काशीखंड - अध्याय ५४ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ अगस्ति वदे जी स्वामि स्कंदा ॥ तूं मज प्रेताचिया अमृतकंदा ॥ मज रंकाचे ह्रदयींच्या आनंदा ॥ कर्ता स्वामिया ॥१॥
तूं मज अनाथासी प्रतिपाळिता ॥ तूं मज अतिथीचा पूर्णदाता ॥ माझिया वियोगक्षुधेसी हर्ता ॥ कल्पद्रुम तूं ॥२॥
माझिया मनोमीनाची आवड ती ॥ तेथें तूं पूर्ण सरितापती ॥ कीं तूं जैसा अशक्ताचिये वृत्ती ॥ पूर्णघन स्वामी ॥३॥
तूं मज रंकाचिया राजछत्रा ॥ मज बोधिसी सगुण मित्रा ॥ महाश्रीमंतांचिया पूर्णचरित्रा ॥ षडानना स्वामी ॥४॥
पंचक्रोशी प्रदक्षिणे तरणी ॥ द्वादश रूपें जाहालसे द्वादश स्थानीं ॥ तो मंदराचळासीं परतोनी ॥ न क्रमी मागुता ॥५॥
आतां सांबादित्याची कथा ॥ ते मज निरूपा जी अनाथनाथा ॥ सांबासी किमर्थ जाहाली व्यथा ॥ पितृशापाची ॥६॥
स्वामी म्हणे गा महामुनि अगस्ती ॥ तुज सुचली शास्त्रश्रवणयुक्ती ॥ तरी कथा परिसावी पुढती ॥ सांबादित्याची ॥७॥
हे कथा पूर्वीं भवानीप्रती ॥ भविष्य कथिलें होतें पशुपतीं ॥ तेचि श्रवण गा तुजप्रती ॥ करावी हा मनोदयो ॥८॥
तरी परियेसीं गा महामुनी ॥ क्षीराब्धीचे तटीं पुण्यजीवनीं ॥ महाक्षेत्र असे पुण्यधामिनी ॥ पूर्वीं द्वारावती ते ॥९॥
तेथें सौभाग्यें असतां श्रीअनंत ॥ मग नारद आला ब्रह्मसुत ॥ त्यासी उपचारिता जाहाला कांत ॥ सिंधुबाळीचा ॥१०॥
ऐसा सर्वही त्या यादववीरीं ॥ प्रेमें तो सन्मानिला ब्रह्मचारी ॥ श्रीहरीचिया कुमरांकुमरीं ॥ वंदिला नारद ॥११॥
ऐसें समस्तांचें भावपूर्वक ॥ नारद पाहे भक्तिकौतुक ॥ त्यांमध्यें गर्वाढय देखिला एक ॥ नारदें तेणें ॥१२॥
तो सांबनामें हरिकुमर ॥ अति बलिष्ठ अति सुंदर ॥ यादवांमध्यें सुंदर वीर ॥ काम तोही ऐसा नाहीं ॥१३॥
तों लावण्यसौंदर्याचेनि अभिमानें ॥ नम्र नव्हेचि नारदाकारणें ॥ मग हरावया त्याचें उसणें ॥ काय केलें नारदें ॥१४॥
कोणा एका समयाचे अवसानीं ॥ हरीची जांबवती कामिनी ॥ तो सांब गेला तियेच्या भुवनीं ॥ सहज क्रीडावयासी ॥१५॥
मग नारदें देखिलें तयासी ॥ तेणें जाणविलें श्रीअनंतासी ॥ म्हणे सांब कुमर जांबवतीसीं ॥ रत जाहाला हरी ॥१६॥
तंव नारद आणि चक्रपाणी ॥ निघते जाहाले तिचे भवनीं ॥ तंव सांब देखिला जी नयनीं ॥ श्रीगोपाळें तेथें ॥१७॥
तंव कोप उद्भवला शार्ङ्गधरा ॥ शाप दिधला सांब कुमरा ॥ कुब्जकुष्ठी होसी अविचार ॥ अवलक्षणी तूं ॥१८॥
मग मंदिरामध्यें आला श्रीपती ॥ त्यानें अभुक्त देखिली जांबवती ॥ दोष नाहीं ऐसें जाणोनि चित्तीं ॥ काय केलें नारायणें ॥१९॥
तंव बोलिली ते महासुंदरी ॥ अपत्य कां शापिलें श्रीहरी ॥ ज्ञानें पाहे तंव शरीरीं ॥ सांब असे निर्दोष ॥२०॥
मग कट्कटा करी शार्ङ्गधर ॥ वृथाचि शापिला कुमर ॥ कैसा रे अनृत मुनिवर ॥ मग विचारी श्रीअनंत ॥२१॥
चक्रपाणी कांहींएक जंव स्मरत ॥ म्हणे हें तंव नारदाचें मनोगत ॥ तंव नारद होऊनियां गुप्त ॥ आक्रमिता जाहाला ॥२२॥
मग हरि म्हणे त्या कुमरासी ॥ आतां तूं जाय वेगें वाराणसीं ॥ तेथें पुरश्चरणें तुझिया दोषासी ॥ निष्कृति होईल सत्य पैं ॥२३॥
मग पितृआज्ञा स्वीकारूनी ॥ सांब निघाला आनंदवनीं ॥ तेणें वंदिली स्वर्गतरंगिणी ॥ पापनाशिनी सिता ॥२४॥
ऐसें पितृशापें सांबासी ॥ कुष्ठकुब्जत्व प्राप्त जाहालें त्यासी ॥ जैसा पूर्णकळीं असतां शशी ॥ काळवंडे ग्रहणीं ॥२५॥
कीं सोज्ज्वळ जैसी रत्नदीप्ती ॥ अकस्मात वरपडी होय हुतीं ॥ मग ते मंद होय जगतीं ॥ प्रकाशाविषयीं ॥२६॥
पाहा हो सांबाचें होतें अति सौंदर्य ॥ परी नाहीं सत्त्वगुणधैर्य ॥ अभिमानें प्रहरिलें जी श्रीवीर्य ॥ लावण्याचें पैं ॥२७॥
शुद्धामृतभोजनीं हरळ ॥ कीं श्रीसंपन्न गृहीं संचर काळ ॥ तैसा अभिमान अमंगळ ॥ न अंगीकारिजे भल्यांनीं ॥२८॥
सांबा आलें जी अवलक्षण ॥ जैसा सुगंधें सांडिला चंदन ॥ कीं क्षीरामृतासी विध्वंसून ॥ लवणांशु जो ॥२९॥
म्हणोनि सर्व शुभ सामुद्रिकासी ॥ अहंकार साभिमान असाध्यासी ॥ आतां असो या द्दष्टांतमार्गासी ॥ जाणती बहुश्रुत ॥३०॥
मग आला वाराणशीसी हरिसुत ॥ पितुशापें जाहालासे दुःखित ॥ जैसा तो अमरेश रत्नें विरहित ॥ पावला पीडा ॥३१॥
तैसा तो गुणरत्नीं अव्हेरिला ॥ सर्व गुणभाव विसरला ॥ जैसा तो रविउदयींचा काळवटला ॥ रोहिणीपति तो ॥३२॥
तेणें मणिकर्णिकेचें केलें स्नान ॥ विश्वनाथासी केलें अभिवंदन ॥ मग दिव्य स्नपन कमळीं पूजन ॥ समर्पिलें शिवासी ॥३३॥
दक्षिणमानसीं जो वैद्येश्वर ॥ तेथें असे तो दिवाकर ॥ त्या सांबादित्यासी कृष्णकुमर ॥ पूजिता जाहाला ॥३४॥
पंचरात्र केलें जागरण ॥ पक्षमासव्रत उपोषण ॥ ऐसा आराधिला पंचानन ॥ षण्मास दिनत्रय ॥३५॥
सांबाची देखोनि पूर्णभक्ती ॥ मग प्रसन्न झाला तो गंभस्ती ॥ सांबासी दिधली दिव्य ज्योती ॥ पूर्वसौंदर्य जें ॥३६॥
तेणें सांबासी जाहाली पूर्णसिद्धी ॥ प्रवर्तली सद्भावज्ञानबुद्धी ॥ तो सांबादित्य सौंदर्याचा निघी ॥ तेणें केला निर्दोष ॥३७॥
जैसा तो विषधरें डंखितां ॥ विनाश पावे ज्ञानस्मरणाची योग्यता ॥ मग अमृतवल्ली प्राप्त होतां ॥ स्मरती गुणज्ञानें ॥३८॥
तैसा दोषतमांतून सुटला ॥ तो सांबवीर सौंदर्य पावला ॥ मग पुनरपि क्रमिता जाहाला ॥ पुरी द्वारावतीसी ॥३९॥
षण्मुख म्हणे जी ऋषिनाथा ॥ ऐसी हे सांबादित्याची कथा ॥ हे श्रवण जाहालिया महाव्यथा ॥ अवलक्षणाची हरे ॥४०॥
त्या सांबादित्याचें दर्शन ॥ मंत्रविधीनें कीजे पूजन ॥ तरी तो अवलक्षणी लक्षण ॥ प्राप्त होय तत्काळ ॥४१॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ ऐसा तो सांबादित्य काशीस्थानीं ॥ तैसाचि तो वृद्धादित्यतरणी ॥ अविमुक्तीसी ॥४२॥
ते कथा सांगतां सविस्तर ॥ वृथाचि कथेसी होईला विस्तर ॥ मंदराचळीं राहिला शंकर ॥ ते कथा पुढें असे ॥४३॥
अंतर्गृहींचिया प्रदक्षिणेसी ॥ तो वृद्धादित्य असे गा अगस्तिऋषी ॥ तो पूजिलिया प्रप्ति कैसी ॥ ते परियेसीं गा अगस्ती ॥४४॥
जो करी त्या वृद्धादित्याचें दर्शन ॥ तरी वृद्ध पुरुष होय तरुण ॥ ऐसा तेथें पंचाननें वर पूर्ण ॥ बोलिला असे ॥४५॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ ऐसा द्वादश रूपें तरणी ॥ ते विश्वनाथाचिये निजधामिनीं ॥ रक्षक होय तो ॥४६॥
आतां मंदराचळीं उमाकांत ॥ काशीवियोगें जाहालासे व्यथाभूत ॥ मग पवचारिल आपुले भृत्यु ॥ निजगण जे ॥४७॥
त्यांसी वदता जाहाला शूलपाणी ॥ अविमुक्तीसी पाठविल्या योगिनी ॥ मग पाठविला तो दिनमणी ॥ तोही राहिला तेथेंचि ॥४८॥
दिवोदासाचे अपार सामर्थ्य ॥ मग त्यांचे व्यर्थ जाहालें मनोरथ ॥ परी ते न म्हणिजे गा व्यर्थ ॥ जे राहिले काशीपुरीं ॥४९॥
आतां कवण असे तुम्हांमाझारी ॥ जो त्या दिवोदासासी विघ्न करी ॥ मग प्रार्थिला तो चौशिरी ॥ विरिंचिदेवो ॥५०॥
विरिंचि वदे जी विश्वंभरा ॥ मी विघ्न करीन त्या नृपवरा ॥ मज आज्ञापिजे त्रिशूलधरा ॥ त्रिपुरांतका ॥५१॥
तुम्हांसी काशीवियोगाचा खेद ॥ जी तेथींचा मी पूर्णवैद्य ॥ सर्व देवांसी करीन आनंद ॥ विघ्न करीन दिवोदासा ॥५२॥
शिव म्हणे गा सृष्टिकर्तया ॥ कैसें विघ्न करिसी त्या रियुंजया ॥ स्वधर्में वर्तत असे त्या ठाया ॥ म्हणोनि देव अशक्त ॥५३॥
तो जरी आचरता अनाचार ॥ तरी कायसा दीर्घ विचार ॥ तो पूर्णसत्त्वाचाचि अंकुर ॥ सत्त्वें राखिली ते काशी ॥५४॥
म्हणोनि एवढा गा संदेह ॥ ऐसें वदाला तो सदाशिव ॥ अनाचाराचे छिद्रा पाहोनि ठाव ॥ देखिजे विचारणा ॥५५॥
ऐसें अनुवादला त्रिनयन ॥ ती आज्ञा स्वीकारी चतुरानन ॥ मग क्षितीं मस्तक ठेवून ॥ निघाला ब्रह्मा ॥५६॥
प्रदक्षिणा केली विश्वंभरा ॥ शिवें आज्ञा दिघली सृष्टिकरा ॥ तो निघाला काशीपुरा ॥ हंसवहनीं विधि पैं ॥५७॥
ऐसा मंदराचळाहूनि विधाता ॥ काशीमार्ग जाहाला क्रमिता ॥ तेणें कैसी देखिली शैलदुहिता ॥ जान्हवी ते ॥५८॥
हिमाद्रीपासोनि प्रवाहिली ॥ कीं ते गिरिपाठारींची अमृतवल्ली ॥ दीषाब्धि नाशावया उद्भवली ॥ मंदाकिनीं पैं ॥५९॥
कीं तो गिरिपाठारींचा वल्ही ॥ दोषकाष्ठांतें दग्धीतसे म्हणोनि ॥ तें देखता जाहाला चतुराननी ॥ दिव्य ज्योति जैसी ॥६०॥
नातरी नव्हे द्दष्टांतमार्ग ॥ जान्हवी नव्हे जी तरंग ॥ तेथें कर्मजंतु पडे पतंग ॥ तो होय दग्ध सृष्टीं ॥६१॥
जान्हवीजळीं जो पडे प्राणी ॥ तो तत्काळ होय मुक्त भुवनीं ॥ तो देवां मान्य कैलासभुवनीं ॥ पूर्वजांसहित ॥६२॥
ऐसी देखिली ते पुण्यसरिता ॥ ते गिरिस्वामीची दुहिता ॥ तंव बद्धकरें मौळीं वंदिता ॥ जाहालासे ब्रह्मा ॥६३॥
म्हणे क्रमिली दोषाची निशी ॥ आतां उदय जाहाला पुण्यसूर्यासी ॥ जें दर्शन जाहालें सितेसी ॥ महासामर्थ्यें ॥६४॥
सफळ माझें सृष्टिकरण ॥ सफळ माझें तप अनुष्ठान ॥ आजन्मपर्यंत सफत यज्ञ ॥ जे देखिली सिता ॥६५॥
स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ विधि स्तवी ते पुण्यजीवनी ॥ हे गंगा व्यापक त्रिभुवनीं ॥ जना उद्धरावया ॥६६॥
हेचि भोगावती पाताळभुवनीं ॥ तेथें हाटकेश्वर शूलपाणी ॥ उद्भवला सप्तपाताळें भेदूनी ॥ अगाध लिंग तें ॥६७॥
मृत्युलोकीं सप्तद्वीपवती ॥ हे गंगा व्यापक सर्व क्षितीं ॥ षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ तें कैसें आतां ॥६८॥
श्वेतद्वीपीं इचें नाम नलिनी ॥ तेथें व्यापिली आहे पुण्यजीवनीं ॥ शाल्मलिद्वीपीं हें नामें पावनी ॥ नरमानवांसी ॥६९॥
क्रौंचद्वीपीं नामें शुभोदका ॥ कौसल्यद्वीपीं नाम सुचक्षणिका ॥ सिंहलद्वीपीं गा ऋषिटिळका ॥ सिंधुनी नामें ॥७०॥
गोमेदद्वीपीं नामें हरिदिनी ॥ जंबुद्वीपीं नामें सिता पापनाशिनी ॥ ऐसी ही थोर शैलनंदिनी मर्त्य जंतूंसी आनंद ॥७१॥
विचारितां सप्तद्वीपांची प्रतिष्ठा ॥ परी जंबुब्दीपीं ही सिता श्रेष्ठा ॥ स्वर्गमोक्षांचा दारवंटा ॥ स्वर्गसरिता पैं ॥७२॥
विश्वनाथाची निजकामिनी ॥ तोचि तारकेश्वर जाहाला गगनीं ॥ हेचि गंगा तेथें मंदाकिनी ॥ अमरादिकांसी ॥७३॥
ऐसी हे गंगा त्रैलोक्यव्यापक ॥ ते विरिंचीनें वंदिली शुभोदक ॥ आनंद वर्तला सृष्टिकारक ॥ चतुर्मुखासी ॥७४॥
तेणें स्तविली सहस्त्रनामावळी ॥ सुशब्दें दीर्घस्वरें पुष्पांजळी ॥ म्हणे जय जय वो मूर्ति मंगळी ॥ सहस्त्रनामे तूं ॥७५॥
तूं विश्वनाथाची श्री सगुण ॥ तुझेनि जडजीवां उद्धरण ॥ तूं महापापियांसी पावन ॥ करिसी त्वरावंत ॥७६॥
तुझिया गर्भींचें पुण्यजीवन ॥ तें मुक्तिहिरण्याचें पुण्य जाण ॥ तुझिया उदकाचें जें आचमन ॥ तें अमृत भोजनातुल्य ॥७७॥
ऐसी ते गंगा सहस्त्रनामें स्तुती ॥ स्तवीत आहे सत्यलोकाधिपती ॥ म्हणे तूं प्रिय मौळीं शिवाप्रती ॥ घातलें साष्टांग ॥७८॥
मग तो गंगाजीवनीं विरिंचि सुज्ञान ॥ सारिता जाहाला सचैल स्नान ॥ तेथें स्थिर केलें हंसवहन ॥ जें जाहालें हंसतीर्थ ॥७९॥
प्रथम शौचकर्म सारिलें ॥ मग पादप्रक्षालन केलें ॥ मग मुखप्रक्षालन आरंभिलें ॥ दंतधावन पैं ॥८०॥
दंतधावनासी काष्ठ जाण ॥ स्थूल असावें अंगुष्ठप्रमाण ॥ दीर्घ तरी द्वादशांगुलें नेमून ॥ युक्तियुक्त केलें ॥८१॥
बदरीवृक्ष अथवा औदुंबरू ॥ जांबळी नारिंगी आम्रतरू ॥ आपामार्ग खर्जुरी हे सृष्टिकरू ॥ आरंभी दंतधावन ॥८२॥
मग आचमन करी सुभट ॥ नेसला दिव्यांबर श्वेतपट ॥ दर्भासनीं ठेविला मुकुट ॥ शिखेसी ग्रंथि घातली ॥८३॥
मग आपीं करिता जाहाला प्रवेश ॥ दक्षिणांजळीं घेऊनि उदकास ॥ मंत्रविधि करूनि सृष्टीचा अघीश ॥ पुनरपि करी आचमन ॥८४॥
पुनरपि उदक दक्षिणांजळीं ॥ अर्घ्य देता जाहाला व्योममंडळीं ॥ मग अधोमुख विधि जळीं ॥ समर्पीं अर्घ्य ॥८५॥
पुनरपि अर्घ्य दे व्योमभागीं ॥ मग अर्घ्य देताहे वामांगीं ॥ नाभिप्रमाण जळतरंगीं ॥ ठाकला विरिंचि ॥८६॥
स्वामी म्हणे गा मित्रावरुणसुता ॥ ऐसें सचैल स्नान करी विधाता ॥ अर्धबिंबोदयीं संध्यार्घ्यें सविता ॥ बलवंत केला रथीं ॥८७॥
हें विधीचें बोलिजे सचैल स्नान ॥ मग विरिंचि करी दर्भासन पूर्ण ॥ अष्टद्वय घटिका वेदाघ्ययन ॥ स्मरे गायत्रीमंत्र ॥८८॥
मग ब्रह्मेश्वरलिंग स्थापिलें ॥ आणि ब्रह्मतीर्थ निर्माण केलें ॥ मग विधीनें गमन मांडिलें ॥ काशीमध्यें ते काळीं ॥८९॥
तेणें कैसी देखिली अविमुक्ती ॥ तेथें दिवोदास राजा नृपती ॥ तेथींचे लोक समस्त वर्तती ॥ राजविचारें ॥९०॥
पाहातसे सृष्टीचें कौतुक ॥ म्हणे हा काय एक झाला सृष्टिकारक ॥ पाराभविले अमरलोक ॥ सृष्टि राखिली येणें ॥९१॥
ऐसा देखोनि राजयाचा उत्कर्ष ॥ मानसीं लज्जावंत सृष्टीचा अधीश ॥ म्हणे आम्हांहूनि दिवोदास ॥ कोटिगुणें अधिक ॥९२॥
एवढा सृष्टिकर विधाता ॥ माझिये सृष्टीं एकचि सविता ॥ याचे राज्यीं ब्रध्नमूर्ति विचारितां ॥ ग्रामीं अर्क ॥९३॥
माझिये सृष्टीचिया अधिकारा ॥ बहुत प्रकारें राखिली वसुंधरा ॥ सामर्थ्य वेंचोनि मज सृष्टिकरा ॥ श्लध्यत्व केलें ॥९४॥
मज गभस्तीचा थोर उपकार ॥ तो प्रकाश करी सह्स्त्रकर ॥ आणिक जो कर्दमऋषीचा कुमर ॥ तो वृष्टि करी वरुण ॥९५॥
सर्व जंतुमात्रांसी जो निजवस्तु ॥ आणिक अत्रिऋषीचा जो सुतु ॥ शांत शीतळ जो मारुतु ॥ तोही मज उपकारी ॥९६॥
कितीएक गुणें त्याचा आधार ॥ आणिक नारदाचे जे कुमर ॥ ते शुभाशुभ साठ संवत्सर ॥ सृष्टिकार्या अधिकारी ॥९७॥
आणिक जो वैश्वानराचा नंदन ॥ तो महाउपकारी मज कृशांन ॥ माझिये सृष्टीसी त्याचा स्वगुण ॥ न सांगवे चर्तुमुखें ॥९८॥
ऐसा जो या समस्तांचा समारंभु ॥ त्याचेनि आधारें मी सृष्टिस्तंभु ॥ मग उत्पत्तिप्रलयकर्ता प्रभु ॥ तोही वेगळाचि असे ॥९९॥
जैसे जडावाविरहित अलंकार ॥ अशोभ्य मुक्तामणिविरहित हार ॥ कीं जैसा कामेविरहित नर ॥ नव्हेचि पंचमान्या ॥१००॥
जैसा सर्वसुंदर कुष्ठी एकाक्ष ॥ जैसा पुष्पफळाविण वृक्ष ॥ चतुर्दशरत्नेंविण सहस्त्राक्ष ॥ अशोभ्य जैसा ॥१०१॥
गज वाजी यांविण नृपती ॥ नव्हे देशपट्टणेंविण भूपती ॥ या दिवोदास राजानें सर्व क्षिती ॥ राखिली आपुले शक्तीं ॥१०२॥
आपणचि वृष्टि करी क्षितीसी ॥ आपणचि ग्रामोग्रामीं शशी ॥ आपणचि वन्ही सर्वांशीं ॥ आपणचि जाहाला समीर ॥१०३॥
कवण लक्षी याचिया सामर्थ्यगुणा ॥ यानें वियोग केला त्रिनयना ॥ यक्ष राक्षस आणि सुरगणां ॥ केलें पृथ्वीअतीत ॥१०४॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ दिवोदासाचें सामर्थ्य पाहोनी ॥ ब्रह्मा त्रास धरिता जाहाला मनीं ॥ कैसें छिद्र पावेन ॥१०५॥
मग विरिंचिनाथ सृष्टिकर ॥ अविमुक्तीसी करी नमस्कार ॥ तो वैकुंठवासियाचा ॥ नाभीकार ॥ काशीप्रवेश करील आतां ॥१०६॥
श्रोतयासी प्रार्थी शिवदास गोमा ॥ काशीप्रवेश करितां ब्रह्मा ॥ ते कथा परिसतां नाना जन्मां ॥ पासाव मुक्त करी ॥१०७॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते विधिकाशीप्रवेशो नाम चतुःपंचाशत्तमाध्यायः ॥५४॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति चतुःपंचाशत्तमाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP