काशी खंड - अध्याय २ रा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥
मग ब्रह्मसुंतें पुढें येतां ॥ तंव देखिली शीतकराची दुहिता ॥ त्या नर्मदेसी झाला वंदिता ॥ नारदमुनि तो ॥१॥
तियेसी मीनली असे कावेरी ॥ त्या संगमीं मुनी स्नान करी । दर्शन करोनि ओंकारीं ॥ मग नमन करीतसे ॥२॥
मग पवनवेगें निघता झाला ॥ तंव पुढें विंध्याद्रि देखिला ॥ मग तो नारद संतोषला ॥ देखोनियां रमणीय वन ॥३॥
देखिलीं गिरीचीं शिखरें ॥ कीं तीं एकवीस खणांचीं दामोदरें ॥ जैशी कां गंधर्वनगरें ॥ उद्भवलीं स्वगीं ॥४॥
देखिल्या असंख्य वनस्पती ॥ मज वर्णावया कैंची मती ॥ परी संकलित श्रोतयांप्रती ॥ करुं निरुपण ॥५॥
नाना जातींचे वल्लीभार ॥ वल्लीवेष्टित तरुवर ॥ आम्रवृक्ष औंदुंबर ॥ सायुघुरें अंजीर ते ॥६॥
कुडे आपटे धामणी ॥ खदिर हरडे व्याहाडणी ॥ बोरांटिया शार्दूळ आणि । नभचुंबित असंख्यात ॥७॥
चिंचा जांबळी बदरी ॥ बाभळी नारिंगी घोटबोरी ॥ रायआंवळे भोंकरी ॥ सालफळी बहुसाल ॥८॥
बिल्व मधुवृक्षांची दाटणी ॥ देवदार आणि टेंबुरणी ॥ ताड माड मालिनी ॥ केतकी बिबि पांगारे ॥९॥
फणसी गंभिरी नारिकेळी ॥ कपित्थवृक्ष कर्पूरकर्दळी ॥ मांदारवृक्ष द्राक्षफळी ॥ फळलिया बहुसाल ॥१०॥
जाई जुई आणि केतकी ती ॥ मोगरी शतपत्रा मालती ॥ बकुळ शेवंती बहुजाती ॥ आणिक पारिजातक ॥११॥
ऐशा वनस्पती सांगतां ॥ स्कंदपुराणीं असे विस्तीर्णता ॥ परी संकलित बोलिलों श्रोतां ॥ श्रवण केलें पाहिजे ॥१२॥
ऐसी तें वनस्पतीश्रिया ॥ वसे पूर्ण विंध्याद्रीचिया ठाया ॥ तरी ते आतां वर्णावया ॥ कैंची मति मज असे ॥१३॥
तरी ते वनश्रिया आतां कैसी ॥ रचिजे हस्तपादादिकेंसी ॥ अंबरभूषणें दीजे तियेसी ॥ तीं कायसी कवण ॥१४॥
ना तरी लक्ष्मीचें भूषण आणिजे ॥ तेंचि वनश्रियेसी दीजे ॥ येरवी आणखी मेळविजे ॥ कोठूनि तरी श्रोतये ॥१५॥
ऐसा जरी बोलावा प्रश्न ॥ श्रोता तरी बहुविचक्षण ॥ ती लक्ष्मीची भूषणें मेळवून ॥ केवी घडवेल वनश्रिया ॥१६॥
तरी असो द्वैतवाणी ॥ आतां असे जें स्कंदपुराणीं ॥ तेंचि लेववूं श्रवणीं ॥ श्रोतयांचे आदरें ॥१७॥
बनश्रियेचीं भूषणें आणिलीं ॥ तेणें लक्ष्मी शृंगारिली ॥ कीं ते विष्णुंकांता अवघी घडिली ॥ वनस्पतीचीच पैं ॥१८॥
तरी वनस्पती कैसी ते कवण ॥ वृक्ष वल्ली धान्यादि तृण ॥ तेथें हरिहराविरिंचचिं मन ॥ विश्रांति पावे सर्वदा ॥१९॥
तरी ते दिव्य वनस्पतीची ॥ आरंभिली कांता हरीची ॥ हे होय वनश्रियेची ॥ सहोदरी साक्षात ॥२०॥
दिव्य वल्लीचें जे फळ ॥ तेंचि काय वनस्पतीचें मूळ । त्या तळीं जें करकमळ ॥ कीजेति रभापुष्पाचें ॥२१॥
ब्रह्मवृक्षाचें जें पुष्प ॥ तेंचि वनश्रियेचें नास ॥ वैडूर्यवल्ली सुहास्य ॥ अधरपुट सर्वथा ॥२२॥
दिव्य तेजोमय जी कमळें ॥ वरी मीनलीं सुनीळ अलिकुळें ॥ तींचि जाणा चक्षुबुबुळें ॥ वनश्रियेचीं शोभिवंत ॥२३॥
दाडिमीबीजें दशना- ॥ मध्यें सोलविं दळाची रसना ॥ दिव्य तेज भूषण श्रवणा ॥ तरुण वृक्ष गर्भाचिया ॥२४॥
कपित्थतरुचीं फळें सदटं ॥ तीं वक्षःस्थळींची पीन कुट ॥ ऊर्ध्व उदरीं रोमरेखा सुभट ॥ केतकीदळ गर्भीचें ॥२५॥
तैलपुष्पांची सखोल नाभी जाण ॥ रंभास्तंभ दिव्य चरण ॥ आतां जे अंबरभूषण ॥ तें कवण कायसें ॥२६॥
प्रोत सुरंभेची गर्भपत्रें ॥ तींचि शुद्ध कायेसी वस्त्रें ॥ सुवर्णफळेंचि माणिकें विचित्रें ॥ तोचि हार कंठीं ॥२७॥
द्रुमलता जे अचळू ॥ तेंचि वनस्पतीचें पट्टकूळू ॥ चंपकवृक्षाचें जें कमळू ॥ तेंचि मुक्त नासिकी ॥२८॥
ब्रह्मदंडीचिया कळिका ॥ त्या वनश्रियेचिया आंगोळिका ॥ त्याचपरी रत्नजडित मुद्रिका ॥ रुद्राक्षफळ तरुचिया ॥२९॥
सुवर्णकमळ विक से ॥ तेंचि वनश्रियेचे मौळीं विलसे ॥ भाळीं कुंकुम रेखिलें दिसे ॥ डाळिंबीपुष्पाचें ॥३०॥
लक्ष्मीवनश्रिया आपण ॥ हे वनस्पतीची घडिली संपूर्ण ॥ मग तियेसी समर्पण ॥ केली नंदीनें हरीसी ॥३१॥
नंदीमुखीं जन्म कमळजेसी ॥ तरी वनस्पतीची घडिली कैसी ॥ तें संकलित श्रोतयांसी ॥ करुं निरुपण अवधारा ॥३२॥
महाप्रळ्याचे अवसानीं ॥ देवांसी होतसे महापळणी ॥ ते काकुळती लागती भिऊनी ॥ रिघती गिरिकंदरी ॥३३॥
तैं ब्रह्मादिकां होतसे वळसा ॥ त्यजूनि शक्ति गृहवेवसा ॥ मग भांबावती दशदिशा ॥ मौनें महदादींचे ॥३४॥
तैं लक्ष्मी विसरे हरी ॥ मग बोभाईत दीर्घस्वरीं ॥ अहो वनश्रिये अवधारीं ॥ शरण आलें तुजलागीं ॥३५॥
अहो वनस्पती सकळजणीं ॥ श्रीहरी गेला मज सोडूनी ॥ तुम्हीं रक्षावें मजलागुनी ॥ म्हणूनि आलें या ठाया ॥३६॥
ते सर्व शृंगारेंसी कामिनी ॥ राहिली वनस्पतीघटीं व्यापुनी ॥ जैसी शुक्तिगर्भी लसे खाणी ॥ मुक्ताफळांची पैं ॥३७॥
ते शत एक संवत्सर ॥ जपती वरुंणाग्निसमीर ॥ करावयालागीं संहार ॥ चहूं खाणींचा एकदांचि ॥३८॥
मग येतां प्रळया चें अवसान ॥ तेव्हां वनस्पती भक्षितो वरुण ॥ मग शतवर्षे वृष्टि करुन ॥ विनाश करी ॥३९॥
मग तें जळ कोंदलें त्रिभुवनीं ॥ तयासी संहारीतसे प्रळयवन्ही ॥ मग असे त्रैलोक्य व्यापुनी ॥ महाज्वाळा तेंचि पैं ॥४०॥
ऐसा त्रिभुवनींचा ज्वाळ ॥ तो महाप्रळ्याचा वडवानळ ॥ त्यासी झडपोनि करी कवळ ॥ महाचंडवात तो ॥४१॥
चंडवात कोंदाटला तो महदाकाशें ग्रासिला ॥ महातत्त्वीं समरस जाहला ॥ पंचभूतांच्या ॥४२॥
वरुणें भक्षिल्या वनस्पती ॥ तयांच्या घटीं लक्ष्मी होती ॥ मग तया वरुणाप्रती ॥ भक्षिलें वडवानळें ॥४३॥
मग ते त्रिभुवनींची ज्वाळालहरी ॥ चंडवात भक्षी झडकरी ॥ मग राहिलें तयाभीतरी ॥ बीज लक्ष्मीचें ॥४४॥
तयीं या तिहींचा अवतार ॥ उद्भवला नंदिकेश्वर ॥ मग तयाचे मुखीं उद्भवला जन्मांकुर ॥ लक्ष्मीचा ते वेळे ॥४५॥
मुखकमळीं जन्म लक्ष्मीसी ॥ म्हणोनि नाम तियेसी ॥ मग ते समर्पिला विष्णूसी ॥ नंदिकेश्वरे तेधवां ॥४६॥
नवल करणी कर्तयाची ॥ कोणा न कळे सर्वथाची ॥ मग पाहे भावार्थ सत्यची ॥ कैसें काय योजी तो ॥४७॥
नंदीचे वदनामझारी ॥ रसना मुख देतसे लहरी ॥ लक्ष्मी उद्भवली ते सागरी ॥ म्हणोनि सिंधुजा नाम पावली ॥४८॥
ऐसी प्रळयाची जे अत्यंत युक्ती ॥ महालक्ष्मी सांगे अगस्तीप्रती ॥ ते कथा असे जी पुढती ॥ महाप्रळ्याची ॥४९॥
हें सांगावया काय कारण ॥ नारदें देखिलें विंद्याद्रीचें वन ॥ म्हणोनि सांगितलें गुणवर्णन ॥ लक्ष्मीवनाश्रियेचें ॥५०॥
तरी आतां ते वनश्रियेसी ॥ मंदिरे दामोदरें पाहिजेत जैशीं ॥ ते वनस्पतींमध्ये कवण कैसीं ॥ तें करु आतां निरुपण ॥५१॥
नाना जातींचे दिव्य तरुवर ॥ एकामाजी एक गुंतले अपार ॥ तेथें मार्गंडाचे सहस्त्र कर ॥ संचरों न शकती सर्वथा ॥५२॥
गिरिमस्तकींची नीरें ॥ तळवटा धांवती उरगाकारें ॥ तेणे भरलीं तीं सरोवरें ॥ पूर्णांबूचीं ॥५३॥
तेथें क्रीडती हंस चकोर ॥ आणि दीर्घ ध्वनीचे मयूर ॥ तेथें उद्भवती पंचम स्वर ॥ कोकिळादि पक्षियांचे ॥५४॥
तेथें नाना जातींचिया शब्दध्वनी ॥ कीं त्या श्रुति त्राहाटती वैखरींनी ॥ त्या वनश्रियेचे भवानीं ॥ होत असती गायनें ॥५५॥
तेथें पर्वतांचीं महाकंदरें ॥ वरी द्रुमपटलें शिखराकारें ॥ तींच काय होती दामोदरें ॥ वनश्रियेचीं ॥५६॥
ब्रह्मकुमुदिनीचीं कमळें ॥ तींच विकासली इंदुकोटि मंडळें ॥ त्यांसी वेष्टिली नक्षत्रें सकळें ॥ त्या श्वेत पुष्पयाती ॥५७॥
चंपकवृक्षाचीं फुलें उदित ॥ त्याचि दीपिकाज्योती तेज बहुत ॥ तेथे षट्रपद झेपावत ॥ तेचि होती तेथें पतंग ॥५८॥
ऐसें वाखाणितां वनश्रियेसी ॥ उपमा न पुरे त्रैलोक्यासी ॥ नाना सुगंध जातींसी ॥ कवण श्रद्धा कैसी करी ॥५९॥
ऐसा तो विंध्याद्री आपुले धामीं ॥ द्विरुप म्हणविजे स्थावरजंगमी ॥ तेणें ब्रह्मपुत्र देखिला व्योमीं ॥ येतां नारदमुनी तो ॥६०॥
देखिला ब्रह्मचर्यकासोटा ॥ मृगाजिने शोभला जोगटा ॥ दंड कमंडलु मस्तकीं जटा ॥ वातस्पर्शें उडताती ॥६१॥
ऐसा अवधूत योगीराज ॥ तो महाज्ञानी त्रैलोक्यपूज्य ॥ दिव्यदेही दिव्यतेज ॥ सूर्यमंडळ जयापरी ॥६२॥
ऐसा तो ब्रह्मचारी ब्रह्मवंद्य ॥ जवळी आला मुनि नारद ॥ मग तेणें दिधला आशीर्वाद ॥ विंध्याचळासी ॥६३॥
मग विंध्याद्री बद्ध करेंसीं ॥ नमस्कारी नारदासी ॥ म्हणे सकळ जन्म आजिचे दिवशीं ॥ आले मुनि मम ठाया ॥६४॥
मग झालें क्षेमालिंगन ॥ विंध्याद्री करिता झाला स्तवन ॥ म्हणे फळ जी माझें जपतपसाधन ॥ जे दर्शना स्वयें आलेती ॥६५॥
जन्मांतरींचे यज्ञहोम ॥ साधिले होते व्रतनेम ॥ तें आजि सुफळ झालें नाम ॥ धराधर माझें कीं ॥६६॥
तरी माझें नाम जें धराधर ॥ तेणें धन्य देखिला योगीश्वर ॥ आजि माझा पुण्यतरुवर ॥ फळलासे बहु फळीं ॥६७॥
ऐसी विंध्याद्रि स्तुति करीत ॥ परिसोनि विश्वासला ब्रह्मसुत ॥ मग क्षणएक राहूनि निवांत ॥ लाविले नेत्र तयानें ॥६८॥
जेवीं समरीं शस्त्रघात ॥ महाक्षत्रिय मूर्च्छित ॥ तैसा तो खोंचला ब्रह्मसुत ॥ विंध्याद्रीचे वचनें ॥६९॥
मग शैल वदे नारदाप्रती ॥ स्वामी कां तुम्ही विश्रामलेती ॥ क्षमा करोनि मजप्रती ॥ श्रवण करवा स्वामिया ॥७०॥
मग नारद वदे मधुर वाणी ॥ आम्ही गमन करितों त्रिभुवनीं ॥ परी विपरीत ऐकिलें श्रवणीं ॥ आजि या वेळे ॥७१॥
धराधर नाम तुजप्रत ॥ हें तुझ्या ठायीं विपरीत ॥ तें ऐकिलें आजि सत्य ॥ म्हणोनि मौन धरियेलें ॥७२॥
धराधर नामाचे गिरिवर ॥ तेही नाहीं म्हणवीत धराधर ॥ परी तुझ्याठायीं हें अगोचर ॥ ऐकिलें जाण ये काळीं ॥७३॥
शैल हें नाम नव्हे तुझें ॥ या नामाचें असे थोर ओझें ॥ तरी प्रत्युत्तर परिसें माझें ॥ गिरिवरा तूं ये समयीं ॥७४॥
अष्टकुळाचळ रचिले पृथ्वीवरी ॥ अवधियांचा स्वामी हेमाद्रि ॥ नाहीं अनुवादली त्याची वैखरी ॥ हें गुणनाम जाणावे ॥७५॥
अरे धराधर नाम त्या मेरुचें ॥ सर्व गिरिवर दास्य करिती त्याचें ॥ हे वृथा उत्तर तुझे वैखरीचें ॥ अनुवादलासी गिरिवरा ॥७६॥
मग विंध्याद्रि वदे प्रत्युत्तर ॥ काय जी वाखाणितां मेरु गिरिवर ॥ मजहूनि महिमा थोर ॥ कैसा पाहूं आजि तो ॥७७॥
मी समर्थ विंध्याचळ ॥ मजसीं तो न तुळे उदयाचळ ॥ अग्निकोणींचा महामौळ ॥ लिंगपर्वत तो असे ॥७८॥
दक्षिणेस असे मैलागिरी ॥ त्यावरी चंदनतरु वेष्टिलें विखारीं ॥ इतुकेन तो महिमासरी ॥ केवीं पावेल आमुची ॥७९॥
हेमकूट असे नैऋत्यकोणीं ॥ तो क्षितिकूटचि आमुचे मनीं ॥ इतुकेन तो आम्हांहुनी ॥ केवीं थोर म्हणवीतसे ॥८०॥
पश्चिमे असे गंधगिरी ॥ गंधर्व असती त्या पाठारीं ॥ इतुकेन आमची सरी ॥ कैशी पावेल कळेना ॥८१॥
वायव्यदिशेस असे षट्पर्वत ॥ त्यावरी वसत असे मारुत ॥ इतुकेन तो महिमेंत ॥ केवीं मजहूनि आगळा ॥८२॥
उत्तरें क्षीरार्णवाचे तीरीं ॥ पर्वते असे मंदरागिरी ॥ त्याचे मस्तकीं त्रिपुरारी ॥ होता ऐशीं सहस्त्र वर्षै ॥८३॥
रुद्रगिरी असे ईशानकोणी ॥ तेथें असती एकादश शूळपाणी ॥ तो आमुचे स्पर्धलागुनी ॥ तुळेल कैसा नेणवे ॥८४॥
अमृतवल्ली असती द्रोणाचळीं ॥ म्हणूनि श्रेष्ठ तो या भूतळीं ॥ परी आमुचे स्पर्धेची नव्हाळी ॥ पावेल तो कैसेनी ॥८५॥
तुम्ही वाखाणिता ज्याचें महत्त्व ॥ त्या हेमगिरीस सकळांचें स्वामित्व ॥ परी त्याच्या ठायीं असे जडत्व ॥ तो आम्हां केवीं तुळों पाहे ॥८६॥
ऐसी ऐकूनि न्यूनता ॥ क्रोध नावरेचि ब्रह्मसुता ॥ त्यानंतर झालासे बोलता ॥ विंध्याद्रीई पाहे पां ॥८७॥
गिरींचा प्रताप सर व्यर्थ ॥ आपणा म्हणविसी समर्थ ॥ ऐसा कोणता रे पुरुषार्थ ॥ असेल तुझा न कळे तो ॥८८॥
पुढिलांसी बोले अपमानी ॥ आपुला सांगे पराक्रम सद्गुणी ॥ तो जन्म पावे अधमखाणीं ॥ सूकरादि पशुयातीचे ॥८९॥
आपणासी नसे ज्ञान त्रिशुद्धि ॥ पुढिलांतें नाना प्रबोधी ॥ नुमजे वेदार्थाची शुद्धि ॥ तो होय वनसूकर ॥९०॥
फुकटचि मान्य होय लोकांसी ॥ पुढिलांचें महत्त्व निर्भत्सीं ॥ जो बोलिजे महामूर्खैसीं ॥ तो मूर्ख एक सहस्त्रांत ॥९१॥
सुबुद्धीचा नेणे विचार ॥ आणि धरी जाणिवेचा अहंकार ॥ द्तो होईल राज्यधरं ॥ वृक्षकोटरींचा ॥९२॥
सत्यासी म्हणे हें वृथा ॥ आणि खंडी जो शुद्ध वेदार्था ॥ तो जाय जी यमपंथा ॥ चंद्रार्कवरी जाण पां ॥९३॥
सत्याचा मानी त्रास ॥ असत्याचा करी हव्यास ॥ तो निश्चयें जाणावा पुरुष ॥ अल्पायुषी सर्वथा ॥९४॥
सत्पुरुषांची करी निर्भत्सी ॥ आणि खंडी पुढिलांची आशा ॥ तरी तो होय यमदंडे पिसा ॥ तीस सहस्त्र वर्षेवरी ॥९५॥
उगीच मान्यता आवगे ॥ पुढिलां आपुर्ले श्रेय सांगे ॥ परद्रव्यहरणीं चित्तवृत्ति न भंगे ॥ तो एक मूर्ख जाणावा ॥९६॥
सत्पात्र देखिल्या दृष्टीं ॥ न वंचे तयाची भेटी ॥ न्यायोपर्जित दीजे धान्यमुष्टी ॥ तें कोटिपुण्य जाणावें ॥९७॥
अन्यायानें द्रव्य हरी ॥ आणि जो ब्राह्मणभोजन करी ॥ तो दाता गिरिकंदरीं ॥ भोगी नाना योनी निरंतर ॥९८॥
ऐशा धर्माधर्माचिया युक्ति ॥ नारद सांगे विंध्याद्रीप्रती ॥ आतां तुम्ही व्हावें गा क्षितिपती ॥ विंध्याचळ पर्वतांचा ॥९९॥
आतां तू करिसी मेरुशीं स्पर्धा ॥ तरी शैलां मान्य होसी रे विविधां ॥ परी मेरुतुल्य न होसी कदा ॥ तरी करावें मेरुचें दास्य ॥१००॥
तुवां निषेधिले गिरिवर ॥ आतां पृथ्वीवरी तूंचि थोर ॥ ऐसें वदोनियां ब्रह्मकुमर ॥ निघता झाला तेथोनियां ॥१०१॥
आतां स्वस्थ नांद गा आपुले मंदिरीं ॥ तूं एक थोर पृथ्वीवरी ॥ ऐसे म्हणूनियां झडकारे ॥ निघाला मुनी नारद तो ॥१०२॥
स्वर्गपंथ क्रमी मुनीश्वर ॥ तंव तो शैल झाला चिंतातुर ॥ म्हणे माझा न धडे आदर ॥ नारदमुखें ॥१०३॥
प्रकटे चिंतेची अवस्था ॥ तो नर अंतरला आत्महिता ॥ चिंतेनें चंचळ होय काता ॥ पद्मनाभाची तेधवां ॥१०४॥
चिंता प्रहरी सद्बुद्धी ॥ चिंता उद्भवी विपरीतबुद्धी ॥ चिंता विमुख करी सिद्धी ॥ साध्य तें असाध्य करीतसे ॥१०५॥
चिंतार्णवीं पडिल्या पुरुषा ॥ मग विसरे गृहव्यवसा ॥ प्राप्त होय उत्तरदशा ॥ हें कारण चिंतेचें ॥६॥
चिंता प्रवर्ते जया नरा ॥ तैं ओहटे दिसे वादनामृतकरां ॥ कृश व्हावया शरीरा ॥ हेचि होय मूळ चिंता ॥१०७॥
चिंतार्णवाचिया लहरी येती ॥ तैं पीयूषाचीं हालाहलें होती ॥ क्षुधा अवीट सुषुप्ती ॥ अरुचि होय नरासी ॥१०८॥
चिंतेनें प्रवर्ते मौन ॥ तेणें होय हृदय शून्य ॥ स्वस्थ असतां दिसे न्यून ॥ पदार्थमात्र देहासी ॥१०९॥
चिंता हरवी द्रवार्थ ॥ तेणें दिसे मंद पुरुषार्थ ॥ चिंतेस प्रहारी तो समर्थ ॥ त्रैलोक्यामाझारी ॥११०॥
विनाशे देहाची धारणा ॥ अकल्प होय हरिस्मरणा ॥ पालटे हृदयींची वासना ॥ मग तो दैवहीन सहजचि ॥१११॥
ऐसा तो विंध्याद्री ॥ चिंतार्णवीं पडिला भारी ॥ मग चिंता प्रहरुनि स्मरी ॥ काय एक मानसीं ॥११२॥
म्हणे विरिंचीचा जो आत्मजं ॥ नारदनामें तेजःपुजं ॥ तो कीं आला सहज ॥ श्रद्धाभक्ति न धडे मजहस्तें ॥११३॥
जळो माझें सामर्थ्य पूर्ण ॥ पूजिला नाहीं विधिनंदन ॥ आतां त्यास मानंपात्र आन ॥ भेटेळ कोठें नेणवचि ॥११४॥
सर्व सामग्री असोनि गृहमेळी ॥ इष्टमित्र आलिया ते काळीं ॥ तयांसी वंची तो या भूतळीं ॥ महामूर्ख जाणावा ॥११५॥
सत्पात्र देखूनि दृष्टईं ॥ त्यासी दवडूनि घातलें नेटीं ॥ तो महापातकी ये सृष्टीं ॥ धराभार जाणावा ॥११६॥
आतां असो हा धर्माचार ॥ विंध्याद्रीनें स्मरिला विचार ॥ म्हणे आतां पुरुषार्थ न करी जो नर ॥ तो निंद्य जगीं जाणावा ॥११७॥
तयासी ऐहिक ना पारत्रिक जोडलें ॥ संसारीं निष्फळचि क्रमिलें ॥ जैसें तृणपर्ण वातें उडविलें ॥ तया मृत्युलोक ना स्वर्ग ॥११८॥
आतां तरी धरुं पुरुषार्थ ॥ पूर्ण करुं सर्व मनोरथ ॥ मग मी होईन समर्थ ॥ कुळाचळामाझारी ॥११९॥
मग देहीं कल्पूनियां प्रसंग ॥ उठावला मनोवृत्तीचा वेग ॥ मग क्रमिता जाहला ऊर्ध्वमार्ग ॥ गगनोदरीं ॥१२०॥
जैसा सोमयागाचा धूम ॥ उद्भवतां लोपे व्योम ॥ कीं तो सुपर्ण विहंगम ॥ संचरे गगनोदरीं॥१२१॥
कीं महाप्रळ्याचे अवसानीं ॥ आकाश पडों पाहे मेदिनीं ॥ म्हणोनि स्तंभ उद्भवला गगनीं ॥ पाताळपुटींहूनियां ॥१२२॥
ऐसा ऊर्ध्व वाढिन्नला विंध्या ॥ केली सुवर्णाचळाची स्पर्धा ॥ मग वसुमती झाली द्विधा ॥ उत्तर दक्षिण द्विभाग ॥१२३॥
मेरुहूनि चार कोटी ॥ संचरला नभाचे पोटीं ॥ मग मौन अवलंबून व्योमपुटीं ॥ राहिला निश्वळ ॥१२४॥
शिवदास गोमा विनवी श्रोतां ॥ कथेसी श्रवण अर्पिजे आतां ॥ होऊं दीजे परिपूर्णता ॥ एकाग्र मनाची ॥१२५॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे विंध्याद्रिवर्णनं नाम द्वितीयाध्यायः ॥२॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति द्वितीयाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2011
TOP