मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ५२ वा

काशीखंड - अध्याय ५२ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आतां तो कैसा पंचमहादोषी ॥ जो विभूतीनें नेला कैलासीं ॥ स्वामी म्हणे अगस्तिऋषी ॥ तो ऐका आतां ॥१॥
दंडकारण्यीं दक्षिणदेशीं ॥ वोलागरनगर ॥ पुण्यपुरीसी ॥ ते पूर्वीं नेली शिवें कैलासीं ॥ ते कथा सांगों आतां ॥२॥
तेथें मधुरशया नामें ब्राह्मण ॥ ज्ञातिभ्रष्ट होता वेदविहीन ॥ महादुराचारी पितृन्घ ॥ पंचमहादोषी तो ॥३॥
जैं तो उद्भवला मातृउदरीं ॥ तैं सुत जाहाला कुयोगावरी आणि त्याचे जन्मदिनांतरीं ॥ होतें अशुभ लग्न ॥४॥
ऐसा तो द्रोही जाहाला सप्तव्यसनी ॥ तो ज्ञातिभ्रष्ट केला गोत्रजांनीं ॥ गोहत्या ब्रह्महत्या मातृगमनी ॥ इत्यादि पंचमहादोषी ॥५॥
त्यासी जन सांगती सिद्धयोग ॥ परी तो न सांडी अमार्ग ॥ जैसा दिव्यांबरें सांडोनि मातंग ॥ मस्तकीं घाली धुळी ॥६॥
असो आतां तयाचा दोषाचार ॥ बहुतां उदकीं नि भिजे पाथर ॥ जैसा इक्षूजवळी पांगार ॥ न घेईचि गुण ॥७॥
जैसें क्षीरामृतें प्रक्षाळितां शिष्ट ॥ परी तें न घे क्षीरस्वभाव दग्ध काष्ट ॥ तैसा बहुप्रकारें उपदेशिला दुष्ट ॥ परी न घेचि सत्त्वगुण ॥८॥
ऐसा तो दुराचारी दोषी ॥ कुलांगना स्त्रिया अभिलाषी ॥ परी द्रोह करीतसे गोत्रमित्रांसी ॥ द्रव्यतस्कर ॥९॥
मग तयाचे गोत्रबंधु असतां ॥ देशावरा निघाले द्रव्यहितार्था ॥ मग तो दुष्ट त्यांसंगतीं स्वार्था ॥ मार्ग क्रमिता जाहाला ॥१०॥
मग त्या गोत्रजांचें द्रव्यचोर ॥ मार्गीं आडवा ठाकला तस्कर ॥ तेणें गोत्रपुरुषां केला शस्त्रमार ॥ हारविलें भांडवल ॥११॥
मग कोणीएक गेला पळोनी ॥ त्या नगरीं बोभाटला दीर्घध्वनीं ॥ मग घांवणेंकरी त्या खष्ट वनीं ॥ पवले वेगेंसीं ॥१२॥
त्यांहीं धरिला तो गोत्रहत्यारा ॥ मागुती हस्त आकर्षोनि आणिला नगरा ॥ मग घालवोनिया तस्करा ॥ टाकिला तो स्मशानीं ॥१३॥
ऐसा मधुरशया दोषी ॥ कोणी संस्कार नेदी त्यासी ॥ श्वान-जंबुक-वायसीं ॥ अव्हेरिला तो ॥१४॥
जैसे अंत्यजाचे कलेवरीं ॥ नातळती शुद्ध बह्मचारी ॥ तैसा तो अव्हेरिला मत्स्यआहारीं ॥ जंत्वादिकीं ॥१५॥
तया नगरीं लिंग स्थापित हर ॥ त्या लिंगा नाम संगमेश्वर ॥ तंव तेथें उतरले काशीकर ॥ सेतुबंधाचे पैं ॥१६॥
पंचसंवत्सर ॥ होते काशीवासी ॥ ते येते जाहाले स्वदेशासी ॥ नित्य नित्य योगंविण रवीसी ॥ जाऊं न देती सर्वथा ॥१७॥
तो सेतुबंधींचा धनेश्वर ॥ त्यांही मांडिला संगमेश्वरीं अध्वर ॥ तेणें वेंचिले द्रव्याचे भार ॥ सत्पात्रांसी पैं ॥१८॥
हविलीं नाना द्रव्यें मंत्रें ॥ तेणें जागरणें जाहालीं अहोरात्रें ॥ श्रवण पठण जाहालीं शिवस्तोत्रें ॥ त्या संगमेश्वरीं ॥१९॥
ऐसी करूनियां यागस्थिती ॥ ते काशीकर स्वदेशा जाती ॥ मग देवद्वारीं विभूती ॥ होती मंत्रसिद्ध यागाची ॥२०॥
तंव ग्रामश्वापदें आलीं संगमेश्वरीं ॥ त्यांहीं नैवेद्यपात्रें भक्षिलीं देवद्वारीं ॥ मग चरणस्पर्श विभूतीवरी ॥ आसनें केलीं श्वानी ॥२१॥
अहोरात्र होते यागस्थानीं ॥ मग दोषी पडला होता स्मशानीं ॥ तेथें कलह मांडिला श्वानीं ॥ धांविन्नले स्मशाना ॥२२॥
दोषी अवन्घाण केला नासापुटीं ॥ मग उरीं पाय देऊनि ललाटीं ॥ जंव विभूती उमटली त्रिपुटीं ॥ दोषियाचे भाळीं ॥२३॥
तो श्वानचरण लागला भाळीं ॥ दोषी जाणोनि तो श्वान कंटाळी ॥ मग स्पर्श केला ते काळीं ॥ दोषियावरी त्या श्वानें ॥२४॥
तो ऊर्ध्वमुख पडला होता सहज ॥ त्याचे मुखीं विभूतीचें पडलें रज ॥ पहा हो कैसें ओढवलें कर्मबीज ॥ दोषिया श्वानाचें ॥२५॥
जैसी भागीरथी मोक्षाचें द्वार ॥ तयामध्यें असती जलचर ॥ त्यांसी तुळणें न महासुर ॥ अमरनाथासहित ॥२६॥
तैसी विभूति जाण मंदाकिनी ॥ वरी पडिले दोषी श्वान दोनी ॥ जैसा पूर्वभार्ग्ये चिंतामणी ॥ सांपडे संकासी ॥२७॥
जैसी ते अद्दश्य लाख अलंकार्रीं ॥ आणि रत्नमणी जडिजे तिजवरी ॥ पाहा ते वंद्य कैसी शिरीं ॥ कुलांगनांचिया ॥२८॥
पाहा पाहा दुष्ट पाथर ॥ त्यासी घडिला मूर्तीचा आकार ॥ तो जैसा नाम पावे हरि हर ॥ तेणें कवण तप केलें ॥२९॥
तैसा तो यमें जाणोनि गोत्रहत्यारा ॥ तो आधींचि नेला होता यमपुरा ॥ मग प्राप्त झाली त्याचिया शरीरा ॥ विभूतिक्रिया थोरी ॥३०॥
तंव पाहा हा कैलासाहून ॥ तेथें उतरलें दिव्य विमान ॥ सवें अप्सरा गंधर्वगायन ॥ आणिक गण शिवाचे ॥३१॥
नाना ध्वनीं वाजती दिव्य घंटा ॥ वोलागर नगराचिया वाटा ॥ विमान उतरलें क्षितितटा ॥ जेथें दोषिया आणि श्वान ॥३२॥
तेंही श्वान देखिलें जीवें स्वस्थ ॥ त्यासी विमानीं घालिती शिवदूत ॥ दोषी देखिला देहगलित ॥ तो नेला यमगणीं ॥३३॥
जीवहंसें अव्हेरिलें शरीरा ॥ त्याचिया भाळीं देखिलें भस्मभारा ॥ मग कोप चढला त्या शिववीरां ॥ देखोनियां दोषी मृत ॥३४॥
म्हणती शिवमंत्राची भस्मधूळी ॥ ती विभूति जयाचे भाळीं ॥ तो अन्ययात परी पृथ्वीतळीं ॥ समर्थ तोचि ॥३५॥
चंदनासी कैंचा ज्वरताप ॥ सूर्यासी केवीं अंधकार लेप ॥ विभूति ज्याचे भाळी त्यासी पाप ॥ न म्हणावें स्वमुखें ॥३६॥
पाहातां कुबेर अलकेश ॥ त्या गृहीं दरिद्राचा केवीं वास ॥ विभूति ज्याचे भाळीं त्यासी दोष ॥ कवण ठेवी त्रिभुवनीं ॥३७॥
शुद्ध कमळींचा जो मुक्ताहारी ॥ त्यासी बंधन केवीं वायसाघरीं ॥ विभूति ज्याचे भाळीं तो यमपुरीं ॥ केवीं भोगी कुंभीपाक ॥३८॥
जो शिवाचा उपासक भक्त ॥ जयासी विभूतीचा स्वार्थ ॥ त्यासी त्रिलोकीं बाधिता समर्थ ॥ ऐस कोण असे ॥३९॥
कल्पद्रुम तो केवीं निष्फळ ॥ चिंतामणि कैसा दुर्बळ ॥ विभूति ज्याचे भाळीं त्यासी काळ ॥ केवीं बांधों शके ॥४०॥
पहा हो तो कृतांत कैसा अन्यायी ॥ शिवाचा सखा नेला विभूतीचा स्नायी ॥ जैसा तो पतंग पंचत्वाठायीं ॥ न मानी अंगारातें ॥४१॥
म्हणोनि विभूती हा प्रलयअंगार ॥ कर्मसृष्टीसी करी संहार ॥ या विभूतीचा समर्थ विचार ॥ तो शंकरचि जाणे ॥४२॥
हे पवित्र विभूतीचे भाळीं ॥ हे शिवमंत्रें लेपिजे भस्मधूळी ॥ हाचि मंत्र जपतसे चंद्रमौळी ॥ त्रिअक्षरें विभूती ॥४३॥
एवढा विभूतीचा महिमा ॥ तो केवीं गम्य होय जी यमा ॥ विभूती अगोचर पुरुषोत्तमा ॥ विरिंचिप्रथमादिकां ॥४४॥
ऐसें अनुवादले शिवगण ॥ विमानीं घातले दोषी आणि श्वान ॥ मग उडालें दिव्य विमान ॥ कैलासंपथें ॥४५॥
श्वान-दोषियां घालोनि विमानीं ॥ शंकरापाशीं आणिले शिवगणीं ॥ मग प्रश्निता झाला शूलपाणी ॥ आपुलिया भृत्यांसी ॥४६॥
एक प्राणें स्वस्थ दुसर मृत ॥ मग कथिते झाले शिवदूत ॥ म्हणती कृतांतें नेला शिवभक्त ॥ विभूतिस्नायी जो ॥४७॥
तें परियेजा जी त्रिपुरारी ॥ जंबुकागृहीं गांजिला केसरी ॥ त्रैलोक्य दग्धी जो क्षणामाझारीं ॥ तो वन्हि वस्त्रीं बांधिला ॥४८॥
विपरीत वर्तलें जी शंकरा ॥ तटाकें वंद्य झालीं नदीश्वरा ॥ भागदानें पीडी गा अध्वरा ॥ हें आश्चर्य थोर पैं ॥४९॥
शिवा ऐसें हें न घडे कोणे काळीं ॥ परी जो भस्मराशि तुमचे भाळीं ॥ जयाचे ठायीं तो यमाजवळी ॥ पावतसे पीडा थोर ॥५०॥
इतुकें अनुवादले शिवगण ॥ कीं जैसा त्यांहीं शिंपिला हुताशन ॥ तैसा झाला क्रोधायमान ॥ विभूतिनिंदा ऐकोनि ॥५१॥
आतां अगस्ती वदे जी समर्था ॥ षडाननस्वामी अनाथनाथा ॥ पुढें कैसी विभूतीची कथा ॥ ते निरूपावी आतां ॥५२॥
म्हणोनि प्रार्थीतसे बद्धहस्तीं ॥ गणांसी आज्ञा करी पशुपती ॥ परी द्वादशभुज विकटमूर्ती ॥ क्षमा करीं मज ॥५३॥
स्वामी म्हणे गा ऋषि गुणज्ञा ॥ तपाधिकारिया महंता पूर्णा ॥ शिवआज्ञा झाली महाउग्र गणां ॥ तैं मी तेथें होतों ॥५४॥
चौसष्ट कोटी गण शिवाचे ॥ ते प्रौढीन सांगवे वाचे ॥ त्यांमध्यें मुख्य नामाचे ॥ ते सांगो संकलित ॥५५॥
नैगमु शैलादि बाणवरी ॥ भृंगी कीटी मणिमंत मांदार ॥ सारुदु पाताळ कंटेश्वर ॥ निजगण हे ॥५६॥
मतिमल्ल चेनमु गोल्हाण ॥ विशंकु गोकर्ण घंटाकर्ण ॥ नामनु मल्हान शंखध्वन ॥ आणिक शंकुकर्ण तो ॥५७॥
महाकुश मशानु शजेश्वर ॥ वडबाळ किन्नर जुखार ॥ पिसार आणि येल्हाकोत्तार ॥ जो मनु महावीर ॥५८॥
हळुकल्हार आणि सचरानन ॥ जय विजय सुलक्षण ॥ देवांग आणि गूढवाहन ॥ महागण शिवाचे ॥५९॥
तेजप्रकाश कुधराहस्त ॥ व्योमानन आणि वज्रदंत ॥ पवाडमल्ल पवन स्वहभूत ॥ मृत्युंजय महावीर ॥६०॥
ऐसीं नामें सांगतां गणांचीं ॥ विलंबता होतसे कथेची ॥ परी पत्रशाकाविरहित रुची ॥ नाहीं भोजनासी ॥६१॥
तरी स्कंदपुराणीं आहे संपूर्ण ॥ जे शिवाचे चौसष्ट कोटी गण ॥ हें संकलितमार्गें श्रवण ॥ केलें मीं श्रोतयांसी ॥६२॥
ऐसे गण शिवाचे बळाधिक ॥ त्यांमध्यें त्रिवर्ग मुख्यनायक ॥ स्वामी वीरभद्र लंबोष्ठक ॥ गिरिजामुंड तो पैं ॥६३॥
शिवसैन्य निघालें अपार ॥ मध्यें शंखभेरींचे महा गजर ॥ ते शिवाज्ञेनें पावले यमपुर ॥ महाजगडंबर गर्जती पैं ॥६४॥
ते यमपुरी दुर्घट आटक ॥ हुडे विस्तीर्ण असती शत एक ॥ तेथें उभे राहोनि यमाचे लोक ॥ प्रवर्तले महामारा ॥६५॥
तंव यमासी जाणविली मात ॥ म्हणे युद्धासी आला शिवसुत ॥ यमपुरीसी मांडिला कल्पान्त ॥ आतां विचारणा कैसी ॥६६॥
मग शिववीरांसी जाणोनि कृतांत ॥ म्हणे हे तरी करिती युगान्त ॥ महा सैन्य आलें अद्‍भुत ॥ हे सर्वथा न आवरती ॥६७॥
मग यमें पाचारिले पुरोहित ॥ जे शुभगुणी समस्त ॥ मग प्रश्निता झाला ही मात ॥ शिववीरांची त्यां ॥६८॥
अशुभमंत्री म्हणती जी यमा ॥ पहिलें वर्तावें संग्रामा ॥ शक्तीविण असोनि युद्धकामीं ॥ न कीजे आम्हीं ॥६९॥
मग ते शुभमंत्री वदते जाहाले ॥ शिववीरांसीं संग्राम न चाले ॥ हे कवण्या अर्थासी आले ॥ प्रश्न कीजे यमरायें ॥७०॥
मग धर्म प्रश्नी चित्रगुप्तासी ॥ हें शिवसैन्य आलें कवण कार्यासी ॥ येरू म्हणे जी तो महादोषी ॥ आणिला त्यांचा ॥७१॥
जो मधुरशया गोत्रहत्यारा ॥ तो तुम्हीं आणिला जी यमपुरा ॥ त्यास्तव येणें शिववीरां ॥ जाहालें येथें ॥७२॥
यम म्हणे तो महादोषी सर्वथा ॥ काय त्या शिवसैन्याची कथा ॥ वातस्पर्शें जैसी तरुपर्णें वृथा ॥ उडवीन व्योमीं ॥७३॥
म्हणोनि हाकारिले भृत्यजन ॥ चतुर्दश कोटी आलें सैन्य ॥ तरी तें आतां जिंकी कवण कैसें ॥ सांगों श्रोतयांसी ॥७४॥
प्रथम आला अधर्म अनाचार ॥ त्यांहीं देखिला शिवभार ॥ जैसा वन्हीपुढें गिरिवर ॥ देखिला कर्पूराचा ॥७५॥
पंचही रोग आले थोर ॥ चौर्‍यायशीं वात अष्टादश ज्वर ॥ आणि सन्निपात महावीर ॥ आले जी तेथें ॥७६॥
रसरोग आला जी महावीर ॥ पित्त दुर्गंधि अपस्मार ॥ तंव स्वामीसी प्रार्थी मुनिवर ॥ सांगा जी नामें त्यांचीं ॥७७॥
तंव स्वामी म्हणे ऋषि अगस्ती ॥ परियेसीं नामांच्या पंक्ती ॥ परी शिवसैन्यापुढें खपती ॥ केउता तो यमरावो ॥७८॥
आतां श्रेष्ठ जो रोमाधिक ॥ हाडीं कूर्म तारक ज्वरमर्क ॥ षड्‍गुणी नसु आदमानक ॥ महारोग हे ॥७९॥
जळगंडमाळा आनंदसार ॥ पीना कुरुसार आणि रुखार ॥ अजीर्ण किर्मी महाभार ॥ शूळ सैन्याचा ॥८०॥
स्वामी म्हणे गा तपाधिका सृष्टीं ॥ हा महाशूळभार यमापृष्ठीं ॥ आतां स्वसैन्य तें लक्षीं तटीं ॥ निरोपूं तुज ॥८१॥
पीतक आणि शिळरस मनु ॥ दंत शुधोकु आणि लंघनु ॥ आढळमन्मथु महादारुणु ॥ ज्वरसैन्य हें ॥८२॥
आतां यमाचें काळसैन्य कैसें ॥ कीं व्योमीं गंधर्वभार जैसे ॥ कीं सरितानीर समुद्रीं ऐसें ॥ शिवसैन्यावरी ॥८३॥
गतिभंग आणि पाणिपंकज ॥ तळस्तंभक आणि मधुपंकज ॥ मणिस्तंभक आणि उत्तंकराज ॥ असाध्य वीर ते ॥८४॥
काळसिंगाडु आणि कांसउर ॥ सव्याधी आणि आडव्याधीर ॥ अकळ विकळ आणि दाढाबधिर ॥ गुजुवड महावीर ॥८५॥
शिष्यासी म्हणे व्यास मुनिवर ॥ आतां असो हा महापसार ॥ कथेसी विलंब होतसे थोर ॥ वाढविला पाल्हाळ ॥८६॥
तरी स्वामी म्हणे अगस्तिमुनीप्रती ॥ सर्वही निरूपिलें नानायुक्तीं ॥ मग संकलितमार्गें श्रोतयांप्रती ॥ निरूपितों कथा ॥८७॥
शिवदास गोमा म्हणे स्पष्टवाणीं ॥ श्रोतयां प्रार्थितों करसंपुट जोडोनी ॥ हे कथा कर्मकाळांचा वन्ही ॥ परिसा जी बहु स्वार्थें ॥८८॥
॥ इति श्रीस्कंदयुराणे काशीखंडे दिवोदासचरिते विभूतिमाहात्म्यकथने मधुरशयाब्रह्मणोद्धरणं नाम द्विपंचाशत्तमाध्यायः ॥५२॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुंभ भवतु ॥ श्रीरस्तु ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP