काशीखंड - अध्याय ४७ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ तंव अगस्ति जाहाला प्रार्थिता ॥ म्हणे क्षमा कीजे मृगांकभालसुता ॥ तरी एक प्रश्न असे जी आतां ॥ कृपानिधी स्वामी ॥१॥
काशमिध्यें जो खखोल्क उत्पन्न जाहाला ॥ तो किंनिमित्त कवणें स्थापिला आणिक विनतादित्य निर्मिला ॥ तो कवण कैसा ॥२॥
स्वामी प्रश्न करितों जी तुम्हांसी ॥ दीर्घ लज्जाभय होतें मानसीं ॥ मी सेवक आपुला वृद्धपणासी ॥ वृथाचि बहुकाळाचा ॥३॥
मी अज्ञान शरीरी मंदमती ॥ प्रश्न करितों तुम्हांप्रती ॥ तुमचिया शब्दामृताची तृप्ती ॥ नव्हेचि मज ॥४॥
तरी मी अनाथ जि शिवसुता ॥ तूंचि माझिये आर्तीचा पूर्ण दाता ॥ तरी हे माझी वियोगचिंता ॥ शांत नव्हे तुम्हांविण ॥५॥
तंव बोलिला शिवकुमर ॥ म्हणे जी ऋषि तुं महा मुनिवर ॥ जैसा सिंधूसी प्रिय शीतकर ॥ तैसा प्रिय मज तूं ॥६॥
जैसा यागविधि पूर्ण देखोनी ॥ आनंदे तो देवाग्नी ॥ तैसा आनंदकर्ता माझे मनीं ॥ मित्रावरुणसुता तूं ॥७॥
अगस्ति तुजाऐसा श्रेष्ठ पात्र ॥ त्रैलोक्यामाजी नसेल पवित्र ॥ शिवकथेचें वेष्टनपात्र श्रोत्र ॥ शरीर तुझें ॥८॥
तूं शिवकथेची गवसणी ॥ प्रश्निसी जें जें ओगरीं तें श्रीवणी ॥ परी न सांगिजे ऐसें माझे मनीं ॥ न उद्भवे गा अगस्ती ॥९॥
तरी तुवां प्रश्निली जे कथा ॥ ते परियेसीं यथार्था ॥ जें पार्वतीनें प्रश्निलें विश्वनाथा ॥ ती कथा सांगों तुज ॥१०॥
विरिंचिदेवाचा जो श्रेष्ठ कुमर ॥ तो मरीचिनामें मुनीश्वर ॥ तयापासाव सृष्टिकर ॥ कश्यप तो जी ॥११॥
त्य कश्यपाच्या तेराही कांता ॥ त्या झाल्या सर्व सृष्टिजनित्या ॥ त्यांमध्यें कद्रु आणि विनता ॥ महामत्सर दोघींचा ॥१२॥
ऐशा त्या दोघी द्क्षनंदिनी ॥ विनता कद्रु कामिनी ॥ दोघी बैसल्या तपसाधणीं ॥ महामत्सरस्वार्थें ॥१३॥
द्वादश सहस्त्र संवत्सर ॥ दोघींनी तप साधिलें अपार ॥ मग प्रसन्न जाहाला सृष्टिकर ॥ कश्यप स्वामी त्यांचा ॥१४॥
कश्यप म्हणे दोघी स्त्रियांसी ॥ तुमची पूर्ण श्रद्धा पावली आम्हांसी ॥ आतां वर मागा जो इच्छित मानसी ॥ मी प्रसन्न असें तुम्हांसी ॥१५॥
मग त्या काश्यपाचिया अगना ॥ प्रार्थित्या जाहाल्या भक्तिगुणा ॥ म्हणती स्वामिया आमुची कामनां ॥ पूर्ण नव्हेचि तुम्हांविण ॥१६॥
तुम्ही निर्माण केली वसुंधरी ॥ तुम्हां प्रणाम प्राणेश्वरा ॥ तरी हेंचि मागणें जी सृष्टिकरा ॥ पुत्रप्रजा दीजे आम्हांसी ॥१७॥
मग तथास्तु म्हणे कश्यपॠषी ॥ सहस्त्र पुत्र दिधले कद्रुसी ॥ मग वीर्य भरोनियां वेगेंसीं ॥ घातलीं आंडीं ॥१८॥
मग ते जन्मले फणिवर ॥ उद्भवले अनेक प्रकार ॥ तरी ते आतां सांगों सविस्तर ॥ जे बोलिले स्कंदपुराणीं ॥१९॥
प्रथम जन्मला तो सहस्त्रफणी ॥ जेणें मौळीं ॥ धरिली मेदिनी ॥ त्याणें काशीमध्यें तप साध्य करूनी ॥ प्रसन्न केला सदाशिव ॥२०॥
मग जन्मला वासुकी तक्षक ॥ कालिया ऐरावत आणि शंख ॥ पूर्ण धनंजय अंतक ॥ आणि नीळ वामन ॥२१॥
एलापत्र अजिंक आनिळ ॥ कल्पाक्ष आणि नहुष सबळ ॥ स्वस्तिक आणि महाकंबळ ॥ निष्ठुर तोडवरू ॥२२॥
कल्पांतक आणि सुनायनी ॥ पिंगट आणि दधिमुख मणी ॥ पादक वीरांक दारुणीं ॥ महाविखार तो ॥२३॥
शीलिशिखा आणि बळी पावक ॥ पद्मवंत आणि वीरानक ॥ पुष्पद्दष्टि आणि निमिक्षाक ॥ कल्पकोट तो ॥२४॥
सुबाहु आणि महावीळक ॥ कुंजरकर आणि शैलक ॥ धृतराष्ट्र आणि पावक ॥ सालाक्षी तो ॥२५॥
पिठारक आणि कुंभोदर ॥ मुखविखार आणि प्रभाकर ॥ आतां असो हा नामपसर ॥ कथेसी होतसे विलंब ॥२६॥
सहस्त्र प्रसवलीं कद्रू परी ॥ मग विनता कश्यपसुंदरी ॥ ती दोन आंडीं दक्षकुमरी ॥ प्रसवती जाहाली ॥२७॥
ते प्रार्थीतसे कश्यपाकारण ॥ तुम्ही कद्रूसी जाहालेति प्रसन्न ॥ तियेसी दिघलें वरदान ॥ जाहाले सहस्त्र पुत्र पैं ॥२८॥
आणि मज कैसे दिघले दोनी ॥ मी काय न्य़ून तिजहूनी ॥ कीं मज देखिलें तपासाधनीं ॥ अशक्त तुम्हीं ॥२९॥
मग कश्यप म्हणे विनतेसी ॥ जे सहस्त्र पुत्र दिघले कद्रूसी ॥ ते सत्यचि पडती भक्ष्यग्रासीं ॥ तुझिया पुत्राच्या ॥३०॥
स्वर्ग मृत्यु पाताळभुवना ॥ तुझे पुत्र न गणतील देवगणां ॥ सुरनइंद्रनारायणां ॥ जिंकितील सत्य ॥३१॥
सहस्त्र वरुषें राहावें निश्चिती ॥ मग तुझीं दोनी आंडीं फुटती ॥ दोन पुत्र तुजे अद्भुत होती ॥ ऐसा दिघला पूर्ण वर ॥३२॥
तंव पंच शत संवत्सरीं तिनें ॥ एक आंडें फोडिलें विनतेनें ॥ तंव ते बाळ जाहालें नाहीं पूर्णपणें ॥ देखिलें मातेनें स्वनेत्रीं ॥३३॥
तंव अर्धचि असे निपजला ॥ महारक्तवर्ण देखिला ॥ मग विनतेसी बोलिला ॥ शापदान ते काळीं ॥३४॥
माझिया पिंडासी पूर्ण दिन नव्हतां ॥ तुवां आंडें फोडिलें तत्त्वतां ॥ तुज दास्यत्व प्राप्त होईल आतां ॥ कोणे एके काळीं ॥३५॥
क्रोधें जाहाला असे लोहितवर्ण ॥ तो पक्षेंविण उद्भवला अरुण ॥ चरणीं चालतां कश्यपनंदन ॥ आला काशीपुरीसी ॥३६॥
तो मणिकर्णिकेसी आला स्नाना ॥ मग करिता जाहाला लिंगस्थापना ॥ ऐसी आरंभिली तपसाधन ॥ अरूणपक्षींद्रें ॥३७॥
सहस्त्र वर्षें त्यजिला आहार ॥ शिवध्यानीं राहिला पक्षिवर ॥ तेणें मानसपूजें पूजिला ईश्वर ॥ आराधिला सदाशिव ॥३८॥
ऐसा तपतापें तापला अरुण ॥ घ्राणद्वारें उद्भवला हुताशन ॥ प्रलयीं सहस्त्रफण ॥ दग्धी सप्त पाताळें ॥३९॥
कीं तो झाला यागींचा राशी ॥ क्रोधाची ज्वाळा लागली आकाशीं ॥ ध्यानस्थ बैसला त्या लिंगापाशीं ॥ अर्ध लक्ष बिंब त्याचें ॥४०॥
ऐसें पंच सहस्त्र वर्षवरी ॥ तो अरुण तपसाधन करी ॥ मग तपावसानीं त्रिपुरारी ॥ प्रकट जाहाला त्याचि लिंगीं ॥४१॥
तें लिंग जैसा रोपिला अंकुर ॥ तेथें भक्तिअंबु घाली पक्षीश्वर ॥ मग फळसिद्धी प्रकटला हर ॥ प्रवेशला त्या लिंगीं ॥४२॥
मग तो आश्वासिला जाश्वनीळें ॥ अरुण स्पर्शिला करकमळें ॥ मग प्रत्युत्तर त्रैलोक्यपाळें ॥ केलें अरुणासी ॥४३॥
म्हणे माग माग वहिलें अर्धगर्भा ॥ तुज समर्पिली म्यां दिव्य प्रभा ॥ जे माझिया स्वरूपाची शोभा ॥ ते समर्पिली तुज म्यां ॥४४॥
मग तो कश्यप-विनतांचा नंदन ॥ स्तुति वदता झाला अरुण ॥ तेणें स्तविला शैलजारमण ॥ बद्धकमळीं कैसा ॥४५॥
म्हणे जयजयाजी अनाथनाथा ॥ पूर्ण योगियांचिया स्वाथी ॥ जयजयाजी दग्धमन्मथा ॥ सबराभरिता तूं एक ॥४६॥
जयजयाजी त्रिपुरदहना ॥ जयजयाजी पूर्णज्ञानस्मरणा ॥ जयजयाजी निवासी काशीभुवना ॥ उमाकांता तूं ॥ ४७॥
तुम्हां प्रमाण केलिया त्रिपुरारी ॥ हेचि दीघी यात्रा आपुली या संसारीं ॥ जैसा तो परीस वेध करी लोहावरी ॥ त्याहूनि कल्पकाळीं अधिक ॥४८॥
जैसा वृक्ष रोपिजे शुद्ध क्षितीं ॥ जळें प्रबळें वाढविजे भक्ती ॥ मग फळलाभ तो पशुपती ॥ पूर्ण इच्छेचा तो ॥४९॥
अनंत ब्रह्मांडें तुझा खेळ ॥ तूं सर्वां घटीं व्यापक प्रांजळ ॥ सर्व आमोदांमाजीं शुद्ध परिमळ ॥ तो तूंचि सदाशिव ॥५०॥
अष्ट लोकादि सर्व कुलाचळ ॥ त्यांमध्यें चौसष्टिक तेजाळ ॥ तें तुझ्या स्वरूपाचें किरणजाळ ॥ व्यापक असे त्रिभुवनीं ॥५१॥
चतुर्विध खाणींमाजीं जे महिता ॥ जे नररूप भवानीकांता ॥ त्यामध्यें जें ज्ञान तत्त्वतां ॥ तें रूप तुझें पैं ॥५२॥
ऐसा निर्गुण निराकार ॥ तूं परब्रह्म सबराभर ॥ हरि-विरिंचिदेवा अगोचर ॥ अकथ्य स्वरूप तुझें ॥५३॥
तुम्हां वाखाणावया पशुपती ॥ मज नाहीं पूर्णज्ञान मूढमती ॥ मी बहु अशक्त जी गर्भमती ॥ जन्मलों स्वामिया ॥५४॥
जो म्यां वर मागावा तुम्हांप्रती ॥ शब्द उच्चारावा मुखाकृतीं ॥ तो शब्दनाद पशुपती ॥ तूंचि होशील पैं ॥५५॥
भक्तांचे ह्रदयीं ज्या कामना ॥ शिवा त्या तुम्हांसी नव्हती भिन्ना ॥ जरी कांहीं करावी विज्ञापना ॥ तरी तूं अंतरात्मा विश्वाचा ॥५६॥
आतां हेचि कामना आमुची ॥ थोर लाभ तो भक्ति तुमची ॥ तुम्ही आर्त पुरवितां अनाथांची ॥ हा भरंवसा त्रिभुवनीं ॥५७॥
मज त्रिभुवनीं पाहावयासी ॥ शिवा हें कल्पीतसें मानसीं ॥ तूं माझिया चित्तचकोरासी ॥ दोन पक्ष द्यावे मज ॥५८॥
ऐसें अरुणाचें प्रतिवचन ॥ मग तथास्तु म्हणे पंचानन ॥ तुज नाठवे रे वर पूर्ण ॥ जो असे माझे मानसीं ॥५९॥
तुझा बंधु जो सहस्त्रकर ॥ एकचक्री असे त्याचा रहंवर ॥ त्या रथासी पूर्ण अधिकार ॥ तो तुझा अरुणा ॥६०॥
तो मेरुप्रदक्षिणेसी त्वरावंत ॥ तपसिद्धीस्तव असे भ्रमत ॥ तो तुझिया शक्तीनें बलवंत ॥ होईल रथ सूर्याचा ॥६१॥
अरुणा त्या मार्तंडाचिया रथीं ॥ वरदहस्तें म्यां केला सारथी ॥ चौसष्टि घटिकांमध्यें महापुरुषार्थी ॥ उल्लंघिसी मेदिनी ॥६२॥
गायत्रीमंत्राचें जें अध्यर्दान ॥ तें सफळ नव्हे गा तुझा उदय झाल्यावीण ॥ जे वेदाध्यायनी ब्राह्मण ॥ त्यांसी वंद्य तूं अरुणा ॥६३॥
आणिक वर तुज प्राप्त केले ॥ काशीमध्यें जें तुवां लिंग स्थापिलें ॥ त्यासी म्यां अधींचि नाम ठेविलें ॥ अरुणेश्वर ऐसें ॥६४॥
ऐसे वर जाहाले त्या अरुणासी ॥ तों शिवें स्थापिला सूर्यरथासी ॥ आतां असो हा जन्म गरुडासी ॥ कैसा जाहाला पैं ॥६५॥
मग सहस्त्र वर्षें जाहालिया पूर्ण ॥ दुजें आंडें फोडिलें विनतेन ॥ तंव तो जन्मला महादारुण ॥ गरुड पक्षींद्र ॥६६॥
ऐसे अरुण गरुड विनतेचे ॥ शेष नागादिक हे कद्रूचे ॥ स्थूलशरीर प्रौढीचे ॥ ऐसे ते बळी जन्मले ॥६७॥
मग कोणेएके काळवेशीं ॥ विनता कद्रू दक्षबाळी ॥ दोघी बैसलिया एकांत स्थळीं ॥ क्रीडेकारणें पैं ॥६८॥
मग कद्रू म्हणे विनतेसी ॥ पैल पाहें ऊर्ध्व आकाशीं ॥ वरूं जुंपिला जो सूर्यरथासी ॥ तो श्वेत कीं कृष्णवर्ण ॥६९॥
तंव विनता दे प्रत्युत्तर ॥ दीघी उष्ण तो सहस्त्रकर ॥ तेथें जाऊनि अनिवार ॥ पाहों शके कवण ॥७०॥
त्याची तेजदीप्ती दारुण ॥ तेथें वारू लक्षी ऐसा कवण ॥ महातेजस्वी बहुदारुण ॥ सन्निध जातां भस्म होती ॥७१॥
येरी म्हणे तुझा अरुण ॥ सहज रथीं असे जाण ॥ तयासी हें वतीमान ॥ नसेल काय ठाउकें ॥७२॥
विनता म्हणे कद्रूसी ॥ अरुण असे सूर्यरथासी ॥ त्याचें दर्शन आम्हांसी ॥ अलभ्य बहुकाळ ॥७३॥
तो आनंदवना तपा गेला ॥ पुनरपि नाहीं देखिला ॥ शिवें सूर्यरथीं स्थापिला ॥ अढळ वर देऊनियां ॥७४॥
कद्रू म्हणे विनतेसी ॥ तूं वर्तमान आणि मानसीं ॥ पुसोनि आपुले पुत्रासी ॥ मग वदों भाषदान ॥७५॥
ऐसें उभयतां वदोनियां ॥ विनता आली गृहा आपुलिया ॥ आनंदवना जावया ॥ उदित जाहाली ॥७६॥
विनता येऊनि अविमुक्तीसी ॥ स्नान करोनि मणिकर्णिकेसी ॥ विश्वनाथ पूजोनि सद्भावेंसीं ॥ अवलोकी सभोंवतें ॥७७॥
तंव तेथें विनतादित्य देखिला ॥ तेथेंचि अनुष्ठानयोग आरंभिला ॥ ऐसा बहुकाळ क्रमिला ॥ तपसाधनीं ॥७८॥
तंव विश्वनाथ आला तपोवनीं ॥ म्हणे मी प्रसन्न तुजलागोनी ॥ जे इच्छा असेल मनीं ॥ तो माग वर ॥७९॥
येरी वदे जी शूलपाणी ॥ पुत्रशाप असे मजलागोनी ॥ तो परामवे ऐसा वचनीं ॥ द्यावा वर मजलागीं ॥८०॥
आणिक सूर्यमंडळासी ॥ जावया इच्छा असे मानसीं ॥ माझी भेट अरुणासी ॥ होई ऐसें करीं सदाशिवा ॥८१॥
तंव शिव म्हणे तथास्तु ॥ पूर्ण होईल तुझा मनोरथु ॥ परी अल्पदिनीं दास्यत्व प्राप्त ॥ होईल तुजलागीं ॥८२॥
उपरी तुझें बंदिमोचन ॥ गरुड पुत्र करील जाण ॥ अतीं होईल विष्णूचें वहन ॥ महापराक्रमी तो ॥८३॥
तो जिंकील त्रयदेवांसी ॥ भक्षील कद्रुकुळासी ॥ तुझें बंदिमोचन अर्धक्षणेंसीं ॥ करील सत्य जाण पां ॥८४॥
तो पराक्रमी महासमर्थी ॥ पृष्ठीं वाहील श्रीअनंत ॥ सकळ ब्रह्मांडगोळ निमिषांत ॥ घेऊनि उडों शकेल ॥८५॥
ऐसें ऐकोनि शिववचन ॥ आनंदमय झाली पूर्ण ॥ शिवआज्ञा गमन ॥ निज गृहासी परतली ॥८६॥
येऊनियां निजमंदिरासीं ॥ शिववरें आनंदे मानसीं ॥ तंव तेचि काळीं अरुणासी ॥ येणें झालें मातृभेटी ॥८७॥
अरुण येऊनि मातेसी ॥ साष्टांग वंदन करूनि चरणासी ॥ येरी पाणिस्पर्श मस्तकासी ॥ करूनि उठवी अरूणातें ॥८८॥
विनता म्हणे पुत्रराया ॥ बहुत दिवस निष्ठुर केली माया ॥ येरू म्हणे रथ मजवांचोनियां ॥ न चलोचि माते ॥८९॥
सूर्यरथीं सारथ्यअधिकार ॥ मी चालवीतसें अष्टही प्रहर ॥ तो रथ प्रहरूनि क्षणभर ॥ मज येणें नव्हेचि ॥९०॥
बहुत दिवस झाले भेटीसी ॥ म्हणोनि आलों बहुत्वरेंसीं ॥ आतां आज्ञा देणें माते आम्हांसी ॥ निजस्थळासी जावया ॥९१॥
येरी वदे अरुणाप्रती ॥ रथीं वारु कवण असती ॥ कद्रू आम्हां वदतां वदती ॥ झाली असे पैजेसी ॥९२॥
तरी ते वारु कैसे सांग आम्हांसी ॥ येरू वदे श्वेत वारू रथासी ॥ असती हे अहर्निशीं ॥ मी सारथी तयांची ॥९३॥
अरुण आज्ञा मागे आपण ॥ येरी करी निंबलोण ॥ रविरथीं गेला अरुण ॥ आज्ञा वंदोनि मातेची ॥९४॥
ऐसें असतां काळवेळेसी ॥ कद्रू आली विनतेपासीम ॥ क्षेमकुशळ पुसोनि तियेसी ॥ जाहालीं क्षेमालिंगनें ॥९५॥
मग आरंभिलें पृच्छेसी ॥ रविरथीं कवण वर्ण वारूसी ॥ येरी म्हणे सूर्यरथासी ॥ वरू श्वेत असती ॥९६॥
कद्रू म्हणे वारू सुनीळ ॥ विनता म्हणे श्वेत निर्मळ ॥ ऐसे बोल बोलतां प्रबळ ॥ तत्काळ वदती पणातें ॥९७॥
कद्रु म्हणे श्वेत वारू असलिया ॥ दास्यत्व अंगिकारिलें म्यां ॥ सुनीळ वारू जाहलिया ॥ तुज दास्यत्व मम गृहीं ॥९८॥
ऐसें वदोनि स्वस्थानासी ॥ गेली आपुले मंदिरासी ॥ तंव कद्रू म्हणे स्वपुत्रांसी ॥ वरू रविरथीं कवण वर्ण ॥९९॥
तंव पुत्र म्हणती श्वेत वारू जाण ॥ सूर्यरथीं करिती भ्रमण ॥ कद्रू म्हणे विनताघरीं पूर्ण ॥ दास्यत्व मज प्राप्त ॥१००॥
तंव पुत्र म्हणती मातेसी ॥ पण वदलीसी न पुसतीं आम्हांसी ॥ पूर्वकर्म न चुके कवणासी ॥ भोगिल्याविण ॥१०१॥
मग कद्रू म्हणे पुत्रांसी ॥ तुम्ही व्यर्थ जन्मलेति माझे कुशीं ॥ वारू सुनीळ न करवे तुम्हांसी ॥ दंशार्थ करूनियां ॥१०२॥
म्हणोनि दुःखें तळमळे प्रबळी ॥ शेजे पहुडली दक्षबाळी ॥ वस्त्र बांधोनियां कपाळीं ॥ महारुदन मांडिलें ॥१०३॥
तंव उरगपुत्र मातेसी वदती ॥ ऊठ माते न करीं खंती ॥ सुनीळ वारू करूं क्षणांतीं ॥ न करीं वो चिंता ॥१०४॥
आम्ही जातों सूर्य़मंडळासी ॥ त्वां चिंतारहित असावें मानसीं ॥ सुनीळ वारू क्षणार्धेंसीं ॥ करूं सत्य आण तुझी ॥१०५॥
पुत्रवचनावरी माता ॥ बहुआनंदमय तत्त्वतां ॥ पुत्रांसी म्हणे विलंब आतां ॥ झणीं न करावा तुम्हीं ॥१०६॥
मग पद्मवंत पिठार दोनी ॥ निघाले आनंदवनालागॄनी ॥ मणिकर्णिकेसी स्नान करूनी ॥ विश्वनाथ पूजिला ॥१०७॥
मग बैसले तपसाधनीं ॥ खखोल्क आदित्य लक्षोनी ॥ मग तपाचिया अवसानीं । पावला विश्वनाथ तो ॥१०८॥
म्हणे माग रे मी मुम्हांसी प्रसन्न ॥ येरु वदती दीनवदन ॥ रविरथीं वारू सुनीळ करावयालागून ॥ सामर्थ्य दीजे शंकरा ॥१०९॥
शिव म्हणे दिघलें तुम्हांसी ॥ परी मुकलेति पक्षपायांसी ॥ जा मातृकार्य करा वेगेंसीं ॥ वर असे तुम्हांसी ॥११०॥
खखोल्क नाम ठेविलें तयांसी ॥ त्याचि रूपें निघाले वेगेंसीं ॥ मातेसी श्रुत करोनि त्वरेंसी ॥ गेले सूर्यमंडळा ॥१११॥
त्यांनीं दंश करोनि तुरंगमांसी ॥ सुनीळ केलें अर्धक्षणेंसीं ॥ विषेंकरूनि सुनीळता त्यांसी ॥ श्यामवर्ण पावला ॥११२॥
कद्रूसी कळले वर्तमान ॥ पुत्रें कार्य साधिलें पूर्ण ॥ दासी पाठविल्या विनतेलागून ॥ दास्यत्वपणासी यावें ॥११३॥
विनता आली कद्रूपासीं ॥ कद्रू म्हणे तूं आमची दासी ॥ वारू आहे सुनीळ रथासी ॥ आतां तूं दासी आमुची ॥११४॥
येरी म्हणे श्वेत वारू असतां ॥ तूंचि माझी दासी तत्त्वतां ॥ कद्रू म्हणे तरी पाहूनि आतां ॥ शीध्र आपण येइजे ॥११५॥
विनता जाऊनि सूर्यभुवनासी ॥ वारू जंव पाहे सुनीळत्व त्यांसी ॥ मग प्रश्न करी अरुणासी ॥ विनता माता ॥११६॥
माता वदे अरुणासी ॥ तुवां शुभ्र वारू कथिले आम्हांसी ॥ तरी कां पावले सुनीळत्वासी ॥ तें सांग मजलागीं ॥११७॥
अरूण वदे मातेप्रती ॥ कपट केले कद्रूसुतीं ॥ विषेंकरूनि सुनीळत्वप्राप्ती ॥ वारुवां अंगीं जाहाली ॥११८॥
विनता वदे दास्यत्व आलें माझिया माथां ॥ हें तंव न चुकेचि सर्वथा ॥ मानूनियां निजकर्मव्यथा ॥ निश्चळ राहिली ॥११९॥
तंव अरूणें श्रुत केलें सूर्यासी ॥ सर्पीं सुनीळ केलें वारुवांसी ॥ विषेंकरूनि तुरंगमांसी ॥ जाचिलें बहुत पैं ॥१२०॥
मग सविता विचारी मानसीं ॥ विष सर्व चुंबोनि आकर्षी ॥ वारू शुभ्र करूनि क्षणार्धेंसीं ॥ केले सचेतन ॥१२१॥
कर्ण रक्षिले श्यामवर्ण ॥ यालागीं वो श्यामकर्ण ॥ यालगीं वो श्यामकर्ण ॥ सर्वांग श्वेत करूनि संपूर्ण ॥ पहिल्यापरीस प्रबळ ॥१२२॥
सूर्यें निजकरें घेऊनि शस्त्रासी ॥ छेदोनि टाकिलें सर्पपक्षांसी ॥ शाप वदला कद्रुकुमरांसी ॥ तो परिसें आतां ॥१२३॥
उदरीं धरिलें तुम्ही कपटासी ॥ तरी उदरशूळ तुम्हां अहर्निशीं ॥ भोगा तुम्ही सर्वकाळेंसीं ॥ निश्चयेंसीं सर्प हो ॥१२४॥
पूर्वी पक्ष होते सर्पांसी ॥ गोमीऐसे पाय त्यांसी ॥ सूर्यं छेदिलें पक्षपायांसी ॥ उदरशूळासी तो वदला ॥१२५॥
सर्प लोळ होऊनि विलपत ॥ आक्रंदती अति अद्भुत ॥ कपटार्थ जाहाला प्राप्त ॥ दुःखें पूर्ण विलपती ॥१२६॥
मग सूर्य वदला विनतेसी ॥ साष्टांग वंदन केलें चरणांसी ॥ निजभुवना नेऊनि तियेसी ॥ अमूल्य वस्त्रांलकार समर्पिले ॥१२७॥
तेथें राहोनि दिवस दोनचार ॥ मग बोले सूर्य़ाप्रति उत्तर ॥ म्हणे सर्प नेऊं क्षितितळावर ॥ विलपती बहु ॥१२८॥
सूर्य वदे सापत्न मातेसीं ॥ सुखें नेइजे सर्प क्षितितळासी ॥ कृपा असों दीजे मातेऐसी ॥ पूर्वापार जे ॥१२९॥
आणिक सविता वदे तियेसी ॥ गरुड भक्षील नागकुळासी ॥ परमामृत आणोनि तुजसी ॥ बंदीमोचन करील ॥१३०॥
गरुडासारिखा पुत्र असतां ॥ माते तूं कां व्यर्थ करिसी चिंता ॥ हा ब्रह्मांडगोल पालथा ॥ करूं शके आपुल्या शक्तीं ॥१३१॥
सप्त सागर चंचू भरोनी ॥ कुलाचल उडवी पक्षवातेंकरूनी ॥ हें भूमंडळ पृष्ठीं घेऊनी ॥ उडों शकेल गगनमंडळीं ॥१३२॥
ऐसा पुत्रपुरुषार्थ ऐकोन ॥ अंतरी जाहली सुप्रसन्न ॥ मग अरुणसूर्याप्रती पुसोन ॥ क्रमिती जाहाली भूमंडळा ॥१३३॥
संज्ञानामें सूर्यकामिनी ॥ ते भेटली आपुलिया बहिणी ॥ तियेसी सांगे एकान्त स्थानीं ॥ कद्रूदास्यत्व आम्हांप्रती ॥१३४॥
तंव संज्ञा वदे विनतेसी ॥ कैसेनि दास्यत्व प्राप्त तुम्हांसी ॥ ते वर्तमानकथा आम्हांसि ॥ कृपा करूनि सांगिजे ॥१३५॥
तुम्ही आम्ही सख्या बहिणी ॥ येथें तंव दुजें नसे कोणी ॥ काय वर्तलें तें आम्हांलागूनी ॥ करी श्रवण बहिणीये ॥१३६॥
येरी म्हणे संज्ञे अवधारीं ॥ पण पडला कद्रू आम्हां सवतमत्सरीं ॥ पण जिंकिला ते कद्रूसुंदरीं ॥ कपटेंकरोनियां जाणा ॥१३७॥
मी वदलें रविरथींचे वारू श्वेतं ॥ ते वदली सुनीळ असत ॥ ऐसा दोघींचा पण अद्भुत ॥ पडला वैराकारें ॥१३८॥
तेथें पाहों आलें तंव तत्काळ ॥ सर्पीं केले श्वेतांचे सुनीळ ॥ कपटेंकरूनि उरगीं प्रबळा ॥ प्राप्त केलें दास्यत्व मज ॥१३९॥
याकारणें मी चिंतातुर ॥ कांहीं न चाले वो प्रकार ॥ येथें राहावें तरी अधर्म थोर ॥ बैसेल माझिया माथां ॥१४०॥
तेथें जावें तरी दास्यत्वप्राप्ती ॥ येथें राहूं तरी दोषप्राप्ती ॥ सकळही देव ऋषि हांसती ॥ सत्त्वा टळली म्हणोन ॥१४१॥
पुसोनियां संज्ञा भगिनीसी ॥ आज्ञा मागोनि सूर्यासी ॥ अरुणें नमस्कारिलें मातेसी ॥ अतित्वरेंसीं निघालीं मग ॥१४२॥
मग विनता दक्षनंदिनी ॥ सर्पांची कृपा उद्भवली मनीं ॥ मग ह्रदयीं स्मरोनियां तरणी ॥ आली क्षितितळा ॥१४३॥
पद्मवंत पिठार हे दोनी ॥ महासर्प विषाननी ॥ विनतेनें उतरिले पृष्ठींहुनीं ॥ गिरि जैसे क्षितितळा ॥१४४॥
मग ते आली तया स्थानीं ॥ तंव कद्रूनें प्रश्निली बहिणी ॥ म्हणे तूं पहावयासी गेलीस काय तरणी ॥ व्योममंडळीं ॥१४५॥
तरी तो उच्चैःश्रवा गतिगुण ॥ तुवां देखिला श्वेत कीं कृष्ण ॥ तरी हा विनते आमुचा प्रश्न ॥ कथावा वेगेंसीं ॥१४६॥
मग उद्वेगें विनता बोलिली ॥ म्हणे म्यां सर्वथा पैज हारविली ॥ मी तुझी दासी जाहाली ॥ तूं स्वामिनी आमुची ॥१४७॥
मग ते कद्रू हर्षें निर्भर मनीं ॥ जैसी ते सीरता पूर्ण पर्जन्यीं ॥ कीं शशी देखोनि कुमुदिनी ॥ तैसें वर्तलें शेषजननीये ॥१४८॥
कीं जैसी निजधामीं पतिव्रता ॥ ती जैसी आनंदे पति देखतां ॥ तैसे वर्तलें कद्रुचिया चित्ता ॥ विनता दासी ते देखोनि ॥१४९॥
ऐसी ते गरुडाची माता ॥ बद्धकरें दास्य करितां ॥ अति कृश झाली ते दक्षदुहिता ॥ पडिली चिंतार्णवीं ॥१५०॥
ऐसें तें अरुणाचें शापदान ॥ मातेसी बाधलें पुत्रवचन ॥ आतां मुक्त करील तें बंधन ॥ गरुड पुत्र तो ॥१५१॥
शिवदास गोमा प्रार्थी श्रोतयांप्रती ॥ खखोल्ककथा निवेदिली तुम्हांप्रती ॥ पुढील कथा ऐकतां कल्मषें नासती ॥ त्या विनतादित्याचेनि ॥१५२॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते खखोल्कादित्यवर्णनं नाम सप्तचत्वारिंशाध्यायः ॥४७॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
॥ इति सप्तचत्वारिंशत्तमाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP