मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय १८ वा

काशी खंड - अध्याय १८ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
वृंदा पतिव्रता जालंधराची ॥ ते मनोजें चळविली साची ॥ तिनें स्वपुरुष अव्हंरूनि प्रेताची ॥ इच्छा केली भोगावया ॥१॥
या मनोजाचा एक शिक्का ॥ हैमवतीस्वयंवरीं लागला चतुर्मुखा ॥ बहुधा अभिलाषिली ॥ अंबिका ॥ विरिंचिनाथें ॥२॥
मग शिवासी प्रार्थी चतुरानन ॥ यासी एवढें सामर्थ्य काय म्हणोन ॥ तंव बोलता झाला पंचानन ॥ विरिंचीप्रती तेधवां ॥३॥
म्हणे विरिंची ऐकें इत्यर्थ ॥ या मदनाचें सामर्थ्य ॥ तें मजही असे अकथ्य ॥ वेदवाक्यांतरीं ॥४॥
जरी तो म्हणशील सांग कवण ॥ तरी तो निराकार असे निर्गुण ॥ तोचि मी लक्षितां पंचानन ॥ झालों विश्वरूप ॥५॥
माझें स्वरूप अंधकार ॥ तोचि मी धुमधुम निराकार ॥ जैं नव्हता सृष्टिव्यवहार ॥ ब्रह्मांड हें संपूर्ण ॥६॥
जैं नव्हतीं पृथ्वी आप तेज पवन ॥ तारापती आणि गगन ॥ देव दैत्य नक्षत्रें जाण ॥ नव्हते हरि विरिंची ॥७॥
नव्हती त्रैलोक्यव्यक्ती ॥ नादबिंदु कळा ज्योती ॥ तैं होती ते अकथ्य मूर्ती ॥ धुमधुमाकार ॥८॥
ऐसा हा अंधकार अद्‍भुत ॥ तैं होता जी ब्रह्मांडभरित ॥ त्यामाजीं मी ध्यानस्थ ॥ होतों कोटीवराहकल्प ॥९॥
ऐसा तो अंधकार महातम ॥ मजही अगोचर अगम्य ॥ तोचि रे मदनाचा जन्म ॥ विरिंचिनाथा सत्य पैं ॥१०॥
ऐसा हा स्मर हरदमन ॥ करीतसे महादोषलांछन ॥ स्वामीच्या निजसामर्थेंकरून ॥ यासी नाहीं भय लज्जा ॥११॥
ऐसा हा मकरध्वज महाक्षत्री ॥ म्यां दग्ध केला तृतीयनेत्रीं ॥ परी हा अभिलाषितां अंतरीं ॥ न राहेचि मन्मथ ॥१२॥
म्हणोनि हा महाअविचारी ॥ यानें ठकविलें महाआचारी ॥ हा त्रिलोकीं सबराभरी ॥ व्यापक असे सर्वदा ॥१३॥
शिवशर्मा म्हणे गुरुकांतेचा गर्भ पडिला ॥ तो वृत्तांत कैसा झाला ॥ आणि कैसा निश्चयो केला ॥ तिचिया प्रायश्चित्ताचा ॥१४॥
ही पृच्छा करितों तुम्हांसी ॥ झणी कोपाल जी आम्हांसी ॥ गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ श्रोता नाहीं तुजऐसा ॥१५॥
तिचा गर्भ पडला क्षितीं ॥ मग ते झाली ऋतुमती ॥ पंच अहोरात्र बृहस्पती ॥ नातळे सहसा तियेसी ॥१६॥
मग ते क्षिप्रागंगेच्या तीरीं ॥ अवंतिका नामें पुण्यपुरी ॥ तेथें गर्भ पडिला महाकाळेश्वरीं ॥ ज्योतिर्लिंगीं पैं ॥१७॥
तेथें सारिला स्नानविधी ॥ तेणें तारेची झाली शुद्धी ॥ मग ते नेली मंदिरा आधीं ॥ गुरुदेवें तेधवां ॥१८॥
तंव तेथें विरिंचिनाथ आला ॥ तेणें गर्भ विलोकिला ॥ मग उचलोनि ह्रदयीं धरिला ॥ आलिंगिला प्रीतीनें ॥१९॥
म्हणे हा चंद्रवीर्याचा शुद्धु ॥ म्हणोनि नर्मदेचा होय बंधु ॥ यासी नाम ठेविलें बुधु ॥ विरिंचिदेवें ॥२०॥
मग बुध प्रार्थी ब्रह्मयासी ॥ म्हणे मी जाईन वाराणशीसी ॥ मग चतुराननें तयासी ॥ आज्ञा केली स्वइच्छें ॥२१॥
मग बुध आला आनंदवनीं ॥ मणिकर्णिकेसी स्नान करूनी ॥ तेणें स्थापिला शूळपाणी ॥ बुधेश्वरनामें लिंग तें ॥२२॥
पांच सहस्त्र वर्षेंवरी ॥ तेणें पूजिला त्रिशूळधारी ॥ मग तीं हर आणि गौरी ॥ जाहालीं प्रसन्न तयासी ॥२३॥
बुधासी म्हणे शंकर ॥ तुझा पिता जाण शीतकर ॥ त्याचेनि सानर्थ्यें तुज वर ॥ प्राप्त करीन मी आतां ॥२४॥
पूर्ण वर दिधला तुजसी ॥ महानरेंद्र या पृथ्वीसी चक्रवर्ती सोमवंशीं ॥ उद्भवती तुजपासाव ॥२५॥
सोमवंश आणि सूर्यवंश ॥ हा तुजपासाव प्रकाश ॥ ऐसा प्रसन्न झाला महेश ॥ बुधाप्रती ते काळीं ॥२६॥
तुझ्या वंशीं राजे उद्भवती ॥ ते महापुण्यशीळ याग करिती ॥ जे बुद्धेश्वरलिंग पूजिती ॥ ते वसती बुधलोकीं ॥२७॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ तो बुधराजा या लोकासी ॥ पुरूरवा पुत्र झाला त्यासी ॥ तेथोनि सोमवंशासी विस्तार ॥२८॥
मार्तंडाचा जो प्रथम सुत ॥ श्राद्धदेव नामें गुणभरित ॥ हा बुध तयाचा जामात ॥ जाहला जाण शिवशर्म्या ॥२९॥
त्या श्राद्धदेवाची कुमारी ॥ इला नामें महासुंदरी ॥ ते बुधराजयाची अंतुरी ॥ जाहली असे शिवशर्म्या ॥३०॥
मग ते शापास्तव सुंदरी ॥ इला गंगा जाहाली घृष्णेश्वरीं ॥ ते कथा सांगेल पुढारी ॥ अगस्तीसी षडानन ॥३१॥
विमान जातसे गगनोदरीं ॥ तंव कवण लोक देखिला पुढारीं ॥ ते कथा कर्मवनासी कुठारी ॥ परिसा श्रोते हो ॥३२॥
तंव पुढें देखिला दिव्य लोक ॥ शिवशर्मा पुसे कौतुक ॥ आतां श्रोतीं व्हावें नावेक ॥ सावधान कथेसी ॥३३॥
महादीप्त श्वेतवर्ण ॥ तेथें नाहीं जरा मरण ॥ शिवशर्म्यासी निरूपित गण ॥ हा तंव असे शुक्रलोक ॥३४॥
शिवशर्मा पुसे गणांप्रती ॥ या लोकीं शुक्र अधिपती ॥ तरी कैसी याची उत्पत्ती ते सांगावी गणोत्तमा ॥३५॥
तंव बोलिले विष्णुदूत ॥ परिसा आतां शुक्राचा वृत्तांत ॥ विरिंचिदेवाचा जो सुत ॥ भृगुनामें विख्यात ॥३६॥
पुलोमा नामें महापतिव्रता ॥ त्या भृगुऋषीची प्रियकांता ॥ ते जाणावी माता ॥ शुक्राचार्याची पैं ॥३७॥
तंव बोलिला तो ब्राह्मण ॥ शुक्र हा भृगूचा नंदन ॥ हा एकाक्ष जाहाला काय म्हणोन ॥ ते निरूपावें मज ॥३८॥
तंव बोलती विष्णुदूत ॥ मरीचि नामें ब्रह्मसुत ॥ तयाचा बोलिजे रेतजात ॥ कश्यपमुनी ॥३९॥
त्या कश्यपाचा कुमर ॥ हिरण्यकशिपु महाअसुर ॥ त्यापासव हरिभक्त थोर ॥ प्रल्हाद नामें विख्यात ॥४०॥
त्या प्रल्हादाचा नंदन ॥ महाविख्यात विरोचन ॥ त्यापासाव ॥ दानशूर सधन ॥ जन्मला बळी ॥४१॥
मग राज्य करितां बळीसी ॥ व्यथा नाहीं तयासी ॥ पापकर्माची वार्ता जनांसी ॥ स्वन्पींही नसेचि ॥४२॥
नित्य पालन द्विजांचें ॥ द्रव्यउपार्जन नीतिमार्गाचें ॥ शत्रु-मित्रत्व एकमेकांचें ॥ नेणती जन सर्वथा ॥४३॥
ऐसा तो बळी चक्रवर्ती ॥ राज्य करीतसे पुण्यकीर्ती ॥ मग घेतली अमरावती ॥ सर्व दैत्य मिळूनी ॥४४॥
तेथें देव आणि असुर ॥ युद्ध करिती घोरांदर ॥ तें निरूपितां सविस्तर ॥ विस्तारेल कथा ॥४५॥
मग देव आणि सुरपती ॥ गेले जेथें कश्यप अदिती ॥ मग त्यांहीं प्रार्थिला तो रमापती ॥ अवतरावया ॥४६॥
अमरपदीं बैसला बळी ॥ तेथें धर्मनीतीं प्रजा पाळी ॥ परी देवांचें न्य़ून कोणेकाळीं ॥ न बोलेचि सर्वथा ॥४७॥
शिवशर्म्यासी म्हणती गण ॥ ऐसें बळीनें घेतलें स्थान ॥ मग बळी पुसता जाहला प्रश्न ॥ त्या शुक्राचार्यासी ॥४८॥
अमरावतीचें राज्य करितां ॥ आपण नाइकिजे शत्रूची वार्ता ॥ ऐसा उपाय योजावा तत्त्वतां ॥ अवश्य म्हणे दैत्यगुरु ॥४९॥
महाद्रव्य हविजे हवनीं ॥ शतयज्ञ कीजे काशीस्थानीं ॥ तरी तो इंद्र होय अमरभुवनीं ॥ चतुःखाणीं भलताही ॥५०॥
ऐसें त्या शुक्राचें वचन ॥ ऐकोनि बळी आंरभिता जाहला यज्ञ ॥ ऐसे दिवस क्रमिले पूर्ण ॥ सहस्त्र वरुषेंपर्यंत ॥५१॥
ऐसा यज्ञ करी बळी चक्रवर्ती ॥ अवघी जिंकली तेणें क्षिती ॥ तंव गरोदर जाहाली ते अदिती ॥ कश्यपकांता ॥५२॥
सहस्त्र वरुषें गर्भ उदरीं ॥ संभवला होता चक्रधारी ॥ मग जन्मला तो नित्याचारी ॥ वामनमूर्ती साक्षात ॥५३॥
मग सवें घेऊनि ब्राह्मण ऋषी ॥ वामन आला बळीयागासी ॥ सेवकीं जाणविलें रायासी ॥ कौतुक थोर वामनाचें ॥५४॥
मग बळीनें देखिला वामन ॥ शुक्रासी करिता जाहला प्रश्न ॥ ऐसी अपूर्व आकृती आपण ॥ कधीं देखिली नसे कीं ॥५५॥
रायें बैसविला यागाजवळीं ॥ क्षेम पुसतसे बळी ॥ येरू म्हणे तुझेनि सर्व काळीं ॥ संतोषित असें मी ॥५६॥
तुमची परिसोनि यागकीर्ती ॥ आम्ही आलों गा ब्रह्ममूर्ती ॥ तंव वदला तो चक्रवर्ती ॥ सफळ जन्म माझा कीं ॥५७॥
पुनरपि वदे बळिराजा ॥ कवण माता पिता द्विजा ॥ येरू म्हणे सहजा ॥ तो प्रकार कळेल सर्वद्दी ॥५८॥
मग वामन पाहे यागस्थिती ॥ देखोनि वदता जाहला वेदनीती ॥ मग म्हणे गा बळी चक्रवर्ती ॥ हा नव्हेचि यागविधी ॥५९॥
विपरीत स्थापिले त्रय अग्न ॥ अपसव्य केलें ग्रहपूजन ॥ वेदबीजें हें विघ्न ॥ सुचविलें यागासी ॥६०॥
ऐसें नव्हे गा हें यज्ञकरण ॥ तदनुसार वदतसे वेदवचन ॥ तंव बळी म्हणे हा विचक्षण ॥ देखिला वामन म्यां ॥६१॥
वामन म्हणे गा बळी ॥ त्वां उद्धरिली हो वंशावळी ॥ अमृत घातलें तुवां मूळीं ॥ यागपुण्याचे ॥६२॥
विरोचन जो तुझा पिता ॥ तो आमुचा परममित्र होता ॥ म्हणोनि जाणावया तुझी दातृता ॥ आलों असें या ठाया ॥६३॥
येरें त्रिपाद भूमि मागीतली ॥ ती बळीनें तत्काळ दिधली ॥ तेणें संकल्पासी करीं घेतली ॥ उदकझारी सत्वर ॥६४॥
तंव बोलिला शुक्र विचारीं ॥ गा द्विज नसे हा दैत्यारी ॥ तुझ्या पूर्वजा केली महामारी ॥ नरसिंहरूपें येणेंचि ॥६५॥
बळी म्हणे गा माझें वचन ॥ जैसें क्षीराब्धीचें प्रमाण ॥ यज्ञकाळीं मागता नारायण ॥ हें थोर भाग्य मज वाटे ॥६६॥
बळीचा जाणोनि संकल्प ॥ म्हणे हा तरी न करी विकल्प ॥ मग शुक्रें धरूनि सूक्ष्म रूप ॥ प्रवेश केला झारीमाजी ॥६७॥
मग झारीचें मुख निरोधून ॥ दानाआड आला भृगुनंदन ॥ तेणें आकर्षिलें जीवन ॥ संकल्पाचें तेधवां ॥६८॥
मग दर्भ घातला छिद्रसुलक्षीं ॥ तो भेदला शुक्राचे चक्षी ॥ तेणें जाहला हो एकाक्षी ॥ भृगुनंदन शुक्र तो ॥६९॥
गण म्हणती हो द्विजा ॥ ऐसें झालें त्या भुगुआत्मजा ॥ अवज्ञा केली धर्मकाजा ॥ म्हणोनि जाहला एकनेत्री ॥७०॥
शिवशर्मा पुसे गणांसी ॥ एवढें सामर्थ्य काय जी यासी ॥ नाम जाहालें शुक्र ऐसें यासी ॥ कोण्या कारणें निरूपिजे ॥७१॥
युद्धीं उठवितो महाअसुर ॥ ऐसा यासी कवणाचा वर ॥ हा सर्व असुरांचा गुरु थोर ॥ तो कैसा निरूपा मज ॥७२॥
गण म्हणती गा द्विजमूर्ती ॥ तारकासुर उद्भवला क्षितीं ॥ तेणें घ्यावया अमरावती ॥ मेळविलें दैत्यकुळ ॥७३॥
तारकासुर अधिपती ॥ दैत्यकुळें शरण येती ॥ कोटयनुकोटी मेळे मिळती ॥ भुवनींचे संपूर्ण ॥७४॥
महाबाहु कटिस्कंध ॥ करटासुर आणि प्रमद ॥ चतुर्मुखारी आणि मेघनाद ॥ आले दैत्यभार समुदायेंसीं ॥७५॥
सप्तलोचन आणि विरूपाक्ष ॥ गजोदर जघनाक्ष ॥ मग तारकासुर एकाक्ष ॥ केला दळाधिपती ॥७६॥
मग घ्यावया अमरावती ॥ तारकासुर निघाला भृगूंच्या मतीं ॥ मेरूच्या पाठारीं समस्ती ॥ केले मेळिकार असुरांचे ॥७७॥
तंव नारद गेला अमरावतीसी ॥ तेणें जाणविलें इंद्रासी ॥ म्हणे आला गा सकळ सैन्येंसी ॥ तारकासुर तो ॥७८॥
मग काय करी वज्रपाणी ॥ भार सन्निध केले देवगणीं ॥ हरि महेश विरिंचीवांचूनी ॥ इतर समस्त मिळाले ॥७९॥
तेथें देवदैत्यांचें तुंबळ ॥ युद्ध जाहालें महाप्रबळ ॥ प्रवर्तला थोर कोलाहल ॥ सुरांअसुरांसी ॥८०॥
जाहालीं धड मुंडे शतचूर्ण ॥ बहुत आटलें उभय सैन्य ॥ ऐसे झुंजले देव-दैत्यगण ॥ महाशक्तिबळें संग्रामीं ॥८१॥
जो जो रणीं पडे असुर ॥ तो तो उठवी दैत्यगुरु सत्वर ॥ परम त्रासिला तो वज्रधर ॥ तारकासुरें संग्रामीं ॥८२॥
मग कैलासा पळाला सुरपती ॥ सर्व वृत्तांत कथिला पशुपती ॥ तारकासुरें घेतली अमरावती ॥ भद्रासनीं बैसला तो ॥८३॥
रणीं पडल्या असुरांतें ॥ तैं तैं उठविलें भृगुसुतें ॥ तें परिसोनियां शंकरातें ॥ उद्भवला कोप अंतरीं ॥८४॥
मग पाहिलें दक्षिणभुजेसी ॥ तंव देखिलें शैलादिगणांसी ॥ म्हणे तुम्हीं जावें अमरभुवनासी ॥ शुक्रालागीं धरावया ॥८५॥
तंव निघाला शैंलादिगण ॥ त्रिनेत्र जैसा पंचानन ॥ तेथें येतां देखिला दुरून ॥ दैत्यअसुरीं सर्वांनीं ॥८६॥
देखोनि शैलादिगणासी ॥ मौन पडिलें दैत्यांसी ॥ करीं धरोनियां शुक्रासी ॥ नेता झाला शिवगण ॥८७॥
पक्व फळाचिया परी ॥ शैलादीनें नेला शिखरीं ॥ नेऊनियां शंकराचे करीं ॥ अर्पिला तेणें ॥८८॥
शिवें परमक्रोधेंकरूनी ॥ शुक्र घातला वदनीं ॥ दशन न लागतां ते क्षणीं ॥ गिळिला तो ॥८९॥
ऐसा तो सहस्त्र वर्षेंवरी ॥ भृगुसुत होता शिवाचे उदरीं ॥ मग कोणे एके अवसरीं ॥ शिव झाला घ्यानस्थ ॥९०॥
ध्यानीं देखिली दाक्षायणी ॥ तेणें वीय द्रवला शूलपाणी ॥ मग पाहे ध्यान विसर्जुनी ॥ तंव तेणें निज शुक्र देखिलें ॥९१॥
शिवासी झाला वीर्यद्रव ॥ त्यासवें पडिला भार्गव ॥ देखता झाला सदाशिव ॥ त्या भृगुआत्मजासी ॥९२॥
मग कृपा उपजली शिवासी ॥ म्हणे माग रे प्रसन्न मी तुजसी ॥ सहस्त्र वरुषें तपासी ॥ होतासी उदरीं माझिया ॥९३॥
तुज दिधला रे पूर्ण वर ॥ तूं होसील असुरगुरु साचार ॥ माझें वीर्य अजरामर ॥ युगानुयुगीं ॥९४॥
तूं माझे शुक्रीं पडिलासी ॥ तरी हेंचि नाम तुजसी ॥ आतां तूं जाईं वाराणशीसी ॥ भृगुनंदना गुणनिधी ॥९५॥
ऐसा वर झाला भृगुनंदना ॥ मग तो आला आनंदवना ॥ तेणें स्थापिलें पंचानना ॥ शुक्रेश्वरलिंग ते ठायीं ॥९६॥
तेथें प्रकट झाला शंकर ॥ शुक्रासी दिधला पूर्ण वर ॥ मग संजीवनीमंत्र तो हर ॥ देता झाला शुक्रासी ॥९७॥
शिव म्हणे त्या शुक्रासी ॥ जे पूर्णभावें पूजिती शुक्रेश्वरासी ॥ पुजा तयांचे वंशीं ॥ होनी अमित नेमेंसीं ॥९८॥
कन्या न देखती स्वन्पीं ॥ ऐसा प्रसन्न झाला शूळपाणी ॥ तूं वंद्य होशील रे एकनयनी ॥ दैत्यअसुरांस ॥९९॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसा वर झाला शुक्रासी ॥ मग स्थापिला या लोकासी ॥ विश्वनाथें संतोषें ॥१००॥
विमान जातसे नभमंडळा ॥ तंव पुढें देखिल्या नक्षत्रमाळा ॥ महादीप्ति दिव्यतेजाळा ॥ लावण्यसुंदर ॥१०१॥
दिव्यांबरा मदोन्मत्ता ॥ दिव्यभूषणी यौवनगर्विता ॥ तयां शास्त्रज्ञता संपूर्णता ॥ अति सुलक्षणीं जाण पां ॥१०२॥
पुरुषाऐसी नामधारणा ॥ महापतिव्रता देवांगना ॥ विस्मय होत ब्राह्मणा ॥ शिवशर्म्यासी ॥१०३॥
शिवशर्मा पुसे विष्णुदूतां ॥ हा कवण लोक जी कृपावंता ॥ कैसी या लोकींची महिमता ॥ ते सांगा जी गणोत्तमा ॥१०४॥
गण म्हणती हो द्विजमूर्ती ॥ परियेसीं या लोकींची मूळ उत्पत्ती ॥ श्रवणपठणें होय शांती ॥ महापातकांची ॥१०५॥
परियेसीं याचा मूळ वृत्तांत ॥ विरिंचिदेवाचा प्रिय सुत ॥ जो महाज्ञानी परम विख्यात ॥ दक्षराजा ॥१०६॥
स्वयंभूनामें महामुनी ॥ त्यासी कन्या झाल्या तिधीजणी ॥ तरी त्या नामें कवणकवणी ॥ परियेसी तूं ॥१०७॥
त्यांमाजीं एक शुभलोचना ॥ रम्यशीला सुलक्षणा ॥ ते दिधली धृताश्व ब्राह्मणा ॥ प्रसवली ते यज्ञदत्तातें ॥१०८॥
त्या यज्ञदत्ताची कांता ॥ दीक्षितायणीं नामें महिता ॥ अति सौंदर्यवती पतिव्रता ॥ जननी होय कुबेराची ॥१०९॥
दुसरी अनसूया कामिनी ॥ ती अत्रिदेवाची कुटुंबिनी ॥ ते बोलली पतिव्रता जनीं ॥ दत्तात्रेय आणि चंद्राची जननीं पैं ॥११०॥
तिसरीं नामें प्रसूता ॥ ते दिधली सृष्टिकरसुता ॥ जो दक्षनामें महादाता ॥ यज्ञसिंधु विख्यात जो ॥१११॥
ते प्रसूता दक्षकांता ॥ साठ प्रसवली दुहिता ॥ त्या आलिया समस्ता ॥ आनंदवनीं स्वइच्छें ॥११२॥
काशीसी जाऊनि दक्षनंदिनी ॥ भावें पूजिला शूलपाणी ॥ मग बैसल्या अनुष्ठानीं ॥ मणिकर्णिकेचे ॥ तटाकीं ॥११३॥
काशीतें न विसंबती क्षणभर ॥ जैं काशीतें न सोडी शंकर ॥ जैसी न प्रहरी तो तरुवर ॥ छाया आपुली सर्वथा ॥११४॥
जैसा स्वर्गभुवनावांचूनी ॥ कल्पद्रुम नाहीं आणिक भुवनीं ॥ तैसी अविमुक्तीविण आणिक स्थानीं ॥ नाहीं मुक्ति सर्वथा ॥११५॥
आणिक तीर्थांची गती ॥ जैशी त्या मुक्ताविणें शुक्ती ॥ म्हणोनि पंचक्रोशीची स्थिती ॥ कोटिगुणें विशेष ते ॥११६॥
म्हणोनि त्या दक्षकुमारी ॥ तपीं बैसल्या सुकुमारी ॥ त्यांनीं आपुल्या युक्तिविचारीं ॥ केल्या लिंगस्थापना ॥११७॥
ऐशा ज्या कुमरी द्क्षबाळा ॥ त्यांमध्यें ज्या नक्षत्रमाळा ॥ त्या स्थापित्या जाहल्या अबळा ॥ नक्षत्रेश्वरलिंग ॥११८॥
ऐशा त्या दक्षबाळा साठी ॥ त्यांमाजीं दोन महाश्रेष्ठी ॥ जयांचें लावण्य लक्षकोटी ॥ त्या अदिती आणि दाक्षायणी ॥११९॥
दाक्षायणीनें स्थापिला दाक्षायणीश्वर ॥ अदितीनें स्थापिला अदितीश्वर ॥ ऐशा पूजिती त्रिशूळधर ॥ आपुलाले भावेंकरूनी ॥१२०॥
ऐशा त्या दक्षनंदिनी ॥ बैसल्या तेथें अनुष्ठानीं ॥ दर्भाग्नींचें शुद्ध पाणी ॥ नित्य सेविती आहार ॥१२१॥
जाहला तपाचा गिरिवर ॥ तेणें आभारला तो हर ॥ पांच लक्ष वरुषेंवरी शंकर ॥ आराधिला त्यांहीं त्रिकाळ ॥१२२॥
मग त्या लिंगीं नक्षत्रेश्वरीं ॥ प्रकटला तो स्मरारी ॥ मग महाआश्चर्य करी ॥ देखोनि तप तयांचें ॥१२३॥
हर म्हणे स्त्रिया होऊनी ॥ ऐसें तप देखिलें नसे त्रिभुवनीं ॥ तुम्हीं पुरुषार्थ केला कामिनी ॥ अतिशयेंसीं तपांच्या ॥१२४॥
आर्त पुरवीन मनाची ॥ तुम्हांसी नामें होतील पुरुषांचीं ॥ ऐसी वाणी शंकराची ॥ परिसती सुंदरी सादर ॥१२५॥
मृगांकमौली वदे हो कामिनी ॥ तुम्हांसी प्रसन्न मी शूलपाणी ॥ आतां वर मागा जो तुमच्या मनीं ॥ अत्यंत प्रिय असेल तो ॥१२६॥
तयामाजीं ज्या श्रेष्ठ दोनी ॥ अदिती आणि दाक्षायणी ॥ त्या वदत्या झाल्या कामिनी ॥ शंकराप्रती ॥१२७॥
म्हणती शिवासी दक्षकन्यका ॥ आम्ही समस्त असों कुमरिका ॥ तूं तंव काशीनिवासका ॥ दीजे वर इच्छित जो ॥१२८॥
म्हणोनि आल्या लोटांगणीं ॥ मस्तक ठेविती शिवचरणीं ॥ मग स्तविती शूलपाणी ॥ साठीजणी बाळा त्या ॥१२९॥
सुवर्णकमळांचिया अंजळी ॥ अर्पिती शिवाचे मौळी ॥ नानाशद्बरत्नीं दक्षबाळी ॥ पूजिती शिवातें प्रीतीनें ॥१३०॥
जयजयाजी धूर्जटी ॥ आम्ही सकळजणी पतिभ्रष्टी ॥ जे तुम्हांवांचूनिया सृष्टीं ॥ कवण पुरवी इच्छा ॥१३१॥
ऐसा जाणोनि त्यांचा भाव ॥ हर्षें निर्भर महादेव ॥ मग फेडावया त्यांचा संदेह ॥ बोलता जाहला शंकर ॥१३२॥
मग अति उदार बोले शंकर ॥ म्हणे दक्ष तुमचा जो पितर ॥ तो करील तुमचें स्वयंवर ॥ तेव्हां इच्छावर पावाल ॥१३३॥
तुम्हीं केली लिंगस्थापना ॥ जे पूजिती त्या पंचानना ॥ ते पावती निजभुवना ॥ तुमचिया ॥१३४॥
आणिक त्यांसी म्हणे चंद्रमौळी ॥ मी असेन या लिंगाजवळी ॥ आतां तुम्हीं जावें सकळीं ॥ पितृसदनी आपुलिया ॥१३५॥
मग त्या शिवाआज्ञा स्वीकारूनी ॥ समस्त कामिनी दाक्षायणी ॥ आल्या असती पितृभुवनीं ॥ साठीजणी बाळा ॥१३६॥
मग त्यांसी भेटेले द्क्ष प्रसूता ॥ त्या म्हणती तुम्ही धन्य आमुचे मातापिता ॥ जे तपांतीं आम्हांसी वरदाता ॥ भेटता झाला शंकर ॥१३७॥
आम्हांसी प्रसन्न झाला हर ॥ समस्तांसी दिधला नाभीकार ॥ म्हणे सत्वर पावाल इच्छावर ॥ सकळही तुम्ही ॥१३८॥
मग ऐसिया वृत्तांता ॥ दक्षरायासी सांगे प्रसूता ॥ म्हणे स्वयंवर मांडूं आतां ॥ कन्या झाल्या उपवर ॥१३९॥
मग जें अवंतीनामें नगर ॥ जेथें क्षिप्रागंगा मनोहर ॥ तेथें मांडिलें स्वयंवर ॥ त्या दक्षरायें ॥१४०॥
आनंद वर्तला दक्षाचे सदनीं ॥ बैसला तो भद्रासनीं ॥ दधीचि मार्कंडेयादि महामुनी ॥ पाचारिले स्वयंवरा ॥१४१॥
पिता पाचारिला विधी ॥ पाचारिले साही बंधु आधीं ॥ ते वेगें आले सदबुद्धी ॥ लग्नसिद्धीकारणें ॥१४२॥
त्यांमाजीं मरीचिनामें श्रेष्ठ ॥ आणि दुसरा नामें वसिष्ठ ॥ अत्रि आणि क्रतुनामें सुभट ॥ पुलस्त्य आणि अंगिरा ॥१४३॥
ऐसे निळोनियां समस्त ॥ सर्वीं केलें जी एकमत ॥ मग स्वयंवर मांडिलें त्वरित ॥ त्या द्क्षरायें ॥१४४॥
मग त्या क्षिप्रागंगेचे तीरीं ॥ मंडप घातला बरवेपरी ॥ तो बेष्टिला नाना दिव्यांबरीं ॥ शतएक योजनें ॥१४५॥
मूळें पाठविलीं दाही दिशा ॥ प्रथम कैलासीं त्या महेशा ॥ त्यागूनि सर्व कारणव्यवसा ॥ यावें स्वयंवराकारणें ॥१४६॥
मग तो वृषभ पालाणूनी ॥ स्वयंवरा आला शूळपाणी ॥ तेणें वरिली दाक्षायणी ॥ सत्य जाण सर्वथा ॥१४७॥
मरीचि मुनीचा जो सुत ॥ कश्यपनामें विख्यात ॥ तो आला जी महामहंत ॥ स्वयंवरासी तेधवां ॥१४८॥
अत्रि ऋषीचा जो कुमर ॥ तो आला शीतकर ॥ तोचि जाणावा पूर्ण वर ॥ सत्तावीस कुमारींचा ॥१४९॥
दक्षिणाधीश आणि पवन ॥ नैऋत्य आणि कृशान ॥ कर्दम ऋषीचा नंदन ॥ वरुण आला स्वयंवरासी ॥१५०॥
श्रोत्यांची एक असे हो पृच्छायुक्ती ॥ स्त्रियेविरहित कैंची पुत्रसंतती ॥ जंव कश्यपें परिणिली नाहीं अदिती ॥ तंव आदित्य कैंचा उद्भवे ॥१५१॥
तरी वेदांचें असे प्रमाण ॥ जे भूत भविष्य वर्तमान ॥ तें अतीत अनागत संपूर्ण ॥ कथिती पुराणें साक्षेपें ॥१५२॥
हे वेदांची वाणी जाणा सर्वही ॥ म्हणोनि संशय न धरावा कांहीं ॥ तो कर्ता करविता सर्वही ॥ कथूनि गेला पूर्वींच ॥१५३॥
मग त्या दक्षाचिया बाळा ॥ करीं घेऊति सुमनमाळा ॥ कंठीं सूत्र घालिती त्या अबला ॥ कवणाकवणासी पहा हो ॥१५४॥
त्या दक्षबाळा अतिसुंदरा ॥ त्यांसी उपमे देऊं जरी अप्सरा ॥ तरी त्या अमंगळ व्यभिचारा ॥ असती जाणा सर्वही ॥१५५॥
महापतिव्रता त्या सुंदरी ॥ जेवीं क्षीरार्णवाच्या लहरी ॥ जयांसी प्रसन्न त्रिपुरारी ॥ तयांचें सामर्थ अपार ॥१५६॥
त्या महालावण्यरूपकळा ॥ शृंगोंर आथिल्या मंगळा ॥ चंद्रवदना त्या अबला ॥ महाअलोलिका ॥१५७॥
केलें महातपसाधना ॥ तेणें प्रसन्न केलें पंचानना ॥ तंव आलासे कैलासराणा ॥ वृषभवाहन सत्वर ॥१५८॥
हेमकमळांचें जें सूत्र ॥ तें करीं घेऊनि महापवित्र ॥ न्याहाळीतसे पंचवक्त्र ॥ दाक्षायणी ती ॥१५९॥
तंव देखिला शूलपाणी ॥ जटाजूट फणीभूषणी ॥ देखतांचि दाक्षायणी ॥ सत्वर जाहाली पुढारी ॥१६०॥
तिनें सूत्र घातले कंठीं ॥ तत्काळ वरिला तो धूर्जटी ॥ आणिक या ब्रह्मांडपुटी ॥ न साजे वर तियेसी ॥१६१॥
परात्पर शिव ते महाशक्ती ॥ उभयतांसी नव्हे भिन्न युक्ती ॥ कल्पानुकल्प पशुपती ॥ स्वामी तियेचा अक्षयी ॥१६२॥
तरी हें नव्हे स्वयंवरींचें मत ॥ हें जाणावें गा पूर्वार्जित ॥ या उभयतांसी नव्हे भिन्नत्व ॥ महदादिकां लय होतांही ॥१६३॥
मंडपीं बैसले दिक्पती ॥ ऋषि विप्र महाभूपती ॥ तयांमाजी ते अदिती ॥ पाहातसे कश्यपातें ॥१६४॥
जो संकल्प अर्दितीचे मनीं ॥ तोचि धरूनि आणिक द्वादशजणी ॥ हमेसूत्रें करीं घेऊनी ॥ उभ्या अदितीमागेंचि ॥१६५॥
तरी त्या सुंदरा त्रयोदशजणी ॥ श्रीते परिसा जी श्रवणीं ॥ त्या नामें कवणकवणी ॥ सांगों आतां ॥१६६॥
प्रथम अदिती महापतिव्रता ॥ तेहतीस कोटी देवजननी तत्त्वतां ॥ दुसरी ते असुरांची माता ॥ दितीनामें प्रसिद्ध ॥१६७॥
सेवका आणि ब्रह्मायणी ॥ पांचवी कद्रु शेषजननी ॥ विनता आणि षडाननी ॥ सातवी ते जाणावी ॥१६८॥
कुंडलिका सुपर्णा प्रभावती ॥ कालिंदी मत्स्येंद्री कनकज्योती ॥ तेरावी ते अभेदिका युवती ॥ ह्या त्रयोदश कश्यपभार्या ॥१६९॥
त्यांहीं वरिला तो मरीचि सुत ॥ कश्यपनामें सृष्टि कल्पीत ॥ त्यांसी दिधला हो कांत ॥ शंकरें हाचि पैं ॥१७०॥
कृती विकृती संभूती ॥ गुणक्षमा आणि गुणवती ॥ सर्वेशा आणि स्मृती ॥ शुभानना ते ॥१७१॥
अच्युतिनामें चंद्रकला जैसी ॥ तुळितां न शकती तिच्या रूपासी ॥ दहावी ते धर्मराशी ॥ महास्वरूपलावण्य ॥१७२॥
ऐशा त्या दक्षकन्यका ॥ त्यांचा एकचि संकल्प ऐका ॥ तिंहीं वरिलें जी पुण्यश्लोका ॥ धर्मराजयासी ॥१७३॥
कुमुदिका आणि तेजा जल्पू ॥ या दोघींचा एक संकल्पू ॥ त्यांहीं वरिला तो मायाधिपू ॥ नैऋतराज तो ॥१७४॥
तेजरूपा आणि तेजाकृता ॥ यांहीं वरिलें हव्यहुता ॥ महालावण्य दशदुहिता ॥ अग्निप्रिया बोलिजे ॥१७५॥
वृषिका आणि दामोदरी ॥ परदोषदहनी तिसरी ॥ यांहीं वरिला तो झडकरी ॥ कर्दमसुत वरुण ॥१७६॥
पावनीनामें महासुंदरा ॥ तिनें सूत्र घातलें समीरा ॥ मग संज्ञेनें वरिलें भास्करा ॥ मार्तंडासी पाहें पां ॥१७७॥
मग उरल्या सत्तावीसजणी ॥ महासुंदरा अश्चिनी आदिकरूनी ॥ त्यांमाजीं कृत्तिका आणि रोहिणी ॥ या दोघी श्रेष्ठ पैं ॥१७८॥
त्यांहीं वरिला रजनीपती ॥ जो वर दिधला पशुपती ॥ ऐशा साठ कन्या प्रजापतिसती ॥ प्रसवली प्रसूता ते ॥१७९॥
गण म्हणती द्विजबाळा ॥ त्या सत्तावीस नक्षत्रमाळा ॥ प्रसन्न करूनि जाश्वनीळा ॥ पावल्या त्या हा लोक ॥१८०॥
मग विमान शीघ्रगती चालिलें ॥ तंव पुढें भौमलोका देखिलें ॥ तें विष्णुदूती कथिलें ॥ शिवशर्म्यासी ॥१८१॥
देखिला अग्नीचा कल्लोळ ॥ महाउग्र तें ग्रहमंडळ ॥ तो वसुमतीचा बाळ ॥ जन्मला भौमदिनीं ॥१८२॥
हयग्रीवें पीडिली वसुमती ॥ तैं क्रोधावला पशुपती ॥ तृतीय नेत्रींहूनि पडिली दीप्ती ॥ तेजकल्लोळाची ॥१८३॥
तो गर्भ राहिला अवनीपोटीं ॥ तो मंगळ जन्मला हुताशआगिठी ॥ महाअंगाररूप द्दष्टी ॥ तो हा धरासुत म्हणती ॥१८४॥
मंगळासी प्रसवली पृथ्वी ॥ तैं होती ऊर्जकृष्णचतुर्थी तिथी ॥ तें व्रत कीजे महास्वार्थी ॥ अंगारिकाचतुर्थीचें ॥१८५॥
तो मंगळ आला वाराणसीं ॥ स्नान सारिलें मणिकर्णिकेसी ॥ अभिवंदन करूनि शिवासी ॥ तेथें स्थापिलें लिंग मंगळेश्वर ॥१८६॥
पांच सहस्त्र संवत्सर ॥ मंगळें तप केलें निराहार ॥ मग प्रसन्न झाला शंकर ॥ स्थापिला जाण या लोकीं ॥१८७॥
लोपामुद्रेसी सांगे कुंभज ॥ विमानीं नेतां तो द्विज ॥ विष्णुदूत तेजःपुंज ॥ कथा सांगती आदरें ॥१८८॥
पराशरापासाव निश्चिती ॥ जन्मला तो व्यास वेदमूर्ती ॥ तो कथिता झाला महामती ॥ अष्टादश पुराणें ॥१८९॥
वैशंपायन पुसे तयासी ॥ पुढारी कथा असे कैसी ॥ ते सांगावी आम्हांसी ॥ कृपाळुवें ॥१९०॥
फलश्रुती सांगों आतां ॥ तरी अनुपम न ये सांगतां ॥ सत्यचि न पुरे लिहों जातां ॥ भूमंडळीं सहसाही ॥१९१॥
श्रोतीं ऐकिजे अहर्निशीं ॥ पुढारी कथा अमृताऐसी ॥ तरी ते प्राकृतवाणीसीं ॥ ऐकवितो सादर ॥१९२॥
शिवदास गोमा हरिखें ॥ श्रोतयांसी सांगे कौतुकें ॥ कांहीं देखाल अनृतासारिखें ॥ तरी क्षमा करावी ॥१९३॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे नक्षत्रादिलोकवर्णनं नामाष्टादशाध्यायः ॥१८॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु  ॥

॥ इति अष्टादशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP