काशी खंड - अध्याय ३५ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥
मग पाताळकंद म्हणे गा गर्वाचारी ॥ परियसें ब्रह्मयाची बरोबरी ॥ गलित झालियावीण शरीरीं ॥ नुपजे ज्ञान ॥१॥
जव भेटेना निर्गुण श्रीगुरु ॥ तंववरी नाहीं ज्ञान अधिकारु ॥ अवस्था भ्रमित नाहीं जीं स्मरु ॥ आत्महिताचा पैं ॥२॥
जेव्हां निजतत्त्व ब्रह्म सांपडे ॥ तंव चित्तसरिता धरितां आंखुडे ॥ मग कल्पनाकीराचां मौळी पडे ॥ मंद दिसे अपायचि ॥३॥
तेणे फिटे मायेचा अंधार ॥ मग प्रपंच होय निजाकार ॥ जंव असे मनीषेचे भुलार ॥ तंवचि ब्रह्म असाध्य ॥४॥
इतुकी पाताळकंदाची बोली ॥ ते हरीनें श्रवणीं परिसिली ॥ मग कांहीं एक तत्त्वें झाली ॥ त्वरा गमनाची ॥५॥
मग जवळी बैसला नारायण ॥ क्रमितां झाला बहुखेदें क्षीण ॥ पाताळकंद म्हणे तूं कोण ॥ किमर्थ केलें आगमन ॥६॥
मग बोलला नारायणा ॥ माझें नाम तरी इच्छाविष्णू जाण ॥ आम्हां ब्रह्मया झाला पण ॥ चरण मुकुट पाहावया ॥७॥
ब्रह्मा गेलासे नभमंडळी ॥ आम्ही क्रमीत आलों पाताळीं ॥ बहु खेद जाहाला जी या स्थळीं ॥ येतां येतां आम्हांतें ॥८॥
आतां येथोन्नि शिवाचिया पादुका ॥ असती योजनसंख्या कितीएका ॥ मग त्या षाताळकंदविनायका ॥ न सांवरेचि हास्यवदन ॥९॥
पाताळकंद म्हणे गा मार्गस्था ॥ कोण तूं यथार्थ सांग आतां ॥ येरु म्हणे मे महाविष्णु क्रमितां ॥ शिणलों येतां पाताळीं ॥१०॥
तंव बोलिला पाताळकंदगणु ॥ म्हणे तूं कोण महाविष्णु ॥ हें परिसोनि नारायणु ॥ आश्चर्य करी थोर पैं ॥११॥
म्हणे हा काय वदला वचन ॥ मज म्हणतसे महाविष्णु कोण ॥ त्रैलोक्यामध्यें नारायण ॥ कितीएक असती ॥१२॥
मग पाताळकंद म्हणे गा श्रीहरी ॥ तुज क्रमितां दिन येथवरी ॥ ते संख्यासंवत्सर झडकरी ॥ कथीं मजपुढां ॥१३॥
मग वदता जाहाला कौस्तुभकंठी ॥ मज क्रमितां या पाताळपुटीं ॥ युगसंख्या झाली लक्षकोटी ॥ पाताळकंदगणा ॥१४॥
तंव बोलिला पाताळकंदगण ॥ शिवाचिया पादुकांचें दर्शन ॥ हें त्रिभुवनीं अगम्य भाषण ॥ हरि वृथा कां शिणसी तूं ॥१५॥
इतुकीं युगें क्रमितां संकटीं ॥ आलासी एक ब्रह्यांडपोटीं ॥ ऐसीं ब्रह्मांडे अनंतकोटी ॥ असती चरणीं शिवाचें ॥१६॥
मज देखतां कोटि नारायण ॥ गेले शिवाचे पाहावया चरण ॥ गेले मज अमान्य करुन ॥ ते नाहीं आले पुनरपि ॥१७॥
ते म्यां देखिले मागीं जातां ॥ परी दृश्य झाले नाही येतां ॥ यानंतर देखिला येतां आतां ॥ तूं एक नारायण ॥१८॥
इतुके विष्णु देखिले म्यां दृष्टी ॥ तुजसहित संख्या झाली कोटी ॥ तैसा मी बैसलों पाताळपुटीं ॥ शिवाचिये चरणध्यानीं ॥१९॥
तरी तुम्हांसी नाहीं अनुग्रहो ॥ आणि विश्वंभरासीं करितां द्रोहो ॥ म्हणोनियां क्षय पावतां पहा हो ॥ ब्रह्मा हरि निश्चयें ॥२०॥
आणि तुम्हांसी नाहीं गुरुमंत्र ॥ अमान्य करितां वेदशास्त्र ॥ यास्तव पडिलें मोहनास्त्र ॥ महदादीचें तुम्हांसे ॥२१॥
मग हरीनें स्मरिला विचारु ॥ मज दीजे जी पूर्ण मंत्रवरु ॥ तेणें मी होईन दास किंकरु ॥ शिवचरणांचा पैं ॥२२॥
दृष्टी पडतां पाताळकंदाची ॥ मौनता विध्वंसिली विष्णूची ॥ मग त्या पाताळकंद गणाची ॥ आरंभिली स्तुती ॥२३॥
पराभविलें मौन मायेचें ॥ प्रकटलें अधिकत्व ज्ञानाचें ॥ म्हणे निरुपा जी दास्य शिवाचें ॥ भावपूर्वक भज पैं ॥२४॥
ते वेळीं पातालकंद गणेश्वर ॥ विष्णूसी देत अभयवर ॥ मग कथिता झाला विश्वंभर ॥ गुणगांभीर्य शिवाचें ॥२५॥
अनंत ब्रह्मांडे जयाचा पसार ॥ तो कवणासी लक्षवे जगदीश्वर ॥ जैसा देखिजे महाथोर ॥ बीजामध्यें वटवृक्ष ॥२६॥
तैसा तो सर्वांभूतीं व्यापक ॥ कीं सर्वांघटीं असे एकचि अर्क ॥ कीं जैसा धामीं पावक ॥ असे परी एकरुपें ॥२७॥
पाताळकंद म्हणे गा हरी ॥ तूं आपणां आपण विचारी ॥ यम नियम नसेचि यासरी ॥ भ्रमूं नको सर्वथा ॥२८॥
कैसा त्या विश्वभराचा प्रकाश ॥ जैसें त्रैलोक्यव्यापक एक आकाश ॥ सर्वां घटीं मठी जैसा भास ॥ अगाध अनुपम असे ॥२९॥
सरितांमध्ये गंगा जाण ॥ समुद्रामध्यें क्षीरार्णव पूर्ण । पुरीमध्यें हो निजधाम जाण ॥ काशीपुरी ते ॥३०॥
तैसाचि एक विश्वप्रभू ॥ तो विश्वव्यापक स्वयंभू ॥ ऐसा उपदेशिला पद्मनाभू ॥ पाताळकंदश्रीगुरुनें ॥३१॥
मग हरि म्हणे पातालकंदा ॥ तूं परब्रह्मगोडीचिया स्वानंदा ॥ चतुर्वेदध्वनींच्या पूर्णनादा ॥ विश्वरुप तूचि ॥३२॥
तुम्हां देखतां जी विष्णु कोटी ॥ जे गेले पाताळपुटीं ॥ मागुते नाहीं देखिले दृष्टीं ॥ पुनरावृत्ती ते ॥३३॥
ऐसा तूं अनादि अगोचरु ॥ मज प्राप्त कीजे पूर्ण वरु ॥ श्रीहरीसा दिधल नाभीकारु ॥ पातालकंद गणेश्वरें ॥३४॥
गण म्हणे गा पुरुषोत्तमा ॥ तूं साक्षात शिवाचा आत्मा ॥ सदाशिव पूर्ण आगमा ॥ परात्पर तूं ॥३५॥
मग हरीसी मंत्र दिधला ते समयीं ॥ तेणें शिवपादुका देखिल्या हृदयीं ॥ मग स्तविता जाहाला ते ठायीं ॥ नमस्कार करुनि गणासी ॥३६॥
ऐसा हरीसी झाला पूर्ण वर ॥ प्रसन्न झाला पाताळकंद गणेश्वर ॥ मग हरी आला वेगवत्तर ॥ काळभैरवापाशीं ॥३७॥
स्वामी म्हणे गा अगस्ती ॥ ऐसी विष्णुची फिटली भ्रांती ॥ मग नमस्कारिला तो उग्रमूर्ती ॥ काळभैरव हरीनें ॥३८॥
आतां ब्रह्मा गेलासे नभमंडळीं ॥ मुकुट पाहावया शिवाचे मौळीं ॥ ते कथा परिसतां बहु रसाळी ॥ महादोष नासती ॥३९॥
संख्या पुरली ब्रह्मकल्पासी ॥ नाश होईल विरिंचिदेवासी ॥ ते कथा परिसा अहर्निशीं ॥ श्रोते तुम्ही एकचित्तें ॥४०॥
मग स्वामी म्हणे हे कुंभोद्भवा ॥ स्वर्गमार्ग क्रमितां विरिंचिदेवा ॥ ब्रह्मकल्पसंख्या पुरली तेव्हां ॥ पावला एक स्वर्ग ॥४१॥
थोर खेदें क्षीण जाहाला सृष्टिकर ॥ न त्यागी अभिमानाचा अंगीकार ॥ मग तो श्रोत होऊनियां क्षण एक स्थिर ॥ राहिला ते स्थळीं ॥४२॥
तेथें असती कामधेनु केतकी ॥ त्याहीं देखिला सावित्रीपती ॥ सत्य भाव स्मरोनि चित्तीं ॥ उल्लंघीत नभमंडळें ॥४३॥
मग सृष्टिकराची जनिता ॥ ते त्रिपदा गायत्री जगन्माता ॥ तिणें ओळखिला सृष्टिकर्ता ॥ विरिंचिनाथ पैं ॥४४॥
मग कामधेनु म्हणे विधीसी ॥ कवण मार्ग कोठें क्रमितोसी ॥ येरु म्हणे हरी आणि आम्हांसी ॥ जाहाले असतीपण ॥४५॥
विष्णु गेलासे पादुका पाहावया पाताळीं ॥ आम्ही मुकुट पाहावया नभमंडळी ॥ आतां मुकुटसंख्या आम्हांजवळी ॥ सांगावें किती असे त्रिपदे ॥४६॥
तव बोलिली त्रिपदा जननी ॥ ब्रह्मकल्प जाहला रे येथुनी ॥ तंव तूं आलासी उल्लंघोनी ॥ एक ब्रह्मांड विरिंचिदेवा ॥४७॥
ऐसीं अनंत ब्रह्मांडे मौळी ॥ हरपलीं जयाच्या रोमावळीं ॥ तरी तो असे ब्रह्मांडस्थळीं ॥ तें ब्रह्मांड कोण लक्षी ॥४८॥
ऐसा हा अनंतब्रह्मांडगोळ ॥ सहज जयाचा क्रीडाखेळ ॥ तो विश्वभर जाश्वनीळ ॥ लक्षवे कोणातें ॥४९॥
आम्हां शुद्धि केंची त्या मुकुटाची ॥ वृथाचि कां क्रमितोसी विरिंचि ॥ तेथींची संख्या ब्रह्मकल्पाची ॥ पुरलें आयुष्य तूमचें ॥५०॥
असंख्य ब्रह्मे तया मुकुटा ॥ आम्हांदेखतां गेले या वटा ॥ ते चित्तसरितेचिया तटा ॥ प्रवाहले वोसणें ॥५१॥
आम्ही येथेंचि असों गा तेची ॥ परी पुनरावृत्ति शुद्धि नाहीं तयांचे ॥ यानंतरें तूं एक विरिंचि ॥ देखिलासी आतां ॥५२॥
मग बोलता जाहाला चतुरानन ॥ जरे पुनरपि आम्हां न ये येणें ॥ तरी मुकुट देखावयाकारण ॥ किमर्थ असे पैं ॥५३॥
मग विरिंचि जाहाला चिंतातुरे ॥ म्हणे हरीच आतां होईल थोर ॥ आम्हांसी न जोडेचि पूर्ण वर ॥ श्रेष्ठपणाचा ॥५४॥
मग प्रार्थी तो कामधेनूसी ॥ मी त्रिकाळ जपतों तुजसी ॥ तरी तूं साक्ष होईं आम्हांसी ॥ कामधेनु केतकी ॥५५॥
तंव कामधेनु बोलिली वचन ॥ असत्य साक्ष असे महादूषण ॥ कुंभीपाकीं घालिती यमगण ॥ रौरवादि महादुःखीं ॥५६॥
तंव बोलिला तो सृष्टिकर ॥ तूं त्रिपद अनादि अगोचर ॥ तुज दोषलांछन हें उत्तर ॥ कोणीं अनुवादों नये ॥५७॥
अष्टोत्तरशतें तुज जो स्मरी ॥ ते तूं दोषकाष्ठाची ज्वालालहरी ॥ जैसा चंदनवृक्षाच्या तरुवरी ॥ न बाधे तापज्वर ॥५८॥
तूं महादादिया अगाध ॥ माझिया साक्षी तुज नव्हे बाध ॥ ऐसा ब्रह्मयाचा संसर्गबोध ॥ धडल कामधेनुसी ॥५९॥
मग ते केतकी कामधेनू ॥ विरिंचि आला साक्ष घेऊन ॥ तंव वाम मागीं नारायण ॥ बैसलासे देखिला ॥६०॥
तंव ब्रह्मा झाला थोर क्रोधायमान ॥ म्हणे मी आलों मुकुट पाहून ॥ माझिया साक्षी कामधेनू ॥ इसी प्रश्नावें भैरवा ॥६१॥
म्यां मुकुट देखिला साचार ॥ आतां मी त्रैलोक्यामध्यें थोर ॥ हें सत्य तरी प्रश्नोत्तर ॥ प्रश्नावें कामधेनूसी ॥६२॥
मम भैरव म्हणे त्रिपदेसी ॥ मुकुटदर्शन झालें विधीसी ॥ हें सत्य कीं असत्य आम्हांसी ॥ सत्य करीं निरुपण ॥६३॥
तव बोलिली त्रिपदा वचन ॥ मुकुट देखिला जी विधींने ॥ तेव्हा भैरवासी आलें स्फुरण ॥ महाप्रतापाचें ॥६४॥
आधींचि त्रिपुरारीचा अग्न ॥ त्यावरी घृतें शिंपिले परिपूर्ण ॥ मग तो भक्षितां न लगे क्षण ॥ करीं भस्म पैं ॥६५॥
जैसा प्रळयींचा वडवानळ ॥ क्रोधायमान झाला महाकाळ ॥ कांपो लागला ब्रह्मांडगोळ ॥ धाकें लपाला श्रीहरी ॥६६॥
दक्षिणहस्तीं तुळी त्रिशूळ ॥ नेत्रीं धडाडीत वन्हिज्वाळ ॥ म्हणे हा नव्हे क्षत्रिय कीं दैत्यकुळ ॥ केवीं त्रिशूळें हाणावें ॥६७॥
मग वाम कराचा करुनि प्रहार ॥ नखाग्रीं छेदिलें त्याचें शिर ॥ भूमीं पडिला तो सृष्टिकर ॥ करीं कपाल घेतलें ॥६८॥
मग म्हणे कामधेनूकारणें ॥ असत्य साक्षी वदलीस तेणें ॥ तुझें अपवित्र वदन ॥ जिव्हा होईल सकंटक अमंगल ॥६९॥
तुझा दंड गोमय गोमूत्र ॥ आणि पंचामृत पवित्र ॥ ऐसें तुज घडलें शापसूत्र ॥ होसील नानावर्ण तूं ॥७०॥
तैसेंचि शापिलें केतकीसी ॥ तूं शिवाचें मस्तकीं वर्जिलीसी ॥ सर्वांगी कंटक होतील तुजसी ॥ घडला संसर्ग गायत्रीचा ॥७१॥
ऐसा तेथें झाला जी शापार्थ ॥ क्षया प्राप्त झाला विरिंचिनाथ ॥ तंव प्रकटला समर्थ ॥ त्रिपुरांतक साक्षात ॥७२॥
सवें नंदी मणिमंत ॥ शैलादि गोकर्ण विघ्नहंत ॥ घंटाकर्ण शंख विख्यात ॥ कीर्तिमुख वीरभद्र तो ॥७३॥
एक कोटी चंड वीर ॥ ऐशा गणेसीं आला शंकर ॥ तंव तेथें देखिला सृष्टिकर ॥ प्रेतदशा पावला तो ॥७४॥
चुकतां इष्टदेवांची भक्ती ॥ मग तो मंत्र फिरे त्याचेचिप्रती ॥ ते जैसे भ्रमिष्ट होऊनियां क्षितीं ॥ हिंडती चलुताचित्तें ॥७५॥
मग देहत्यागींचि लीन ॥ ममत्वें जैसें जगत्रय पूर्ण ॥ तैसा प्रेतवत ब्रह्मा देखोन ॥ कृपा आली त्रिनयना ॥७६॥
महामौनें झाला होता पिसा ॥ म्हणोनि पावला प्रेतदशा ॥ हा काळभैरव क्षोभला कैसा ॥ या सृष्टिकरावरी ॥७७॥
मग शिव म्हणे काळभैरवासी ॥ वृथा मारिलें कां अनाथासी ॥ हें ब्रह्महत्यालांछन घडलें तुम्हांसी ॥ सत्य जाण भैरवा ॥७८॥
हें ब्रह्मकपाल तुझे करी ॥ त्यामध्यें अखंड भिक्षा हरीं ॥ आतां त्रिलोकींची तीर्थे करीं ॥ जीं वेदीं प्रसिद्ध ॥७९॥
आतां तुज मी सांगतों संख्या ॥ हे ब्रह्महत्या मागें विकटाक्षा ॥ जेथें होईल इची मृत्युसंख्या ॥ तेथें पडेल कपाल हें ॥८०॥
तंववरी जडिलें असेल करीं ॥ ऐसी आज्ञा करी त्रिपुरारी ॥ मग भैरव निघाला झडकरी ॥ तीर्थयातेकारणें ॥८१॥
कपाल जडलें करस्थळीं ॥ मागें ब्रह्महत्या महाविक्राळी ॥ मग निघाला करावया आंघोळी ॥ तिहीं लोकीचीं तीर्थे ॥८२॥
मग शिव म्हणे शैलादिगणां ॥ वीरभद्र आणि घंटाकर्णा ॥ आपण उठवूं या ब्राह्मणा ॥ विरिंचिदेवासी ॥८३॥
हा करील यागाचा विधी ॥ तेणें स्फुरतील मंत्रसिद्धी ॥ मग होईल त्रैलोक्यामधीं ॥ पुण्याचा मोठा प्रवाह ॥८४॥
शिव म्हणे शैलादिगणां ॥ ब्रह्मयासी दिधलें वेदाननां ॥ तरी वेदांसारिखी जे प्रज्ञा ॥ ते द्यावी यासी कीं ॥८५॥
मग धांविन्नले शिवगण ॥ तत्काळ पावले आनंदवन ॥ त्यांहीं मणिकर्णिकेचें जीवन ॥ आणियेलें तात्कालिक ॥८६॥
मग तें ब्रह्मयांचें कलेवर ॥ त्यावरी शिवें घातले गजाबरं ॥ मग तें मणिकर्णिकेचे नीर ॥ प्रक्षाळिलें शिवमंत्रें ॥८७॥
वीरभद्रें सोडिली अंधारी ॥ भस्मधुळी टाकिली तयावरी ॥ आव्हानिता जाहाला त्रिपुरारी ॥ जीवात्मा विधीचा ॥८८॥
अगस्ति म्हणे स्वामी परियेसीं वाचा ॥ नखाग्रे शिरच्छेद केला ब्रह्मयाचा ॥ तरी ते ते प्रसंगी वीरभद्र कैंचा ॥ जन्मला होता पैं ॥८९॥
तंव षण्मुख म्हणे गा महामुनी ॥ हा संशय न धरीं मनीं ॥ वीरभद्र म्हणसी तरी शतें तीनी ॥ जाहालीं असती ॥९०॥
वीरभद्रें घेतला जी डमरु ॥ केला शिवमंत्राचा उच्चारु ॥ तंव ब्रह्मयाच्या शरीराचे अंकुरु ॥ निघाले चारी ॥९१॥
जैसी गात्रें उभवी कूर्म ॥ तैसी चारी शिरे जाहलीं उत्तम ॥ ऐसा उठविला तो आगमधाम ॥ सृष्टिकर ब्रह्मा ॥९२॥
पहा हीं एक शिराचे साठीं ॥ चारी शिरें प्राप्त करी धूर्जटी ॥ ते वेदासारिखीं मुखवटीं ॥ दिधली त्रिनयनें ॥९३॥
प्रथम होतें एकचि आनन ॥ मग शिवें केले चतुरानन । विरिंची उठूनि शिवस्तवन ॥ करीतसे हृदयीं ॥९४॥
परी ते चतुर्मुखे कैसीं कैसीं ॥ जीं शिवें प्राप्त केलीं विधीसी ॥ उत्पत्ति जाहाली ब्रह्मयासी ॥ शिवमंत्रविभूतीनें ॥ ॥९५॥
भ्रांतपण शरीरीं पालटलें ॥ मग विधीनें शिवासे देखिलें ॥ दिव्य शरीर ब्रह्मयाचें जाहालें ॥ शिवाचेनि स्पर्शे ॥९६॥
मग विरिंचिनाथ बद्धकरेसीं ॥ स्तविता जाहाला शिवासी ॥ भ्रांति सांडूनि पूर्वागमासी ॥ सुचित्त ब्रह्मा जाहाला ॥९७॥
सद्नदित जाहालें कंठनाळ ॥ ऊर्ध्वमुख दाटलें रोमांचकुळ ॥ चक्षूसी प्रवाहे आनंदजळ ॥ विरिंच्चिदेवाचे ॥९८॥
तेणें कंप न सावरेचि शरीरीं ॥ चतुर्मुख ब्रह्मा प्रेम सांवरी ॥ स्वेद उद्भवला पूर्ण शरीरीं ॥ अंबुनिधी सात्त्विक ॥९९॥
मग उभा राहोनि सृष्टिकर ॥ तेणें नमस्कारिला शंकर ॥ म्हणे शिवा आम्ही तुझे आज्ञाकर ॥ करीतसों सृष्टी ॥१००॥
जयजयाजी विश्वात्मा शंकरा ॥ मी परम अपराधी हरा ॥ मज क्षमा करी विश्वंभरा ॥ अन्यायी भृत्य रंक मी ॥१०१॥
तुम्हांसी निंदिलें म्यां आननें ॥ तें अस्त्रें तुटलें माझें अनन ॥ प्रायश्चित्त घेतलें माझे शरीरप्राणें ॥ दिधलें काळभैरवें स्वहस्तें ॥१०२॥
माझिया शरीरीं क्रोधगर्वै ॥ बरवें दंडिलें काळभैरवें ॥ आतां निर्व्याधि केलें सदाशिवे ॥ आपुलेनि सामर्थ्ये ॥१०३॥
तुझिया नेत्रींचा जो ज्वाळ ॥ तो त्रिभुवन दग्धी वडवानळ ॥ महाकाळाचे कंठीं त्रिशूळ ॥ घालिसी देवा तूं ॥१०४॥
तूम परात्पर विश्वंभर ॥ तूं अगम्य तुझा न कळे पार ॥ अनंत ब्रह्मांडांसी तुझा आधार ॥ अत्ते जी स्वामिया ॥१०५॥
शिवा तूं सर्वांचा जीवात्मा ॥ तूं अविनाश अभंग अनामा ॥ तूं संहारिता जी सृष्टिकर्मा ॥ न लागतां वेळ ॥१०६॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश ॥ तरणि तारापति सरिताधीश ॥ यामध्यें तुझा मनोरथ महेश ॥ एकचि जाणता ॥१०७॥
म्हणोनि घातलें लोटांगण ॥ म्हणे तूं सर्वकार्यकारण ॥ आतां माझे मनोरथ पूर्ण ॥ न होती तुजवांचूची ॥१०८॥
ऐसा स्तविला त्रिनयन ॥ विरिंची केला चतुरानन ॥ तरी तीं मुखें कोन कोण ॥ परिसा ब्रह्मयाचीं ॥१०९॥
दर्दुरमुखें जपतसे ऋग्वेद ॥ अश्वमुखें जपतसे यजुर्वेदाचे छंद ॥ श्वानमुखें उच्चारी शब्द ॥ सामवेदाचा ॥११०॥
अथर्वणवेद जंबुकवदनें ॥ ऐसीं विधीसी केलीं चतुराननें ॥ ब्रह्मकल्पांतीं मागुती त्रिनयन ॥ उठवील ब्रह्मा ॥१११॥
ऐसा हरिविधींचा वाद ॥ भ्रांति फेडोनि केलें निर्विवाद ॥ तंव अगस्तीनें प्रार्थिला स्कंद ॥ स्वामी कार्तिकेय जो ॥११२॥
ब्रह्महत्या घडली भैरवासी ॥ तो कैसा निघाला तीर्थयात्रेसी ॥ कैसी निवृत्ति केली त्या कर्मासी ॥ ब्रह्महत्येचिया ॥११३॥
षण्मुख म्हणे गा कुंभोद्भवा ॥ब्रह्महत्या घडली काळभैरवा ॥ मग वंदोनि सदाशिवा ॥ निघाला तीर्थयात्रेसी ॥११४॥
प्रथम क्रमिलें पातालविवरीं ॥ मग तो पाताळींची तीर्थे करी ॥ महालिंग हाटकेश्वरीं ॥ आला भैरव पैं ॥११५॥
तेथें महातीर्थ भोगावती ॥ हाटकेश्वरलिंग पशुपती ॥ तेथें शेष्नागादिक पूजिती ॥ अमृतजळें ॥११६॥
त्या भोगावतीसी केलें स्नान ॥ हाटकेश्वरीं केलें पूजन ॥ पाताळींची तीर्थ संपूर्ण ॥ केलीं त्या काळभैरवें ॥११७॥
मग तो निघाला स्वर्गमंडळासी ॥ ऊर्ध्व क्रमिता झाला काशी ॥ तो गगनोदरींचिया तीर्थासी ॥ स्नानें करिता जाहाला ॥११८॥
तों नभंडळीं तारकेश्वरु ॥ विरिंचीनें स्थापिला तो विश्वंभरु ॥ तेथें आला पूजाविधि करुं ॥ काळभैरव तो ॥११९॥
तेणें स्नान केलें मंदाकिनीसी ॥ जियेनें उद्धरिलें ब्रह्मादिकांसी ॥ तेथें पूजोनियां तारकेश्वरासी ॥ मग निघे तेथोनियां ॥१२०॥
मग तो निघाला वैकुंठासी ॥ मागें ब्रह्महत्या महाराक्षसी ॥ हस्तीं कपाल बहुत्वरेंसीं ॥ आलासे विष्नुभुवना ॥१२१॥
तंव हरीनें देखिलें दुरोनी ॥ मग सिंधुजेसी वदे चक्रपाणी ॥ आम्हांसी जाहाली होती भुलवणी ॥ महदादिमायेची ॥१२२॥
मग आम्हीं आणि त्या सृष्टिकरें ॥ विवाद क्रमिला परस्परें ॥ मग भ्रांति फेडिली त्या विश्वंभरें ॥ विश्वरुप शिवें दाविलें ॥१२३॥
तो पैल येतसे त्रिशूळधरु ॥ जो क्षराक्षर सबराभरु ॥ तो विश्वनाथ परमेश्वरु ॥ चाले वेगीं अभिवंदन ॥१२४॥
तंव कमळजा वदे श्रीहरीसी ॥ हा जरी अगोचर वेदशास्त्रांसी ॥ कोटि जन्म पुण्य कीजे जपतपराशी ॥ तैं गम्य हा महेषू ॥१२५॥
आपुलें तपसामर्थ्य संपूर्ण ॥ सुफळ आपुला जी जन्मदिन ॥ जें हे स्वरुप जाहालें पावन ॥ पूर्वभाग्यें पुरुषोत्तमा ॥१२६॥
सुफळ जी आपुलें तप यज्ञ ॥ तो उदय पावलासे पूर्णब्रह्म ॥ कीं सहस्त्रकमळीं पंचानन ॥ प्रत्यहीं पूजिला होता पूर्वी ॥१२७॥
यास्तव कीजे योगाभ्यास ॥ देहदमन महाअरण्यवास ॥ तो दृश्य जाहाला परमपुरुष ॥ सहज ये काळीं ॥१२८॥
सिंधुजा म्हणे गा मुरारिस्वामी ॥ हे मूर्ति पूजिजे बहुतां नेमीं ॥ भाग्येंविण परीस जोडे धामीं ॥ तरी कायसा यत्न कीजे ॥१२९॥
भक्तीविण देव ये घरासी ॥ तपेंविण जाइंजे कैलासीं ॥ तरी सामर्थ्य जी हृषीकेशी ॥ अनुपम कीं ॥१३०॥
ऐसें ते सिंधुजेचें वचन ऐकून ॥ हृदयीं तोषला नारायण ॥ इतुके समयीं विष्णुभवन ॥ पावला भैरव तो ॥१३१॥
मग ती सिंधुजा नारायण ॥ उभयताम ठाकलीं पूजा घेऊन ॥ कैसा पूजिला तो पंचानन ॥ लक्ष्मीनारायणें ॥१३२॥
हरि चरण चुरी मोकली भार ॥ श्याम तमालनील पीतांबर ॥ कंठीं वैजंयती असे सुंदर ॥ कपाळीं मृगमदतिलक पैं ॥१३३॥
कनककमंडलू घेतला करीं ॥ पूर्ण आथिला मंदाकिनीनीरीं ॥ सुवर्णकमलमाळा हरी ॥ अष्टगंधेसीं उभा पैं ॥१३५॥
ऐसी उभयतां भावें पूर्णा ॥ भैरवासी केली प्रदक्षिणा ॥ पुढती लागोनियां चरणां ॥ स्तवितीं झालीं तयासी ॥१३६॥
करीं घेऊनि अष्टगंधें ॥ नाना रत्नें मुक्तें अविधें ॥ कामधेनूची पंचामृतें शुद्धें ॥ तृप्त केला भैरव ॥१३७॥
मग हरि म्हणे जी परमपुरुषा ॥ तूं अनाथाचिया पूर्ण ईशा ॥ तूं आमुचिया भक्ती महेशा ॥ अंगिकारीं यथोक्ता ॥१३८॥
जी सुवर्णकमळें दिव्यदेठीं ॥ ते माळा घातली भैरवाचें कंठी ॥ मधुपर्क केला कनकतार्टी ॥ शुद्ध भावें कमळजेनें ॥१३९॥
तो ओगरिला हस्तकपालीं ॥ मुकुट वंदी सिंधुजावाळी ॥ म्हणे युगानुयुगीं चंद्रमौळी ॥ प्राप्त कीजे दास्य आपुलें ॥१४०॥
मग सिंधुजा आणि मुरारी ॥ चरण स्पर्शिला मौळीवरी ॥ मग स्तुति करिता झाला हरी ॥ काळभैरवाची ॥१४१॥
म्हणे जयजयाजी भूतेशा ॥ निजस्मरणहृदयभासा ॥तूं परब्रह्म गुणविशेषा ॥ उग्रमूर्ती तूं ॥१४२॥
जयजयाजी तुमचे नामस्मरणें करुन ॥ सहस्त्र ब्रह्महत्या होती दहन ॥ तुज ब्रह्महत्या हे संपूर्ण ॥ आश्चर्य थोर पां ॥१४३॥
तूं सर्व सृष्टीचे जीवनमूळ ॥ तूं लिंगाकार सूक्ष्म स्थूळ ॥ तूं ब्रह्मांडभरित जी सकळ ॥ भरोनि उरलासी ॥१४४॥
तुझें मी कैसें करु स्तवन ॥ तुझे मुकुटी गंगाजीवन ॥ तूं अकळ जी ब्रह्म निर्गुण ॥ अगम्य रुप तुझें पैं ॥१४५॥
म्हणोनि लक्ष्मीनारायण ॥ साष्टांगें वदिते जाहाले चरण ॥ मग बोलिला प्रतिवचन ॥ काळभैरव हरीसी ॥१४६॥
मग भैरव म्हणे लक्ष्मीपती ॥ मी तृप्त जाहालों तुझिया भक्तीं ॥ तुज समर्पिली अद्भुत शक्ती ॥ महादैत्य दंडावया ॥१४७॥
जयप्राप्ति तुज सर्व युद्धीं ॥तुज ओळंगती सर्व सिद्धी ॥तुज म्यां केलें त्रैलोक्या आधीं ॥ कमळजेसहवर्तमान ॥१४८॥
ऐसा विष्णूसी वर देऊनी ॥ मग भैरव निघाला तेथुनी ॥ त्यामागें देखिली दीर्घध्वनी ॥ ब्रह्महत्या राक्षसी ॥१४९॥
ते कैसी देखिली हरिलक्ष्मीनें ॥ महाविकटाक्षी कृष्णवर्ण ॥ बाबरझोटिया विक्राळ वदन ॥ महाराक्षसी ते ॥१५०॥
नरमुंडांचीं कुंडलें श्रवणीं ॥ कंधरीं मुंडमाळा महापात्रपाणी ॥ शैलाची दरी ऐसी नयनीं ॥ महाधुमाड हातीं ॥१५१॥
ऐसी ते ब्रह्महत्या निशाचरे ॥ त्या भैरवामागें दीर्घशरीरीं ॥ तंव विष्णूनें धरिली पदरीं ॥ उभी केली क्षण एक ॥१५२॥
मग हरि म्हणे तूं कोण ॥ ह्यामागें भ्रमसी किंकारण ॥ कैसा तुझा भाव तूं कोण ॥ सांगें मजला झडकरी ॥१५३॥
तंव बोलली ते महाविकटाक्षी ॥ जे पर्वतातुल्य कपाटचक्षी ॥ महादीर्घध्वनीचा शब्द मुखीं ॥ आव्हानिती झाली ॥१५४॥
विकटाक्षी म्हणे गा नारायणा ॥ माझें नाम ब्रह्महत्या जाणा ॥ मी शिवाचिया आज्ञा प्रमाणा ॥ वर्तत असें सर्वकाळ ॥१५५॥
मी महादोषी अपराधिनी ॥ यमपुरीची वेल्हाळिणी ॥ मी पंचमहादोष भोगोनी ॥ राहें त्रैलोक्यमंडळीं या ॥१५६॥
मज हाकारिलें पशुपती ॥ हा महाकाळ दाखविला उग्रमूर्ति ॥ म्हणे तूं यासंगें पावसी मुक्ती ॥ उद्भरसी ब्रह्महत्ये ॥१५७॥
मग यासंगे करीतसे गमन ॥ परी हा महाकाळमूर्ति कवण ॥ यासंगें करितां भ्रमण ॥ नेणवे मजलागीं ॥१५८॥
मग शिवाचे आज्ञेसहित ॥ या महाकाळासवें भ्रमत ॥ याजवळी असे सायुज्य मुक्त ॥ ऐसें बोलती वेदशास्त्रें॥१५९॥
ऐसें निरुपिलें त्रिनयनें ॥ परिसिलें लक्ष्मीनारायणें ॥ मग तियेसी आज्ञा करुन ॥ प्रहारिली ब्रह्महत्या ॥१६०॥
मग ते भैरवामागें डाकिनी ॥ त्वरावंत धांवे महापापिणी ॥ मग तो आला मृत्युभुवनीं ॥ तत्काळ काळभैरव ॥१६१॥
मग मृत्युलोकीचीं तीर्थे स्नानें ॥ समस्त केलीं भूतेशानें ॥ तरी तीं आतां कवण कवणें ॥ परियेसीं गा अगस्ती ॥१६२॥
प्रथम आला तो केदारेश्वरी ॥ रेतकुंडी स्नानाविधि करी ॥ मग तो आला ओंकारेश्वरी ॥ नर्मदेच्या संगमीं ॥१६३॥
तों नर्मदासंगमी कावेरी ॥ तेथें तूप करितो गर्ग आचारी ॥ मग भैरव पूजा विधीनें करी ॥ ओंकारेश्वराची ॥१६४॥
मग निघाला झडकरी ॥ क्रमिलें क्षिप्र गंगेचे तीरीं ॥ अवंतिका नाम महापुरी ॥ पूजिला महाकाळेश्वर ॥१६५॥
मग भैरव निघाला तेथूनी ॥ वेगे आला ब्रह्मगिरि टाकूनी ॥ तेथें पूजिला तो शूळपाणी ॥ त्र्यंबकधारी जो ॥१६६॥
तेथूनि निघाला झडकरी ॥ आला आंवढ्यानागनाथेश्वरीं ॥ तेथें पूजाविधी भैरव करी ॥ मग निघे तेथूनियां ॥१६७॥
आलासे बाळ कामिकावनीं ॥ तेथें लिंग स्थापिलें शैलनंदिनी ॥ तो भैरवें पूजिला पंचाननी ॥ घृष्णेश्वर तो ॥१६८॥
मग निघाला वेगवत्तर ॥ परळीं पूजिला वैजनाथेश्वर ॥ भिवरेतीरींचा भीमाशंकर ॥ पूजिला तो भैरवें ॥१६९॥
मग क्रमिता जाहला तेथूनी ॥ समुद्रीं आला सेतुबंधस्थानी ॥ तेथें पूजिला तो शूळपाणी ॥ रामेश्वर लिंग पैं ॥१७०॥
मग निघाला त्वरावंत ॥ पावला तो लिंगपर्वत ॥ तो समर्थ भवानीकांत ॥ मल्लिकार्जुन जो ॥१७१॥
तेथें पाताळगंगेचें आवरण ॥ प्रदक्षिणा चौर्यायशीं योजन ॥ तेथें सारिलें पूज्यपूजन ॥ काळभैरवें ॥१७२॥
प्रदक्षिणा करुनि गिरीची ॥ विधीनें पूजा सारिली शंभूची ॥ ऐसीं दर्शनं घेऊनि लिंगाचीं ॥ निघता जाहाला ॥१७३॥
उभा राहोनी पूर्वद्वारीं ॥ मग तो महाकाळ मानसीं विचारी ॥ म्हणे जी श्रेष्ठ लिंगें पृथ्वीवरी ॥ तितुकीं पूजिलीम्यां ॥१७४॥
परी क्षयो नव्हे ब्रह्महत्येसी ॥ मग तो भैरव विचारी मानसीं ॥ एक राहिलें असे पृथ्वीसी ॥ आनंदवन क्रमावें ॥१७५॥
त्रिपुरांतक तेथींचा निवासी ॥ ते नाहीं घडली मज काशी ॥ मग संकल्प धरोनि मानसीं ॥ उठावला आकाशीं तो ॥१७६॥
निघाला योगमार्गे क्रमीत ॥ त्या आनंदवना आला त्वरित ॥ तंव देखिलें तें अकस्मात ॥ पंचक्रोशीस्थान ॥१७७॥
त्रैलोक्यतीर्थे करितां भ्रमण ॥ जो वियोग जाहाला होता पूर्ण ॥ तो शांत झाला देखोनि जीवन ॥ स्वर्गसरितेचें ॥१७८॥
देखोनियां आनंदवन काशी ॥ महाकंप सुटला ब्रह्महत्येसी ॥ जैसी प्लवंगमी गर्भ शरीरासी ॥ न सांभाळी वृद्धपणी ॥१७९॥
वातस्पर्शे झेंपावें तरुवर सकळ ॥ मग वृक्षीचें गळे पक्क फळ ॥ तैसें गळालें ब्रह्मकपाल ॥ भैरवकरींचे ॥ १८०॥
त्या ब्रह्मकपालासरसी विशाळी ॥ ब्रह्महत्या गळालीं गंगाजळीं ॥ ते पराभवला सप्त पातळी ॥ काशी दृश्य झालिया ॥१८१॥
तें कपाल पडलें गंगानीरीं ॥ पराभविलें पातालविवरीं ॥ जैसें नक्षत्र रिचवे पृथ्वीवरी ॥ आकाशाहूनि अकस्मात ॥१८२॥
ब्रह्महत्येचें महापातक ॥ तें पराभवी गंगोदक ॥ म्हणोनि गर्जना केली कौतुक ॥ दीर्घध्वनी भैरवें ॥१८३॥
तो शब्दनाद न समाये त्रिभुवनीं ॥ कोंदला असे महासघन होऊनी ॥ ब्रह्महत्या गेली रे म्हणोनी ॥ या काशीस्थळीं पैं ॥१८४॥
स्वामी म्हणे गा कुंभोद्धवां ॥ त्रैलोक्य तीर्थ करितां भैरवा ॥ परी ब्रह्महत्या न जायेचि गांवा ॥ क्षयाचिया पैं ॥१८५॥
म्हणोनि कुंभजा तें काशीस्थान ॥ मी किती वाखाणूं समर्थगुण ॥ तेथें पंच महादोषदहन ॥ होतसे दर्शनमात्रें ॥१८६॥
मग भैरवें केलें गंगास्नान ॥ विश्वनाथासी केलें अभिवंदन॥ मग आरंभिलें अनुष्ठान बहुतां नेमेंसी ॥१८७॥
अष्ट लक्ष संवत्सर ॥ अनुष्ठान केलें जी अपार ॥ मग प्रकटला तो शंकर ॥ त्रैलोक्यनाथ कृपाळू ॥१८८॥
भैरवाची देखोनि तपःशक्ती ॥ त्यासी अनुवादला पशुपती ॥ तुझिया दोषांची जाहाली निष्कृती ॥ फिटलिया ब्रह्महत्या ॥१८९॥
आतां तुज दिधलें वरदान ॥ चौसष्ट कोटी माझे प्रियगण ॥ त्यांचें आधिपत्य तुजकारण ॥ समर्पिलें भैरवा ॥१९०॥
तूं अधिपती इतुकिया गणांचा ॥ रक्षपाळ होई काशीपुरीचा ॥ तेथें दोष फेडोनि पुण्याचा ॥ पर्वत जोडिजे ॥१९१॥
तेथें पंचक्रोशीचें असे प्रमाण ॥ अष्ट दिशां कोणीं असावे गण ॥ माझी आज्ञा असे ज्यांकारण ॥ तो आणावा काशीमध्यें ॥१९२॥
ऐसा वर झाला भैरवासी ॥ म्हणोनि राहिला तो वाराणशीसी ॥ स्वामीं म्हणे मुनि अगस्तीसी ॥ परियेसीं गा फलश्रुती ॥१९३॥
ऐसें हें कालभेरवाचें आख्यान ॥ जयासी होय श्रवण पठन ॥ तरी त्यासी घडेल दर्शन ॥ द्वादश ज्योतिर्लिगांचें ॥१९४॥
अग्रपूजां करावी भैरवसी ॥ मग पूजावा तो काशीनिवासी ॥ ऐसा वर असे कालभैरवासी ॥ विश्वनाथाचा ॥१९५॥
ऐसें हें कालभैरवाचें आख्यान ॥ जयासी एकाग्र होय श्रवण पठन ॥ त्याचें निवारे महाविघ्न ॥ ते होती महासुखी ॥१९६॥
जे नित्य स्मरती भैरवासी ॥ ते न बांधिजेती काळपाशीं ॥ यमदूत वंदिती तयांसी ॥ दुःखवार्ता नसे तयांचे वंशीं ॥१९७॥
जे परिसती भैरवाचें आख्यान ॥ तयांसी वंदिती यमाचे गण ॥ अगस्तीसी निरुपी षडानन ॥ पुण्यपावन हें ॥१९८॥
व्यास निरुपी शिष्याप्रती ॥ आतां स्वामीसी प्रार्थील अगस्ती ॥ ते कथा परिसावी पुढती ॥ महादोषनाशिना ॥१९९॥
शिवदास गोमा श्रोतयांसी ॥ प्रार्थीतसे बहु आदरेंसी ॥ अगस्ति प्रश्न करील स्वामीसी ॥ ते परिसा पुढें ॥२००॥
इति स्कंदपुराणे काशीखंड भैरवाख्यानं नाम पंचत्रिंशाध्यायः ॥३५॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति पंचत्रिंशाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2011
TOP