथें पतिव्रतांसी होतां उबारे ॥ मग वोवरिया गवाक्षद्वारें ॥ प्रकाश करितां शीतकरें ॥ त्या होती शीतळ ॥४१॥
सात खणांचीं मंदिरें ॥ रत्नखचित मनोहरें ॥ शोभा पावती त्या शीतकरें ॥ उदय झालिया तत्काळ ॥४२॥
व्यापारी असती ते जन ॥ ते विश्रामती अस्त झालिया दिन ॥ मग शशी प्रकाशतां पूर्ण ॥ श्रमहरण होय तयांचे ॥४३॥
मृग रोही सांबरें चितळीं ॥ नाना श्वापदें विचरती भूमंडळी ॥ जी श्रम पावती सकळीं ॥ तीं पावती विश्राम ॥४४॥
तीं विश्रामती आपुले धामीं ॥ जंव तो चंद्र प्रकाशे व्योमीं ॥ जेवीं जन विश्रांति पावे तमीं ॥ रवि अस्तातें पावलिया ॥४५॥
चंद्रबिंब प्रकाशतां जळीं ॥ जळचरें लक्षिती नभमंडळीं ॥ तीं क्रीडती आनंदकल्लोळीं ॥ शशिबिंब देखोनियां ॥४६॥
चंद्र असे जयाचे आननीं ॥ तयासी भाग्यवंत म्हणती जनीं ॥ स्त्रियांसी उपमा चंद्रवदनी ॥ ऐसा उपकारी श्रेष्ठ हा ॥४७॥
हा चंद्र शुभदायक त्रैलोक्यासी ॥ हा चंद्र अशुभही सर्व जनांसी ॥ म्हणूनि घात चंद्रकाळतिथीसी ॥ वर्जिती सर्व ॥४८॥
यापासाव तिथी पंचदश ॥ हा भोगीत राशी द्वादश ॥ गण म्हणती शिवशर्म्यास ॥ तें परिसें गा समस्त ॥४९॥
प्रथम घातचंद्र चतुर्दशी ॥ तो अशुभ सांगतसे मेषासी ॥ पांचवा वर्जिजे षष्ठीसी ॥ वृषभाकारणें ॥५०॥
नवम अष्टमीसी आला ॥ तो मिथुनासी वर्जिला ॥ दुसरा चतुर्थीसी नव्हे भला ॥ कर्कासी पैं ॥५१॥
अष्टमचंद्र जो दशमीसी ॥ तो अशुभ वर्जिला सिंहासी ॥ दशम अशुभ अष्टमीसी ॥ कन्येकारणें ॥५२॥
द्वादशीसी चंद्र तृतीयस्थानी ॥ तो तुळेसी अशुभ कार्यकारणीं ॥ सातवा दशमीलागोनी ॥ अशुभ जाण वृश्चिकासी ॥५३॥
चतुर्थ चंद्र आला बीजे ॥ तो अशुभ धनानी त्याज्य कीजे ॥ अष्टम द्वादशीसी होइजे ॥ अशुभ तो मकरासी ॥५४॥
एकादश चंद्र षष्ठीसी ॥ तो अनुचित होय कुंभासी ॥ द्वादश वर्जिला बीजेसी ॥ मीनाकारणें आवश्यक ॥५५॥
ऐसा द्वादश राशींचा भोक्ता ॥ हा चंद्र त्रैलोक्याचा दाता ॥ दीनांचा प्रतिपाळिता ॥ द्विजराज हा ॥५६॥
व्रतें चांद्रायणादि यापासुनी ॥ हा न्यून दशा घेतसे ग्रहणीं ॥ सुख देतसे त्रिभुवनीं ॥ द्विजांकारणें अक्षयीं ॥५७॥
यापासाव सर्व तीर्थक्षेत्रें ॥ नाना दानें चालतीं धर्मसूत्रें ॥ यापासाव कर्में विचित्रें ॥ चालताती सर्वही ॥५८॥
ऐसा हा परोपकारी अमृतकर ॥ यानें पूजिला तो शंकर ॥ त्रेलोक्यासी याचा आधार ॥ शिवप्रसादें करोनियां ॥५९॥
शिवशर्मा पुसे गणांसी ॥ येवढें सामर्थ्य काय जी यासी ॥ यानें कैसें पूजिलें शिवासी ॥ तें सांगा मज सत्वर ॥६०॥
चंद्र हा कोण कवणाचा ॥ कवण माता पिता याचा ॥ संदेह हा माझे मनाचा ॥ फेडावा जी गणोत्तमा ॥६१॥
तंव बोलते झाले विष्णुगण ॥ शिवशर्म्या तूं बहू विचक्षण ॥ तुज वैकुंठ प्राप्त होतसे जाण ॥ पार नाहीं तव भाग्यासी ॥६२॥
गण म्हणती गा ब्रह्मवत्सा ॥ बरवी आरंभिली तुवां पृच्छा ॥ तरी पूर्ण करुं तव इच्छा ॥ तें परिसावें आतां ॥६३॥
विरिंचिदेवाचा जो सुत ॥ ऋषि अत्रि नामें विख्यात ॥ तो अनसूयेचा कांत ॥ पिता द्त्तात्रेयाचा ॥६४॥
तो आला असे आनंदवनासी ॥ पुण्यक्षेत्र काशीपुरीसी । स्नान करूनि मणिकर्णिकेसी ॥ करिता झाला तपसाधन ॥६५॥
लिंग स्थापिलें अत्रीश्वर । मग पद्मासन घाली ऋषीश्वर ॥ ह्रदयीं करीतसे उच्चार ॥ शिवनामाचा आदरें ॥६६॥
लौकिक कर्म सारिलें तेथें ॥ वीर्य चाललें ऊर्ध्वपंथें ॥ भेदूनि एकवीस मनकुळांतें ॥ नेणें जाण सहस्त्रदळीं ॥६७॥
वीर्य न सांठे सहस्त्रदळीं ॥ मग तें उतरलें चक्षुमंडळीं ॥ नेत्रद्वारें पृथ्वीवरी ॥ टाकिलें तें ऋषीनें ॥६८॥
जैसी अमृताची खोटी ॥ पडली पृथ्वीचे तळवटीं ॥ तेणें कंपायमान जाहली सृष्टी ॥ भूमंडळीं सर्वही ॥६९॥
ऐसें कांपे भूमंडळ ॥ जन भाविती हलकल्लोळ ॥ ऐसा त्या ऋषीचा वीर्यगोळ ॥ भासे अग्नीसारिखा ॥७०॥
मग अष्टदिशा धांवत आल्या ॥ त्या  विष्णूचे नाभिकमळीं जन्मल्या ॥ ज्या स्कंदपुराणीं सांगितल्या ॥ त्या कवण कवण असती
॥७१॥
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ॥ आग्नेयी वायवी निऋती ईशान ॥ या अष्ट दिशा मिळोन ॥ धरिला त्यांनीं वीर्यगोल ॥७२॥
तेणें दिशा झाल्या गरोदर ॥ गर्भ धरिला अष्ट मासवर ॥ मग न साहवे त्यांचें जठर ॥ तेव्हां टाकिला धरेसी ॥७३॥
तंव त्या सत्यलोकाहुनी ॥ वेगें आला चतुरानन धांवोनी ॥ गर्भ घेतला उचलोनी ॥ अभय वर दीधला ॥७४॥
तूं होसी रे तेजोराशी ॥ चंद्रमा नाम ठेविलें तयासी ॥ मग नेला तो सत्यलोकासी ॥ विरिंचिदेवें सत्वर ॥७५॥
मग व्रतबंध केला तयासी ॥ चंद्रमा पुरे चतुराननासी ॥ कवण माता पिता आम्हांसी ॥ तें सांगावें वेदपुरुषा ॥७६॥
तंव विधि बोले चतुर्वक्त्र ॥ म्हणे तूं अत्रिऋषीचा पुत्र ॥ हो त्रैलोक्याचा मित्र ॥ नातू होसी आमुचा ॥७७॥
तुझा पिता महामुनी ॥ तेणें तप साधिलें आनंदवनीं ॥ त्याचिया वीर्यापासुनी ॥ जन्म तुज लाधला ॥७८॥
मग विधीसी म्हणे अत्रिसुत ॥ आम्हीही पूजूं भवानीकांत ॥ विधि म्हणे तथास्तु सत्य ॥ यापरतें कोणतें सुख ॥७९॥
विधीनें सांगितला शिवमंत्र ॥ मग चंद्र निघे अत्रिसुत ॥ आनंदवनीम जेथें त्रिनेत्र ॥ वेगें आला तेथें तो ॥८०॥
तेणें मणिकर्णिकेचें केलें स्नान ॥ विश्वनाथासी केलें अभिवंदन ॥ मग मांडिलें अनुष्ठान ॥ काशीपुरीसी आदरें ॥८१॥
लिंग स्थापिलें चंद्रेश्वर ॥ अनुष्ठानीं बैसला अत्रिकुमर ॥ ह्रदयीं स्मरोनियां शंकर ॥ धरिला नेम सर्वदा ॥८२॥
चंद्रकूपीं त्रिकाळ स्नान ॥ चंद्रेश्वरीं पूज्यपूजन ॥ मग करीतसे ध्यानधारण ॥ जपे शिवमंत्र त्रिकाळ ॥८३॥
ऐसें अनुष्ठान केलें चंद्रमें ॥ संख्या जाहली शत एक पद्में ॥ त्रिपुरहंता पूजिला नेमें ॥ अत्रिसुतें ॥८४॥
गणितां शतएक पद्मांसी ॥ अर्धकल्प बोलिजे त्यासी ॥ इतुके संवत्सर काशीपुरीसी ॥ केलें अनुष्ठान साक्षेपें ॥८५॥
अनुष्ठानाचें कार्य साधून ॥ मग चंद्रें मांडिला महायज्ञ ॥ हांकारिले जी ब्राह्मण ॥ महामुनिवर आणिक ते ॥८६॥
सत्यलोकींहूनि आला विरिंची ॥ सवें सावित्री भार्या त्याची ॥ जे दुहिता सहस्त्रकराची ॥ महापतिव्रता जाण पां ॥८७॥
वैकुंठींहूनि आला श्रीहरी ॥ सवें नदीश्वराची कुमरी ॥ तो पुरुषोत्तम आला सहपरिवारीं ॥ सोमयागासी तेधवां ॥८८॥
देवांसहित वज्रपाणी ॥ सवें धेऊनि शची कामिनी ॥ तो आला जी आनंदवनीं ॥ सोमयागाकारणें ॥८९॥
मन त्या मणिकर्णिकेचे तीरीं ॥ यागमंडप उभविला बरव्यापरी ॥ तेथें आले महाऋषि ब्रह्मचारी ॥ शापानुग्रहीं समर्थ ॥९०॥
महाऋषीश्वर जुनाट ॥ वृद्ध थोर अतिवरिष्ठ ॥ उचलिती चक्षुसंपुट ॥ तेव्हां विलोकिती जनांसी ॥९१॥
पृथ्वी तरली जयांच्या सत्यें ॥ ते ऋषि मिळाले अपार तेथें ॥ ते महाऋषी श्रोतयांतें ॥ श्रवण करवूं अत्यादरें ॥९२॥
महाऋषि आला दधीची ॥ सुनाभादि अस्त्रें जयाचे अस्थींचीं ॥ शिरें कापिळीं त्रिपुरादि दैत्यांचीं ॥ त्र्यंबकधरें ॥९३॥
समुद्राचें केलें आचमन ॥ इल्वल वातापी भक्षिले जेणें ॥ तो मित्रावरुणाचा नंदन ॥ अगस्ति तेथें पातला ॥९४॥
सृष्टि करितां क्षण न लागे ज्यासी ॥ पतिव्रता सर्वें तेजोराशी ॥ तो मुख्य विप्र अविमुक्तीसी ॥ कश्यप ऋषी पातला ॥९५॥
जेणें द्विधा केली गंगा वैतरणी ॥ शापें सर्व भस्म केला वन्ही ॥ तो ब्रह्मसुत महामुनी ॥ भृगु आला त्या ठाया ॥९६॥
चाळीस सहस्त्र शिवऋषी ॥ वीस सहस्त्र विष्णुऋषी ॥ आणिका जे कां ब्रह्मऋषी ॥ ते बावीस सहस्त्र असती ॥९७॥
गौतम दाल्भ्य जे जर्जर ॥ मार्कंडेय आला पराशर ॥ अत्रि वसिष्ठ ब्रह्मकुमर ॥ आले यागाकारणें ॥९८॥
पूर्वापार महाजुनाट मुनी ॥ पुलस्त्य मरीची महाविंदानी ॥ च्यवन ब्रह्मदत्त विभांडकमुनी ॥ गाधि कपिलादि मुनीश्वर ॥९९॥
बकदाल्भ्य मुनीश्वर दुर्वास ॥ ऐसे ऋषी मिळाले बहुवस ॥ ज्यांसी घडामोडी करितां आयास ॥ नसे सृष्टीचा सर्वथा ॥१००॥
ऐसे आले शिवभुवनासी ॥ सुर नर किन्नर देवऋषी ॥ म्हणती इच्छा नाहीं आम्हां यागासी ॥ परी काशीतीर्थ घडेल ॥१०१॥
घडेल मणिकर्णिकेचें स्नान ॥ विश्वेश्वराचें अभिनंदन ॥ आमुचें पूर्वपुण्य म्हणोन ॥ हा उदय जाहाला साक्षास ॥१०२॥
कैसें उदेलें कर्म अर्जित ॥ जैसें अग्नीमध्यें जें पडत ॥ तें व्योममंडपी अकस्मात ॥ प्राप्त होय दीक्षिता ॥१०३॥
ऐसे यागासी आले महामुनी ॥ शास्त्रार्थविद वेदाध्ययनी ॥ तापसी सिद्ध सत्यवचनी ॥ शांतिक्षमेचे पर्वत जे ॥१०४॥
नाना गोत्रींचे मुनिवर ॥ महातपाचे गिरिवर ॥ व्याकरण-ज्योतिषशास्त्रविचार ॥ केला जयांनीं ॥१०५॥
विश्वामित्र महामुनी ॥ भारद्वाज जमदग्नी ॥ वामदेव विभांडकमुनी ॥ आले तेथें मिळोनी ॥१०६॥
अंबरीष लोहमर्षण ॥ मांडव्य जुनाट कात्यायन ॥ अगिरा भार्गव पिप्पलायन ॥ आले महर्षींचे समुदाय ॥१०७॥
ऐसे अठयायशीं सहस्त्र ऋषी ॥ संपूर्ण मिळाले काशीपुरीसी ॥ मग मुहूर्त पाहोनि सुदिनेंसी ॥ आरंभिला याग संभ्रमें ॥१०८॥
अर्धचंद्राकार कुंड स्थापुनी ॥ तैसेंचि वर्तुल चतुष्कोणी ॥ अग्नि स्थापिले तिन्ही ॥ गार्हपत्य आहवनीय दक्षिणाग्नि ते ॥१०९॥
मग आणिलीं यागपात्रें ॥ नानावर्ण विधिमंत्रें ॥ स्त्रुक स्त्रुवादि विचित्रें ॥ आणिलीं मंडपीं ॥११०॥
शम्या कृष्णाजिन मुसळ ॥ समिधा दर्वी उखळ ॥ श्वेतशुभ्र सोज्वळ ॥ काश्मीराचीं अनेक ॥१११॥
आज्यस्थाली आणि प्रणीता ॥ शुचिदर्भें मंडिता ॥ गोमयपिंड तत्त्वतां ॥ आणिलीं तेथें संभ्रमें ॥११२॥
सोमवल्लीचिया पूर्ण लता ॥ तोचि सोम आणि सोमपानकर्ता ॥ चमस आणिले तत्त्वतां ॥ यागाकारणें अनेकांपरी ॥११३॥
भृगु विरिंची हे आचार्य साचार ॥ यज्ञकंकणें बाधिलीं सत्वर ॥ यज्ञदीक्षा धेतली याउपर ॥ स्वयें चंद्रम्यानें ॥११४॥
मग ते स्त्रुव समिधा आणूनी ॥ पुण्यतरूच्या पत्रें आकर्षूनी ॥ सिद्धमंत्रें शुद्ध करूनी ॥ ठेविल्या मंडपीं ॥११५॥
कलश ठेविले द्रव्य भरूनी ॥ विधीं बैसले दर्भासनी ॥ महाश्रेष्ठ जे ज्ञानी ॥ यागासी आरंभ केला तिंहीं ॥११६॥
मग ऋत्विजांसी पूगफल दिधलें ॥ द्रव्यरत्नें नारिकेलफलें ॥ करीं कंकण बांधिलें ॥ जांबूनदाचें ॥११७॥
मग बिल्वचंदनाचीं काष्ठें ॥ अगुरुचंदनाचींही सुभटें ॥ कुंडीं रचिलीं एकवटें ॥ मग प्रवर्तले हवनासी ॥११८॥
त्र्यंबकाकार स्थापिलें कुंड ॥ सखोल नाभिप्रमाण प्रचंड ॥ धणितां त्रिसहस्त्र दंड ॥ प्रदक्षिणा असे कुंडाची ॥११९॥
स्वाहा स्वधा करितां वेदध्वनी ॥ अवदानें तृप्त करिती वन्ही ॥ तंव आधींच दीक्षा घेऊनी ॥ बैसला चंद्रमा ॥ तो ॥१२०॥
परिधानें केलीं मृगाजिनांचीं ॥ आसनें स्थापिलीं चर्माचीं ॥ व्रतें घेतलीं ब्रह्मचर्याचीं ॥ भूतां आहार इच्छेचा ॥१२१॥
आवाहन झालें गार्हपत्यासी ॥ गंधाक्षता झाली ब्राह्मणांसी ॥ मग प्रवर्तले हवनासी ॥ ऋषि मुनी सर्वही ॥१२२॥
सहस्त्र एक ऋषीश्वर ॥ महामंत्री थोर थोर ॥ आहुती घालिती अपार ॥ वेदमंत्रेंकरूनियां ॥१२३॥
मद्यमांसांचिया आहुती ॥ क्षिप्रा घृतें दिव्य अन्नें होमिती ॥ मग ते पंचामृतें शिंपिती ॥ महायागासी अनुक्रमें ॥१२४॥
येथें भागदानें झालीं देवांसी ॥ मग भाग आरंभिला शिवासी ॥ विधिमंत्रें दिधला महादेवासी ॥ स्वाहाकार बोलती ऋषीश्वर ॥१२५॥
देव ऋषी सुरगण ॥ दर्भांचें करोनियां आसन ॥ हातीं घेती हव्यद्रव्यें पूर्ण ॥ ब्रह्मादिक संपूर्ण पैं ॥१२६॥
मग करी घेऊनियां पूर्णाहुती ॥ आणि अष्टसुगंधें चर्चिती ॥ विरिंची आणि तारापती ॥ राहिले उभे कर जोडूनी ॥१२७॥
शीतकरें आहुती घेतली करीं ॥ वेदमंत्रें ऋषीश्वरीं ॥ धातली कुंडामाझारीं ॥ शिवार्पित म्हणूनियां ॥१२८॥
ऐसी ती करोनियां शिवार्पित ॥ मग चंद्र स्तुति करीत ॥ म्हणे हा माझा भाव यथार्थ ॥ पावो शिवभवनींसी ॥१२९॥
म्हणे जयजयाजी शंकरा ॥ तुज अर्पिजे धनशरीरा ॥ तरी तूं भेटसी त्रिशूलधरा ॥ आपुलिया भावार्थें भक्तांसी ॥१३०॥
ऐसें कल्पोनियां मानसीं ॥ चंद्रें साष्टांग नमस्कार घातला शिवासी ॥ मग जाणोनि पुण्यराशीं ॥ प्रकटला शिव तत्काळ ॥१३१॥
तो प्रकटला कैसा शूलपाणी ॥ उद्भवला चंद्रेश्वरलिंगांतूनी ॥ वामांगीं असे दाक्षायणी ॥ वृषभध्वजेंसीं ॥१३२॥
दशभुज पंचवक्त्र ॥ आणि फणिभूंषण त्रिनेत्र ॥ गंगा जटीं महापवित्र ॥ भस्मोदूधूलित सर्वांगीं ॥१३३॥
प्रसन्न व्हावया पंचानन ॥ उमेसहित त्रिनयन ॥ देखोनि विरिंची नारायण ॥ जयजयकार करीत ऊठिले ॥१३४॥
समस्त देव प्रमथ ऋषी ॥ साष्टांगें नमिती शिवासी ॥ तो उभा राहिला वर द्यावयासी ॥ परी न बैसे मंडपीं ॥१३५॥
तेथें आनंदाची मात ॥ सभा न्याहाळीतसे भवानीकांत ॥ मग जाहालासे तो विस्मित देखोनियां देवसभा ॥१३६॥
विधीनें याग समापितां शांति करूनी ॥ मग सभा दाटली देवगणीं ॥ तेथें सभापति चक्रपाणी ॥ देवेंसीं तो वज्रधरू ॥१३७॥
ऐसा यागमंडपीं आनंद ॥ देखोनियां सच्चिदानंद ॥ मग करावया नवरसविनोद ॥ नृत्यांगना पावल्या ॥१३८॥
स्वर मिळवूनियां मृदंगासी ॥ पाहूनियां तालसंयोगासी ॥ निरुतें सज्जूनियां विण्यासी ॥ ठाकलिया सभारंगणीं ॥१३९॥
तेथें नारद तुंबरु मृदंगीं ॥ तिंहीं धुमाळी दाविली रंगीं ॥ श्रुती स्फुरल्या उपांगीं ॥ यक्षकिन्नरेश्वरीं त्या ॥१४०॥
गंधर्व तालधारी तेथें ॥ सामगायन सुस्वरातें ॥ दाविताती नाना पदार्थांतें ॥ तिन्ही ताल युक्तीसी ॥१४१॥
मार्ग दाविती सुदेशींचा ॥ ग्राम मूर्च्छना वेग स्वरांचा ॥ हाहा हूहू योगश्रुतींचा ॥ दाविती आलापें ॥१४२॥
कंपकंठीं सप्तस्वरीं ॥ मृदंगी दावीतसे कुसरी ॥ तेथें मेळवीतसे टाळधारी ॥ श्रुतियुक्त संगीत ॥१४३॥
ऐसा वोडव दाविला यंत्रकारीं ॥ तंव नृत्यांगना पातल्या अपारी ॥ सर्व लोकींच्या मनोहारी ॥ ठाकल्या उभ्या नृत्यासी ॥१४४॥
देवेंद्रासी वदे महामुनी ॥ ऐसें नृत्य आरंभिलें मंडपस्थानीं ॥ मग गौरवूनि ऋषिमुनी ॥ तया स्थानीं तिष्ठत ॥१४५॥
हे कथा शिष्याकारण ॥ निरूपीतसे कृष्णद्वैपायन ॥ ऐसी कथा हे महाराष्ट्र भाषापूर्ण ॥ निरूपीतसे शिवदासा गोमा ॥१४६॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे रुद्र-चंद्रलोकवर्णनं नाम षोडशाध्यायः ॥१६॥  ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥   ॥ ॐ ॥    ॥ ॐ ॥

॥ इति षोडशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP