काशीखंड - अध्याय ५५ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ स्वामी म्हणे गा मुनिवरा ॥ ब्रह्मा देखता जाहाला त्या काशीपुरा ॥ त्या दिवोदासराजा सहस्त्रकरा ॥ उदयोस्तु ॥१॥
प्रतिग्रामीं देखे तरणि तारापती ॥ काशीमध्यें द्वादश गभस्ती ॥ एवढी त्या दिवोदासाची शक्ती ॥ जाहाली पृथ्वीव्यापक ॥२॥
काशीचिया चौबारीं उभा विरिंची ॥ नित्य मार्ग आचरणें पाहे लोकांचीं ॥ रूप सामर्थ्य पाहातां श्रीमंतांचीं ॥ आपणासारिखींचि ॥३॥
तेथें पृथ्वीजन सर्व राजाधारें ॥ राजा तो सर्वही लोकांचे विचारें ॥ त्याचें राज्यीं अशोभ्य मंदिर्री ॥ तीं कुबेराचीं पैं ॥४॥
धामीं देखे सुरपती ॥ द्वारीं सहस्त्र चतुर्दंत ऐरावती ॥ उच्चैःश्रवा श्यामकर्णांची गणती ॥ नाहीं याचे राष्ट्रीं पैं ॥५॥
स्त्रिया सगुण महास्वामिभक्तिणी ॥ स्वामिसेवेसी रत निशिदिनीं ॥ सिंधुजा लक्षितां शेषशयनीं ॥ ते अशक्त दिसे ॥६॥
गुणें लावण्यें अशक्त अप्सरा ॥ सत्त्वें अरुंधतीतुल्य सुंदरा ॥ आश्चर्य वर्तलें त्या सृष्टिकरा ॥ देखोनि पृथ्वीजन ॥७॥
महावेदध्वनि षट्कर्मिक ॥ देखे विधाता सृष्टिकारक ॥ अग्निहोत्री वैश्वदेव उपासक ॥ मनें उत्पत्तिप्रलयो ॥८॥
ऐसें देखोनि सर्वलोकाचरण ॥ खेद पावता जाहाला चतुरानन ॥ म्हणे आतां दिवोदासासी विघ्न ॥ कीजे पां कैसें ॥९॥
तंव भद्रासनीं बैसला नृपती ॥ ब्रह्मा भट्टा जाहाला जोशीमूर्ती ॥ यज्ञोपवीत तें दिसे अंगकांती ॥ सहस्त्र मार्तंडांतुल्य ॥१०॥
ब्रह्मवृक्षाचा दंडपाणी सरळा ॥ मृगचर्माची शोभली मेखळा ॥ भाळीं ऊर्ध्व रेखिला टिळा ॥ अष्ट सुगंधांचा ॥११॥
दिव्य पादुका मिरवती पादतळीं ॥ काश्मीरी मुकुट शोभले मौळीं ॥ मग तो ब्रह्मा नृपस्थळीं ॥ पावता जाहाला ॥१२॥
तंव सिंहासनीं बैसला राजा ॥ जवळी महामंत्री पुत्र प्रजा ॥ तंव दुरुनि देखिलें त्या द्विजा ॥ सृष्टिकरासी ॥१३॥
राजानें कैसी देखिली द्विजशोभा ॥ जैसा त्या एकत्र मिळालिया गंधर्वगर्भा ॥ तंव तो ब्राह्मण राजसभा ॥ अवलोकी चक्षूंनीं ॥१४॥
तेणें कैसा देखिला तो नृपवर ॥ तो काशीपुरीचा राज्यधर ॥ समर्थ तरी तो सुरेश्वर ॥ तुळों न शके सर्वथा ॥१५॥
जैसी अंबुनिधीमध्यें पूर्णता ॥ पाहातां क्षीरार्णवाची महिमता ॥ कीं कुलाचलांमाजी लक्षितां ॥ सुवर्णाचळ तो ॥१६॥
तैसा देखिला तो सूर्यवंशी ॥ तो रिपुंजय राजा अविमुक्तीसी ॥ आश्चर्य वर्तलें सृष्टिकरासी ॥ देखोनियां राजा ॥१७॥
जैसा तो कद्रुसुत महीधर ॥ जैसा सहस्त्रमुखी फणिवर ॥ लक्षितां त्याचिया शक्तीचा पसर ॥ तो अशक्त रायापुढें ॥१८॥
ऐसा तो अनंगमोहिनीकांत ॥ विधीनें देखिला ताराजामात ॥ मग विरिंचिनाथ असे बोलत ॥ आशीर्वचन रायासी ॥१९॥
मग राजा पुत्र प्रजा सकळी ॥ उतरलीं सिंहासनातळीं ॥ ब्राह्मण वंदिला बद्धकरकमळीं ॥ क्षितीं मस्तक ठेवूनियां ॥२०॥
मग राजयानें चतुराननी ॥ स्वहस्तें बैसविला सिंहासनीं ॥ तंव आली तेथें अनंगमोहिनी ॥ राजकांता ते ॥२१॥
तिनें मौळीं वंदिला प्राणेश्वर ॥ प्रेमें संतोषला नृपवर ॥ मग दक्षिणपाणीं बैसकार ॥ केला राजांगनेसी ॥२२॥
जे महीधराची ज्येष्ठ नंदिनी ॥ तिनें अभिवंदन केलें विधिचरणीं ॥ मग राजा आणि कामिनी ॥ प्रश्न केला द्विजोत्तमासी ॥२३॥
राजा म्हणे षट्कर्मिका ॥ महाप्राज्ञा द्विजनायका ॥ जी सर्व विधियज्ञकारका ॥ शुचिर्भूत सुस्नायीं ॥२४॥
कवणे स्थळीं असणें द्विजोत्तमा ॥ काय पां कीजे ऐसी जाहाली क्षमा ॥ नाना सुगंधीं पूजिला ब्रह्मा ॥ राजांगना दंपतीं ॥२५॥
मग बोलों आरंभिलें विधीनें ॥ अक्षताहस्तीं आर्शीवचनें ॥ म्हणे जी राजश्री आम्हां राहाणें ॥ एक स्थळीं नाहीं कीं ॥२६॥
क्षणैक पाताळीं रहिवास ॥ क्षणैक क्रमितों कैलास ॥ क्षणैक आहे आमुचा वास ॥ मृत्युमंडळीं ॥२७॥
आम्हांसी क्रमणें सप्तद्वीपवती ॥ तेथें तुमचीचि स्तवनस्तुती ॥ ऐसा तूं श्रुत जाहालासी नृपती ॥ त्रैलोक्यद्विजांसी ॥२८॥
जे काळीं जें मागावया आर्त ॥ भ्रमतसें हा कल्पोनियां स्वार्थ ॥ तरी त्रैलोक्यमंडळीं समर्थ ॥ गर्जे नाम तुझें ॥२९॥
कांहीं संकल्प धरोनियां चित्तीं ॥ म्हणोनि सेविली अविमुक्ती ॥ तूं येथींचा दानी महानृपती ॥ क्षितीचा पैं ॥३०॥
मनोरथ व्हावया सुफळ ॥ म्हणोनि क्रमिलें हें काशीस्थळ ॥ आर्त पुरवावयासी महाभूषाळ ॥ कल्पद्रुम तूं ॥३१॥
मग वदता जाहाला पृथ्वीराजा ॥ म्हणे जो संकल्प असेल गा द्विजा ॥ तो मी सफल करावया पैजा ॥ स्मरोनि वदतों ॥३२॥
जें तुम्हांसी आर्त असेल ये काळीं ॥ तें तुम्ही मागा तत्काळीं ॥ तुमचिया मनोरथासी ये स्थळीं ॥ देईन मी पैं ॥३३॥
तंव ब्रह्मा म्हणे गा नृपती ॥ हेंचि मागणें असे आमुचें चित्तीं ॥ यागवृद्धि करावी निश्चितीं ॥ हा मनीं संकल्प असे ॥३४॥
मग राजा वदे जी द्विजवरा ॥ तरी विलंब न कीजे अध्वरा ॥ किती याग करावयाची त्वरा ॥ असे तुम्हां स्वामिया ॥३५॥
मग वदता जाहाला सृष्टीचा अधिप ॥ पंच यज्ञ करावयाचा माझा संकल्प ॥ तंब बोलता जाहाला महाभूप ॥ ब्राह्मणासी पैं ॥३६॥
दश याग करावे द्विजमूर्ती ॥ उच्चैःश्रवा जो अश्व शुभकांती ॥ जंवपर्यंत माझी सप्तद्वीपवती ॥ भ्रमे स्वच्छंदगतीनें जो ॥३७॥
ऐसें आरंभावें जी दश अश्वमेधां ॥ आम्हांसी निरूपाव्या यज्ञसमिधा ॥ ज्या ज्या पुण्यतरूंचिया विविधा ॥ आणिक नाना द्र्व्यें ॥३८॥
तंव ब्राह्मण म्हणे नृपनंदना ॥ दश अश्वमेध हे तुमची कामना ॥ तरी मी संकल्पाचिया जीवना ॥ इच्छीत असें ॥३९॥
मग राजयानें करीं घेतलें उदक ॥ संकल्प केला जी भावपूर्वक ॥ महामंत्री प्रजा पुत्र लोक ॥ इच्छिती हा स्वधर्म ॥४०॥
ऐसा दश यांगाचा संकल्प जाणोन ॥ मग आनंदला तो चतुरानन ॥ म्हणे आतां छिद्र सांपडलें पूर्ण ॥ या दिवोदासाचें ॥४१॥
यागकार्याचिया समिधा सकळी ॥ त्या किंचितही नाहीं महीमंडळीं ॥ जोंपर्यंत याची असे भूतळी ॥ तोंपर्यंत अप्राप्त ॥४२॥
माझिये सृष्टि उत्पत्ति जाहालिया ॥ त्या सर्व सत्यलोका नेलिया ॥ ज्या कांहीं शेष असती उरलिया ॥ त्या गुप्त केल्या विधीनें ॥४३॥
ऐसा आनंदला सृष्टिकर ॥ म्हणे प्रथमचि कैंचा अंगार ॥ मग जो सर्व समिधांचा भार ॥ तो कैंवा प्राप्त त्यासी ॥४४॥
मग राजा म्हणे सुब्राह्मणा ॥ आतां विलंब न कीजे हवना ॥ मी त्वरावंत अवभॄथस्नाना ॥ तुमचिया पादांबुजीं ॥४५॥
मग आरंभिलें जी यागस्थळ ॥ तें स्वर्गसरितेचें पुण्यजळ ॥ दक्षिणमानसीं जें गंगाजळ ॥ मणिकर्णिकाजळीं ॥४६॥
ब्राह्मण म्हणे गा नृपनंदना ॥ समिधा आणीं यज्ञकारणा ॥ त्या तुमचिया राष्टूभुवना ॥ अप्राप्त असती पैं ॥४७॥
पृथ्वीमंडळीं करितां शुद्धी ॥ परी समिधा न मिळती अगाधी ॥ आतां दशाश्वमेधांचिया सिद्धी ॥ त्या कैशा प्राप्त तुम्हां ॥४८॥
मग राजा वदला ब्राह्मणासी ॥ यज्ञसामुग्री निरूपा जी आम्हांसी ॥ समिधादि द्रव्य पाहिजे यागासी ॥ तें सांगा द्विजोत्तमा ॥४९॥
स्वामी म्हणे गा मित्रावरुणसुता ॥ सर्व यागविधि शास्त्रयुक्ता ॥ विरिंचि समिधा जाहाला निरूपिता ॥ दिवोदासाप्रती ॥५०॥
प्रथम पुण्यतरूंचीं शुद्धवटें ॥ यागीं पाहिजेत चंदनागरुकाष्ठें ॥ दिव्य कमळें पाहिजेत अनुच्छिष्टें ॥ नागवेली पूगीफळें ॥५१॥
अविंधमुक्तें रत्नमणी तेजाचे ॥ वैदूर्य पुष्पराग सुरंगांचे ॥ इंद्रनीळ गोमेद मुक्तांचे ॥ पाहिजेत प्रकार यागीं ॥५२॥
हिरण्य माणिकें पाहिजेत तेजाळ ॥ पट्टसूत्रें पाहिजेत पट्टकूळ ॥ कामधेनूंचीं पीय़ूषें निर्मळ ॥ पाहिजेत गोघृतें ॥५३॥
रंभाफळें नारिकेळें नारिंगें ॥ उत्तम खर्जूरी मातुलुंगें ॥ गंभीरें आणि सुमनें सुरंगें ॥ पाहिजेत नाना जातींचीं ॥५४॥
मृगाजिनें आणि चितळाजिनें ॥ अजाजिनें पाहिजेत सोमपानें ॥ मृगमद आणि सोमपानें संपूर्णें ॥ पाहिजेत गोदंत ॥५५॥
दर्भशिखा आणि प्रणीता कपालें ॥ कृष्णाजिनें इंद्र्नीळउखळें ॥ अजा घेनु समिधा मुसळें ॥ स्त्रुवा स्त्रुचा पै मंडित ॥५६॥
अजापुत्र अश्व पंचकल्याण ॥ मेष महिष अष्टादश धान्य ॥ इक्षुदंड पंचखाद्यें संपूर्ण ॥ नाना समिधाभार ॥५७॥
ऐशा सर्व समिधा नाना जाती ॥ ज्या प्रथम होत्या विधीच्या उत्पत्तीं ॥ त्या दिवोदासाच्या राज्यीं नसती ॥ गुप्त केल्या विधीनें ॥५८॥
दिवोदासाचा देखोनि राजकोश ॥ देवीं मानिला दीर्घ त्रास ॥ त्यांहीं गुप्त केला आपुला वंश ॥ शत्रुत्वपणें ॥५९॥
तो पृथ्वीव्यापक झालासे आपण ॥ म्हणोनि समिधा गुप्त केल्या विधीन ॥ मग राजा अनुवादला वचन ॥ ब्राह्मणासी ते काळीं ॥६०॥
पुण्यतरु कैसा जी कवण ॥ कैसीं तीं कमळें किंवर्ण ॥ अविंधमुक्तें पुष्पराग रत्न ॥ कैसीं पट्टसूत्रें अंबरें ॥६१॥
कैसीं रंभा नारिकेळें ॥ जंबीर शतपत्रें बकुळें ॥ सोमपान इंद्रनीळउखळें ॥ कैसीं तीं मृगाजिनें ॥६२॥
कैशा त्या दर्भशिखा प्रणीता ॥ कामधेनुदुग्धें मृगमद तत्त्वतां ॥ कैसे ते अजा विधियुक्ता ॥ निरोपा मज स्वामिया ॥६३॥
ऐसे जे नाना समिधाभार ॥ त्यांचा मज दाखवा जी आकार ॥ मग समिधाआकार सृष्टिकर ॥ दाखवी दिवोदासासी ॥६४॥
मग मृत्तिकेच्या करूनि समिधा ॥ नाना जातिवर्णाकार शुद्धा ॥ अगाध असती ॥ वेदविद्या ॥ दाखवी राजयासी ॥६५॥
मग राजा समिधा देखोन ॥ पदवी देखता जाहाला आपण ॥ प्रकट केले ते स्वइच्छेपासून ॥ सर्व समिधाभार ॥६६॥
मग ब्राह्मणासी वदे नृपवर ॥ जें यागकार्यासी वेंचेल भांडार ॥ तें वेंचावें जी अति उदार ॥ न बोलावें तुम्हीं ॥६७॥
मग यागीं बैसला सृष्टिकर ॥ राजयानें दिथला समिधाभार ॥ ज्या ज्या ब्रह्मादिकां अगोचर ॥ त्या त्या आणिल्या राजयानें ॥६८॥
मग विधीनें मंत्रांचीं अवदानें ॥ स्वहस्तें समर्पिलीं चतुराननें ॥ यागमुखें तृप्त गीर्वाण ॥ दिवोदासें पैं ॥६९॥
ऐसे दशाश्वमेध जाहाले पूर्ण ॥ राजयासी जाहालें अवभृथस्नान ॥ धूम्रें सुनीळ जाहालें गगन ॥ ते साक्षी असे अद्यापि ॥७०॥
मग विरिंचि विचारी मानसीं ॥ आतां कैसें पां कीजे रायासी ॥ जें कार्य नव्हे प्राप्त देवांसी ॥ तें केलें राजयानें ॥७१॥
आतां छिद्र न सांपडेचि याचें ॥ कार्य नव्हे त्रिपुरांतकाचें ॥ अप्रमाण फळ माझिये पैजेचें ॥ व्यर्थ जाहाले मनोरथ ॥७२॥
आतां नमस्कारावया धूर्यटी ॥ काय घेवोनि जाऊं मुखवटी ॥ कोण दीर्घकार्यसंतुष्टी ॥ कीजे त्या शंकरा ॥७३॥
विरिंचि खेद पावला मनीं ॥ कल्पतरु हरिजे दुर्भळापासूनी ॥ कीं अशक्त बळी जिंकी रणीं ॥ तैसें जाहालें विधीस ॥७४॥
कीं समर्था होय मानभंग ॥ की ब्रह्मचर्याचा विनाश सिद्धियोग ॥ कीं अवदानें न घेतां जैसा याग ॥ निष्फळ दिसे ॥७५॥
कीं हारपे रंकाची द्र्व्यसंपत्ती ॥ कीं पर्जन्य न पडे दुर्बळाचे शेतीं ॥ कीं अकस्मात पडिजे आवर्ती ॥ विना दोषदंडें ॥७६॥
कीं सत्यार्थाची होय निर्भर्त्सा ॥ कीं समर्थगृहीं प्रवेशे दुर्दशा ॥ कीं निधान साधितां होय पिसा ॥ विनाशती श्रुतिशुभगण ॥७७॥
कीं जैसे यज्ञकार द्विजवर ॥ संपूर्ण करिती गृहस्थाचा आधार ॥ तेथें तृप्त नव्हेचि क्षुधातुर ॥ अप्राप्त होय दक्षिणा ॥७८॥
देशावरा क्रमिजे द्र्व्यकामा ॥ तेथें मुदला हानि होय उदिमा ॥ मग खेद पावे त्याचिया मनोधर्मा ॥ निष्फळ होती मनोरथ ॥७९॥
ऐसा ब्रह्मयाचा खेदें झाला मानभंग ॥ मग न क्रमी मंदराचलाचा मार्ग ॥ जैसा अकाळीं उच्चारितां राग ॥ घडे परम लांछन ॥८०॥
स्वामिकार्य न होतां सर्वथा ॥ कोण वर्णी त्याचे पुरुषार्था ॥ मंदराचला जाऊनि जगन्नाथा ॥ काय श्लाघ्यता मी मिरवूं ॥८१॥
जो परम अन्यायी शिवाचा ॥ त्यासी त्रिलोकीं ठाव कैंचा ॥ तरी ऐसा प्रादुर्भाव एक शिवाचा ॥ येथें न चले कोणाचें ॥८२॥
गोघ्न ब्रह्मघ्न दोषियासी ॥ मात्रागमन सुरापान धडलें अहर्निशीं ॥ बाळहत्या पितृहत्या या दोषांसी ॥ वेदीं नाहीं प्रायश्चित्त ॥८३॥
अक्षभ्यभक्षी सप्तव्यसनी ॥ ज्ञातिभ्रष्ट चतुवर्णी ॥ जो महादोषी वर्जिला त्रिभुवनीं ॥ तेणें पां काय कीजे ॥८४॥
त्यासी घडे जरी स्वर्गसरितेचें स्नान ॥ आणि वाराणसीचें दर्शन ॥ तरी ऐसे दोष पराभवून ॥ पूर्वजां प्राप्त कैलास ॥८५॥
जरी विश्वनाथाचें होय अभिवंदन ॥ तरी त्या पुण्यासी नेणे पंचानन ॥ मग जे इतर सर्वत्र जन ॥ श्रद्धा पावती कोठोनि ॥८६॥
ज्यानें हे सेविली वाराणसी ॥ तो परम सखा जोडला शिवासी ॥ गीर्वाण त्याचिया पूर्वजांसी ॥ करिती सन्मान ॥८७॥
जो असे गा दूरदेशांतरीं ॥ काशी अक्षरद्वय उच्चारी ॥ त्यासी बद्धांजलीं कृतांत करी ॥ साष्टांग नमस्कार ॥८८॥
काशी द्वय अक्षर उच्चार वाचे ॥ कल्प जन्मांचे दोष दहती त्याचे ॥ ते महा शंकराचे ॥ अगाध गण पैं ॥८९॥
ज्यासी घडे काशीदर्शन ॥ आणि तें स्वर्गसरितेचें स्नान ॥ तरी पूर्वज करिती अमृतपान ॥ शिवसभे कैलासीं ॥९०॥
ऐसें विचारी तो चतुरानन ॥ मंदराचळासी न करी गमन ॥ आपणचि येईल पंचानन ॥ या वाराणशीं ॥९१॥
जंव सरलें नाहीं निशिप्रमाण ॥ तंव पूर्वें उदया न करी अरुण ॥ जंव नाहीं आलें राजयाचें अवसान ॥ तंव काशी अप्राप्त शिवासी ॥९२॥
पर्जन्य वृष्टि न करी अकाळीं ॥ वृक्ष ऋतूविण न येती फळीं ॥ संपूर्ण तपेंविण चंद्रमौळी ॥ नव्हे प्रसन्न ॥९३॥
जंववरी न साधी सिद्धियोग ॥ नाहीम सरला राजयाचा भोग ॥ तंववरी काशीं यावयाचा प्रसंग ॥ नव्हे जी सदाशिवासी ॥९४॥
कीं आम्हांसी केली असेल माव ॥ आणि येथेंचि असेल सदाशिव ॥ ऐसा काशीचा प्रादुर्भाव ॥ ते भिन्न नव्हे शिवासीं ॥९५॥
जैसीं फळें वृक्षाचिया पोटीं ॥ ऋतूविण दृश्य नव्हती दृष्टीं ॥ राजभोग सरलिया जगजेठी ॥ प्रकटेल आपणचि ॥९६॥
तरी आतां येथेंचि राहों सर्वथा ॥ जे हरेल सर्वही व्यथा ॥ येथें येणें होईल जगन्नाथा ॥ सरलिया काळ ॥९७॥
मग दशाश्वमेधस्थळीं ॥ ते स्वर्गतरंगिणीचे पाळीं ॥ तेथें स्थापिला चंद्रमौळी ॥ विरिंचिदेवें ॥९८॥
ऐसी करूनियां लिंगस्थापना ॥ मग ब्रह्मा करी नामधारणा ॥ तें नाम प्रसिद्ध वदेपुराणां ॥ दशाश्वमेधेश्वर पैं ॥९९॥
तें लिंग अगाध होतें पाताळीं ॥ उद्भवलें विधीच्या यागस्थळीं ॥ ब्रह्मा राहिला त्या लिंगाजवळी ॥ शिवध्यानीं तो ॥१००॥
स्वामी म्हणे गा ऋषिउत्तमा ॥ लिंगाजवळी राहिला ब्रह्मा ॥ त्या लिंगाचा अगाध महिमा ॥ अगम्य ब्रह्मादिकां ॥१०१॥
त्या लिंगाजवळी करी अध्वर ॥ सप्तद्वीपवतीचा नृपवर ॥ ऐसें अनुवादला कर्पूरगौर ॥ पार्वतीप्रती ॥१०२॥
तेथें पूर्वजांसी देई पिंडदान ॥ तरी त्यासी घडेल दश अश्वमेधांचें पुण्य ॥ मातृपितृपक्ष करितां अमृतपान ॥ शिवासंनिध कैलासी ॥१०३॥
मणिकर्णिकेसी कीजे स्नान ॥ दशाश्वमेधीं पूजन ॥ पुण्यद्रव्यें सत्पात्रीं दान ॥ करी जो तेथें ॥१०४॥
तरी सर्व देवेंसीं सुरेश्वर ॥ त्यासी करी साष्टांग नमस्कार ॥ जेणें पूजिला दशाश्वमेधेश्वर ॥ मणिकर्णिकाजळीं ॥१०५॥
पत्रपुष्पें कीजे स्नपन पूजन ॥ घटिकाद्वय कीजे अनुष्ठान ॥ पंचखाद्यें कीजे यागहवन ॥ तरी ऐसें घडे समर्थ्य ॥१०६॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ या लिंगाचा महिमा सांगों किती ॥ अन्यत्र जंतु पावे गा मुक्ती ॥ सायुज्यस्थान तें ॥१०७॥
एकशत यागांचें घडे पुण्य ॥ येथें केलिया पूजन ॥ कैलासीं गणांमाजी अग्रंगण ॥ आणि प्राप्त मोक्षपद ॥१०८॥
जेथें ब्रह्मादिक इच्छिती मरण ॥ तेथें पंचक्रोशी आनंदवन ॥ जेथें त्रिपुरांतकासी निवसन ॥ तें स्थळ किती वाखाणूं ॥१०९॥
तें स्थळ दुर्लभ नर-मानवांसी ॥ यक्ष-राक्षस-देव-पन्नगांसी ॥ अरे हें परम निधान काशी ॥ दुर्लभ त्रिभुवनांत ॥११०॥
तेथें असे ते स्वर्गसरिता ॥ ते महासामर्थ्याची पुण्यलता ॥ उद्धरावया मर्त्य जंतां ॥ प्रकटली मृत्युभुवनीं ॥१११॥
त्या द्शाश्वमेधेश्वराजवळी ॥ बंदिदेवीनामें असे विशाळी ॥ तियेचा महिमा ते काशीस्थळीं ॥ अगाध गा मुनिवरा ॥११२॥
तियेसी जो करी नमस्कारु ॥ तो नित्य जगीं सौभाग्यनरु ॥ तो धन्य जैसा कल्पतरु ॥ अनाथदीनांसी ॥११३॥
सुगंध द्र्व्यें कीजे पूजन ॥ अहोरात्र उपवास पारण ॥ तरी त्याचे वंशीं राजबंधन ॥ न होय कोणे काळीं ॥११४॥
ते महादेवी स्मरलिया मनीं ॥ तत्काळ मुक्त करी बंघनापासोनी ॥ बंधनें मुक्त करी म्हणोनी ॥ बंदिदेवी नाम तियेसी ॥११५॥
स्वामी म्हणे ऋषिउत्तमा ॥ ऐसा त्या लिंगीं राहिला ब्रह्मा ॥ सिद्ध नव्हेचि शिवाचिया कामा ॥ निष्फळ मनोरथ ॥११६॥
आतां मंदराचळीं भवानीकांत ॥ काशीवियोगें असे खेदभूत ॥ तंव पुढें उभे ठाकले महाद्भुत ॥ गण ते विश्वनाथाचे ॥११७॥
शिवदास गोमा प्रार्थितो सज्जनां ॥ आतां शिव आज्ञा करील गणां ॥ ती कथा परिसा जी कर्मवना ॥ महाकुठार पैं ॥११८॥
इति श्रीस्कंद्पुराणे काशीखंडे दिवोदासचरिते दशाश्वमेध ॥ माहात्म्यवर्णनं नाम पंचपंचाशत्तमाध्यायः ॥५५॥
॥ श्रीसांबसदशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति पंचपंचाशत्तमाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP