काशीखंड - अध्याय ५६ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ अगस्ती वदे जी शिवकुमर ॥ ऐसा ब्रह्मयानें स्थापिला शंकर ॥ वेदीं प्रसिद्ध दशाश्वमेधेश्वर ॥ महालिंग तें ॥१॥
तेथेंचि दशहरातीर्थ जाण ॥ ते तीर्थीं कीजे सचैल स्नान ॥ तरी दश जन्मींचीं पापें दारुण । जळोनि दग्ध होती ॥२॥
त्या दशहरातीर्थीं सृष्टिकरें ॥ ब्रह्मेश्वरलिंग स्थापिलें दुसरें ॥ मग वेदनिर्घोष बहुतां आदरें ॥ राहिला तेथें ॥३॥
ब्रह्मेश्वरलिंग वंदिती पूजिती ॥ पुण्यद्रव्य सप्तात्रीं देती ॥ जे महायाग दान हविती ॥ त्यांसी प्राप्त सत्यलोक ॥४॥
षण्मुख म्हणे गा कुभोद्भवा ॥ तेथें राहाणें झालें विरिंचिदेवा ॥ ऐसा काशीवियोग झाला शिवा ॥ मग काय करिता झाला ॥५॥
काशीवियोग झाला पंचानना ॥ तो व्यापक झाला सुरगणां ॥ काशीनें मोहिलें त्रिभुवना ॥ जैसें वत्सां कामधेनु ॥६॥
काशीनें मोहिले उमाकांता ॥ मग मोह कां नव्हे मर्त्य जंतां ॥ सुरेंद्रगणादि इच्छिती तत्त्वतां ॥ मृत्यु काशीचे ठायीं ॥७॥
मग देवांसी म्हणे शूलपाणी ॥ काशीपुरीं पाठविल्या योगिनी ॥ तरी त्या मंदराचला परतोनी ॥ न येतीचि मागुत्या ॥८॥
त्यानंतरें पाठविला सविता ॥ तोही परतोनि न ये मागुता ॥ काय पां झाली असे व्यवस्था ॥ अविमुक्तीसी ॥९॥
त्यानंतरें पाठविला विरिंची ॥ काय पां व्यवस्था असेल त्याची ॥ त्यासी परतोनि मंदराचळाची ॥ नव्हेचि वासना ॥१०॥
मग शिव पाचारी महागणां ॥ म्हणे तुम्हीं जावें आनंदवना ॥ छिद्र पाहोनि नृपनंदना ॥ देखिजे ठावो ॥११॥
पृथ्वीमंडळीं तो दिवोदास ॥ झालासे काशीपुरीचा अधीश ॥ परी तो अविमुक्तिस्थानीं वास ॥ पाहावा कैसा असे ॥१२॥
सूर्य विरिंची योगिनी ॥ त्यांचीं सामर्थ्यें राहिलीं काशीस्थानीं ॥ तेथें कवणिया पूजनीं ॥ स्थिरावलीं मनें त्यांचीं ॥१३॥
तुम्हांसी कथितों भावपूर्वक ॥ तुम्ही माझे आप्तक ॥ महापराक्रमी बळाधिक ॥ प्रतिमा माझी ॥१४॥
मज हा वियोग झाला ॥ काशीचा वियोग प्रकटला ॥ काय पां पदार्थ असे केला ॥ अविमुक्तीनें मज ॥१५॥
अनुपम तुमची बळशक्ती जे त्रैलोक्य नाशावया कल्पांतीं ॥ ते तुम्ही सत्त्वधीर माझिया मूर्ती ॥ अगाध गण ॥१६॥
आनंदवनाचा मार्ग क्रमितां ॥ तुम्हीं न कीजे विलंब आतां ॥ माझी आज्ञा स्वीकारोनि त्यरितां ॥ निघिंजे वाराणसी ॥१७॥
अरे गोकर्णा महाबळा ॥ घंटाकर्णा आणि महाकाळा ॥ वीरभद्रा आणि महास्थूळा ॥ महोदरा तूं ॥१८॥
नंदी भृंगी महाविकटा ॥ सोम नंदी आणि काळकुर्कुटा ॥ पिंगला कुठार सुभटा ॥ मय़ूराक्षा तूं ॥१९॥
अरे तूं बाणवीरा गोकर्णा ॥ तारका स्थूलकर्णा अतिकर्णा ॥ द्रुमचंडवीरा महादारुणा ॥ प्रभामय तूं ॥२०॥
छानवक्रा आणि पिंगलाक्षा ॥ कर्णाद वीरभद्रा पंचाक्षा ॥ चर्तुमुखा आणि कुंभजाक्षा ॥ वीरबाहु प्रसिद्धा ॥२१॥
भारभूताक्षा आणि षण्मुंडा ॥ त्र्यक्षा लांगुली आणि आषाढा ॥ क्षेमधन्वा विरोधा कुडा ॥ स्वामिकार्तिका तूं ॥२२॥
जैसा तो पुत्र गजवक्र ॥ शाख विशाख माझे पुत्र ॥ तैसेचि माझे मित्र अन्यत्र ॥ न कल्पीं तुम्हां ॥२३॥
त्वरावंत गा जावें वाराणसी ॥ अधर्म छिद्र पाहवें राजयासी ॥ ऐसा उपाय देखोनि आम्हांसी ॥ न्यावें गा काशीमध्यें ॥२४॥
ऐसे ते शिवाचे गण अद्भुत ॥ मंदराचलाहूनि त्वरावंत ॥ उमटले जैसे महापर्वत ॥ ऊर्ध्व व्योमीं ॥२५॥
कीं ते महापक्षींद्र नभोमंडळीं ॥ जैसे गंधर्वभार कुलाचळीं ॥ कीं ते सिंधुमथनींचे महाबळी ॥ दिक्पती ते ॥२६॥
कीं ते स्वर्गतरंगिणीचे ओघ ॥ कीं ते महातीर्थांचे पुण्य मार्ग ॥ कीं ते दोषअवदानांचे याग ॥ अध्वर ते ॥२७॥
सहस्त्रकर मार्तंडाचे ॥ ते तमोभक्षक उदयाचळींचे ॥ कीं ते दोषमातंगांचे ॥ महामृगेश पैं ॥२८॥
कीं ते परीस दोषधातुवेधक ॥ कीं ते महाऋषी ज्ञानदीपक ॥ कीं ते चतुर्विध खाणी लोकव्यापक ॥ मनांकुर शिवाचे ॥२९॥
ऐसे ते शिवाचे गण अति क्रूरू ॥ शांति क्षमेचे तरी जैसे पुण्यतरू ॥ ते अनाथ दीनांचे कल्पतरू ॥ महापवाड मल्ल ते ॥३०॥
ऐसे ते निमिषार्धें व्योममार्गें ॥ आनंदवनीं गण आले सवेगें ॥ कीं ते ताराक्ष जैसे कर्मभेददंगें ॥ रिघती क्षितिगर्भीं ॥३१॥
त्यांहीं अकस्मात देखिली काशी ॥ महा आश्चर्य वर्तलें मानसीं ॥ मग तेही विसरले शिवआज्ञेसी ॥ काशी अद्दश्य झालिया ॥३२॥
पूर्वे उदयो झालिया तरणी ॥ सर्व नक्षत्रें लोपती गगनीं ॥ ते शिवगणीं देखिली शिवधामिनी ॥ अविमुक्ती पैं ॥३३॥
गणांसी झाला काशीअधिकार ॥ मग शिवआज्ञेचा नव्हेचि स्मर ॥ जैसा भुलविला शंकर ॥ हिमाद्रिजेनें ॥३४॥
तैसे काशी देखोनि विसरले ॥ ते गण शिवाचे भुलले ॥ मग ते साष्टांगें वंदिते झाले ॥ काशीपुरीसी बद्धपाणी ॥३५॥
गर्जती जयजयकारें दीर्घध्वनीं ॥ म्हणती देखिली शिवाची धामिनी ॥ आमुचा उदयो झाला पुण्यतरणी ॥ जे देखिली वाराणसी ॥३६॥
सुफळ आमुची मनकामना ॥ पूर्णभक्तीनें आराधिलें पंचानना ॥ तरीचि पूर्वभाग्यें सर्व गणां ॥ द्दश्य झाली काशी ॥३७॥
दिव्य कमळीं अविंध मुक्तीं पूजा ॥ अमूल्य रत्नें दिव्यतेजा ॥ पूर्वीं अर्चिलें वृषभध्वजा ॥ म्हणोनि देखिली हे काशी ॥३८॥
जैसीं पूर्वीर्जिताचिया गुणें ॥ रंकासी साध्य होती निधानें ॥ तैसें पूर्वीर्जितें आनंदवन ॥ देखिली काशी ॥३९॥
ऐसी ते काशीपुरीची स्तुती ॥ पृथक् शिवाचे गण वदती ॥ साष्टांग नमस्कार घालोनि क्षितीं ॥ वंदिली काशीपुरी ॥४०॥
मग राजलक्षण ॥ पाहाती त्रिपुरांतकाचे गण ॥ परी तो आपुला सत्त्वगुण ॥ न टाकीचि कोणे काळीं ॥४१॥
जैसें ब्रह्मसूत्र नव्हेचि वृथा ॥ कीं साधु नुल्लंघी वेदार्था ॥ जैसीं तीं क्षीर-लवणें सर्वथा ॥ न धरिती एक स्वाद ॥४२॥
तैसे गण पाहाती अधर्मछिद्र ॥ परी तो आन अंगीकारीना राजेंद्र ॥ जैसा मर्यादा नुल्लंघी समुद्र ॥ सत्त्वधीर तो ॥४३॥
जैसी तें पद्मिणी असे जलावरी ॥ आणि पत्रपुष्पें न लिंपे त्या नीरीं ॥ तैसा दिवोदास राजा काशीपुरीं ॥ अलिप्त दोषीं ॥४४॥
ऐसा अपाय पाहातां ॥ परी तो राजा नेणे अधर्मवार्ता ॥ जैसा तो गतिगमनीं सविता ॥ नव्हे चलचित्त ॥४५॥
मग परस्परें करिती अनुवाद ॥ न सांपडे राजयाचा छिद्रभेद ॥ मग गण पावते जाहाले महाखेद ॥ दिवोदास राजा पंचक्रोशींचा ॥४६॥
कीं योगेश्वर करी कालवंचना ॥ मग तो अप्राप्त होय यमगणां ॥ मग ते खेद पावोनि भुवना ॥ जाती आपुलिया ॥४७॥
ऐसा हा दिवोदास महाधैर्य ॥ जळो जळो संसर्गशौर्य ॥ नव्हेचि विश्वनाथाचें कार्य ॥ निष्फळ जाहाला मनोरथ ॥४८॥
म्हणती स्वस्थ आतां जीवात्मा ॥ अशक्त जाहाले ज्वामीचिया कामा ॥ तरी तो स्वामी सेवकांसी क्षप्रा ॥ कैसा पां करील ॥४९॥
म्हणोनि जे अशक्त स्वामिकारणीं ॥ त्यांसी ठाव नाहीं त्रिभुवनीं ॥ तरी त्यांहीं राहिजे काशीस्थानीं ॥ तेथें न चले शिवाचें ॥५०॥
ऐसी ही चहूं खाणींची मोक्ष देती ॥ हे विश्वंभराची मुक्तीदात्री ॥ आपणचि येईल पशुपती ॥ काळ क्रमोनियां ॥५१॥
येथें आहे स्वर्गतरंगिणी ॥ आपणचि राहिला लिंग स्थापुनी ॥ मग अहोरात्र तेचि स्मरणीं ॥ स्मरूं विरूपाक्षा ॥५२॥
आतां येथेंचि राहों शिवध्यानीं ॥ त्रिकाळ पूजूं तो शूलपाणी ॥ मग अन्यायी असें त्रिभुवनीं ॥ न म्हणवेला शिवमुखें ॥५३॥
एकाचि पुष्पीं पूजिजे शूलपाणी ॥ तरी तेणें समर्पिला रत्नमणी ॥ दिव्य कमळमाळा गुंफोनी ॥ पूजिला सदाशिव ॥५४॥
पूर्ण पूजा सर्मिजे जगदीश्वरीं ॥ ते पूर्वजांसी मोक्षाधिकारी ॥ सर्व देवेंसीं तो वज्रधारी ॥ वंदी तयासी ॥५५॥
अष्टगंधें भावपूर्वक ॥ जरी पूजिला असेल त्र्यंबक ॥ तरी त्यासी वंदिती ब्रह्मादिक ॥ संशय नाहीं ॥५६॥
साष्टांगें वंदी जो त्रिनयन ॥ म्हणे मी शिवा तुझा भृत्य दीण ॥ तरी त्रैलोक्यमंडळीं त्याहून ॥ नाहीं गा श्रेष्ठ ॥५७॥
ऐसी हे परमनिधान काशी ॥ कां न रुचे कवण मानसीं ॥ त्रिपुरहंता तेथींचा निवासी ॥ हे निजधामिनी त्याची ॥५८॥
जो रहिवासी काशीस्थळीं ॥ लिंगासी विभूती चर्ची त्रिकाळीं ॥ परी अमरनाथ कोटिकाळीं ॥ न तुळे त्याचिये ॥५९॥
विस्मय करिती गणनायक ॥ म्हणती या काशीचे मशक ॥ त्यांचिया स्पर्धेसीं सुरेंद्रादिक ॥ न तुळती देव ते ॥६०॥
ऐसें परस्परें वदती गण ॥ समर्थ या काशीपुरीचें तृण ॥ त्या तृणाची स्पर्धा आपण ॥ गीर्वाण न तुळती स्पष्ट ॥६१॥
काशीचें सामर्थ्य पाहातां ॥ तें यमासी न कळे चित्रगुप्तां ॥ तेथींचें भविष्य एकचि कर्ता ॥ भवानीकांत ॥६२॥
यम तो पृथ्वीचें कर्तव्य जाणे ॥ परी काशीजंतूंचें भविष्य़ नेणे ॥ हे शिवाची धामिनी शिवचि जाणे ॥ अविमुक्ति हे ॥६३॥
सुरेंद्र देव आणि ब्रह्मा ॥ यम चित्रगुप्त पुरुषोत्तमा ॥ हे सर्वही जाणती पृथ्वीआगमा ॥ परी अगम्य काशीभूत ॥६४॥
आम्ही अशक्त जाहालों स्वामिकार्यासी ॥ तो महाद्रोह लाधल आम्हांसी ॥ तरी आपण सेवृं वाराणसी ॥ ते नाशील हा द्रोह ॥६५॥
मग केलिया लिंगस्थापना ॥ ते प्रवर्तले पूजना ॥ लिंसासी जाहालिया नामधारणा ॥ त्या कवण कैशा ॥६६॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ तैं कवण लिंगें स्थापिलीं गणीं ॥ तें तूं परिसें मैत्रावरुणी ॥ कुंभोद्भवा ॥६७॥
शाख विशाख महाकाळेश्वर ॥ नंदी घंटाकर्ण महोदरेश्वर ॥ सोमनंदी पिंगलेश्वर ॥ कुंडेश्वर तो ॥६८॥
मय़ूराक्ष बाणेश्वर गोकर्ण ॥ ताकेश्वर तुळेश्वर स्थूलकर्ण ॥ सुकेश्वर घोकेश्वर संपूर्ण ॥ प्रभामयूरेश्वर तो ॥६९॥
वीरभद्रेश्वर पिंगलाक्ष ॥ द्रुमचंडेश्वर आणि पंचाक्ष ॥ खगेश्वर क्षेत्रेश्वर कीराक्ष ॥ निकुंगजेश्वर तो ॥७०॥
पंचाक्षेश्वर भारभूतेश्वर ॥ चर्तुमुख षण्मुख विरोघेश्वर ॥ आषाढनाग मनुकपर्देश्वर ॥ लांगूलेश्वर तो ॥७१॥
स्वामी म्हणे गा अगस्तितमुनी ॥ आतां मी किती सांगों षडाननीं ॥ हीं चौसष्टीं लिंगें स्थापिलीं गणीं ॥ काशीमध्यें प्रसिद्ध ॥७२॥
त्या गणांमध्यें जो कुर्कुटवीर ॥ तेणें लिंग स्थापिलें कुर्कटेश्वर ॥ त्या लिंगासी दिधला पूर्ण वर त्रिपुरांतकें पैं ॥७३॥
ऐसी तें काशीपुरी लिंगमंडित ॥ तेथें भवानी देतसे भुक्तिमुक्त ॥ विश्वनाथ देतसे सायुज्य पदार्थ ॥ तारक उपदेश ॥७४॥
तेथें सर्व जनांसी मुक्तिभोजन ॥ दुर्गा भवानी देतसे आपण ॥ सर्वांसही झालिया अन्नपान ॥ करीतसे भवानी ॥७५॥
सर्व जनांसी तृप्त करी ॥ मग भवानी भक्ष्य अंगीकारी ॥ एकादा जंतु राहे निर्धारीं ॥ तरी उपवास भवानीसी ॥७६॥
ऐसी ते सर्व जंतूंसी अन्नदानी ॥ तेथें गौबाईनामें होती ब्राह्मणी ॥ तरी तिच्याऐसी नित्याचारिणी ॥ नाहीं आणिका स्थळीं ॥७७॥
ती नित्य सोंवळी दिनत्रयीं क्षौर ॥ सर्व लिंगांसी करी नमस्कार ॥ त्रिकाळ यात्रा निरंतर ॥ सर्व तीर्थीं स्नान ॥७८॥
ति नित्य स्नाना जाय गंगातीरा ॥ मग येती होय आपुले मंदिरा ॥ तंव तो अन्य यातीचा वारा ॥ ना स्पर्शें तियेसी ॥७९॥
मग ते आपुल्या मानसीं कंटाळलीं ॥ ती देव पूजूनि होय ओंवळीं ॥ पुनरपि करावया जाय आंघोळीं ॥ गंगेसी पैं ॥८०॥
मागुती करी गंगास्नाना ॥ पुनरपि ये शिवस्नपना ॥ तंव चरणीं स्पर्शें पाषाणा ॥ काष्ठवस्त्र होतें ॥८१॥
तेणें ती मागुती ओंवळी होय ॥ पुनरपि गंगास्नानासी जाय ॥ ऐसी ते देवपूजेसी ओंवळीं न जाय ॥ गौबाई ब्राह्मणी ॥८२॥
ऐसी ते अहोरात्र उपवासी ॥ ओंवळीं न जाय शिवपूजेसी ॥ जय पंच राज गौबाईसी ॥ होतसे उपोषण पैं ॥८३॥
ऐसी ते पंच दिवशीं पारणें ॥ कोणे दिवशीं द्वादश दिनें ॥ यास्तव भवानी आपणें ॥ न करीचि भक्षण पैं ॥८४॥
ऐसे त्या गौबाईस्तव उपवास ॥ त्यास्तव भवानी जाहाली कृश ॥ तंव पुसता जाहाला काशीअधीश ॥ भवानीप्रति ते काळीं ॥८५॥
शत सहस्त्र अन्नसत्रें असती ॥ सर्व जनां इच्छाभुक्ती ॥ हें त्रैलोक्य करूं शके तृप्ती ॥ ऐसी तूं अन्नदात्री ॥८६॥
जैसा महाअरण्यांत तपेश्वरी ॥ निःस्पृही निःस्वादी पवनाहारी ॥ तो जैसा अतिकृश शरीरीं ॥ तैसी कां तूं वल्लभे ॥८७॥
कल्पद्रुम तो क्षुधेनें पीडिला ॥ सूर्य कैसा तमें वेष्टिला ॥ चंदनासी केवीं प्रवर्तला ॥ उष्ण ज्वर तो ॥८८॥
सर्व जंतूंसी समर्पिसी आहार ॥ आणि तुझें कां जाहालें कृश शरीर ॥ मग भवानी करी प्रत्युत्तर ॥ गौबाई ब्राह्मणीचें ॥८९॥
तियेसी नित्यकर्म आचरतां ॥ दिन क्रमीतसे स्नानें करितां ॥ ते भक्ष्यभोज्याची नेणे वार्ता ॥ त्रय पंच दिनवरी ॥९०॥
तेणें आम्हांसी होतसे पारणें ॥ केवीं भक्षिजे तृप्ति केलियाविणें ॥ सर्व जंतूंसी दीजे भक्ष्यभोजनें ॥ मग भक्षिजे आम्हीं ॥९१॥
मग कोपारूढ झाला त्र्यंबक ॥ वेगें पाचारिला विनायक ॥ त्यासी आज्ञा करिता झाला त्रिपुरांतक ॥ परियेसी आतां ॥९२॥
क्षुधेनें पीडीतसे भवानी ॥ तरी ते गौबाईनामें नित्याचारिणी ॥ तियैसी वेगें आणावें बांधोनी ॥ ते घालावी काशीबाहेरी ॥९३॥
मग ते गौबाई नित्याचारी ॥ गणेशें बांधिली बद्ध करीं ॥ मौळीं ताडीतसे ठोंसर करीं ॥ आणिली ते शिवापशीं ॥९४॥
मग तियेसी म्हणे चंद्रमौळी ॥ विधवे तूं राहूं नको काशीस्थळीं ॥ नित्य होतसे सोंवळी ओंवळी ॥ सहस्त्र वेळां पैं ॥९५॥
ऐसें गौबाईसी वदला शंकर ॥ साष्टांग घातला तिनें नमस्कार ॥ म्हणे तूं दीन-अनाथांचा दातार ॥ विश्वेश्वर तूं ॥९६॥
काशीमध्यें असोनि करितां नेम ॥ मी वर्तलें नाहीं अधर्म ॥ नित्याचार मार्ग हा स्वधर्म ॥ तुम्हींचि निरूपिला शिवा ॥९७॥
तरी मी स्वधर्मी नित्याचारी ॥ मज कां घालितां काशीबाहेरी ॥ स्वधर्म करितां जाहाले प्राप्त शरीरीं ॥ ठोंसर गणाहातीं ॥९८॥
ऐसें गौबाईनें केलें प्रत्युत्तर ॥ मग हास्य करी शंकर ॥ प्रसन्न झाला त्रिपुरहर ॥ गौबाई ब्राह्मणीसी ॥९९॥
शंकर म्हणे वो नित्याचारिणी ॥ मी संतोषलों तुझिया प्रतिवचनीं ॥ आतां प्राप्त झालीस मजपासोनी ॥ अभयवर तूं ॥१००॥
दक्षिणमानसीं साक्ष गणेश ॥ त्याजपाशीं तुज अखंडवास ॥ तुज हा प्राप्त केला आयास ॥ तें परियेसीं आतां ॥१०१॥
काशीयात्रा करिती सर्व जन ॥ महादानें करिती यागहवन ॥ जे तुझें न घेती दर्शन ॥ त्यांची निष्फळ होय यात्रा ॥१०२॥
गणेशें तुज केली ठोंसरविपत्ती ॥ जे तुझें दर्शन घ्यावया येती ॥ शिर कुरवाळोनि साक्ष ठेविती ॥ हा साक्षीविनायक ॥१०३॥
तुझें घेऊनियां दर्शन ॥ साक्षीविनायका देती गार्हाण ॥ त्यांची सुफळ यात्रा झाली पावन ॥ मज अर्पितां ॥१०४॥
मग ते दक्षिणमानसीं गौबाई ॥ जे नित्याचारिणी गंगस्नायी ॥ ते दुर्गाभवानीच्या ठायीं ॥ स्थापिली शिवें ॥१०५॥
मग अगस्तीसी म्हणे शिवकुमर ॥ येथेंचि लिंग असे कुर्कुटेश्वर ॥ शिवाचा गण तो कुर्कुटवीर ॥ तेणें स्थापिलें लिंग तें ॥१०६॥
त्याचें दर्शन घेतां प्रतीती ॥ सर्व कारणें सिद्धीसी जाती ॥ अपशकुनांचे सुशकुन होती ॥ विपरीत तें सुपरीत करी ॥१०७॥
हें त्या शिवाचें आहे वरदान ॥ ऐसे काशीमध्यें राहिले गण ॥ विचारणा करी पंचानन ॥ म्हणे ते केवीं पां राहिले ॥१०८॥
आमुचें कार्य न करिती कोणी ॥ जे जाती काशीभुवनीं ॥ ते मंदराचला परतोनी ॥ न येतीचि मागुते ॥१०९॥
जैशा उगमापासोनि सरिता ॥ सागरीं मीनलिया धांवतां ॥ त्याचि परतोनि उगमा येतां ॥ देखिजे ना कधींही ॥११०॥
तैशा योगिनी गेलिया काशीमधीं ॥ त्यांची परतोनि न येचि शुद्धी ॥ काय विस्मृति जाहाली मंदबुद्धी ॥ कार्याविषयीं ॥१११॥
जैशा तो वृंदावनीं चक्रपाणी ॥ तुळसीनें राखिलासे बांधोनी ॥ तो अद्यापि सन्मुख तियेपासोनी ॥ कल्पांतीं नव्हेचि दूरी ॥११२॥
तैसा काशीमध्यें पाठविला सविता ॥ परतोनि नाहीं देखिला येतां ॥ तो अस्त होय परी उदयो करितां ॥ देखिजेना पूर्वेसी ॥११३॥
गंगेचा धरोनि संकल्प मानसीं ॥ अंशुमान राजा गेला तपासी ॥ तो परतोनि मागें अयोध्येसी ॥ नाहीं देखिला येतां ॥११४॥
तैसा काशीमध्यें पाठविला ब्रह्मा ॥ तो मागुता द्दश्य जाहाला नाहीम आम्हां ॥ कीं ब्रह्मचारी न लिंपें दुष्टकर्मा ॥ तैसा न येचि येथें ॥११५॥
जैसा महाशूर संग्रामीं ॥ तो न प्रहरी जयभूमी ॥ कीं जैसें ध्रुवपद असे व्योमीं ॥ तें प्रहरीना ध्रूव ॥११६॥
तैसे माझे प्रीतीचे जे गण ॥ त्यांहीं सेविलेंसे आनंदवन ॥ परी ते नाहीं देखिले परतोन ॥ मंदाराचळासी येतां ॥११७॥
जे जे पाठविले वाराणसीं ॥ ते मागुते न आले आम्हांपासीं ॥ जैसा जीवात्मा अव्हेरी कलेवरासी ॥ तो न प्रवर्ते मागुता ॥११८॥
कीं काशीचा ऐसाचि प्रादुर्भाव ॥ तो महावशीकरणाचा ठाव ॥ तेथें राहिले त्यांसी संदेह ॥ मागुतें यावयासी ॥११९॥
या काशीनें मोहिलें त्रिभुवन ॥ मृत्यूही कल्पी तेंचि स्थान ॥ हें जाणतसें दीर्ध वशीकरण ॥ ऐसें नाहीं कोणतें स्थळ ॥१२०॥
म्हणोनि हें काशी मोहिनी ॥ प्राणेंचि जातील काळ क्रमूनी ॥ ते उमगतां देखिजेना योनी ॥ अन्यत्र तेही ॥१२१॥
जैसी ते पद्मिनी तडागजळीं ॥ मकरंदें लुब्धती तियेच्या कमळीं ॥ तो आमोद सेवूनि आणिका स्थळीं ॥ न प्रवर्तती चित्तवृत्ती ॥१२२॥
तैसी नव्हे ती काशीकुमुदिनी ॥ तेथें जे जे जंतु येती दुरोनि ॥ ते ते देह विसर्जिती परी परतोनी ॥ न क्रमिती आणिक स्थळीं ॥१२३॥
जैसा तो दीपमाळेचा मार्ग ॥ देखतांचि क्रमिती पतंग ॥ त्या जीवशरीरातें होत भंग ॥ परी येतां देखिजेना ॥१२४॥
तैसे जे जे काशीमार्गें गेले ॥ प्राणांतें वेंचूनि तेथें राहिले ॥ ते ते योनीं उपजतां नाहीं देखिले ॥ अद्यापि म्यां ॥१२५॥
ऐसी ते परम निधान काशी ॥ तेणें विरल केला आम्हांसी ॥ मग विरह तो मर्त्य जंतूंसी ॥ कां पां न होईल ॥१२६॥
आतां कवणा पाठवूं आनंदवनीं ॥ आम्हां अप्राप्त निजधामिनी ॥ आतां ऐसा कवण तो कार्य करूनी ॥ नेईल आम्हांसी ॥१२७॥
दिवोदासाचें अपार सामर्थ्य ॥ तो करूं शकेल विपरीतार्थ ॥ जे जे पाठविले त्यांचे मनोरथ ॥ निष्फळ केले राजयानें ॥१२८॥
स्वामी म्हणे गा अगस्तिऋषी ॥ ऐसा विरह झाला शिवासी ॥ आतां शिवें पाठविलें कवणासी ॥ ते कथा परिसा पुढें ॥१२९॥
या अध्यायाची सांगों फलश्रुती ॥ श्रवणपठणें होय जयप्राप्ती ॥ तयासी दर्शन घडे अविमुक्ती ॥ आणि काशीयात्रा ॥१३०॥
विश्वनाथाचें घडे दर्शन ॥ पूर्वजांसी कैलास पावन ॥ घडे तें स्वर्गसरितेचें स्नान ॥ गृहीं श्रवण जाहालिया ॥१३१॥
पंचलिंगस्थापना वाराणसी ॥ जन्मांतरीं होय अविमुक्तिवासी ॥ देहान्त झालिया निर्वासी ॥ प्राप्त होती पूर्वज ॥१३२॥
आतां सावधान जी श्रोतोत्तमां ॥ सत्य अनृत मज कीजे क्षमा ॥ साष्टांगें प्रार्थी शिवदास गोमा ॥ कथा परिसा पुढारी ॥१३३॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते शिवगणकाशीप्रवेशकथनं नाम षट्पंचाशत्तमाध्यायः ॥५६॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP