मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ४१ वा

काशीखंड - अध्याय ४१ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आतां सामुद्रिकें शुभ ज्या स्त्रिया ॥ त्यांची शुद्धि पूर्ण काया ॥ अवलक्षणी त्या वर्जिलिया ॥ ऐहिक-पारत्रिकांसी ॥१॥
जियेचीं पदांगुष्ठे सरळ ॥ रक्तवर्ण नखाग्रें वर्तुळ ॥ सखोल सान पादतळ ॥ त्या शुभलक्षणिका जाणाव्या ॥२॥
दीर्घ स्थूल व्यंकट अंगुष्ठ ॥ तीक्ष्ण नखाग्रें जाडें बोट ॥ उथळ पसरट चरणपुट ॥ ते अशुभ वर्जिली ॥३॥
ते स्वामीसी कल्पी घात ॥ चिरंजीव नोहे तियेचा सुत ॥ ते ऐहिकीं पारत्रिकीं स्त्रियांत ॥ वर्जिली द्रोहिणी ॥४॥
सान घोंटी पोटरिया सरळ ॥ कुंकुमवर्ण टांचा वर्तुळ ॥ ते स्त्री जाणावी शुभमंगळ ॥ पुत्रवती निश्चयें ॥५॥
ओंठ दीर्घ असती कृष्णवर्ण ॥ स्थूल घोंटे मनगटें संपूर्ण ॥ ते जाणावी दुर्दशा अवलक्षण ॥ सर्वांकारणीं ॥६॥
ज्यांचे सरळ वर्तुळ जानु ॥ रोमविरहित गौरवर्णु ॥ रंभास्तंभाकार अवधा चरणु ॥ ते शुभदायिनी ॥७॥
सायपत्राऐसें जानुचर्म ॥ त्यावरी असती ऊर्ध्वरोम ॥ ते अशुभ विध्वंसी सर्वकाम ॥ ऐहिक-परत्रींचे ॥८॥
गुप्त असे शंखिनीनाळद्वार ॥ जैसा कुरंगिणीपदाकार ॥ ते शुभलक्षणिका सुंदर ॥ पुत्रजयवंती ॥९॥
सूक्ष्म कटिभाग सुरेख जयांचे ॥ पुष्करं प्रमाण नाभीचें ॥ दीर्घ नासिका ठाण जयांचें ॥ त्या सुखदायिनी ॥१०॥
स्थूल कटितटी वदन कीं नाभीं ॥ ते सर्वथा नव्हे वर्जिली शुभीं ॥ दीर्घस्वरुप विक्राळ जे उभी ॥ ते अशुभा दुर्दशा ॥११॥
सूक्ष्म उदर सान पयाळें ॥ मध्यनाभीं जैसीं केतकीदळें ॥ सरळ कंठ बाहुवटें वर्तुळें ॥ ते शुभदायक जाणिजे ॥१२॥
हृदयनाभीं दिसे पसरता ॥ स्थूल पीन कुचाग्रीं दिसे नम्रता ॥ स्थूल कंठ दीर्घ ज्या बहुता ॥ ह्या वर्जिल्या सामुद्रिकीं ॥१३॥
सूक्ष्म हनुवटी लहान श्रवण ॥ सप्त ताल अधर दृष्टी दशन ॥ आरक्त जिव्हा जे अतितीक्ष्ण ॥ ते शुभलक्षणिका ॥१४॥
दर्दुराननी दीर्घदशनी श्रवण ॥ लंबोष्ठिका जियेचा जिव्हा स्थूळ ॥ अधरीं पिंगट रोमावळ ॥ ते दरिद्रभोगिनी ॥१५॥
सरळ नासाग्र शुकमुंखाकार ॥ मृगनयनी कंठ कोकिळास्वर ॥ कोदंडाऐसा भ्रुकटीआकार ॥ ते शुभदायिनी ॥१६॥
सूक्ष्म नासाग्रपुटें सरळीं ॥ सखोल नेत्र भ्रुकुटें मीनलीं ॥ भाळांगी जे विशाळ आथिली ॥ ते अशुभ सामुद्रिकीं ॥१७॥
लहान मस्तक जियेचें वर्तुळ ॥ दीर्घ केशभार सुनीळ सरळ ॥ पदांगुष्ठापासोनि शुद्ध मौळ ॥ ते शुभलक्षणा ॥१८॥
तंव अगस्ति वदे शिवसुता ॥ स्त्रियांची लक्षणें सामुद्रिक पाहातां ॥ तरी सुलक्षणा ज्या गुणवंता ॥ अल्पचि भूमंडळीं ॥१९॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ षड्‌जाती असती कामिनी ॥ त्यांमध्ये एकचि प्रहरुनी ॥ येरी सर्व शुभमुक्तिका ॥२०॥
एक ते पद्मिनी देवांगना ॥ दुसरी हरिणी शुभलोचना ॥ हस्तिनी विचिणी या शुभगुणा ॥ शुभ सालंकृता ॥२१॥
पांचवी शुभ वडवा सुंदरी ॥ सहावी ते वर्जिली शंखिनी नारी ॥ तरी ह्या जाणाव्या कैशिया परी ॥ तें परियेसी अगस्ती ॥२२॥
आतां पद्मिनीचें गुणवर्णन ॥ तें तुज करुन गा निरुपण ॥ तियेचे भोक्ते सुरेंद्र देवगण ॥ त्या स्वर्गी देवांगना ॥२३॥
नासिकाग्रीं दीपज्योती पूर्ण ॥ सुनीलोत्पल जैसे नयन ॥ मकरंदे सुनील सगुण ॥ तैशापरी नेत्रज्योती ॥२४॥
पद्मिनीकरींचिया आंगोळिका ॥ कीं जैशा ब्रह्मदंडीचिया कलिका ॥ तयांवरी रत्नजडित मुद्रिका ॥ महातेजोमय ॥२५॥
रंभागर्भ जैसे तियेचे पाणी ॥ चापाकृती ते भ्रुकुटिस्थानीं ॥ वैडूर्य जैसें अंधर दशनी ॥ दाटी दाळिबीगर्भीची ॥२६॥
अंकुश कुंडलें करस्थळीं ॥ ऊर्ध्वरेखा पद्म पायातळीं ॥ अंगकांति हिरण्यवत वक्षःस्थळीं ॥ यौवनगर्वित पैं ॥२७॥
मृगमदी जवादीऐसी ॥ रुप गंध असे पद्मिनीसी ॥ सर्व शुभ्रांबरें भूषणें तियेसी ॥ प्रिय असती बहु ॥२८॥
कंठ पंचमस्वर संपूर्ण ॥ बहु प्रिय नाना शास्त्र पुराण ॥ छत्र मंचक गंधर्वगायन ॥ संगीतकला अभ्यास ॥२९॥
सखिया रुचती प्रीतिवंत ॥ चरणभूषणें व्हावीं बहुत ॥ अर्धचंद्र भाळीं नासाग्रीं मुक्त ॥ प्रिय नाना अंबंरें ॥३०॥
सप्त खणांचीं शुभ मंदिरें ॥ जीं कमविलीं चंदनागारें ॥ अष्टगंधें लिंपिली घरें ॥ तेथें शयनस्थळ तियेचें ॥३१॥
स्वामिसेवेसी नित्य तरुणी ॥ पतिव्रता सालंकृत सुलक्षणी ॥ स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ ऐसे गुण पद्मिनीचे ॥३२॥
बहु गुणवर्णन पद्मिनीसी ॥ सांगता विलंब धर्मकथेसी ॥ संकलितमार्गे श्रोतयांसी ॥ निरोंपू मंदबुद्धि ॥३३॥
आतां चित्रिणींचें कैसें गुणवर्णन ॥ गौर सरळ तियेचे करचरण ॥ कंठ शंखरुपासमान ॥ हंसगती चमकत ॥३४॥
लहान प्रमाण मस्तकीं ललाटीं ॥ लहान श्रवण सूक्ष्मचि भ्रुकुटी ॥ दीर्घ वक्षःस्थळीं पीनकुटी ॥ रहस्य स्थूळकंठ ॥३५॥
सुरंग अधर सूक्ष्म दशन ॥ सरळ नासिका सांकड वदन ॥ घूर्णित दृष्टी सूक्ष्मचि नयन ॥ कुंकुमांबरें सर्वदा प्रिय ॥३६॥
चित्रशाळा प्रिय शास्त्रपुराण ॥ सुगंधचर्चित इच्छित चरण ॥ भाळीं मळकट नेत्रीं अंजन ॥ प्रिय बहुत पैं ॥३७॥
तियेचे कंठीं सुकुमार स्वर ॥ कंठीं इच्छी उत्तम हार ॥ तैसे सुगंध अल्पचि आहार ॥ बहु निद्रा तियेसी ॥३८॥
दीर्घ मस्तक सरळ केशभार ॥ तियेसी शयन इच्छिती सुरनर ॥ आणि स्वामिसेवेसी तत्पर ॥ अहर्निशीं ॥३९॥
स्वामी म्हणे गा अगस्तुमुनी ॥ ऐसी ते चित्रिणी सुलक्षणी ॥ आतां कैसी ते हरिणी ॥ सांगों तुजप्रती ॥४०॥
दीर्घ मस्तक सरळ भार ॥ तियेसी शयन इच्छिती सुरनर ॥ सुगंध प्रिय अल्पचि आहार ॥ बहुत निद्रा तियेसी ॥४१॥
सूक्ष्म सरळ तियेचे करचरण ॥ लहान भाळ मौळ दीर्घ श्रवण ॥ चाले हंसगतीचें गमन ॥ कंठप्रदेश सरळ ॥४२॥
विशाळ नेत्र शुद्धांजनरेखा ॥ सूक्ष्म वक्षःस्थळ विरळ देखा ॥ स्थूळ कृष्णांबरें प्रसन्नमुखा ॥ हरिणी ते जी ॥४३॥
सूक्ष्म सरळ कंठ तियेचा ॥ ते स्वार्थ करी हरित पीतांबराचा ॥ गीतनाद नृत्य बहुश्रुताचा ॥ इच्छी समारंभ ॥४४॥
अल्प निद्रा सुरतीं कामातुर ॥ सघन मस्तक गांधार स्वर ॥ रक्त मणिमुक्तांचा शुंगार ॥ इच्छीतसे सर्वकाळ ॥४५॥
लहान सूक्ष्म पद साजिरें ॥ लज्जा बहु इच्छी एकान्त मंदिरे ॥ सूक्ष्म कांति घनपयोधरें ॥ ऐसी ते हरिणी ॥४६॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ ऐसी सुंदर कुरंगिणी ॥ आतां स्वभावलक्षणें हस्तिनी ॥ सांगों तुजप्रती ॥४७॥
तरी स्थूळ तियेचे करचरण ॥ विशाळ मस्तक दीर्घ दशन ॥ जिव्हा स्थूळ लंब श्रवण ॥ कंठीं धैवत स्वर ॥४८॥
दीर्घ कुचभार मस्तक विशाळ ॥ सूक्ष्म लोचन लंबोष्ठिका स्थूळ ॥ गजजाती पदतळें वर्तुळ ॥ सूक्ष्म घोंटे मनगटें ॥४९॥
बहु लज्जावती ते सुंदरी ॥ नेसावया प्रीति सुनीलांबरीं ॥ उभी राहूनि संधीविवरीं ॥ इच्छीतसे उपवनें ॥५०॥
बहुप्रीतिवती विनोदवृत्ती ॥ कामकला बहु कल्पी चित्तीं ॥ क्षेमदर्शन बहुप्रीती ॥ कंठ कटी स्थूळ ॥५१॥
तियेसी सुरतीं गुप्त विचरण ॥ बहु प्रिय अंधकार माध्यान्ह ॥ अगस्तीसी वदे षडानन ॥ ऐसी ते हस्तिनी ॥५२॥
स्वामी म्हणे गा अगस्तिऋषी ॥ आतां वडवा नारी ते कैसी ॥ तियेसी गुणलक्षणें तुजसी ॥ करुं निरुपण ॥५३॥
ती रुपें तरी डोळस जाण ॥ अतिगंभीर हास्तवदन ॥ दीर्घ ताठ रंभा संपूर्ण ॥ बहुत भोजन करीतसे सुंदरी ॥५४॥
त्वरावंत चाले ते लंबोदरी ॥ बहु सत्त्वगुण तिच्या शरींरीं ॥ दान मान क्षमा कृपा करी ॥ सत्पात्रीं ब्राह्मणासी ॥५५॥
करपात्रीं आंगोळिका स्थूळ ॥ कुच कटी सारिखें वक्षःस्थळ ॥ तियेसी भक्षावया विचित्र फळ ॥ प्रीति थोर पैं ॥५६॥
ते दीर्घदशनी कामकळी ॥ गांठाळ अंगोळिका पर्वस्थळी ॥ मीनला मौळीं मस्तक विशाळी ॥ सुरतीं खेदी पुरुषातें ॥५७॥
विचित्र वस्त्रें वेढावयासी ॥ हे प्रीति थोर कल्पी मानसीं ॥ दीर्घ स्तन दिसती शरीरासी ॥ सखोल कपाळ तियेचें ॥५८॥
सर्वांग ठाण तियेचें ॥ सुरत इच्छी अंतीं बळाचे ॥ ताडनीं तर्जनीं मन तियेचें ॥ बहु सुख पावे ॥५९॥
निद्रास्वरुप प्रकट तिचे स्थानीं ॥ स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ ऐसी ते संपूर्ण गुणलक्षणी ॥ वडवा नारी ॥६०॥
आतां शंखिनीचें गुणलक्षण ॥ सर्वांगीं वांकडी गौरवर्ण ॥ दीर्घ शरीर उंच असे ठाण ॥ तनु विक्राळ तियेसी ॥६१॥
कर-पाद दीर्घ असती थोर ॥ चरण अति कठोर ॥ ठोंसर अंगुलाग्रें फुटीर ॥ पिंगट सूक्ष्म नेत्र पैं ॥६२॥
अति विशाळ मीनलीं भ्रुकुंटें ॥ स्थूळ पसरलीं भाळपुटें ॥ वेधनिका जिअसीं घोंटीव मनगटें ॥ अंगीं हरितं शिरादळें ॥६३॥
कंठभार संपूर्ण ॥ अतिदीर्घ पसरले दशन ॥ अधरीं रेषा दिसे खंडण ॥ दशनीं गवाक्ष ॥६४॥
लोहितांबर व्हावें तियेसी ॥ हर्षे अति कलह करायासी ॥ स्त्रियांची लज्जा बहु मानसीं ॥ पुरुषांमध्यें बहु निर्लज्ज ॥६५॥
थोर उदर करी बहु भोजन ॥ पुढिलांचे वर्म जाय बोलोन ॥ चंचळ बहु नव्हे स्थिर चरण ॥ उभी निद्रित डुले पैं ॥६६॥
स्वामी म्हणे गा अगस्तिऋषी ॥ हे शंखिनी नव्हे पुरुषासी ॥ सर्व स्त्रियांमध्ये बोलिजे इसी ॥ दुर्दशा हे खरी हो ॥६७॥
हे स्वामिया मान्य नव्हे सर्वदा ॥ हे पतिव्रतेची करी निंदा ॥ सत्त्व गुण अव्हेरुनि करी सदा ॥ मद-मत्सर-क्रोध ॥६८॥
म्हणोनि भले जे गृहस्थाचारी ॥ तिंहीं सामुद्रिक पाहावें बरवियापरी ॥ शंखिनी पहरुनि अन्य सुंदरी ॥ येर पंच त्या शुद्धा ॥६९॥
शुभ स्त्रियेनें शुभ मंदिर ॥ शुभ स्त्रियेने दान स्वाचार ॥ शुभ स्त्री नुल्लंघी उत्तर ॥ स्वामियाचें पैं ॥७०॥
अगस्ती म्हणे कुंभोद्भव ॥ जेथें स्त्रीपुरुषांचा एक भाव ॥ तेथें सर्वथा नाहीं संदेह ॥ सर्व सिद्धींचा ॥७१॥
तेथेंचि सर्व सिद्धींचा वास ॥ आणि चातुर्याचा प्रकाश ॥ अर्थ काम मोक्ष योगाभ्यास ॥ सर्व सिद्धी असेचि ॥७२॥
तेथेंचि सर्व गुण सर्व धर्म ॥ तेथेंचि सफळ याग होम ॥ तेथेंचि बोलिजे यम नियम ॥ सत्वांश जे कां ॥७३॥
तरी ते यम नियम कैसे कवण ॥ अगस्तीसी निरुपी षडानन ॥ परी ते शुभस्त्रीविण ॥ असाध्य जाणावे ॥७४॥
सदाचार नीति वर्तणूक ॥ सत्पात्रपूजा भावपूर्वक ॥ ज्ञातां योगाभ्यास द्रव्य न्यायिक ॥ हे बोलिजे यम नियम ॥७५॥
म्हणोनि सत्य तें महाज्ञान ॥ सत्य तोचि सदाचार पूर्ण ॥ सत्यावांचूनि सायुज्यस्थान ॥ नव्हे गा मुक्ती ॥७६॥
ऐसा जो सत्त्ववृत्तीं पुरुष ॥ तोचि जाणावा देवाचा अंश ॥ असत्यासी प्राप्त होय पाश ॥ यमदंड जो कं ॥७७॥
ऐशा निरुपिल्या सर्व नीती ॥ स्वामीसी प्रश्नीतसे अगस्ती ॥ काशीवियोगें पीडिला पशुपती ॥ किंनिमित्त स्वामी ॥७८॥
मी तरी पराधीन षडानना ॥ म्हणोनि योग याग प्राणा ॥ काशीवियोग कां झाला पंचानना ॥ तो नसे कवणाआधीन ॥७९॥
आतां विज्ञापना जी श्रोतयां जना ॥ पुण्यकथेसी देइंजे श्रवणा ॥ काशीवियोग झाला पंचानना ॥ ते कथा परिसा पुढें ॥८०॥
अपार काशीखंडाचा महिमा ॥ श्रोतीं कीजे पूर्ण क्षमा ॥ संकलित मार्गे शिवदास गोमा ॥ कथीतसे मंदमती ॥८१॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे स्त्रीलक्षणवर्णनं नामैकचत्वारिंशाध्यायः ॥४१॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति एकचत्वारिंशाध्यायः समाप्त ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP