मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय २७ वा

काशी खंड - अध्याय २७ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
मग लोपामुद्रेसी वदे कुंभज ॥ ऐसा उद्धरिला तो शिवशर्मा द्विज ॥ ऐसीं तीर्थें निर्मी वृषभध्वज ॥ भक्तजनांसी तारावया ॥१॥
ऐसीं तीर्थें मुक्ति देती ॥ परी जन्मांतराची होय प्राप्ती ॥ म्हणोनि मल्लिकार्जुनाची गती ॥ अधिक असे जाण पां ॥२॥
म्हणोनि अन्यत्र लिंगें पूजिल्या ॥ तो जंतु जाय काशीठाया ॥ मल्लिकार्जुनाचें शिखर देखिल्या ॥ घडे काशीसी मुक्ती ॥३॥
तरी आपण देखिलें हें शिखर ॥ आपणां मुक्तीठाव काशीपुर ॥ जें लक्ष्मीनें सांगीतलें साचार ॥ एकुणतिसावे द्वापारीं ॥४॥
शिखर देखतां घडे काशी ॥ जरी पूजाविधी कीजे या लिंगासी ॥ तरी पूर्वज करिती कैलासीं ॥ अमृतपान शिवसभे ॥५॥
मग लोपामुद्रा आणि अगस्ती ॥ पाताळगंगेचें स्नान करिती ॥ मग पूजितीं जाहालीं प्रीतीं ॥ मल्लिकार्जुनातें ॥६॥
मग आरंभिली स्तुती ॥ म्हणे जयजयाजी त्रिशूळहस्ती ॥ जयजयाजी पशुपती ॥ पंचानना तूं एक ॥७॥
तुम्हां पूजिलिया विरूपाक्षा ॥ कोण जाणे त्या पुण्याची संख्या ॥ कृतांतासी करूनि शिक्षा ॥ निजपद देसी तूं ॥८॥
तूं प्रसन्न होतांचि महेशा ॥ अनन्यभक्तांसी सहसा ॥ आपणांसारिखे करिसी ऐसा ॥ समर्थ होसी तूं ॥९॥
तुम्ही दयाळू व्योमकेशा ॥ भक्तांसी हा पूर्ण भरंवसा ॥ जन वेष्टिले मायापाशा ॥ म्हणोनि नाहीं तव स्मरण ॥१०॥
जैसे कर्माधीन जीवकोटी ॥ तेणेंचि भ्रमती मोहसृष्टीं ॥ जैं तुझे स्मरणपूजनीं भाव उठी ॥ तैं दग्ध होय त्रिपुटी सहजचि ॥११॥
हें त्रैलोक्य जी तुमचा विनोद ॥ पूर्णभक्ती तुमचा आनंद ॥ मग सह्जचि संवाद ॥ होय तुझिया वराचा ॥१२॥
हरि विरिंची ब्रध्न तारापती ॥ हे तुमचे मनांकुर होती जाती ॥ मी मूढ मानव मंदमती ॥ वाखाणूं आतां काय तें ॥१३॥
तुझिये इच्छेचा अंकुर ॥ तोचि ब्रह्मा शार्ङ्गधर ॥ त्यांसही संदेह घातला थोर ॥ उत्पति - स्थितींचा ॥१४॥
अगस्तीनें साष्टांग नमिलें देखा ॥ बद्धकरें प्रार्थिलें त्रिपुरांतका ॥ म्हणे मी दीन अनाथ त्र्यंबका ॥ दीजे वरदान मज आतां ॥१५॥
तंव जाहाली प्रसादवाणी ॥ म्हणे रे अगस्ति महामुनी ॥ तुज प्राप्त होईल निजधामिनी ॥ काशीपुरी ते ॥१६॥
तुज भवानीनें दिधला वर ॥ तो तूं सत्य जाण कल्पतरू थोर ॥ तो इच्छाफल देईल सत्वर ॥ अहर्निशीं तुजलागीं ॥१७॥
मग लोपामुद्रा आणि अगस्ती ॥ मार्ग क्रमितीं जाहालीं पुढती ॥ संकल्प धरोनियां मनोवृत्तीं ॥ स्वामिभेटीचा ॥१८॥
मग आला स्वामीच्या स्थाना ॥ तेथें देखिलें षडानना ॥ आश्चर्य वर्तलें त्या ब्राह्मणा ॥ देखोनियां स्वामीसी ॥१९॥
तंव लोपामुद्रा करी प्रश्न ॥ म्हणे हा कैसा षडानन ॥ हा शिवगौरींचा नंदन ॥ कथावें आतां मजप्रती ॥२०॥
द्वादशभुज षण्मुख ॥ अष्टादश नेत्र विकटवेष सुरेख ॥ मयूरवहन भूषण शेष ॥ मिरवत असे तयाचा ॥२१॥
मग तो अगस्ति म्हणे हो कांते ॥ पतिव्रते गुणसरिते ॥ शब्दश्रवणीं सुचित्ते ॥ ज्ञात गुण तुझे या त्रिभुवनीं ॥२२॥
हा स्वामी शिवगौरींचा सुत ॥ परिसावा याचा जन्मवृत्तांत ॥ कोणे एके कल्पीं आकांत ॥ पृथ्वीसी केला दैत्यांनीं ॥२३॥
तरी हें चरित्र जुनाट फार ॥ युगें क्रमिलीं असती अपार ॥ तरी हें स्कंदपुराणीचें सार ॥ शिवें कथिलें भवानीसी ॥२४॥
लोपामुद्रेसी सांगे अगस्ती ॥ दक्षाची कन्या नांवें दिती ॥ ते कश्यपाची कांता जनिती ॥ महाअसुरांची म्हणवीत ॥२५॥
हिरण्यकशिपु हिरण्याक्ष ॥ राहु कपिस्कंध धूम्राक्ष ॥ तालजंघ पिंगाक्ष ॥ आणिक रौरव दैत्य पैं ॥२६॥
हे कश्यपाचे कुमर ॥ दितीपासाव जन्मले असुर ॥ मध्यें मुख्यनायक तारकासुर ॥ महाउग्र भ्यासुर जो ॥२७॥
तेणें तप केलें दारुण ॥ प्रसन्न जाहाला चतुरानन ॥ म्हणे जिंकिसी रे त्रिभुवन ॥ सत्य वाणी माझी हे ॥२८॥
तुज युद्धासी समरंगणीं ॥ भिडे ऐसा वीर नसे या त्रिभुवनीं ॥ हरि विरिंचि रुद्रांपासूनी ॥ तुज जय असे प्राप्त ॥२९॥
तूं पराभविसी अमरगण ॥ ऐसें वदला चतुरानन ॥ मग दैत्य आलासे तेथून ॥ तारकासुर नगरासी ॥३०॥
ऐसा तो तारकासुर महाबळी ॥ शुक्राचार्य मंत्री जवळी ॥ मग तारकासुर ते वेळीं ॥ प्रश्न करिता जाहाला गुरूसी ॥३१॥
म्हणे हें जिंकूं त्रिभुवन ॥ विरिंचि मज जाहालासे प्रसन्न ॥ महासंग्रामीं त्रिदशांपासून ॥ जय असे आम्हांसी ॥३२॥
मग शुक्राचार्य म्हणे दैत्यनाथा ॥ आतां विलंव न करीं सर्वथा ॥ आपण पराभवूं या अमरनाथा ॥ घेऊं संपूर्ण अमरपुरी ॥३३॥
यासी भिडतां काय उशीर ॥ पराक्रम दिसे याचा अतुल ॥ येथें न लावावा उशीर ॥ क्षण एक भिडावया ॥३४॥
ऐसा करोनियां विचार ॥ तेणें हांकारिले दैत्य असुर ॥ जे जे पृथ्वीचे महाथोर ॥ पाताळपुरींचे पराक्रमी ॥३५॥
महादैत्य राहु भस्मासूर ॥ शुंभ निशुंभ करटासुर ॥ तालजंघ कुंभक असुर ॥ चतुर्मुख मेघनाद ॥३६॥
सहस्त्रबाहु आणि वज्रनाभ ॥ धेनुक सुबाहु आणि कुंभ ॥ गजोदर सीरध्वज आणि निकुंभ ॥ ऐसे पाचारिले त्या ठायीं ॥३७॥
सप्तलोचन आणि धूम्राक्ष ॥ नरकासुर बाण विरूपाक्ष ॥ प्रलंब आणि तो मौराक्ष ॥ नमुचि आणि शंबरासुर तो ॥३८॥
ऐसीं दैत्यकुळें सांगतां ॥ सप्त कोटी प्रसवली दिति माता ॥ म्हणोनि संकलित श्रोतां ॥ नामें सांगीतलीं ॥३९॥
ऐसीं मिळालीं दैत्यकुळें ॥ तारकासुरा आलें थोर बळें ॥ कीं भेदूनि सप्तही पाताळें ॥ उद्भवले जैसे कुलाचला ॥४०॥
कीं स्वर्गीं अभ्रपुटें विशेषें ॥ श्याम विशाल गर्जनाघोषें ॥ गिरिकंदरीं जैसीं मुखें ॥ नेत्रकूप तटाकें जैसीं ॥४१॥
ऐसे पाताळविवरींचे उन्मत्त ॥ महाप्रौढ बळादभुत ॥ पृथ्वीसी करूं शकती कल्पान्त ॥ ते ते आले तारकापुरा ॥४२॥
मग तारकासुरें युक्ति केली ॥ दळाधिपत्य दिधलें शुक्रासी ॥ मग निघते झाले सैन्यभारेंसीं ॥ अमरलोकावरी तेधवां ॥४३॥
जिंकिली अवघी क्षिती ॥ पराभविले सर्व नृपती ॥ असुर व्याप्त जाहाले दिगंतीं ॥ ते आवरिले तारकें ॥४४॥
म्हणे हे पृथ्वीचे जे भूपाळ ॥ हे तंव आपुलें भक्ष्य  फळ ॥ आधीं जिंकूं अमरकुळ ॥ यांसी नाहीं कारण ॥४५॥
म्हणोनि उसळले महाअसुर ॥ आकाशीं जैसे गंधर्वभार ॥ त्यांहीं वेष्टिलें अमरपुर ॥ सुरनाथाचें ॥४६॥
द्वादशा लक्ष योजनें जे अमरावती ॥ अवधी वेढिली तारकदैत्यें ती ॥ जैसे झेंपावतीं महापर्वती ॥ प्रलयमेघ ॥४७॥
कथितां तारकाचा संग्राम ॥ ग्रंथासी न चले नेम ॥ पुढें सांगावया अवगम ॥ असेना कांहीं सर्वथा ॥४८॥
चाळीस कोटी दैत्यसैन्य ॥ पाळा पाडिला छत्तीस योजन ॥ तीन पाळीं दैत्य पडले दारुण ॥ सुरनगरी वेष्टोनियां ॥४९॥
द्वादश लक्ष योजनें अमरावती ॥ तीन पाळीं वेढिली दैत्यीं ॥ तरी सांगतां दैत्यांची गणती ॥ सत्य मानिजे श्रोतेजनीं ॥५०॥
तारकासुराचा जो मंत्रीं ॥ तो शुक्र बोलिला जी एकनेत्री ॥ बत्तीस सहस्त्र धरित्री ॥ रोधिली त्याच्या सैन्यानें ॥५१॥
आणिक दैत्यांमाजी महाबाहु ॥ महापराक्रमी राहु ॥ त्याचा कैसा निर्मिला देहू ॥ सृष्टिकर्त्यानें ॥५२॥
तरी तो नव सहस्त्र योजन ॥ संख्या स्तनापासूनि स्तन ॥ मुष्टीचें रुंच प्रमाण ॥ एक लक्ष सहस्त्र दोनी ॥५३॥
एक लक्ष योजनें साठी ॥ पाऊल उमटे क्षितितळवटीं ॥ श्रवणापासूनि नेत्रवटी ॥ चाळीस सहस्त्र योजनें ॥५४॥
नातरी पाटा कीजे वसुंधरा ॥ वरवंटा कीजे त्याचे शरीरा ॥ समुद्रमथनीं कापिलें शिरा ॥ त्या राहूचिया नारायणें ॥५५॥
दळाधीश तो तारकासुर ॥ स्थूल जैसा मेरुमंदार ॥ प्रमाण बोलिला पराशरकुमर ॥ व्यासऋषी जो प्रसिद्ध ॥५६॥
ऐशीं सह्स्त्र योजनें भूमिका ॥ तारकासुरें रोधिली देखा ॥ शक्ति तरी त्रैलोक्या ॥ माजी नसे कोणासी ॥५७॥
कोणाचें शरीर अर्ध लक्ष योजन ॥ कोणाचें साठ सहस्त्र पूर्ण ॥ तीस सहस्त्रांहूनि न्यून ॥ कोणीएक नसे त्यांमाजी ॥५८॥
ऐसे लक्षितां सर्व असुर ॥ चाळीस कोटी परिवार ॥ तारकासुर प्रौढी थोर ॥ दळाधीश तोचि पैं ॥५९॥
ऐसी सांगता असुरगणिता ॥ स्कंदपुराणीं असे विस्तीर्णता ॥ अनृत न मानिजे श्रोतां ॥ हें कथिलेंसे पुराणांतरी ॥६०॥
सांगतां असुरांचें प्रमाण ॥ श्रोते मानितील जरी असत्य वचन ॥ तरी ऐका जी निरूपण ॥ पुराणांतरींचें ॥६१॥
प्रश्नोत्तर सांगतां सत्य कीं असत्य ॥ परी कथावें पुरणांचें मत ॥ अन्यथा बोलणें पुराणाविरहित ॥ ती म्हणावी मिथ्या बडबड ॥६२॥
तरी दिति-कश्यपांचा कुमर ॥ हिरण्यकशिपु नामा असुर ॥ त्याचा बंधु हिरण्याक्ष धीर ॥ महाप्रौढीचा विख्यात जो ॥६३॥
तरी लक्षितां तयाचें शरीर ॥ कक्षेसी अद्दश्य गिरिवर आणि सागर ॥ ऐसा विक्राळ महाथोर ॥ मेरुमंदारतुल्य तो ॥६४॥
क्षीरसागराचें प्रमाण ॥ असे चौसष्ट लक्ष योजन ॥ हिरण्याक्ष जाय उल्लंघोन ॥ पैलतीरासी सहजगती ॥६५।
हे वसुमती नव्यायशीं कोडी ॥ ती कक्षेसी घातली करोनि चौघडी ॥ मग धांवतसे थोर प्रौढीं ॥ देवांपाठीं लागतां ॥६६॥
ऐसा जरी सांगावा प्रश्न ॥ तरी श्रोता थोर विचक्षण ॥ जे पृथ्वीची चौघडी करून ॥ घातली कैसी कक्षेसी ॥६७॥
तरी आतां पुराणींचीं बहुमतें ॥ तीं श्रवण करवूं श्रोतयांतें ॥ जरी कक्षेसी घातलें पृथ्वीतें ॥ तरी दैत्य कोठें धांवत होता ॥६८॥
सप्त सागर कुलाचल ॥ मेरूसहित समस्त भूमंडळ ॥ सप्तदीपें लोकपाळ ॥ ऐसी घरा विस्तीर्ण हे ॥६९॥
तें कैसी घातली कुक्षीं ॥ तरी तें परियेसा साक्षी ॥ पुराणांतरीं अपरोक्षी ॥ सांगीतली असे ॥७०॥
तंव लोपामुद्रा म्हणे अगस्तीसी ॥ तूं माझिया मनकुमुदिनीचा शशी ॥ कीं मम ह्रदयकमलाचा होसी ॥ मधुकर तूं एक ॥७१॥
मज करितां तुमची भक्ती ॥ मानसीं न होय तृप्ती ॥ मजवरी असे जरी तुमची कृपाप्रीती ॥ तरी प्रश्न एक पुसेन ॥७२॥
तंव कुंभज म्हणें वो कामिनी ॥ तुझीं शब्दत्नें माझे मनहिरण्यीं ॥ जडवीं प्रश्नरूपें दिव्यकोंदणीं ॥ न करीं साजणी विंलब ॥७३॥
मग वदती जाहाली ते चतुरा ॥ शेषाचे मौळी असे वसुंधरा ॥ ते कक्षेसी घालावया असुरा ॥ शेषें कैसी दीधली ॥७४॥
तंव अगस्ति म्हणे हो कांते ॥ माझे सुखशयनी आनंदभरिते ॥ बरवें पुसिलें गुणवंते ॥ संदेहहरणार्थ जें कां ॥७५॥
अगस्ति म्हणे वो सुंदरी ॥ शेषाचीं मंदिरें पाताळविवरीं ॥ तेथें अनेक नागकुमरी ॥ होत्या सहस्त्रमुखी ॥७६॥
आतां परिसें माझें प्रश्नोत्तर ॥ दोन रूपीं वसुंधरा थोर ॥ एक जंगम दुसरें स्थावर ॥ तें परिसावें तुवां ॥७७॥
नवखंडें मेरुमंडळ ॥ सप्त द्वीपें कुलाचल ॥ कांते ऐसें हें महीतळ ॥ स्थावर बोलिजे ॥७८॥
हे मस्तकीं धरिली दिशाकुंजरीं ॥ ते असती कूर्मपृष्ठीवरी ॥ आतां जंगमरूप जे दुसरी ॥ ते चतुरें परिसावी ॥७९॥
दुसरी रूपें असे कामधेनु ॥ ते जंगम बोलिजे हेमवर्णु ॥ अंगुष्ठप्रमाण सहस्त्रफणु ॥ सदा वाहे निजमौळीं ॥८०॥
तंव तो हिरण्याक्ष दैत्य महाबळी ॥ तेणें धाडी घातली पाताळीं ॥ येथें जाहालीसे धुमाकुळी ॥ शेष आणि असुरांसी ॥८१॥
तरी ते दोघे सहोदर ॥ दोघे कश्यपाचे कुमर ॥ दोघांचें युद्ध झालें घोरांदर ॥ तें असो आतां पुढें सांगूं ॥८२॥
विध्वंसिली शेषाचीं मंदिरें ॥ महायुगान्त केला असुरें ॥ मग त्या कद्रुकुमरें ॥ घेतली न्यूनता आपणासी ॥८३॥
असुर देखोनि महाबळी ॥ कंपायमान जाहाली महीतळी ॥ मग पळाला तो सहस्त्रमौळी ॥ असुराभेणें तेधवां ॥८४॥
हिरण्याक्ष महादारुण ॥ पळतां धरिता जाहाला शेषफण ॥ मस्तकींची घेत काढून ॥ धेनुरूप पृथ्वी जे ॥८५॥
ते घातली कक्षेमाझारीं ॥ ते गोमुखें बोभाइली दीर्धस्वरीं ॥ शेष पळाला क्षीरसागरीं ॥ विष्णूजवळी पावला तो ॥८६॥
हरीसी भेटला सहस्त्रफणी ॥ पुढें ठेविला मस्तकींचा मणी ॥ तोचि कौस्तुभ कंठीं नारायणीं ॥ बांधिला प्रीतीनें ॥८७॥
तया कौस्तुभाचा प्रकाश थोर ॥ तो मंदराचळाचा कुमर ॥ जैं प्रमथीं मथिला क्षीरसागर ॥ तैं गळालें वीर्य तयाचें ॥८८॥
पर्वत भ्रमतां सागरीं ॥ तेव्हां मंदरगिरीसी आली गिरगिरी ॥ वीर्य गळालें सागरीं ॥ तें चालिलें पाताळा ॥८९॥
तें सहस्त्र वर्षें होतें पृथ्वीपोटीं ॥ तेणें कंपायमान जाहाली सृष्टी ॥ मग तिनें अव्हेरिलें पाताळपुटीं ॥ तें पडलें शेषमौळीं ॥९०॥
तो कौस्तुभ जाहाला दीप्तिमंत ॥ जाणा मंदराचळाचा सुत ॥ तो सर्वकाळ श्रीकाळ श्रीअनंत ॥ मिरवीत असे निजकंठीं ॥९१॥
ऐसा तो दीप्तिमंत कौस्तुभमणी ॥ जेणें शोभायमान चक्रपाणी ॥ त्यापासव जाहाल्या खाणी ॥ पृथ्वीवरी रत्नांचिया ॥९२॥
तंव हरीसी विनवी कद्रुसुत ॥ म्हणे स्वामी तुमचा असें मी शरणागत ॥ पैलपाठीं लागला धांवत ॥ हिरण्याक्ष दैत्य तो ॥९३॥
पृथ्वी हरिली जी बलात्कारीं । देत्यें घातलीसे कक्षेमाझारीं ॥ ते बोभातसे दीर्घ स्वरीं ॥ दयाळुवा तव नामें ॥९४॥
तंव हरीनें घेतलें सुदर्शन ॥ करावया हिरण्याक्षाचें खंडण ॥ तंव गगनीं वाणी जाहाली पूर्ण ॥ यासी न मारावें या समयीं ॥९५॥
हा पूर्ण असे शिवाचा वरद ॥ त्यासी सुदर्शन न करी भेद ॥ हा शिवें केला असे अमरकंद ॥ अठ्ठावीस युगें जाण पां ॥९६॥
जेव्हां होईल नरसिंहअवतार ॥ तैं मरण पावेल हा असुर ॥ ऐसा यासी असे पूर्ण वर ॥ विश्वनाथाचा ॥९७॥
मग शेष आणि लक्ष्मीकांत ॥ क्षीरसागरीं राहिले गुप्त ॥ म्हणोनियां कृतांत ॥ बाधूं न शके तयांसी ॥९८॥
मग तो हिरण्याक्ष काय करी ॥ पृथ्वी टाकिली क्षीरसागरीं ॥ ते राहिली शंखाचे कोटरीं ॥ धेनुरूपें अद्यापि ॥९९॥
ऐसा तो हिरण्याक्ष असुर ॥ यासीं तुळिजे मेरु थोर ॥ तो उल्लघूनि क्षीरसागर ॥ सत्वर गेला पैलपारीं ॥१००॥
हें  सांगावया कारण ॥ तारकासुरें वेढिलें अमरभुवन ॥ ते वेळीं हिरण्याक्ष आला जाणून ॥ आठवलें सहज हें ॥१०१॥
ऐसे दैत्य मिळाले महाबळी ॥ देवांसी भिडती समफळी ॥ गर्जना करिती नममंडळीं ॥ प्रळयमेघ जयापरी ॥१०२॥
ऐसें सैन्य चाळीस कोटी ॥ चरण ठेवावया न मिळे क्षितितटीं ॥ वाद्यध्वनीचिया बोभाटीं ॥ व्योम अवघें नादावलें ॥१०३॥
मग निःसाणीं देवोनियां घावो ॥ युद्धा प्रवर्तला दित्यरावो ॥ थरारला ब्रह्मकटाहो ॥ गजरेंकरोनि तेधवां ॥१०४॥
मग दैत्यबळ पाहे वज्रमुष्टी ॥ तंव ते देखिले कोटयनुकोटी ॥ वाद्यध्वनी नभाचे पोटीं ॥ थरारलें ग्रहतारामंडळ ॥१०५॥
मग देवांसहित सुरेश्व ॥ आला दैत्यावरी घेऊनि दळभार ॥ तंव देखिले महाअसुर ॥ कुळाचळ जैसे कां ॥१०६॥
संघट्ट्णी जाहाली उभय दळांसी ॥ न सांभाळिती आपआपणांसी ॥ तेथें दिवसाची जाहाली निशी ॥ सैन्यरजेंकरोनियां ॥१०७॥
घोरांदर होतसे दोहीं दळीं ॥ केश धरोनि पाडिती क्षितितळीं ॥ देव जे पडती रणमंडळीं ॥ तयां उठवी बृहस्पती ॥१०८॥
दैत्य पडती धरेवरी ॥ त्यांतें शुक्र उठवी झडकरी ॥ मागुती युद्धासी उभे करी ॥ संजीवनमंत्रेंकरोनियां ॥१०९॥
ऐसें गेले लक्ष संवत्सर ॥ परी दोन्ही न हटती भार ॥ मग प्रश्निता जाहाला तारकासुर ॥ सुक्राचार्यासी ते वेळीं ॥११०॥
तारकासुर वदे शुक्रासी ॥ रणीं पडलिया देवसैन्यासी ॥ कवण उठवीतसे तें मजपासीं ॥ कथावें सविस्तर तुम्ही ।१११॥
तंव बोलिला एकनयनी ॥ समर्थ पाठिराखा असे रणीं ॥ मग भिडतां समरंगणीं ॥ बळ बहुत होतसे ॥११२॥
अमृतवल्ली द्रोणाचळीं ॥ त्या आणवितो बृहस्पती तत्काळीं ॥ देव पडती जे भूतळीं ॥ ते उठवीतसे वल्लीबळें ॥११३॥
ऐसा परिसोनि वृतांत ॥ मग धांविन्नला तारकदैत्य ॥ सागरीं टाकिला पर्वत ॥ द्रोणाचळ तेधवां ॥११४॥
मग इंद्रासी म्हणे देवगुरू ॥ सागरीं बुडविला गिरिवरू ॥ आतां नाटोपे तो असुर थोरू ॥ पळावें येथूनि लवलाहें ॥११५॥
मग देव निघाले गिरिकंदरीं ॥ तंव नारद गेला कैलासशिखरीं ॥ तेणें प्रार्थिला तो त्रिपुरारी ॥ धुर्जटी जो म्हणवीतसे ॥११६॥
शिवासी म्हणे ब्रह्मकुमर ॥ दैत्यीं सागरीं बुडविला औषधीगिरिवर ॥ तेणें अपमान झाला थोर ॥ देवगुरूचा पहा हो ॥११७॥
तेणें कोपला तो शंकर ॥ पाठविला शैलादिगण हेर ॥ धरूनि आणीं दैत्यगुरु सत्वर ॥ माझे आज्ञेकरूनी ॥११८॥
मग धांविन्नला शैलादिगण ॥ शुक्र आणिला तेव्हां धरून ॥ तयासी भक्षूनि पंचानन ॥ शीतळ झाला शरीरीं ॥११९॥
घेतलें गुरूचें उसनें ॥ भार्गव भक्षिला पंचाननें ॥ पुढें असो हें निरूपणें ॥ तें केलें मागील प्रसंगीं ॥१२०॥
मग इंद्रासी म्हणे देवगुरू ॥ तुम्हीं स्मरावा शार्ड्गधरू ॥ तोचि महाअसुरू ॥ शांत करूं शके ॥१२१॥
ऐसें विचारी जंव देवगुरू ॥ तंव आला नारद ब्रह्मकुमरू ॥ तो कथिता जाहाला विचारू ॥ विष्णूचा वज्रधरासी ॥१२२॥
नारद म्हणे हो वज्रधरा ॥ तुम्ही हरीसी किमर्थ स्मरा ॥ निमित्ताविण शार्धङ्गरा ॥ न घडे येणें सर्वथा ॥१२३॥
जरी खूंटे आयुष्याचा मार्ग ॥ तरी कमळंततुवें बांधिजे मातंग ॥ मृत्युसमयीं कृतांताचा राग ॥ कोण शांत करूं पाहे ॥१२४॥
दैत्यांसी मारावया नसे निमित्त ॥ म्हणोनि मुरारी तेथेंचि झालासे गुप्त ॥ चौदा चौकडियांपर्यंत ॥ अजिंक्य जाण असुर हा ॥१२५॥
तंव बोलिला वज्रधर ॥ आम्ही दैत्यासीं करूं समर ॥ मग जें असेल होणार ॥ तें सुखें होवो कां ॥१२६॥
नारद म्हणे वज्रपाणी ॥ तारकासी भिडे समरंगणीं ॥ ऐसा तुम्हांमाजी कोणी ॥ न देखों बळी समर्थ ॥१२७॥
आतां परिसा माझें उत्तर ॥ तुम्हां राखणें असेल जरी अमरपुर ॥ तरी मदतीसी आणावा महाशूर ॥ पुत्र मांधातियाचा ॥१२८॥
तो मुचुकुंद नामा महावीर ॥ त्यासम नसे त्रिलोकीं थोर ॥ त्याचे शूरत्वासी नाहीं पार ॥ ऐसा शूरांमाजीं श्रेष्ठ हा ॥१२९॥
तो मांधातियाचा नंदन ॥ अनेकविद्यापरिपूर्ण ॥ तो आणाल तरी विशेष गुण ॥ अमरावती रक्षील तो ॥१३०॥
मग देवीं आणिला मुचुकुंच ॥ महापुण्यशील मुखीं वेद ॥ रथीं बैसोनेयां विनोद ॥ पाहे असुरांचा द्दष्टीनें ॥१३१॥
जेथें असे तो तारकासुर ॥ तेथें आला मुचुकुंद वीर ॥ चक्षूनें देखिला तो दळभार ॥ महाअसुरांचा ॥१३२॥
त्याचिया रथझडपेचिये गतीं ॥ दैत्यांच्या मुर्कुंडया पडिल्या क्षितीं ॥ तंव तारक देखिला पुढती ॥ येतयेतां मुचुकुंदें ॥१३३॥
मुचुकुंद म्हणे तारकासुरा ॥ तुवां गांजिलें हो सुरेश्वरा ॥ आतां साहें महाअसुरा ॥ बाणसंधान माझें ये वेळीं ॥१३४॥
मग योजिला धनुष्यासीं गुण ॥ पृष्ठीं घातला सहस्त्रनयन ॥ मग सितीं लाविला बाण ॥ तो प्रळयकाळ ज्यापरी ॥१३५॥
तो तारकें देखिला अकस्मात ॥ वरिचेवरी तोडिला येत येत ॥ तारकप्रौढी महाद्‍भुत ॥ न मानी संधान तयाचें ॥१३६॥
तारकें योजिलें शरजाळ ॥ तेणें व्यापिलें नभमंडळ ॥ दोघे जैसे मेरुमंडार अढळ ॥ करूं पाहाती निर्वाण ॥१३७॥
तारकाचे ध्वज छत्र जाण ॥ अश्व धनुष्य आणि वोडण ॥ छेदिलिं एकाचि बाणेंकरून ॥ मुचुकुंदवीरें तेधवां ॥१३८॥
मग तारकासुर खङ्गप्रहारीं ॥ मुचुकुंद ताडिला ह्रदयावरी ॥ खङ्ग भंगिला ते अवसरीं ॥ नृपसुतें गदाघायें ॥१३९॥
मुचुकुंदें विंधिला तारकासुर ॥ अश्व सारथी केले चूर ॥ मोडिला तारकासुराचा रहंवर ॥ विरथ केला ते ठायीं ॥१४०॥
मग उठावला तारकासुत ॥ हरिण्याक्ष नामें बळाद्‍भुत ॥ पर्वत म्हणोनि मूर्च्छागत ॥ केला मुचुकुंद ते वेळीं ॥१४१॥
ऐसें तारक-मुचुकुंदांसी ॥ थोर युद्ध मांडलें दोघांसी ॥ द्दष्टांत द्यावयाकारणें यासी ॥ नाहीं योजना पुराणीं ॥१४२॥
एकमेकां हाणिती शिळाप्रहार ॥ तेणें थरारले सप्तसागर ॥ गडबडले ते गिरिवर ॥ कुलाचल पृथ्वीवरी ॥१४३॥
ऐसे भिडती महानेटें ॥ पर्वत लोटिती नखाग्रबोटें ॥ चरणप्रहारें होती शतकुटें ॥ मेरुमंदरांचीं तेधवां ॥१४४॥
महात्राणें लोटिती एकमेकां ॥ दोघे निर्भय नाहीं शंका ॥ तंव मुचुकुंदें त्या तारका ॥ देखिलें बळाधिक्य ॥१४५॥
आतां सावधान जी श्रोतोत्तमां ॥ प्राथींतसे शिवदास गोमा ॥ दोघे प्रवर्तले महासंग्रामा ॥ तारक आणि मुचुकुंद तो ॥१४६॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे तारकासुरसंग्रामवर्णनं नाम  शप्तविंशाध्यायः ॥२७॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति सप्तविंशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 28, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP