मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ७१ वा

काशीखंड - अध्याय ७१ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ आतां अगस्ति प्रार्थी षडानन ॥ जी तूं अनाथा चिया इच्छा पूर्णा ॥ जैसी कामधेनु वोळे जीवना ॥ वत्सावरी ॥१॥
जैसी माझिया मनोमी नाची आर्ती ॥ तैसा तूं स्वामी सरितापती ॥ परी मज अद्यापि नाहीं तृप्ती ॥ शिवा कथामृताची ॥२॥
पर्जन्यें तृप्त केला चातक ॥ पद्मिनी तृप्त झाली देखोनि मयंक ॥ परी माझा वियोग तो अधिक ॥ शांत नव्हे कोणे काळीं ॥३॥
वत्सासी तृप्त करी कामधेनू ॥ यागीं तृप्त होय हुता शन ॥ परी माझा वियोग कृशानू ॥ तृप्त नव्हे कोणे काळीं ॥४॥
अन्नरस तृप्त करी जठरा ॥ सुमनें तृप्त करिती मधुकरा ॥ परी माझिया वियोग अंगारा ॥ तृप्ति नव्हे कोणे काळीं ॥५॥
परी एक भासतें माझ्या चित्तीं ॥ स्वामी तुम्ही कराल मज तृप्ती ॥ मज प्राप्त होईल अविमुक्ती ॥ ऐसें तुम्ही जाण तसां ॥६॥
तरी पृच्छा असेकृपानिधी ॥ शैलेश्वरलिंग जें काशीमधीं ॥ ते आदि अवसान सर्वसिद्धि ॥ निरूपा मज ॥७॥
जी तूं माझिये पृच्छेच्या परिहारा ॥ समर्थ अससी गा शिव कमरा ॥ नातरी जैसी पिपीलिका देखोनि शर्करा ॥ आनंदे मानसीं ॥८॥
तैसा तूं शिव कथाशर्करेची खाणी ॥ आम्ही स्फटिक तूं चिंतामणी ॥ जैसे ते योगीश्वर हिरण्य त्यजूनी ॥ प्रीति करिती लोष्टीं ॥९॥
तैसा मी लोष्ट जी मंद बुद्धी ॥ परी तें हेम होय परिससबंधीं ॥ तैसा मी प्राप्त झालों शिव कथासिद्धि ॥ तुम्हां स्पर्शें पैं ॥१०॥
तंव अगस्तीसी वदे शिवकुमर ॥ शेषावांचूनि न घेववे महीभार ॥ पृथ्वी जीवन सांठवावया सागर ॥ तोचि एक पात्र ॥११॥
तरी शिव कथा पृथ्वीवरी ॥ जनां उद्धरावया परोपकारी ॥ त्या पुण्यजीवनाचा स्नायी ब्रह्म चारी ॥ तुजवांचूनि कवण ॥१२॥
मी शिव कथाधनें झालों नानावटी ॥ परी तूं त्या हिरण्याची पूर्ण कसवटी ॥ मग तें बावन्नीक आणि चौसष्टी ॥ हें तूं जाणसी कीं ॥१३॥
ऐसी स्वामीची सुशब्दवाणी ॥ तेणें अगस्ति संतोषला मनीं ॥ जैसा तो चातक देखे नयनीं ॥ गंधर्वनगरें ॥१४॥
तैसा आनंद झाला त्या ब्रह्मणा ॥ कीं हिरण्यदशा होय पाषाणा ॥ कीं येर तरु समता करी चंदना ॥ तैसा हर्षे ऋषी ॥१५॥
मग स्वामी म्हणे गा तपो निधी ॥ महा प्राज्ञा विशेष बुद्धी ॥ तरी परियेसीं गा पृच्छाविधी ॥ अगस्ति मंहता ॥१६॥
काशी मध्यें लिंग जें शैलेश्वर ॥ शैलगिरि तो हिमाद्रिवर ॥ तो शिवांगना ॥ हैमवतीचा पितर ॥ तेणें स्थापिलें तें लिंग ॥१७॥
तरी परियेसीं त्य़ा लिंगाचें अवसान ॥ हें बरवें प्रश्चिले त्वां दोषदहन ॥ हें परिसावया वहिले श्रवण ॥ आहेति तुझें ॥१८॥
कश्यप-षण्नेत्रांचा कुमर ॥ तया नांव गा हिमाद्रिवर ॥ त्यासी प्रसन्न जाहाला शंकर ॥ दिधलें गिरिस्वामित्व ॥१९॥
सुवर्णाचाळाची जे कांता ॥ ते धरा नामें पतिव्रता ॥ तिच्या उदरीं अवतरली प्रसूता ॥ ते मेनका नामें ॥२०॥
ती मेनका पतिव्रता सगुण ॥ हिमा द्रिसी अर्पी चतुरानन ॥ तो दक्षाचा अवतार म्हणोन ॥ भविष्य होतें पुराणीं ॥२१॥
पूर्वीं दक्षाचे हवनीं ॥ शरीर दग्धिलें होतें भवानीं ॥ ते शाप बोलिली होती वदनीं ॥ दक्षरा जासी ॥२२॥
तें सत्य व्हावया प्रत्युत्तर ॥ दक्ष जाहाला हिमाद्रि गिरिवर ॥ मग उमेनें घेतला अवतार ॥ हिमवंता गृहीं ॥२३॥
तो स्थावर जंगम द्विरूप गिरी ॥ तेथें अवतरली भवानी सुंदरी ॥ दोन्ही रूपें जाहालीं मेन केच्या उदरीं ॥ सिता हैमवती ॥२४॥
विधीनें गंगा नेलीसे देव लोकीं ॥ मग हैमवती जाहाली असे एकी ॥ ते स्वयंवरीं पर्णिली कौतुकीं ॥ विश्वनाथें पैं ॥२५॥
मंगळें वद्ती ऋषि ब्राह्मण ॥ ब्रह्मा करीतसे अक्षतारोपण ॥ बोहलीं बैसालासे त्रिनयन ॥ अंबिकेसहित ॥२६॥
लावण मूर्ति देखोनि अंबिकेची ॥ तेथें वीर्य द्र्वला तो विरिंची ॥ तेणें चरणें ॥ चुरिलें परी सर्वांची ॥ पडिली द्दष्टी ॥२७॥
मग ए मंदाकिनी स्वर्गसरिता ॥ जे अंबिकेची भगिनी सिता ॥ तेथें प्रायश्चित्तें शुद्ध केला विघाता ॥ सर्व देव मिळो नियां ॥२८॥
ऐसें जाहालें शंकराचे स्वयंवर ॥ वर्‍हाडी आले होते अपार ॥ अष्टदिशांचे गिरिवर ॥ कुलाचल पैं ॥२९॥
ते प्रीतीं आदरें बहुसन्मानें ॥ षड्र्सें उपचारिले हिमाद्रीनें ॥ दिधलीं नाना विध भूषणें ॥ एकमेकांसी ॥३०॥
तिंहीं हिमाद्रि वंदिला बद्धकरीं ॥ मग स्वस्थाना गेले सर्व गिरी ॥ आपुलिया गणेंसीं त्रिपुरारी ॥ निघाले कैलासीं ॥३१॥
मग जे दाक्षायणीची पूर्वस्थिती ॥ चालविती जाहाली ते हैमवती ॥ तें सर्वही भ्रांतगती ॥ हे महदादि शिवाची ॥३२॥
ऐसा बहुकाळ क्रमितां कैलासीं ॥ मग विश्वनाथ आले वाराणसीं ॥ स्वामी म्हणे गा अगस्ति ऋषी ॥ पुढें परियेसीं कथा पैं ॥३३॥
मग हिमाद्रीसी वर्तली चिंता ॥ आणि प्रियेसी जाहाला विचारिता ॥ म्हणे प्राणेश्वरी माझिया मता ॥ व्हावें सावधान ॥३४॥
आम्हां उपजली बहु खंती ॥ आपण हैमवती अर्पिली पशुपती ॥ ते दिधली कवणाचिया हस्तीं ॥ हे अगम्य जाहाली मात ॥३५॥
आपणां प्रथमचि नाहीं स्मर ॥ जामात केला कवण हा विश्वेश्वर ॥ कवण माता पिता हा कुमर ॥ कवणाचा कांते ॥३६॥
कन्या मागों आला चतुरानन ॥ त्याचा आपण मानिला स्वगुण ॥ परी कन्या समर्पिली तो कवण ॥ न कळेचि आम्हां ॥३७॥
आतां जनवार्ता ऐकों अनारिसी ॥ तो म्हणवी ईश्वर स्मशानवासी ॥ त्रैलोक्या मध्यें राहावयासी ॥ एक स्थान नाहीं ॥३८॥
ब्रह्मयानें सांगीतला त्रैलोक्यपती ॥ कवण याचा जनक ॥ जनिती ॥ कवण वदे शिव पशुपती ॥ कवण म्हणे हा हर शंकर ॥३९॥
आपणांसी ठावुकें नाहीं त्याचें कुळ ॥ आणिक त्यासी म्हणती जाश्वनीळ ॥ मी त्रिलोकीं समर्थ हिमाचळ ॥ ठकिलें ठकिलें ब्रह्मयानें ॥४०॥
नारदें सांगीतली शुभदशा ॥ तो जनवार्तें नाइकों तैसा ॥ धुळीं धुमाळीं वेष्टित पिसा ॥ सर्प भूषणें त्याचीं पैं ॥४१॥
ऐसी पृथक्‍  जनांची वार्ता ॥ त्यासी स्त्रिया जाहा लिया बहुता ॥ होमीं दग्धली दक्षदुहिता ॥ याचेनि उद्वेगें ॥४२॥
मग हिमाद्रीचिया प्रत्युत्तरा ॥ प्रतिवदली मेनका सुंदरा ॥ कैसें कर्म उदेलें एकसरां ॥ हैमवतीचें पैं ॥४३॥
विष्णूसी कन्या देऊं म्हणत होतें तुम्हां ॥ तंव कर्मसूत्र ओढवलें आम्हां ॥ कैंचा सत्यलोकाधिया आला ब्रह्मा ॥ कन्ये भोंवता ॥४४॥
आतां कैसोनि देखों ते कन्या ॥ ऐसी त्रिलोकीं नाहीं लावण्या ॥ आतां स्मरूं कवण व्रत पुण्या ॥ जेणें हैमवती प्राप्त ॥४५॥
मी पूर्वीचि वदलें तुम्हांसी ॥ सोयरीक न कीजे तया देवासी ॥ पाहातां पृथ्वी चिया नरेंद्रांसीं ॥ काय उणें होतें ॥४६॥
सांडूनियां पृथ्वी पुरें पट्टणें ॥ त्या देवांसी म्हणिजे स्वर्गीं राहाणें ॥ गृह स्थासी क्रूरद्दष्टीं पाहाणें ॥ ऐसी लीला तयांची ॥४७॥
कौशांबीनगरींचा कुश नाभ राजा ॥ त्यासी होत्या शतभरी आत्मजा ॥ तो आरंभूं म्हणे शतयज्ञबीजा ॥ तंव विघ्न केलें देवीं ॥४८॥
तेथें नारद आला सोयरिकेसी ॥ मग त्या कन्या दिधलिया च्यवनासी ॥ त्यानंतरें आला अगस्ति ऋषी ॥ तेणें पुत्रचि नेला ॥४९॥
त्या पुत्राची वीर्य मुद्रा लोपुनी ॥ ते अगस्तीनें केली कामिनी ॥ मग नाम ठेविलें शुभ गुणीं ॥ लोपा मुद्रा ऐसें ॥५०॥
आम्हांसी संकटीं कन्या जाहा लिया दोनी ॥ हैमवती आणि मंदकिनी ॥ कवणाचा कवण तो शूलपाणी ॥ घेऊ नियां गेला ॥५१॥
जैसा अभागी करी द्रव्यहव्यास ॥ त्यासी अवचितां प्राप्त होय काळ पाश ॥ तैसा तो पावला महेश ॥ पूर्वर्जितावंचुनी ॥५२॥
कीं जैसी तृषापीडेची आगिठी ॥ मृगजळ दिसतसे घनवृष्टी ॥ तेथें धांवतां होय हिंपुटी ॥ परी आशा न पुरे ॥५३॥
जैसे सोम सूर्य तपा चिया स्वार्था ॥ मेरु प्रदक्षिणे पश्चिमपंथा ॥ तंव अवचितां प्राप्त होय व्यथा ॥ गृह गती तयांसी ॥५४॥
कीं लक्ष्मीवंत जाय देशावरा ॥ द्रव्यलोभें वंचूनियां भांडारा ॥ तों मार्गीं वरपडा होय तस्करा ॥ हारवी भांडवल ॥५५॥
तैसे दोन कन्या आमुचें जीवित्व ॥ त्यांसी लागलें आमुचें मत ॥ तंव विघ्न केलें अकस्मात ॥ नारद विरिंचींनीं ॥५६॥
आतां कोठें असेल तो शंकर ॥ त्यासी पाहे ऐसा कैंचा किंकर ॥ मग त्य कन्येचा सौभाग्य विचार ॥ तो कवण जाणे ॥५७॥
ऐसी स्वमतें वदे स्वमतें वदे मेनका सुंदरी ॥ मग तियेसी वदे हिमाद्री ॥ म्हणे परियेसीं माझें प्राणेश्वरी ॥ प्रत्युत्तर माझें ॥५८॥
मी जाणें सप्तताळींची मात ॥ स्वर्ग भुवनींचा जाणें वृत्तांत ॥ मृत्युमंडळीं तरी महाद्‍भुत ॥ नसे दुजा मज हुनी ॥५९॥
ऐसीं तिन्ही तालें मज आधीन ॥ जेथें असेल तो पंचानन ॥ त्रैलोक्या वेगळें तरी गमन ॥ नकरी तो कोठें ॥६०॥
ऐसीं तिन्ही तालें धुंडीन क्षणा माझारीं ॥ मग सुवार्ता पुसेन गौरी ॥ विपत्तिपीडा असेल जरी ॥ तैसा देखों विचार ॥६१॥
परी माझा कल्पीतसे मनोरथ ॥ जे दिगंबरासी कैंचा द्रव्यार्थ ॥ स्मशानीं वसे तो समर्थ ॥ केवीं बोलिजे ॥६२॥
तरी आतां प्राणेश्वरी परियेसीं ॥ जे शुभा शुभ जामात आम्हांसी ॥ परी कन्ये करितां सर्वथा तयांसी ॥ करावे उपचार ॥६३॥
जरी जामाता असेल दरिद्रपण ॥ श्वशुर गृहीं लक्ष्मी असेल पूर्ण ॥ तरी त्यासी द्रव्य कीजे समर्पण ॥ दहावा विभाग ॥६४॥
त्यासी धुंडितां त्रैलोक्या माझारी ॥ जरी सांपडेल एकादे नगरीं ॥ त्यासी द्र्व्य द्यावें संकल्प मात्रीं ॥ अन्नदानमिषें ॥६५॥
मग आलोच करावया कारण ॥ हिमाद्रीनें पाचारिले मंत्रिजन ॥ तरी ते आतां कैसे कवण ॥ परिस श्रोते हो ॥६६॥
पृथ्वी मध्यें जे सर्व गिरी ॥ देवां दुर्लभ वस्तु ज्यांमाझारी ॥ कन्या प्रसवले महा सुंदरी ॥ त्रिशतें साठी गंगा ॥६७॥
त्वरें महा गिरिवर ॥ जो कृष्णा कालिंदींचा पितर ॥ तो पुण्यश्लोक बंधुवर ॥ हिमाद्रीचा पैं ॥६८॥
स्थावर जंगम आला विंध्याद्री ॥ शरय़ू उद्भवली यजाचे पाठारी ॥ तो मानससरोवराचा अधिकारी ॥ आला पर्वत ॥६९॥
मलय पर्वत आला दक्षिणेचा ॥ लिंग पर्वत अग्निकोणींचा ॥ तो पितर पाताळ गंगेचा ॥ आला हिमाद्रि आज्ञेनें ॥७०॥
हिमाद्रीनें हांकारिले महा गिरी ॥ जे जे पुण्यश्लोक होते पृथ्वी वरी ॥ ते आले पृथ्वी प्रमाणां तरीं ॥ धरिली होती धरा पैं ॥७१॥
मंदरा चल आला महा गिरिवर ॥ जो चतुर्दशरत्नांचा श्रृंगार ॥ महा विष्णूनें पृष्ठीं भार ॥ घेतला कूर्मरूपें ॥७२॥
ऐसा मंदरा चल पुण्य गिरी ॥ तयाचें वाहन झाला हरी ॥ ऐसा स्वगुणें मानी मुरारी ॥ काय वानूं तयाते ॥७३॥
ऐशीं सहस्त्र वर्षें पर्यंत ॥ त्याचे मस्तकीं राहिला भवानी कांत ॥ तें विष्णूनें जाणोनि पूर्वार्जित ॥ भार पृष्ठीं घेतला ॥७४॥
तयाचा बंधु चंद्र गिरी ॥ चंद्र वेगा प्रसवली सुंदरी ॥ उत्तुं गपर्वत आणि शंखगिरी ॥ तटाकीं जयाच्या ॥७५॥
आणिक आणिला द्रोणागिरिवर ॥ तो अमृत औषधींचा महा भार ॥ देव गुरूसी तयाची अधिकार ॥ सुरा सुरयुद्धीं ॥७६॥
प्रभातीं प्रभा करी कश्य पसुत ॥ तो आला उदय पर्वत ॥ सह्याद्रि आला मदोन्मत्त ॥ पितर गोदेचा ॥७७॥
आणिक बाणगंगेचा पितर ॥ त्रिकूट नामें आला गिरिवर ॥ पश्चिमेचा आला गंधाद्रिवर ॥ आणि हेमकूट तो ॥७८॥
वैरागिरीचा अचलेश्वर आला ॥ धवल गिरी लवणगिरी पातला ॥ कालिंद गिरीचे मस्तकीं शिव राहिला ॥ जंव मेरू पृथ्वी वरी ॥७९॥
ऐसीं हिमा द्रीचीं आज्ञा वचनें ॥ सकळ गिरिवरी परिसोनि कानें ॥ येतांचि वंदिते झाले स्वामित्वपणें ॥ हिमा द्रीसी पैं ॥८०॥
जैसे ते सर्व देव दिक्पती ॥ स्वामित्वें सह स्त्रक्षासी वंदिती ॥ तैसा वंदिला समस्त पर्वतीं ॥ हिमाद्रि गिरिवर तो ॥८१॥
जैसा सर्व गणेंसीं जाश्व नीळ ॥ कीं सर्व जनांसी वंद्य भूपाळ ॥ तैसा तो श्रेष्ठ सुवर्णा चळ ॥ स्वामी सर्व गिरींचा ॥८२॥
कीं किरण चक्रांत सहस्त्रकर ॥ नक्षत्रां मध्यें शीतकर ॥ तैसा हिमाद्रि गिरिवर ॥ स्वामी सकळ शैलांचा ॥८३॥
म्हणोनि त्या सर्वही गिरीवरीं ॥ साष्टांगें वंदिला महा गिरी ॥ मग हिमाद्रि प्रत्युत्तरीं ॥ सन्मानीं तयांसी ॥८४॥
हिमाद्रि वदे मंदराचला प्रती ॥ आम्हीं कन्या दिधली हैमवती ॥ तरी तो ईश्वर नामें पशुपती ॥ जामात आमुचा ॥८५॥
तो आम्हांसी ठाबुका नाहीं कवण ॥ कन्या घेऊनि गेला चतुरानन ॥ आतां कुलाचार पुसणें हा पण ॥ सत्य जाहाला आम्हां ॥८६॥
तरी तो अद्यापि पिना कपाणी ॥ आम्हांसी ठाऊक नाहीं कवणे स्थानीं ॥ विचारितां या त्रिभुवनीं ॥ कवण स्थळ तयाचें ॥८७॥
तंव मंदरा चल जाहाला बोलता ॥ म्हणे परियेसीं गा हिमंवता ॥ माझे मस्तकीं तो शिव होता ॥ ऐशीं सहस्त्र वरुषें ॥८८॥
इतुका काळ जाहाल्या नंतरें ॥ नेणों कोठें क्रमिलें त्या शंकरें ॥ मग वदता जाहाला प्रत्युत्तरें ॥ चंद्रगिरी तो ॥८९॥
चंद्रा चल वदे जी गिरींद्रा ॥ महा शैलवंद्या सुभद्रा ॥ आम्हीं देखिलें त्या महा रुद्रा ॥ त्रिपुरा चिया वधीं पैं ॥९०॥
पृथ्वीचा रथ केला होता त्र्यंबका ॥ मेरूचा ध्वज आकाश पताका ॥ तैं त्रैलोक्य भरूनि पिनाका ॥ उरी होती ॥९१॥
तैं शिव त्रिपुरासी चढे कोपा ॥ परी क्रोध नुपजे कृपा ॥ मग आठवलें शिव स्वरूपा ॥ कांहीं एक ते समयीं ॥९२॥
मौळीं होता जो तारा पती ॥ तो शिवें ठेविला उत्तंग पर्वतीं ॥ तेंचि गुण नाम जाहालें मज प्रती ॥ चंद्र गिरी ऐसें ॥९३॥
मग तृतीय नेत्रीचा संतप्त ज्वाळ ॥ इतुके क्रोधातें उद्भवी जाश्व नीळ ॥ मगा सुखिया केला हा ब्रह्मांड गोळ ॥ त्रिपुरहंत्यानें ॥९४॥
तैं आम्हीं देखिला होता त्रिपुरारी ॥ त्या नंतरें बोलता जाहाला द्रोणाद्री ॥ म्हणे परिसा जी तो गंगा जटा धारी ॥ देखिला होता आम्हीं ॥९५॥
पृथ्वीसी उद्भवला होता तार कासुरू ॥ तेणें अप मानिला देव गुरू ॥ मज केला विपत्ति अवसरू ॥ तेणें समुद्रीं टाकिलें ॥९६॥
देव अशक्त जाहाले विना औषधी ॥ मग मथिते झाले क्षीराब्धी ॥ तैं देखिला होता सर्व गणादी ॥ वृष भवहनी तो ॥९७॥
ऐसें सर्व गिरीचें पृथक बोलणें ॥ एकाग्र परिसिलें हिमाद्रीनें ॥ आतां चला पाहूं समस्त जणें ॥ हैम्वतीवर तो ॥९८॥
पाहात हें त्रैलोक्य भूतळ ॥ जरी अद्दश्य जाहाला जाश्व नीळ ॥ तरी कन्या असेल अति दुर्बळ ॥ द्रव्य घेऊं सांगातें ॥९९॥
मग पाचरिले भांडारी ॥ तयांसी आज्ञा करिता जाहाला हिम गिरी ॥ द्रव्य मणी तुळा रे तुळ भारीं ॥ नाना वस्तु असती ज्या ॥१००॥
मग ते स्वामी चिया मतें ॥ तुळिती नाना वस्तु द्रव्यातें ॥ ते संख्या संकलित श्रोत य़ांतें ॥ करूं निरूपण ॥१०१॥
स्वातीतो याचीं शुद्धें ॥ क्षीरार्ण वाचीं मुक्तें अगाधें ॥ तीं दोन कोटी तुळा अविंधें ॥ घेतलीं मुक्तें पैं ॥१०२॥
युद्धीं झुंजिन्नले हरी नंदिकेश्वर ॥ तैं शक्ति मंद केला शार्ङ्गधर ॥ दशनीं भेदिला गदा प्रहार ॥ नंदी चिया तेथें ॥१०३॥
त्य द्शना चिया झाल्या हिरे खाणी ॥ ते हिरे जैसे दिव्य तरणी ॥ ते घेतली नव लक्ष तुळोनी ॥ आणि षट्‍ सह्स्त्र तुळा ॥१०४॥
नंदी चिया अशुब्दाचीं सगुण ॥ तीं प्रथम खाणीचीं रत्नें रंगें पूर्ण ॥ दोन लक्ष तुळा तोलून ॥ घेतलीं शुद्ध ॥१०५॥
सर्व खणीं तूनि जे पूर्वापार ॥ नाभिपदीं उद्भवले होते असुर ॥ त्यांसी वधो नियां शार्ङ्गधर ॥ प्रसन्न जाहाला ॥१०६॥
भूमीं पडिलें तुमचें शोणित ॥ त्या रत्न खाणी होतील दिव्य दीप्ति मंत ॥ त्या खाणींसी जे उत्पन्न होत ॥ ते शुद्ध पद्मराग ॥१०७॥
ऐसे जे पद्मराग दिव्यमणी ॥ तुळिले तुळा कोटी दोनी ॥ इतुकी संख्या परिया श्रवणीं ॥ पुष्पराग घेतले ॥१०८॥
नंदिकेश्वरा चिया लिंगा पासून ॥ दिव्य रत्न प्रसवली काम धेन ॥ तिये पासाव उद्भवला सत्त्व गुण ॥ तो गोमेद ऐसें नाम ॥१०९॥
कामधेनू चिया मेदीं जन्मला ॥ म्हणोनि गोमेद नाम पावला ॥ तो गोमेद संग्रहो सवें घेतला ॥ एक राशी लक्ष तुळा ॥११०॥
जें इंद्रपद घेतलें नंदीनें ॥ दशदिशा टाकिलीं इंद्रासनें ॥ त्याचि खाणीं जाहाले सगुणें ॥ इंद्र्नील ऐसे ॥१११॥
ऐसे जे इंद्रनीळ दिव्यमणी ॥ ते घेतले लक्ष तुळा तुळोनी ॥ हिमाद्रीचें सामर्थ्य त्रिभुवनीं ॥ न तुके कवण्या गिरीसीं ॥११२॥
कच्छ कुंजर जे धरिले गरुडें ॥ त्रयोदश गांवें तयांचीं रुंडें ॥ तीं जंबुवृक्षीं नेलीं प्रचंडें ॥ ताराक्षे तेणें ॥११३॥
तंव खांदी मोडली तयाच्या भारीं ॥ मग उडी घातली पृथ्वीवरी ॥ चरण रुतले हिमाद्रीवरी ॥ त्या गरुड पाचखाणी ॥११४॥
त्य शुद्ध पाचूंची घेतली सरी ॥ तुळिली अर्धकोटी तुळा भारीं ॥ पोंवळवेल तुळिली सुंदरी ॥ नव लक्ष तुळा ॥११५॥
जय़ांसी नाम गंगावनें ॥ गोलो कींचीं चवरें उत्तमें ॥ तीं कोटि तुळा घेतलीं जी नेमें ॥ दिव्य दंड जयांसी ॥११६॥
जें पुच्छ झाडिलें नंदिकेश्वरें ॥ तेथें कल्पतरु उद्भवलें एक सरें ॥ तेथें जन्मलीं दिव्यांबरे ॥ तीं घेतलीं सवें असंख्य ॥११७॥
जंबु वृक्षा पासुनि जें जन्मलें ॥ तें चौसष्टिक जांबूनद सुवर्ण जाहालें ॥ तें एक निधि तुळा तुळिलें ॥ मंत्रि जनीं पैं ॥११८॥
नव्याण्णव सहस्त्र घेतल्या दासी ॥ संख्या नाहीं जी भ्रृत्य जनांसी ॥ आंदण द्यावया हैमव तीसी ॥ घेतलिया वस्तु ॥११९॥
ऐसे मणि भारें भरले कुंजर ॥ मिरवती दिव्य घंटांचे श्रृंगार ॥ त्यांसी उपमा देऊं जरी गिरीवर ॥ तरी तेही सवें असती ॥१२०॥
ऐसा तो सर्व गिरींचा नाथ ॥ परिवारें हिमाद्री समर्थ ॥ जैसा सर्व देवांसह सुरनाथ ॥ अमरपुरामाजीं ॥१२१॥
निघाले अष्टकुलाचळ ॥ सवें भृत्यजन सकळ ॥ धुंडिते जाहाले त्रैलोक्य मंडळ ॥ तें कैसें आतां ॥१२२॥
जैसे ते व्योमीं गंधर्व भार ॥ तैसें क्षितितळीं गिरीवर ॥ चालती द्विरूप महा स्थावर ॥ जंगमादिक जे ॥१२३॥
तंव हिमाद्री म्हणे गा मंदराचळा ॥ स्वगींच्या मातृका पाचारूं सकळा ॥ तयांवांचोनि जाश्वनीळा ॥ नव्हे शुद्धि सर्वथा ॥१२४॥
मग त्या अष्टदिशां चिया मातृका ॥ वेगें पाचारिल्या सकळिका ॥ हिमाद्रि म्हणे तुम्ही त्या त्र्यंबका ॥ शुद्धी सांगा वहिल्या ॥१२५॥
वैष्णवी म्हणती गा हिमाद्री ॥ तप साधना कीजेति कोटीवरी ॥ तरीचि शुद्ध भावें त्रिपुरारी ॥ सांपडेल कोणे स्थळीं ॥१२६॥
त्याची शुद्धी इतुकी असे आम्हांसी ॥ वेद बोलती तो स्मशानवासी ॥ पाहातां गिरिकंदरीं कैलासी ॥ आगम्य तो तुम्हां ॥१२७॥
जरी पाताळीं पाहावें त्या त्र्यंबका ॥ तरी वेद बोलती तें ऐका ॥ सप्तपाताळें त्याच्या पादुका ॥ ऐसें ऋषि वाक्य पैं ॥१२८॥
मृत्यु मंडळींचा तरी वृत्तांत ॥ त्याकारणें ऋषि जाहाले ध्यानस्थ ॥ युगें क्रमिलीं परी उमाकांत ॥ न साधे तयांसी ॥१२९॥
आतां जैसा भाव तुमचे शरीरीं ॥ तैसा पाहातां सांपडेल त्रिपुरारी ॥ मग दक्षिण मार्गें हिमाद्री ॥ क्रमिता जाहाला ॥१३०॥
मग तो आनंदवन स्थळीण ॥ तो शिवार्णव देखे चक्षु मंडळीं ॥ त्याचे उत्तर भागीं सर्व शैलीं ॥ विश्रांति केली ॥१३१॥
पश्चिमेसी अस्त जाहा लिया दिनमणी ॥ हिमाद्रि स्थिरावला तये स्थानीं ॥ मग सर्व ते निशा क्रमूनी ॥ दिखिला अरुणोदय ॥१३२॥
तरणीचा जाहाला अर्धबिंबोदय ॥ षट्‍कर्मिकी पाहोनि तो समय ॥ मग सूर्यासी देते जाहाले जय ॥ संध्या अर्ध्यदानाचा ॥१३३॥
मग द्वय घटिका आलिया गभस्त ॥ सिंहा सनीं बैसला हिमवंत ॥ तेथें सर्व गिरी आले महा द्‍भुत ॥ हिमाद्रीसी वंदावया ॥१३४॥
मग सर्व शैलीं केला नमस्कार ॥ जैसा तो अभ्रीं वेष्टिला दिनकर ॥ सन्मा निता जाहाला मेनकावर ॥ त्या महा पर्वतांसी ॥१३५॥
बैसका दिधल्या दक्षिण पाणी ॥ मग हिमाद्रीनें अवलो किलें नयनीं ॥ तंव देखिली शिवाची धामिनी ॥ काशी प्रकाशीं ते ॥१३६॥
न ये मज संस्कृताची वाणी ॥ सत्यमिथ्या भाव अर्पण शिव चरणीं ॥ तरी परिसा जी श्रोते एकाग्र मनीं ॥ कैसी देखिली काशी ॥१३७॥
आनंदव नाच्या उत्तर भागीं ॥ हिमाद्रि बैसला होता उच्च योगी ॥ काशी देखिली रचनारंगीं ॥ आश्चर्य करी मनें ॥१३८॥
आणि कैसें देखिलें आनंद वन ॥ मध्यें पक्षिकुळें विचरतीं सगुण ॥ त्यां चिया शब्दांसी वेदपुराण ॥ साक्ष देती अहर्निशीं ॥१३९॥
ऐसी त्या आनंद वना माझारी ॥ शिव धामिनी काशी पुरी ॥ ते स्वर्ग सरितेचे तीरीं ॥ शोभा यमान ॥१४०॥
भूमिका बांधिलिया शुद्ध पिरोजें ॥ पंचक्रोशी साधिली वैदूर्य राजें ॥ तयां पुढें मिरविती शुद्ध मरकत जे ॥ आणि सोमकांत ॥१४१॥
पुढें कल्प वृक्षां चिया मंडाळिया ॥ तेथें हेमनिबद्ध खडकुळिया ॥ आणि क्रीडती आनंद मया ॥ मुक्त राजहं सखिल्लारें जीं ॥१४२॥
दिसती कर्पूरा चिया कर्दळी ॥ बहु त्या वेष्टि लिया कनक मृग जळीं ॥ तेथें आनंदें क्रीडती बिडाळीं ॥ जवादी पैं ॥१४३॥
तेथें कल्प वृक्ष डोलती ॥ कल्पिल्या रसधारा स्त्रंवती ॥ तेथें अद्दश्य पान करिती ॥ तेजस्वी पैं ॥१४४॥
ऐसिया मिळती सकल रसायणी ॥ तेथें स्वर्ग सरितेचें पुण्य पाणी ॥ तें महा किल्बिषाची करी धुणी ॥ ऐसें वेद बोलती ॥१४५॥
मुक्ति मंडप देखतसे द्वारीं ॥ तया तळीं चौफेरी सांबरी ॥ तेथें खडकुळि यांच्या द्वारीं ॥ गावक्षें सोमकांतांचीं ॥१४६॥
त्या मुक्तिमंड पातळीं अशोका ॥ अवघी मृगमद युक्त भूमिका ॥ वरी मिरवती पौळिका ॥ रंगमाळा पैं ॥१४७॥
बोह लिया घातल्या सुवर्णा ॥ वरी कुंकुम कस्तूरिका सगुणा ॥ तेथें क्रीडती देवांगना ॥ करिती नित्य पूजा विधी ॥१४८॥
तेथें चौफेरी दिव्य द्रुमातळीं ॥ अविंध मुक्तमाण्यां चिया रंवदळी ॥ तेथें पंक्तीसी बेसले वेळो वेळीं ॥ विधिवहन ते ॥१४९॥
ते भूमिका कनकरजें सारिली ॥ वरी निखळ पिरोजें जडलीं ॥ नाना मरकतें तया पुढिलीं ॥ खेवणीं ते सोमकांत ॥१५०॥
ऐसें तें रमणीय स्थान ॥ हिमाद्रि देखतसे दुरून ॥ म्हणे व्यर्थ माझें समर्थ पण ॥ हें कवणाचें नगर ॥१५१॥
हे देव शत सहस्त्र विद्याधरी ॥ देवांगना गंधर्वांच्या कुमरी ॥ सुगंध याती गुंफिती स्वयें करीं ॥ शिव भवानींसी ॥१५२॥
या शिव भवानीं चिया वोळंगणी ॥ कुसुम सेजे चिया सुखासनीं ॥ स्वर्गांगना आभरण लेणीं ॥ समर्पिती भवानीसी ॥१५३॥
ऐसी ते मनोरम दिव्य पुरी ॥ स्वर्ग सरितेचे उत्तर पारीं ॥ जेथें राहाती शंकर गौरी ॥ तें स्थळ अनुपम कीं ॥१५४॥
असं भाव्य देखिली दिव्य रचना ॥ प्रासा दाग्रें चुंबिती गगना ॥ तेथें विद्युल्लते चया प्रमाणा ॥ मिरवती दिव्य ध्वजा ॥१५५॥
कोटि कौस्तुभ जडिले कळसा ॥ गोमेद पाचू चिया मजालसा ॥ असंख्यात प्रासाद दाही दिशा ॥ भासती जैसे तरणी ॥१५६॥
तेथें सर्व नगरींचे लोकांसी ॥ गभस्ति उदय न भासे पूर्वेसी ॥ तेथें सर्व काळ दिव्य लोकांसी ॥ नाहीं अर्क निशा ॥१५७॥
नगरीं सप्त खणांची दिव्य शोभा ॥ मरकत मंडित फांकती प्रभा ॥ कोटि रवि शीत करांची प्रभा धामीं धामीं भासत ॥१५८॥
ऐसी ते पंचक्रोशी अवि मुक्ती ॥ तेथें कल्पद्रु मांचीं वनें असती ॥ चिंतामणी सारिखे जडिले भिंतीं ॥ काम धेनु दुभतसे ॥१५९॥
ग्रह नक्षत्रें अष्टही दिक्पती ॥ सप्त ऋषी आणि तारापती ॥ प्रदक्षिणा करीतसे गभस्ती ॥ तेथें द्वादशरूपें ॥१६०॥
म्हणोनि किती वाखाणिजे ते पुरी ॥ वेदांसी अगम्य तेथें कैंची वैखरी ॥ आश्चर्य करिता जाहाला हिमागिरी ॥ मग बोलों प्रवर्तला ॥१६१॥
मजहूनि या भूमंडळांत ॥ ऐसा कवण असे लक्ष्मीवंत ॥ माझिया भुव नाहूनि हें महा द्‍भुत ॥ रचिलें असे पुर ॥१६२॥
पाहातां नगराची या महिमता ॥ आमुची मोटिकळीं न्यूनता ॥ हें कवणाचें नगर आतां ॥ कैसें ठाऊक कीजे ॥१६३॥
शिवें जाणीतली गिरींची व्यवस्था ॥ मग भ्रांति केली सर्वही पर्वतां ॥ हिमाद्रीसी प्रवर्तली दीर्घ चिंता ॥ कवणाचें पुर ॥१६४॥
पाहातां अत्यंत दिव्य स्थान ॥ न कळे स्वामि भृत्यांचें भुवन ॥ रचना भासतसे एका हुन ॥ एक अधिक पैं ॥१६५॥
हिमाद्रीचे बैसले मजालसीं ॥ ते देखती दिव्य रचना वाराणसी ॥ भ्रांति पडिलीसे सर्व गिरींसी ॥ पडिलें महा मान ॥१६६॥
तंव इतुकिया समयीं उत्तर द्वारें ॥ बाहेरी निघालीं तीं काशी करें ॥ तीं दुरोनि देखिलीं गिरिवरें ॥ हिमाद्रीनें ॥१६७॥
त्यां मध्यें दोघे द्विजनायक ॥ देखिले उत्तम षट्‍कर्मिक ॥ जैसे नक्षत्रां माजीं तेजें आत्यंतिक ॥ गुरु आणि शुक्र ॥१६८॥
भृत्यां करीं पाचारिलें त्यांसी ॥ त्यांनीं आशी र्वाद केला हिमाद्रिसी ॥ मग पृथक्‍ सकळां पर्वतांसी ॥ केला स्वस्तिकार ॥१६९॥
मग रत्नखचिय्त चौकिया आसन ॥ गिरीनें बैसविले ते ब्राह्मण ॥ उपचारें केलें पूजावंदन ॥ मग पृच्छा आरं भिली ॥१७०॥
गिरि म्हणे जी द्विज मूर्ती ॥ हे कवणाची पुरी दिव्य दीप्ती ॥ कवण या नगरीचा अधिपती ॥ तें निरूपावें मज ॥१७१॥
ऐसें परिसोनि गिरीचें उत्तर ॥ क्षण एक स्थिर राहिले द्विजवर ॥ तेथें घटिला दोन प्रत्युत्तर ॥ न करिती गिरीसी ॥१७२॥
मग उल्हा सोनि मनीं ॥ हिमाद्रीसी वदले वचनीं ॥ म्हणती गा राजेंद्रा तूं महा ज्ञानी ॥ दिसतोसी आम्हां ॥१७३॥
तुझिया लक्ष्मीचा जो पसर ॥ पाहातां न तुळे कुबेर ॥ तेजें लोपे सहस्त्रकर ॥ धैर्य क्षीराब्धी प्रमाणें ॥१७४॥
सुवर्णा चला सम गंभीरता ॥ व्योमा परीस तुझी निश्चलता ॥ सुरेंद्राहूनि सामर्थ्य महिमता ॥ दीर्घत्वें दिसे ॥१७५॥
विशेष तुझा सेना परिवार ॥ शक्तीसी न तुळे महा शूर ॥ ऐसा तूं दिर्घत्वें दिससी थोर ॥ अति क्षमारूपी ॥१७६॥
ऐसें दीर्घ ऐश्वर्य अओनि गृहीं ॥ परी तुझें शूरत्व निष्फळ सर्वही ॥ ऐहिक पारत्रिक न जोडेचि कांहीं ॥ व्यर्थचि जीवित्व ॥१७७॥
ऐसा तूं स्वदेशीं सर्वही अनृत ॥ हे दिव्य पुरी तुज नाहीं प्राप्त ॥ तरी हे आतां कवणाची श्रुत ॥ करूं तुज प्रती ॥१७८॥
अरे जो अंधका सुराचा हंता त्रिपुरारी ॥ जयाचा खेळ ब्रह्मांड भरी ॥ तो अधिपति येथींचा हे वैखरी ॥ शिणे वाखाणितां ॥१७९॥
तो म्हणसी जरी तूं कवण ॥ त्याचें नाम शिव पंचानन ॥ पंचवक्र पंचदशलोचन ॥ स्मरारि तो ॥१८०॥
सकळ गिरींचा जो अधिपती ॥ तो महा पुण्यश्लोक पुण्यकीर्ती ॥ त्याचे उदरीं जन्मली हैमवती ॥ त्या नाम हिमाद्री ॥१८१॥
त्रैलोक्यनाथ तयाचा जामात ॥ जो हैमवतीचा प्रिय कांत ॥ तो या काशीचा अधीश विख्यात ॥ सूक्ष्म स्थूलां समचि ॥१८२॥
ऐसी वार्ता परिसोनि हिमागिरि ॥ उंचबळला तो शरीरीं ॥ जैसी क्षीरार्णावाची आनंदलहरी ॥ सुभिक्ष करी मुक्तांचें ॥१८३॥
कीं वरुण वृष्टी जाहा लिया पर्वत ॥ वनस्पती दिसे आनंद भरित ॥ तैसा आनंदें हिमवंत ॥ प्रश्न करी पुनरपि ॥१८४॥
हिमाद्री म्हणे जी ब्राह्मणा ॥ श्रुतिशास्त्र पाठका सर्वज्ञा ॥ तुमची समता तुलना ॥ शशि सूर्य़ न पावती ॥१८५॥
या काशी पुरीचा जो निवासी ॥ तो पुनरपि सांगा जी आम्हांसी ॥ थोर आश्चर्य होतें मानसीं ॥ तुमच्या वाग्विलासें ॥१८६॥
ब्राह्मण वदते जाहाले वैखरीं ॥ अरे सर्व गिरींचा स्वामी हिमाद्री ॥ तयाचा जामात त्रिपुरारी ॥ तो येथींचा निवासी ॥१८७॥
इतुकें परिसोनि द्विजवचन ॥ हिमाद्रीसी आनंद जाहाला पूर्ण ॥ जैसा पश्चिमेसी अस्त जाहा लिया दिन ॥ पूर्वेसी पूर्ण पौर्णिमेचा शशी ॥१८८॥
मग तिसरी पृच्छा करी हिमवंत ॥ म्हणे तुम्हीं कथिला जो वृत्तांत ॥ ते ऐकिली नाहीं मात ॥ या सभाचतुरीं ॥१८९॥
म्ग ब्राह्मण वद्ते जाहाले वाचे ॥ परिसा वृत्त काशी शाचें ॥ माता पिता ठाउके नाहीं तयाचे ॥ श्रुती शिणल्या अगम्य हा ॥१९०॥
इतुकेंचि ठावुकें असे पुराणां ॥ हा तंव हिमाद्रीचा जामात जाणा ॥ आणिक याचा सखा या त्रिभुवना ॥ ठावुका नाहीम ॥१९१॥
तो अविमुक्तीचा अधीश ॥ आतां पुरे गा पृच्छा आयास ॥ मग हिमाद्रीनें मानिला संतोष ॥ मनामाजीं ॥१९२॥
मग फोडोनिया द्र्व्य भांडार ॥ काढिले मुक्तमणी अपार ॥ सुखी केले द्विजवर ॥ दिव्यांबर द्र्व्य समर्पुनी ॥१९३॥
बोलविलें बहुतां आदरें ॥ मग विचारिलें त्या गिरिवरें ॥ तें कैसें निरूपिलें शिव कुमारें ॥ अगस्ती प्रती ॥१९४॥
तेचि कथा वैशंपायना प्रती ॥ सत्यवती सुत जो व्यास मूर्ती ॥ निरूपीतसे महा युक्तीं ॥ संस्कृत भाषें ॥१९५॥
त्याचा अर्थ महा राष्ट्र करूनी ॥ निरूपिला श्रोत यांलागोनी ॥ महा पापें श्रवण पठणें करूनी ॥ दग्ध होती ॥१९६॥
हा अध्याय एकाग्र परिसिती ॥ त्याच्या पुण्यासी नाहीं मिती अंतीं कैला सपद प्राप्ती ॥ देतसे तो सदा शिव ॥१९७॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे शैलेश्वरवर्णने हिमाद्रिकाशीप्रवेशो नाम एकसप्ततितमाध्यायः ॥७१॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति एकसप्ततितमाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP