मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ८ वा

काशी खंड - अध्याय ८ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
विमान जातसे शीघ्रगती ॥ तंव पुढें अप्सरालोक देखती ॥ जेथें अष्टनायिका नृत्य करिती ॥ महालावण्य स्वरूप त्यांचें ॥१॥
शिवशर्मा म्हणे गणोत्तमा ॥ हा कवण लोक सांगिजे आम्हां ॥ आणि कैसा या लोकींचा महिमा ॥ तो निरूपावा भावपूर्वक ॥२॥
या लोकीं कोण अधिपती ॥ आणि याची कैसी उत्पत्ती ॥ तें भावपूर्वक कृपामूर्ती ॥ कथावें मज दीनातें ॥३॥
यानंतर वदले विष्णुगण ॥ बरवा पुसिला तुवां प्रश्न ॥ जेणें महादोषांचें होय दहन ॥ श्रवणमात्रेंकरूनी ॥४॥
तरी पूर्वीं क्षीराब्धिमाझारी ॥ पर्वत घातला मंदरगिरी ॥ मग मथिला तो सुरासुरीं ॥ तैं निघाल्या त्या अप्सरा ॥५॥
समुद्रमथनीं निघाल्या ॥ पुण्यास्तव हा लोक पावल्या ॥ ऐसा वृत्तांत विष्णुगणीं कथिला ॥ शिवशर्म्याप्रती आदरें ॥६॥
रंभा मेनका तिलोत्तमा कांती ॥ उर्वशी मंजुघोषा लीलावती ॥ कामकला आनंदा चंद्रकांती ॥ महाश्रेष्ठ नायिका त्या ॥७॥
पाहतां लावण्य चंद्रकांतीचें ॥ जें रूप घडलें हो तियेचें ॥ पाहूनियां सुरश्रेष्ठांचें ॥ मन एकाग्र होतसे ॥८॥
तिच्या भूषणीं रत्नें मिरवती ॥ त्यांवरी पडली अंगदीप्ती ॥ अलंकारांचीं बिंबें दिसती ॥ तियेच्या सर्व अंगावरी ॥९॥
तियेचे कांतीची पडली दीप्ती ॥ तेणें दिव्यांबरें भूषणें लोपती ॥ जैसीं रविप्रकाशें आच्छादती ॥ नक्षत्रें समस्त ॥१०॥
लक्षितांचि लावण्यशोभा ॥ शत एक मेळविजे गंधर्वगर्भा ॥ जैसी ते सिंधुजा पंद्मनाभा ॥ यापरी अप्सरा असती पैं ॥११॥
सूर्यासमान ज्यांची अंगकांती ॥ त्यांचें लावण्य वर्णावें किती ॥ मज न ये वर्णावया मती ॥ परी संकलित सांगेन परिसावें ॥१२॥
ऐसें लावण्य चंद्रकांतीचें ॥ तिजहूनि शतगुणें रंभेचें ॥ रंभेहूनि लावण्य उर्वशीचें ॥ सहस्त्रगुणें आगळें ॥१३॥
ऐसीं लावण्यें आगळीं त्यांचीं ॥ परी तुलना न ये तिलोत्तमेची ॥ लक्षगुणें दीप्ति जियेची ॥ अधिक दिसतसे ॥१४॥
पाहातां तिलोत्तमेच्या रूपाची ज्योती ॥ सहस्त्र विद्यल्लता काळवटती ॥ जैसी रजनीकांताची ज्योती ॥। मंद दिसे रविउदयीं ॥१५॥
शतसहस्त्र छत्रपति जियेसी ॥ ग्रंथीं वाखाणिती दमयंती ॥ परी तिलोत्तमेच्या रूपासी ॥ तुलना नाहीं सर्वथा ॥१६॥
मृत्युलोकींच्या भूपकन्या ॥ पतिव्रता सत्त्वें मान्या ॥ त्यांसी उपमा दीजे लावण्या ॥ दिव्यांगनांची सर्वथा ॥१७॥
म्हणोनियां जे महापुण्य करिती ॥ यज्ञ करोनि कन्यादान देती ॥ स्त्रीदानें जे संकल्पिती ॥ महातीर्थाचे ठायीं विशेषें ॥१८॥
एक स्वामिकाजीं वेंचिती शरीरें ॥ एक करिती द्विजकार्यें आदरें ॥ लिंगें पूजिती गोक्षीरें ॥ महातीर्थाचे ठायीं ॥१९॥
ऐशा कीजेति पुण्यराशी ॥ तेव्हां पाविजे स्वर्गसुखासी ॥ सुरांगना येती वरावयासी ॥ महाशूर ते जाणोनी ॥२०॥
अवघ्या बाळा त्या सुंदरी ॥ असती द्वादशसंवत्सरी ॥ वृद्धावस्था जन्मवरी ॥ असेचि ना समर्था ॥२१॥
ऐसियांचिया तारूण्याची गती ॥ आनंदयुक्त त्या लोकीं वसती ॥ त्या महा सुरांतें भोगिती ॥ युगानुयुगीं सर्वदा ॥२२॥
ऐसा तो अप्सरालोक देखिला ॥ शिवशर्म्यासी गणीं सांगीतला ॥ पुढें विमान जातां देखिला ॥ सूर्यलोक संपूर्ण तो ॥२३॥
शिवशर्मा पुसतसे गणांसी ॥ हे पुढें दिसतसे तेजोगशी ॥ कवण अधिपती या लोकासी ॥ तें सांगा समूळ मजलागीं ॥२४॥
यासी कां एवढा पुरुषार्थ ॥ हा किंनिमित्त एवढा समर्थ ॥ हा पूर्ण कीजे मनोरथ ॥ गणोत्तमा तुम्हीं आमुचा ॥२५॥
तंव गण बोलती गा द्विजा ॥ जा लोकीं असे पद्मराजा ॥ याची जे करिती बरवी पूजा ॥ ते पावती ह्या लोका ॥२६॥
हा त्रैलोक्य क्षणें संहारी ॥ आणि हाचि त्रैलोक्य पूर्ण तारी ॥ यासी पूर्वीं त्रिपुरारी ॥ प्रसन्न होऊनि वर वदलासे ॥२७॥
हा सविता सर्वां घटीं असे व्यापक ॥ हा चराचरप्रकाशक ॥ आणिक असे निशिभक्षक ॥ जाणें हा तमाचा ॥२८॥
हा अन्नरस पचवी जठरेंसीं ॥ आणि पाळीतसे गर्भांसी ॥ चौर्‍यायशीं लक्ष जीवांसी ॥ देतसे आहार हा ॥२९॥
जैं होतसे रविग्रहण ॥ तैं न्यूनता घेतसे आपण ॥ सुखी करीतसे हा ब्राह्मण ॥ कुरुक्षेत्रीं सुवर्णदानें ॥३०॥
कुरुक्षेत्रीं जे दान देती ॥ ते अक्षयी धनवंत होती ॥ ऐसा कृपावंत हा गभस्ती ॥ सर्व जनांसी सर्व काळ ॥३१॥
हा सर्व कार्यांसी सिद्धिदायक ॥ याचे अमृतसिद्धियोग अनेक ॥ हस्तार्क मूलार्क पुष्यार्क ॥ कार्यकरणींचे सिद्धिद ॥३२॥
एक असत्य महादोष करिती ॥ चोरोनि पातकें आचरती ॥ कवणें देग्विलें नाहीं म्हणती ॥ परी हा ऊर्ध्व देखतसे ॥३३॥
तो भृत्यांकरवीं कृतांतासी ॥ पापपुण्य जाणवी नियमेंसीं ॥ मग घोर यातना दोषियांसी ॥ करवी तें पूर्वीं निरूपिलें ॥३४॥
ऐसा हा देदीप्यमान दिवाकर ॥ त्रैलोक्यमणी सत्त्वधीर ॥ चारी खाणींचा जो नित्य व्यापार ॥ चाले आधारे याचिया ॥३५॥
ऐसा हा उपकारी दिननाथ ॥ पुरवी सर्वांचे मनोरथ ॥ सप्तमुखी वारूचा रथ ॥ एक चक्र असे ज्या ॥३६॥
याचे रथीं सारथी अरूण ॥ रथचक्र नवसहस्त्र योजन ॥ अर्धनिमिषें गमन ॥ किती करी भानु हा ॥३७॥
बावीस सहस्त्रशत योजनें दोनी ॥ अर्धनिमिषांत क्रमीतसे तरणी ॥। हा गायत्रीजपशर्क्तानें मेदिनी ॥ क्रमीतसे सर्वदा ॥३८॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ हे तंव गायत्रीचे अंकुर ॥ ते करिती सृष्टन्यादि व्यापार ॥ आज्ञा श्रीप्रभूची ॥३९॥
गाधिसुतें दुसरी सृष्टी केली ॥ हे गायत्रीचि आव्हानिली ॥ मग ते सिर्द्धातें पावती झाली ॥ त्या गायत्रीच्या अनुष्ठानें ॥४०॥
म्हणोनि जपती द्विजवर ॥ चालती सृष्टीचे व्यापार ॥ अर्ध्य देतांचि रहंवर ॥ बळवंत होय सूर्याचा ॥४१॥
जे जे सूर्यमंत्र जपती ॥ भानुदिनीं उपोषण करिती ॥ ते सूर्यभक्त सर्वकाळ वसती ॥ सूर्यलोकीं जाण पां ॥४२॥
गण म्हणती शिवशर्म्याप्रती ॥ ऐसा हा पवित्र गभस्ती ॥ विमान चाले जंव पुढती ॥ तंव देखिला कवण लोक ॥४३॥
शिवशर्मा पुसे गणोत्तमा ॥ हा कोण लोक सांगिजे आम्हां ॥ मग ते सुशील पुण्यशीळ सप्रेमा ॥ निरूपिती तयासी ॥४४॥
मग म्हणती गा द्विजा अवधारीं ॥ हा लोक दिसे अमरपुरी ॥ हे दिव्यपुरी मेरूचे पाठारीं ॥ वसिन्नली पूर्वभागीं ॥४५॥
तरी हे परियेसीं सुरनगरी ॥ विश्वकर्मा स्वयें निर्माण करी ॥ एकवीस खणांचे दामोदरीं ॥ मिरवती भार पताकांचे ॥४६॥
दशलक्ष योजन ॥ देखिली अमरावती विस्तीर्ण ॥ शत योजनें मंडपस्थान ॥ वज्रधर इंद्राचें ॥४७॥
एकवीस खणांच्या ओवरिया ॥ अवघ्या जांबूनदें रचलिया ॥ प्रभा फांकती सोमकांताचिया ॥ दश दिशा भरोनी ॥४८॥
तेथें पद्मराग जडले भिंतीं ॥ वैडूर्याचे स्तंभ विराजती ॥ वरी गोमेदांची दिव्य दीप्ती ॥ शोभायमान साजिरी ॥४९॥
जेवीं कल्पद्रुमाच्या लता ॥ तैशा मदलसा पाचबंद सर्वथा ॥ अविंध मुक्तेंकरूनि जडिता ॥ तरणितुल्य शोभिवंत ॥५०॥
हुडे दिसती नीळजडित ॥ शत योजनें नभचुंबित ॥ पद्म पुष्पराग शोभत ॥ चर्या झळकती आकाशीं ॥५१॥
हेमबद्ध भूमिकेवरी ॥ चिंतामणी जडिले चौंबारीं ॥ कल्पवृक्ष ते धरोघरीं ॥ कामधेनूचीं पीयूषें ॥५२॥
रत्नखचित भद्रस्थानीं ॥ बत्तीस सोपानांचे सिंहासनीं ॥ बैसले अमरेश वज्रपाणी ॥ प्रमथांसहित ते ठायीं ॥५३॥
हा अदिति-कश्यपांचा कुमर ॥ दिव्यरूप शचीचा वर ॥ दक्षिणभुजीं लावण्यसुंदर ॥ पुत्र जयंत पैं त्याचा ॥५४॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ राजे बैसले मजालसीं ॥ अर्धसहस्त्र शट साठ संख्या ऐसी ॥ याहूनि अधिक नाहीं ॥५५॥
मुकुटीं लागलिया रत्नज्योती ॥ दिव्यांबरें कांसे मिरवती ॥ कीं त्या विद्युल्लता स्फुरती ॥ सुरसभेमाझारीं ॥५६॥
ऐसा हा सुरपति वज्रधारी ॥ चतुर्दश रत्नें ज्याचे घरीं ॥ पतिव्रता शची ज्याची सुंदरी ॥ महालावण्य रूप जिचें ॥५७॥
तेहतीसकोटी देवांचा नाथ । चतुर्दशरत्नें महासमर्थ ॥ दिक्पतींमाजी हा समर्थ ॥ कथिला न जाय सर्वथा ॥५८॥
लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक ॥ धन्वंतरी कामधेनु सुरा मोहक ॥ अप्परा मृगांक आणि देवदत्त शंख ॥ हालाहल आणि पीयूष तें ॥५९॥
नंदघोष याचा रहंवर ॥ ज्यावरी आरूढे सुरेश्वर ॥ सप्तमुखी उच्चैःश्रवा थोर ॥ ऐसा न देखों त्रिभुवनीं ॥६०॥
ऐरावत गज ज्याचे घरीं ॥ शुभ्र जैसा धवलगिरी ॥ प्रभा तैसी चतुर्दंतांवरी ॥ सोमसूर्यांची ज्यापरी ॥६१॥
इंद्रनीळादि रत्नें जडलीं दंतीं ॥ दिव्य धंटा कंठीं शोभती ॥ दिव्य पताका मिरवती ॥ विद्युल्लता ज्यापरी ॥६२॥
पाहातां ऐरावताची दीप्ती ॥ जैसीं जळीं नक्षत्रें बिंबती ॥ तैसीं अंगीं स्वरूपें दिसती ॥ सुरवरांचीं ॥६३॥
चालतां दिसे गिरिवरप्रमाण ॥ उंच असे दश योजन ॥ वरी आरूढे सहस्त्रनयन ॥ शचीरमण तो ॥६४॥
ऐसें ऐश्वर्य सहस्त्रनयना ॥ सहस्त्र एक असती भोगांगना ॥ ऋद्धि सिद्धि निरंतर पूर्णा ॥ सेवार्थीं गृहीं सादर ॥६५॥
भद्रसिंहासन उच्चस्थानीं ॥ त्रिदश आणि द्विसोपानी ॥ भोंवतीं सभा दाटली देवगणीं ॥ मध्यें होती चौखणी पैं ॥६६॥
षड्‍राग षड्‍रागिणी ॥ छत्तीस पुत्रिका रागांपासुनी ॥ त्या सप्तस्वरांची महाध्वनी ॥ उद्भविती गायक हो ॥६७॥
ऐसी ते मनोरम पुरी ॥ असे स्वर्गसरितेचे तीरीं ॥ अमित पुर्‍या इचे आधारीं ॥ असती कवण कवण ॥६८॥
इचे पूर्वभागीं मंगळावती ॥ अग्निकोणीं पूरी तेजावती ॥ दक्षिणभागीं ज्योतिष्पती ॥ यक्षपुरी नैऋतीसी ॥६९॥
पश्चिमभागीं ब्रह्मपुरी असे ॥ गंधर्वपुरी वायव्यदिशे ॥ महोदधीपुरी वसे ॥ उत्तरभागीं सर्वदा ॥७०॥
ईशान्यभागीं पुरी यशोवती ॥ ऐशा अमरावतीआधारें असती ॥ ऐश्वर्य भोगी सुरपती ॥ शिवप्रसादेंकरोनियां ॥७१॥
ऐसा हा अमराधीश वज्रपाणी ॥ दिक्यतींमाजीं अग्रणी ॥ सर्व ऋषिगणीं अमरगणीं ॥ वेष्टित असे सर्वकाळ ॥७२॥
ऐसा हा अमरेश महासुखी ॥ द्वितहस्त्रपाणी सहस्त्रमुखी ॥ चौदा मन्वंतरें आयुषी ॥ अलोट पद याचेंचि ॥७३॥
येणें शतयज्ञ केलें वाराणसीं ॥ मग हें पद प्राप्त झालें यासी ॥ गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसी हे दिव्य पुरी जाण पां ॥७४॥
हे अमरेशाची निज राजधानी ॥ कीं ही दिव्य तेजाची खाणी ॥ तेजें तरी द्वादशतरणीं- ॥ परीस अधिक दिसतसे ॥७५॥
व्यास म्हणे शिष्यांप्रती ॥ मज न वर्णवे हे अमरावती ॥ तें लोपामुद्रेसी अगस्ती ॥ निरूपिता जाहला ॥७६॥
शिवदास गोमा दीनवदन ॥ प्रार्थी श्रोतयांलागून ॥ पुढती चालतें झालें विमान ॥ तंव देखिली कनकपुरी ॥७७॥
॥ इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे इंद्रलोकवर्णनं नामाष्टमाध्यायः ॥८॥  ॥ श्रीकाशीविश्वेश्वरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥  ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति अष्टमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP