मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ५१ वा

काशीखंड - अध्याय ५१ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ अगस्ति वदे जी शिवकुमरा ॥ तूं सुगंध मैलागिरि तरुवरा ॥ तरी तूं माझिया वियोगांकुरा ॥ निर्मिलासी हरें ॥१॥
तूं शुद्ध कमळांचें सरोवर ॥ ज्या कमळीं पूजितां होय तृप्त हर ॥ माझा वियोग तेथें मुक्ताहार ॥ तृप्त नव्हे क्रीडतां ॥२॥
या चरणकमलाचा प्रीतिस्वाद ॥ आमोदीं रत मनोमकरंद ॥ तोही तृप्त जाहाला परी आनंद ॥ नव्हेचि माझा ॥३॥
शिवकथा आरभितां अवदान ॥ सुखें श्रवण करितां हें हवन ॥ वियोगकुंड माझे श्रवण ॥ हवितां तूप्ति नाहींचि ॥४॥
समुद्रमथनींच्या विषज्वाळीं ॥ दग्धीत होतें तें शिवकंठनाळीं ॥ म्हणोनि शांत केलें चंद्रमौळीं ॥ धरिली गंगा शीतकर ॥५॥
म्हणोनि माझी वियोगव्यथा ॥ ते शांत करावी समर्था ॥ तूं इच्छादानी अनाथनाथा ॥ होइजे शिवात्मजा ॥६॥
जेणें राक्षस गेला कैलासा ॥ त्या विभूतीचा मूळवृत्तांत कैसा ॥ विभूति प्रिय त्या महेशा ॥ तें निरूपावें स्वामी ॥७॥
तंव बोलिला तो महाअवधूत ॥ जो ब्रह्मचारी श्रेष्ठ शिवसुत ॥ महार्णवाच्या ठायीं तो पूर्ण आर्त ॥ क्रूर तारकासुराचा ॥८॥
म्हणे गा अगस्ती पुण्यपात्रा ॥ तुझिये तुळेसी तुळिजे धात्रा ॥ तुवां प्रसन्न करूनि त्रिनेत्रा ॥ साकार केलें पैं ॥९॥
तुजऐसा श्रोता संपूर्ण गुणें ॥ परिसितां अल्प जाहालीं पुराणें ॥ तूं जें जें पुससी तें तें षडाननें ॥ कथावें तुजप्रति ॥१०॥
तूं शिवकथेचें अंबुज ॥ कीं शिवकथा सुवर्ण सतेज ॥ वरी जडले तुझे शब्दपुष्कराज ॥ यथोक्तपंक्तीं ॥११॥
तूं माझिया मना आनंदकर्ता ॥ तूं माझा बोधसमुद्र प्राशिता ॥ ग्राहक जोडलासी महाश्रोता ॥ शिवकथारत्नासी ॥१२॥
तरी तुवां प्रश्निलें गा दोषहरण ॥ तें भस्मधूलीचें आदि-अवसान ॥ तरी सत्यार्थचि हें त्रिभुवन ॥ रचिलें विभूतीनें ॥१३॥
आतां एकाग्र होऊनियां ऋषिनाथा ॥ परियेसीं विभूतीची मूळ कथा ॥ जे अत्यंत प्रिय विश्वनाथा ॥ ते सांगों तुजप्रति ॥१४॥
पाहातां या विभूतीचें महिमान ॥ आकारा आणिलेंसे त्रिभुवन ॥ मग सृष्टि करावया कारण ॥ केलें ब्रह्मादिकांसी ॥१५॥
स्वर्ग-मृत्यु-पाताळविवर ॥ हें सर्वही असे अंडाकार ॥ त्याच प्रळयीं करावया संहार ॥ बहु त्वरावंत शिव ॥१६॥
जे कल्पसंख्या एकचि पूर्ण ॥ तंव आणिक सूर्याचें वर्तमान ॥ ह्या कल्पांतीं पावे मरण ॥ प्रथम मार्तंड तो ॥१७॥
ऐसे चतुर्दश जाहालिया गभस्ती ॥ ते मन्वंतरांची कोण गणती ॥ चतुर्दश मन्वंतरांसी म्हणती ॥ एक वराहकल्प ॥१८॥
मग पंचत्व पावे देवाधीश ॥ होय त्याचिया शरीराचा नाश ॥ तेव्हां प्रवर्ते हो एक दिवस ॥ लोमहर्षणाचा पैं ॥१९॥
जैं लोमहर्षणाचा पूर्ण क्षय ॥ तैं भृगुणक्ष्याचा दिनोदय ॥ भृगुपक्षी पावलिया क्षय ॥ हो दिन ब्रह्मयाचा ॥२०॥
जैं ब्रह्मयाचा होय दिनान्त ॥ तैं त्रैलोक्यासी होय कल्पान्त ॥ तैं शेषशयनीं हरि अच्युत ॥ तो जागृत होय ॥२१॥
ऐसा एक संहारे लक्ष्मीपती ॥ तैं धुमधुमाकार योगाची गणती ॥ पंचभूताकार मोडिती ॥ ब्रह्मादिकांसी ॥२२॥
ऐसा एक निमालिया विष्णु ॥ तैं महदादीचा प्रवर्ते दिनु ॥ तो विश्वंभर लक्षितां क्षणु ॥ कोटिवा विभाग पैं ॥२३॥
ऐसीं हीं सहस्त्र युगें ॥ जहालीं धुमधुमाकार प्रसंगें ॥ तंववरी त्रिशूलाग्रीं शिवलिंगें ॥ धरिलीं काशीपुरीं ॥२४॥
एकवीस स्वर्गमंडळीं ॥ काशीमध्यें ध्यानस्थ चंद्रमौळी ॥ धुमधुमाकार ब्रह्मांडणोकळीं ॥ स्मरे आपणातें ॥२५॥
त्या स्वरूपाच्या ध्यानामाझारीं ॥ ब्रह्मे जाहाले असंख्यवरी ॥ तंव पंचत्व पावले हरी ॥ अर्बुद एक ॥२६॥
तैं वरुण अग्नि समीर ॥ हे त्रिवर्ग शिवाचे अंकुर ॥ हे एकवटूनि जाहाला नंदिकेश्वर ॥ तो हा शिवाजवळी ॥२७॥
तैं ब्रह्मांड ब्रह्मप्रळयाचे अवसानीं ॥ संहरे अमरेश शीर्वाणीं ॥ तैं अमोघ वस्तु चतुर्दशरत्नीं ॥ होती अमरावतीसी ॥२८॥
प्रलयान्त जाणोनि थोर ॥ गजबजिला तो अमरेश्वर ॥ पाचारिला तो दिक्पतीश्वरें भूसुर ॥ आलोचनासी बृहस्पती ॥२९॥
म्हणे चतुर्दश रत्नें माझ्या घरीं ॥ तीं प्रलयीं आम्हीं ठेविजे सागरीं ॥ ते सप्त समुद्र संहारिले तरी ॥ ठेविजे कवणापाशीं ॥३०॥
तंव इंद्रासी वदे अमृतकरू ॥ परिसा माझा शब्दांकुरू ॥ जो अंगिरासुत देवगुरू ॥ अजरामर बृहस्पती ॥३१॥
तयाजवळी ठेविजे रत्नें समस्त ॥ त्यासी प्रलयीं नव्हे जी मृत्यु निश्चित ॥ मग गुरु होऊनि भयभीत ॥ बोलतसे इंद्रातें ॥३२॥
विपरीत बुद्धीनें विनाशयोग ॥ मज न कळे प्रलयप्रसंग ॥ दीपघटेसी पाहातां काय पंतग ॥ पंचत्व स्मरे पां ॥३३॥
सदाशिवाचा जो पूर्ण भांडारी ॥ तो महासमर्थ जी अलकापुरीं ॥ सर्व रत्नें ठेविजे त्याच्या घरीं ॥ तो कुबेर चिरंजीव ॥३४॥
तंव मरीचि ऋषीचा आत्मज ॥ जो अमरनाथा पूर्वज ॥ तो बोलता जाहाला कश्यपराज ॥ पुत्रा अमरनाथासी ॥३५॥
जेथें हरि विरिंचि देवांसी वळसा ॥ हा कुबेर भांडारी कायसा ॥ संकेत पुरलिया महदाकाशा ॥ मग देव कैंचे ॥३६॥
जेथें रुद्राच्या सुता अंत ॥ जे प्रळय़ीं भक्षी ब्रह्मांडांत ॥ तरी मज स्मरे एकान्त ॥ प्रळय़ीं चिरंजीव ॥३७॥
वरुण वन्हि समीर ॥ त्यांचा सर्व केला संहार ॥ तो त्रिमूर्ति विश्वेश्वर ॥ आहे शिवाजवळी ॥३८॥
तो तुम्हीं देवीं स्मरावा सकळीं ॥ रत्नें ठेवावीं गा तयाजवळी ॥ आणिक विचारितां त्रैलोक्यमंडळीं ॥ न दिसे रत्नां यत्न ॥३९॥
कश्यप इंद्रासी कथी हा विचार ॥ तंव आला शिवणांचा भार ॥ शस्त्रास्त्रीं हांकीत बळिया वीर ॥ आले अमरावतीसी ॥४०॥
आलें त्रिपुरांतकाचें सैन्य ॥ अति बलिष्ठ पर्वतासमान ॥ देवशक्ति जाहालिया क्षीण ॥ आला पूर्ण क्षयो ॥४१॥
एकीं सांडिली अमरपुरी ॥ एक रिघती गिरिकंदरीं ॥ स्त्रिया सुत सांडूनि विवरीं ॥ निघाले देव पैं ॥४२॥
एक ते स्वर्गसुख सांडुनी ॥ देव पळाले गा मृत्युभुवनीं ॥ पराभविला तो वज्रपाणी ॥ भृंगिशैलादिगणें ॥४३॥
शिवगणीं लुटिली अमरावती ॥ जीं जीं रत्नें पडती जयां हातीं ॥ तीं गौप्य करूनि शिवगण नेती ॥ कैलासाचिया वाटा ॥४४॥
तंव कैलासाहूनि नंदीगण ॥ जो विश्वंभराचा विजयवाहन ॥ त्यासी आज्ञा करी पंचानन ॥ सृष्टिसंहाराची ॥४५॥
मग उठविला त्रिविधाकार ॥ महाशैल जैसा वनस्पतिचर ॥ तेणें मागीं येतां देखिला भार ॥ शिवगणांचा चौसष्ट कोटी ॥४६॥
मुख पसरिलें पृथ्वी आकाश ॥ शिवसैन्याचा केला ग्रास ॥ मग नंदिकेश्वर थोर आवेश ॥ धरिता झाला ॥४७॥
सप्तद्वीपवतीच्या वनस्पती ॥ भक्षिता झाला त्रिमूर्ती ॥ तृण वल्ली सुगंधजाती ॥ भक्षिल्या निमिषमात्रें ॥४८॥
मग शंकरें त्रिशूलाचे अग्रीं ॥ सर्व जंतंसीं धरिली काशीनगरी ॥ जैसा तो गृहस्थ संपत्ति सर्व सामुग्री ॥ स्वस्थाना ठेवी दुष्टकाळीं ॥४९॥
तैसी निजवस्तु शिवाची काशी ॥ अविनाश म्हणोनि विसंबेना तियेसी ॥ एकवीस स्वगीं पंचक्रोशी ॥ सर्व जंतूंसीं नेली ते ॥५०॥
पहा हो जांबूनदाचे अलंकारीं ॥ जैसी ते लाख वंदिजे शिरीं ॥ तैसी कर्मजंतूंसीं काशीपुरी ॥ अत्यंत प्रिय शिवातें ॥५१॥
आरोहण जया नंदीच्या पृष्ठीं ॥ त्रिशूलधारी दक्षिणमुष्टीं ॥ एकविसावे स्वगीं धूर्जटी ॥ काशी ठेविली बहुयत्नें ॥५२॥
हे कथा जुनाट पूर्वापार ॥ मागें प्रलय झाले अपार ॥ परी विभूतीमाजी नंदिकेश्वर ॥ प्रळय करीतसे ॥५३॥
जैं शिवकंठीं नव्हतें हालाहल ॥ शेषमुखीं नव्हतें गरळ ॥ तैं अमृतविषाचें जें मूळ ॥ तो नंदिकेश्वर ॥५४॥
त्याचें पूर्वनाम तें बसवा ॥ हा अत्य़ंत प्रिय सदाशिवा ॥ हा त्रैलोक्याअंतीं अविनाश ठेवा ॥ त्रिपुरांतकाचा ॥५५॥
मग त्या बसवेश्वरें काय केलें ॥ श्रृंगें मेरुमंडळ उडविलें ॥ बत्तीस कोटी शरीर विदारिलें ॥ महामेरूचें नंदीनें ॥५६॥
त्या बसवेश्वराचा अवतार ॥ मौळीं वाहात होता महीभार ॥ तेणें फुंकिला विषाचा अंगार ॥ सप्त पाताळें पैं ॥५७॥
ऐसा त्या शेषाचा विषाग्न ॥ तेणें केलें सप्त पाताळांचे दहन ॥ ऐसा तो सृष्टिसंहार कैसा कवण ॥ करील आतां ॥५८॥
भ्रमतां मेरुच्या भ्रमणीं ॥ तो मेरु टाकिलासे मेदिनी ॥ मग ते ग्रह तारा तरणी ॥ कवण कार्याचे ॥५९॥
ऊर्ध्वमुख होता सूर्याचा यत्न ॥ तो नंदिकेश्वरें फुंकिला त्राणेंकरून ॥ मग तो द्वादशादित्य वरुण ॥ जाहाला अधोमुख ॥६०॥
तेणें जाळिली सप्तद्वीपवती ॥ मग ते नंदीनें टाकिली क्षितीं ॥ सवेंचि क्रमिता जाहाल पुढती ॥ शिवाजवळी ॥६१॥
शिवापाशीं येऊनि तो बसवा ॥ तेणें खवळिलें महादेवा ॥ म्हणे म्यां तुज केलें सदाशिवा ॥ नामधारण पैं ॥६२॥
तंव कोपारूढ जाहाला पंचानन ॥ महदादींची संख्या जाहाली जाणोन ॥ तेणें उघडिला भाललोचन ॥ ब्रह्मांडअंतक जो ॥६३॥
शिवें उघडिला तृतीय नेत्र ॥ उद्भवला वैश्वानराचा पुत्र ॥ व्रह्मांड दग्धी तो पंचवक्र ॥ दाहिले एकवीस स्वर्ग ॥६४॥
ब्रह्मांडीं चेतला वैश्वानर ॥ दग्धिले तारा शीतकर ॥ भूमीं रिचवती दग्धांगार ॥ अंगिरामौळी जेवीं ॥६५॥
मग तो ब्रह्मांडभरित ॥ व्यापला होता प्रळयभरित ॥ तो समस्त भक्षिला अकस्मात ॥ बसवेश्वरें ॥६६॥
मग महागर्जना केली थोर ॥ पृथ्वीभार सांडिती दिशाकुंजर ॥ मग वरुण जाहाला बसवेश्वर ॥ करी पूर्ण वृष्टी ॥६७॥
मग मुसळधारीं वृष्टि करूनी ॥ उदकीं समरसली मेदिनी ॥ जळें व्यापिलीं जीं त्रिभुवनीं ॥ मग काय करी नंदी तो ॥६८॥
मोडिल्या ब्रह्मांडलक्षखाणी ॥ एकविसावे स्वगीं जाऊनी ॥ काशीमध्यें बैसला शिवध्यानीं ॥ असंख्य युगें पैं ॥६९॥
उदक होतें जें ब्रह्मांडभरित ॥ त्यासी वन्हि चेतला अकस्मात ॥ तेणें उदकराशि दग्धित ॥ भक्षिलें जीवन पैं ॥७०॥
मोडिलें पंचत्वाचें मंडण ॥ पृथ्वी आप तेज वायु गगन ॥ मग आकाररूप सगुण ॥ असेचि ना कांहीं ॥७१॥
जैसा देहीं असतां स्वस्थ जीवेश्व ॥ तंव अवघा दिसे आकार ॥ मग विदेही जाहाला त्याचा स्वर ॥ असेचि ना कांहीं ॥७२॥
तैसा तो सगुणाकार मोडला ॥ मग आपआपणातें विसरता झाला ॥ वटबीजप्रमाण गुप्त राहिला ॥ मग नेणों किती युगें ॥७३॥
मग जी दर्दुराननवैखरीपती ॥ त्याची यजुर्वेदें केली शांती ॥ मग यजुर्वेद पावला मुक्ती ॥ सामवेदमुखीं ॥७४॥
मग त्या सामवेदाचें भक्षण ॥ पश्यंतीसहित करी आथर्वण ॥ त्या आथर्वणाचें दहन ॥ करी तो प्रणव ॥७५॥
ऐसा तो प्रणव  ॐ कार त्रिपदा ॥ भक्षिलें अष्टादशपुराणवेदां ॥ तेचि सदशिवाची इच्छाभेदा ॥ मोडिली सदाशिवें ॥७६॥
पूर्वीं विश्वनाथाचे मौळीं ॥ हाटकेश्वर होता पाताळीं ॥ तो उठविता जाहाला चंद्र्मौळी ॥ आणिला पृथ्वीतटा ॥७७॥
मग तो विश्वनाथीं सामावुनी ॥ आकाशीं क्रमिले शूलपाणी ॥ तारकेश्वर होता जो गगनीं ॥ तेथें ठेविले काशी ॥७८॥
तेथें नंदी बैसला शिवस्मरणीं ॥ सदाशिव बैसला नंदीचे ध्यानीं ॥ ऐसे राहिले देवभक्त दोनी ॥ अक्षररूपें पैं ॥७९॥
मग सृष्टि करावयाचें कारण ॥ मानसीं इच्छी पंचानन ॥ तेंचि महत्तत्त्व माया सगुण ॥ उभी ठाकली शिवाजवळी ॥८०॥
तंव ध्यानविसर्जन केलें शिवें ॥ तियेसी अवलोकिलें सदाशिवें ॥ तंव तो देही उद्भवला भावें ॥ करी आश्चर्य थोर ॥८१॥
मग आरंभिला सृष्टिविनोद ॥ मानीतसे महदादिखेद ॥ तयासी नातळतां स्वेद ॥ उद्भवला शिवासी ॥८२॥
तंव बसवा विसर्जूनि ध्याना ॥ केली प्रलयमेघाची गर्जना ॥ ब्रह्मांड व्यापिलें पूर्णजीवना ॥ स्वेदें शिवाचिया ॥८३॥
तंव शिवाची इच्छा थोर ॥ प्रसवली त्रिविध त्रिमूर्ति कुमर ॥ तंव तो आला बसवेश्वर ॥ त्यांसी करी नामधारणा ॥८४॥
जें त्रिअक्षरी नाम बसवा ॥ तेंचि नाम ठेविलें त्रिदेवां ॥ बकार नाम तें विरिंचिदेवा ॥ ब्रह्मा पैं ॥८५॥
सकार नाम तें सदाशिवासी ॥ वकार नाम तें ठेवी विष्णूसी ॥ ते त्रिपदेंकरोनि ॥ तिघांसी ॥ उद्भविती जाहाली ॥८६॥
ऐसें त्रिविध मायांकुर अक्षर ॥ होता तोचि झाला क्षर ॥ ब्रह्मांडभरित होतें जें नीर ॥ तें स्वीकारी शिव ॥८७॥
सन्मुख देखिला नंदीवहन ॥ महदादीनें मोहिला पंचानन ॥ मग कुरवाळिता झाला त्रिनयन ॥ बसवेश्वरासी ॥८८॥
पृष्ठीवरी कर ठेविला शंकरें ॥ नंदी कुरवाळिला दक्षिण करें ॥ दड कुरवाळितां नंदिकेश्वरें ॥ गोमय करी शिवा करीं ॥८९॥
मग नंदिकेश्वरासी म्हणे त्रिपुरारी ॥ हे कवण वस्तु दिधली करीं ॥ येरू म्हणे हे त्रैलोक्याधारीं ॥ पाहिंजे त्रिनेत्रीं ॥९०॥
मग शिव पाहे भाललोचनीं ॥ तंव तो भस्मराशि देखे शूलपाणी ॥ नंदी म्हणे त्रैलोक्यतारणीं ॥ क्रिया थोरी पैं ॥९१॥
हे जन्मली लोचनें वक्षःस्थळीं ॥ शिवमंत्रें अवश्य धरिजे भाळीं ॥ सृष्टिकार्यास्तव भस्मधूळी ॥ आकारिली तुम्हीं ॥९२॥
मग शिवें महामंत्रेंकरून ॥ सर्व गात्रीं केलें भस्मलेपन ॥ मग केलें हस्तप्रक्षालन ॥ प्रलयोदकीं ॥९३॥
मग शिवें अंतरिक्षाहून ॥ प्रलयोदकीं केलें प्रेरण ॥ मग उभा राहिला नाभिप्रमाण ॥ प्रलयोदक आकर्षी ॥९४॥
तेथें स्नान करितां आदिपुरुषा ॥ तरंग उद्भवले अष्टदिशा ॥ मग ब्रह्मांडरचना परियेसा ॥ कैसी आरंभिली ॥९५॥
मग शिवें हातीं घेऊनि जीवन ॥ ऊर्ध्व टाकिलें मंत्रेंकरून ॥ तींचि ग्रह नक्षत्रें उडुगण ॥ स्थापिलीं अंतरिक्षीं ॥९६॥
उभय नेत्रांचें तेजसौंदर्य ॥ तेचि व्योमीं स्थापिले चंद्र सूर्य ॥ बत्तीस कोटी महाधैर्य ॥ उद्भवला मेरुतरंग ॥९७॥
मग ते शिवगात्रींची विभूती ॥ उदक शोषूनियां केली क्षिती ॥ अष्टदिशा तरंग उद्भवलेती ॥ तेवि कुलाचल ॥९८॥
स्वामी म्हणे गा तपोधीशा मुनी ॥ ऐसी आकारिली हे मेदिनी ॥ तंव नंदीनें प्रार्थिला शूलपाणी ॥ वर दीजे जी विभूतीसी ॥९९॥
मग शिव म्हणे गा निजवाहना ॥ परियेसीं विभूतीची नामधारणा ॥ विभूति प्रसवली त्रिभुवना ॥ ऐसें जाण तूं सत्य ॥१००॥
हे विभूतिभस्मक्रिया थोरी ॥ हे जे सतत मंदाकिनी सुंदरी ॥ हे त्रिमात्रा षडक्षरी ॥ महदादि वेदगर्भा ॥१०१॥
हे त्रैलोक्या अगोचर देवाधी ॥ हे अष्टसिद्धींची पूर्णनिधी ॥ अरे हे ब्रह्महत्येचे दोष दग्धी ॥ शिवमंत्रें ॥१०२॥
विभूतीचें केलें नामस्मरण ॥ तरी आजन्मदोष होती दहन ॥ विभूतीनें होय दर्शन ॥ तेणें शिव पुजिला ॥१०३॥
विभूती मंत्रूनि लाविजे भाळीं ॥ तो प्रत्यक्ष जाणिजे चंद्रमौळी ॥ दिश्वभर वसे तो सर्वकाळीं ॥ तयाजवळी पैं ॥१०४॥
विभूती लेपी जो सर्व गात्रीं ॥ मंदाकिनीजळें शिवमंत्रीं ॥ तो सर्वां वंद्य जाण जगत्रीं ॥ शिवासारिखा ॥१०५॥
तया कोणी नमस्कार करी ॥ तयाचे चरण वंदिजे शिरीं ॥ तो कैलासी चंद्रार्कवरी ॥ वसे शिवाजवळी पूर्वजांसीं ॥१०६॥
स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ ऐसी हे विभूति प्रिय शूळपाणी ॥ हे जन्मली तृतीयलोचनीं ॥ ऐसें एका प्रलयीं जाहालें ॥१०७॥
षण्मुख म्हणे गा मुनि परियेसीं ॥ या विभूतीची उत्पत्ति झाली ऐसी ॥ या विभूतीनें तारिले महादोषी ॥ म्हणोनियां प्रिय शिवा ॥१०८॥
विभूतीचे पवाडे त्रिभुवनीं ॥ हे जय करी गा मृत्यूपासुनी ॥ विभूतीनें हरिले यमाजवळुनी ॥ पंचमहादोषी ॥१०९॥
अगस्तीसी म्हणे शिवसुत ॥ परियेसीं विभूतीचा वृत्तांत ॥ पंचमहादोषी जाहाले जी प्राप्त ॥ कैलासपदासी ॥११०॥
ऐसा विभूतीचा अगाध महिमा ॥ श्रोतयां वदे शिवदास गोमा ॥ सत्य अनृत मज करोनि क्षमा ॥ कथा परिसा पुढरीं ॥१११॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते विभूतिमाहात्म्यवर्णनं नामैकपंचाशत्तमाध्यायः ॥५१॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥    ॥ शुभं भवतु ॥     ॥ श्रीरस्तु ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP