काशीखंड - अध्याय ४२ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ स्वामी म्हणे ऋषि अगस्ती ॥ ऐसीचि असे ते अविमुक्ती ॥ थोर वियोग जाहाला तुजप्रती ॥ जे चतुर्थ मोक्षदायिनी ॥१॥
अनेक लिंगें असती अन्यत्र स्थळीं ॥ जीं श्रेष्ठ प्रत्यक्षाकार भूतळीं ॥ परी जें सामर्थ्य विश्वेश्वराजवळी ॥ काशीमध्यें पैं ॥२॥
तें नाहीं गा कवण्या लिंगासी ॥ कोटी लिंगें तुळती स्पर्धेसी ॥ तो साक्षात हा कैलासवासी ॥ विश्वंभर ॥३॥
प्रथम निर्मिले काशीस्थान ॥ मग स्थापिला मेरु त्रिभुवन ॥ असके प्रळय गेले होऊन ॥ परी अविनाश काशी ॥४॥
शिवें त्यजूनिया केलास ॥ क्षिती आरंभिला रहिवास ॥ करावया मुक्तीचा प्रकाश ॥ त्रैलोक्यजंतूंसी ॥५॥
असंख्य वनें पृथ्वीमंडळीं ॥ जें सामर्थ्य आनंदवनस्थळीं ॥ याचिया कोटी विभागकाळीं ॥ न तुळती कदाही ॥६॥
कुलाचल सप्तद्वीपावती ॥ सप्तपाताळें नवखंड क्षिती ॥ परी काशीखंडाची जे प्राप्ती ॥ ते कोठेंचि नाहीं ॥७॥
अनंत नगरें पुरिया पट्टणें ॥ सत्यलोक वैकुंठ कैलासभुवनें ॥ परी तींही न तुळती कोटिगुणें ॥ काशीपुरीचिया ॥८॥
सप्तपुर्यांचीं सामर्थ्य अपारें ॥ आणिक ज्या इंद्रपुरीच्या आधारें ॥ परी अविमुक्ति निर्मिली शंकरें ॥ ते अनुपम पैं ॥९॥
गंगा सागर सरिता मेदिनी ॥ तटाक सरोवरें पुण्यजीवनीं ॥ परी जें सामर्थ्य उत्तरवाहिनी ॥ अनुपम अगोचर ॥१०॥
अन्यत्र स्थळीं साधी साधनें ॥ मासव्रतें कृच्छ्र चांद्रायणें ॥ तें फळ गा एकाचि आचमनें ॥ उत्तरवाहिनीचे ॥११॥
अन्यत्र स्थळीं महायाग दान ॥ तुळापुरुष भार देइजे सुवर्ण ॥ तें फळ ये देतां मुष्टि धान्य ॥ अविमुक्तीमाजीं ॥१२॥
अनेक स्थळीं कीजे धूम्रपानविधी ॥ सहस्त्र वरुषें कीजे तपःसिद्धी ॥ द्रव्यदान वेंचिजे एकनिधी ॥ ऐसें घडे सामर्घ्ये ॥१३॥
तरी दोनचि अक्षता गंगोदक ॥ आणि बिल्वपत्रीं पूजिजे त्र्यंबक ॥ तरी हें सामर्थ्य जोडे अधिक ॥ दशगुणें पैं ॥१४॥
म्हणोनि सर्व याग महादान ॥ स्पर्धे न तुळती न्यून ॥ असंख्य अपार काशीचें पुण्य ॥ कवण स्पर्धा करी ॥१५॥
अगस्ती वदे जी षडानना ॥ माझ्या वियोगाग्रीसी पुण्यजीवना ॥ तापस देखोनि सुरगीर्वाणां ॥ उपजे खेद ॥१६॥
आपुलें कार्य धरोनियां चित्तीं ॥ मिळाले दिक्पाल सुरपती ॥ मज अनाथासी केली विपत्ती ॥ पराधीन म्हणोनि ॥१७॥
शिव जो घातला काशीबाहेरी ॥ वियोगें पीडिला त्रिपुरारी ॥ तरी ऐसा त्रैलोक्यामाझारीं ॥ कवण समर्थ ॥१८॥
तंव स्वामी म्हणे कुंभोद्भव ॥ तुज वियोग जाहाला विंध्याद्रीस्तव ॥ तैसा वियोगी पडला महादेव ॥ मंदराचळास्तव पैं ॥१९॥
तैं विरिंचीनें शंकर प्रार्थिला ॥ मग तो मंदराचळासी गेला ॥ तैं काशीचा वियोग प्रवर्तला ॥ विश्वनाथासी ॥२०॥
अगस्ती वदे जी शिवनंदना ॥ विधीनें कैसें प्रार्थिलें पंचानना ॥ आणि कवणिया कारणा ॥ तें सांगावें आम्हांसी ॥२१॥
षण्मुख म्हणे गा अगस्तीं ॥ कवण एक समयाचे अंतीं ॥ अवर्षण पूर्ण झालें क्षितीं ॥ साठ संवत्सरपर्यंत ॥२२॥
दुष्ट राजे वर्तले पृथ्वीमंडळीं ॥ अधर्माची प्रवृत्ति जाहाली भूतळीं ॥ तेणें वरुण झालासे निर्जळी ॥ साठ वरुषें पैं ॥२३॥
साठ वर्षे झाली अनावष्टी ॥ तेणें संपली ब्रह्मयाची सृष्टी ॥ अन्नआहारी जे पृथ्वीतटीं ॥ ते पावले क्षयातें ॥२४॥
राहिलीं जप तप नेम व्रतें ॥ संपलीं यागकार्ये यज्ञहुतें ॥ महागंगेचीं जळें समस्ते ॥ जाहालीं अदृश्य पैं ॥२५॥
पृथ्वीसीं जल न दिसे दृष्टी ॥ एक धुंडिताती महागिरिकुटीं ॥ तंव तेथें देखती गा आंगिठी ॥ शुष्क वनस्पतींची ॥२६॥
सर्व जंतु गेले समुद्रतीरीं ॥ तंव अल्प जळ होतें सागरीं ॥ तें अति कोदलेंसे जलचरीं ॥ मत्स्यच्छादिकीं ॥२७॥
तेथें मत्स्यआहारी जे लोक ॥ त्यांहीं भक्षिले जळचरादिक ॥ ते चिरंजीव जाहाले नावेक ॥ पंचदश वरुषेंवरी ॥२८॥
मग समुद्रीं जाहालें अल्प नीर ॥ मग महामत्स्य अतिक्रूर ॥ त्यांहीं भक्षिले सूक्ष्म जलचर ॥ मानवियांचा जाहाला क्षयो ॥२९॥
संपलिया सर्व सुगंधजाती ॥ दुर्गंधी उद्भवल्या बहुती ॥ श्वापद मानव संपले क्षितीं ॥ पृथ्वी जाहाली स्मशान ॥३०॥
पृथ्वीमध्यें पुण्यसरिता ॥ सिंधूपरीस ज्या महिता ॥ त्या स्वर्गलोकीं राहिल्या अल्पवता ॥ सत्त्वगुणास्तव ॥३१॥
तेथें राहिले मत्स्यआहारी जंत ॥ माध्यान्हीं होती भूमिगत ॥ चतुर्वर्ण एकमय मिश्रित ॥ कैंचा मग कुळधर्म ॥३२॥
राहिली क्रिया आचरणें बंधन ॥ कैंचे वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण ॥ ऐसे वर्तो लागले अन्योन्य ॥ साठ संवत्सर ॥३३॥
राहिलें पृथ्वीमंडलीं यज्ञदान ॥ मग देवांसी कैंचें भक्ष्य भोजन ॥ तेणें क्षुधें पीडिले देवगण ॥ मग झाले अति कृश ॥३४॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ मग ब्रह्मदेव विचारी चित्तीं ॥ म्हणे कैसी काय कीजे युक्ती ॥ मग पाहिलें ज्ञानें ॥३५॥
तंव अधर्म देखतसे दृष्टीं ॥ विनाशातें पावलीं सर्व सृष्टि ॥ क्रिया सांडोनि चतुर्वर्ण एकवटी ॥ देखे एकमेकां ॥३६॥
जैसे लक्ष्मीवंत मंदिरामधी ॥ पुत्रकलत्रेंसीं असती निर्व्याधी ॥ ऐश्वर्य नेइजे निकंदूनि बुद्धी ॥ लुटोनि जैसें ॥३७॥
तैसा ब्रह्मदेव सृष्टीकरणें ॥ अति दुःखित झालासे मनें ॥ मग करिता झाला तो धांवणें ॥ सृष्टिकार्यास्तव ॥३८॥
मग ब्रह्मा सत्यलोक सांडोनि ॥ वेगीं आरुढला हंसवाहनीं ॥ मग विश्वनाथधामिनी ॥ आला काशीपुरासी ॥३९॥
मग विरिंचि इच्छीतसे आनंदवन ॥ गंगेची होतें सत्यलोकजीवन ॥ तेथें सारिलें संध्यास्नान ॥ विरिंचिदेवें ॥४०॥
वनस्पती जे सर्व सृष्टीची ॥ रक्षा जाहाली जैसी यज्ञाहुती ॥ परी पंचक्रोशी जे शिवाची ॥ असे अल्प वृक्षच्छाया ॥४१॥
तेथें वृक्षाचे तळीं तापसी ॥ विरिंचीनें देखिला महाऋषी ॥ तंव तो महाक्षत्रिय सूर्यवंशी ॥ देखिला विधीनें शिवध्यानीं ॥४२॥
वैवस्वतमनु जो सूर्यसुत ॥ त्या मनुवंशींचा जो महाद्भुत ॥ तो महानरेंद्र शिवभक्त ॥ रिपुंजय नामें ॥४३॥
एकसहस्त्र वरुषें रिपुंजयराजयानें ॥ ध्यानीं लक्षिला पंचानन ॥ नित्य जपे त्रिकाळ अनुष्ठान ॥ शिवदेव आराधी ॥४४॥
तो देखिला जो महातपेश्वरु ॥ मग मानसीं विचारी सुष्टिकरु ॥ मनी म्हणे हा करुं नृपवरु ॥ सरुद्वीपवतीचा ॥४५॥
हा सूर्यवंशी राजा आचारशीळ ॥ महापुण्यात्मा लोकपाळ ॥ धर्मराज्य करितां भूगोळं ॥ पावेल पुण्य वद्धीतें ॥४६॥
मग विरिंचि आला तयाजवळी ॥ रिपुंजया जागृत केलें ते काळीं ॥ ध्यानीं लक्षीत होता चंद्रमौळी ॥ तो चेतविला विधीनें ॥४७॥
मग विरिंचि म्हणे रिपुंजयासी ॥ म्यां सृष्टि समर्पिली तुजसी ॥ सप्तद्वीपवतीचे राज्यासी ॥ केलासी म्यां अधीश ॥४८॥
तरी माझी आज्ञा तूं अंगीकारी ॥ ये वसुमतीचें धर्मराज्य करीं ॥ आणि माझे सृष्टीचे चराचरीं ॥ तूंचि होय कर्ता ॥४९॥
मग तो रिपुंजय सूर्यवंशी प्रत्युत्तर वदला ब्रह्मयासी ॥ आणिक भूपती मेदिनीसी ॥ काय अल्प असती ॥५०॥
मी करीत असतां शिवअनुष्ठान ॥ तूं कैंचा विधाता आलासी गा विघ्न ॥ राज्यार्थ नव्हे हें महापतन ॥ संकल्पितां आम्हां ॥५१॥
प्रहरुनि शंकराची भक्ती ॥ आणिक कल्पिजे राज्यसंपत्ती ॥ तें राज्य नव्हे गा थोर विपत्ती ॥ नरकीं पतन ॥५२॥
इंद्रपदासमान जो राज्यार्थ ॥ त्रैलोक्यसंत्तीचा जो समर्थ ॥ तोही परी गा न्यून पदार्थ ॥ शिव भक्तीपुढें ॥५३॥
मज शिवाची भक्ती करितां ॥ कैंचा आलासी गा विघ्नउद्भविता ॥ मजहूनि क्षत्रिय काय आता ॥ नाहीं त्रिलोकीं ॥५४॥
शिवध्यान अव्हेरुनि शरीरीं ॥ वृथा हें पृथ्वीचें राज्य ना अंगीकारीं ॥ तो एकचि असे माझा आभारी ॥ त्रिपुरांतक जो ॥५५॥
तेणें घेतला प्रतिग्रहो ॥ मी अंगीकारींना राज्यसंग्रहो ॥ मग त्या विपत्तीचा संदेहो ॥ कवणा घालू धातया ॥५६॥
तूं आमचा विधाता श्रेष्ठ पूर्वज ॥ आम्हांसी पीडिजेतो सूर्यात्मज ॥ तरी तूं आतां पूजितां मुख्य वृषभध्वज ॥ न करीं विघ्न स्वामिया ॥५७॥
मग प्रबोधी तो सृष्टिकर ॥ म्हणे तूं पुण्यात्मा नृपवर ॥ पृथ्वीसी होईल तुम्हां अधिकार ॥ तेणें होईल पुण्यवृष्टी ॥५८॥
मज हिंडता त्रिभुवनक्षिती ॥ परी पुण्य़ात्मा न देखोंचि भूपती ॥ तूं पृथ्वीराज्यासी पुण्यकीर्ती ॥ योग्य देखिलासे आम्हीं ॥५९॥
तुझे शरीरीं सत्त्वगुण साक्षी ॥ करिसी महापुण्याची सभिक्षी ॥ तुझिया राज्यामध्यें दुर्भिक्षी ॥ होईल महादोषांचे ॥६०॥
पृथ्वी दाटली गा दूषणें ॥ म्हणोनि प्रवर्तलें अवर्षण ॥ निर्जळ राहिला तो वरुण ॥ साठ वरुषें जाण पां ॥६१॥
तूं धर्मराज्य करिशील पूर्णपणें ॥ तेणें वृद्धि पावतील याग हवनें ॥ देवांसी पावतील भागदानें ॥ हें सामर्थ्य जोडले तुजलागीं ॥६२॥
ऐसें नानापरी त्या महावीरा ॥ प्रबोधोनि आणिलें विचारा ॥ मग रिपुंजय म्हणे सृष्टिकरा ॥ परिसावी जी माझी विज्ञापना ॥६३॥
मग रिपुंजयें पृच्छा आरंभिली ॥ तुम्हीं मज जरी समर्पिला ॥ तरी महीतळीं म्या अंगीकारिली ॥ तुमचिये आज्ञेनें ॥६४॥
तरी मी मागेन जो राज्यार्थ ॥ तो सुफळ करावा मनोरथ ॥ कीं इंद्रपदीं एक सुरनाथ ॥ कीं मी एकचि भूमंडळी ॥६५॥
सप्तद्वीपवतीमध्ये श्रेष्ठ ॥ मजहूनि नसावा जी सुभट ॥ जरी समर्थ झाला नीलकंठ ॥ परी तो नसावा कीं ॥६६॥
मग विरिंचि म्हणे रिपुंजया ॥ तूं आणिक माग रे क्षत्रिया ॥ तुज मी प्रसन्न व्हावया ॥ आलों असें या आनंदवनीं ॥६७॥
तुज म्यां दिधलीं अवगेहे क्षिती ॥ या महीतळींचा भूपती ॥ ऐशीं सहस्त्र वरुषें क्षितिप्रती ॥ करीं धर्मराज्य ॥६८॥
आणिक शेषाची जे नंदिनी ॥ तियेचें नाम अनंगमोहिनी ॥ ते म्यां समर्पिली राजगृहिणी ॥ रिपुंजया तुजलागी ॥६९॥
ते अतिलावण्ययुत पतिव्रता ॥ सर्वसुखभोगिनी तुझी कांता ॥ मग रिपुंजय म्हणे विधाता ॥ तुझी आज्ञा मस्तकीं ॥७०॥
सर्व देवीं जावें स्वर्गमंडळीं ॥ सर्व नाग ते जावे पाताळीं ॥ मग या मृत्युलोकमंडळीं ॥ मीचि अधिष्ठानीं असें ॥७१॥
मग विधी म्हणे गा क्षत्रियवत्सा ॥ तूं दाहक कामक्रोधादि समस्तां ॥ जे जे उद्भवेल तुझी इच्छा ॥ ते पूर्ण करीन मी ॥७२॥
हें मूळ ब्रह्मवाक्य सत्य मानीं ॥ हे वाचा देतों काशीस्थानीं ॥ मग विधीनें पाचारिले महामुनी ॥ वसिष्ठादिक जे ॥७३॥
महापवित्र जे अरुंधती ॥ ते महाश्रेष्ठ सकळांप्रती ॥ तप करुनियां पशुपती ॥ पूजिला काशीश्तानीं ॥७४॥
वृताशु नामें जो ऋषीश्वर ॥ तो विरिंचिदेवाचा मंत्रकुमर ॥ त्याचिया अर्घ्यांजळीं मत्स्यावतार ॥ जाहाला पूर्वी ॥७५॥
त्या वृताशुऋषीचा जो सुत ॥ वकदाल्भ्ये महामहंत ॥ तो पूर्वी होता तप करीत ॥ आनंदवनीम ॥७६॥
पंच लक्ष वरुषेंवरी ॥ तेणें तप केलें या काशीपुरीं ॥ मग प्रसन्न जाहाला त्रिपुरारी ॥ बकदाल्भ्यासी ॥७७॥
ऐसा पूजिला तेणें महेश ॥ मागीतला चिरंजीवअध्यास ॥ सहस्त्र ब्रह्मे तो माझा दिवस ॥ करावा जी शिवा ॥७८॥
इतुकें हें शिवें त्यासी दिधलें ॥ मग तेणें जें लिंग स्थापिलें ॥ त्यासी शिवें नाम धारण केलें ॥ बकदाल्भ्येश्वर ॥७९॥
ऐसा तो शिवभक्ती मुनिवर ॥ महाजुनाट जी पूर्वापार ॥ मग त्यासी जाहाले दोघे कुमर ॥ एक कन्या जाण पां ॥८०॥
त्यानें याग केला काशीस्थळीं ॥ नाग पाचारिले होते पाताळीं ॥ सर्व देव आले स्वर्गमंडळीं देवऋषी ॥८१॥
मग त्यांनी यज्ञीं घालितं पूर्णाहुती ॥ हीं तीन अपत्यें निघालीं पुण्यकीर्ती तरी तीं कवण कवण गा अगस्ती ॥ परियेसीं आतां तूं ॥८२॥
तुझा पिता जो मित्रावरुणी ॥ आणि दधीची ऋषी महामुनी ॥ तिसरी कन्या ते महाप्रवृत्तिनी ॥ शुभगुणी अरुंधती ॥८३॥
जे त्रिलोकींची सत्त्वाहुती ॥ महाशुभगुणी मंगलकीर्ती ॥ यागापासाव जाहाली उत्पत्ती ॥ या तिघांची पैं ॥८४॥
मग ते महाऋषिकुमरी ॥ तप साधिती जाहाली काशीपुरीं ॥ प्रकटला तो स्मरारी ॥ भाळ्चक्षू जो ॥८५॥
पंचअयुतें केलें अनुष्ठान ॥ निराहारीं पूजिला त्रिनयन ॥ शिव म्हणे तुज मी जाहालों प्रसन्न ॥ यज्ञाहुती पैं ॥८६॥
मग अरुंधती वदे जी शंकरा ॥ तुजऐसा अक्षयी पार्वतीवरा ॥ माझे गुण पुरती त्रैलोक्यसुंदरा ॥ ऐसा देई वरु मज ॥८७॥
जंव भूमीवरी असे मेरु ॥ तंव तूं काशीमध्ये शंकरु ॥ ऐसा मज द्यावा जी सौभाग्यवरु ॥ भवानीकांता ॥८८॥
शिव म्हणे तूं स्त्री होऊनी ॥ ऐसें तप नाहीं केलें कोणीं ॥ पूर्वी ब्रह्मा विष्णु गेले होऊनी ॥ परी तुझे तप अधिक ॥८९॥
तुझी देखोनियां पूर्ण भक्ती ॥ तृप्त जाहाली माझी मनोवृत्ती ॥ आतां तुझी करीन तृप्ती ॥ जैसा संकल्प तुझा ॥९०॥
ज्या त्रिलोकींच्या पतिव्रता ॥ त्या उद्धरती तुझें नाम स्मरतां ॥ मग शिवें पाचारिलें त्यां समस्तां ॥ त्रैलोक्यमंडळींचिया ॥९१॥
जळशात सागराची सुंदरी ॥ पद्मकुमुदिका शेषाची नारी ॥ तिच्या सत्त्वें धरिली फणीवरी ॥ वसुमती शेषें ॥९२॥
आणिक महामेरुची सुंदरा ॥ शिवे पाचारिली नामें धरा ॥ कश्यपाचिया पतिव्रता तेरा ॥ पाचारिल्या शिव ॥९३॥
शतरुपा आणि सुरुची ॥ लक्ष्मी सावित्री हरि-विधींची ॥ इतुकियांहित जे शिवाची ॥ दाक्षायणी पातली ॥९४॥
ब्रह्मयाचा कुमर जो श्रेष्ठ ॥ तो महाऋषींमध्यें सुभट ॥ तो तपीं बैसला होता वसिष्ठ ॥ तो आणिला शिवें ॥९५॥
मग शिवशब्द तोचि सुमूहूर्त ॥ तो ब्रह्मकल्पांतींही नव्हे विपरित ॥ वसिष्ठासीं अरुंधतीं केली अर्पित ॥ शंकरें स्वहस्तें ॥९६॥
सावित्री पार्वती करिती अक्षय वायनें ॥ वरिला महामुनी अरुंधतीनें ॥ ब्रह्मदेव गर्जे आशीर्वचनें ॥ शुभमंगलें ॥९७॥
मग ज्या त्रिलोकींच्या पतिव्रता ॥ शिवें आणिल्या होत्या समस्ता ॥ त्यांसी म्हणे हे वंदावी गुणसरिता ॥ अरुंधती तुम्हीं ॥९८॥
हे सत्त्वगुणरत्नांची खाणी ॥ उद्भवली माझ्य अंबिकाग्निहवनीं ॥ इचे गुण त्रैलोक्यभुवनीं ॥ प्रिय पतिव्रतांसी ॥९९॥
जैं हे अरुंधती कल्पी चळूं ॥ तैं रसतला जाय हा भूगोळू ॥ काशीमध्ये असे तो जाश्वनीळू ॥ विसर्जे ध्यानीं ॥१००॥
मग पार्वतीआदि सर्व शक्ती ॥ त्यांहीं मस्तकीं वंदिती अरुंधती ॥ शुद्ध ब्राह्मण पूजिला वेदमूर्ति ॥ तो वसिष्ठ ब्रह्मसुत ॥१०१॥
ऐसा अरुंधतीसी जाहाला वर ॥ मग तियेसी आज्ञापी शंकर ॥ तुझें लिंग तें अरुंधतीश्वर ॥ नामधारण केलें म्यां ॥१०२॥
काशीमध्यें या लिंगाचें पूजन ॥ अरुंधतीतीथी करिती स्नान दान ॥ त्या पतिव्रता होती सगुण ॥ अरुंधतीचेनी ॥१०३॥
जन्मांतरीं पूजिती अरुंधतीश्वर ॥ अरुंधतीतीर्थीचें वंदिती नीर ॥ त्यांचे वंशी नव्हे परद्वार ॥ ऐसा वर शिवाचा असे ॥१०४॥
मग तियेसी म्हणे चंद्रमौळी ॥ मी असेन या लिंगाजवळी ॥ या लिंगाचे शक्तीनें चाले भूतळीं ॥ जे सृष्टी विधीची ॥१०५॥
ऐसी ते पतिव्रता जाणा ॥ शिवें दिधली वसिष्ठ ब्राह्मणा ॥ मग ते प्रसवली महासगुणा ॥ सत्कीर्ति पराशरादि ॥१०६।
हें सांगावया काय कारण ॥ ब्रह्मा रिपुंजयासी जाहाला प्रसन्न ॥ तेथें अरुंधती वसिष्ठ ब्राह्मण ॥ आणिलीं होतीं मुहूर्तासी ॥१०७॥
मग जे महीधराची नंदिनी ॥ ते विधीनें आणिली आनंदवनीं ॥ ते रिपुंजयासी समर्पूनी ॥ दिधलें राज्य पृथ्वीचें ॥१०८॥
अरुंधतीनें केला अभिषेक ॥ रिपुंजयो केला काशीचा अधीश ॥ विधीनें नाम ठेविलें तयास ॥ दिवोदास ऐसें ॥१०९॥
ऐसा दिवोदास केला राजेश्वर ॥ मग शिवापाशीं गेला सृष्टिकर ॥ तेणें साष्टांग केला नमस्कार ॥ मग विज्ञापिलें काय ॥११०॥
ब्रह्मा जंव विज्ञापना करी ॥ तंव तें जाणीतलें त्रिपुरारीं ॥ मग शिवं ब्रह्मा दक्षिणकरीं ॥ पाचारिला जवळिकें ॥१११॥
शिव म्हणे गा विरिंचि अवधारीं ॥ उत्तरभागी क्षीरार्णवाचे तीरीं ॥ तपीं बैसलासे मंदरगिरी ॥ त्या कौसल्यद्वीपीं ॥११२॥
त्याचिया तपाचें आलें अवसान ॥ लक्ष वर्षे जाहालीं पूर्ण ॥ त्या गिरीसी वर अर्पावया जाण ॥ चला जाऊं वेगेंसीं ॥११३॥
तंव विधी मनी हर्षला भारी ॥ संदेहेंविण निघाले बाहेरी ॥ म्हणे तथास्तु स्मरारी ॥ न करावा विलंब ॥११४॥
तंव नंदी पालाणिला ढवळा ॥ ब्रह्मा हंसेसीं उताविळा ॥ गरुड महाअद्भुत अतिबळा ॥ हरिवाहन तो ॥११५॥
बाहेर निघालिया स्वामी अधीश ॥ मग भृत्या नगरीं कैंचा वास ॥ तैसा मार्गस्थ झालिया महेश ॥ मग निघाले सर्व देव ॥११६॥
मग त्या कौसल्यद्वीपामाझारीं ॥ पावले जेथें मंदरगिरी ॥ सर्व देवभारेंसी त्रिपुरारी ॥ गेला पर्वताजवळिकें ॥११७॥
षण्नेत्रेचा कुमर ॥ जो काश्यपात्मज धीर गंभीर ॥ हृदयीं शिवनामउच्चार ॥ मंदराचळाचे ॥११८॥
शिव म्हणे कश्यकुमरा ॥ थोर शिणलासी भक्तवरा ॥ स्थावर जंगम महाधीरा ॥ उत्तरस्तंभ तूं ॥११९॥
संवत्सर लक्ष परिपूर्ण ॥ हृदयीं माझेंचि स्मरण ध्यान ॥ आतां आलें तपाचें अवसांन ॥ माग रे इच्छावर ॥१२०॥
ऊठ ऊठ गा थोर कष्टलासी ॥ मग शिवें करें स्पर्शिलें त्यासी ॥ मग तयानें विस्र्जूनि ध्यानासी ॥ पाहिलें शिवाकडे ॥१२१॥
मग मंदराचळें संतोषोनी ॥ साष्टांग नमस्कार घातला शिवाचे चरणीं ॥ मग बद्धहस्तें उभा राहोनी ॥ स्तुती करिता जाहाला ॥१२२॥
जयजयाजी सर्वात्मका ॥ जयजयाजी सुनाभ त्र्यंबका ॥ जयजयाजी त्रैलोक्यतारका ॥ काशीनिवासिया ॥१२३॥
तूं अंतरात्मा सर्व जीवांसी ॥ भावपूर्वक प्रसन्न जाहालासी ॥ आम्हीं मागावें तें तूं काय नेणसी ॥ संकल्प मनींचा ॥१२४॥
माझें जें मागावयाचें आर्त ॥ तें तुम्हां आधीं असे श्रुत ॥ तूं ब्रह्मवस्तु अकल्पित ॥ जाणसी मनोभाव माझा ॥१२५॥
तरी हेंचि मागतों ये काळीं ॥ तुम्हीं चंद्र धरिला जी मौळीं ॥ तैसें तुम्ही राहावें जी माझे भाळीं ॥ हाचि वर द्यावा मज ॥१२६॥
हेंचि मज घडेल मुक्तीस्वरुप ॥ सफळ माझे झाले साक्षेप ॥ सफळ जन्मांतरींचें तप ॥ हाचि वर थोर मज ॥१२७॥
तंव विरिंचि वदे जी सदाशिवा ॥ हा मागेल तैसा वर द्यावा ॥ म्यां स्थापिला तुमचिया आज्ञाभावा ॥ दिवोदास काशीमध्ये ॥१२८॥
सप्तद्वीपवतीचा नरेंद्र ॥ जैसा नक्षत्रांसी अधिपति चंद्र ॥ तैसा दिवोदास केला राजेंद्र ॥ तुमचिये आज्ञेस्तव ॥१२९॥
तुमचिया आज्ञें म्यां सृष्टि केली ॥ ते अवर्षणी अवघीचि निमाली ॥ मग तुमचियें आज्ञें समर्पिली ॥ पृथ्वी दिवोदासासी ॥१३०॥
महाक्षय जाहाला जी पुरपट्टणां ॥ व्याघ्र सिंह करिती गर्जना ॥ मग स्थापिलें जी ब्रह्मारण्या ॥ दिधली वसुमती ॥१३१॥
तो महक्षत्रिय जी सूर्यवंशी ॥ धर्मराज्य करील पृथ्वीसी ॥ सप्तद्वीपवतीचे राज्यासी ॥ तोचि योग्य असे ॥१३२॥
विरिंचि वदे मंदरागिरी ॥ ऐशीं सहस्त्र संवत्सरवरी ॥ तुझ्या मौळीं राहील त्रिपुरारी ॥ ऐसा वर दिधला तुज ॥१३३॥
मग शिवें विचारिलें मानसीं ॥ ऐसा वर जाहाला दिवोदासासी ॥ तरी काशीवास तो आम्हांसी ॥ अप्राप्त जाहाला असे ॥१३४॥
मग विरिंचि म्हणे नीलकंठा ॥ सर्व देवीं राहिजें या समुद्रतटा ॥ तुम्ही मंदरगिरीचिया मुकुटा ॥ राहाणें गणेंसी ॥१३५॥
मृत्युलोकींचे राज्य तें किमात्मक ॥ तेथींचे मानवी ते दीपमंशक ॥ उत्पत्ति प्रलय होती लक्ष एक ॥ क्षणामाजी शिवा ॥१३६॥
निमिषार्धामाजीं प्रलय उत्पती ॥ लक्ष एक जंतु होती जाती ॥ तृणासमान ते पृथ्वीचे भूपती ॥ त्यांची कथा ते कायसी ॥१३७॥
“विरिचि वदे जी आदिमहेशा ॥ तृणासमान ते मानवी दशा ॥ ऐंशी सहस्त्र वर्षे दिवोदासा ॥ होती निमिषमात्रें ॥१३८॥
नरमानवांचा हाचि धर्म ॥ यांहीं मरिजे पुनरपि जन्म ॥ शिवा तुम्हीं न धरावा जी श्रम ॥ काशीपुरीचा पैं ॥१३९॥
तरी समस्त या गीर्वाणांकारणें ॥ आज्ञा कीजे आपुलिया वचनें ॥ तुम्हीं हें वसवावें भुवन ॥ मंदराचळासी ॥१४०॥
मग शिवाचे आज्ञेंत ॥ देव पृथक् राहिले समस्त ॥ ब्रह्मा विष्णु उमाकांत ॥ राहिले गिरिमौळीं ॥१४१॥
मग मंदराचल पर्वताहुनी ॥ विरिंचिनाथ आला काशीस्थानीं ॥ पर्वती जरी राहिला शूलपाणी ॥ तरी काशींत मुक्ति कैंची ॥१४२॥
काशीबाहेर गेला पशुपंती ॥ तरी काशीमध्ये मुक्ती कैंची निश्चितीं ॥ ऐसें विरिंचीनें विचारिलें चित्तीं ॥ मग काय करितां जाहाला ॥१४३॥
ऐसा हर प्रार्थिला नानापरी ॥ मग शिव तो राहिला गिरिवरीं ॥ आपण ब्रह्मा आला काशीपुरीं ॥ मुक्तिविचारणेसी ॥१४४॥
मग ब्रह्मयानें केली लिंगस्थापना ॥ मुक्ति द्यावया त्रैलोक्यजना ॥ लिंगासी केली नामधारणा ॥ अविमुक्तेश्वर ऐसी ॥१४५॥
शिव जंव होता मंदरगिरीसी ॥ तंव या त्रैलोक्यजंतुजीवांसी ॥ मुक्ति देतसे काशीपुरीसी ॥ अविमुक्तेश्वर हा ॥१४६॥
योजिली अविमुक्ति नामें ऐसी ॥ तेंचि नाम स्थापिलें त्यासी ॥ मग त्रैलोक्यजंतुनवांसी ॥ देतसे मुक्ति तें लिंग ॥१४७॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमहंता ॥ परियेसीं त्या लिंगची महिता ॥ जेणें पराभवे व्याधिवार्ता ॥ स्मरणमात्रें ॥१४८॥
जरी अविमुक्तेश्वर कल्पी मन ॥ त्रिकाळ करितां नामस्मरण ॥ आणि तो असो कां दूरी योजन ॥ पांच सहस्त्र वरुषें पैं ॥१४९॥
जरी काशीमध्ये घडे पंचत्व ॥ अपार तयाचें पुण्यसत्त्व ॥ एवढें सामर्थ्य घडे साक्षात्व॥ लिंगनाम स्मरलिया ॥१५०॥
जरी त्या लिंगाचे होय दर्शन ॥ नेत्रीं पाहे अवलोकून ॥ तरी कोटिजन्मींचे दोष होती दहन ॥ दर्शनमात्रें ॥१५१॥
जरी करें स्पशीं त्या लिंगासे ॥ मौळ तुकी देखोनि प्रासादासी ॥ तरी पापराशी होती दहन ॥ कुलाचलासमान पैं ॥१५२॥
अविमुक्तेश्वरीं कीजे पूजन ॥ मणिकर्णिकेचें जळीं कीज स्नान ॥ तरी त्या पापराशी होती दहन ॥ कुलाचलासमान पैं ॥१५३॥
शिवरात्रिदिनीं कीजे उपोषण ॥ अविमुक्तेश्वरीं कीजे पूजाविधी जागरण ॥ अहोरात्र करितां गायन ॥ तरी काय घडे सामर्थ्य ॥१५४॥
तरी द्विपक्षपूर्वजांसाहित ॥ मुक्त कैलासलोक प्राप्त ॥ धरा मेरु कोटि वेळ येत जात ॥ तंववरी वास तेथें ॥१५५॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ तें लिंग पूजीत होता पशुपती ॥ तें अगाध आच्छादिलें होतें क्षितीं ॥ महादेवें पैं ॥१५६॥
तें प्रकट केलें चतुराननें ॥ तें अगाध निर्मिलें नाहीं कवणें ॥ त्या लिंगाची आकृति सामर्थ्यगुणें ॥ तो शंकरचि जाणे ॥१५७॥
तें अनादिसिद्ध स्वयंभू असे ॥ कोटिकल्पवरी काशीमध्यें वसे ॥ त्य लिंगशक्तीनें दशदिशे ॥ राहिलें आकाश ॥१५८॥
तें लिंग पूर्णस्तंभ आकाशाचा ॥ तें लिंग अमृतकंद वसुमतीचा ॥ सप्तपाताळां आधार त्याचा ॥ ऐसें तें अगाध पैं ॥१५९॥
माघ कृष्णपक्षीं शिवरात्रीसी ॥ इतर लिंगे येती त्या लिंगापाशी ॥ तें साधारण असें भक्तिप्रणमेंसी॥ सर्वकाळ पैं ॥१६०॥
लक्ष्मीकांत आणि विरिंचेदेवी ॥ नेणती त्या लिंगाचा प्रादुर्भावो ॥ याचा धर्म जाणे सदाशिवो ॥ ऐसें हें अगाध ॥१६१॥
त्रिलोकीं लिंगे अगाध असती ॥ परी अपार या लिंगाची शक्ती ॥ पूर्वी पूजिले होतें पशुपतीं ॥ म्हणोनि समर्थ असे ॥१६२॥
जेणें पूजिला अविमुक्तेश्वर ॥ आणि बद्धकरें साष्टांग नमस्कार ॥ त्यासी वेदी सूर्याचा कुमर ॥ यमराव तो ॥१६३॥
सर्व देवांसह सहस्त्रनयन ॥ विरिंचिनाथ आणि नारायण ॥ वंदिती करसंपुट जोडून ॥ अविमुक्तेश्वर ॥१६४॥
सर्व देव करिती नमस्कार ॥ अगाध अनुपम हा अविमुक्तेश्वर ॥ अरे हा मणिकर्णिकाजळें हर ॥ त्रिकाळ स्नपावा ॥१६५॥
स्वामी म्हणे गा अगस्तिऋषी ॥ दिवोदास राजा वाराणसी ॥ शिव गेला मंदराचलासी ॥ ऐसीं सहस्त्र वरुषें पैं ॥१६६॥
तंववरी अविम्कुतेश्वरलिंग ॥ दाखवीतसे मुक्तिमार्ग ॥ हा श्रवण घडे जया प्रसंग ॥ तरी काय सामर्थ्य वर्णावें ॥१६७॥
काशीमध्यें कीजे लिंगस्थापना ॥ गो शतसहस्त्र दिधल्या ब्राह्मणां ॥ तें असे या लिंगाच्या अध्यायश्रवणा ॥ अलक्ष असे गणना पुण्याची ॥१६८॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ ऐसी ते काशी निर्वाणखाणी ॥ अविमुक्तेश्वर तो भाग्यावांचूनी ॥ प्राप्त नाहीं गा सर्वथा ॥१६९॥
आतां काशीवियोग वृषभध्वजा ॥ तो कैसा वर्तला कुंभंजा ॥ ते कथा परिसावी बरविया वोजा ॥ मैत्रावरुणी ॥१७०॥
शिवदास गोमा म्हणे श्रोतां ॥ अगस्ति प्रश्नील शिवसुता ॥ ते कथा पुढारी परिसतां ॥ महादोष नासती ॥१७१॥
इति स्कंडपुराणें काशीखंड दिवोदासचरिते अविमुक्तेश्वरमाहात्म्यवर्णनं नाम द्विचत्वारिंशाध्यायः ॥४२॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति द्विचत्वारिंशाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP