काशी खंड - अध्याय १३ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
ऐसें संहारिलें दैत्यकुळ ॥ सिद्धाश्रमीं देव आले सकळ ॥ तंव आलें शिरकमळ ॥ देवांचिया पाठोपाठीं ॥१॥
पंचेचाळीस सहस्त्र योजन ॥ त्या राहूचें पसरलें वदन ॥ वज्रतुल्य विक्राळ दर्शन ॥ काळशूळ ज्यापरी ॥२॥
तो पातला हांव टाकीत ॥ मुख पसरोनियां धांवत ॥ तेणें देव झाले भयभीत ॥ देखोनि शिर राहूचें ॥३॥
मग पुढें झाला तो सुरेश्वर ॥ मागें दिक्पाळादि देवांचे भार ॥ म्हणती करूं या राहूचा संहार ॥ उअला आतां एकचि हा ॥४॥
तंव इंद्रें ताडिला शतबाणीं ॥ ते कडकडां मोडिले दाढे धरूनी ॥ भूमीसी टाकिले तुकडे करूनी ॥ दर्भासारिखे ॥५॥
तंव इंद्रें उभारिला वज्रपाणी ॥ तों राहूनें ताडिला गजवहनीं ॥ विकळ पडला तेव्हा धरणीं ॥ मूर्च्छा येऊनि ते काळीं ॥६॥
ऐसा मांडिला थोर अनर्थ ॥ पडला पडला रे सुरनाथ ॥ मग आडवा आला समर्थ ॥ दैत्यमर्दन प्रतापी ॥७॥
मग धनुष्यासी योजूनि बाण ॥ त्या राहूवरीं योजी नारायण ॥ सुटला तो धनुष्यमुष्टीपासून ॥ काळजिव्हेसारिखा ॥८॥
तो बाण राहूनें धरिला मुखीं ॥ दशनीं पिष्ट केला सुपुंखी ॥ तंव उठावला सहस्त्राक्षी ॥ वज्रपाणी जो समर्थ ॥९॥
क्रोधें वज्र धेऊनियां करीं ॥ शक्र आलासे पुढारी ॥ तंव राहूनें देखिला समोरी ॥ सहस्त्रनयन तो ॥१०॥
राहु म्हणे रे भगलांछनी ॥ केवीं श्रेष्ठ तूं चतुर्दशरत्नीं ॥ दैत्य भुलले मद्यपानीं ॥ संहारिले तुवां ते ॥११॥
अनेक जे संहारिले असुर ॥ त्या दैत्यांचा बंधु मी क्रूर ॥ तुझा फेडावया गर्वभार ॥ आलों जाण भगनेत्रिया ॥१२॥
मग म्हणे तो सहस्त्रनयन ॥ दुखंड केला शर भेदून ॥ आतां उरलासे अर्धप्राण ॥ तो तुझा घेईन येवेळीं ॥१३॥
मग इंद्रें सोडिला अग्निबाण ॥ तेथें चेतला हुताशन ॥ राहु धांविन्नला मुख पसरून ॥ भक्षावया तयातें ॥१४॥
सरसावला इंद्रबाहू ॥ सर्व सुरीं वेष्टिला राहू ॥ जैसा गिरिपाठीं पाहूं ॥ तृणें वेष्टित वैश्वानर ॥१५॥
मग काय करी तो ग्रह क्रूर ॥ श्रवणझडपें ताडिले सुर ॥ जैसा अगस्ति प्राशितां सागर ॥ नलगेचि विलंब तयासी ॥१६॥
मग कोपला वज्रहस्त ॥ तेणें क्रोधें पीडिला तो चतुर्दंत ॥ मग हाणीतसे वज्रघात ॥ सुरनाथ राहूवरी ॥१७॥
राहूचें शिर अगस्ती ॥ वज्र सागर भक्षी ग्रहपती ॥ निःशस्त्री केला तो अमरपती ॥ क्षणमात्रेंकरूनियां ॥१८॥
शक्र पराभविला राहूनें ॥ ऐसें देखिलें नारायणें ॥ मग आयुधें घेऊनि संपूर्णें ॥ निघाला आडवा तयासी ॥१९॥
तेणें गदा घेऊनियां करीं ॥ महाक्रोधें टाकिली राहूवरी ॥ तंव ते पक्व फळाचियापरी ॥ भक्षिली तेव्हां राहूनें ॥२०॥
मग कोपला जी नारायण ॥ तो राहूनें देखिला तृणासमान ॥ मग मोकलिलें सुदर्शन ॥ परमक्रोधेंकरूनी ॥२१॥
राहुमुखींचे दशन ॥ दिसती गिरीश्रृंगासमान ॥ तेणें महाविष्णूचें सुदर्शन ॥ भक्षिलें तेंही सत्वर ॥२२॥
जैसा वज्रेंविण सुरेश्वर ॥ कीं चक्रोंविण शार्ङ्गधर ॥ कीं गायत्रीविण सृष्टिकर ॥ इतुके भ्रष्ट जाण पां ॥२३॥
ऐसा ग्रह देखोनि क्रूर ॥ जेणें घेतलासे पीयूषआहार ॥ म्हणोनि न जिंकवे असुर ॥ ब्रह्मादिकांसी ॥२४॥
थोर खेदें क्षीण झाला श्रीपती ॥ परी न भंगेचि तो ग्रहपती ॥ मग धांविन्नला पशुपती ॥ त्रिशूळेंसीं ॥२५॥
हरी नागविला राहूनें ॥ भक्षिलीं गदा-सुदर्शनें ॥ नारायण तेणें क्षीण ॥ शस्त्राविण झाला असे ॥२६॥
ऐसें देखोनि अन्योन्य ॥ पराभविले सुरगण ॥ मग कोपला तो पंचानन ॥ राहुवरी ते काळीं ॥२७॥
तंव शिवगण धांविन्नले ॥ हा हा म्हणोनि मोकलिती भाले ॥ एकी धनुष्या शर लाविले ॥ विंधिते झाले राहूसी ॥२८॥
मुद्नर त्रिशूल कोयतिया सुरी ॥ एकसरें टाकिती राहूवरी ॥ जैसें सांचलें गिरिवरीं ॥ तृण डोले बहुत ॥२९॥
मग आवेशें राहुमुखें ॥ गर्जना केली महाघोषें ॥ शस्त्रें निवारूनि तवकें ॥ धांविन्नलें सत्वर ॥३०॥
हाणितां श्रवणींच्या झडपा ॥ कीं त्या महाकाळाच्या थापा ॥ पृथ्वीमध्यें करीतसे दडपा ॥ शिवसैन्याचा साटोप ॥३१॥
ते श्रवन न होती पक्ष दोनी ॥ कीं पर्वत आले उडत कोठूनी ॥ शिवसैन्य उडविलें गगनीं ॥ श्रवणाचेनि फडत्कारें ॥३२॥
ऐसा जाणोनि सैन्यांचा कल्पान्त ॥ मग अति क कोपला उमाकांत ॥ म्हणे मारीन हा ग्रह अद्भुत ॥ या रणमंडळीं आतांचि ॥३३॥
मग शर धनुष्या लाविले शंकरें ॥ राहू विंधिला कठिण शरें ॥ मग ते तेणें उडविले ञाणस्वरें ॥ शिवाचे बाण तेधवां ॥३४॥
मग कोपला त्रिनयन ॥ झोंकिलीं सुनाभ त्रिशूळें दारुण ॥ राहूनें विकासिलें मुख संपूर्ण ॥ गिळिलीं दोनी तेधवां ॥३५॥
मग राहू धांवला आवेशून ॥ झडपें ताडिला त्रिनयन ॥ नंदिकेश्वरासहित योजन ॥ एक लोटिला तो शिव ॥३६॥
सुटला भार मोकळिल्या जटा ॥ विध्वसिला विभूतीचा पट्टा ॥ गजांबर आणि सोटा ॥ उडविला तेणें घ्राणघातें ॥३७॥
भयें पळालें इंद्र हरी ॥ ग्रहें नागविला त्रिपुरारी ॥ हा राहू अमरशरीरी ॥ तो अजिंक्य जाण त्रिभुवनीं ॥३८॥
मग कोपला शिव समर्थ ॥ निःशस्त्री उभा ठाकला युद्धार्थ ॥ मग प्रहारूनि शक्तित्वार्थ ॥ आवरिला विचार तो ॥३९॥
म्हणे मजसारिखा शूलपाणी ॥ जो काळासी काळ या त्रिभुवनीं ॥ आज मज जिंकिलें घोर रणीं ॥ राहूनें पुरुषार्थ करूनियां ॥४०॥
ऐसी देवांसी ग्रहें केली व्यथा ॥ आश्चर्य वाटलें जगन्नाथा ॥ आतां पुढें वर्तली कैसी कथा ॥ ते परिसा जी श्रोतेहो ॥४१॥
मग राहसी म्हणे त्रिनयन ॥ तूं शिवभक्त म्हणविसी पूर्ण ॥ तुझिया शक्तीसी त्रिभुवन ॥ न तुळेचि सर्वथा ॥४२॥
आतां माग रे मी तुज प्रसन्न ॥ बळ देखोनि संतोषलें मन ॥ येरू म्हणे माझी शक्ती संपूर्ण ॥ तुझिया कृपेंकरूनी ॥४३॥
परी तुझिया मुखींचा अनुवाद ॥ शिवा तो मागेन प्रसाद ॥ परी तुज मी प्रसन्न हें अगाध ॥ मग रे शंकरा संतोषें ॥४४॥
मी मागेन तें द्यावें मज ॥ तूं मागशील तें देईन तुज ॥ ऐसें वर्तलें महा चोज ॥ त्या रणमंडळामाझारी ॥४५॥
मग राहूसी म्हणे त्रिनयन ॥ तूं जरी झालासी मज प्रसन्न ॥ तरी इंद्राचें वज्र आणि सुदर्शन ॥ विष्णूचेंही देईं गा ॥४६॥
कौमोदकी गदा सुनाभ त्रिशूळ ॥ हीं तुवां द्यावीं हो सकळ ॥ तंव राहूनें दिधलीं उताविळ ॥ शस्त्रें समस्त तीं ॥४७॥
मग बोलिला ग्रह क्रूर ॥ आतां जरी तूं मज प्रसन्न हर ॥ तरी मी मागतों हाचि वर ॥ सोम सूर्य द्यावे मज ॥४८॥
तंव विचारिलें मनीं चतुराननें ॥ सोमसूर्यांसी मागितलें राहूनें ॥ तरी सत्यचि होईल विध्वंसणें ॥ माझिया सृष्टीं ॥४९॥
मग विरिंचि म्हणे राहूसी ॥ सोम सूर्य हे दिधले तुजसी ॥ प्रतिग्राही होऊनि पुण्यासी ॥ न्यावे तुवां गा ॥५०॥
ऐसें ब्रह्मयाचें उत्तर ॥ तें सर्व देवां मानलें साचार ॥ तैंहूनि सूर्य शीतकर ॥ वेधती ग्रहणीं ॥५१॥
राहूचें धड झाला केतु ॥ तो सूर्यपुण्यासी ग्रहणीं नेतु ॥ शिर तेंचि राहु विख्यातु ॥ बाधी चंद्रासी ॥५२॥
ऐसें झालें जेथें समुद्रमथन ॥ त्या वना नाम झालें घोरविपिन ॥ सुरां असुरां धोरांदर पूर्ण ॥ म्हणोनि हें गुणनाम ॥५३॥
देव गेले आपुले स्थानीं ॥ हा वृत्तांत देखोनि नारदमुनी ॥ म्हणे कोठें असेल जननी ॥ तया दैत्याची ॥५४॥
मग आला हिमाचलपर्वतीं ॥ तेथें असती कश्यप-दिती ॥ तियेसी म्हणे तूं काय निश्चिती ॥ दैत्य मारिले इंद्रें ते ॥५५॥
वज्रघातें महादैत्य ॥ अमरनाथें केला निःपात ॥ सोम सूर्य दिक्पती आदि तेथ ॥ समग्र होते ते समयीं ॥५६॥
ऐकोनि कोपली दिती ॥ घोरवना आली शीघ्रगती ॥ पुत्र पडिले देखोनि क्षितीं ॥ करुणाशब्दें आक्रंदे ॥५७॥
वेगें कैसी धांवली दक्षनंदिनी ॥ कीं ते प्रळयमेघींची सौदामिनी ॥ सृष्टि संहारावया पूर्ण जीवनीं ॥ वृष्टी करी जैसी ॥५८॥
सप्त शत कोटी ते ससुर ॥ पडिले जैसे महागिरिवर ॥ अशुद्धें भरला सागर ॥ झाले सरितासंगम अनेक ॥५९॥
तंव नारद म्हणे दितीसी ॥ आतां या शोकसागरीं कां बुडसी ॥ तप आचरोनि उठवीं पुत्रांसी ॥ तरीच सामर्थ्य थोर तुझें ॥६०॥
ऐसें नारदाचें उत्तर ॥ दितीसी मानलें साचार ॥ मग पुत्रशवें अव्हेरूनि सत्वर ॥ निघती झाली कश्यपवनिता ॥६१॥
मग ते आली हिमाचळपर्वता ॥ तप करी कश्यपकांता ॥ अनशनव्रत दक्षदुहिता ॥ घेऊनियां बैसली ॥६२॥
द्वादश सहस्त्र संवत्सर ॥ तपीं बैसली निराहार ॥ तिनें आराधिला शंकर ॥ हैमवतीवर जो कां ॥६३॥
तंव वाचा झाली गगनोदरीं ॥ तेथें प्रकटला त्रिपुरारी ॥ भक्ति पावली वो सुंदरी ॥ द्क्षबाळे ॥६४॥
तुवां केलें जें तपसाधन ॥ तें कोण निमित्त सांग कारण ॥ मग ते वदे प्रतिवचन ॥ दक्षबाळा कौतुकें ॥६५॥
तिनें प्रार्थिला तो त्रिनयन ॥ म्हणे स्वामी मज द्यावें जी पुत्रदान ॥ जो त्रैलोक्य जिंकून ॥ अजिंक्य सर्व देवांसी ॥६६॥
मग वाचे म्हणे हो तथास्तु ॥ तूं पावसी कल्पिला सुतु ॥ आतां प्राथीं आपुला कांतु ॥ रतीरमणीं तो ॥६७॥
मग तिनें कश्यप स्मरिला ॥ तो स्मरणमात्रें पावला ॥ त्यासी विरिंचीनें मंत्र दिधला ॥ तो समर्पिला दितीसी ॥६८॥
मग दिती झाली गरोदर ॥ अवतरला महावीर ॥ तंव संभवला तो समीर ॥ दक्षबाळीच्या जठरीं ॥६९॥
तो वाढतसे बहुतांचा वैरी ॥ ते प्रसूत न होय झडकरी ॥ तो गर्भ धरिला वर्षे सत्तरी ॥ उदरामाजीं तियेनें ॥७०॥
तंव नारद गेला अमरपुरा ॥ मात जाणविली वज्रधरा ॥ म्हणे जी आश्चर्य वर्तलें सुरेश्वरा ॥ मृत्युमंडळामाझारीं ॥७१॥
तुम्हां देवांसी जिंकी ऐसें पुत्ररत्न ॥ हें दितीनें मागीतलें वरदान ॥ तरी आपणांसी रक्षण ॥ कीजे गा सुरेशा ॥७२॥
तो वाढतसे दितीचे उदरीं ॥ गर्भास जाहालीं वर्षें सत्तरी ॥ तो जन्मतां त्रैलोक्यामाझारी ॥ लावील ख्याती ॥७३॥
जों उदरीं असे तो अजून ॥ तों शीघ्र विचारावा प्रयत्न ॥ ऐसें ऐकतां सहस्त्रनयन ॥ दचकला थोर मानसीं ॥७४॥
मग सिंहाचें रूप धरूनी ॥ छिद्र पाहातसे वज्रपाणी ॥ प्रसूत होतांचि गर्भ धरूनी ॥ संहारीन तत्काळ ॥७५॥
रंकाचें रूप धरोनि सुरेश्वर ॥ दितीजवळी आला सत्वर ॥ ती म्हणे तूं कोणाचा किंकर ॥ सांग आतां मजपाशीं ॥७६॥
येरू म्हणे मी अनाथ दीन ॥ जो करील माझें उदरपोषण ॥ त्याचे घरीं मी दास्य करून ॥ राहीन आतां धर्मार्थी ॥७७॥
तंव दितीनें पाहिली वेळ ॥ जवळी आला प्रसूतिकाळ ॥ तरी हा अनाथ बाळ ॥ असावा अति जवळिकें ॥७८॥
तंव आला प्रसूतीचा अवसर ॥ दक्षिणेसी चरण उत्तरेसी शिर ॥ ते ऊर्ध्वमुखें निद्रातुर ॥ निजली असे कश्यपभार्या ॥७९॥
तंव योनिरंध्रें सुरेश्वर ॥ गर्भीं संचरला सत्वर ॥ तंव देखिला तो महाभयंकर ॥ गर्भ दितीचा ॥८०॥
वज्रें ताडिला गर्भपिंड ॥ तेणें घायें केला सप्तखंड ॥ तों बोभाइली प्रचंड ॥ उदरामाजीं ॥८१॥
इंद्र हाणी दुसरा वज्रघात ॥ तंव एकएकाचे झाले सात ॥ ऐसीं खंडें केलीं संख्यागति ॥ एकुणपन्नास तयांचीं ॥८२॥
तंव दिती झालीसे जागृत ॥ जवळी पाहातसे तो रंक दूत ॥ म्हणे याचि वैरियानें निश्चित ॥ अपत्य माझें मारिलें ॥८३॥
म्हणे तो आलिया वज्रपाणी वैरी ॥ त्यासी मारीन घालूनि जठरीं ॥ तंव तिनें स्मरिला श्रीहरी ॥ आणि विरिंची तो ॥८४॥
मग आले विरिंची हरी ॥ त्यांहीं प्रार्थिली दिती सुंदरी ॥ आतां प्रसूत करीं झडकरी ॥ गर्भासी आपुलिया ॥८५॥
तुझा पुत्र हा सुरेश्वर ॥ जो अदितिकश्यपांचा कुमर ॥ मातेसी नाहीं हा विचार ॥ सुष्ट दुष्ट अपत्याचा ॥८६॥
एक होता ते बहुत झाले पुत्र ॥ त्याचें वोढवलें पूर्वसूत्र ॥ आतां त्यांसी देऊं प्रसन्न मंत्र ॥ जे कां इच्छा अपत्याची ॥८७॥
दितीस म्हणे सावित्रीकांत ॥ वज्रें मारिला तुझा गर्भसुत ॥ त्यासी नाम ठेविलें मारुत ॥ सत्य वचन माझें हें ॥८८॥
एकुणपन्नास रूपें तयाचीं ॥ हा गति जाणें त्रैलोक्याची ॥ ऐसी प्रार्थिली ते कश्यपाची ॥ कामिनी दिती तेधवां ॥८९॥
मग तो जन्मला सप्तघात ॥ ब्रह्मा वदे तुझें नाम मारुत ॥ असो त्रिजगीं विख्यात ॥ कश्यपनंदन ॥९०॥
मग मारुत म्हणे ब्रह्मयासी ॥ आतां मी जाईन वाराणशीसी ॥ गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसा जन्मला तो पवन ॥९१॥
मग तो आला आनंदवना ॥ त्या विश्वनाथाच्या भुवना ॥ तेथें आरंभिली तपसाधना ॥ पंचक्रोशीमाजीं ॥९२॥
तेणें स्नान केलें मणिकर्णिकेसी ॥ भावें पूजिता झाला विश्वनाथासी ॥ मग मुहूर्त पाहुनि शिवासी ॥ स्थापिलें लिंगरूपें ॥९३॥
मग मांडिलें अनुष्ठान ॥ निराहारी तपसाधन ॥ अचळ घातलें आसन ॥ स्थान जैसें पृथ्वीचें ॥९४॥
ऐसा दश लक्ष संवत्सर ॥ मारुत बैसला निराहार ॥ तंव पातला भक्तवरदातार ॥ स्वामी विश्वनाथ ॥९५॥
दुर्बळासी द्र्व्याचा लाभ ॥ कीं पडत्या आकाशींचा स्तंभ ॥ तैसा दीननाथ स्वयंभ ॥ पावला तो शंकर ॥९६॥
आलें तपाचें अवसान ॥ झालीं दहा लक्ष वर्षें पूर्ण ॥ मग शिव म्हणे मी झालों प्रसन्न ॥ मागें अपेक्षित मारुता ॥९७॥
तुज दिधला पूर्ण वर ॥ तूं तपियांमाजीं थोर ॥ तुज स्वन्पींही आहार ॥ घडला नाहीं सर्वथा ॥९८॥
मज पूजिले मनोगतें ॥ माझी भक्ति केलीस एकाग्रचित्तें ॥ तपानुष्ठानें देखिलीं बहुतें ॥ परी न देखों तुजसारिखे ॥९९॥
मज पूजिलें दश लक्ष संवत्सर ॥ त्यमध्यें मास दिन एक प्रहर ॥ घटिका पळ साचार ॥ नाहीं झालासी दुश्चित्त ॥१००॥
तुवां मज तोषविलें थोर ॥ म्हणोनि दिघला अभयवर ॥ ऊर्ध्व पाहे मारुतेश्वर ॥ तंव देखिला गजांबरी ॥१०१॥
त्रिशूलधर धृतजटाजूट ॥ भाललोचन नीलकंठ ॥ चंद्रमौळी दैत्यारी उद्भट ॥ त्रिपुरांतक साक्षात ॥१०२॥
मारुत वदे जी महेशा ॥ तूं दीनअनाथांचा धिंवसा ॥ तूं भक्तजनां देसी भरंवसा ॥ युगानुयुगीं ॥१०३॥
मग पवन करिता झाला स्तुती ॥ म्हणे जयजयाजी पशुपती ॥ हें त्रैलोक्य तुझी लीलाकृती ॥ सहज असे जाण पां ॥१०४॥
जो त्रैलोक्यभूगोळ ॥ तूं स्वयें निर्मिसी जाश्वनीळ ॥ काळ आणि महाकाळ ॥ तूं तयांचा संहारक ॥१०५॥
तूं अनादि विश्वपाळा ॥ हें त्रैलोक्य तुझे कंठींची माळा ॥ तयामाजीं मायातंतु आगळा । गोंविलासे ॥१०६॥
नव्याण्णव कोटी वसुंधरा ॥ ते तुमच्या अंगत्वेंचि अवधारा ॥ ज्या वनस्पती भार अठरा ॥ त्या सर्व तुझी रोमावळी ॥१०७॥
जें तुझ्या गात्रीं अस्थिकुळ ॥ ते उद्भवले अष्टकुळाचळ ॥ तुझें जें कां चक्षुमंडळ ॥ तेचि हे सोमसूर्य ॥१०८॥
सप्तपाताळें तुझें चरणीं ॥ आणि मृत्युलोक ह्रदयभुवनीं ॥ एकवीस स्वर्ग जी शूळपाणी ॥ मुकुट तुझा विस्तीर्ण ॥१०९॥
तुझिया स्वेदीं जन्म सागरातें ॥ नाडीपासाव सरिता नव शतें ॥ तुझे मुकुटीं तेज मिरवतें ॥ तेंचि ग्रहनक्षत्रें ॥११०॥
तुझिया प्राणांचे श्वासोच्छासा ॥ तोचि पवन क्रमी दाही दिशा ॥ तुझिया श्रवणांपासाव महाकाशा ॥ सहजचि असे उत्पत्ती ॥१११॥
तुझिया स्वेदें जन्मले स्वेदज ॥ तुझिया अस्थिपासाव जन्मले अंडज ॥ रोमावळीपासाव झाले उद्भिज्ज ॥ रक्तमांसें जारजखाणी ॥११२॥
तुझिया चरणीं झालें शूद्रवर्ण ॥ वैश्य झाले ऊरूपासून ॥ तुझिया मुखीं जन्मले ब्राह्मण ॥ भुजांपासाव क्षत्रिय ॥११३॥
तुमचे मनाचा जो अंकुर ॥ तोचि जन्मला शार्ङ्गधर ॥ ज्याचे नाभिस्थानीं सृष्टिकर ॥ विरिंची अवतरला ॥११४॥
स्थूळ सूक्ष्म जीव अपार ॥ नानावर्ण चराचर ॥ तो तूं साक्षात शंकर ॥ मी वदूं काय अल्पवदनें ॥११५॥
पाहतां अवघें त्रिभुवन ॥ तें तूं एकचि त्रिनयन ॥ म्हणोनि घातलें लोटांगण ॥ मारुतें तैं साष्टांगीं ॥११६॥
तेणें परम संतोषला शंकर ॥ म्हणे तुज दिधला रे पूर्ण वर ॥ तुज केला असे राज्यधर ॥ गंधवतीपुरीचा ॥११७॥
तुज राज्य दिधलें वायुकोणींचें ॥ आणि आधिपत्य गंधवतीचें ॥ तुज नाम ठेविलें साचें ॥ पवन अनिल म्हणोनियां ॥११८॥
तुवां जें लिंग स्थापिलें ॥ आणि यथोक्तभावें पूजिलें ॥ तयासी म्यां नामधारण केलें ॥ पवनेश्वर म्हणोनियां ॥११९॥
मग पवनासी म्हणे शंकर ॥ म्यां घेतला त्रिविध अवतार ॥ करावया त्रैलोक्याचा संहार ॥ महाप्रळयीं ॥१२०॥
कल्पांतीं नाशावया त्रिभुवन ॥ म्यां स्थापिले त्रिवर्ग जाण ॥ माझ्याचि इच्छेंकरून ॥ झाल्या असती त्रिमूर्ती ॥१२१॥
एक कर्दमाचा सुत वरुण ॥ दुसरा वैश्वानराचा कृशान ॥ तिसरा कश्यपाचा कुमर पवन ॥ हे त्रिवर्ग माझा अवतार ॥१२२॥
कल्पान्त होईल त्रिभुवनासी ॥ तैं सर्व रत्नें ठेविती वरुणापाशीं ॥ अष्टधात् नवनिधी अग्नीपाशीं ॥ ठेविती देव ते ॥१२३॥
जे जे त्रिभुवनीं सुगंध जाणा ॥ जे परम प्रिय माझिया मना ॥ ते तुजपाशीं ठेविती रे पवना ॥ महाकल्पांतसमयासी ॥१२४॥
ऐसिया जाणा त्रिमूर्ती ॥ चिरंजीव करी पशुपती ॥ परी त्याही नाशातें पावती ॥ ब्रह्मप्रळयीं सर्वथा ॥१२५॥
मग पवनासी म्हणे पशुपती ॥ जे पवनेश्वरलिंग पूजिती ॥ त्यांसी प्राप्त करीन गंधवती ॥ वायुलोकासी ॥१२६॥
ऐसें हें तव लिंव सगुण ॥ तरी मी येथोंचि असेन ॥ मग तेथेंचि राहिला त्रिनयन ॥ पवनेश्वरीं प्रीतीनें ॥१२७॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसा वर झाला पवनासी ॥ मग स्थापिला गंधवतीसी ॥ पंचाननें तो ॥१२८॥
तो महाराज मारुत ॥ तुज निरूपिला साद्यंत ॥ त्याचा समूळ जो वृत्तांत ॥ इत्थंभूत जाहला तो ॥१२९॥
या अध्यायाची सांगों फलश्रुती ॥ आयुष्याची वृद्धी बहु होती ॥ आणि प्राप्त होय अविमुक्ती ॥ काशीपुरी ते ॥१३०॥
प्रयागीं घडतां माघस्नान ॥ पूर्वजांसी होय स्वर्ग पावन ॥ द्वादशलिंगांचे दर्शन ॥ प्राप्त होय श्रवणमात्रें ॥१३१॥
जो त्र्यंबक पुण्यक्षेत्र ब्रह्मगिरी ॥ तेथें प्रदक्षिणा ज्या अष्टोत्तरी ॥ तें श्रेय होय निर्धारीं ॥ हा अध्याय श्रवणमात्रेंचि ॥१३२॥
कुरुक्षेत्रीं घडे सुवर्णदान ॥ आणि स्वर्गसरितेची शतस्नान ॥ घडती हा अध्याय करितां श्रवण ॥ ऐसें वचन श्रीव्यासाचें ॥१३३॥
आतां सावधान जी श्रीत्तोत्तमा ॥ बद्धांजळी प्रार्थी शिवदास गोमा ॥ पुढारी कथा परिसा निरुपमा ॥ महापवित्र जाणोनियां ॥१३४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे वायुलोकवर्णनं नाम त्रयोदशाध्यायः ॥१३॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
इति त्रयोदशाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 27, 2011
TOP