काशीखंड - अध्याय ६४ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्री गणेशाय नमः ॥ षण्मुख म्हणे गा अगस्तिमुनी ॥ जातां वीरेश्वराची कथा येथुनी ॥ ते परियेसीं महादोष नाशिनी ॥ अति पवित्र ॥१॥
सहस्त्र जन्मींचीं कल्मषें नासती ॥ वंशा नुवंशीं प्राप्त अविमुक्ती ॥ गोहत्या ब्रह्मह्त्या परा भवती ॥ तत्काळ श्रवणें ॥२॥
आतां ते पवित्र कथा कैसी ॥ साक्षेपें परियेसीं गा ऋषी ॥ मित्र जित राजा अविमुक्तीसी ॥ आला जय घेऊनि ॥३॥
ऐसा तो काशी पुरीसी असतां ॥ बहु काळ क्रमिला राज्य करितां ॥ तेथें व्याधिव्य थेची वार्ता ॥ नेणती सर्व जन ॥४॥
मग विद्या धराची नंदिनी ॥ महा पति व्रता मलय गंधिनी ॥ ते मित्र जित रायाची कामिनी ॥ प्रार्थी त्से स्वामीसी ॥५॥
म्हणे परिसा जी स्वामी नृपती ॥ आम्हांसी अत्यंत प्रिय तुमची भक्ती ॥ तरी आम्हांसी दीजे पुत्र संतती ॥ तुमचेनि स्वभावें ॥६॥
राजा म्हणे माझिये प्राणेश्वरी ॥ मुक्त फळें शोभा यमान जेवीं हरीं ॥ तैसे तुझे शब्द माझे ह्रदय मंदिरीं ॥ शोभा यमान पैं ॥७॥
प्रिये तूं जे जे कल्पिसी मनोरथ ॥ जैसा असेल तुझा इच्छा स्वार्थ ॥ तैसा तो सुफळ करावया समर्थ ॥ विश्वनाथ असे ॥८॥
तरी तुज एक व्रत सांगेन ॥ तेणें तूं पावसील पुत्ररत्न ॥ मनो भावें पूजिजे त्रिनयन ॥ तो कैसा परियेसीं आतां ॥९॥
मार्ग शीर्ष शुद्ध तृतीया दिवस येत ॥ ते दिनीं पूजिजे भवा नीकांत ॥ या काशीचे ठायीं पुत्र प्राप्त ॥ वंघ्या स्त्रियांसी होय पैं ॥१०॥
तैं कीजे उपवास पारण ॥ अष्टोत्तरशत आहुती कीजे हवन ॥ तरी इच्छे सारिखे पुत्रदान ॥ देतसे विश्वनाथ ॥११॥
सुंगधिनी नामें पति व्रता ॥ ते अलका पतीची प्रिय कांता ॥ बहुकाळ जाहाले शिव पूजितां ॥ ते सुंदरीसी ॥१२॥
मग प्रसन्न जाहाला विश्वंभर ॥ दिधला कुबेरा ऐसा वर । मग पुत्र काम नेस्तव ॥ शंकर ॥ आरा धीला मागुता ॥१३॥
ऐसी ते कुबेराची कामिनी ॥ हेंचि व्रत केलें काशी स्थानीं ॥ ती पुत्र प्राप्त झाली शुभ गुणी ॥ नल कूबर-माणि ग्रीवां ऐसे ॥१४॥
मग राजा वदे महा सुंदरी ॥ तरी तेंचि व्रत आतां अंगीकारीं ॥ मग तें व्रत आचरितां सुंदरी ॥ झाली पुत्रवर्ती ॥१५॥
मग रायें पांचारिले जोशी ॥ महा मंत्री बैसले मजालसीं ॥ त्यांहीं आज्ञा केली पाठ कांसी ॥ जन्म काळ वर्तवावया ॥१६॥
जन्म काळ पाहाती वेदाध्ययनी ॥ तो जन्मला मूळाचे प्रथम चरणीं ॥ तरी तो क्षय करील म्हणोनी ॥ माता पित यांचा ॥१७॥
राजा म्हणे कैसी कृती करावी ॥ तंव मंत्री वदते जाहाले स्वभावीं ॥ राया हा सांडावा महार्णवीं ॥ मूळनक्षत्रींचा ॥१८॥
तंव मंत्री प्रवेशले मंदिरासी ॥ विवेकें प्रबोधिलें राजां गनेसी हा पुत्र मूळीं जन्मला आपणांसीं ॥ क्षय करील सर्वथा ॥१९॥
मग विवेकें ती मलय गंधिनी ॥ बोलती जाहाली प्रति वचनीं ॥ म्हणे मंत्री हो तुम्हीं सर्व गुणी ॥ परिसा उत्तर माझें ॥२०॥
म्यां व्रत नेम साधिले काशी पुरीं ॥ मग प्रसन्न जाहाली विकटा गौरी ॥ हा मूळिया पुत्र माझ्या उदरीं ॥ कां पां दिधला मज ॥२१॥
हा विकटा गौरीनें आम्हांसी ॥ पुत्र प्राप्त केला बहु सायासीं ॥ तरी हा तिचा तिजपासीं ॥ नेऊनि टाकूं आम्ही ॥२२॥
हा मूळिया भक्षील माता पितर ॥ हा कवणाच्या कार्याचा नव्हे पुत्र ॥ जंववरी राजा तंववरी स्फुरेल मंत्र ॥ बहु पुत्र संततीचा ॥२३॥
ऐसी मलय गंधिनी वदे मंत्रिकां ॥ मग तिनें पाचारिल्या परिचारिका ॥ ज्या ज्ञान बुद्धि प्रवीण सुचिका ॥ चातुर्या विषयीं ॥२४॥
तो पुत्र दिधला तयां पासीं ॥ म्हणे हा द्यावा तुम्हीं विकटा गौरीसी ॥ म्हणावें ऐसा पुत्र आम्हांसी ॥ काय प्राप्त केला ॥२५॥
मग बालक घेऊनि तत्काळीं ॥ सांडिलें विकटा गौरी जवळीं ॥ म्हणे हा तुझा तूं सांभाळीं ॥ विकटा गौरी ॥२६॥
पुत्र टाकूनि गेल्या परिचारिका ॥ मग काय करिती जाहाली ते अंबिका ॥ तिनें पाचारिल्या योगिनी मातृका ॥ अष्टही जणी ॥२७॥
योगिनींसी वदे विकटा गौरी ॥ स्वर्गीं असती त्य अष्ट सुंदरी ॥ हा पुत्र कीजे त्यांचा आभारी ॥ वाढविजे यासी ॥२८॥
मग योगिनी घेऊ नियां बालकासी ॥ वेगीं उमपल्या कैलासीं ॥ बालक देऊ नियां मातृ कांपासीं ॥ पुनरपि आलिया ॥२९॥
त्या मातृका परस्परें वदती ॥ ते विकटा गौरी शंकराची शक्ती ॥ ते काशीचे ठायीं देतसे भुक्ति मुक्ती ॥ नर-मानव-पशुजंतां ॥३०॥
तियेच्या आपण आज्ञा धारी ॥ बालका यत्न करूं बरवियापरी ॥ मग आपणा प्राप्त होईल काशी पुरी ॥ या बाल कासंबंधें ॥३१॥
मग अष्ट संवत्सर पर्यंत मातृका ॥ यत्नें पाळिती त्या बालका ॥ मग बालक घेऊनि दीर्घ कौतुका ॥ आलिया काशी पुरीसी ॥३२॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुन ॥ त्या मातृका नामें कवण कवणी ॥ गौरीया आल्या बालक घेऊनी ॥ त्या परियेसीं आतां ॥३३॥
प्रथम श्रेष्ठ मातृका रौद्री बरवी ॥ द्वितीय मातृका ते वैष्णवी ॥ तृतीय मातृका ते ब्राह्मी जाणावी ॥ चतुर्थ कौमारी ते ॥३४॥
वाराही ते पांचवी मातृका ॥ सहावी ते नारसिंहिका ॥ चांमुडेश्वरी सातवी मातृका ॥ आहे माहेंद्रिका ते आठवी ॥३५॥
ऐसा अष्ट मातृका बालकासी ॥ धेऊनि आलिया गौरी पासीं ॥ म्हणती या राजलक्षणी बालकासी ॥ रक्षिलें न जाय ॥३६॥
मातृ कांहीं सोडिला गौरीचे द्वारीं ॥ गौरी कुरवाळी स्पर्शोनि करीं ॥ मग त्यासी नाम ठेवी गौरी ॥ वीर ऐसें ॥३७॥
मग तो क्रीडा खेळत देउळीं ॥ गेला बिंदुमाधवा जवळीं ॥ मग तेणें देखिला चक्षु मंडळीं ॥ गौरी वरद ऐसा ॥३८॥
मग तो बिंदुमाधव मूर्तीं ॥ प्रसन्न झाला त्या वीराप्रती ॥ म्हणे तूं करीं पां शिवाची भक्ती ॥ गौरी वरद्सुता ॥३९॥
मग तो लिंगस्थापना करी ॥ शत वर्षें पूजिला भस्मधारी ॥ तंव तो प्रकटला त्रिशूळधारी ॥ तया लिंगा माजीं पैं ॥४०॥
तो वीर बैसला होता शिव ध्यानीं ॥ तो शंकरें स्पर्शिला स्वयें पाणीं ॥ आश्वासिता झाला त्रिनयनी ॥ हैमवतीकांत पैं ॥४१॥
मी संतोषलों तुझे अनुष्ठानीं ॥ लिंग उद्भवलें सप्तपाताळ भेदूनी ॥ तुझा भक्तिप्रादुर्भाव देखोनी ॥ गौरी वरदवीरा ॥४२॥
शिव म्हणे गौरी वरदवीरा ॥ तुवां तोषविलें मज त्रिशूळधरा ॥ मनो भावें पूजिलें शंकरा ॥ स्थापिलें हें लिंग ॥४३॥
तुझें नाम गौरी वरदवीर ॥ तरी या लिंगा नाम वीरेश्वर ॥ सप्तपाताळींहूनि लिंगाकार ॥ आलों भक्तीं तुझिये ॥४४॥
मग तो वीर स्तुतीसी प्रवर्तला ॥ तेणें शिव साष्टांगें वंदिला ॥ म्हणे जय जयाजी या भूगोला ॥ रचिलें तुवां इच्छावृत्तीं ॥४५॥
शिव तूं दाता अनाथां चिया ॥ क्षण नलगे उत्पत्तिप्रळयां ॥ तुमची इच्छा ते महादादिमाया ॥ ब्रह्मांडजननी ते ॥४६॥
तुमचें करावया जी स्तवन ॥ व्यासें कथिलीं अष्टाद शपुराण ॥ चतुर्वेदांचें करूनि मथन ॥ स्मरिलें तुम्हां ॥४७॥
तरी हे स्वर्ग-मृत्यू-पाताळ ॥ हा बोलिजे एकचि ब्रह्मांड गोळ ॥ ऐसें त्रैलोक्य महीमंडळ ॥ तूंचि व्यापक ॥४८॥
मौळीनें वाहातसे ब्रह्मांडभार ॥ ऐसा तो सहस्त्रमौळीं महीधर ॥ तो तुमचें कंठीं उरगहार ॥ मी किती तुज वाखाणूं ॥४९॥
तुम्हां वोळंगती अष्टमहासिद्धी ॥ तुम्हां स्मरती कुलाचल उदधी ॥ मी दीन अनाथ मंदबुद्धी ॥ न कळे पार तुमचा ॥५०॥
जरी लक्ष तुमचिया प्रमाणा ॥ तरी तुम्ही अगा पंचानना ॥ पृथ्वी ऐसें तुळिजे त्रिनयना ॥ तरी तें कंठीं तुझे ॥५१॥
नव्या यशीं कोटि जे वसुंधरी ॥ ते तूं लिंग बोलिजे स्थावरा ॥ मध्यें बत्तीस कोटी महामेरुघेरा ॥ ते पिंडिका तुझी ॥५२॥
जळधर पृथ्वीपरिघ द्यावयास ॥ त्यासी उपमा तुळिजे गा महेश ॥ भोंवता सप्तपरिघ कलश ॥ पूर्णांबुजें भरित पैं ॥५३॥
शिवा तुम्हांसी म्हणिजे सप्तपाताळ ॥ तरी त्या तळीं तुमचें चरणतळ ॥ आणि एकवीस स्वर्गमंडळ ॥ त्यांही वरता मुकुट तुझा ॥५४॥
जरी तारा-ग्रह लक्षूं त्र्यंबका ॥ तरी तीं उडुगणें पुष्पमाळिका ॥ तुमचे कंठीं मिरवती सुमनमाळिका ॥ सुगंधपुष्पें ॥५५॥
तुम्हां म्हणों जरी शशि-ब्रघ्न ॥ तरी ते सोम सूर्य तुझे लोचन ॥ तुम्हांसी म्हणावें गार्हपत्याग्न ॥ तो भालचक्षु तुमचा ॥५६॥
ऐसा तूं अगम्य विरूपाक्षी ॥ जरी ते तुम्हां सप्तसमुद्र दीजे साक्षी ॥ तरी ते सप्तही उदधी कुक्षीं ॥ तुमचिया शिवा ॥५७॥
तुम्हांसी म्हणावें शैल प्रचंड ॥ तरी ते तुमचेचि दोर्दंड ॥ चतुर्वेद म्हणों तरी अखंड ॥ वाचा उद्नार तुमचा ॥५८॥
ऐसा हा त्रैलोक्य ब्रह्मांडगोळ ॥ तरी हें एवढें तुझेंचि स्थूळ ॥ मी अशक्त जी एकचि मौळ ॥ वाखाणू किती ॥५९॥
ऐसी त्या वीराची पूर्ण स्तुती ॥ ते परिसोनि तोषला उमापती ॥ मज पावली तुझी पूर्ण भक्ती ॥ गौरी वरदवीरा ॥६०॥
वीरासी वदे त्रिशूळधर ॥ तुज प्राप्त करितों पूर्ण वर ॥ तुझें श्रेष्ठ लिंग हें वीरेश्वर ॥ सर्वकाळ काशी मध्यें ॥६१॥
या लिंगाचा जो अगम्य महिमा ॥ वीरा तो ठाउका नव्हे आम्हां ॥ मग विरिंचिनाथा पुरुषोत्तमा ॥ कैंचा गम्य ॥६२॥
हें लिंग होतें सप्तपाताळीं ॥ अकस्मात आलें मृत्यु मंडळीं ॥ तुझी भक्ति देखोनि तत्काळीं ॥ द्दश्य जाहालों ॥६३॥
या लिंगाचा प्रादुर्भाव देखोनि ॥ येथें लिंगें स्थापिलीं बहुतां जनीं ॥ तीं कवण गा वीरा श्रवणीं ॥ ऐक आतां सांगतों ॥६४॥
प्रथम झाला मत्म्यावतार ॥ तो वृताशुॠषीचा कुमर ॥ तेणें लिंग स्थापिलें मत्स्येश्वर ॥ या काशी मध्यें ॥६५॥
द्वितीय कूर्मीं स्थापिला कूर्मेंश्वर ॥ वराहें स्थापिला वराहेश्वर ॥ नारसिंहें आराधिला शंकर ॥ तो नारसिंहेश्वर पैं ॥६६॥
वामनेश्वर स्थापिला वामनें ॥ परशुरामें जमदग्निनंदनें ॥ भावें पूजिला पंचानन तेणें ॥ तो पशुरामेश्वर पैं ॥६७॥
आणि दाशरथिरामेश्वर ॥ कृष्णें लिंग स्थापिलें कृष्णेश्वर ॥ मग झाला बौद्धावतार ॥ त्या नाम बौद्धेश्वर ॥६८॥
शंकर म्हणे गा भक्तवरा ॥ आणिक लिंगें परियेसीं वीरा ॥ या काशीच्या ठायीं त्रिशूळधरा ॥ आराधिलें जिंहीं ॥६९॥
येथें आला उदयगिरी ॥ तेणें स्थापिला त्रिपुरारी ॥ लिंग स्थापिलें काशीपुरीं ॥ उदयाचळेश्वर पैं ॥७०॥
येथे आला गिरि मंदर ॥ तेणें स्थापिला मंदरेश्वर ॥ मलयाचलें पूजिला शंकर ॥ तें मलयेश्वर लिंग ॥७१॥
येथें आला हेमकूट पर्वत ॥ तेणें पूजिला भवानीकांत ॥ तो काशीच्या ठायीं महा अद्भुत ॥ हेमकूटेश्वर ॥७२॥
येथें आला गंधगिरी ॥ तप साधना केली काशी पुरीं ॥ तेणें स्थापिलें त्रिपुरारी ॥ त्या नाम गंघेश्वर ॥७३॥
खटुपर्वत आला काशीस्थानीं ॥ तेणें पूजिला त्रिनयनी ॥ तेणें लिंग स्थापिलें भाललोचनी ॥ त्या नाम पर्वतेश्वर ॥७४॥
रुद्रगिरी आला काशी पुरीसी ॥ तेणें पूजिला काशी निवासी ॥ लिंग स्थापिलें शिवासी ॥ रुद्रेश्वर ऐसें ॥७५॥
वीरा येथें आला क्षीर सागर ॥ तो कश्यपऋषीचा ज्येष्ठ कुमर ॥ तेणें लिंग स्थापिलें महेश्वर ॥ क्षीरेश्वर नामें ॥७६॥
ऐसी हीं लिंगें पृथक स्थापना ॥ परी तुझें लिंग श्रेष्ठ जाणा ॥ अगोचर देवां सुरेंद्रगणां ॥ महापूज्यमान ॥७७॥
ऐसीं त्या वीराप्रती शंकरें ॥ लिंगें द्दश्य केलीं प्रत्यक्षाकारें ॥ मग शिवासी प्रार्थिलें त्या वीरें ॥ वर द्यावया लिंगासी ॥७८॥
मग वीरासी वदे महादेव ॥ परियेसीं लिंगाचा प्रादुर्भाव ॥ सृष्टि उद्भवीतसे ब्रह्मदेव ॥ या लिंगाचे अधिकारें ॥७९॥
सोम-सूर्थांचे रथ त्वरावंत ॥ मेरुप्रदक्षिणेसी भ्रमत ॥ तरी हे गमनीं बळवंत ॥ या लिंगाचेनि आधारें ॥८०॥
व्योम बद्ध झालेंसे निश्चळ ॥ कृशा नूसी अति संतप्त ज्वाळ ॥ सप्तद्वीपवती कुलाचल ॥ या लिंगाच्या अधिकारें ॥८१॥
या वीरेश्वर लिंगाजवळी ॥ मेषाहुति समर्पिजे अग्निज्वाळीं ॥ तरी तेणें जिंकिली महीतळी ॥ सूर्ययागाचे पुण्यें ॥८२॥
येथें समर्पी न्यायिक द्रव्यांश ॥ तरी तेणें केला तुळापुरुष ॥ ऐसा वर देत महेश ॥ या लिंगासी ॥८३॥
यज्ञ आरंभिजे वीरेश्वरा पासीं ॥ लक्ष रुद्रजप घडे त्यासी ॥ कोटि जागांचें फळ अहर्निशीं ॥ प्राप्त होय तयातें ॥८४॥
येथें एक पुष्प समर्पी कोणी ॥ तेणें वसुमती दिधली दानीं ॥ श्रद्धापूर्वक पूजनें एक पंचाननी ॥ आराधी जो ॥८५॥
तरी पंचकोटि तुरंगम ॥ सहस्त्र गोदानें कोटि होम ॥ विरिंचिनाथ आणि पुरुषोत्तम ॥ वंदिती तयासी ॥८६॥
करसंपुट स्पर्शोनि मौळीं ॥ साष्टांग प्रमाण क्षितितळीं ॥ भावपूर्वक या लिंगाजवळी ॥ भक्तीं विरक्त होय ॥८७॥
तरी सप्तद्वीपवती नवखंडें ॥ सप्तपाताळें आणि ब्रह्मांडें ॥ यांचीं करोनियां अधोमुंडें ॥ वंदिलें हें लिंग ॥८८॥
स्वामी म्हणे गा महा मुनिवरा ॥ ऐसे वर झाले त्या वीरेश्वरा ॥ मग शिवें करीं धरिलें त्या वीरा ॥ गौरी वरदासी ॥८९॥
ऐसे देवभक्त प्रेमभरित ॥ पहा हो केवढें भक्ताचें उचित ॥ दोघे त्या लिंगामध्यें अकस्मात ॥ लय पावले पैं ॥९०॥
तंव स्वामी म्हणे गा अगस्ती ॥ ऐसी वीरेश्वराची उत्पत्ती ॥ तुज निरूपिली परमभक्तीं ॥ पृच्छाप्रसंगें ॥९१॥
अगस्ति प्रार्थीं शिवसुता ॥ तरी प्रश्न असे जी ज्ञान भरिता ॥ तूं मज अशक्तासी धैर्यदाता ॥ षडानना स्वामी ॥९२॥
दुर्वासऋषीश्वरलिंग काशीमधीं ॥ हें मज निरूपा जी ज्ञानबुद्धी ॥ तूं मज तृषांर्ताचा अंबुधी ॥ षड्वक्रा स्वामिया ॥९३॥
अगस्तीसी वदे शिवकुमर ॥ म्हणे परियेसी पृच्छेचा परिहार ॥ गर्गाचार्यऋषीचा कुमर ॥ दुर्वास नामें ॥९४॥
त्यानें काशी मध्यें केली तपसाधना ॥ आराधिता जाहाला पंचानना ॥ परी क्रूरभाव अंतःकरणा ॥ न करीचि त्याग ॥९५॥
विधियुक्त पूजन करी ॥ परी नम्रता न धरीचि शरीरीं ॥ तपसाधना केली काशीपुरीं ॥ शत एक संवत्सर ॥९६॥
मग म्हणे हें कैसें काशी स्थान ॥ नित्य करितों मी पूजा-स्नपन ॥ परी तो अद्दश्य पंचानन ॥ द्दश्य नव्हेचि मज ॥९७॥
म्हणे मी त्रासलों शिव भक्तीसी ॥ मज असाध्य तो अविमुक्ति निवासी ॥ येथें मुक्ति म्हणती सर्व जीव जंतूंसी ॥ हें सर्वही मिथ्या ॥९८॥
मी कष्टलों बहुत काळवरी ॥ अनुष्ठान करीतां शरीरीं ॥ आतां शापीन हे काशीपुरी ॥ विश्वनाथाची ॥९९॥
दुर्वास देत होता शापदान ॥ तंव धांविन्नले शिवाचे गण ॥ दुर्वासा आणिला हस्त बांधोन ॥ शिवापासीं ॥१००॥
ते गण म्हणती ऋषीश्वरा ॥ अरे गर्विष्ठा ॥ अतिक्रूरा ॥ काशी मध्यें असोनि अविचारा ॥ तुज नाहीं धीरत्त्व ॥१०१॥
ग्ण म्हणती गा दुर्वासा ॥ तूं नेणसी काशी चिया प्रकाशा ॥ चंदनतरूचे गुण वायसा ॥ केवीं प्राप्त होती ॥१०२॥
नातरी अमृतकर चिये ज्योती ॥ तेणें चकोरां होय तृप्ती ॥ त्या पीयुष आहाराची गती ॥ कपोत केवीं जाणती ॥१०३॥
कमळाचा आमोद चोखट ॥ सेवूं जाणती मधुकंर सुभट ॥ तो रसास्वाद गोमयकीट ॥ न जाणेचि सर्वथा ॥१०४॥
या काशी चिया प्रकाशाची गती ॥ तो विश्वनाथचि जाणे प्रीतीं ॥ काशी अक्ष्ररद्वय जपतां मुक्ती ॥ मातृपितृ पक्षांसी ॥१०५॥
ऐसा गणीं प्रबोधिला ऋषीश्वर ॥ परी तो न प्रहरी भाव क्रूर ॥ जैसा चंदन गुण वसंत तरु साचार ॥ न अंगीकारी सर्वथा ॥१०६॥
आतां असो हे द्दष्टांतपरवडी ॥ बहुश्रुत जाणती प्रमेय गोडी ॥ जैसी समुद्रीं दिधलिया बुदी ॥ पाविजे अविंध मणी ॥१०७॥
मग दुर्वास नेला शिवा जवळी ॥ क्रोधें कंप सुटला अचळीं ॥ तें आश्चर्य देखोनि चंद्र मौळी ॥ हास्य करी पंचानन ॥१०८॥
मग विश्वनाथ वदे गणांसी ॥ हा खेदक्षीण न करा रे तापसी ॥ हे शुभा शुभ मंह्त परियेसीं ॥ वंदावे सर्वथा ॥१०९॥
अपार सामर्थ्य असे याचें ॥ तुम्ही हास्य न करा रे ऋषीचें ॥ तमो गुणी पूर्ण शरीर याचें ॥ या काशीचे ठायीं ॥११०॥
हा अति क्रोधा यमान शरीरीं ॥ परी हा तापसी ब्रह्मचारी ॥ याचा अव गुण बहुतांपरी ॥ न मानिजे तुम्हीं ॥१११॥
जरी तो तापस महाक्रोधी ॥ तरी तो न म्हणावा मंद बुद्धी ॥ वृथा म्हणिजे तरी काशी मधीं ॥ लिंग स्थापिलें येणें ॥११२॥
जयांसी कामक्रो धांचा विटाळ ॥ ते माझे परमभक्त केवळ ॥ ते पृथ्वी जनां वंद्य सर्व काळ ॥ जे पूजक माझे ॥११३॥
गणांसी वदतसे पशुपती ॥ जे महंत अतिकोधी असती ॥ त्यांची जन्मां तरींची तप भक्ती ॥ तत्काळ जाय ॥११४॥
तप साधन करी जन्मवरी ॥ आणि विषम भाव न प्रहारी तो महंत जाणा पृथ्वी माझारी ॥ क्वचित मंद ॥११५॥
परी ते न म्हणावे गा अव गुणी ॥ ऐसें गणांसी वदे शूल पाणी ॥ अरे हा दुर्वास तापसी महा मुनी ॥ आणावा जवळीकें ॥११६॥
मग शिव म्हणे दुर्वास ऋषी ॥ माग माग रे मी प्रसन्न तुजसी ॥ हें मुक्तिक्षेत्र अविनाश काशी ॥ शापूं नको तूं ॥११७॥
अक्षरद्वय मंत्र जपे जो काशी ॥ सर्व तपो विद्या साध्य तयासी ॥ शत एक जन्मां चिया पापराशी ॥ दहती या मंत्रें ॥११८॥
तेणें साधिले कोटि तपोयज्ञ ॥ न लगे ध्यान धारणा दान ॥ लय लक्ष्य समाधि साधन ॥ तें काशी द्वय अक्षरें ॥११९॥
येथें मुक्तिबद्ध होसील तूं नेणसी ॥ शापदान कोण बोले वैखरीसी ॥ इच्छावर माग मी प्रसन्न तुजसी ॥ दुर्वास महंता ॥१२०॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ ऐसा प्रसन्न झाला शूलपाणी ॥ दुर्वास लज्जावंत झाला मनीं ॥ मग पाहे अघोद्दष्टीं ॥१२१॥
मग तो सोडूनियां अव गुणां ॥ दुर्वास प्रवर्तला शिवस्तवना ॥ म्हणे जय जयाजी त्रिनयना ॥ मी अन्यायी थोर ॥१२२॥
दग्धो माझें जीवित्व अव गुणांचें ॥ वृथा हें माझें शरीर क्रोधाचें ॥ आतां तुमच्या दर्शनें गुणाचें ॥ झालें तत्काळ ॥१२३॥
मग शिवासी प्रार्थी ऋषीश्वर ॥ म्यां लिंग स्थापिलें शंकर ॥ त्यासी प्राप्त कीजे ऐसा वर ॥ कामेश्वर लिंग तें ॥१२४॥
त्र्यंबका मी अनाथ दीन ॥ माझा ऐसाचि स्वभाव क्रोधी गुण ॥ माझा संसारीं निष्फळ अपमान ॥ होतसे जेथें तेथें ॥१२५॥
स्वामी म्हणे गा ऋषि अगस्ती ॥ दुर्वासें शिवाची केली स्तुती ॥ तें श्रवण करवूं गा तुज प्रती ॥ मित्रा वरुण सुता ॥१२६॥
शिवा मी लोह तूं परीस ॥ तेणें मी होईन हिरण्यांश ॥ हा तुम चिये भक्तीचा प्रकाश ॥ व्हावया मज ॥१२७॥
तुमच्या आश्रयें झालों सुवर्ण ॥ त्यावरी जडलें तुमचें नामरत्न ॥ तें जन्मवरी मिरवीन भूषण ॥ माझिया ह्रदयीं ॥१२८॥
शिवा मी मंदबुद्धि ज्ञान भ्रष्ट ॥ जैसे त्या औदुंबराचे फळां तील कीट ॥ त्यांसी न भासे जी व्योमकूट ॥ मंदमति गुणे ॥१२९॥
शिवा मी अष्टाद शज्वर पावकु ॥ राज व्यथाव्याधि पीडें भोगिकु ॥ परी तुझे नामरसें ज्वरांकु ॥ पराभवे महाव्यथा ॥१३०॥
शिवा मी अमंगळ जी कृपण ॥ परी साचें तुझें नाम ॥ सुवर्ण ॥ जैसें चर्म पात्रींचें जीवन ॥ प्राशिजेत उत्तमलोकीं ॥१३१॥
नातरी तें चर्मपात्रींचे उदक ॥ तेणें सिद्ध होती मिष्टान्नपाक ॥ तैसें माझें शरीर क्रोधिक ॥ तेथें नाम तुझें ॥१३२॥
भलतैसें असो प्रासाद मंदिर ॥ तेथें लिंग स्थापिलें पवित्र विश्वंभर ॥ तैसें माझें क्रोध शरीर ॥ परी तेथें शुभ नाम तुझें ॥१३३॥
धेनु केसी अमंगळाची प्रीती ॥ कांसे पंचामृतपय स्त्रवती ॥ तैसें माझें शरीर मंदमती ॥ परी शुभ नाम वसे तुझें ॥१३४॥
शिवा जैसा तो वंद्य मूर्ति पाषाण ॥ त्यासी पूजा अर्पिती सर्व जन ॥ तैसा मी मति भ्रष्ट अज्ञान ॥ परी शुभ नाम तुझें ॥१३५॥
जैसा तुरंगम पशुपती ॥ त्यावरी आरूढ होय नृपती ॥ वरी दिव्य दंड चामरें मिरवती ॥ स्वामित्वपणें ॥१३६॥
तैसा माझे मनीं तूं स्वार ॥ माझ्या ह्रदयीं तुझा नामस्मर ॥ तेणें मी पशुजंत अविचार ॥ वंद्य झालों शिवा ॥१३७॥
ऐसी दुर्वासऋषीची स्तुती ॥ तेणें संतोषला पशुपती ॥ म्हणे तुझी पावली भक्ती ॥ ऋषि दुर्वासा ॥१३८॥
अगस्तीसी म्हणे शिव कुमार ॥ त्या लिंगी लय पावला शंकर ॥ सुखी केला तो ऋषीश्वर ॥ त्रिपुरांतकें ॥१३९॥
दुर्वा सेश्वर तें लिंग प्रथम ॥ मग शिवाचा वर जाहाला उत्तम ॥ शिवें लिंगासी प्रयोजिलें नाम ॥ कामेश्वर ऐसें ॥१४०॥
काम कुंडीं कीजे स्नान दान ॥ कामेश्व्रीम कीजे पूजन ॥ तेणें सर्व मनोरथ संपूर्ण ॥ सुफल होती ॥१४१॥
या अध्यायाची सांगों फलश्रुती ॥ हा अध्याय जे श्रवण पठण करिती ॥ जन्मां तरींचे दोष परा भवती ॥ निमिषमात्रें ॥१४२॥
ऐसा अगस्ति स्वामींचा संवाद ॥ जैं जैं पृच्छा तों तों दीर्घा नंद ॥ येथूनि कथा रसाळ विनोद ॥ परिसावी श्रोतीं ॥१४३॥
शिव दास गोमा श्रोतयां प्रती ॥ भाव पूर्वक प्रार्थी बद्धहस्तीं ॥ आतां स्वामीसी अगस्ती ॥ ते कथा महा आश्चर्य ॥१४४॥
इति श्रीस्कंद पुराणे काशीखंडे वीरेश्वरोत्पत्तिवर्णनं नाम चतुःषष्टितमाध्यायः ॥६४॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति चतुःषष्टितमाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP