काशी खंड - अध्याय १२ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
तरी तो मंदरगिरी कैसा ॥ स्तंभ दीजे पडत्या आकाशा ॥ कीं तो हिरण्यवर्ण जैसा ॥ ध्वज शिवरथींचा ॥१॥
कीं तो महापुण्यशील पर्वत ॥ लक्ष वरुषें होता ध्यानस्थ ॥ ह्रदयीं शिवनाम असे जपत ॥ अहर्निशीं ॥२॥
ऐसा तो मंदरगिरीं ॥ सागरीं घातला सुरीं असुरीं ॥ तरी ते सप्तसागर पृथ्वीवरी ॥ कैसे असती कोण कोठें ॥३॥
हे सप्तही कश्यपाचे कुमर ॥ ते साक्षात ईश्वरअवतार ॥ सांठवावया पृथ्वीचें नीर ॥ निर्मिले सृष्टिकर्त्यानें ॥४॥
कीं ते सप्तही अर्गल पृथ्वीतळीं ॥ एकवीस स्वर्ग त्या मेरुपोकळीं ॥ त्यां अगोचर दुर्गा चंद्रमौळी ॥ ब्रह्मांडपती तो ॥५॥
वडील तो क्षीरसमुद्र पूर्ण ॥ जो सप्तद्वीपवतीचें आवरण ॥ त्याची संख्या चौसष्ट लक्ष योजन ॥ स्कंदपुराणीं बोलिली ॥६॥
ऐसा तो संपूर्ण क्षीरार्णव ॥ उत्तर भागीं तो असे अपूर्व ॥ तेथें शेषशायी लक्ष्मीधव ॥ असे मध्यभागीं तो ॥७॥
दुसरा घृतोदनामा सागर ॥ तो बत्तीस लक्ष योजनें विस्तार ॥ ऐसा तो दुर्घर थोर ॥ ईशानभागीं जाण पां ॥८॥
तिसरा तो मधुदनामा सगुण ॥ षोडश लक्ष योजनें विस्तार विस्तीर्ण ॥ तो वायव्यकोणीं असे संपूर्ण ॥ महासागर जाण तो ॥९॥
चौथा दध्युदनामा जाण सुरस ॥ जेथें रत्नें पडिलीं चतुर्दश ॥ त्याचें प्रमाण लक्षिलें असे ॥ आठ लक्ष योजनें ॥१०॥
जो सुरासुरीं मथिलासे ॥ हा समुद्र असे पूर्वदिशे ॥ आतां पांचवा समुद्र असे ॥ आग्नेयदिशेसी ॥११॥
इक्षुरसोदनाम सागर पूर्ण ॥ चार लक्ष तयाचें प्रमाण ॥ सहावा तो दोन लक्ष योजन ॥ नीर नामें पश्चिमेचा ॥१२॥
दक्षिणेचा नामें लवणसागर ॥ एक लक्ष तयाचा पसर ॥ सवा लक्ष तयाचा विम्तार ॥ केला असे सूर्यवंशें ॥१३॥
नैऋतीदिशेशी नाहीं समुद्रवास ॥ तेथें राक्षसादिकांचा रहिवास ॥ ऐसा सप्तसागरांचा संख्यांश ॥ असे पूर्ण पुराणांतरीं ॥१४॥
आठ लक्ष जो दध्युदधि ॥ मंदरपर्वत घालूनि तयामधीं ॥ मथिती रत्नांचिया शुद्धी ॥ सुर असुर कैसे ते ॥१५॥
विष्णूनें पाचारिला फणिवर ॥ तो आला सहस्त्रमुखी विषधर ॥ पर्वत वेढूनि कद्रुकुमर ॥ झाला पोंवळी गिरीची ॥१६॥
पूर्वपारीं झाले दितीचे कुमर ॥ पश्चिमपारीं अदितीचे कुमर ॥ शेषमुख विषें दुर्धर ॥ तें करीं दिधलें दैत्यांचें ॥१७॥
सिद्धासनीं बैसोनि त्रिनयन ॥ पाहातसे सागराचें मथन ॥ शिवगण ब्रह्मादिक संपूर्ण ॥ सेवेसी तिष्ठती जवळिकें ॥१८॥
तो सागर आठ लक्ष योजन ॥ मध्यें गिरि उभा नाभिप्रमाण ॥ उदधि मथितां पडेल गगन ॥ म्हणोन झाला स्तंभ कीं ॥१९॥
चतुर्भुजांचीं मिळालीं माजरीं ॥ शक्ती स्फुरलिया सुरासुरीं ॥ ऐसें मथन मांडिलें सागरीं ॥ तें परिसा कैसें आतां ॥२०॥
सागराची केली कुरवंडी ॥ मंदराचळ तो रविदांडी ॥ मग मथिते झाले महाप्रौढी ॥ सुर असुर ते ॥२१॥
मथन नव्हे तो प्रळय जैसा ॥ उदक उसळलें आकाशा ॥ सागरासी मांडिला वळसा ॥ जळजंतूंचा पूर्ण क्षयो ॥२२॥
तेथें पर्वताचे वातभ्रमणीं ॥ नक्षत्रें रिचवती समुद्रजीवनीं ॥ कडकडिलें समुद्राचें पाणी ॥ थरारला मेरु तो ॥२३॥
घुमघुमला तो दधिसागर ॥ तेणें शब्दें गर्जे अंतर ॥ बधिर झाले दिशाकुंजर ॥ महाघोषें तेधवां ॥२४॥
थरथरलें अवघें भूमंडळ ॥ भ्रमें भोंवे दिशांतराळ ॥ थरथरलें अष्टकुळाचळ ॥ खचती श्रृंगें तयांचीं ॥२५॥
तें उदक उसळलें आकाशा ॥ तेणें व्यापिल्या दाही दिशा ॥ वरुण प्रळयीं करी जेवीं वळसा ॥ काय होईल तें नेणवे ॥२६॥
फेन उद्भवला सागरीं ॥ तेणें वेष्टिला असे मंदरगिरी ॥ कीं तो वृष्टिकर गगनोदरीं ॥ प्रलयकालीं मेघ जैसा ॥२७॥
जैशीं अभ्रपटलें शोभती निराळीं ॥ तैसा फेन उद्भवला जळीं ॥ विष्णुसद्दित मंदराचळीं ॥ वेष्टिता झाला तेधवां ॥२८॥
तेथें मथनाची गर्जना ॥ कंप सुटला त्रिभुवना ॥ तेथें विजूचिया प्रमाणा ॥ कैसें लक्षिलें नेणवे तें ॥२९॥
जे विष्णुभुजांचीं दोन मांजरीं ॥ भ्रमतां पर्वताचिया घसरीं ॥ वन्हिज्वाला गगनोदरीं ॥ जैशा प्रळयसौदामिनी ॥३०॥
नावेक उपमा गमली थोरी ॥ फेन नव्हे तो मेघ श्रीहरी ॥ तेथें विद्युल्लता चमत्कारीं ॥ झळके पीतांबर ॥३१॥
आतां असोत हे द्दष्टांतगुण ॥ तेथें कैशीं उमगलीं रत्न ॥ प्रथम उद्भवलें कवण ॥ तें परिसा आतां ॥३२॥
प्रथम निघालें हालाहल ॥ त्रैलोक्यनाशक सुनीळ ॥ तें दग्ध करूं शके ब्रह्मांडगोळ ॥ क्षणमात्र न लागतां ॥३३॥
तेथें ओढितां देव दैत्य सकळा ॥ शेष रगडिला वक्षस्थळा ॥ तेणें महाविषाच्या गरळा ॥ वमी समुद्रमथनीं तो ॥३४॥
तों सहस्त्रमुखें विष वमत ॥ तीं दोनी हालाहलें झालीं मिश्रित ॥ तीं कोणी न घेती देवदैत्य ॥ अग्नि लागला व्योमीं तो ॥३५॥
तेणें तापलें नभमंडळ ॥ म्हणोनि झालें सुनीळ ॥ गौरवर्ण होता गोपाळ ॥ तैं झाला तोही कृष्णवर्ण ॥३६॥
ऐसी जे महाविषलहरी ॥ तीतें कोणी न अंगिकारी ॥ मग उठिला तो त्रिपुरारी ॥ तें विष भक्षावयासी ॥३७॥
तेणें विभूती टाकिली मंत्रून ॥ मग तें विष केलें प्राशन ॥ जरी न स्वीकारिता तरी हें त्रिभुवन ॥ दग्ध होतें क्षणमात्रें ॥३८॥
तें स्वलीलें राखी कंठीं ॥ महाविष धुर्जटी ॥ तेणेंचि गुण नाम झालें त्रिकुटीं ॥ नीलकंठ ऐसें जाण पां ॥३९॥
ऐसें त्रिलोकीं दुर्धर काळकूट ॥ तेणें सुनीळ झाला शिवाचा कंठ ॥ आसनीं बांधूनि जटाजूट ॥ बैसला त्रिपुरांतक तो ॥४०॥
दैत्य ओढिती शेषाचें मुख उच्च ॥ देवीं धरिलें त्याचें अधम पुच्छ ॥ हरिदोर्दंड ते काळपाश साच ॥ पडिले पर्वतकंठीं ॥४१॥
तेणें कांपला गिरिवर ॥ रगडलें शेषाचें उदर ॥ कढों लागला तो सागर ॥ एकचि कल्पान्त ओढवला ॥४२॥
मग निघाल्या अष्टनायिका ॥ रंभा सुकेशी आणि मंजुघोषा ॥ तिलोत्तमा उर्वशी मेनिका ॥ चन्द्रकान्ती लीलावती ॥४३॥
निघाल्या अष्टनायिका ॥ रंभा सुकेशी आणि मंजुघोषा ॥ तिलोत्तमा उर्वशी मेनिका ॥ चन्द्रकान्ती लीलावती ॥४३॥
निघाला तो उच्चैःश्रवा वारू ॥ रथ कामधेनु कल्पतरू ॥ धन्वंतरी कौस्तुभ कुंजरू ॥ चतुर्दंत ऐरावत ॥४४॥
ऐरावताच्या चरणीं वेष्टिली ॥ ते समुद्रमथनीं निघाली ॥ तें सोळावें रत्न नागवेली ॥ नेली जाण अमरपुरासी ॥४५॥
हे निघाली समुद्रमथनीं ॥ ते नव्हे शेषाची नंदिनी ॥ वेष्टिली असे नागचरणीं ॥ म्हणोनि नागकन्या हे ॥४६॥
तैं मंदराचळाचा भार जाणोनी ॥ पृथ्वीतळ बुडों पाहे जीवनीं ॥ मग विष्णूनें कूर्मरूपें मेदिनी ॥ धरिली तेव्हां पृष्ठीवरी ॥४७॥
दुर्दशा आणि लक्ष्मी सुंदरी ॥ निघाल्या मथितां सागरीं ॥ मग रत्नांचे विभाग करी ॥ विरिंचिनाथ तो ॥४८॥
लक्ष्मी समर्पिली विष्णूसी ॥ दुर्दशा दिधली उद्दालकासी ॥ मग ते देवांमाजी भिक्षेसी ॥ निघतां कोणी न अंगीकारी ॥४९॥
मग भिक्षा घातली चतुराननें ॥ महाविषातें प्राशिलें त्रियनयें ॥ ऐशीं विभागिलीं दिव्य रत्नें ॥ चतुर्दश जीं कां ॥५०॥
मग देव स्थिर झाले मथनीं ॥ समस्त बैसले पंक्ती करोनी ॥ अमृत वोगरी सिंधुनंदिनी ॥ समस्त देवगणांसी ॥५१॥
तंव बोलता झाला सहस्त्रनयन ॥ जंव श्रुत नव्हे दैत्यांकारण ॥ तंव तुम्ही करा अमृतपान ॥ बहु त्वरा करोनियां ॥५२॥
मथन राहिलें जाणोनी ॥ शेष गेला पाताळभुवनीं ॥ मग समस्त दैत्य मिळोनी ॥ विचारिती राहूसी ॥५३॥
तंव राहू बोले वचना ॥ देव पीयूषा वंचितील आपणां ॥ मी पाहूनि येतों सुरगणां ॥ तुम्हीं असावें येथेंचि ॥५४॥
मग राहू उसळला गगनोदरीं ॥ आला उदधीचिया पैलपारीं ॥ अद्दश्य होऊनि देवांमाझारीं ॥ पाहिलें त्यांचें चरित्र ॥५५॥
पंक्तीं बैसले सुरवर ॥ समस्त करिती पीयूषाआहार ॥ ऐसें देखोनि राहु असुर ॥ विचारित निजमानसीं ॥५६॥
जरी सांगूं जावें दैत्यांसी ॥ तरी अप्राप्त होईन षीयूषासी ॥ आतां अमृत घेऊनि त्वरेंसीं ॥ मग जाणवूं दैत्यांतें ॥५७॥
मग राहु देवपंक्तींत बैसला ॥ गुप्तरूपें अमृतप्राशन करू लागला ॥ तंव तो अमृतचोर देखिला ॥ सोम-सूर्यें तेधवां ॥५८॥
त्यांहीं विष्णूसी दाविली खूण ॥ कीं राहू करितो अमृतप्राशन ॥ मग मोकलिता झाला सुदर्शन ॥ राहूवरी पद्मनाभ ॥५९॥
तेथें छेदिलें राहूचे मस्तकासी ॥ तंव तें उडालें आकाशीं ॥ सांगों गेलें असुरांसी ॥ पूर्वपारीं उदधीच्या ॥६०॥
मग त्या राहूचें रुड थोर ॥ उठावलें जैसा महागिरिवर ॥ जेणें पराभविले सुर॥ इंद्रादिक सर्वही ॥६१॥
मग हरीनें उपाय योजूनी ॥ रुंड स्थिर केलें मेदिनीं ॥ तंव आले जों समग्र उसळूनी ॥ महाअसुर ते ॥६२॥
मग काय केलें शार्ङ्गधरें ॥ पूर्ण मोहक रूप धरिलें जी त्वरें ॥ मग त्या मोहिनीरूपें एकसरें ॥ गेला असुरांजवळिकें ॥६३॥
मोहिनीरूप देखोनि सुंदर ॥ कामें भुलले ते असुर ॥ त्यांसी अमृताचा स्मर ॥ असेना देहीं सर्वथा ॥६४॥
मग म्हणे मोहिनी असुरांसी ॥ म्यां अमृत आणिलें तुम्हांसी ॥ ऐसें बोलोनि मौनें दैत्यांसी ॥ पाजिली मदिरा तियेनें ॥६५॥
तंव भुलले कामबाणीं ॥ मग ते अद्दश्य झाली मोहिनी ॥ तेव्हां देवांसी म्हणे चक्रपाणी ॥ संहारावें दैत्यकुळा ॥६६॥
महामदिरें मातले दैत्य ॥ तेणें झाले महाउन्मत्त ॥ मग आपुलाचि आपण घात ॥ करूं प्रवर्तले सर्वही ॥६७॥
त्रिशूल हाणिती एकमेकांतें ॥ घायें काढिती पोटींचीं आंतें ॥ पर्वततुल्य पडती प्रेतें ॥ धरणीवरी ॥६८॥
उचलिती महापर्वत शिरीं ॥ ते टाकिती एकमेकांवरी ॥ ऐसी मांडिली महामारी ॥ आपणचि आपणां ॥६९॥
मग जे कांहीं शेष उरले ॥ ते प्रमथीं सर्व संहारिले ॥ ऐसे साठ कोटी आटले ॥ दहा घटिकेमाझारी ॥७०॥
जरी सांगावा युद्धविस्तार ॥ तरी कथेसी होईल उशीर ॥ म्हणूनि संकलित सांगितलें साचार ॥ संपविले दैत्य सर्वही ॥७१॥
असो संपले दैत्य दारुण ॥ त्यांत महायोद्धे सांगों येथून ॥ तेथें ब्रह्मा विष्णु त्रिनयन ॥ मानविले तया राहूनें ॥७२॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ आतां राहू येईल संग्रामासी ॥ पुढें राहूची उत्पत्ति कैसी ॥ तेही सांगूं तुजलागीं ॥७३॥
श्रोतयां विनवी शिवदास गोमा ॥ श्रवण कीजे राहूचिया संग्रामा ॥ तो परिसिल्या पुण्यमहिमा ॥ नासती दोष जन्माचे ॥७४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे समुद्रमथनं नाम द्वादशाध्यायः ॥१२॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥
॥ इति द्वादशाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 27, 2011
TOP