काशी खंड - अध्याय ३८ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥
अगस्ति वदे शिवनंदना ॥ आतां नित्याचार कैसा चारी वर्णा ॥ क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मणां ॥ कैसा सदाचार ॥१॥
कैसी चतुर्वर्णाचारनीत ॥ आश्रमाचार तो करावा श्रुत ॥ गार्हस्थ्य संन्यास ब्रह्मचर्य वानप्रस्थ ॥ यांत श्रेष्ठ गृहस्थाश्रम ॥२॥
षण्मुख म्हणे गा कुंभजा ॥ सदाचार परियेसीं बरविया वोजा ॥ हाचि प्रश्न केला होता वृषभध्वजा ॥ हैमवतीनें ॥३॥
तो सदाचार कैसा गा अगस्ती ॥ चतुर्वणाची रहस्यस्थिती ॥ नम्र होइजे गा सर्व जाती ॥ भलिया पुरुषें ॥४॥
राजा सिद्ध आणि पतिव्रता ॥ षट्कर्मी ब्राह्मण आणि गुरु पिता ॥ आपणां श्रेष्ठ आणि वेदमाता ॥ इतुकियांची निंदा वर्जावी ॥५॥
बाळ प्रौढ सुंदर कामिनी ॥ वस्त्रें अलंकार परद्रव्यहारिणी ॥ कुदृष्टीनें न पाहावें भल्यांनी ॥ सदाचारी पुरुषें ॥६॥
शून्यगृहीं न वसिजे सुषुप्ती ॥ परप्रियेसीं कल्पिजे नीती ॥ गमनीं अवलोकिजे क्षितीं ॥ सदाचारी पुरुषें ॥७॥
शीतकाळी प्रिय हुताशन ॥ तो साक्षात बोलिजे त्रिनयन ॥ जडत्वास्तव त्यासी चरण ॥ न लाविजे भल्यांनी ॥८॥
लधुशंका आणि गुरळी ॥ गग्नस्नान आणि घ्राणमळी ॥ दंतधावन आणि आशौच आंघोळी ॥ इतुकीं जळीं वर्जिजे ॥९॥
इतुकें करी तो दोषें लिंपी ॥ उदक साक्षात विष्णुरुपी ॥ नीतिवंत पुरुषें इतुकें आपीं ॥ वंचिजे सर्वथा ॥१०॥
पेरिले शेतीं वाहात्या भूतळीं ॥ महासरिता आणि क्षीरवृक्षातळीं ॥ मागीं अथवा कुंजमंडळीम ॥ न कीजे पुरीष भल्यांनी ॥११॥
ब्रध्नमुख आणि भस्मराशीं अग्नीं ॥ येथें वंचिजे उच्छिष्टपात्रपाणी ॥ लाळ मूत्र आणि स्पर्शन चरणीं ॥ इतुकें वंचिजे ॥१२॥
प्रभातीं माध्यान्हीं सायंकाळीं ॥ सविता न पाहावा चक्षुमंडळीं ॥ आणिक वंचिजे ग्रहणकाळीं ॥ भलतेनी पुरुषें ॥१३॥
सूर्य पाहतां होती अलपनेत्र ॥ ग्रहणीं वेधपीडेचें सूत्र ॥ म्हणोनि उच्चारीं गुरुमंत्र ॥ तेणें होय निर्दोष ॥१४॥
एकदिन अनाथ अन्नार्थी जन ॥ अल्पगात्री बधिरश्रवण ॥ पात्र अपात्र ऐसें विवेचन ॥ न कीजे भल्यांनी ॥१५॥
त्यांसी दीजे वस्त्रें अन्नदान ॥ परी वेंचिजे द्रव्यदान॥ साध्वी स्त्रियांसी संभाषण ॥ न कीजे भल्यांनी ॥१६॥
दुष्ट रायाचें दानदत्त ॥ तें वमनासमान कुश्चित ॥ तें अंगीकारितां प्रायश्चित ॥ दीजे त्या ब्राह्मणा ॥१७॥
म्हणोनि दुष्टदानाचा संम्रह ॥ षट्कर्मी न घेइजे प्रतिग्रह ॥ कल्पपर्यंत अमंगळ देह ॥ भोगी तो ब्राह्मण ॥१८॥
आपुलें गृहीं श्राद्धविधि होय ॥ परगृहीं ब्राह्मण जो जाय ॥ तें उभयतांचें श्राद्धकार्य ॥ निष्फळ पिंडदान ॥१९॥
दक्षिणांगी जो शयन करी ॥ त्यासी रोग बाधिती शरीरीं ॥ तो मात्रा भक्षी जन्मवरी ॥ परी साध्य नाहीं ॥२०॥
म्हणोनि वामांगीं कीजे शयन ॥ तेणें सर्व भक्ष्यें होती जाणे ॥ तरी तो त्रैलोक्यवैद्याकारण ॥ अजित नर ॥२१॥
शुद्ध भावार्थाचां दानें ॥ तीं अंगीकारावीं शुद्ध ब्राह्मणें ॥ प्रतिग्रहे जरी घे वेदाविणें ॥ तो होय वनसूकर ॥२२॥
पालखीदान संकल्प करी ॥ सत्पात्र होऊनि अंगीकारी ॥ तो दाता पृथ्वीवरी ॥ होय राजेश्वर ॥२३॥
गज-वाजिदान संकल्प करितां ॥ तो होय गज-तुरंगमभोक्ता ॥ वस्त्रदान सत्पात्रासी देतां॥ तो पावे चंद्रलोकीं ॥२४॥
कुंभिनी दान देतां होय भूपती ॥ हेमदानें होय सुकुमार अंगकांती ॥ रौप्यदान देतां होय लावण्यमूर्ती ॥ जगत्रयामध्यें ॥२५॥
धन देतां होय लक्ष्मीबळ ॥ अन्न दान देतां होय सुशीळ ॥ उपानह दान देतां निर्मळ ॥ होय अंगकांति ॥२६॥
जन्मवरी नम्रता असिजे ॥ सत्पात्रीं शांति क्षमा कीजे ॥ नित्याचारीं भाव भक्ति कीजे ॥ सत्पात्रें गृहस्थें ॥२७॥
सत्पात्रें आलिया गृहासी ॥ गृहस्थ वंची जरी तयासी ॥ तरी जन्मांतरींच्या पुण्यराशी ॥ होतील त्यासी विमुख ॥२८॥
अधरींचा रोम छेदिजे दशनें ॥ उभय हस्तीं करी मौळिकुरवाळणें ॥ हीं प्रकटावया कारणें ॥ दुर्दशेचे पैं ॥२९॥
बद्धांजलीं प्राशन करी जो जल ॥ स्नानीं झाडी मौळीचें रोमकुळ ॥ दशनीं नखें छेदी तो अमंगळ ॥ बोलिजे अवलक्षण ॥३०॥
अनृतं निर्दक आणि परद्वारी ॥ तस्कर आणि जुंवारी ॥ विश्वासघातकी आणि मत्स्यआहारी ॥ इतुकियांसी संग न कीजे ॥३१॥
सर्व महत्त्वाचें जें कारण॥ तरी शरीरीं आवरिजे नम्रपण ॥ जैसा वृक्षभार महत्त्वें पूर्ण ॥ नम्र होय फळीं ॥३२॥
वृद्ध पुरुष आणि कामधेनु ॥ घृतघट मधुघट ब्राह्मणु ॥ थोर वृक्ष आणि सुवाशिणु ॥ हे शकुन घेइजे दक्षिणांगी ॥३३॥
मूळ मघा आश्लेषा अमावास्यादिनी ॥ स्त्रीसीं भोग न कीजे ब्राह्मणीं ॥ दरिद्र भोगावया अवलक्षणीं ॥ हेंचि मूळ जाणावें ॥३४॥
स्त्री गरोदर जाहालिया परियेसा ॥ गर्भवासना पूर्ण कीजे चतुर्मासा ॥ तरी स्त्रिया सुखी गर्भवळसा ॥ नव्हे कोणे काळीं ॥३५॥
मग प्रसूत जाहालिया कामिनी ॥ नाम ठेविजे एकादशदिनीं ॥ ते नामधारणा त्रिभुवनीं ॥ महसुखदायक ॥ ३६॥
मग त्रयोदशावा जो दिन ॥ अपत्याचें कीजे कर्णवेधन ॥ मग तयासी नव्हे जाण बंधन ॥ पिंडदोषाचें ॥३७॥
मग ब्राह्मणाचा व्रतबंधाचार ॥ कीजे पंचम संवत्सरीं सादर ॥ क्षत्रियाचा व्रतबंध निर्धार ॥ कीजे अष्टवषी ॥३८॥
आणिक व्रतबंध वैश्यासी ॥ कीजे द्वादशवर्षासी ॥ व्रतबंध शूद्रासी ॥ बोलिलाचि नाहीं ॥३९॥
अगस्तीसी वदे शिवकुमर ॥ ऐसा चतुर्वर्णाचा आचार ॥ आतां कैसा कीजे स्वयंवर ॥ अपत्याचा पैं ॥४०॥
ब्राह्मण नवरा वर्षे षोडश ॥ क्षत्रिय नवरा वर्षे वीस ॥ वैश्य नवरा वर्षे चौवीस ॥ परियेसीं गा अगस्ती ॥४१॥
आतां चतुवर्णांचा वधू कैसी ॥ त्यांही कन्यादानें कीजे तीं कैसी ॥ जेणें प्राप्ती होय पुण्यफळासी ॥ तें परियेसीं आतां ॥४२॥
ऐसा चतुर्वर्णांचा सदाचार ॥ त्याहूनि अधिक तो व्रती नर ॥ आतां कन्या देतां विचार ॥ कीजे अगस्तिमुनी ॥४३॥
सप्त अष्ट वर्षांची पर्णितां ॥ तरी पाविजे पुण्यफळ सुकृता ॥ द्वादश वर्षांची अर्पितां ॥ निष्फळ कन्यादान ॥४४॥
द्वादशवर्षी कन्यादान करितां ॥ ते जाहलीसे चंद्राग्निगंधर्ववृता ॥ कवणें कुळीं पर्णितां ॥ निष्फळ जाणावी ॥४५॥
अष्ट वर्षांची कुमारी ॥ ते कन्या फळदायक नोवरी ॥ उभय कुळांसी उद्धरी ॥ सुखदायक तें ॥४६॥
एक पर्णिती रजस्वली ॥ ते निष्फळ उभय कुळीं ॥ अष्ट वर्षांची जे सुफळी ॥ ते पर्णिजे भल्यांनीं ॥४७॥
कन्या देतां कवण साक्षसूत्र ॥ राजा पाचारिजे राजपुत्र ॥ पंडित वेदाध्ययनीं शुद्धमंत्र ॥ अथवा वृद्धा अबला एक ॥४८॥
यांमध्ये एक पाचारुन ॥ मग कीजे कन्यादान ॥ तो या लोकीं परलोकीं पावन ॥ होय ऐहिक परत्रासी ॥४९॥
बिजवरासी केलिया कन्यादान ॥ तो वर नव्हे गा स्मशान ॥ ते जाणावी कन्या अपावन ॥ स्मशानवृक्ष जैसा ॥५०॥
ममतेस्तव कन्या रजोवती ॥ गृहींचि राखिती पितर जनितीं ॥ षण्मुखं म्हणे गा अगस्ती ॥ परियेसीं तें लांछन ॥५१॥
त्याचिया दोषा नाहीं निवृत्ती ॥ तो नव्हे कोठें प्रायश्चित्ती ॥ द्वादश ब्रह्महत्या नित्य होती ॥ एवढें लांछन तयाचें ॥५२॥
स्त्रीहत्या गोवध लांछन ॥ या दोषांसी तरी कोणेकाळीं भंजन ॥ परी रजोवती कन्यालांछन ॥ नाहीं निष्कृती तयासी ॥५३॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ हे निरुपिली सदाचारनीती ॥ आतां ब्रह्मचर्यातें तुजप्रती ॥ करुं निरुपण ॥५४॥
शूद्रावाचूनि जो वर्ण ॥ तो व्रतबंधी बोलिजे ब्राह्मण ॥ इतरी ब्रह्मचर्य जाण ॥ कैसें वर्तिजे सांगों तुज ॥५५॥
प्रथम शौच स्नान संध्यावंदन ॥ मग ध्येय ध्यान यजन ॥ ऐसे ब्राह्मणें साधिजे पंचाग्न ॥ मग सहावी भिक्षा ॥५६॥
जैं ब्रह्मचर्यवासी ॥ तरी त्याची योगस्थिति कैसी ॥ आणि दंडासन तयायी ॥ कैसें निरुपिलें ॥५८॥
वैश्यें घेतला ब्रह्मचर्ययोग ॥ तरी कैसा त्याचा आचारमार्ग ॥ ऐसा त्रिवर्णाचा प्रसंग ॥ परियेसीं गा अगस्ती ॥५९॥
ब्रह्मवृक्षाचा दंड निर्माण ॥ स्थूल तरी पादांगुष्ठप्रमाण ॥ दीर्घ तरी मौळीपर्यंत जाण ॥ हा दीजे ब्राह्मणासी ॥६०॥
बिल्ववृक्षाचा दंड सुभट ॥ स्थूल जैसा पाणीअंगुष्ठ ॥ दीर्घ तरी पर्यंतललाट ॥ दीजे हा क्षत्रियासी ॥६१॥
रुद्रवृक्षाचा जो दंड ॥ दीर्घनासिकाग्रप्रमाण अखंड ॥ स्थूल सांगीतला जैसा गोदंड ॥ हा दीजे वैश्यासी ॥६२॥
हें ब्रह्मचारियासी दंडधारण ॥ सांगीतलें दीर्घ स्थूल प्रमाण ॥ आतां ब्रह्मचारियासी आसन ॥ कवण कैसीं ॥६३॥
मृगाजिन दिधलें ब्राह्मणासी ॥ चितळाजिन क्षत्रियासी ॥ आसन दिधलें वैश्यासी ॥ अजाचर्म ॥६४॥
ब्राह्मणाचा कमंडलु तुं बिनीफळाचा ॥ वैश्यासी दिधला लोहपात्राचा॥ क्षत्रियासी निर्मिला मृत्तिकेचा ॥ ऐसे कमंडलू ॥६५॥
शूद्रवर्णावांचूनि सर्वही ॥ भिक्षा कीजे त्रयवर्णांचें गृहीं ॥ आकिल्बिष असावें देहीं ॥ सर्वकाळ ॥६६॥
मग स्वामीसी वदं अगस्ती ॥ आतां गृहस्थाश्रमाची जे पद्धती ॥ ते निरुपा जी पुण्यकीर्ती ॥ षडाननस्वामी ॥६७॥
षण्मुख म्हणे जी महंता ॥ तेवींचि शुद्धाचरणं परियेसीं आतां ॥ गृहस्थाश्रमीं वर्ततां ॥ कैसीं चतुर्वर्णांचीं ॥६८॥
भलिया ब्राह्मणा घरासी नेइजे ॥ तयासी शांति क्षमा बोलिजे ॥ सन्मानूनि भावपूर्वक दीजे ॥ दान तयासी ॥६९॥
तो षट्कर्मिक भावें पूजावा ॥ परी निरर्थक जाऊं न द्यावा ॥ तेणें सामर्थ्याचा केला ठेवा ॥ ऐहिक परत्रींच्या ॥७०॥
निराश जैं जाय सत्पात्र ॥ तैं गृह जाणावें अपवित्र ॥ तरी त्या संचलें सूत्र हानीचें ॥७१॥
सवंग संग्रह करी बहुत ॥ आणि महागाई इच्छी नित्य नित्य ॥ तो इहलोकीं परलोकीं होय अप्राप्त ॥ पुण्यफळासी ॥७२॥
तो उपजे अंत्यजज्ञातीचे घरीं ॥ महाद्रोही दरिद्री जन्मवरी ॥ नाहीं भिक्षा इच्छेचे परी ॥ अप्रमाण जगीं तो ॥७३॥
आतां ब्राह्मणें भोगिजे वृषलीसी ॥ जरी पुत्र जाहाले तियेसी ॥ स्वामी म्हणे गा अगस्ति ऋषी ॥ तो काय म्हणावा ॥७४॥
त्यासी केवीं गा व्रतबंधन ॥ त्याणें कैसें आचरावें वेदाध्ययन ॥ तो महादोषी गा संध्या स्नान ॥ सांगों नये तयासी ॥७५॥
तो कल्पपर्यंत भोगी निरंय ॥ म्हणोनि हें ब्राह्मणीं वर्तों नये ॥ तो महादोषी अधःपाता जाय ॥ पूर्वजांसहित ॥७६॥
कवण कवणाची युवती ॥ बालत्कारें भोगी कामवृत्ती ॥ तरी ती शुद्ध कीजे प्रायश्चितीं ॥ कैसियापरी ॥७७॥
ते क्षत्रियें वैश्यें आणि ब्राह्मणीं ॥ कैसी दोषनिवृत्त कामिनी ॥ हें पूर्वी हैमवतीसी शूलपाणी ॥ निरुपिलें ॥७८॥
गोधनस्थळीं ऊर्जमासीं॥ तियेसी बैसविजे शुल्क एकादशीं ॥ प्रायश्चित्त क्षौर तियेसी ॥ बोलोलेंचि नाहीं ॥७९॥
म्हणोनि बैसविजे गोधनीं ॥ रोमाग्रीं छेदिजे अंगुळे दोनी ॥ याचि प्रायश्चित्तें कामिनी ॥ शुद्ध जाहाली जाणा ॥८०॥
गोमय गोमूत्र लाविजे मौळीं ॥ गोदंड स्पर्शिजे मुखकमळीं ॥ परी पुरुषासी प्रायश्चित गोस्थळीं ॥ बोलिलेंचि नाहीं ॥८१॥
स्त्री परद्वारीं इच्छाभूत ॥ मनापासोनि परपुरुषीं होय रत ॥ तरी वेदीं तियेसी प्रायश्चित्त ॥ बोलिलेंचि नाहीं ॥८२॥
त्यांही वर्तो नये गा त्रिवर्णी ॥ पराभवोनि कीजे दूषणी ॥ तियेसी सर्वकाळ भक्ष्य देऊनी ॥ ठेविजे गृहीं वेगळें ॥८३॥
परी ते प्रहरुं नएय सर्वथा ॥ भलिया गृहस्थें मानिजे वेदार्था ॥ स्त्री निर्दोष हे कथा ॥ सांगों तुज पुढें ॥८४॥
स्वामी म्हणे गा अगस्ति सगुणा ॥ जेणें क्षुधवेगळें होईजे पितृगणा ॥ जे श्राद्धपद्धती चतुर्वर्णां ॥ कैसी निरुपिलीं ॥८५॥
कवणें अन्नें निर्मिलो सिद्धी ॥ कैसा कीजे पाकविधी ॥ पिंड दीजे माध्यान्हकाळसंधी ॥ कसिआ चतुर्वर्णी ॥८६॥
मुद्नान्नगोधूमें श्राद्ध करी ॥ तेणें पितर तृप्त मास चारी ॥ माषान्नें षन्मासवरी ॥ क्षुधा नाहीं पितरांसी ॥८७॥
गोदुग्धें केलिया क्षिप्रापाक ॥ तेणें पितर तृप्त संवत्सर एक ॥ महिषीदुग्धपाक निरर्थक ॥ जाती तयाचे ॥८८॥
अथवा महिषीदुग्धामाझारीं ॥ गोदुग्ध मेळविजे स्वल्पपात्रीं ॥ तरी तेणें संवत्सरवरी ॥ तृप्त पितर ॥८९॥
गोक्षीरें गोघृतें क्षिप्रा घालिजे ॥ वरी अमृतकंदु समर्पिजे ॥ तेणें पितरां दिधलें भोजें ॥ दोन संवत्सर अन्न ॥९०॥
ऐसिया अन्नें होय पूर्वजतृप्ती ॥ तो अन्नपाक कीज कवण हस्तीं ॥ ज्या स्त्रिया सुलक्षण जाणती ॥ अन्नरसपाक ॥९१॥
विधवा नसाव्या स्वयंपाकस्थळीं ॥ नसावी कुब्जा वंध्या वृषली ॥अन्नपाक होय यांचे करकमळीं ॥ तरी निष्फळ श्राद्ध॥९२॥
म्हणोनि सुलक्षणी सुवासिनी सौभाग्य ॥ त्या असती श्राद्धपाका योग्य ॥ पूर्वज उद्धरिजे महाभाग्य ॥ सचूनि स्वहस्तें ॥९३॥
आतां जयांसी घालिक्जे अन्न ॥ ते श्राद्धी योजिले कैसे कवण ॥ त्यांसी अन्न देतां होय पावन ॥ तत्काळ पूर्वजांसी ॥९४॥
एकाक्षकरपाद बधिर कुष्टी ॥ वक्रपाद आणि कुदृष्टी ॥ द्यूतकर्मी कुब्ज कामभ्रष्टी ॥ हें श्राद्धीं वर्जिले ॥९५॥
श्राद्धीं ऐसियां जे अन्न देती ॥ श्राद्ध निष्फळ पूर्वजां अतृप्ती ॥ संवत्सरपर्यंत क्षुधाक्रांर्ती ॥ असती पूर्वज ॥९६॥
ज्येष्ठ कुमर अथवा ज्येष्ठ बंधू ॥ सर्वज्ञ भला आचारसिंधू ॥ श्राद्धीं अन्न दीज बहु शुद्धु ॥ पाहिजे बहु प्रकारें ॥९७॥
जो त्रिकाल स्नान संध्या सारी ॥ आणि पंचमहायज्ञ नित्य करी ॥ तो जाणावा चतुर्वणामाझारीं ॥ उत्तम ब्राह्मण पैं ॥९८॥
ऐसे पंचज्ञकारक जे ब्राह्मण ॥ त्यांचे गृहींचे अमृत अन्न ॥ येर तें षट्कर्मंविण ॥ नामें ब्राह्मणचि ॥९९॥
आतां चतुर्वर्णांचें मिष्टान्न ॥ तें गुणदायक कैसें कोण ॥ शुद्ध ब्राह्मणघरींचें जें अन्न ॥ तें अमृत अन्न बोलिजे ॥१००॥
आतां क्षत्रियांचा जो अन्नपाक ॥ तो दुग्धासमान गुणदायक ॥ क्षत्रिय तोचि जो प्रजापालक ॥ येर ते नामें क्षत्रिय ॥१०१॥
आतां वैश्याचे गृहीं जें भोजन ॥ उत्तम ना कनिष्ट जाण ॥ मध्यम बोलिजे वैश्याचें अन्न ॥ तें अन्नचि असे पैं ॥१०२॥
आतां शूद्रादिकांचें अन्न ऐसें ॥ तें जाणावें रुधिरपान तैसे ॥ आतां चतुर्वर्णांचे भोजन कैसें ॥ कीजे गा अगस्ती ॥१०३॥
संमार्जन करुनि गोमयाचें ॥ वरी मंडळ रेखिजे उदकाचें ॥ त्यावरी पात्र ठेवूनि अन्नाचें ॥ ओगरिजे चतुर्वर्णी ॥१०४॥
तरी जीं मंडळें पात्रातळींची ॥ कवण कैसीं चत्रुर्वर्णांची ॥ प्रथम मंडळें जीं षट्कर्मिकांची ॥ चतुष्कोणी रेखिजे ॥१०५॥
क्षत्रियांचें तीनकोनी मंडळ ॥ वैश्यें रेखिजे वर्तुळ ॥शूद्रजातीचें जाणावें मंडळ ॥ उदक शिंपणें ॥१०६॥
अगस्ति वदे जी षडानन ॥ हीं मंडळें सांगीतलीं चतुर्वर्णां ॥ हीं रेखिजे कवण कारणा ॥ तें निरुपावें स्वामिया ॥१०७॥
स्वामी म्हणे अगस्ति अवधारीं ॥ मंडळाविण जो भोजन करी ॥ तरी भक्षिलें अन्न तें उदरीं ॥ सुख नेदी सर्वथा ॥१०८॥
दक्षिणमुखें भोजनपात्रीं ॥ बैसों नये गा दिवसारात्रीं ॥ आसन स्थापूनियां पात्रीं ॥ प्राशिजे केवळ ॥१०९॥
मंडळाविण भोजन करितां ॥ तरी पीडा रोग होय बाधिता ॥ मंडळ करोनि आरोग्यता ॥ होइजे बहुकाळ ॥११०॥
वसिष्ठादिक ऋषीश्वर ॥ ब्रह्मादिक महासुरवर ॥ ते जाहाले असती गा अजरामर ॥ मंडळेंकरुनी ॥१११॥
म्हणोनि भोजनीं मंडळ करुन ॥ मग सुखेंचि भक्षावें मिष्टान्न ॥ मग तें होय गा जीर्ण ॥ पीयूषतुल्य पैं ॥११२॥
आतां कृष्णतंतु असे वस्त्रासी ॥ तें अपवित्र गा ब्राह्मणासी ॥ जितुकें तंतु अंबरासी ॥ तितुकें अधःपात ॥११३॥
कृष्णवस्त्र द्विज पांघुरतां ॥ तो अन्य यातीसीं कीजे समता ॥ तो ब्राह्मणपणापासूनि निरुता ॥ पराभवे द्रोही ॥११४॥
स्त्रिया सुवासिनी ब्राह्मणींसी ॥ कृष्णांबर युक्त असे तियेसी ॥ येरवीं अंगीकरितां निरयपंथासी ॥ जाय तो ब्राह्मण ॥११५॥
ब्राह्मण रत होय वृषलासी ॥ गृहीं सुलक्षण स्त्री असतां तयासी ॥ जाय तो सत्यचि शूद्रवर्णानी ॥ म्हणोनि तियेसी आतळों नये ॥११६॥
जैसे मित्रत्व सूकर जातीसी ॥ हेंचि फळ त्याचे संगतीसी ॥ भोजन घडे त्याचें संगतीसी ॥ भोजन त्याचे पंक्तीसी ॥ तरी घेइजे प्रायश्चित्त ॥११७॥
म्हणोनि चतुर्वणी समस्तीं ॥ पर्णिजे आपुलिया ज्ञाती ॥ विभक्त पर्णितां अधोगतीं ॥ पडेल कल्पपर्यंत ॥११८॥
आतां रात्रीच्या समयीं जाण ॥ सर्वथा न करिजे दधिभोअन ॥ दिवसा न कीजे भक्षण ॥ नवनीताचें ॥११९॥
ऐसें भोजन घडे ज्यासी ॥ तरी गोमांसभक्षी म्हणिजे त्यासी ॥ पूर्वजांसहित अधःपातासी ॥ जाय तो नर ॥१२०॥
अंगुलीनें करी दंतधावन ॥ मग तो करी अन्नभक्षण ॥ तरी गोमांस भक्षिलें तेणें ॥ परम अमंगळ तो ॥१२१॥
द्रव्य मेळवून आच्छादी क्षितीं ॥ एकलाचि आपण जेवी प्रीतीं ॥ महामिष्टानें भक्षी इच्छा तृप्ती ॥ ऐसा जो उदरंभरी ॥१२२॥
आपुले उदरा स्तव संची ॥ महामिष्टानें भक्षी आपणची ॥ आश्रितपुरुषवर्गांतें वंची ॥ तो कृमिभक्षी म्हणिजे ॥१२३॥
आतां चतुर्दश जी दूषणें ॥ पुरुषासी असती कवणें ॥ ते पुरुष जाणावे अवलक्षणें ॥ दोषी थोर ॥१२४॥
स्वामि म्हणे गा अगस्ति ऋषी ॥ चतुर्दश ते जाणावे कैसे दोषी ॥ पूर्वजन्मांची फळें जाणावीं ऐसीं ॥प्राप्त होती कैसीं पैं ॥१२५॥
कुलांगना अभिलाषूनि चित्तीं ॥ एक राग-रागिण्या-स्वर आलापिती ॥ कंठस्वरें स्त्रिया भुलविती ॥ ते होती गा दोषी पैं ॥१२६॥
शास्त्रश्रवण कुकमीं मन ॥ शिवशास्त्रें शिवस्तोत्रें गायन ॥ एक दुश्चित न देती श्रवण ॥ ते होती बधिर पैं ॥१२७॥
कुलांगनांची अलंकारभूषणें जाण ॥ एक महादोषीं नेती हिरुन ॥ हरिती कुलांगनां दर्पण ॥ ते होती अंध ॥२८॥
एक मार्गी हरिती द्रव्यवस्त्रें ॥ मनुष्यघात करिती शस्त्रें ॥ वत्स पितां हाणिती वक्त्रें ॥ ते होती अपार दोषी ॥२९॥
एक छेदिती बिल्वतरु ॥ शत्रुत्वें मोडिती रोपिले अंकुरु ॥ गोब्राह्मणां हाणिती चरणप्रहारु ॥ ते होती करपाददोषी ॥१३०॥
एक प्रहारुनि कुलांगनेसी ॥ आणि कामें रत जाहाले वृषलीसी ॥ एक निंदिती गृहस्थाश्रमासी ॥ ते होती करपाददोषी ॥१३१॥
कामी सतीचा अभिलाष पोटीं ॥ सलज्जेसी पाहाती विकटदृष्टीं ॥ दानसंकल्प वारिती मुष्टीं ॥ ते होती एकाक्षदोषी ॥१३२॥
एक देखोनि कुलांगना ॥ कामातुर करिती नेत्रखुणा ॥ एकासी नित्य विचारणा ॥ ते होती अधोदोषी ॥१३३॥
अपात्रीं दान वारिजे पुरुषें ॥ तो न लिंपे तेणें दोषें ॥ सत्पात्रीं वारी तो भरंवसें ॥ होय शुक्राचार्य ॥१३४॥
एकासी नित्य व्यसन पारधी ॥ विनादोषें नाना जंतूंसी वधी ॥ तो सर्वथा जाणावा मंदबुद्धी ॥ जन्मांतरी होय अपुत्रदोषी ॥१३५॥
एक ते दासीपुत्र जन्मोन ॥ नेणती शास्त्र कथा दान ॥ मातापितरां नोळखती म्हणोन ॥ ते एक महादोषी ॥१३६॥
प्रहरुनि स्त्रिया महसुंदरी ॥ वृषलीसंग कल्पिती जन्मवरी ॥ म्हणोनि उपजती दासीउदरीं ॥ शापें स्त्रियांचेनि ॥१३७॥
एक स्कंधीं घेऊनि कुठारु ॥ वनस्थळीं छेदिती पुण्यतरु ॥ कार्येविण दुखवितो पुण्यांकुरु ॥ ते होती जन्मरोगदोषी ॥१३८॥
एक ब्रह्मघातकी कुवासनी ॥ अभिलाषिती पुत्राची कामिनी ॥ निरंतर भोगिती चौर्यायशीं लक्ष योनी ॥ ते तत्काळ कुष्टी होती ॥१३९॥
कुष्टी व्हावयाचे जे दोष ॥ वेदीं बोलिलें नाहींत आणिक ॥ जंव पृथ्वी धरोनि शेष ॥ तंववरी निरय रोग हा ॥१४०॥
षट्शास्त्रें करी अमान्य ॥ मूर्ख अपंडितासी करी सन्मान ॥ अपवित्र वैखरी बोले न्यून ॥तो वाचामूकदोषी ॥१४१॥
ते कष्ट जरी करीती जन्मवरी ॥ तरी भक्षण न मिळे तयां पोटभरी ॥ मग त्यांसी षट्शास्त्रज्ञानांची शरीरीं ॥ कैंची बुद्धी वसेल ॥१४२॥
एक कन्या देऊनि द्रव्य घेती ॥ अथवा हारिती रंकाचिया वृत्ती ॥ जन्मा येऊनियां प्राप्त होती ॥ मलिनत्वदोषीं ॥१४३॥
अगस्तीसी वदे षडाननं ॥ ऐसें चतुर्वर्णांचें आचरण ॥ हे चतुर्दशदोषनिरुपण ॥ कथिलें तुजसे पैं ॥१४४॥
जया शरीरीं नाहीं दोषां वासु ॥ तोचि मानवी म्हणिजे पुरुषु ॥ दोषमलिन तो जाणावा पशू ॥ नरदेहासी येऊनी ॥१४५॥
ऐसा जो चतुर्वर्णांचा नित्याचार ॥ अगस्तीसी वदे शिवकुमर ॥ मग आणिक प्रश्न करी मुनिवर ॥ इल्वल-वातापिशत्रू जो ॥१४६॥
शिवदास गोमा श्रोतयांप्रती ॥ प्रयत्नें प्रार्थीतसे बद्धहस्तीं ॥ स्वामीसी प्रश्नील अगस्ती ॥ तेंचि महाराष्ट्रभाषा निरुपिलें ॥१४७॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे चतुर्वणाचारकथनं नामाष्टत्रिंशाध्यायः ॥३८॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥शुभं भवतु ॥ ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति अष्टत्रिंशाध्यायः ॥ समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2011
TOP