काशीखंड - अध्याय ४४ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी विघ्ननाशिता ॥ जयजया तूं गजांबरीसुता ॥ जी तूं सर्वसिद्धिपूर्णभरिता ॥ आदिगणाधीशा ॥१॥
तुज चतुर्दश्यविद्यांचा अधिकार ॥ शिणला तो सहस्त्रशिर ॥ मग मी शंके बाधलों थोर ॥ धरिलें मौन ॥२॥
मग विनवूं पाहें सरस्वती ॥ तंव ते वेदगर्भ वीणा हातीं ॥ सर्व नादांचे मूळ ते जाणती ॥ चतुर्वाचा वेदासी ॥३॥
मग स्तवन पूजन स्मरण ॥ कीजे ऐसी वाचा कवण ॥ जेथें खंडे वैखरीचें चलन ॥ न सुचेचि मार्ग ॥४॥
मग कैवल्यदानियाची प्रार्थना ॥ जेणें हें सकळ आणिलें मना ॥ प्रपंच ब्रह्म करुनि निजनिर्गुणा ॥ लय दाखविला ॥५॥
जो हारपवी आपआपणांमाझारीं ॥ चिंतामणि-स्फटिकां समता करी ॥ तयासी अमृत-विषलहरी ॥ पीयूषचि कीं ॥६॥
इंक्षुदंड आणि काळकीर ॥ हे उभयतां देखिले समताकर ॥ तेणें प्रपंचाचे ओंडबर ॥ ब्रह्म करोनि दाखविलें ॥७॥
म्हणोनि भेद न देखों सर्वथा ॥ मग प्रणाम कैचा करुं श्रीगुरुनाथा ॥ आतां जेणे पराभवे दीर्घ व्यथा ॥ ते कथा श्रोतीं परिसिजे ॥८॥
आतां श्रोतीं सर्वज्ञ व्हावें मनीं ॥ जैसी ते गंगा स्वर्गतरंगिणी ॥ ते प्रकट केली जी मृत्युभुवनी ॥ भगीरथरायें ॥९॥
मग तेणें उद्धरिले पूर्वज ॥ ते जगा उपकारा आली सहज ॥ तैसें योजिलें वेदान्तबीज ॥ काशीखंड हें ॥१०॥
जे काशीखंडकथा त्रिभुवनीं ॥ ते संस्कृत होती व्यासवाणी ॥ ते प्रकटविली जनोद्धारिणी ॥ महाराष्ट्रभाषा ॥११॥
आतां सावधान जी श्रोतृनाथा ॥ परिसा उत्तरार्धाची कथा ॥ तेणें पराभवे महाभवव्यथा ॥ सर्व जंतूंचे जे ॥१२॥
स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ मंदराचळासी गेले शूळपाणी ॥ तो पर्वत वसविला गीर्वाणीं ॥ दुसरा कैलास ॥१३॥
जैसीं मेरुप्रदक्षिणेचीं नक्षत्रें ॥ तेथें भ्रमण करिती अहोरात्रें ॥ तैसींचि मंदराचळीं चालती शिवसूत्रें ॥ शिवाज्ञेनें पैं ॥१४॥
जैसा तो गिरि सुवर्णशैल ॥ तैसाचि बोलिजे मंदराचळ ॥ कीं तेथें राहिलासे जाश्वंनीळ ॥ म्हणोनि हे उपमा ॥१५॥
जैसें महामेरुचें धैर्य ॥ तैसेंचि मंदराचळाचें गांभीर्य ॥ तेथें भ्रमण करिती सोम सूर्य ॥ दिनमानगतीं ॥१६॥
त्या मंदराचळाचीं कंदरें ॥ जैसीं एकवीस खणांची दामोदरें ॥ आकाशपर्यंत गिरिशिखरें ॥ राहिले देव समस्त ॥१७॥
रत्नखचित मिरवती पाठारें ॥ देवसभामंडप मनोहरें ॥ पदोपदीं अमृतसरोवरें ॥ क्रीडती हंस कमळीं ॥१८॥
तेथें कोकिळांचे पंचमस्वर ॥ तेथें गंधर्वगायनें नृत्याकार ॥ जेथें तो साक्षात शंकर ॥ तें स्थळ किती वर्णावें ॥१९॥
रत्नदीपांचा धामीं प्रकाश ॥ राहिले हरि विरिची महेश ॥ तेथें निर्मिला कैलास ॥ विश्वकर्म्यनि स्वहस्तें ॥२०॥
ऐसा तो पर्वत मंदरगिरी ॥ असे क्षीराब्धीचे उत्तरपारीं ॥ तंव आठवला ते काशीपुरी ॥ त्रिपुरांतकासी ॥२१॥
स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ वियोगें कृश जाहाला शूलपाणी ॥ तेथें हरि विरिंची देव मिळोनी ॥ प्रार्थिती विश्वंभरा ॥२२॥
संतोष न वाटे शंकरासी ॥ काशीवियोग जाहाला मानसीं ॥ तरी तो वियोग अगस्तिऋषी ॥ केवीं पां नव्हे तुजला ॥२३॥
ऐसा वियोग जाहाला शिवासी ॥ परी तो न चुके कवणासी ॥ जैं मौन पडलें शिवमानसीं ॥ तें अगम्य जाहालें देवां ॥२४॥
उद्भवला महावियोगज्वर ॥ शरीर जाहालें महाअंगार ॥ तेथें कवणासी नाहीं स्मर ॥ शिवव्यथेचा पैं ॥२५॥
कंठीं त्या हालाहलाचा पावक ॥ आणि तृतीय नेत्रींचा दाहक ॥ ऐसा त्रिज्वरें त्र्यंबक ॥ कवण जाणे काय व्यथा ॥२६॥
जैं पंचमहाभूतांचा संकेत ॥ कीं पुरे ब्रह्मांडाचा पूर्ण अंत ॥ तैं दक्ष वधावया भवानीकांत ॥ सहजरुप हो ॥२७॥
तो उत्पत्ति प्रलयांविरहित ॥ तो क्षराक्षरविश्वभरित ॥ आणि तो कैसा व्यथाबाधित ॥ तें कवण जाणे ॥२८॥
तंव श्रीहरि म्हणे जी विश्वनाथा ॥ तुम्ही इच्छादानी जी चतुरथा ॥ तुम्हां स्मरतां जी असंख्य व्यथा ॥ पराभवती दूरी पैं ॥२९॥
आणि तुम्हांसी हे व्यथा बाधित ॥ हें महा आश्चर्य जी विपरीत ॥ शिवाचे व्यथें बाधिले समस्त ॥ ब्रह्मादिक ॥३०॥
ऐसा देवांसहित प्रार्थी हरी ॥ परी तो असंभाव्य ज्वर त्रिपुरारी ॥ श्रवणासी न बोले प्रत्युत्तरीं ॥ मौनें जाहाला स्थाणु जैसा ॥३१॥
ऐसा क्षण एक राहे निश्चळ ॥ मग देवांसी वदे जाश्वनीळ ॥ अरे हा द्ग्धीतसे वडवानळ ॥ मज काशीवियोगाचा ॥३२॥
नाना आपुलिया प्रिय वस्तूंसी ॥ मित्रत्वें देइजे कवणासी ॥ मज अनुचित वाटे मानसी ॥ अयत्नास्तव ॥३३॥
आपुली जी इच्छा उद्भवे आपणा ॥ ते जरी न रुचे सर्व जनां ॥ परी ते आपुलिया प्राणा ॥ परीस अधिक असे ॥३४॥
तैसी माझी इच्छा ते अविमुक्ती ॥ परात्पर अविनाश कल्पांतीं ॥ ते विरिचीनें दिवोदासाप्रती ॥ समर्पिली ॥३५॥
इच्छा जरी ते न रुचे जनांसी ॥ परी काशी प्रिय सर्व जंतूंसी ॥ मी असें सर्व जंतूंसे मानसीं ॥ म्हणोनि प्रिय ते मज ॥३६॥
शंकर म्हणे गा पद्मनाभा ॥ इच्छा असती शुभा अशुभा ॥ परी अविमुक्तीची जी प्रतिभा ॥ सर्व काळ शुभ पैं ॥३७॥
काशीवियोग पळप्रमाण ॥ तो मज ब्रह्मकल्प गा सत्य जाण ॥ हा शब्द परिसोनि देवगण ॥ बाधिले ज्वरें ॥३८॥
पुनरपि मौनी जाहाला शंकर ॥ त्यासी नाहीं काशीगुनाचा विस्मर ॥ कैसोनि शांत होय महाज्वर ॥ ऐसा भेटले कवण वैद्य ॥३९॥
ज्वरें कैसा तापला भवानीकांत ॥ जैसा सूर्ययागींचा महाहुत ॥ कीं महाकल्प ब्रह्मांड दाहित ॥ ऐसा प्रमर्थीं देखिला ॥४०॥
तरी तो सहजचि गा वन्ही ॥ त्याची व्यथा आली कैसेनी ॥ त्यासही जलोदर झाला यज्ञीं ॥ नहुषरायाचिया ॥४१॥
म्हणोनि काशीगुणाचा वियोग थोर ॥ यास्तव शिवें मानिला ज्वर ॥ माझिये प्रिये ऐसें शंकर ॥ वदला पार्वतीसी ॥४२॥
विश्वनाथ वदे शैलजे ॥ माझिये इच्छे तूं दक्षात्मजे ॥ माझिया वियोगा सहजें ॥ अमृतवल्लीं तूं ॥४३॥
तरी हा दग्धीतसे महाज्वर ॥ माझिया मौळीं शीतळ शीतकर ॥ तो अधिकचि उद्भवितो ज्वर ॥ तृतीय नेत्रीं जैसा ॥४४॥
तरी दाक्षायणी परियेसीं ॥ जैसी शुल्कप्रतिपदेचा शशी ॥ कालवंडत जाय सौम्य निशी ॥ तैसा दीर्घत्वें ज्वर ॥४५॥
काशी माझी जीवाची आवडी ॥ काशी मेरुप्रमाण पाप फोडी ॥ चौर्यायशीं लक्षांची बांदोडी ॥ तोडी निमिषार्धे ॥४६॥
ऐसी ते परम निजधाम काशी ॥ तरी वियोग नव्हे कवणासी ॥ प्रिये हा ज्वर तुझेही मानसीं ॥ जाणवत असेल ॥४७॥
हिमाद्रिजा म्हणे त्रिपुरारी ॥ मी चिंताग्रस्त झालें भारी ॥ मजही व्यापीतसे शरीरीं ॥ दुस्तर हा महाज्वर ॥४८॥
मज न गमे काशीविण ॥ हें तंव विपत्तीचें ब्रह्मारण्य ॥ अति खेदें क्षीण होतसे मन ॥ वारानसीविरहित ॥४९॥
काशीविण आणिके स्थळीं वास ॥ तो म्यां मानिला जी अति त्रास ॥ जैसा वसिष्ठेंविण पुरुष ॥ न देखे अरुंधती ॥५०॥
कीं सरोववरेंविण मुक्ताहारे ॥ तो आणिक कांहीं न स्वीकारी ॥ जैसा वरुर्णेविण पृथ्वीवरी ॥ न लिंपे चातक ॥५१॥
मी उद्वेगें गेलें जी त्रिप्रुरारी ॥ आतां चला जाऊं काशीपुरीं ॥ माझें मन उत्कंठित भारी ॥ काशीविण स्वामी ॥५२॥
ते काशी तुमची निजधामिनी ॥ जैसी सरोवरीं पवित्र कमळिणी ॥ ते जळावरी चढे पद्मिणी ॥ पूर्ण झालिया सरोवर ॥५३॥
तैसी सर्वही ते काशीपुरी ॥ कल्पांतीं धरितां हे त्रिशूलावरी ॥ दीर्घ त्या काशीजंतूंची सामुग्री ॥ ते प्रळयीं अविनाश ॥५४॥
म्हणोन शुद्धामृत तें काशीस्थल ॥ आणिक स्थानीं तें हालाहल ॥ परी तेंही प्राशिलें सकळ ॥ लाघव तुमचें ॥५५॥
शिवा तूं भक्तीचा परमभोक्ता ॥ शम करिसी हालाहल अमृता ॥ तूं शुभाशुभ भक्तांचिया चित्ता ॥ सारिखा होसी ॥५६॥
ऐसी स्तुति करीतसे दाक्षायणी ॥ काशी द्वय अक्षरें स्मरतसे मनीं ॥ तेणें संतोषे शूलपाणी ॥ नावेक स्वस्थ ते काळीं ॥५७॥
मग शिव म्हणे हिमाद्रिजे ॥ ऐसी ते काशी केवीं प्राप्त मज ॥ जव दिवोदासाचें असे राज्य ॥ तंव ते अप्राप्त आम्हांसी ॥५८॥
संहारिले त्रिभुवन लोक ॥ पूर्वी प्रलय ते जाहाले असंख्य ॥ पुढेंही होतील नेणों कितीएक ॥ परी ते काशी अविनाश ॥५९॥
मज आठव नाहीं पूर्वापार ॥ कैसें निर्मिलें हें काशीपुर ॥ ऐसी प्रिय मज काशी स्मर ॥ नाहीं पंचक्रोशी ॥६०॥
कांते मीं निर्मिले त्रिभुवन ॥ बहुत पुर्या केल्या निर्माण ॥ परी जे वारानसीचे गुण ॥ ते अगोचर मज असती ॥६१॥
ते माझी निजवस्तु प्रिय थोर ॥ तें माझें प्रलयीं राहावयाचें घर ॥ जैं एकवटती पृथ्वी-सागर ॥ अकथ्य तुमचें चरित्र ॥६२॥
षण्मुख म्हणे गा कुंभोद्धवा ॥ ऐसा काशीवियोग जाहाला महादेवा ॥ दाक्षायणी म्हणे जी सदाशिवा ॥ अकथ्य तुमचें चरित्र ॥६३॥
हा तुमचा वियोगज्वर ॥ तो हरि-विरिंचीसी अगोचर ॥ तरी तुमचे तुम्हीचि वैद्य उपचार ॥ येर नेणती स्वामी ॥६४॥
तुम्हांसी वियोग हा काय म्हणोनी ॥ आम्हीं उपचार जाणावा कैसेनी ॥ ते पंचक्रोशी जे परमधामिनी ॥ तुम्हांसी अगम्य नसे ॥६५॥
मग शिव मौळीचिया पिंगट जटा ॥ मोकळ्या करिता जाहाला नीलकंठा ॥ मग हिमाद्रीची दुहिता ललाटा ॥ वरी तुषारिली गंगा ॥६६॥
केलें विभूतीचें लेपन ॥ शीतकर प्रकाशला संपूर्ण ॥ तेणें सावध जाहाला त्रिनयन ॥ क्षण एक ते काळीं ॥६७॥
शिव म्हणे दाक्षायणी परियेसी ॥ तो दिवोदास राजा वाराणसीं ॥ तेणें स्वधर्मेचि रक्षिळी काशी ॥ परी अधर्म नेणे तो ॥६८॥
तो जरी अघर्म करिता क्षिती ॥ तरी मी तयासी करितों विपत्ती ॥ धर्मासी न चले उपाय युक्ती ॥ सर्वथा कवणाची ॥६९॥
धर्म तो माझाचि स्थापिला असे ॥ धर्मिष्ठ ते विपत्ति भोगिती कैसे ॥ त्या धर्मामध्यें काळाचे फांसे ॥ न करितीए रिघाव ॥७०॥
धर्म तो माझें सत्य वचन ॥ तयासी अमान्य करील कवण ॥ तो असत्य करितां त्रिभुवन ॥ कैसेनि तरे कांते ॥७१॥
तो दिवोदास अधर्म करी ॥ तरी मी घालीन काशीबाहेरी ॥ अधर्म अनाचार राष्ट्री ॥ नाहीं दिवोदासाचे ॥७२॥
तयासी केवीं करावी विपत्ती ॥ मग सृष्टी चाले केवीं पुढती ॥ ऐसा हिमाद्रिजेप्रती पशुपती ॥ कथीतसे स्वधर्म ॥७३॥
आतां सर्वथा न चले कांहीं ॥ देव मौनें राहिले सर्वही ॥ मग शिवआज्ञेची वांछा देहीं ॥ इच्छीत राहिले ॥७४॥
तंव शिवासन्मुख साधारणी ॥ सेवार्थिया होत्या चौसष्ट योगिनी ॥ त्यांसी आज्ञा करी शूलपाणी ॥ पाचारोनियां जवळिकें ॥७५॥
मग शिव म्हणे योगिनी ॥ माझी आज्ञा वंदा सर्वजणी ॥ तुम्हीं सर्वभावें काशीभुवनीं ॥ जाइजे समस्तीं ॥७६॥
तरी तुम्हीं योगमाया सकळीं ॥ सर्वव्यापक भूतळीं ॥ त्या दिवोदासाच्या राज्यमंडळीं ॥ अधर्मछिद्र पाहावें ॥७७॥
तरी त्या दिवोदासाचे प्रजाजन ॥ तुमचें करितील पूजन ॥ ऐसा उपाय देखावा जाऊन ॥ काशीमध्यें तुम्हीं ॥७८॥
तेथें जाऊनि करावा अनाचार ॥ मांडावा अधर्माचा व्यापार ॥ मग सत्यधर्म नृपवर ॥ पाहा वागवील कैसा ॥७९॥
ऐसी आज्ञा करी धूर्जटी ॥ परिसती योगिनी चौसष्ती ॥ प्रमाण करिती करसंपुटीं ॥ क्षितीं मौळी ठेवूनियां ॥८०॥
मग त्या स्वभारेंसी सकळा ॥ मिळाला योगिनींचा मेळा ॥ त्या उमगलिया नभमंडळा ॥ चालिया व्योममार्गेसी ॥८१॥
तंव अगस्ति वदे जी रुद्रकुमारका ॥ तूं माझिया तपयागासी हव्याका ॥ तूं योगसिद्धीचिया कूपिका ॥ पूर्ण शिवनामामृतें ॥८२॥
मग मंदराचळाहूनि योगिनी ॥ शिवें पाठविल्या काशीभुवनीं ॥ तरी त्या चौसष्टी कवणकवणी ॥ निरुपाव्या मजलागीं ॥८३॥
स्वामी म्हणे मित्रावरुणसुता ॥ न देखों तुजऐसा महाश्रोता ॥ तरी त्या चौसष्ट योगिनी आतां ॥ सांगो तुजप्रती ॥८४॥
तरी परियेसीं गा महासज्ञाना ॥ प्रथम देवता गजानना ॥ गृध्रकागतुंडा सिंहवदना ॥ उष्ट्रग्रीवा ते ॥८५॥
हयग्रीवा वाराही शरभानना ॥ उलूंकिका शिवारवा मयूरी जाणा ॥ अष्टवक्त्रा कोटराक्षी विकटानना ॥ विकटलोचना कुब्जा ते ॥८६॥
ललज्जिव्हा शुष्कोदरी ॥ वानरानना ॥ श्वदंष्ट्री ॥ वृक्षाक्षी केकराक्षी निर्धारी ॥ बृहत्तुंडा सुराप्रिया ते ॥८७॥
शुकी रक्तासी कपालहस्ता ॥ श्येनी कपोतिका पाशहस्ता ॥ चंडविक्रमा प्रचंडा दंडहस्ता ॥ शिशुघ्नी आणि पापहंत्री ॥८८॥
काली वसाधया रुधिरपायिनी ॥ गर्भभक्षा शवहस्ता अंत्रमालिनी ॥ स्थूलकेशी बृहत्कुक्षी प्रेतवाहनी ॥ सर्पास्या आणि दंदशूकरा ॥८९॥
मृगशीर्षा क्रौंची वृषानना ॥ व्यात्तास्या व्योमैकचरणा ॥ ऊर्ध्वदृग्धूमनिःश्वासा जाणा ॥ तापनी शोषणी दृष्टि ते ॥९०॥
स्थूलनासिका विद्युत्प्रभा कोटरी ॥ बलाकास्या कटपूतना मार्जारी ॥ अट्टाट्टहासा कामाक्षी निर्धारी ॥ मृगाक्षी आणि मृगलोचना ॥९१॥
स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ ऐशा त्या चौसष्ट योगिनी ॥ महाआनंदें उमगलिया गगनीं ॥ क्रमिती काशीमार्ग ॥९२॥
तरी त्या आल्या मेळिकारेंसी ॥ क्रमिती नभमार्ग वेगेंसीं ॥ मग प्रत्त्युत्तरें एकमेकींसी ॥ वदत्या जाहाल्या परस्परें ॥९३॥
म्हणती आपुला जो तपतरणी ॥ तो आजि उदया आला कैसेनी ॥ जे आपणांसी आणि पंचाननी ॥ वदला प्रत्युत्तर ॥९४॥
अपार आमुचें तप अनुष्ठान ॥ सफल आमुचा जन्मदिन ॥ जें आम्हांसी आजि पंचानन ॥ निरुपी स्वमुखें ॥९५॥
पाहातां स्वर्गमृत्युपातालपुटें ॥ तरी एवढें कार्य न चले कोठें ॥ आम्हांसी पाठविलें नीलकंठें ॥ काशीपुरीसी ॥९६॥
आमुची पुण्यसामुग्री अपार ॥ जें हें कार्य निरुपिलें थोर ॥ पूर्वभाग्यास्तव त्रिशूलधर ॥ प्रसन्न जाहाला आम्हांसी ॥९७॥
इकडे तरी आम्हां पशुपती ॥ तिकडे तरी ते अविमुक्ती ॥ असंख्य आमुची तपःशक्ती ॥ जे आम्हां काशी घडेल ॥९८॥
स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ वाराणशी पावल्या योगिनी ॥ मस्तकीं वंदिली स्वर्गतरंगिणी ॥ मग प्रवेशल्या काशीभुवनीं त्या ॥९९॥
तंव तो मित्रावरुणाचा सुत ॥ कुंभज वदला बहुश्रुत ॥ पुढें निरुप जी कथा महाअदभुत॥ शिवशास्त्र जें ॥१००॥
काशीमध्यें प्रवेशल्या योगिनी ॥ त्या कैशा कवण रुप धरोनी ॥ ते कथा जैसी मंदाकिनी ॥ भक्षी दोषमळासी ॥१०१॥
मग त्या कंभोद्भवाकारण ॥ शिवकुमार वदे षडानन ॥ तुवां घातलें सायुज्यासी ठाण ॥ देव केले शरणागत ॥१०२॥
तरी ये कथेचा प्रादुर्भाव ऐसा ॥ श्रवणमात्रें चुके काळाचा फांसा ॥ श्रोतया जनांची निवारे दुर्दशा ॥ सत्य सत्यचि पैं ॥१०३॥
ये कथागंगेचे पुण्यजीवनें ॥ जयांसी घडती श्रवणस्नानें ॥ श्रवणमुखें कथामृतभोजनें ॥ जे भक्षिते सर्व काळ ॥१०४॥
ते विश्वंभराचे निज गण ॥ त्यांहीं संतोषविला त्रिनयन ॥ त्यांसी पूर्वगति पावन ॥ होईल वाराणसी ॥१०५॥
कथा परियेसीं वहिली श्रवणें ॥ जैसें देखिल्या स्थानीं धांवणे ॥ तैसा तूं गा वहिला सहस्त्रगुणें ॥ अगस्ति महंता ॥१०६॥
जैसा चकोर इच्छी शीतकर ॥ कीं आमोदासी रत मधुकर ॥ कीं स्वातीतोयासी वैरागर ॥ इच्छीत जैसा ॥१०७॥
कीं चातक इच्छी वरुण ॥ कीं कुमुदिनी इच्छी अत्रिनंदन ॥ तैसा तूं शिवकथेसी श्रवण ॥ अर्पी अगस्ती ॥१०८॥
शिवदास गोमा मंदमती ॥ साक्षेपें प्रार्थीत श्रोतयांप्रती ॥ योगिनी प्रवेशल्या अविमुक्तीं ॥ ते कथा परिसा पुढें ॥१०९॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते शिवकाशीविरह योगिनीकाशीप्रवेशवर्णन नाम चतुश्वत्वारिंशाध्यायः ॥४४॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥श्रीरस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP