काशीखंड - अध्याय ५० वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ षण्मुख म्हणे गा अगस्तिमुनी ॥ त्या दक्षिणदेशीं काम्यकवनीं ॥ महाक्षेत्र असे पुण्यजीवनी ॥ गोदावरी पापनाशिनी ते ॥१॥
त्या गोदावरीच्या उत्तरपारीं ॥ प्रतिष्ठान असे पुण्यपुरी ॥ तेथें लिंगस्थापना बरवियापरी ॥ पिप्पलेश्वर तो ॥२॥
दधीचिऋषीचा कुम्रर ॥ पिप्पलादनामें महामुनिवर ॥ तेणें गोदावरीतीरीं स्थापिला हर ॥ त्या नांव पिप्पलेश्वर ॥३॥
ऐसें तें गोदेचें उत्तरतीर ॥ तेथें प्रतिष्ठान पुण्यपुर ॥ त्या नगरीचा मुळियां द्विजवर ॥ ग्रामलेखक दत्तोग्रासनामें ॥४॥
तो सर्व पुरीचा प्रतिग्रही ॥ आपणचि अंगीकारी सर्वही ॥ आणिकां ब्राह्मणांसी नेदी कांहीं ॥ दानमात्र तो ॥५॥
ऐसा त्या ग्राममुळियानें दानें घेतां ॥ काळ क्रमिला प्रतिष्ठानीं असतां ॥ तो महाब्रह्मद्वेषी होता ॥ काण्व ब्राह्मण ॥६॥
गोदेचे तीरीं ज्या ज्या क्रिया अपार ॥ त्यांत महादानाचा करी अंगीकार ॥ अधर्माचे प्रतिग्रह अपार ॥ आपणचि संग्रही ॥७॥
भले जे षट्कर्मी ब्राह्मण ॥ त्याचे गृहीं न स्वीकारिती अन्न ॥ एक जे ब्राह्मण अनाथ दीन ॥ त्यांसी कांहींचि नेदी ॥८॥
ऐसा दत्तोग्रास उदर भरी ॥ त्या गोदावरीच्या तीरीं ॥ तो ब्राह्मण अधर्मी दुराचारी ॥ वर्जिलासे सत्पात्रीं ॥९॥
ऐसा तो दत्तोग्रास ग्रामलेखक ॥ आणि ग्राममुळिया प्रतिग्रही तो एक ॥ नगरामध्यें उपदेशी लोक ॥ दान द्यावयाकारणें ॥१०॥
दीर्घदान चर्मक चांडाळाचें ॥ अंगीकारी जुगारी अंत्यजजातीचें ॥ चोरी चप्पी आणि पसारियांचें ॥ उपदेशोनि मागे ॥११॥
प्रातःकाळीं नगरीं करी भ्रमण ॥ तो न करीचि संध्यास्नान ॥ आंगोळीनें करी दंतधावन ॥ अमंगळ ऐसा पैं ॥१२॥
आपहस्तें सोंवळें करी ॥ रजकाचे घरीं प्रक्षाळिलें वस्त्र अंगीकारी ॥ नित्य मंडळीविण भोजन करी ॥ दुष्टबुद्धी तो ॥१३॥
दीन अनाथ ब्राह्मणांसी वंची ॥ दुष्ट दानें घे बहुत आपणचि ॥ स्वल्प देखे तरी म्हणे तुमचीं ॥ न घेईं मी दानें ॥१४॥
बहुत द्रव्यदान देखे दुष्टाचें ॥ त्यासी म्हणे हें निर्दोष तुमचें ॥ ऐसा तो अमंगळ आपुल्या कुळधर्माचें ॥ नेणे आचरण ॥१५॥
त्या नगरीं एक ब्राह्मण नित्याचारी ॥ महास्वधर्मी वर्ते कुलाचारी ॥ तो सहस्त्रभोजन केलियाविण दिवस घरीं ॥ जाऊं नेदी व्यर्थ ॥१६॥
मुळिया जाय त्याचिया गृहासी ॥ दानद्रव्य मागे आपणासी ॥ परी स्वहस्तें नित्याचार्यासी ॥ दान करूं नेदी ॥१७॥
मग तो द्र्व्य घेऊनि आपणापाशीं ॥ बहुत आणी आपुल्या गृहासी ॥ मग स्वल्प विभाग नेदी ब्राह्मणांसी ॥ तो कैशियापरी ॥१८॥
तुळापुरुषाचा जो सुवर्णभार ॥ जो ब्राह्मण पावे शतभर ॥ त्यासी देतसे जव मात्र येर ॥ आपणचि राखे सर्व ॥१९॥
जो ब्राह्मण पावे पंच गोदान ॥ त्यासी पहुडवी वस्त्रचि देऊन ॥ स्वयंपाक करी घृतें परिपूर्ण ॥ तो आपणचि भक्षी ॥२०॥
येरां समर्पी स्वल्प किंचित ॥ ते आशाबद्ध उठवी अतृप्त ॥ ऐसा वर्तत जन्मपर्यंत ॥ आळसचि नसे ॥२१॥
म्हणोनि दान तें स्वहसतें कीजे ॥ आणि सत्पात्र असे तें पूजिजे ॥ त्यासी किंचित देतां पाविजे ॥ लक्षपुण्यासी ॥२२॥
ग्राममुळियासी न दीजे दान ॥ मुळियानें होइजे महादूषण ॥ तो दाता अधःपाता जाय दारुण ॥ चंद्रार्कवरी पैं ॥२३॥
स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ म्हणोनि सत्पात्र पाहिजे दानीं ॥ जैसें दग्ध बीज रोपितां मेदिनीं ॥ न करीचि विस्तार ॥२४॥
ऐशीं मुळियाहातीं केलीं दानें ॥ तीं बाधलीं नित्याचार्याकारणें ॥ स्वामी म्हणे एकाग्रमनें ॥ परियेसीं गा अगस्ती ॥२५॥
अन्य ज्ञातीचा प्रतिग्रहं घेत ॥ तें अंगिकारिलें जन्मपर्यंत ॥ परी त्या आणिका सत्पात्रीं किंचित ॥ नेदी दशांशमात्र ॥२६॥
तो ऐसा दोषिया जाणोनि द्विज ॥ तंव यमाविपती सूर्यात्मज ॥ दूतां आज्ञा करी धर्मराज ॥ दोषी आणावया ॥२७॥
अरे काम्यकवनीं गोदेचे तीरीं ॥ प्रतिष्ठाननामें पुण्यनगरी ॥ तेथें असे तो दुराचारी ॥ ग्राममुळिया द्त्तोग्रास तो ॥२८॥
तयासी देहान्त जाहालिया पूर्ण ॥ आलें असे मृत्य़ूचें अवसान ॥ त्यासी दुस्तर नरक भोगवा रे संपूर्ण ॥ तीस सहस्त्र वरुषें पैं ॥२९॥
ऐसी धर्माची आज्ञा घेऊनी ॥ दूत धांविन्नले मृत्युभुवनीं ॥ सांगातें राक्षस घेऊनी ॥ आले गोदातीरीं ॥३०॥
मग ते प्रतिष्ठानपुरीं ॥ संचार केला यमकिंकरी ॥ ते समयीं असंभाव्य व्यापिला ज्वरीं ॥ दत्तोग्रास तो ॥३१॥
दत्तोग्रास नासावया ज्वरव्याधी ॥ द्रव्य असोनि व घे औषधी ॥ त्यासी आली जंव पूर्ण अवधी ॥ तंव पाश टाकिले यमदूतीं ॥३२॥
तंव अगस्ति वदे जी कृपावंता ॥ तूं महाज्ञानिया शिवसुता ॥ यमकिंकरी त्या दत्तोजिता ॥ टाकिला पाश ॥३३॥
तरी तो दत्तोग्रासाचा जीवात्मा ॥ तो कैसा सांपडला यमा ॥ तें मज निरूपा जी पूर्ण क्षमा ॥ करोनियां स्वामी ॥३४॥
स्वामी म्हणे पृच्छेचिया वरा ॥ आत्माज्ञानिया महायोगीश्वरा ॥ तुज स्पर्धा कीजे त्या नदेश्वरा ॥ क्षीरार्णवाचिया ॥३५॥
तरी हेंही गा न्यून वचन ॥ तुवां समुद्राचें केलें आचमन ॥ तुझें अधिक गा धैर्य ज्ञान ॥ वसुमध्यें मेरु जैसा ॥३६॥
जो सर्वां घटीं व्यापक विश्वंभर ॥ तो परमात्मा ब्रह्मांडींचा राज्यधर ॥ तरी जीवात्मा तो त्याचा छायांकुर ॥ ह्रदयीं अष्टदळीं ॥३७॥
तो परमात्मयाचा सरिताओघ जैसा ॥ वर्ते शरीरत्रयीं मायावेवसा ॥ मनीं आसनीं बैसूनि दश दिशा ॥ क्रमीत कुबुद्धिसंगें ॥३८॥
जीव हा मानी ईश्वर ॥ मनासरिसा धांवतसे वेगवत्तर ॥ यास्तव नेणती विश्वंभर ॥ जीवात्मयासी पैं ॥३९॥
तो जरी परमात्म्यासी जाणता ॥ तरी यमगणांसी ना गवसता ॥ जैसें वस्त्रीं बांधिलें महाहुता ॥ केवीं पां राहावे ॥४०॥
जैसा तो उदयाचळींचा तरणी ॥ जनांसी न बाधी लक्षितां नयनीं ॥ तोचि ब्रन्ध लक्षितां माध्यान्हीं ॥ जनांसी संकट ॥४१॥
म्हणोनि जो रवि प्रातःकाळींचा ॥ तैसाचि जीवात्मा मनोवृत्तीचा ॥ परमात्मा तो जाणावा साचा ॥ माध्यान्हींचा सूर्य जैसा ॥४२॥
परियेसीं गा मित्रावरुणसुता ॥ तो ब्राह्मण आत्मज्ञानी नव्हता ॥ म्हणोनि सांपडला कृतांता ॥ वासनालिंगदेहें ॥४३॥
जीव तो हृदयीं अष्टदळस्थानीं ॥ परमात्माचि बिंबलासे दर्पणीं ॥ सर्व जंतां घटीं असे व्यापुनी ॥ अणुरेणुरूप त्याचें ॥४४॥
त्या अष्टदळांमध्यें पाहातां ॥ त्रय शरीरें असती गा महंता ॥ त्या देहत्रयाची अवस्था ॥ जागृती स्वन्पसुषुप्ती ॥४५॥
कारणदेह झालासे निद्रित ॥ लिंगदेह भ्रमे स्वन्पवत ॥ स्थूळदेहीं चेवला जागृत ॥ जीवात्मा हाचि पैं ॥४६॥
आतां असो हें आत्मज्ञान सर्वही ॥ दत्तोजित सांपडला लिंगदेहीं ॥ म्हणोनि बांधिती यम जैसे अही ॥ देखा दुराचारियासी ॥४७॥
मग ते राक्षसाऐसें शरीर ॥ कृष्णें जैसा दग्धिला गिरिवर ॥ तें महाविशाळ अमंगळ थोर ॥ प्राप्त केलें ब्राह्मणा ॥४८॥
वक्षःस्थळ जैशीं गिरिकूटें ॥ श्रवण घ्राणरध्रें जैशीं कपाटें ॥ सूक्ष्म अणुमात्र मुखवटें ॥ क्षुधा पर्वतासमान ॥४९॥
मनुष्यमुंडांचिया माळा बीभत्सा ॥ तें कंठीं भूषण राक्षसा ॥ शरीरीं प्रकटली दुर्दशा ॥ पाडिले कृमी अंगीं ॥५०॥
जैसें गिरिपाठारींचें दीर्घ तृण ॥ तैसे रोमांच दीर्घ कठिण ॥ मग ताडिते झाले यमगण ॥ त्या राक्षसासी ॥५१॥
मग ते तीस सहस्त्र संवत्सर ॥ रौरवीं घालिती यमकिंकर ॥ क्षुधासमयीं न देती आहार ॥ करिती पीडा थोर पैं ॥५२॥
अणुमात्र सूक्ष्म वदन ॥ देहीं क्षुधा तरी गिरिसमान ॥ भक्ष्य नाहीं जेथें सहस्त्र योजन ॥ तेथें नेदी यमकिंकर ॥५३॥
पर्यन्यकाळीं जीवनें पीडिती ॥ तीक्ष्ण उपलावरी सुषुप्ती ॥ शीतकाळीं नेऊनि बैसविती ॥ हिमाचळावरी ॥५४॥
उष्णकाळीं उष्णपीडा थोर ॥ ऐसें नानाविध अघोर ॥ त्राणें ताडितां यमकिंकर ॥ नव्हती कृपाळु ॥५५॥
महातीर्थाचा जो दोषी प्राणी ॥ तो न घालिती चौर्यायशीं योनीं ॥ कुंभीपाकीं घालिजे यमगणीं ॥ तीस सहस्त्र वर्षें पैं ॥५६॥
तो राक्षस होऊनियां पिसा ॥ यमदूत फिरविती दाही दिशा ॥ कुंभीपाकाचा जो वळसा ॥ निर्मिला महादोषियांसी ॥ ५७॥
कुंभीपाक सांगतां सविस्तर ॥ तरी द्वादश सहस्त्र अघोर ॥ कथेंसी विंलब होतसे थोर ॥ परी संकलित सांगतों ॥५८॥
इतुके दिवस तो दोषी प्राणी ॥ रौरव भोगविले यमगणीं ॥ मग आलिया दोषावसानीं ॥ करिती अव्हेर त्याचा ॥५९॥
दोषदंड जाहालिया यमकिंकर ॥ त्यांहीं अव्हेरिला तो निशाचर ॥ त्याचें भूत भविष्य जें होणार ॥ कर्ता समग्र जाणेल पैं ॥६०॥
मग तो क्षुधापीडेचेनि ज्वाळीं ॥ राक्षस भ्रमतसे भूमंडळीं ॥ जन्मभूमिकेसी ॥ प्रतिष्ठास्थळीं ॥ आला गोदातीरीं तो ॥६१॥
त्या प्रतिष्ठानीं महाप्राज्ञ ॥ नित्याचारी होता ब्राह्मण ॥ सहस्त्रभोजनाविरहित दिन ॥ न क्रमी कदा तो ॥६२॥
मग तो राक्षस गेला त्याचे गृहीं ॥ म्हणे तेथें भक्ष्य मिळेल कांहीं ॥ म्हणोनि संचरला देहीं ॥ नित्याचारियाचे ॥६३॥
गृहीं पूर्ण असतां हरिसुंदरी ॥ मग दुर्दशा प्रकटे शरीरीं ॥ ते समग्रही ऐश्वर्य हरी ॥ क्षणामाजी पैं ॥६४॥
जैसा क्षीरामृतें घट भरिला ॥ त्यामध्यें लवणाचा अंश पडिला ॥ मग तो जैसा विलया गेला ॥ क्षीरामृतरस ॥६५॥
जैसा नयनीं ओळंगे जलधर ॥ पृथ्वीजनां उपकार करावया थोर ॥ तेथें जैसा अकल्पित उद्भवे समीर ॥ तो विध्वंसी अभ्रपुटें ॥६६॥
कीं अरोग स्वस्थ असतां नर ॥ अकस्मात देहीं संचरे ज्वर ॥ तैसा संचरला निशाचर ॥ नित्याचारियाचे ह्रदयीं ॥६७॥
तो नित्य ब्राह्मण भोजन करी ॥ दोषी संचरला त्याचे शरीरीं ॥ मग विमुख जाहाली ते सुंदरी ॥ पद्मनाभाची पैं ॥६८॥
विपरीत बुद्धि प्रकटली देहीं ॥ ऐश्वर्य हरिलें सर्वही ॥ गृहीं शेष उरलें होतें कांहीं ॥ तें हारविलें द्यूतकर्मीं ॥६९॥
ऐसा तो द्यूतकर्मीं नित्य खेळतां ॥ ब्रह्मभोज्याची नेणे गंधवार्ता ॥ गृहीं होती सुलक्षण शुभ कांता ॥ तेही हारविली पैं ॥७०॥
हेंचि गा दुर्दशेचें कारण ॥ जयासी कुबुद्धीचें श्रवण पठण ॥ अधःपाता जावया अवसान ॥ हेंचि मूळ मुनी ॥७१॥
देहीं संचरला निशाचर ॥ सत्वर अव्हेरिला तो द्विजवर ॥ क्षुधाक्रांत होऊन तत्पर ॥ भ्रमे जनांचिये द्वारीं ॥७२॥
पाहातां अन्नसत्र जयाचे मंदिरीं ॥ तो क्षुधाक्रांत जनांचे द्वारीं ॥ मृदुल आस्तरणें मंचकावरी ॥ तो शेजे तृणाचिया ॥७३॥
म्हणोनि कुबुद्धीचा देहीं स्पर्श ॥ तो निर्धन जाणावा पुरुष ॥ कुबुद्धी सर्वथा करी नाश ॥ ऐश्वर्यासी सर्वदा ॥७४॥
कुबुद्धीचा सखा तो अभिमान ॥ कुबुद्धीचा पदार्थ इच्छा न्यून ॥ कुबुद्धीस्तव तो विधिवाहन ॥ इच्छी कूपोदक ॥७५॥
ऐसा तो कुबुद्धि निशाचर ॥ तेणें अपमानिला तो द्विजवर ॥ मग तो होऊनियां किंकर ॥ खिल्लारें रक्षी जनांचीं ॥७६॥
ऐसा तो नित्याचरी नित्य नेमानें ॥ संकल्पी होता नाना दोनें ॥ पहा हो कैसीं कुबुद्धीचीं लक्षणें ॥ तो भृत्य जाहाला जनांचा ॥७७॥
ऐसा तो भ्रष्टला द्विजवर ॥ तेणें प्रहारिला आपुला कुलाचार ॥ देहीं संचरला तो निशाचर ॥ प्रतिष्ठान पुण्यपुरीं ॥७८॥
तेथें कोणी एक वणीजवर ॥ तो दीर्घ लक्ष्मीचा पडिभार ॥ त्याचे घरीं राहिला तो द्विजवर ॥ वृषभ रक्षीत तयाचें ॥७९॥
त्या वणिजवरें कोणे एके काळीं ॥ क्रमिली आनंदवनस्थळी ॥ तो द्विजवर भृत्याजवळी ॥ वृषभ रक्षी पैं ॥८०॥
ऐसें क्रमिलें महापुण्यस्थानीं ॥ पावले पंचक्रोशीचिया प्रमाणीं ॥ मग तेथें धांविन्नले ते क्षणीं ॥ गण त्रिपुरांतकाचे ॥८१॥
शैलादि घंटाकर्ण विरूपाक्ष ॥ गोकर्ण कीर्तिमुख आणि त्र्यक्ष ॥ त्यांहीं धरिला तो वृषभरक्ष ॥ वणिजवराचा ॥८२॥
त्याचे देहीं होता निशाचर ॥ त्यासी काढिते झाले शिववीर ॥ तो घातला पंचक्रोशीबाहेर ॥ शुद्ध केला नित्याचारी ॥८३॥
कीं तो ऐसाचि काशीचा प्रादुर्भाव ॥ महापापा होतसे पराभव ॥ कीं तेथींचा वासी महादेव ॥ कीं हेचि शक्ती पैं ॥८४॥
मग तो महादोषी निशाचर ॥ शिवगणीं त्याचा केला अव्हेर ॥ काशीमध्यें नेला तो द्विजवर ॥ नित्याचारी पैं ॥८५॥
ब्राह्मणभोजनाचें पुण्य पूर्वापारी ॥ आराधना केली नित्य गोदातीरीं ॥ तेणें सामर्थ्यें प्राप्त काशीपुरी ॥ नित्याचार्या पैं ॥८६॥
मग तो अपराधी राक्षस ॥ काशीमध्यें करूं पाहे प्रवेश ॥ त्यासी येऊं नेदी गणाधीश ॥ देहलीगजेंद्र तो ॥८७॥
पंचक्रोशीचिया प्रदक्षिणेबाहेरी ॥ पराभविला तो दुराचारी ॥ द्दष्टीं अवलोकिलीपुरी काशी ॥ राहिला तेथेंचि पैं ॥८८॥
जैसा मृगेशाचेनि पक्षवातें ॥ युगान्त होतसे कुरंगातें ॥ कीं सिंहगर्जनेसी त्वरितें ॥ पळती मातंग ॥८९॥
कीं द्दश्य झालिया अग्निज्वाळ ॥ देखतां आधींचि पळे व्याळ ॥ कीं शिवमंत्रासी काळ ॥ कांपे थरथरां ॥९०॥
तैसा देखोनि काशीचा प्रकाश ॥ प्रदक्षिणेसी राहिला तो राक्षस ॥ महापापांचा होतसे नाश ॥ काशीदर्शन झालिया ॥९१॥
मग काशीचा कळस मनोहर ॥ दुरोनि पाहातसे निशाचर ॥ तेणें पराभविले दोषांकुर ॥ कांहीं एक राक्षसाचे ॥९२॥
मागुता देहीं रिघावयासी ॥ मार्गीं लक्षीतसे नित्याचार्यासी ॥ कशीकरें द्दश्य होती त्यासी ॥ परी न देखे तो द्विज ॥९३॥
ऐसा तो राक्षस दोषी पूर्ण ॥ काशीप्रदक्षीणेसी करीतसे भ्रमण ॥ तंव द्वादशादित्यांमाजीं एक जाण ॥ झालासे रक्षपाळ ॥९४॥
तेथें विमलेश्वर देखे तो निशाचर ॥ तेथेंचि महालिंग मनोहर ॥ प्रासाद विमलेश्वराचा थोर ॥ देखिला राक्षसें ॥९५॥
लोलार्काचे महाद्वारीं राक्षस ॥ भक्षावया पाहे ग्रास ॥ तंव प्रासादमंडळीं एक पुरुष ॥ देखिला असे राक्षसें ॥९६॥
तो शिवाचा उपासनी होता ब्राह्मण ॥ तेथें पूजीत होता त्रिनयन ॥ त्रिकाळ शिवमंत्र तो साधून ॥ करीतसे जनमित्र तो ॥९७॥
पूजाविधि सारोनियां बाहेरी ॥ आला तो जनमित्र ब्रह्मचारी ॥ मग शिवस्तुती दीर्घस्वरीं ॥ उच्चारिता जाहाला ॥९८॥
प्रेमानंदें भरित मनीं ॥ गद्यपद्यविधींचा पूर्ण ज्ञानी ॥ त्रिकाळ पूजिल्याविण शूलपाणी ॥ न क्रमी सर्वथा तो ॥९९॥
थैथैकारें संगीत शब्दें ॥ तो नृत्य करी महा आनंदें ॥ प्रासादप्रदक्षिणा विनोदें ॥ नित्य करी शत एक ॥१००॥
तंव राक्षसें देखिलें ब्राह्मणासी ॥ मग धांविन्नला तो भक्षावयासी ॥ ब्राह्मणें देखोनि राक्षसासी ॥ धरिलें महाभय ॥१०१॥
राक्षस देखिला जैसा महागिरी ॥ कंपायमान जाहाला तो शरीरीं ॥ तेणें भयें स्मरण करी ॥ विश्वनाथाचें पैं ॥१०२॥
शिव शिव नाम उच्चारी वक्त्रें ॥ भाळीं विभूति लावी शिवमंत्रें ॥ मग त्या शिवनामाचीं होऊनि शस्त्रें ॥ भेदलीं राक्षसशारीरीं ॥१०३॥
ब्राह्मणावरी तो क्षुधाक्रांत ॥ जवळी येत होता धांवत ॥ तंव ह्रदयीं बैसला महाघात ॥ शिवनामशस्त्रांचा ॥१०४॥
भाळीं विभूति देखिली नयनीं ॥ शिवनाम श्रुत जाहालें श्रवणीं ॥ मग त्या राक्षसाचे मनीं ॥ उपजली कृपा पैं ॥१०५॥
पिशाचबुद्धीचें आलें अवसान ॥ जन्मांतरदोषांचें जाहालें पुरश्चरण ॥ राक्षसें विपरीत बुद्धि प्रहरून ॥ धरिली सुबुद्धि पैं ॥१०६॥
करसंपुट जोडोनि निशाचर ॥ त्या ब्राह्मणासी करी नमस्कार ॥ मग प्रश्निता जाहाला तो द्विजवर ॥ त्या राक्षसाप्रती पैं ॥१०७॥
ब्राह्मण म्हणे गा महा ढिसाळा ॥ तूं कवण ऐसा पर्वतकुळा ॥ तुझ्या कंठीं मनुष्यमुंडांच्या माळा ॥ कैशी गती तुझी पैं ॥१०८॥
विशाळ तुझें शरीर कृष्ण ॥ देह तरी स्थूळ अणुमात्र शिर वदन ॥ ऐसा तूं बीभत्स कैंचा कवण ॥ तें सांगें आतां ॥१०९॥
राक्षण म्हणे गा ब्राह्मणा ॥ मी प्रतिष्ठानींचा प्रतिग्राही जाणा ॥ द्रव्यावरी होती माझी वासन ॥ आणिकां कांहींचि नेदीं ॥११०॥
ऐसें कृतांतें जाणोनियां दोषा ॥ मज केलें पिसाट राक्षस ॥ माझ्या कंठी घातला हा फांस ॥ तीस सहस्त्र संवत्सर ॥१११॥
महायातना करिती यमदूत ॥ कोणे काळीं न होती कृपावंत ॥ ऐसा निरूपिला सकळ वृत्तांत ॥ राक्षसानें ब्राह्मणासी ॥११२॥
मग मी आलों गा या स्थळीं ॥ तुज म्यां देखिलें चक्षुमंडळीं ॥ मग जठरीं क्षुधा प्रज्वळली ॥ देखोनि तुम्हांसी ॥११३॥
तैं जी माझी राक्षसबुद्धी होती ॥ आणि जो विपरीतभाव होता चित्तीं ॥ तो पराभवला देखोनि विभूती ॥ तुझिया भाळींची ॥११४॥
तुवां उच्चारिलें शिवनामस्तोत्र ॥ तेणें माझें सूक्ष्म जाहालें जाहालें वक्त्र ॥ माझ्या वक्षःस्थळीं भेदलें महाशस्त्र ॥ तुवां उच्चारिलें शिवनाम जें ॥११५॥
तुझ्या भाळीं म्यां म्यां देखिली विभूती ॥ जे माझिया कुबुद्धीची क्षयकर्त्री ॥ माझ्या ह्रदयीं प्रवेशली महाशक्ती ॥ सत्यार्थभावाची ॥११६॥
तंव ब्राह्मण म्हणे गा दीर्घदेही ॥ तूं जरी प्रतिष्ठानींचा प्रतिग्राही ॥ तरी तूं काशीमध्यें महाद्रोही ॥ आलासी कैसा रे ॥११७॥
परिसोनि केसरीची गर्गना ॥ धीरत्व केवीं होय वारणा ॥ कीं सूर्योदय जाहालिया ब्रन्धा ॥ मग कैंची निशी पैं ॥११८॥
कीं ते राक्षसांचिया दीर्घध्वनीं ॥ उरगगलित होय मेदिनी ॥ कीं त्या मृगेंद्राचिया झडपणीं ॥ कुरंगा होय कल्पान्त ॥११९॥
तैसे या मंदाकिनीच्या लोटें ॥ प्रवाहती तृणदोषकाष्ठें ॥ जैसा वायु धुळीसी महा नेटें ॥ क्षयो करी पर्जन्या पैं ॥१२०॥
तैसा तूं द्रोही गा राक्षस ॥ तुज काशीमध्यें कैसा जाहाला प्रवेश ॥ मुक्ताहारीचिया भुवनीं वायस ॥ प्रवेशे कैसेनी ॥१२१॥
राक्षस म्हणे गा ब्रह्मचारी ॥ मी प्रदक्षिणे होतों गोदेच्या तीरीं ॥ ते प्रतिष्ठान नामें पुण्यपुरीं ॥ दत्तोजित नाम माझें ॥१२२॥
माझा जाणोनियां दोषभार ॥ मज प्राप्त केलें राक्षसशरीर ॥ रौरवादि महा अघोर ॥ जाचिलें यमगणीं पैं ॥१२३॥
तो कुंभीपाक महा दुर्घट ॥ घटिका पळाक्षरीं महा कष्ट ॥ मग दोषांतरीं हें शरीर महा दुष्ट ॥ अव्हेरिलें यमगणीं ॥१२४॥
मग मी राक्षसदेही अविचारी ॥ गेलों प्रतिष्ठानीं गोदातीरीं ॥ तेथें गृहस्थ ब्राह्मण नित्याचारी ॥ होता सदावर्ती तो ॥१२५॥
मग त्याच्या देहीं म्यां केला स्पर्श ॥ गृहसंततीचा केला नाश ॥ मग तो उद्वेगें जी पुरुष ॥ जाहाला वृषभरक्षी ॥१२६॥
तो वणिजवराचिया सांगाता ॥ काशीपुरीसी जाहाला निघता ॥ पंचसंवत्सर क्रमिले आतां ॥ नाहीं आला बाहेरीं ॥१२७॥
पंचक्रोशीं प्रदक्षिणेबाहेरीं ॥ मज अव्हेरिलें शिववीरीं ॥ येथें बैसलों राक्षप्तशरीरी ॥ सहस्त्र कोटी ॥१२८॥
तो मागुती येईल काशी करूनीं ॥ मग त्याचे देहीं संचरोनी ॥ स्वदेशा जातील घेउनी ॥ काशीकर ते ॥१२९॥
मी पांच संवत्सर येथें ॥ रक्षीत बैसलों सांगातियातें ॥ परी काशी करोनि दक्षिणपंथें ॥ नाहीं आला अद्यापि ॥१३०॥
मग मी पंचक्रोशी भ्रमत ॥ येथें आलों अतिक्षुधाक्रांत ॥ तंव तुज देखिलें अकस्मात ॥ भक्षावयाकारणें ॥१३१॥
मग ब्राह्मण पुसे राक्षसासी ॥ काशीकरें जाती स्वदेशासी ॥ त्यांचीं दोषलांछनें तयांसी ॥ बाधिती केशीं ॥१३२॥
येथें मंदाकिनी असे शिवकांता ॥ ती लोटीतसे दोषां समस्तां ॥ काशीकर दोषें बाधी मागुता ॥ हें विपरीत उत्तर तुझें ॥१३३॥
मग राक्षस म्हणे ब्राह्मण ॥ हें म्यां प्रार्थिलें शिवगणां ॥ जे पंचक्रोशीप्रदक्षिणां ॥ अव्हेरिलें मज येथें ॥१३४॥
मग म्यां प्रार्थिले शिवदूत ॥ मज हा नित्याचारी कैं होईल प्राप्त ॥ ते म्हणती संवत्सरपर्यंत ॥ जो राही काशीमध्यें ॥१३५॥
एक संवत्सर राही काशीमधीं ॥ तोचि मुक्त झाला सर्व व्याधी ॥ अधिक दिनें पावला औषधी ॥ अमृतवल्ली ते ॥१३६॥
दोष पराभवती देखोनि तयासी ॥ तो सुखें कां नव जाय देशासी ॥ जैसें तें पद्मिनीपत्र अंबूसी ॥ अलिप्त असे ॥१३७॥
संवत्सर न होतां काशी करूनी ॥ निघता होय आपुले भुवनीं ॥ तयासी पंचक्रोशीच्या प्रमाणीं ॥ बाधिती दोष राक्षसा ॥१३८॥
परी त्या जन्मांतरीं असे पावन ॥ मागुतें प्राप्त होईल आनंदवन ॥ मग त्रिजन्मवरी निर्वाण ॥ पावती सायुज्यता ॥१३९॥
ऐसे मज देखतां नेणों किती ॥ दोषें बाधले स्वदेशा जाती ॥ परी नाहीं देखिला सांगाती ॥ पंचवर्षें माझा ॥१४०॥
मज स्मरला इतुका विचार ॥ तेथें मी होतों पांच संवत्सर ॥ जरी हें माझें राक्षसशरीर ॥ परी हा भाव काशीचा ॥१४१॥
तुवां केला शिवनाम उच्चार ॥ तो मज ह्रदयीं भेदला महाशर ॥ पराभवला दुष्टभाव क्रूर ॥ स्मरली सुबुद्धि ॥१४२॥
तरी परियेसीं गा ब्रह्ममूतीं ॥ मज प्राप्त करावी मंत्रशक्ती ॥ तेणें मज पावन होय सायुज्यमुक्ती ॥ तो दीजे अनुग्रहो ॥१४३॥
मग बोलिला तो काशीवासी ॥ शिवमंत्र प्राप्त करीन तुजसी ॥ सचैलस्नान करूनि वेगेंसीं ॥ यावें तुवां राक्षसा ॥१४४॥
पैल विमलकुंड पापनाशन ॥ तेथें तुवां त्वरेनें करावें स्नान ॥ मग त्या कुंडींचें पूर्ण जीवन ॥ राक्षस वंदिता झाला ॥१४५॥
विमलकुंडीं रिघे करावया आंघोळी ॥ तंव उठावली भूतावाळी ॥ बाबरझोटिंग महा विशाळी ॥ खांद्यावरी काळचक्रें ॥१४६॥
राक्षस देखिला अमंगळदेही ॥ कुंडीं स्पर्शितां हाटकिलें त्यांहीं ॥ म्हणे तूं परता रे महाद्रोही ॥ प्रतिष्ठानींचा पैं ॥१४७॥
अरे या विमलकुंडीं महातीर्था ॥ राक्षसा तूं प्राप्त नव्हेसी सर्वथा ॥ म्हणोनि धांविन्नले महाव्यथा ॥ करावी राक्षसासी ॥१४८॥
मग तो पळाला जी निशाचर ॥ ब्राह्मणापाशीं आला भयातुर ॥ म्हणे जी जळदैत्य महाक्रूर ॥ उठावले मज हांकीत ॥१४९॥
त्यासी ब्राह्मणें तें काळीं ॥ पैल देवद्वारींची भस्मधुळी ॥ ती शिवमंत्रें लाविली भाळीं ॥ तये वेळीं सवेग पैं ॥१५०॥
मग ते विभूती धेऊनिया करीं ॥ ब्राह्मणें चर्चिली मंदाकिनीनीरीं ॥ शिवमंत्रें करोनि अवधारीं ॥ राक्षस भाळीं लावीत ॥१५१॥
मग तो राक्षस निघाला स्नाना ॥ तंव त्या भूतावळी आलिया शरणा ॥ स्वागत सांगत लोटांगणा ॥ घालिती साष्टांगें ॥१५२॥
मग विमलकुंडीं केलें स्नान ॥ राक्षसदेह झाला हेमवर्ण ॥ तंव त्यासी उतरलें विमान ॥ कैलासाहूनि पैं ॥१५३॥
सवें गंधर्व अप्सरा नृत्यांगना ॥ राक्षस नेला कैलासभुवना ॥ ब्राह्मण पाहातसे गगना ॥ पाचारीतसे राक्षसातें ॥१५४॥
म्हणे तूं जातोसी कैलासा ॥ आणि मज कां सांडिलें राक्षसा ॥ येरू म्हणे पंचत्रयदिवसां ॥ येशील तूंही ॥१५५॥
षण्मुख म्हणे अगस्ती ॥ राक्षसा जाहाली कैलासप्राप्ती ॥ एवढी ते भस्मधूलीची शक्ती ॥ तो नेला विभूतीनें ॥१५६॥
ऐशी हे विभूतीची क्रीया थोरी ॥ म्हणोनि लेपीतसे त्रिपुरारी ॥ तियेचा मूळवृत्तान्त तो पुढारी ॥ निरोपूं गा अगस्ती ॥१५७॥
आतां विभृतिमाहात्म्यकथा ॥ ते भस्मधूली प्रिय विश्वनाथा ॥ तरी ते दुर्लभ सुरेंद्रमन्मथा ॥ त्रिकाळ इच्छिती ॥१५८॥
आतां सावधान जी श्रोतोत्तमा ॥ प्रार्थीतसे शिवदास गोमा ॥ भस्ममाहात्म्य अतिउत्तमा ॥ परिसा जी पुढें ॥१५९॥
॥ इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते पिशाचमोचनतीर्थमाहात्म्यवर्णनं नाम पंचाशत्तमाध्यायः ॥५०॥
॥ सांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति पंचाशत्तमाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP