काशी खंड - अध्याय ५ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ऐसे देव पहुडले समस्त ॥ मग अगस्ति झाले ध्यानस्थ ॥ देवांची कार्यविचारणा करीत ॥ तों उद्भवे चिंता चित्तातें ॥१॥
ऋषि वदे लोपामुद्रेसी ॥ उपकार नव्हे हे विवसी ॥ सुखें असतां हे वाराणसी ॥ विघ्न आलें पूर्ण आम्हां ॥२॥
पाहातां देवांचिया आज्ञार्था ॥ आपणांसी विघ्न प्राप्त सर्वथा ॥ आपण मुकलों या विश्वनाथा ॥ ऐसें भविष्य दिसतसे ॥३॥
सुरपति घेऊनि आला गीर्वाणां ॥ आणि हें कार्य निरूपिलें आपणा ॥ तरी मंद झाल्या आंगवणा ॥ सुरेंद्राचिया ॥४॥
वज्रा ऐसी सामुग्री जयाची ॥ ह्रदयें भेदी महागिरींचीं ॥ त्यापुढें विंध्याचळाची ॥ मात ते कायसी ॥५॥
अल्पप्रमाण स्फुलिंग उजळे ॥ तेणें अष्टकुळाचळ जळे ॥ तो वैश्वानर बळें ॥ प्रार्थूं आला आम्हांसी ॥६॥
कश्यपऋषीचा जो कुमरू ॥ समूळ उत्पाटूं शके मेरू ॥ ऐसा वायु आला श्रद्धा करूं ॥ आमुचे गुंफाद्वारीं ॥७॥
विंघ्याद्रीऐसे लक्ष गिरी ॥ क्षणें उठवीं क्षणें संहारी ॥ तो धर्मराज आमुचे द्वारी ॥ आला असे प्रार्थावया ॥८॥
प्रळयीं द्वादशधा दीप्त तो गभस्ती ॥ त्रैलोक्य दग्ध करी दीप्ती ॥ तों आमुचे द्वारी करावया विनंती ॥ मार्तंड स्वयें आलासे ॥९॥
जैं अभिलाषिली गुरुकांत ॥ तैं पराभविलें देवां समस्तां ॥ ते प्रौढी काय झाली न्यून आतां ॥ त्या शीतकराची ॥१०॥
जो नव निधींचा भांडारी ॥ त्रैलोक्याची लक्ष्मी घरीं ॥ तृणतुल्य जयासी महागिरी ॥ तो कुबेर प्रार्थूं आलासे ॥११॥
कल्पांतीं करी पूर्ण जळ ॥ उदकीं बुडवी पृथ्वी कुळाचळ ॥ तो कर्दमऋषीचा बाळ ॥ वरुण प्रार्थूं पातला ॥१२॥
ऐसे बळी आदित्य दिक्पती ॥ ते कार्य करूं न शकती ॥ ते सत्यचि परी कर्मगती ॥ न चुके जाण आमुची ॥१३॥
या देवां सुरेंद्रा नावडे तापसी ॥ विघ्न करिती तपासी ॥ आम्ही सेवून राहूं काशीसी ॥ देवांभेणे परियेसा ॥१४॥
पृथ्वीतटीचें जें वेदाचरण ॥ श्रीमंत वर्तती हिताकारण ॥ ते वर्तणूक देखती ॥ अप्रमाण ॥ दुर्जन जैसे कां ॥१५॥
कां ते देव दुर्जन आले ॥ तिंहीं भक्ताचिये मतीतें पीडिलें ॥ तैसेचि दुर्जन असती निर्मिले ॥ या भूमंडळामाझारी ॥१६॥
व्यवसाय त्यजूनि सर्वही ॥ क्षेमरूप होऊनि राहे जो गृहीं ॥ तयासी म्हणती हा संदेही ॥ आळशी आणि दरिद्री ॥१७॥
कवण गुप्त व्यापार करी ॥ जगीं अमे मौनाचारी ॥ त्यासी काय कल्पिती दुराचारी ॥ हा तस्कर ॥१८॥
एकाचे गृहीं असे अर्पूणता ॥ आणि तो जगीं मिरवीतसे पूर्णता ॥ त्याची दुरात्मे करिती वार्ता ॥ आहे म्हणती हा तस्कर ॥१९॥
कवणाचें तरी गृह तस्करिलें येणें ॥ यासी कैंचीं वस्त्रें भूषणें ॥ हे पदेवी कां उदिमाविणें ॥ कैसेनि प्राप्त असेल ॥२०॥
महासाधु झाला ज्ञानभरित ॥ सर्व सास्त्राविकारी नीतिवंत ॥ त्यासी म्हणती हे जहाले चळित ॥ पिसाट जगीं कां ॥२१॥
ऐसें जे नीतिमागें आचरण ॥ सत्यार्थ न घेती दुरात्मे दुर्जन ॥ म्हणोनि कां ते अन्नर्थी दीन ॥ क्लेश भोगती सर्वदा ॥२२॥
कीं नसेल आपुली कर्मगती ॥ म्हणोनि अप्राप्त हे अविमुक्ती॥ जैसें पीक पावे रंक शेतीं ॥ परी भक्षिजे टोळ-कीटकीं तें ॥२३॥
कीं जैसें स्वन्पीं दिसे विचित्र ॥ रंकासी प्राप्त राज्य क्षेत्र ॥ चेइलिया मिथ्या भास सर्वत्र ॥ धूळचि सत्य असे ॥२४॥
जेवीं अनाथा सांपडे निधान ॥ तें समर्थें नेइजे हिरून ॥ तैसें हें आनंदवन ॥ अप्राप्त आम्हांसी पैं ॥२५॥
जैसा पुत्र पावे तारुण्यासी ॥ तो अप्राप्त ॥ होय मातापित्यांसी ॥ तैसी हे अविमुक्ति काशी ॥ अप्राप्त जाहाली आम्हांतें ॥२६॥
आतां असो हें होणार बळवंत ॥ देवीं केलें सर्वही अनृत ॥ तो कर्ता कार्य एक निश्चित ॥ शिवचि असे ॥२७॥
आतां आन भाव न धरूं देहीं ॥ परोपकार तोचि करूं सर्वही ॥ मग गृहसामुग्री त्यजूनि पाहीं ॥ उठिला अगस्ति कांतेसहित ॥२८॥
जैसा उमेसहित शंकर ॥ उभा ठाके भक्तां द्यावया वर ॥ तैसा देवांवरी करावया उपकार ॥ अगस्ति उभा ठाकला ॥२९॥
अगस्ति लोपामुद्रा सगुण ॥ गंगेसी करूनियां स्नान ॥ माग करिता झाला स्तवन ॥ स्वर्गतरगिणीचें ॥३०॥
जय जय वो स्वर्गसरिते ॥ जय जय वो दोषरहिते ॥ जय जय वो पुण्यभरिते ॥ दयार्णव माता होसी तूं ॥३१॥
तुझें करितां नामस्मरण ॥ व्यग्र नाहीं अंतःकरण ॥ नित्य मस्तकीं वंदितों जीवन ॥ तरी कां अव्हेरिसी मज ॥३२॥
मग निघाला तो मुनींद्र ॥ अमृतकळापूर्ण जैसा चंद्र ॥ तेणें नमस्कारिला तो गजेंद्र ॥ ढुंढीविनायक ॥३३॥
तुज नमन ढुंढीविनायका ॥ कीं तूं महाविघ्नांसी अंतका ॥ तरी विघ्न कां मज रंका ॥ प्राप्त केलें तुवां हें ॥३४॥
तूं भक्तांचीं विघ्नें हरिसी ॥ म्हणोनि निर्विघ्न नाम तुजसी ॥ काय चुकलों तुझे भक्तीसी जें विघ्न केलें मज आतां ॥३५॥
मग निघाला तो महाऋषी ॥ वेगी आला दंडपाणीपाशीं ॥ मस्तक ठेवूनि चरणांसी ॥ केलें त्यातें अभिवंदन ॥३६॥
म्हणे गा दंडपाणि अवधारीं ॥ तुमची भक्ति मी नित्य करीं ॥ तुम्ही विश्वंभराचे दंडधारी ॥ कां अव्हेरिलें मजलागीं ॥३७॥
मग आला काळभैरवाजवळी ॥ त्यासी प्रंणमिलें बद्धांजळीं ॥ स्तविता झाला ते काळीं ॥ अगस्तिमुनी तो ॥३८॥
तुज शरण जी उग्रमूर्ती ॥ शिरीं जटाजूट त्रिशूळ हस्तीं ॥ काय चुकलों तुमची भक्ती ॥ जे अव्होरिलें मजलागीं ॥३९॥
मग स्मरे सकळ देवतांतें ॥ म्हणे कां अव्हेरिलें आम्हांतें ॥ तुम्हां पूजिलें नाहीं एकचित्तें ॥ काय अन्याय पैं माझा ॥४०॥
तुज प्रणाम वो भवानी सुंदरी ॥ माझिया तपाची साक्षी बिकट गौरी ॥ अहो हयग्रीवा देवी अवधारीं ॥ कां अव्हेरिलें मजलागीं ॥४१॥
ऐसा तो वियोगी अविमुक्तीचा ॥ धांवा करी देवतांचा ॥ परी तो पुत्र मूळनक्षत्रींचा ॥ प्रहरिजे मघार्णवीं ॥४२॥
मग नमिला भवानी शंकर ॥ सद्भावें केला नमस्कार ॥ म्हणे स्वामी माझा भाव क्रूर ॥ देखिलासे तुम्हीं कीं ॥४३॥
अहो तृणवल्लीवृक्षभार ॥ तुमचें सामर्थ्य अपरंपार ॥ तुम्ही वसतां निरंतर ॥ या काशीपुरीमाझारी ॥४४॥
श्वान जंबूक आणि हरी ॥ विहंगम पक्षी नानापरी ॥ यांचें भाग्य अपार पृर्वापारीं ॥ आम्हांपरीस सहस्त्रगुणें ॥४५॥
तुम्ही श्रेष्ठ रे सर्व पाषाण ॥ तुम्हां प्राप्त हें आनंदवन ॥ मी एक अनाथ दीन ॥ मज अव्होरिलें विश्वनाथें ॥४६॥
म्यां कवणासीं नाहीं प्रमाद केला ॥ कां विश्वेश्वरपूजनीं विक्षेप पडला ॥ मग तो ऋषि प्रियेसी वदला । उपकार करितां विघ्न जोडे ॥४७॥
पहा जो स्वन्पीं झाला उपकारी ॥ तो हरिश्वंद्र गाधिसुता उपचारी ॥ परी तेणें तो राज्याबाहेरी ॥ काढिला रावो ॥४८॥
पाहें पां भृगूच्या घरी वैश्वानर ॥ परोपकारी रक्षाकार ॥ विनादोषें शापोनि अंगार ॥ सर्वभक्षक तो केला ॥४९॥
आणिक दैत्यवंशीं परोपकारी बळी ॥ यज्ञ करितांच घातला तो पाताळीं ॥ म्हणोनि उपकार करितां भूतळीं ॥ तो न रुचे देवांसी ॥५०॥
अगस्ति म्हणे प्रिये सुंदरी ॥ देवांची ह्रदयें कठोर भारी ॥ निमित्तास्तव योजिला हा विंघ्याद्री ॥ आतां हें होणार टळेना ॥५१॥
चतुर्दश रत्नें अमरनाथाचे घरीं ॥ तीं गळाली क्षीराब्धीमाझारी ॥ मग देवीं तो मंदरगिरी ॥ उत्पाटिला समूळ ॥ ५२॥
तो क्षीराब्धीच्या उदरी घातला ॥ मग सुरासुरीं अंबुनिधि मथिला ॥ विंध्याद्रीस्तव मेळा मिळविला ॥ हें संकट आम्हांसी ॥५३॥
पहा आतां एक विचार ॥ त्रैलोक्यआनंदकर्ता स्मर ॥ तो त्रिनयनें जाळिला सत्वर ॥ तेणें कवणाचें काय केलें ॥५४॥
ऋषि करुणा भाकी दीनवदनी ॥ म्हणे कठिण जी तूं शूलपाणी ॥ ऐसा आक्रंदतसे दीर्घध्वनी ॥ क्षितीवरी अंग घातलें ॥५५॥
मारुताचिया झुंजाकारीं ॥ वृक्ष उत्पाटिले क्षितीवरी ॥ तैसा ऋषि आक्रंदतसे दीर्घस्वरीं ॥ क्षितीवरी पडिला तो ॥५६॥
काशीच्या चौबारी क्षितितळीं ॥ मस्तकीं रज घाली भरूनि अंजळी ॥ म्हणे हे धुळीचें स्नान कोणे काळीं ॥ प्राप्त होईल मजलागी ॥५७॥
नयनी प्रवाहे नीर ॥ चक्षूंसी म्हणे पहा रे शंकर ॥ अवलोका हें काशीपुर ॥ गेलें गेलें हातींचें ॥५८॥
जे भागीरथीमाजी जीवजंतु अपार ॥ मत्स्यकच्छादि जलचर ॥ त्यांचें भाग्य अति थोर ॥ अमरेशापरीस मज गमे ॥५९॥
ऐसा आक्रंदत दीर्घध्वनी ॥ क्रोधायमान अंतःकरणी ॥ जैसा तो तीव्र तरणी ॥ माध्यान्हकाळीं दिसतसे ॥६०॥
ध्यानस्थ राहूनि पळ एक ॥ ह्रदयीं स्थिरावला सम्यक ॥ म्हणे जें प्रमथांसी परम सुख ॥ तेंचि करूं एक आतां ॥६१॥
या परोपकाराहून ॥ नाहीं दुसरें थोर पुण्य ॥ जयासी घडलें असेल आनंदवन ॥ तोचि जाणेल परोपकार ॥६२॥
सिता असिता प्रयागस्थानी ॥ तुळा धरूनियां पाणी ॥ परोपकारपुण्य आणि हीं दोनी ॥ तुळिली स्वयें चतुराननें ॥६३॥
उपकारें जिंकिलें सायुज्यस्थान ॥ पुण्यें न चुके जन्ममरण ॥ म्हणोनि परोपकारतुलन ॥ ब्रह्मन्यानें केलें प्रयागीं ॥६४॥
त्रिलोकी श्रेष्ठ परोपकार ॥ ऐतें वदला सृष्टिकार ॥ म्हणोनि अगस्ति मुनिवर ॥ हेंचि ह्रदयीं धरीतसे ॥६५॥
परोपकार धरोनि हृदयीं ॥ अगस्ति उठिला ते समयीं ॥ मेदिनी कंपायमान ते ठायी ॥ जाहाली ऋषिकोपास्तव ॥६६॥
काशीवियोग घटोद्भवा ॥ म्हणे पृथ्वीनें धरिली मावा ॥ म्हणोनि विंध्याद्रीसी जातां कंणवा ॥ दूर कीं झाला मार्ग तो ॥६७॥
म्हणेनि कंपायमान झाली मेदिनी ॥ ऋषि क्रमीतसे चरणीं ॥ तिनें कठिणत्व सांडोनी ॥ मृदु झाली पदोपदीं ॥६८॥
जाणोनि ऋषीची मनोवृत्ति ॥ क्रमितां झाली अल्प क्षिति ॥ विंध्याद्रीपाशीं आला अगस्ति ॥ एक निमिषामाझारी ॥६९॥
सहस्त्र विद्युल्लता एकसरीं ॥ उद्भवती गगनोदरीं तैसा तेजकल्लोळ पृथ्वीवरी ॥ तंव ऋषि येतां देखिला शैलें ॥७०॥
ऋषि येतां विंध्याद्रिनिकटीं ॥ तंव तो सामाव्ला पृथ्वीचे पोटीं ॥ ऋषीनें देखिला स्वद्दष्टीं ॥ सान गिरिशृंग जैसा ॥७१॥
महाक्रोधाग्नि देखोनि ऋषीसी ॥ कंप सुटला विंध्याद्रीसी ॥ म्हणे हा झणीं आमुतें ग्रासी ॥ इल्वल-वातापीशत्रु हा ॥७२॥
म्हणोनि तो पृथ्वीपोटीं ॥ सामावोनि राहिला अधोद्दष्टी ॥ तंव ऋषि उल्लंघून पृष्ठी ॥ आला गिरिदक्षिण भागीं ॥७३॥
ऋषि वदे विंध्याद्रीसी ॥ जें तुवां कार्य धरिलें मानसीं ॥ स्पर्धा केली सुवर्णाचलासी ॥ पुरुषार्थ आपुला लक्षूनियां ॥७४॥
तंव विंध्याद्रि झाला भयातुर ॥ म्हणे त्वरेंसीं पहुडो हा ऋषीश्वर ॥ यानंतर प्रत्युत्तर ॥ ऋषि करी विंध्याद्रीसी ॥७५॥
आतां तूं ऐसाचि राहें स्वस्थ ॥ प्रमथांसीं न करीं द्वैत ॥ परिसें गा शैला महादद्भुत ॥ मात या देवांची ॥७६॥
तारकें घेतली अमरपुरी ॥ देव मृत्यु पावले युद्धाभीतरी ॥ तैं देवांसी औषाधोपचारी ॥ द्रोणाचह जीववीत ॥७७॥
म्हणोनि तारक खवळला ॥ द्रोणाचल सागरीं बुडविला ॥ तो तारक क्षयातें पावविला ॥ ऐसे देव शक्तिवंत ॥७८॥
जो सुरनायक वज्रधर ॥ त्याचा ऐरावत कुंजर ॥ तेणें दंतप्रहारें पाठार ॥ हिमालयाचें तोडिलें ॥७९॥
तो अवध्या गिरींचा अधिपति ॥ जयाचा जामात पशुपति ॥ तुझा पुरुषार्थ असेल तो किती ॥ जे देवांसीं वैर धरणें ॥८०॥
महापर्वत मंदरगिरी ॥ तो देवीं घातला दुग्धसागरीं ॥ तूं त्यांपुढें अशक्त शरीरी ॥ जे देवांसीं वैर घडेल ॥८१॥
शैला तूं तृणतुल्य देवांसी ॥ परी हें कारण होतें आम्हांसी ॥ अप्राप्त झाली पंचक्रोशी ॥ तुजनिमित्त पाहें पां ॥८२॥
तरी भला रे पुरुषार्थी शैला ॥ शक्तिवंता महाबला ॥ परी सर्वथा त्या दिक्पालां ॥ न कीजे वैर सर्वथा ॥८३॥
ऐसें ऋषि बोले विंध्याद्रीसी ॥ परी तो न बोले प्रत्युत्तरासी ॥ मग कांतेसहित त्वरेंसीं ॥ निघता झाला ऋषि तो ॥८४॥
कांतेसहित तो अगस्ती ॥ पावला सह्याद्रीप्रती ॥ क्षमा शांति बहुत प्रीती ॥ भेटला तेव्हां गिरीसी ॥८५॥
गिरी मस्तक ठेवी चरणीं ॥ तंब अगस्तीनें धरिलें द्वयपाणी ॥ म्हणे गा स्वस्थ बैसें आपुले स्थानीं ॥ आशीर्वचन दीधलें ॥८६॥
सह्याद्रीनें बोलूं आदरिलें ॥ संसारक्रमें चित्त मलिन झालें ॥ त्या महादोषांतें दग्ध केलें ॥ तुमचिया दर्शनें ॥८७॥
तुम्ही असतां आनंदवनी ॥ जे विश्वनाथाची राजधानी ॥ तेथींचे रज तुमच्या चरणीं ॥ तें मजलागीं प्राप्त कीजे ॥८८॥
जें रज तुमचे पदतळीं ॥ जरी तें पडेल आमुचें मौळीं ॥ तरी जन्मांतरींचे दोष तत्काळीं ॥ पराभवती स्वामिया ॥८९॥
ऐसें सह्याद्रीचें अमृतवचन ॥ परिसोनि क्षेम दिधलें अगस्तीन ॥ मग तेथोनि गमन ॥ करिता झाला दक्षिणमार्गे ॥९०॥
ऋषि निघाला झडकरी ॥ तंव देखिली गोदावरी ॥ संतोषला हृदयांतरीं ॥ गोदांबु देखोनियां ॥९१॥
त्र्यंबकाहूनि उद्भवली ॥ पूर्वसागरासी पावली ॥ उद्धरावया प्रकटली ॥ विश्वमाता विश्वातें ॥९२॥
काशीवियोगें देह कष्टले ॥ शोकसंतापें उष्ण झाले ॥ म्हणोनि अगस्तीनें सारिलें ॥ गंगास्नान तये काळीं ॥९३॥
तेथें विश्रांति झाली अगस्तीप्रती ॥ अभिवंदन करी बद्धहस्तीं ॥ गोदेची करूनि स्तुती ॥ क्रतीतसे दक्षिणपंथ ॥९४॥
ऋषि आला कोल्हापुरीं ॥ तेथे भेटली महालक्ष्मी सुंदरी ॥ अगस्ति ऋषि बद्धकरीं ॥ स्तविता झाला तियेसी ॥९५॥
जयजय वो मंगला भवानी ॥ जयजय वो त्रैलोक्यतापहारिणी ॥ शुंभ-निशुंभनिर्दळणी ॥ वाराही धन्य तूंचि पैं ॥९६॥
तूं होसी संसारकुमुदिनी ॥ जगत्रयासी महामौनकारिणी ॥ मायामोहें भुलवणी ॥ सर्वभूतात्मिके ॥९७॥
तूं अवचिन्हें उडविसी महाकौतुकें ॥ नानापरींचीं भयानकें ॥ येऊं न देसी जवळिकें ॥ आज्ञेविरहित सर्वथा ॥९८॥
तूं दिव्य त्रिगुण सागरकुमारी ॥ तूं व्यापक होसी चराचरीं ॥ सान थोर न कळे वो सुंदरी ॥ स्वरूप तुझें आम्हांतें ॥९९॥
तूं आदि संसाराची खाणी ॥ आमूळवृक्षाची सांठवणी ॥ तुझा गोंधळ ब्रह्मज्ञानी ॥ महायोगी घालिती ॥१००॥
षटचक्रांचे मूलपीठे ॥ योगपंथींचे खोल वाटे ॥ त्रिकूट गोल्हाटीचे घाटे ॥ तुज जाणे तो पावे सायुज्यपद ॥१०१॥
परम सुखाची आदि ॥ भुक्तिमुक्तींची तूं सिद्धि ॥ अविनाशपदींची बुद्धि ॥ आनंदकंद तूं होसी ॥१०२॥
तू एकासी जागविसी जागणी ॥ एकासी निजविसी योगिनी ॥ योगियांसी महाप्रमोदिनी ॥ अनुहत अनादि ॥१०३॥
तूं प्रकृति जीवभाविनी ॥ महामोहमय व्यापक जनीं ॥ ध्यानीं लक्षिसी विवंचूनी ॥ आकार तुझा तूंचि कीं ॥१०४॥
शून्य उन्मनीचे देहीं ॥ पुष्पमनें पूजिती पाहीं ॥ आनंद पावती सर्वही ॥ महायोगीश्वर तेचि पैं ॥१०५॥
अंबे काय करूं वो तुझी स्तुति ॥ पाहातां तुझीच अवघी उत्पत्ति ॥ तुवां स्थापिल्या आकारमूर्ति ॥ भूतसृष्टीचिया ॥१०६॥
भक्तांगृहीं मंगलें करिसी ॥ म्हणोनि मंगला नाम तुजसी ॥ आणि अमंगलाचे सदनीं बससी ॥ म्हणोनि अमंगला तूं ॥१०७॥
अमंगल न यावें भक्तांपासीं ॥ म्हणोनि असुर अमंगल द्वेषी ॥ त्यांसी मर्दूनियां देसी ॥ देवादिकांसी मंगल ॥१०८॥
ऐसी अगस्तीची अमृतवाणी ॥ परिसोनि संतुष्ट झाली भवानी ॥ म्हणे माग माग रे मैत्रावरुणी ॥ तुज प्रसन्न जाहलें मी ॥१०९॥
लक्ष्मी म्हणे लोपामुद्रेतें ॥ बरवीं दिसती वो तुमचीं नेमव्रतें ॥ तुवां माझिया मनाते ॥ आनंद केला ऋषिअंगने ॥११०॥
स्वामीसवें सौभाग्यवती ॥ पतिव्रताधर्म ऐसेचि असती ॥ आतां तूं क्षेम देईं मजप्रती ॥ ऋपिकामिनी पतिव्रते ॥१११॥
सौभाग्य दिधले तुजजागुनी ॥ तंव लोपामुद्रा लागे चरणीं ॥ लक्ष्मीनें धरिले स्वयें पाणी ॥ झालें क्षेम आलिंगन ॥११२॥
भवानी लोपामुद्रेसी वोले ॥ महाअसुर म्यां निर्दाळिले ॥ चंड मुंड रक्तबीज पावविले ॥ क्षयासी ऋषिकांते ॥११३॥
महाअसुरांचा करितां संहार ॥ क्रोधाग्नि प्रज्वळिला होता थोर ॥ तुझें क्षेम ते भागीरथीनीर ॥ उष्णता गेली देहाची ॥११४॥
मग लोपामुद्रेकारणें ॥ दिधलीं दिव्यांबरें भूषणें ॥ सर्व शृगार भवानीनें ॥ समर्पिला ते समयीं ॥११५॥
भवानी म्हणे वो अगस्ती ॥ आनंदवनीं तुम्हां दोघां वस्ती ॥ वियोगास्तव क्रमिली क्षिती ॥ परोपकार झाला तुजलागीं ॥११६॥
तुवां जें केलें स्तवन ॥ हें नित्यकाळ करिती जे श्रवण पठण ॥ त्यांसी माझें वरदान पूर्ण ॥ आणि ठावो मजपासीं ॥११७॥
आतां भावपूर्वक अभयकरू ॥ तुज दिधला पूर्ण वरू ॥ तंव बोलिला ऋषिश्वरू ॥ भावनीप्रती ते काळीं ॥११८॥
अहो आकाशाहूनी जें थोर ॥ चतुर्वेदांचें जे मुख्या सार ॥ तें शिवालय काशीपुर ॥ प्राप्त करीं मागुतें मज ॥११९॥
तंव ते वदे भवानी सुंदरी ॥ जें अपेक्षा तुझे अंतरीं ॥ ते एकूणतिसाव्या द्वापारीं ॥ प्राप्त होईल तुललागीं ॥१२०॥
एकुणतीस होतील द्वापारू ॥ तैं तुज कृपा करील शंकरू ॥ सत्यचि माझा अभयवरू ॥ प्राप्त होईल तुज काशी ॥१२१॥
करिसी चतुर्वेदांचें मथन ॥ कथिसी अष्टादश पुराण ॥ तैं तुज म्हणतील कृष्णद्वैपायन ॥ हें भविष्योत्तर पुराणींचें ॥१२२॥
भवानीसी वदे मुनीश्वर ॥ तुवां जो दिधला अभयवर ॥ तो आनंद करितो अपार ॥ माझिया मानसीं ॥१२३॥
पर्वतींचें तेज जैसें वन्ही ॥ वरी वृष्टि करी जैसा मेघ गर्जुनी ॥ तैसा माझा वियोगाग्नी ॥ शांत तुझ्या पदाबुजजळें ॥१२४॥
तरी भवानिये परियेसीं ॥ तुवां भविष्य कथिलें आम्हांसी ॥ परी प्रळयीं ते पंचक्रोशी ॥ नासे कीं अविनाश ॥१२५॥
भवानी म्हणे रे अगस्ती ॥ प्रळय ते पांच असती ॥ तरी ते सविस्तर तुजप्रती ॥ करूं निरूपण सर्वही ॥१२६॥
अस्त झालिया प्रभाकर ॥ मग प्रवर्ते अंधकार ॥ सर्वही खुंटे अनादि व्यापार ॥ हाचि जाण नित्यप्रळय ॥१२७॥
एकाचा पुरलासे अंत ॥ दुसरा तयासी रक्षीत ॥ यास्तव साधु होती देहातीत ॥ हा आत्यंतिकप्रळयो ॥१२८॥
युद्ध होतां अग्निजळांसी ॥ तैं संहार होतसे जतूसी ॥ तो कुंभोद्भवा परियेसीं ॥ भौतिक प्रळयो ॥१२९॥
आतां काळ पडिलिया जो अंत ॥ त्या प्रळयासी नाम नैमित्तिक ॥ आतां परियेसीं एकाग्रचित्त ॥ ब्रह्मांडप्रळय जो ॥१३०॥
आतां प्रळय जो पाचवा ॥ तैं संहारू चौंखाणीजीवां ॥ चतुराननाची समाधि तेधवां ॥ महाप्रळयो जाणिजे ॥१३१॥
अष्टसहस्त्र युगांचें गणन ॥ तैं विधीचें अहोरात्र जाण ॥ त्यासी समाधि लागे पूर्ण ॥ षोडश सहस्त्र वर्षवरी ॥१३२॥
तैं द्वादशही सूर्य तपती ॥ पूर्ण जळें सप्तद्वीपवती ॥ चहूं खाणींची जीवजाती ॥ कोठें वसेल ते काळीं ॥१३३॥
ऐसा दिनप्रळय विधीचा असे ॥ तैं जीवजंतु महदादिमांदुसे ॥ तें पंचमहाभूतीं समरसे ॥ मुनिवर्या ॥१३४॥
विरिंचीनें विसर्जिलिया ध्यान ॥ प्रलयांबूचें करी आचमन ॥ चार खाणी करी निर्माण ॥ पितामह तो ॥१३५॥
जयाचें भोक्तृत्व असे जैसें ॥ जंतु निर्माण करी तैसे ॥ नित्यप्रळय विधीचे ऐसे ॥ परियेसीं अगस्ती ॥१३६॥
आतां महाप्रळय तो आणिक ॥ परिसें कुंभजा थोर कौतुक ॥ तेथें ब्रह्मादिकांसी अंतक ॥ प्रवर्ततो अगस्ती ॥१३७॥
शतवषैं पडे अवर्षण ॥ तेव्हां संहारे जीवन ॥ द्वादश सूर्यांचें तेज पूर्ण ॥ तेणें दग्ध वसुमती ॥१३८॥
शेषाचा विषानल पेटे ॥ तेणें दग्ध होती सप्तपातालपुटें ॥ कुळाचळांचीं होती रजकुटें ॥ रवितेजेंकरोनियां ॥१३९॥
संख्या एक शत संवत्सरांची ॥ पूर्ण वृष्टि होय वरूणाची ॥ गजशुंडावत धारा जलाची ॥ खंडेचि ना तये काळीं ॥१४०॥
त्रैलोक्य त्या प्रलयजळीं ॥ समरसेल महीतळीं ॥ काशीसहवर्तमान चंद्रमौळी ॥ काय पहा करिजेल ॥१४१॥
शेषें दग्ध केलीं पाताळें ॥ सूयें जाळिलीं कुळाचळें ॥ एकवीस जीं स्वर्गमंडळें ॥ जाळी तो तृतीय नेत्रें ॥१४२॥
मग जे त्रिभुवनाची दग्धधुळी ॥ समरसली प्रलयजळीं ॥ तंव काय करी तो चंद्रमौळी ॥ काशिकाधीश जो ॥१४३॥
जीवासहवर्तमान काशीपुरी ॥ शिवें धरिली त्रिशूलावरी ॥ ते नेली गगनोदरीं ॥ एकवीस स्वर्गांपरौती ॥४४॥
सप्तद्वीपवती निमाली ॥ अविनाश काशी राहिली ॥ शिवें त्रिशूलाग्रीं धरिली ॥ अविनाश विश्वंभरें ॥१४५॥
म्हणोनि प्रलयीं ते न नासे ॥ कवण जाणे प्रत्यक्ष ऐसें ॥ ते अनादिसिद्ध परिसें ॥ इच्छा विश्वनाथाची ॥१४६॥
तें प्रलयोदक उचंबळलें ॥ त्या उदलासी तेजें ग्रासिलें ॥ तेजासीही झडपिलें ॥ चंडवातें ते काळीं ॥१४७॥
मग जो चंडवात उद्भवला ॥ तोही महाकाशें भक्षिला ॥ त्या महाकाशाचा ग्रास केला ॥ तमोगुणस्वरूपें ॥१४८॥
ऐसीं महदभूतें मोडिलीं ॥ इच्छेनें महदादि भक्षिलीं ॥ तींही विलयातें पावलीं ॥ गुणत्रयेंसीं ॥१४९॥
ऐसें सर्व स्वरूपीं मिळालें ॥ मग केवळ निराकार उरलें ॥ जैसे पृथ्वीचे अंकुर लोपले ॥ पृथ्वीचमाजी ॥१५०॥
ऐसा जगदंकुर मोडिला ॥ सर्वही प्रपंच आच्छादिला ॥ रुद्र तरुबीज प्रमाण उरला ॥ परी तोही आच्छादे ॥१५१॥
स्वन्पीं देखिजे तो वैरी ॥ तयासी कवण कैसें संहारी ॥ तो प्रबुद्ध जाहालियावरी ॥ तोचि सहारे आपैसा ॥१५२॥
ऐसें प्रलयाचें निरूपण ॥ अगस्तीसी करी भवानी जाण ॥ मग पुढती वदली वचन ॥ कुंभजाप्रती तेधवां ॥१५३॥
तूं जाईं रे दक्षिणमार्ग क्रमीत ॥ पुढें भेटेल स्वामी शिवसुत ॥ तो पंचक्रोशीची पूर्ण मात ॥ निरूपील तुजलागीं ॥१५४॥
मग लक्ष्मीची आज्ञा होतां त्वरित ॥ ऋषि वंदिता झाला बद्धहस्त ॥ मग निघाला कांतेसहित ॥ दक्षिणपंथें ते वेळीं ॥१५५॥
विंध्याद्रीचा गर्व प्रहरिला ॥ सोमसूर्यांचा मार्ग मुक्त केला ॥ नक्षत्रांचा भार चालिला ॥ पूर्वेहूनि पश्चिमेसी ॥१५६॥
पूर्ववत चालती व्यापार ॥ घटिका प्रहर पळ अक्षर । तंव लोपामुद्रेसी मुनिवर ॥ काय वदता जाहाला ॥१५७॥
शिष्य म्हणती व्यासऋषीसी ॥ पुढें कथा वर्तली कैसी ॥ महाप्रज्ञा षड्वैरियांपासीं ॥ ते निरूपावी भावपूर्वक ॥१५८॥
श्रोतयां प्रथीं शिवदास गोमा ॥ मज कीजे जी पूर्ण क्षमा ॥ माझिये वैखरीसी उत्तमा ॥ काशीखंड हें अवधारा ॥१५९॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे अगस्ति-लक्ष्मीसमागमवर्णनं नाम पंचमाध्यायः ॥५॥
॥ श्रीसांवसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्रीरस्तु ॥ ॐ ॥ ॥ ॐ ॥ ॥ ॐ ॥
॥ इति पंचमाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2011
TOP