मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ७० वा

काशीखंड - अध्याय ७० वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ अगस्ति वदे जी स्वामिनाथा ॥ मज काशीवियोगाची व्यथा ॥ ते भंजन करावया समर्था ॥ तूंचि स्वामी मज ॥१॥
तरी प्रश्न असे जी षडाननी ॥ वीरभद्रें केली विभूति संजीवनी ॥ पडिले जे वीर त्या रण स्थानीं ॥ ते उठविले वीर भद्रें ॥२॥
तेथें पडला होता प्रजापती ॥ त्यासी कां नुठवीचि विभूती ॥ संजीवनी ॥ झाली सकळांप्रती ॥ तरी दक्ष कां राहिला ॥३॥
अगस्तीसी वदे शिव कुमार ॥ परियेसीं पृच्छेचें उत्तर ॥ तूं पृच्छेचा सागर ॥ मैत्रावरुणी ॥४॥
वनस्पतीमध्यें जैसा मैलंगरू ॥ तो सुगंध प्रवाह चंदनतरू ॥ सर्व वृक्षांसी करी अधिकारू ॥ परी न वेधे वसंत तो ॥५॥
नातरी स्वाती अंबु वृष्टि करी ॥ तें तोये पडे शुक्ति-शंखांचे कोठारीं ॥ मुक्तें निपजती शुक्ती माझारीं ॥ नव्हती शंखगर्भीं ॥६॥
नातरी वैशाख शुद्ध पौर्णिमेसी ॥ चकोरांसी अमृत स्त्रवे शशी ॥ ते दिनीं आनंद होतो त्यांसी ॥ परी वायसां कां नव्हे ॥७॥
नातरी शीतकराचें झालिया दर्शन ॥ सोमकांतशिळा स्त्रवती जीवन ॥ परी येर क्षितितळींचे पाषाण ॥ ते कां न स्त्रवती ॥८॥
नातरी एके पंक्तीं शेतीं बीज रोपिलें ॥ तें सगुण वृद्धीतें पावलें ॥ एक तें महीतळींचि राहिलें ॥ हें कर्तव्य शिवाचें ॥९॥
नातरी त्रैलोक्या मध्यें आहे काशी ॥ प्रळयीं नाश होतसे त्रैलोक्यासी ॥ परी ते अविनाश वाराणसी ॥ हे इच्छा शिवाची ॥१०॥
म्हणोनि जयासी कोपे शंकर ॥ तो क्रोध कल्पांतींचा वैश्वानर ॥ जैसा वन्हीनें दग्घिला बीजांकुर ॥ न उद्भवेचि कोणे कोळीं ॥११॥
म्हणोनि शिव कोपास्तव प्रजापती ॥ त्यासी नुठवी संजीवनी बिभूती ॥ तो पडिलाचि राहिला रणक्षितीं ॥ सहस्त्र संवत्सर ॥१२॥
हवनीं देह त्यागितां गिरिजा ॥ शाप बोलिली होती दक्षराजा ॥ तूं पाषाण होसी रे पूर्वजा ॥ दक्षवीरा पैं ॥१३॥
तैं तुझें उदरीं घेईन जन्म ॥ विसर्जन होईल हा श्रम ॥ मग अंबिकेनें सेविला होम ॥ आहुतिरूपें ॥१४॥
तें सत्य व्हावया शापदान ॥ दक्ष तो कैसा जाहाला जी पाषाण ॥ अगस्तीसी वदे जी षडानन ॥ परियेसीं एकाग्र ॥१५॥
नारदाचें होतें शापदान ॥ जें दक्षा तूं होसी रे पाषाण ॥ तें व्हावया त्याचें साच वचन ॥ जन्म जाहाला दक्षासी ॥१६॥
विरिंचिदेवाचा जो श्रेष्ठ कुमर ॥ मरीचि नामें तपेश्वर ॥ तो पुत्र प्रसवला जी सृष्टिकर ॥ कश्यप ऐसा ॥१७॥
तो कश्यप महातपेश्वरी ॥ द्क्षा चिया त्रयोदश कुमरी ॥ त्या पतिव्रता असती मंदिरीं ॥ कश्यपाचिया ॥१८॥
कश्यपस्त्री महापतिव्रता ॥ तिने काळ क्रमिला तप करितां ॥ ते कश्यपाची कांता ॥ महातपस्विनी ॥१९॥
ऐसी त्या नैमिषारण्य़ामाझारी ॥ तपें कृश झाली ते सुंदरी ॥ ते दक्ष प्रजापतीची कुमरी ॥ आराधीतसे कश्यपातें ॥२०॥
मग मरीचिऋषीचा कुमर ॥ तियेसी देता जाहाला वर ॥ म्हणे जे मनकामना उपचार ॥ वदावे ते कांते ॥२१॥
मग ते षड्‍नेत्रा वदे कश्यपासी ॥ म्हणे पुत्रकामना आहे मजसी ॥ ती सुफळ कीजे महा ऋषी ॥ कश्यपस्वामिया ॥२२॥
मग कश्यप विचारी मनीं ॥ दक्षशिर वीर भद्रें कापिलें रणीं ॥ त्याचें रक्तबीज नेलें होतें गगनीं ॥ कर्दमसुतें वरुणें ॥२३॥
तें दक्षरुधिर वरुणापोटीं ॥ वाळोनि राहिलें पाषाण खोटीं ॥ तें कश्यपें आणिलें क्षितितटीं ॥ प्रियेकारणें ॥२४॥
नातरी वरुण करी जळप्राशन ॥ मग पृथ्वीसी वृष्टि करी पूर्ण ॥ आणि वृष्टि होय तरी पाषाण ॥ होती त्या गर्भीं ॥२५॥
म्हणोनि दक्षरुधिर पाषाणवत ॥ तें वरुणा जवळी होतें पतित ॥ गंधर्वनगर जैसें महाद्‍भुत ॥ ढिसाळकर ॥२६॥
तें षड्‍नेत्रेसी दिधलें कश्यपें ॥ पाषाण झाला तो भवानीशापें ॥ मग तो स्थावर-जंगम द्विरूपें ॥ केला कश्यपृषीनें ॥२७॥
तो पुत्र जन्मला जैसा हिरण्य गोळ ॥ कोटी विद्युल्लता तैसा तेजाळ ॥ मग तेथें आला सत्यलोकपाळ ॥ विरिंचिनाथ ॥२८॥
विधीनें जातक पाहिलें वर्तवुनी ॥ तो जन्मला पुनर्वसूचे चतुर्थचरणीं ॥ त्यासी जन्म नाम ठेविलें म्हणोनी ॥ झिमाचळ ऐसें ॥२९॥
त्यासी प्रसन्न झाला विधी ॥ समर्पिले वर अष्टसिद्धी ॥ तो श्रेष्ठ केला पर्वतांमधीं ॥ हिमालय ॥३०॥
तुज केला म्यां सर्वगिरिमान्या ॥ तुज समर्पिली मेरूची कन्या ॥ ते महापतिव्रता लावण्या ॥ लक्ष्मी समान ॥३१॥
ते मेनका नामें महा सुंदरी ॥ हिमालयें पर्णिली स्वयंवरीं ॥ मग तो संपन्न आपुल्या मंदिरीं ॥ क्रमी बहु काळ ॥३२॥
ऐसी त्य हिमाल याची उत्पत्ती ॥ सत्यलोका गेला सावित्रीपती ॥ तंव स्वामीसी प्रश्नी अगस्ती ॥ दक्षकथा जे ॥३३॥
स्वामी म्हणे गा मैत्रा वरुणी ॥ सहस्त्र वरुषें दक्ष पडिला रणीं ॥ ह्रदयावरी प्रेत घेऊनी ॥ राहिली प्रसूता ॥३४॥
तंव ब्रह्मयापाशीं गेला नारद मुनींद्र ॥ म्हणे केवढा प्रसूतेचा निर्बंध ॥ ते पावली अति खेद ॥ सहस्त्र वरुषें ॥३५॥
ते सती होईल कोपायमान ॥ वदले एखादें शापदान ॥ मग त्रिदेवांचेंहीं करण ॥ न चले कांहीं केलिया ॥३६॥
मग विरिंची पाहे ज्ञानीं ॥ तंव ते कष्टली रणमेदिनीं ॥ कीं महासती साध्यगोरांजनी ॥ प्रयागतीर्थीं जैसी ॥३७॥
मग विधीनें देखिली विचारणा ॥ हांकारिलें समस्त देवगणां ॥ देव गुरु आदि सहस्त्रनयना ॥ अष्टही दिक्पती ॥३८॥
सहस्त्राक्ष कृतान्त हुता शन ॥ समीन नैऋत वरुण ॥ अलकपती अत्रिनंदन ॥ शीतकर तो ॥३९॥
ऐसे घेऊनि तेहतीस कोटी देव ऋषी ॥ विरिंचि निघाला वैकुंठासी ॥ तेथें प्रार्थूनि पद्मना भासी ॥ विज्ञा पिता जाहाला ॥४०॥
हरीसी प्रार्थूनि सृष्टिकर ॥ कथिता जाहाला प्रसूतेचा विचार ॥ सहस्त्र वरुषें रण सागर ॥ सेविला तिनें ॥४१॥
ते दक्षराजाची महासती ॥ आतां शीघ्र प्रार्थूं तो पशु पती ॥ मग तो वैकुंठाधिपती ॥ निघाला कैलासा ॥४२॥
सर्व देव यानें प्रेरिलीं सुंदरें ॥ विपुळ बळवंत मोहरें ॥ कीं व्योमीं जैसीं गंगर्वनगरें ॥ प्रवाहती विशिष्ट काजा ॥४३॥
गण गंधर्व देव ऋषि वृंदें ॥ पुढें नृत्यांगना नाचती आनंदें ॥ वाद्य ध्वनीं चिया पूर्ण नादें ॥ गर्जतसे अंबर ॥४४॥
शिव दर्शनाचा मार्ग क्रमितां ॥ देवांसी आनंद निर्भयता ॥ उचंबळलिया चित्त सरिता ॥ आनंदजळें ॥४५॥
ऐसे हरि विरिंचि सर्व देव ॥ शंकर भक्तीसी स्वयमेव ॥ मग तिंहीं देखिला सदा शिव ॥ शार्दूलासनीं ॥४६॥
तिंहीं कैसा देखिला भाललोचानी ॥ स्पर्धेसीं तुळिजे शत कोटि तरणी ॥ मग ध्यान स्थचि देव गणीं ॥ साष्टांग ॥४७॥
हरि विरिंचि प्रवर्तले शिवस्तवना ॥ म्हणती जय जयाजी काम दहना ॥ गजांबरी शार्दूलचर्म शयना ॥ त्रिलोचना त्रिपुरांतका पैं ॥४८॥
जय जयाजी कर्पूर गौरा ॥ जय जयाजी व्याघ्रां बरधरा ॥ जे कल्पांतीं त्रेलोक्य संहारा ॥ तमो गुणा सदा शिवा तूं ॥४९॥
तूं सर्वही नीतिमार्गांचें आचरण ॥ तूं त्रैलोक्य सृष्टीचें मूळ जीवन ॥ महायोगीश्वरांचें परम ध्यान ॥ तो तूं भाललोचना पैं ॥५०॥
ऐसे ते ब्रह्मा हरि स्तविती ॥ ध्यान विसर्जिलें पशुपतीं ॥ हरि विरिंचि देव बद्ध हस्तीं ॥ भक्त्यर्थीं देखिले ॥५१॥
द्दष्टी पडतां शंकराची तेथें ॥ साष्टांग घालिती दंडवतें ॥ मग पृच्छा केली त्रिपुरहंतें ॥ विधि-हरींसी ॥५२॥
पृच्छा करितां तो शंकर ॥ मौळीं पूर्ण भरित शीतकर ॥ त्याचेनि प्रकाशें जैसे चकोर ॥ आनंदले देव पैसे ॥५३॥
कीं देखोनि जलधराची वृष्टी ॥ चात कपक्षियां होय संतुष्टी ॥ तैसा देखोनि धूर्जटी ॥ आनंदले देव ॥५४॥
तंव शिव म्हणे गा शार्ङ्गधरा ॥ तूंचि माझे इच्छे चिया भक्तवरा ॥ आणिक विरिंचिनाथा सृष्टिकरा ॥ काय पृच्छा असे तुम्हां ॥५५॥
आम्हांसी होतें समाधीचें ध्यान ॥ तंव पृथ्वी वरी जाहाले यज्ञ ॥ जिंहीं राखिलें आमुचें भाग दान ॥ ते दंडिले वीर भद्रें ॥५६॥
विधि-हरींनीं तो वंचिला याग ॥ तेथें उमेनें केला देहत्याग ॥ येर्‍हवीं मुनीं पासूनि यज्ञ भाग ॥ काढिला वीर भद्रें ॥५७॥
आतां असो त्या यागाचें कारण ॥ पृथ्वी वरी होतील यज्ञ हवन ॥ आतां पृथ्वीचे जे नृपनंदन ॥ ते कैसे असती ॥५८॥
क्षत्रिय कैसे वर्वती पंचकर्में ॥ वैश्यांचीं वैश्वदेव-देवार्चनें नेमें ॥ ब्राह्मणांचीं पंच पहा यज्ञ षट्‍कर्में ॥ कैसीं असती ॥५९॥
पृथ्वी मंडळींचे तप कारक ॥ जे अग्निहोत्री षट्‍कर्मिक ॥ परम ज्ञानी सिद्ध साधक ॥ कैसे असती ॥६०॥
पृथ्वी मंडळी कैसें धर्मदान ॥ यज्ञ करिती कीं नाहीं जय मान ॥ ऋषी ते तप व्रत उपोषण ॥ कैसे क्रमिताती ॥६१॥
आपुलिया स्वामीची भक्ति करितां ॥ स्त्रिया सुचिया असती कीं दुश्वित्ता ॥ धामीं ज्या पतिव्रता ॥ त्या कैशा असती ॥६२॥
पुण्य वर्ततसे कीं पृथ्वी मधीं ॥ मर्यादें कैसे असती ते उद्‍धी ॥ क्षत्रिय ते महा शूर युद्धीं ॥ कैसे असती ॥६३॥
ऐसीं विश्वं भराचीं प्रत्यत्तरें ॥ मस्तकीं वंदिलीं शार्ङ्गधरें ॥ जैसीं तीं दिव्य कमळें सुंदरें ॥ अर्पिजे मौळीं ॥६४॥
मग शिव म्हणे लक्ष्मीकांता ॥ तुम्ही सर्व आलेति किंनिमित्ता ॥ जें असेल तुम चिया चित्ता ॥ तें विज्ञा पिजे आम्हां ॥६५॥
कांहीं अपूर्व असेल वार्ता ॥ कीं कवणें पीडिलें देवां समस्तां ॥ कीं दर्शन ध्यावया माझें आतां ॥ आलेति स्वभावें ॥६६॥
शंकराचे सुशद्धा कारण ॥ प्रत्युत्तरीं तुळिजे ऐसा कोण ॥ मग विष्णूकडे पाहाती गीर्वाण ॥ ब्रह्मादि देवेंद्र ॥६७॥
मग हरि आज्ञा करी विधीसी ॥ प्रसूतावृत्तांत कथिजे शिवासी ॥ मग ब्रह्मा पुढें होऊनि शंकरासी ॥ वेद मधुर वाणीनें ॥६८॥
विधि म्हणे जी त्रिपुरहंता ॥ बहु कष्टली ती दक्षकांता ॥ सह्स्त्र वरुषें धरिलें प्रेता ॥ आपुलिया वक्षःस्थळीं ॥६९॥
सहस्त्र वरुषें राहिलीं याग हवनें ॥ देवांचीं वर्ज्य जाहाली भाग दानें ॥ तरी तुम्हीं कृपा कीजे पूर्णपणें । ऐसिया काजीं ॥७०॥
आम्ही अन्यायी जी दुर्मती ॥ तुमची शुद्धि नेणों पशुपती ॥ आम्हांसी नाहीं गा सात्त्विक वृत्ती ॥ भरलों अभिमानेंकरूनियां ॥७१॥
जैसा आपुलिया स्वामीचा भृत्य ॥ मानें मंदिरीं होतसे उन्मत्त ॥ मग स्वामिकार्याचा निजहेत ॥ असेचि ना ॥७२॥
कीं जैसा तृषापीडेचेनि ज्वाळें ॥ वापीकूप खणूनि प्राशूं नेणे जळें ॥ तैसीं पीडिलीं जी दिक्पाळें ॥ याग भागें विण ॥७३॥
मग शिव म्हणे गा चतुरानना ॥ तूं मानिसील माझिया मना ॥ जे दक्षा चिया यज्ञ कारणा ॥ वंचिलें तुवां ॥७४॥
मग वदता झाला विरिंची ॥ शिवा जंतु शुद्धि नेणें तुमची ॥ तो ज्ञाती निर्मिला म्यां पशूची ॥ मानवी होऊ नियां ॥७५॥
आतां क्षमा कीजे त्रिपुरहंता ॥ भाग समर्पिजे देवां समस्तां ॥ यागाची वृद्धि कीजे जी आतां ॥ आपुलेनि स्वहस्तें ॥७६॥
ऐसी ब्रह्मा-हरींची विनवणी ॥ एरिसोनि संतोषला शूलपाणी ॥ वेगें आरूढला नंदी वहनीं ॥ निघाला वेगेंसीं ॥७७॥
तेणें हर्षले देव सुर ॥ जैसे शशिप्रकाशें चकोर ॥ कीं आनंदती जैसे मधुकर ॥ वसंत ऋतू माजी ॥७८॥
महा दानी दक्ष राज ॥ त्यासी उठवूं आला वृषभध्वज ॥ तेणें देवांसी आनंदाचा पुंज ॥ दाटला कंठीं ॥७९॥
होतसे वाद्यध्वनींचा गजर ॥ शंख स्फुरिला महाडमर ॥ ऐसे पावले बृह स्पतिपुर ॥ नीलकंठ ॥८०॥
चतु र्दश रत्नें पडिलीं सागरीं ॥ तेथें धांवणें केलें सुरासुरीं ॥ कीं जैसा रंकशेतीं वृष्टि करी ॥ जल धर पैं ॥८१॥
तैसा दक्ष काजासी त्रिपुरारी ॥ जैसी कामधेनु वळे वत्सावरी ॥ सहस्त्र वरुषें दक्ष सुंदरी ॥ पीडिली सती ॥८२॥
शिव आले जी याग स्थानीं ॥ परिवारेंसीं देवगणीं ॥ ह्रदयीं संतोषला शूलपाणी ॥ याग स्थळ देखोनी ॥८३॥
तेथें क्षिप्रासंगम देखोनी ॥ प्रथम पीडिले जी भाग दानीं ॥ मग शिवासी दाख विलें गीर्वाणीं ॥ यागाचें स्थळ ॥८४॥
तंव नारद वदे जी त्र्यंबका ॥ पैल दक्ष प्रेताची जे मृत्तिका ॥ क्षितिमंडळीं केली वंदनिका ॥ भूचरजंतीं ॥८५॥
मग छेदन करूनि वृक्षांचें ॥ स्थळ चाळिलें दक्ष प्रेताचें ॥ कलेवर काढिलें प्रजापतीचें ॥ देव सुरीं तथें ॥८६॥
प्रसतेच्या वक्षःस्थळीं पाहाती ॥ तंव दक्ष प्रेताचा कौस्तुभ देखती ॥ ऐसें देखोनि कैला सती ॥ कष्टला मनीं ॥८७॥
सहस्त्र वरुषें क्षुधा तृषा ॥ प्रसूता कल्पीत निराशा ॥ प्रजापती विराहित वांच्छा ॥ नेणे कवणचि ॥८८॥
ऐसी देखोनि सती सुंदरी ॥ कंपाय मान झान तो स्मरारी ॥ म्हणे इचे तपाग्नीची थोरी ॥ अगम्य आम्हां ॥८९॥
संख्या जाहाली वरुणाची वृष्टी ॥ जळजंतूची सिंधूच्या पोटीं ॥ परी त्या प्रसूतेचें तप धूर्जटी ॥ अगम्य जाहालें ॥९०॥
प्रसूते चिया पुण्यजळीं ॥ महावृष्टि जाहाली याग स्थाळीं ॥ तेणें निक्षेपिली रजधूळी ॥ दक्षदुरिताची ॥९१॥
दक्ष दुरितचि तम प्रचंड ॥ तें विध्वंसी प्रसूतेचा पुण्यमार्तंड ॥ दक्षदुरितग जावरी दोर्दंड ॥ प्रसूता पुण्यकेसरीचा ॥९२॥
नातरी प्रसूतेचीं पुण्यसुमनें तीं मौळीं वंदिलीं भाललोचनें ॥ मग काय आरंभिलें पंचाननें ॥ त्या दंपतीसी ॥९३॥
दक्षा चिया प्रेतकलेवरा ॥ शिवें परिधान केलें गजांबरा ॥ मुखीं मंत्र विधीनें घातली भस्मरा ॥ प्रसूते चिया ॥९४॥
तेणें प्रसूता जाहाली सचेतन ॥ शिव चरणीं केलें अभिवंदन ॥ मग करिती जाहाली स्तवन ॥ अक्षय लिंगाचें ॥९५॥
अमोघ अविनाश दिव्यांबरें ॥ प्रसूतेसी दिधलीं शार्ङ्गधरें ॥ शिवासी स्तवी करुणास्वरें ॥ मंजुळ वाणीनें ॥९‍६॥
म्हणे जयजयाजी चंद्रचूडामणि ॥ शंखचूड तुमचे भूषणीं ॥ तरी तुम्हीं होइजे जी महादानी ॥ दीजे चुडेदान ॥९७॥
मग विरिंचि म्हणे प्रसूतेप्रती ॥ अगाध पतिव्रता ते अरुंधती ॥ तुजही देखतसे पशुपती ॥ तियेसमान ॥९८॥
तुजकारणें तो विश्वंभर ॥ याग स्थाना आला वेगवत्तर ॥ माझिया सृष्टीसी पूर्ण अधिकार ॥ तुझिया सामर्थ्याचा ॥९९॥
मग प्रसूतीसी वदे जाश्वनीळ ॥ सचेतन करीं दक्षाचें मृंगळ ॥ मग बस्ताचें लाविलें शिरकमळ ॥ दक्षरुंडासी ॥१००॥
विभूति मंत्रिली विश्वंभरें ॥ परमात्मा आव्हानिला शंकरें ॥ शिंपिलीं मौळींजटा-गंगानीरें ॥ द्क्ष जाहाला सचेतन ॥१०१॥
म्ग देखोनि सचेतन प्रजापती ॥ दीर्घ आनंदली प्रसूती ॥ म्हणे जया जयाजी पशुपती ॥ इच्छादानी तूं ॥१०२॥
जैसें अभागिया साधे निधान ॥ कीं सांपडे पूर्वजांचें धन ॥ तैसी मी प्राप्त जाहालें भक्ती विण ॥ प्रजापति वर ॥१०३॥
तंव दक्षें उघडिले जी नेत्र ॥ सन्मुख देखिला पंचवक्र ॥ मग दक्ष जाहाला सुपात्र ॥ शिवनामाचा ॥१०४॥
मग उभा राहोनि दक्षराज ॥ स्तविता जाहाला वृषभध्वजा ॥ म्हणे जय जयाजी ब्रह्मांडबीजा ॥ विश्वंभरा तूं ॥१०५॥
सद्नदित जाहाला कंठस्वर ॥ ऊर्ध्व उभारले रोमांकुर ॥ चक्षीं जळ घ्राणीं समीर ॥ स्फुंदतसे आनंदें ॥१०६॥
जय जय विश्वभरिता शंकरा ॥ मी महा अपराधी जी दातारा ॥ पूर्ण क्षमा कीजे उमावरा ॥ मज पशूसी ॥१०७॥
तुम्हांसी निंदिलें जया आननें ॥ तें भलें दग्धिलें माझें वदन ॥ सह्स्त्र वरुषें केलें शयन ॥ यागपीठीं प्रायश्चित्त ॥१०८॥
माझें देहा चिया क्रूर भावा ॥ भलें दंडिलें जी सदा शिवा ॥ आतां द्दश्य जाहालसी आघवी ॥ तुम चिया भक्ती ॥१०९॥
तुम चिया क्रोधाग्नीची पूर्ण ज्वाळा ॥ ते दाहीतसे स्वर्ग-मृत्यु-पाताळा ॥ त्रिशूळ प्रहारें काळ-महा काळा ॥ जिंकिसी निमिषमात्रें ॥११०॥
दक्ष वदे जी स्मरारी ॥ किती वाखाणूं तुम्ही सर्वांभ्यंतरीं ॥ माझें व्रत चालों दीजें पूर्वापारीं ॥ यागादिक जें ॥१११॥
ऐसें त्रिपुरांतकाचें स्तवन तेणें ॥ दक्षें केलें भाव पूर्वक मनें ॥ दक्ष उठविला पंचानने ॥ बस्तशिर लावो नियां ॥११२॥
मग शापाचा उश्शाप करूनी ॥ शिव गेला कैला सभुवनीं ॥ मग दक्ष कल्पिता जाहाला मनीं ॥ वाराणसीते ॥११३॥
प्रसूतेसह आनंदवनासी ॥ दक्ष राजा आला वाराणशीसी ॥ स्नानविधि केला मणिकर्णिकेसी ॥ ईश्वर पूजा करावया ॥११४॥
मग लिंग स्थपिलें दक्षेश्वर अनुष्ठानीं बैसला विधि कुमर ॥ तेणें आराधिला शंकर ॥ पंचसहस्त्र वरुषें ॥११५॥
पंचसहस्त्र वरुषें पूर्व ॥ दक्षें केलें मंत्र विधीनें अनुष्ठान ॥ मग आरंभिलें याग हवन ॥ त्या दक्षेश्वरलिंगीं ॥११६॥
केली हवनद्रव्याची आहुती ॥ यागमंडप घातला युक्तीं ॥ यज्ञदीक्षा घेऊनि प्रजापती ॥ बैसला होमीं ॥११७॥
हवनीं आचार्य केला विधाता ॥ अक्षतावंदनें जाहालीं समस्तां ॥ जाहालीं यज्ञकंकणाची योग्यता ॥ ऋत्विजां सकळां ॥११८॥
मग नमिला शिव दक्षेश्वर ॥ सर्व देव ऋषींसी केला नमस्कार ॥ तंव आव्हानिला जी अंगार ॥ गार्हपत्य तो ॥११९॥
ऐसी स्थापना जाहाली त्रय अग्नी ॥ पूजिले ऋषी ब्राह्मण मुनी ॥ मग प्रवर्तली वेदध्वनी ॥ अवदानासी ॥१२०॥
आणि नाना समिधांचे भार ॥ पुण्यतरू बेल चंदनागर ॥ भाग स्थिती देताती ऋषीश्वर ॥ देवां दिक्पाळांसी ॥१२१॥
मद्यमांसां चिया आहुती ॥ क्षीर-सर्पिद्रव्यें समर्पिती ॥ दिव्य कमळें नाना रत्न मुक्तीं ॥ शिंपिती पंचामृतें ॥१२२॥
ऐसी देवांचीं जाहालीं भाग दानें ॥ मग शंकराचा भाग विचारून ॥ विधिनेमेंसीं आहुति प्रमाण ॥ संकल्पिती शिवा ॥१२३॥
ऐसा तेथें जाहाला याग विधी ॥ शिव प्रकटला त्या लिंगा मधीं ॥ प्राप्त केली रे सर्व सिद्धी ॥ दक्ष राजा तुज ॥१२४॥
मग उभा राहिला दक्षेश्वर ॥ मंत्र विधीनें करिती जय जय कार ॥ मग प्रसूते सहित दक्षेश्वर ॥ प्रवर्तला स्तवना ॥१२५॥
दंपतीनें जोडोनि कर कमळ ॥ भावें स्तविला तो शशिमौळीं ॥ म्हणे असत्य अर्पिलें शिरकमळ ॥ शिव अध्वरा तुज ॥१२६॥
बहुत केले म्यां अध्वर ॥ तैं होतें माझें नरशिर ॥ आतां विरूप केलें शरीर ॥ माझें तुवां शंकरा ॥१२७॥
ऐसी दक्षें स्तुति करूनी ॥ मग उभयतां येती लोटां गणीं ॥ तंव द्दश्य जाहाला शूळ पाणी ॥ दक्षासी तेथें ॥१२८॥
तो शंकर भोळ्य़ा भावाचा भोक्त ॥ तोचि स्वयें दाता स्वयें मागता ॥ मग शिव जाहालासे वदता ॥ दक्षराजाप्रती ॥१२९॥
शिव म्हणे माग रे प्रजापती ॥ मी प्रसन्न जाहालों तुझिया भक्ती ॥ मग दक्ष वदे जी पशुपती ॥ तुम्हीं असावें या लिंगीं ॥१३०॥
तेजें कोंद लिया दाही दिशा ॥ द्क्षें हर देखिला कैसा ॥ जैसा कोटिसूर्यां चिया प्रकाशा ॥ अधिक तेजें ॥१३१॥
मग दक्षासी वदे तो महेश ॥ म्यां याचि लिंगीं केला वास ॥ या तुझिया लिंगाचा प्रकाश ॥ अगम्य त्रिभुवनीं ॥१३२॥
या दक्षेश्वरलिंगाचा महिमा ॥ तो म्यां अगम्य केला पुरुषोत्तमा ॥ मग इंद्रादि देव ब्रह्मा ॥ केवीं जाणती पैं ॥१३३॥
मग शिवासी स्तवी प्रसूती ॥ म्हणे जयजयाजी कैलासपती ॥ प्रळय आणि उत्पत्ती-॥ वेगळा शिव पैं ॥१३४॥
त्रैलोक्य भरलें तुझे संततीं ॥ ऐसा तूं समर्थ सर्व व्यक्तीं ॥ तुवां जाणोनि माझी काकुळती ॥ धांवलेती शिवा ॥१३५॥
मी पावलें जी पुण्यफळासी ॥ जें दर्शन जाहालें शिव तुम्हांसी ॥ पूर्ववर प्राप्त केला मजसी ॥ दक्ष राज महा दानी ॥१३६॥
मग स्तविती महा मुनी ॥ म्हणती जय जयाजी शूळपाणी ॥ सर्व सिद्धि साधनें यज्ञकरणीं ॥ तीं तूंचि शिवा ॥१३७॥
मग विधि प्रवर्तला स्तवना ॥ जी तूं कपाल हस्ता भाललोचना ॥ सर्व व्यापूइ त्रिभुवना ॥ अलिप्त तूं शिवा ॥१३८॥
गणितां पृथ्वीचे रेणुरज ॥ स्वर्ग पाताळ संख्या गमे मज ॥ परी तूं अगम्य वृषभध्वज ॥ सर्व देवां आम्हांसी ॥१३९॥
म्हणोनि घातलें लोटांगण ॥ सर्व देवीं केलें शिवस्मरण ॥ विधि मंत्रे आहुती समर्पून ॥ तृप्त केले सर्वही ॥१४०॥
ऐसी जाहाली याग समाप्ती ॥ अवभृथस्नानें केलीं समस्तीं ॥ दीक्षा त्यजो नियां दक्ष-प्रसूतीं ॥ घेतलीं अंबरें ॥१४१॥
ऐसें यागकार्य संपादून ॥ मग दक्षें मांडिलें महादान ॥ सुखी केले ऋषि ब्राह्मण ॥ तीं कैसीं महादानें ॥१४२॥
दक्षेश्वरलिंग स्थापिलें दक्षानें ॥ तेथें कैसीं आरंभिलीं महादानें ॥ षण्मुख म्हणे परिसें स्वस्थमनें ॥ अगस्ति ऋषी ॥१४३॥
तीर्थावांचोनि जें महादान देत ॥ तें बीज प्ररिलें गा दग्धवता ॥ या पुण्याचें फळ होय प्राप्त ॥ गृह स्थासी पैं ॥१४४॥
तीर्थावांचूनि नाहीं सत्पात्र ॥ निष्ठेवांचूनि नाहीं सुफळ मंत्र ॥ म्हणोनि गृहींचें जे दानसूत्र ॥ अफलित सर्वथा ॥१४५॥
जरी सत्पात्र भेटे गृह मंदिरीं ॥ तरी दान दीजे शतवरी ॥ तें दशांशफळ तरी थोरी ॥ न साधे तीर्थाची ॥१४६॥
म्हणोनि जें जें दान करणें ॥ तें तें काशीप्रयागीं मुष्टिधान्यें ॥ किंचित दीजे घडे कोटिपुण्यें ॥ ऐसें ते फलित ॥१४७॥
तरी सत्पात्र तें कैसें आतां ॥ बहुत फळे किंचित देतां ॥ जयासी देतां देतां सूर्य अल्प होय वृत्तांता ॥ षट्‍कमें पंचयज्ञ ॥१४८॥
येर ते ब्राह्मण नामाचे असती ॥ त्यांसी अन्नदानें कीजे तृप्ती ॥ परी द्नव्य वस्त्रें समर्पितां तयांप्रती ॥ वृथाचि निष्फळ ॥१४९॥
म्हणोनि पात्र तें काशी प्रयागीं ॥ दक्ष वैसला होता दान मागीं ॥ तेणें सत्पात्रें तृप्त केलीं यागीं ॥ तीं कैसीं आतां ॥१५०॥
पांच लक्ष कामधेनू सालंकृता ॥ जैशा कल्पद्रुमाच्या पुण्यलता ॥ त्या गोलोकीं चिया जाती श्वेता ॥ दुग्घमाता पैं ॥१५१॥
हेमरत्नांचे करूनि श्रृंगार ॥ पट्टसूत्रें घंटिका मुक्तांचे हार ॥ तेथें अंगीकारिती द्विजवर ॥ वेद मंत्र स्वाक्षरी ॥१५२॥
एक लक्ष तुरगमजाती ॥ कीं ते श्यामकर्णाची शुम्रकांती ॥ तेही वेदमंत्रें अंगीकारिती ॥ शुद्ध प्रति ग्रही ॥१५३॥
दश लक्ष दिधलें भद्रजाती ॥ सर्व श्रृंगारीं जैसे ऐसावती ॥ दानें देतसे दक्ष प्रजापती ॥ शिव प्रीत्यर्थ ॥१५४॥
अठयायशीं सहस्त्र भार सुवर्ण ॥ तुळा दिधली प्रजापतीनें दान ॥ अविंध मुक्तामणी रत्न ॥ दिधलीं देहतुळे ॥१५५॥
आणिक द्वादश लक्ष वृषभांसी ॥ सुवर्णघंटां मंडितचरणेंसीं ॥ महिषी समर्पिल्या हिरण्य़ेंसी ॥ दिधलीं अजादानें ॥१५६॥
दिधल्या दासी गृह मंदिरे ॥ भूमिदाने भूषणें दिव्यांबरें ॥ यज्ञोपवीतें विधि कुमारें ॥ दिधलीं ऋत्विजांसी ॥१५७॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ ऐसा दक्ष यजमान त्रिभुवनीं ॥ तेणें पूजिले महादानी ॥ सन्मानें देव ते ॥१५८॥
ऐसा दक्षें शिव निंदिला पूजिला ॥ तो तुम्हांसी समूळ वृत्तांत कथिला ॥ हा अध्याय जयासी श्रवण पठन जाहाला ॥ परियेसीं तें पुण्य ॥१५९॥
तरी शिवाची आज्ञा ऐसी ॥ पूर्वीं निरूपिलें होतें भवानीसी ॥ दक्षें दान जें केलें वाराणशीसी ॥ तें घडे पुण्यसामर्थ्य ॥१६०॥
हा अध्याय जयासी श्रवण पठन ॥ तयासी दक्षेश्वरीं पूजन ॥ मणिकर्णिकेचें त्रिकाळ स्नान ॥ हा वर शिवाचा ॥१६१॥
ऐसा दक्षेश्वराचा पूर्ण महिमा ॥ तुज निरूपिला अगस्ति उत्तमा ॥ तें उच्छिष्ट निरूपीतसे क्षेमा ॥ व्यासमुनीं शिष्यां प्रती ॥१६२॥
आतां या ग्रंथाची फळश्रुती ॥ मज न सांगवे श्रोतयां प्रती ॥ परी जें वदला पार्वती प्रती ॥ शंकर आपण ॥१६३॥
तेथें अगम्य सांगीतला महिमा ॥ तो मज न वर्णवेचि उपमा ॥ परी कांहीं संकलित श्रोतोत्तमां ॥ करूं निरूपण ॥१६४॥
या अध्याय पठनें जाण ॥ पाप नासे आकल्प संपूर्ण ॥ अतीं शिव लोक पावन ॥ हे आज्ञा शिवाची ॥१६५॥
सहस्त्र जन्म वाराण शिवासा ॥ कीं लक्ष जन्म पूजिला महेश ॥ कीं पृथ्वी प्रदक्षिणा पुण्यांश ॥ घडला तया ॥१६६॥
कीं ग्रहणीं कोटि गोदान ॥ कीं अरुणोदयीं लक्षभार सुवर्णदान ॥ कीं द्वादश ज्योतिर्लिंगदर्शन ॥ घडे शिवरात्रीसी ॥१६७॥
कीं प्रयागीं कोटियज्ञ केले तेणें ॥ कीं लक्ष कन्यादानें सिंहस्थीं अर्पणें ॥ कीं सहस्त्र केलीं मौंजीबंधनें ॥ विप्रांचीं तेणें ॥१६८॥
कीं सहस्त्र गंगा प्रदक्षिणा पुण्यें ॥ कीं लक्ष विप्रां दिधलीं गृह दानें ॥ कीं अनाथांचीं व्रतबंधनें ॥ निर्मुक्त केलीं ॥१६९॥
आतां असो हे फल श्रुती ॥ मज न सांगवे श्रोवयां प्रती ॥ संस्कृतीं ॥ व्यास संमती ॥ बहुतीच असे ॥१७०॥
तें संस्कृत अगम्य जाणा ॥ मग देखिली महाराष्ट्र विचारणा ॥ जैसें करांजलीनें प्राशिजे जीवना ॥ तडाग-सरिते चिया ॥१७१॥
संस्कृताचा अगम्या विचार ॥ जैसा कूपोदका लागे पात्र दोर ॥ शुद्ध वेदवाक्य शूद्र नर ॥ कैंचा पावेल ॥१७२॥
म्हणोनि हें कथिलें सत्य अमृत ॥ तें विश्वनाथासी पावे अर्पित ॥ श्रोतयां वक्तयां वारणसी होय प्राप्त ॥ म्हणे शिव दास गोमा ॥१७३॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दक्षचरिते विभूतिमाहात्म्य-दक्षानुग्रहवर्णनं नाम सप्ततितमाध्यायः ॥७०॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति सप्ततितमाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP