मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ६० वा

काशीखंड - अध्याय ६० वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ मग स्वामीसी म्हणे ऋषीश्वर ॥ मज अधिकत्वें जी वियोग अगांर ॥ अविमुक्तीसी आला त्रिशूळधर ॥ मज कां अप्राप्त काशीपुरी ॥१॥
जो विरूपाक्ष त्रैलोक्याधी ॥ त्यासी अप्राप्त केवीं काशीमधीं ॥ मी दीन अनाथ जी मंदबुद्धी ॥ तुम्हां आधीन स्वामिया ॥२॥
माझें तपसाधन तें किंचित ॥ मज कैंची काशी प्राप्त ॥ आतां माझा वियोग कीजे तृप्त ॥ तुमचेनि मुखश्रवें पैं ॥३॥
शिवकथाद्रव्याचें अवदान ॥ नव्हे कोण्या अध्वरासमान ॥ परी मी तुम्हांसी करीं अमान्य ॥ तुमची कृपा देखोनी ॥४॥
मी तुमचा लडिवाळ रंक ॥ इच्छा पूर्ण कीजे भावपूर्वक ॥ मंदराचळाहूनि आला त्र्यंबक ॥ तें मज श्रवण कीजे ॥५॥
ऐशीं सहस्त्र वर्षें जाश्वनीळ ॥ मंदराचळीं होते देव सकळ ॥ विष्णूसी सांगावया अतुर्बळ ॥ कैसा आला ताराक्ष ॥६॥
तंव स्वामी म्हणे गा मैत्रावरुणी ॥ वातस्पर्शें समुद्रप्राशनी ॥ तूं पूर्ण आनंदकर्ता माझिया मनीं ॥ शिवकथा प्रश्नितोसी ॥७॥
तुझिया धैर्याचा महिमा ॥ स्पर्धेनें समता कीजे व्योमा ॥ तुज निरूपावें गा कुंभोद्भवा आगमा ॥ याचि वक्रेंकरूनि ॥८॥
तरी मी अल्प गा षड्‍वक्रेंसीं ॥ मज अकथ्यता त्रिनेत्रासी ॥ त्यासी स्मृतिशास्त्रकथामृतेंसीं ॥ पाविजे कैवल्य काशीपद ॥९॥
तरी आतां प्रश्निला असे जो प्रश्न ॥ काशीपुरीं कैसा आला पंचानन ॥ व्योमीं पताका देखिल्या दुरोन ॥ गजेंद्रविष्णूनें ॥१०॥
व्योमीं देखिला जी वृषभध्वज ॥ ह्रदयीं संतोषला गरुडध्वज ॥ स्वरूपें सुंदर तेजःपुंज ॥ महाशुभसार्थक ॥११॥
कोटि सूर्यांचा प्रकाश पूर्वेसी ॥ ऐसें दिव्य तेज देखिलें आकाशीं ॥ दीप्यमान प्रकाश दिशीं ॥ ध्वज देखिला शिवाचा ॥१२॥
कोटि पद्में दिव्य विमानांची शोभा ॥ कीं हरिकंठीं कौस्तुभप्रभा ॥ तेथें कल्पवरी गंधर्वगर्भा ॥ ते उपमा तुळिजे ॥१३॥
देव दिक्पति बैसले विमानीं ॥ तेथें बहु लोकांची जाहाली दाटणी ॥ जैसीं गंधर्वनगरें गगनीं ॥ पृथ्वीवरी रिघावया ॥१४॥
जैसीं जळार्ण्वीं तारुवें प्रेरिती ॥ नाना ते अशोभ्य नव्हेति युक्ती ॥ त्या देवांचीं वहनें परमदीप्ती ॥ तेजें मंद सोम-सूर्य ॥१५॥
वाखाणितां बहु प्रकारची सुंदरता ॥ कीं जैशा कल्पद्रुमाच्या पूर्ण लता ॥ नातरी क्षीरार्णवाची मुक्तलता ॥ न तुळे स्पर्धेसी ॥१६॥
ध्वजीं मिरवे नाना रत्नांचा प्रकाश ॥ दिव्य वाद्यध्वनींचा घोष ॥ पृथ्वी व्योमीं प्रकाश ॥ देवविमानांचा ॥१७॥
भेरीमृदंगांचिया दीर्घ ध्वनीं ॥ शंख तूर्यांचा नाद गगनीं ॥ पुढां होतसे पैखणी ॥ अप्सरा दिव्यांगनेंसीं ॥१८॥
ताल घंटा महाशिंगांचा गजर ॥ सनया उपांग त्राहाटिल्या सुस्वर ॥ सप्तद्वीपवती आणि अंबर ॥ तेजें दीप्यमान जाहालें ॥१९॥
दुंदुमी त्राहाटिल्या महागजरें ॥ गर्जती गिरिससुद्रांचीं कंदरें ॥ ब्रह्मांड भरोनि पाताळविवरें ॥ कोंदाटला नाद ॥२०॥
ऐसें देखोनि हरी गजानन ॥ म्हणती पैल आले वृषभवाहन ॥ आतां चला जी न लावावा क्षण ॥ वेळ जी तुम्हीं ॥२१॥
तंव स्वामी म्हणे कुंभोद्भवा ॥ मंदराचलाहूनि येतां सदाशिवा ॥ अष्टदिक्पति सुरेंद्र्देवां सहवर्तमान होते ॥२२॥
विश्वंभर आला आनंदवनीं ॥ हे कथा मज कथिली नाहीं कोणीं ॥ म्यां प्रत्यक्ष देखिलें नयनीं ॥ तेंचि कथितों तुजलागीं ॥२३॥
काशीपुरीसी येतां पंचानन ॥ तेव्हां सांगातें होते कोण कोण ॥ तें कुंभोद्भवा श्रवण ॥ करीं तूं आतां ॥२४॥
तैं ची होतों सदाशिवाजवळी ॥ वेगळाले भार केले दिक्पाळीं ॥ आले पंचक्रोशीचे उत्तरपाळी ॥ तेथें मेळा स्थिर केला ॥२५॥
सहस्त्र बंधुवर्गेंसीं फणिवर ॥ तो सांगातें शेष होता महीधर ॥ सत्तावीस नागकुळांचा भार ॥ त्यासवें होता ॥२६॥
चौसष्ट कोटी गणेंसीं शंकर ॥ भूतभैरव हा वेगळा भार ॥ आणि आठ कोटि कुमरीं शंकर ॥ वेष्टित होता ॥२७॥
नर मानव यक्ष राक्षस ॥ गण गंधर्व असमसाहस ॥ भूतभैरव अप्सरा आकाश ॥ गर्जविती दीर्घघ्वनीं ॥२८॥
स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ हें काशीखंड स्कंदपुराणीं ॥ मी निरूपितों यथार्थ मनीं ॥ भावपूर्वक ॥२९॥
मानसीं न धरीं गा आन विचार ॥ परात्पर वस्तु तो शंकर ॥ वेदपुराणीं हाचि गा निर्धार ॥ परियेसीं गा अगस्ती ॥३०॥
एक कोटी भैरव होते जवळीं ॥ औट कोटी होती भूतावळी ॥ चौसष्ट कोटी योगिनी विशाळी ॥ स्वभारेंसीं असती पैं ॥३१॥
नव कोटी कात्यायनींचा भार ॥ छप्पन्न कोटी चामुंडा अति क्रूर ॥ हा वेगळाचि चाले परिवार ॥ भूतादिकांचा ॥३२॥
स्वामी कार्तिकेय षड्‍वक्त्री ॥ द्वादशभुज अष्टादशनेत्री ॥ हा अष्टकोटी नाना शस्त्रास्त्रीं ॥ होता शिवाजवळी ॥३३॥
ऐसा पुत्रपरिवारेंसीं त्र्यंबक ॥ त्यांमध्यें मी एक कार्तिक ॥ आणिकही चंडनायक ॥ सप्त कोटी होते कित्येक ॥३४॥
शिवापुढें करिताती पैखण ॥ ते सप्त साठ होते गजानन ॥ ते नामसंख्या तुज श्रवन ॥ पुढें करूं अगस्ती ॥३५॥
चतुर्दशरत्नीं जो समर्थ ॥ ऐरावतवाहन सुरनाथ ॥ तो शिवदर्शनाचा धरोनि स्वार्थ ॥ तेहतीस कोटी देवेंसीं असे ॥३६॥
महातप अनुष्ठानाचे गिरिवर ॥ तोय पत्रें भक्षिती योगीश्वर ॥ अठ्ठ्यायशीं सहस्त्र ऋषीश्वर ॥ होते शिवासवें ॥३७॥
कद्रूकश्यपांचे जे कुमर ॥ ते महा अद्‍भुतशक्ति फणिवर ॥ तीन कोटी होते विषसागर ॥ शिवाचे पैं ॥३८॥
चार कोटी होते दैत्यदानव ॥ ऐशीं सहस्त्र होते गंधर्व ॥ शिवापुढें रागध्वनींची ठेव ॥ गर्जती शिवनामामृतें ॥३९॥
अर्ध कोटी यक्ष निशाचर ॥ पांच होते लक्ष विद्याधर ॥ ते सर्व संगीतनृत्यकार ॥ शिवसभेचे पैं ॥४०॥
महाकुळाचळांचिया दुहिता ॥ त्या साठी सहस्त्र तीन सरिता ॥ सप्तही समुद्रकांतसहिता ॥ शिवासवें होत्या पैं ॥४१॥
स्नपिता संतोषे त्रिनयन ॥ तें महापंचामृत कांसे भरून ॥ त्यासांगातें होत्या कामधेन ॥ षोडष सहस्त्र श्रेष्ठ पैं ॥४२॥
तीन कोटी होते महाविखार ॥ जे सह्स्त्र फणांचे महीधर ॥ तो वेगळाचि असे शेषाचा भार ॥ चाले शिवासवें ॥४३॥
एक लक्ष वीस सहस्त्र सुपर्ण ॥ इतुके गरुड होते हरिवहन ॥ अष्ट सहस्त्र हिमाद्रिप्रमाण ॥ पर्वत होते मोठे ॥४४॥
वरुणापासाव ज्या विस्तारिती ॥ पृथ्वीपरिधा ज्या सर्वकाळ फळती ॥ त्या सांगातें होत्य़ा वनस्पती ॥ तीन कोटी तीन सहस्त्र ॥४५॥
मस्तकीं घेतला पृथ्वीचा भार ॥ प्रळयीं गर्जना ज्यांची दीर्घस्वर ॥ ते मेरूसमान दिशाकुंजर ॥ त्रिपंच सहस्त्र सवें होते ॥४६॥
द्वादश वैश्वानर दिव्यदीप्ती ॥ हे शिवासवें होते अगस्ती ॥ तेथें सोमसूर्यांची गणती ॥ करी ऐसा नव्हता कोणी ॥४७॥
इतुका शिवासवें होता परिवार ॥ ऐसा अविमुक्तीसी आला हर ॥ अगस्तीसी म्हणे शिवकुमर ॥ पुढें कैसें वर्तलें ॥४८॥
विष्णूपुढें आधीं लंबोदर ॥ आला शिवासी करावया नमस्कार ॥ त्यासी देखतांचि शंकर ॥ तोषला तो न सांगवें ॥४९॥
हर बैसलासे सिंहासनीं ॥ गणेश ओळंगला जी धांवूनी ॥ मग तो शंकर आणि दाक्षायणी ॥ उचलिला उभयतांनीं ॥५०॥
मातापितरें जैसीं आपुलिया कुमरा ॥ पमे उतुळिजे जैसें गिरिनृपवरा ॥ तेथें शिवाहोनि समर्थ दुसरा ॥ कवण असे ॥५१॥
माता पिता देव गा नाहीं त्यासी ॥ उपमा द्यावया गजेंद्रासी ॥ मग पंचाननें लंबोदरासी ॥ स्तविलें तेव्हां ॥५२॥
शिव म्हणे गा विघ्नहंता ॥ तूं मज अगम्य वरदसुता ॥ तुम्हांसी म्यां समर्पिली महिमता ॥ सर्व देवाधीश तूं ॥५३॥
तुवां मज संतोषविलें अत्यंत ॥ माझी इच्छा केली पूर्णभरित ॥ मज वाराणसी जाहाली गा प्राप्त ॥ तुमचिये कृपेंकरून ॥५४॥
मज तुम्हीं पाठविलेंती रहस्य ॥ म्हणोनि वाराणसी जाहाली द्दश्य ॥ त्या आनंदाचें बहुरहस्य ॥ न तुळे क्षीरार्णव ॥५५॥
ऐसा त्या आनंदाचा उद्भवला रस ॥ प्रेमभरित उचंबळला महेश ॥ तोचि काय भरिता जाहाला अधीश ॥ सप्तरूपें समुद्र ॥५६॥
मग शिव वदे जी गजवदना ॥ प्रथम उच्चार तुमच्या नामाचा जाणा ॥ मग सुफळ अष्टादश पुराणां ॥ अधिकार तुमचा ॥५७॥
तुमचा जेथें नाहीं नामस्मर ॥ तो वृथाचि होय वेद उच्चार ॥ तुमचे नामस्मरणें सृष्टिकर ॥ मग सुफळद्दष्टी ॥५८॥
सर्व जनांचीं जीं कार्यकारण ॥ तीं निष्फळ तुमचे नामेंविण ॥ तूं भक्तांचें हरिसी महविघ्न ॥ म्हणोनि विघ्नहर तुझें नाम ॥५९॥
आसनीं गमनीं तुमचा उच्चार ॥ वेदविद्याभ्यास करितां अध्वर ॥ पृथ्वीवरी द्यावया अधिकार ॥ वाराणसीचा तुम्हां ॥६०॥
स्वयंवरीं युद्धीं उच्चार तुमचे नामीं ॥ तेव्हां क्षत्रियांसी जय संग्रामीं ॥ सर्व व्यापारीं रिघतां भूमीं ॥ तूमचिया नामीं जयो ॥६१॥
जेव्हां सृष्टी आरंभिली विरिंचीन ॥ ते समयीं तुमचें केलें स्मरण ॥ आणिक अष्टसिद्धि पूर्ण ॥ ओळंगती तुम्हां ॥६२॥
मृगांकधर म्हणे जी लंबोदरा ॥ चौसष्टकोटीगुणवरा ॥ म्यां रक्षपाळ केलासे काशीपुरा ॥ सप्तावरणें अंतर्गृहीं ॥६३॥
तरी परिसें गा मज प्रियगणा ॥ तुज मी करितों नामधारणा ॥ तूं अत्यंत प्रिय माझिया मना ॥ तरी तूं प्रिय गण ॥६४॥
माझे सर्वही गण ओळंगती ॥ सर्वही कारणीं तुज स्मरती ॥ म्हणोनि तुझें नाम गणपती ॥ योजिलें प्रियपुत्रा ॥६५॥
तुम्हां शयनीं स्मरलिया भक्ता ॥ पराभविसी तूं भक्तांची चिंता ॥ म्हणूनि नाम योजिलें जी सुता ॥ शयनचिंतामणी तूं ॥६६॥
माझें पाशुपत अस्त्र दारुण ॥ त्यासी अधिकार तुझें नामस्मरण ॥ तेंचि नाम योजिलें सगुण ॥ पाशुपत विनायक ॥६७॥
तुझिया ध्यानीं महायोगीश्वर ॥ त्यांसी देसी तूं अभयवर ॥ म्हणोनि तेंचि नामसार ॥ वरदविनायक ॥६८॥
शाटयायन भद्रजाती ॥ त्या दिग्गजांचा तूं अधिपती ॥ तेंचि नाम योजिलें तुजप्रती ॥ गजविनायक पैं ॥६९॥
तुझिया नामाचे आर्तवंत ॥ तुज आराधिती नित्य नित्य ॥ त्यांसी तूं सिद्धि करिसी प्राप्त ॥ म्हणोनि सिद्धिविनायक ॥७०॥
तुवां सिद्धि भक्तांसी प्राप्त केलिया ॥ मोक्षही प्राप्त तूं द्दश्य जाहालिया ॥ तरी नाम योजिलें पुत्रराया ॥ मोक्षविनायक ॥७१॥
आराधितां तुझें पूर्ण व्रत ॥ साध्य नाहीं ऐसा आनंद देत ॥ तरी नाम योजिलें गुणभरित ॥ साक्षीविनायक तूं ॥७२॥
तरी सर्व सिद्धींचें भांडार ॥ तुज नाम लंबोदर ॥ गुणभरित सागर ॥ ढुंढिविनायक तूं ॥७३॥
जैसा पंचानन त्र्यंबक ॥ तैसाचि तूं पंचवदन सुलक्षणिक ॥ तरी मोदादि पंचविनायक ॥ नाम थोर तुझें ॥७४॥
भक्तांचिया चाडे भक्तीसी धुंडिसी ॥ तैं तूं ढुंढिराज नाम पावलासी ॥ माझिया आज्ञें रक्षिली पंचक्रोशी ॥ तो तूं देहली विनायक ॥७५॥
तुज आराधीतसे ब्रह्मात्मजा ॥ साह्य जाहालासी सर्व कार्यकाजा ॥ तियेचे मनोरथ सुफल केले सहजा ॥ तो तूं सरस्वती विनायक ॥७६॥
तूं विघ्नांवरी परजितां त्रिशूळ ॥ तेव्हां लोहितवर्ण चक्षुमंडळ ॥ तें विकट नाम योजिलें विशाल ॥ वक्रतुंड विनायक ॥७७॥
विश्वनाथाची जे निजधामिनी ॥ ते तूं रक्षितोसी सत्त्ववनीं ॥ तैं नाम योजिता जाहाला शूलपाणी ॥ सप्तार्णव विनायक ॥७८॥
तुज पूजितां तोयपत्रपुष्पीं ॥ त्या भक्तांची तूं आशा पुरविसी ॥ तेंचि नाम योजिलें गा तुजसी ॥ आशा विनायक ॥७९॥
शौर्य विनायक नाम सगुण ॥ आणिक सूर्यासी जाहाला प्रसन्न ॥ तेंचि नाम योजीं पंचानन ॥ अर्क विनायक ऐसें ॥८०॥
दुर्गासुराचिया महायुद्धीं ॥ भवानीसी प्राप्त केली सिद्धी ॥ तो तूं विनायक सर्वगणाधी ॥ सिद्धि विनायक ॥८१॥
तूं सर्व सिद्धींचा दायक ॥ तुझेनि बुद्धीचा प्रकाशक ॥ तुझें नाम विनायक ॥ बुद्धि विनायक पैं ॥८२॥
आतां असो हा नामांचा पसार ॥ तूं सगुण सर्वसिद्धींचा दातार ॥ जयासी प्रसन्न मन्मथहर ॥ तो सर्वां वंद्य केला गणेश ॥८३॥
शिव म्हणे रे पुत्रनायका ॥ तुज जे वंदिती लंबोष्ठका ॥ ते म्यां वंद्य केले ब्रह्मादिकां ॥ ऐसी आज्ञा माझी ॥८४॥
तंव स्वामीसी प्रार्थी अगस्ती ॥ म्हणे पृच्छा असे जी मयूरपती ॥ शिवें केला हा सर्व गणाधिपती ॥ लंबोदर पैं ॥८५॥
हा शिवगौरींचा कैसा सुत ॥ आणि कैसा जाहाला एकदंत ॥ मग जाहाला चतुर्दंत तो वृत्तांत ॥ कथावा मजप्रती ॥८६॥
स्मामीसी म्हणे कृपा करूनियां मज ॥ कैसा उद्भवला चतुर्भुज ॥ आणि याचें मूळ जन्मबीज ॥ निरूपावें स्वामी ॥८७॥
स्वामी म्हणे मुनिश्रेष्ठा ॥ बरवा केला कथेचा द्रष्टा ॥ कैसा जन्म जाहाला त्या लंबोष्ठा ॥ तें परियेसीं आतां ॥८८॥
श्रोतीं कीजे एकाग्र मन ॥ कथेसी सादर कीजे जी श्रवण ॥ हे कथा सर्व सिद्धींचें कारण ॥ साध्य होय पैं ॥८९॥
रौरवदैत्याचा जो श्रेष्ठ कुमर ॥ तो अतिक्रूर नामें गजासुर ॥ तेणें पीडिले महासुर ॥ लक्ष संवत्सरवरी ॥९०॥
विध्वंसिलीं यागादि हवनें ॥ देवांसी अप्राप्त केलीं भागदानें ॥ देवगण पीडिले क्षुधेनें ॥ मानिले तृणतुल्य ॥९१॥
लक्ष वरुषें प्रवर्तलें द्वंद्व ॥ सुरेंद्रा ऐसे केले शक्तिमंद ॥ दैत्यांसी अधिकाधिक महामद ॥ पुरुषार्थाचा पैं ॥९२॥
तैं नैमिषारण्याचा अधिपती ॥ पुरुषार्थें जिंकिली अवघी क्षिती ॥ मग विचारिता झाला चित्तीं ॥ दैत्यनाथ तो ॥९३॥
म्हणे म्यां जिकिलें अमरेशासी ॥ याग विध्वंसूनि भ्रष्ट केले ऋषी ॥ आतां मर्त्य मंडळीं राहिली काशी ॥ जिंकणें असे आम्हां ॥९४॥
म्हणोनि मेळविला दैत्यभार ॥ तो असो जी आतां नामांचा उच्चार ॥ काशी प्रवेशावया शंकर ॥ होतसे विलंब ॥९५॥
गजासुरें आपुले स्वभारीं ॥ अकस्मात वेष्टिली काशीपुरी ॥ म्हणे हा जिंकूनियां त्रिपुरारी ॥ करीन लोकां युगात ॥९६॥
तंव शिवाचे गण महाबळी ॥ ते दैत्यांसीं झुंजिन्नले सकळी ॥ शोणितें रोपिली महीतळी ॥ तें असो आतां ॥९७॥
मग गण पराभविले गजासुरें ॥ गणीं लंघिलीं गिरिकंदरें ॥ तंव उद्वस देखिली शंकरें ॥ वाराणसी ते ॥९८॥
मग शंकर म्हणे दाक्षायणी ॥ तुम्हीं निर्भय असावें काशी भुवनीं ॥ तुमच्या सखिया षोडशजणी ॥ असावें स्वगृहा तुम्हीं ॥९९॥
गजासुरासीं युद्ध करिता ॥ ऐसा त्रिभुवनीं नाहीं पाहातां ॥ तरी आम्ही युद्धासी जाऊं आतां ॥ अहर्निशीं पैं ॥१००॥
परियेसीं आतां प्राणेश्वरी ॥ युद्ध होईल त्रयोदश अर्कवरी ॥ तरी तुम्हीं आपुले मंदिरीं ॥ निश्चिंत असावें ॥१०१॥
मग त्वरावंत नंदिकेश्वरीं ॥ आरूढला तो त्रिपुरारी ॥ सुनाभ त्रिशूळ घेतलें करीं ॥ हातांत घेतला डमरू ॥१०२॥
असुरीं देखिलें त्रिनयना ॥ मग दीर्घध्वनी केली गर्जना ॥ युद्ध झालें असुर-पंचाननां ॥ तें न बोलवे वैखरीं ॥१०३॥
युद्ध झालें द्वादश अहो रात्र ॥ बहुत उपाय करी त्रिनेत्र ॥ त्रिशूळावांचूनि एकही शस्त्र ॥ नाहीं उरलें शिवकरीं ॥१०४॥
वर्णितां सविस्तर युद्ध प्रसंग ॥ दीर्घ विलंब असे कथामार्ग ॥ त्रिशूळप्रहार केला सवेग ॥ शिवें ते काळीं ॥१०५॥
मूळमंत्रें आव्हानिला त्रिशूळ ॥ लक्षिलें गजासुराचें वक्षःस्थळ ॥ मुष्टि फेंकिता झाला जाश्वनीळ ॥ महात्राणें मंत्रेंसीं ॥१०६॥
कोटि विद्युल्लतांची प्रभा ते समयीं ॥ ऐसा तेजाकार त्या भूमीचे ठायीं ॥ त्रिशूळ भेदला दैत्याचे ह्रदयीं ॥ शिवहस्तींचा ॥१०७॥
त्रिशूळ प्रहाराचा नाद गगनीं ॥ कीं व्योमींचें शिखर पडे मेदिनीं ॥ कीं उद्भवे प्रलय मेघांत ध्वनी ॥ गर्जती अष्टही दिग्गज ॥१०८॥
ऐसी शंकराची त्रिशूळमुष्टी ॥ कंपायमान झाली अवघी सृष्टी ॥ शरीर भेदोनि पाताळपुटीं ॥ पाडिलें छेदूनि ॥१०९॥
मग त्रिशूळासहित गजासुर ॥ मुष्टीनें उचलिता झाला शंकर ॥ व्योमीं धरिला छत्राकार ॥ शिवें आपुले मौळीं ॥११०॥
ऊर्ध्वचक्षु व्योमकुटीं ॥ दैत्यासी अवलोकी धूर्जती ॥ मग प्रत्युत्तर सुना भमुष्टी ॥ वदता झाला शिव ॥१११॥
त्रयोदशार्कपर्यंत महादारुणें ॥ तुवां युद्ध केलें गा महापुरुषार्थपणें ॥ आतां उभयांमध्यें सांगा कवणें ॥ होय श्रेष्ठ बळी ॥११२॥
गजासुर म्हणे जी चंद्रमौळी ॥ मी अतिश्रेष्ठ त्रैलोक्य मंडळीं ॥ तुझ्या मौळीं छत्र या रणमंडळीं ॥ माझिया शरीराचें ॥११३॥
तुमचे मस्तकीं अमृतकर ॥ यापरता त्रिलोकीं नाहीं थोर ॥ त्याहीवरी मी झालें छत्राकार ॥ म्हणोनि मी श्रेष्ठ त्रिभुवनीं ॥११४॥
अपार तप केलें म्यां पूर्वापारीं ॥ मी छत्र झालों तुमच्या शिरीं ॥ तंव क्रोध प्रहरूनि त्रिपुरारी ॥ जाहाला कृपावंत ॥११५॥
ऐकोनि असुराचें वचन ॥ मग शिव जाहाला प्रसन्न ॥ म्हणे गा असुरा माग वरदान ॥ दिधलें तुज ॥११६॥
दैत्य म्हणे ऐसा द्यावा वर ॥ माझिया चर्माचें कीजे अंबर ॥ बरवें मृदु जें सुकुमार ॥ पेरिजे तुम्हीं ॥११७॥
तुमचिया कंठींची जे माळ ॥ तेथें मुख्यमणि कीजे शिरकमळ ॥ तरी मी सर्वकाळ तुम्हां जवळ ॥ असेन ऐसियापरी ॥११८॥
स्वामी म्हणे अगस्ति अवधारीं ॥ तैंहूनि शिव जाहाला गजांबरी ॥ दैत्याचें शिर घेतलें करीं ॥ गजमुख तें ॥११९॥
शिवाचा भेदला होता अस्त्रघात ॥ तैं पडला होता एकदंत ॥ मग तें शिर घेऊनि उमाकांत ॥ येतसे काशीपुरीसी ॥१२०॥
इकडे काय करी दाक्षायणी ॥ शिव युद्धासी गेला हें जाणोनी ॥ जवळी सखिया षोडशजणी ॥ क्रीडती सर्वकाळ ॥१२१॥
मुख्य सेवेसी असे जी त्यांमधीं ॥ तियेसी नाम गद्यपद्यनिधी ॥ तिणें सुगंध चर्चिला आत्मबुद्धीं ॥ दाक्षायणीसी ॥१२२॥
तो दाक्षायणी अंगींचा सुगंध मळा ॥ गद्यपद्यनिधीनें केला पुतळा ॥ तो दाखविला हैमवतीला ॥ मग काय करी ते ॥१२३॥
हैमवतीनें देखिला सुलक्षण ॥ मग त्यासी दिधलें अमृतपान ॥ तंव तो महाक्षत्रिय सचेतन ॥ झाला भवानीहस्तें ॥१२४॥
त्यासी उपदेशिले नाना मंत्र ॥ महामारणीं शस्त्रास्त्र ॥ तो पंचक्रोशीप्रमाण महाक्षेत्र ॥ काशीरक्षक केला ॥१२५॥
गदा मुद्नर परशु अंकुश ॥ रक्तांबराक्षी महावेष ॥ काशीविघ्न करावया नाश ॥ निर्मिला भवानीनें ॥१२६॥
तंव दैत्य वधूनि आला त्रिपुरारी ॥ गजमौळी धरिला असे करीं ॥ शिव प्रवेशतां काशीपुरीं ॥ हाटकिला गणेशें ॥१२७॥
तेथें दोघांचें युद्ध जाहालें अपार ॥ क्षणैक मानवला शंकर ॥ तो आतां असो युद्धपसर ॥ संकलितचि सांगों ॥१२८॥
त्यासी उत्तर वदे शूलपाणी ॥ आम्ही गेलों होतों दैत्यवधा कारणीं ॥ कैसा प्रवेश लासी आमुचे भुवनीं ॥ दैत्यनष्टा तूं ॥१२९॥
म्हणोनि शिवें तुळिला त्रिशूळ ॥ म्हणे एक आहे दैत्यशिरकमळ ॥ त्यासी मेळवीन हें तुझें मौळ ॥ हाणीतलें घायातें ॥१३०॥
गजासुराहोनि बहुतांपरी ॥ तेणें संतोषला त्रिपुरारी ॥ शिर घातलें मुंडमाळे माझारी ॥ केला मुखमणि ॥१३१॥
ऐसें त्रयोदश अर्क जाश्वनीळें ॥ संहारिलीं महादैत्यकुळें ॥ मुंडमाळे घातलीं शिरकमळें ॥ उत्तम क्षत्रियांचीं ॥१३२॥
मग आले आपुले भुवनीं ॥ वृत्तांत प्रश्निला दाक्षायणीं ॥ म्हणे तुम्ही काशीमध्यें शूलपाणी ॥ कैसे जी आलेती ॥१३३॥
तंव मुंडमाळेसी देखिलें शिर ॥ म्हणे जी कैसा वधिला ॥ तेणें दुःख मानिती झाली थोर ॥ दक्षकुमरी ते ॥१३४॥
मग तें गजासुराचे शिर ॥ लावूनियां उठविला कुमर ॥ त्यासी प्रसन्न झाला तो शंकर ॥ उपदेशी नाममंत्र ॥१३५॥
प्रथम होत्या दोन भुजा ॥ तेणें संतोषविलें वृषभध्वजा ॥ मग त्यासी आणिक समर्पूनि सहजा ॥ केला तो चतुर्भुज ॥१३६॥
मग स्वामीसी म्हणे गा अगस्ती ॥ ऐसी या गणाची मूळ उत्पत्ती ॥ मग चतुर्दंत झाला गणपती ॥ ते कथा सांगों पुढारी ॥१३७॥
शिवदास गोमा मंदमती ॥ साक्षेपें प्रार्थी श्रोतयांप्रती ॥ चतुर्दंत झाला गणपती ॥ ते कथा पुढारी परियेसा ॥१३८॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे गणेशोत्पत्तिवर्णनं नाम षष्टितमाध्यायः ॥६०॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति षष्टितमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP