मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ७५ वा

काशीखंड - अध्याय ७५ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ मग विरिंचि म्हणे गा सूर्यसुता ॥ आप्न वैकुंठासी जाऊं आतां ॥ तेथें प्रार्थूं श्री अनंता ॥ तो करी संतुष्ट ॥१॥
मग महिषवहन सूर्य कुमर ॥ विकुंठासी निघाला सृष्टिकर ॥ वहन उपनला पक्षिवर ॥ हंसनामें महा स्थूल ॥२॥
दोघे प्रवेशले हरि भुवन ॥ सन्मुख देखिला लक्ष्मीनारायण ॥ मग करिते जाहाले स्तुतीलागून ॥ तें असो आतां ॥३॥
विधीनें सांगीतला वृत्तांत ॥ जो गया स्रुर तपें शक्तिमंत ॥ तेणें उद्धरिले सर्व जंत ॥ शुभा शुभ सकळ जे ॥४॥
शिवाचा वर असे तयासी ॥ यागविधी राहिला पृथ्वीसी ॥ तेणें तेहतीस कोटी गीवीणांसी ॥ जाहालीं पारणीं ॥५॥
राहिलें वेदाध्ययन तीर्थयात्रा ॥ पंडित व्याख्यान करिती वेदशास्त्रां ॥ योगीश्वरीं त्यजिलें गुरुमंत्रा ॥ द्विजांनीं संध्या त्यागिली ॥६॥
तरी परियेसीं गा नारायणा ॥ सोम सूर्य़ ग्रह उडुगणां ॥ त्यांसी सद्दश्य जाहाली प्रदक्षिणा सुवर्णा चालाची पैं ॥७॥
ग्रह तारा तपा चिया स्वार्था ॥ भ्रमत होतीं शक्ति पुरुषार्था ॥ त्यांसी उद्भवली थोर व्यथा ॥ तप चिंतेची पैं ॥८॥
संपली माझी सर्वही सृष्टी ॥ शुभा शूभ जीव जाती मुक्तितटीं ॥ तुझें भुवन जें दश कोटी ॥ तें कोदलें पवाडु नाहीं ॥९॥
जे त्रिलोक्यमणी सोम सूर्य ॥ ते गयसुर भेणें न करितीचि उदय ॥ ऐसा प्रवर्तला अत्यंत समय ॥ तो तूं जाणसी श्रीहरि ॥१०॥
ऐसी विधीची वाणी ऐकुण ॥ मग बोलता जाहाला नारायण ॥ म्हणे यासी असे पूर्ण वरदान ॥ महादेवाचें ॥११॥
जें जें मागे गयासुर ॥ त्यासी तें तें अशक्त नाहीं द्याव यासी ॥ आतां उपायेंकरूनि जिंकावें त्यासी ॥ विरिंचिनाथा ॥१२॥
मग निघाले हरि विरिंचि ॥ सांकडी फेडावया गीर्वाणांचीं ॥ महिमा राहिली होती काशीची ॥ ते वृद्धि करावया ॥१३॥
मग त्या कीकटीं फल्गूचे तीरीं ॥ गुप्त आले विरिंचि हरी ॥ तेथें दोघे जाहाले वेषधारी ॥ उत्तम षट्‍कर्मिक ॥१४॥
मग आले गया सुरा जवळीं ॥ तंव तयातें ध्यान लाविलें चक्षुमंडळी ॥ मंत्र जपतसे जेणें चंद्रमौळीं ॥ प्रसन्न होय आपण ॥१५॥
सन्मुख उभा राहिला सृष्टिकर ॥ मगें उभा असे शार्ङ्गधर ॥ ब्रह्मा बोलता जाहाला स्वस्तिकार ॥ गया सुरासी तेधवां ॥१६॥
जंव शंब्द श्रुत झाले श्रवणीं ॥ तंव गयासुर पाहे ध्यान विसर्जुनी ॥ इतुकियांत विरिंची तत्क्षणीं ॥ अद्दश्य जाहाला ॥१७॥
तंव मागें होता नारायण ॥ तोही बोलिला स्वस्तिवचन ॥ मागें पाहे गया सुर परतोन ॥ तंव तोही गुप्त जाहाला ॥१८॥
दोघे भासती द्विंजवर ॥ तंव गयासुर वदे प्रत्युत्तर ॥ तुम चिया मनोरथासी शरीर ॥ त्यागूं शकें मी ॥१९॥
तरी कामना सांगावी दोघांची ॥ मी आर्त पुरवीन रे तुमची ॥ द्दष्टीसी न भासा तरी तुमचे मनींची ॥ इच्छा केवीं जाणावी ॥२०॥
तव अद्दश्यचि बोले विधाता ॥ म्हणे मी ब्राह्मण असें गा मागतां ॥ जरी तूं होसी पूर्णदाता ॥ तरी तूं देईं भाषदान ॥२१॥
गयासुर सत्त्वधीर शिव भक्त ॥ म्हणे गा ब्राह्मणा मागें इच्छित ॥ मग तो ब्रह्मवाचा रुद्रवाचा वदत ॥ भवपूर्वक ॥२२॥
मग भाषादान स्वीकारून ॥ करीं घेतलें संकल्प जीवन ॥ मग बोलला चतुरानन ॥ कामना भाव ॥२३॥
म्हणे तूं देता जाहालासी वर ॥ तुज ऐसा त्रैलोक्यांत नसेल थोर ॥ तरी मज करणें असे अध्वर ॥ तुझिया पृष्ठीवरी ॥२४॥
येरू म्हणे याग करणें असे चित्तीं ॥ तरी संवत्सरमास किती ॥ विधि म्हणे आमुची होईल पूर्णाहुती ॥ षण्मासांनंतर ॥२५॥
मग आपुलिया सत्त्वाकारणें ॥ असुर राहिला अधोवदनें ॥ याग आरंभिला विरिंचीनें ॥ गया सुराचे पृष्ठीवरी ॥२६॥
नाना समिधांचे भार आणुनी ॥ विधियुक्त समर्पीतसे हवनीं ॥ तेथें तृप्त होतसे वन्ही ॥ ग्रहवक्र तो ॥२७॥
ऐसा षण्मा सांवरी अध्वर ॥ अवदानें देतसे सृष्टिकर ॥ तंव बोलता जाहाला गयासुर ॥ विरिचिदवे प्रती ॥२८॥
आतां पूर्णा हुति असे किती दूरी ॥ विधि मौनव्रत असे वैखरीं ॥ तंव बोलता जाहाला नरकेसरी ॥ गया सुरासी पैं ॥२९॥
तीन मास पाहिजेति गा असुरा ॥ मग पूर्णाहुती होईल अध्वरा ॥ येरू म्हणे भलें साधिलें शरीरा ॥ माझिया तुम्हीं ॥३०॥
आतां माझिया जीवाची पूर्णाहुती ॥ भावें अर्पितों मी देवां प्रती ॥ आतां वर द्यावा मज श्रीपती ॥ तीर्थनाम स्थापिजे माझें ॥३१॥
ऐसा नवमासवरी ॥ अध्वर ॥ करिते जाहाले हरि सृष्टिकर ॥ तुटलें गयासुराचें शिर ॥ हरीचेनि पदें ॥३२॥
जो चरण ठेविल बळी चिया पृष्टीं ॥ तोचि चरण ठेविला गया सुराचे कंठीं ॥ मुक्ती देऊनियां पादतळवटी ॥ मग वदला वर ॥३३॥
मग बोलला शार्ङ्गधर ॥ जेथें पडिलें दैत्याचें शिर ॥ तेथें माझा स्थापिला पूर्ण वर ॥ तो कैसा आतां ॥३४॥
प्रथम होतें फल्गुगंगातीर्थ ॥ मग संहारिला तो दैत्यनाथ ॥ तेंचि गुण नाम जाहालें यथार्थ ऐसें ॥३५॥
ब्रह्मयानें तेथें अध्वर ॥ हरिनें स्थापिला गया ॥ गदाधर ॥ असुराचे शिरीं दिधला वर ॥ तो परिसा आतां ॥३६॥
हरि विधी बोलिले वचन ॥ या गयातीर्थीं जो देईल पिंडदान ॥ तरी त्याचे पूर्वज होतील पावन ॥ वैकुंठस्थानीं ॥३७॥
जेथें पडलें गयासुराचें शिर ॥ तेथें त्याचे उद्धरती सर्वही पितर ॥ हरिपदाहूनि विशेषाकार ॥ दशगुणी असे पैं ॥३८॥
तेथें पिंडदन देई जो सम शमीपत्रें ॥ त्याचीं उद्धरती सप्तही गोत्रें ॥ हा वर दिधला आपुल्या वक्रें ॥ हरि विरिंचींनीं ॥३९॥
हें अगस्तीनें प्रश्निलें यथोक्त ॥ तें पुराणांतरीं असे उक्त ॥ स्वामीनें निरूपिलें तें युक्त ॥ संखलित येथें ॥४०॥
आतां असो गयेची वाणी ॥ ऐसी ते कीटकीं पितृ उद्धरणी ॥ आतां आणिक प्रश्नीतसे मुनी ॥ अगस्ति स्वामीसी ॥४१॥
अगस्ति वदे जी शिवनंदना ॥ माझिया मताची तूं काम धेनु जाणा ॥ हर्षे तृप्त करिसी प्राणा ॥ शिव कथापीय़ूषें ॥४२॥
काशीवियोगें पीडिलें आमुतें ॥ म्हणोनि प्रश्नीतसे वियोगस्वार्थें ॥ तरी काशीमध्यें असती तीर्थें ॥ शिववाक्यें जीं ॥४३॥
मुक्ति देती लिंगे चतुर्दश ॥ तेथें कैसा जाहाला जी इतिहास ॥ मज काशीवियोग दीर्घ प्रायस ॥ तो तूं निवारिसी स्वामी ॥४४॥
जें ज्या तीर्थीं जाहालें वृत्त ॥ तें मज स्वामी करावें श्रुत ॥ भूत भविष्य वर्तमानयुक्त ॥ कथावें मजप्रती ॥४५॥
मग तो शिवनंदन महाभद्र ॥ शक्ति संपूर्ण द्वादशावा रुद्र ॥ शिव कथामृत अगाध समुद्र ॥ उचंबळला अगस्तीवरी ॥४६॥
तो जैसा पौर्णिमेचा शीतकर ॥ व्योसीं देखोनि हलावे सागर ॥ तैसा आनंदे शिव कुमर ॥ अगस्तीसी देखोनी ॥४७॥
मग तो तारकासुराचा अरी ॥ म्हणे अगस्ति ऋषि अवधारीं ॥ मी किती वाखाणूं ते काशीपुरी ॥ भुक्ति मुक्ति देतसे ॥४८॥
भूत भविष्य वर्तमान ॥ हें आधींचि कथीं पंचानन ॥ जें अद्यापि वर्ततसे जाण ॥ काशीमध्यें पैं ॥४९॥
तरी आतां परियेसीं ऋषी ॥ तत्काळ सिद्धिदायक ते काशी ॥ पंचत्वें तरी ते निर्वाणासी ॥ विलंबचि नाहीं ॥५०॥
तरी प्रसिद्ध लिंग कृत्तिवसेश्वर ॥ तेथें एक जाहाला असे चमत्कार ॥ समस्त लोक देखती बडिवार ॥ त्या कृत्तिवासतीर्थाचा ॥५१॥
त्या कृत्तिवासेश्वराचे देवद्वारीं ॥ वायस बैसले होते वृक्षावरी ॥ ते कलह करितां पडले भीतरी ॥ कृत्तिवासतीर्थामाजीं ॥५२॥
पहा हा कैसा त्या तीर्थाचा प्रकाश ॥ क्षण एक उदकीं होते वायस ॥ बाहेरी निघतां जाहाले राजहंस ॥ लोक देखती तेथें ॥५३॥
असो तेथें प्रकटला त्रिपुरारी ॥ जे वायस जाहले मुक्ताहारी ॥ मग त्या तीर्थासी नाम जाहालें बरवियापरी ॥ हंसतीर्थ ॥५४॥
हा चमत्कार जाहला कृत्तिवा सेश्वरीं ॥ आणिक अमृतेश्वर गंगातीरीं ॥ स्वामी म्हणे ऋषि अवधारीं ॥ महा आश्चर्य ॥५५॥
काशी मध्यें एक शूद्रवर्ण ॥ प्राणान्त जाहालासे त्याकारण ॥ मग मिळोनि सखे स्वजन ॥ नेला संस्कारासी ॥५६॥
मग त्या मणिकणिंकेचे तटाकीं ॥ तो प्राणी घातला होता अर्धोदकीं ॥ तंव प्राण स्वस्थ जाहाला एका एकीं ॥ जाहालें थोर आश्चर्य ॥५७॥
सप्तपाताळाहूनि लिंग उद्भवलें ॥ त्या प्रेतातळीं तत्काळ प्रकटलें ॥ मृत होतें तें अमृत जाहालें ॥ पतित कलेवर जें ॥५८॥
मग चरणचालीं त्या प्राणियासी ॥ जीवंत स्वस्थ नेला लोकीं गृहासी ॥ तेंचि गुण नाम जाहालें लिंगासी ॥ अमृतेश्वर ऐसें ॥५९॥
त्याची साक्ष असे अजून ॥ सर्पें डंखिलें ज्याकारण ॥ त्यासी अम्रुतेश्वराचें दर्शन ॥ करवितां स्वस्थ होय ॥६०॥
तरी त्या लिंगाचा महिमा आतां ॥ सहस्त्रमुखें न ये सांगतां ॥ ब्रह्मा सृष्टीचे जीव उद्भविता ॥ त्यासीही अगम्य ॥६१॥
सर्व जनांसी करी संतुष्टी ॥ पृथ्वीवरी होतसे जलवृष्टी ॥ तो वरुण करी व्योमीं घनदाटी ॥ त्या लिंगाचे अधिकारें ॥६२॥
तें लिंग पूजिलिया सामर्थ्य घडे ॥ तेणें यमपंथीं घातले गडे ॥ पूर्वज जाहाले सोंगाडे ॥ शंकराचे पैं ॥६३॥
स्वामी म्हणे अगस्ती प्रती ॥ त्या लिंगाचें महात्त्व सांगों किती ॥ पूर्वजांसी नाहीं पुनरावृत्ती ॥ दर्शनमात्रें ॥६४॥
आतां आणिक परिसें गा सगुण ॥ काशीमध्यें लिंग जे त्रिलोचन ॥ तेथें इतिहास जाहाला तो संपूर्ण ॥ निरोपूं तुज ॥६५॥
जेथें कर्मजंतुपक्षी पंचत्व पावले दैवें ॥ ते कैलासा नेले महादेवें ॥ मग ते सृष्टिजीव नरमानवें ॥ कां पां नुद्धरती ॥६६॥
धर्मराजनामें सूर्यकुमर ॥ तेणें लिंग स्थापिलें धर्मेश्वर ॥ त्रिलोचनीं केला तपाचा गिरिवर ॥ धर्मराजें तेणें ॥६७॥
प्रसिद्ध लिंग तें त्रिलोचन असे ॥ तत्काळ सिद्धिदायक अनायासें ॥ तरी तें लिंग उद्धवलें कैसें ॥ तें परियेसीं अगस्ती ॥६८॥
शिवें घातिला पूर्वीं गजासुर ॥ ते कथा निरूपिली तुज सविस्तर ॥ त्याचें चर्म शिवासी गजांबर ॥ जाहालें असे परिधाना ॥६९॥
त्रिशूळें हाणीतलें वक्षःस्थळीं ॥ त्रिशूळाग्र भेदलें सप्तपाताळीं ॥ तें दक्षिणहस्तें चंद्रमौळीं ॥ उत्पाटी मागुती ॥७०॥
मग त्या त्रिशूळाग्राचेनि द्वारें ॥ लिंग एक उद्भवलें एक सरें ॥ त्यासी नाम ठेविलें शंकरें ॥ त्रिलोचनेश्वर ॥७१॥
मग त्या लिंगासी वर सहजें ॥ अनुपम दिधला वृषभध्वजें ॥ तें असे तेथें धर्मराजें ॥ साधिलें तप ॥७२॥
ऐशीं सहस्त्र संवत्सरवरी ॥ तप साधिलें त्रिलोचनेश्वरीं ॥ मग प्रकटला त्रिपुरारी ॥ यमा चिया भक्तीस्तव ॥७३॥
शिव म्हणे गा सूर्यकुमरा ॥ तुवां पूजिलें त्रिलोचनेश्वरा ॥ तरी आतां माग इच्छावरा॥ प्रसन्न जाहालों तुज ॥७४॥
तंव यम म्हणे गा पिंगाक्षजटी ॥ फणिभूषण मिरवतसे कंठीं ॥ तरी परिसा जी भालदृष्टी ॥ ईश्वरस्वामी ॥७५॥
एक विज्ञापना असे जी मानसीं ॥ आम्हीं जे मागावें तें तूं आधींचि जाणसी ॥ तरी माझिया तपाच्या साक्षीसी ॥ होतें तयासी पार नाहीं ॥७६॥
जैंहूनि तप मांडिलें ये स्थळीं ॥ तैंपासूनि पांखरें आहेति मजजवळी ॥ तरी यांची कृपा चंद्र मौळीं ॥ उपजावी तुम्हां ॥७७॥
माझें तप जें असेल संपूर्ण ॥ त्या पुण्यें यांसी होइजे प्रसन्न ॥ एक सह्स्त्र वरुषें तप साधन ॥ तें म्यां समर्पिलें या पांखरां ॥७८॥
आतां तूं नाथ जोडिलासी मज ॥ ऐसें अनुवादला धर्मराज ॥ तंव हास्य करी वृषभध्वज ॥ पंचानन तो ॥७९॥
म्हणे मी तोषलों रे तुझिये भक्तीं ॥ तुवां जाणीतली पूर्ण तप युक्ती ॥ ते कैसी धर्मा तुज प्रती ॥ करूं निरूपण ॥८०॥
पुण्य तपाची सामुग्री जोडिली ॥ कर्मजंताकाजीं किंचित वेंचिली ॥ ते दश गुणें वृद्धीतें पावली ॥ हें तुवां सत्य जाणिजे ॥८१॥
तुज ऐसा तपस्वी महा द्‍भूत ॥ म्यां नाही देखिला त्रैलोक्यांत ॥ उपकारीं तप वेंची तो अत्यंत ॥ बहु प्रिय मज ॥८२॥
तपा हुनि द्श गुणें वृद्धी ॥ म्यां निर्मिलीसे उपकार शिद्धी ॥ तुवां उपकार केला काशीमधीं ॥ हें महा आश्चर्य ॥८३॥
त्या प्रारवियांसी आतां मी प्रसन्न ॥ होईन तुझिया तपसा मुग्रीकरून ॥ हें जरी ते बोलती आम्हांसी वाचा होऊन ॥ पृच्छेसी परिहर ॥८४॥
तंव त्या त्रिलोचन प्रासादीं ॥ बैस्ली होती पारवियांची मांदी ॥ तिंहीं अकस्मात स्मरिली सद्‍ बुद्धी ॥ घातलीं लोटांगणें ॥८५॥
तीं समस्त वर्तलीं जय जय कारा ॥ म्हणती परियेसीं गा त्रिशूलधरा ॥ आम्ही सेवीतसों या काशी पुरा ॥ मुक्तीस्तव पैं ॥८६॥
या काशी मध्यें सर्व जंतुजीवां मुक्ती ॥ ऐसें आम्हीं ऐकिलें वेदांतीं ॥ तेथें मुक्ति निश्चयें ऐसीं बोलती ॥ काशीमध्यें ऋषिवाक्यें ॥८७॥
म्हणोनि आम्ही सेविली वाराणसी ॥ हे सर्व जंतूंसी ज्ञान प्रकाशी ॥ मग शिव बोलता जाहाला धर्मासी ॥ प्रत्युत्तर पैं ॥८८॥
म्हणे या पांख रांसी केवढें ज्ञान ॥ ऐसेंचि असे काशीचें प्रमाण ॥ या त्रिलोच नेश्वरी शक्ति पूर्ण ॥ ऐसीचि असे ॥८९॥
येथें असे रत्नेश्वर व्याघ्रेश्व्र ॥ हंसतीर्थीं ज्ञानवापीश्वर ॥ ऐसा या लिंगाचा बडिवार ॥ कल्पानुकल्पीं असे ॥९०॥
तरी धर्मा तूं परियेसी प्रत्युत्तर ॥ या पांखरीं माझी भक्ति केली थोर ॥ यांचाही आम्हांसी असे उपकार ॥ तो सांगों तुज प्रती ॥९१॥
हीं वसती माझ्या प्रासादाग्रीं नित्य ॥ सुस्वर उद्भवती घुमघुमित ॥ त्या नाद शब्दी मी बहु तृप्त ॥ होतसे धर्मा ॥९२॥
जेव्हां प्रासाद मळे धुळी धुसारी ॥ तंव हीं पांखरें येती मेळिकारीं ॥ मग यांचे पक्षवात ॥ फडत्कारीं ॥ निर्मळ होताती शिखरें ॥९३॥
ऐसें हें काशी पुरनिघान ॥ येथें अन्य जंतूंसी होतसे ज्ञान ॥ मग नरमानवां सिद्धी पूर्ण ॥ कां पां न होईल ॥९४॥
तरी धर्मा तुझें पुण्य महाथोर ॥ आतां तुज देतों पूर्ण वर ॥ तुवां लिंग स्थापिलें धर्मेश्वर ॥ आणि हें धर्मतीर्थ पैं ॥९५॥
अपार तुझी पुण्य सामुग्री ॥ तुज समर्पिली म्यां दिव्य नगरी ॥ ते असे मेरूचे पाठारी ॥ चतुर्दश लक्ष ॥९६॥
ते चतुर्दश लक्ष योजन ॥ तुज समर्पिलें यम भुवन ॥ चतुर्दश कोटी तुझें सैन्य ॥ त्यांचा तूं अधिपती ॥९७॥
चारी खाणींचे जीव जंत ॥ त्यांचें तूं जाणसी भविष्य निमित्त ॥ पाप पुण्य जें तप सुकृत ॥ तें तूं सर्व जाणसी ॥९८॥
हरि विरिंचि आणि काशी स्थान ॥ हे वंचूं नये रे त्रिभुवन ॥ उत्पत्ति प्रळय जीवां कारण ॥ हें तूं जाणसी ॥९९॥
पंचक्रोशीचे जे कर्मजंतू ॥ त्यांची अगम्य तुज भविष्य मातू ॥ आणिक कथितों वृत्तांतू ॥ तो तूं परिसें धर्मा ॥१००॥
विभूति वंदी जो शिव मंत्रें ॥ मुखीं उच्चारी शिव स्तोत्रें ॥ शिव पूजा शिवालयीं बैसोनि शास्त्रें ॥ करी श्रवण पठन ॥१०१॥
महा ज्ञानी योगी ब्रह्म चारी ॥ आणि जो महा उपकार करी ॥ जो मज अर्पी तयासी यमपुरी ॥ वंचावी तुवां ॥१०२॥
मग तो हो कां अन्य याती ॥ ऐसा तुज केला यमाधिपती ॥ आणिक कथितों तुज प्रती ॥ तें परियेसीं यमा ॥१०३॥
महा पुण्य शीलां तूं पूर्ण धर्म ॥ महा दोषियांचा तूं क्रूरा यम ॥ ऐसा वर दिधला उत्तम ॥ विश्चनाथें यमासी ॥१०४॥
तंव तो धर्म राजा ॥ शिव चरणीं ॥ स्तवीत लोटला बद्ध पाणी ॥ म्हणे जय जय जी भाललो चनीं ॥ कर्पूर गौरा ॥१०५॥
स्वामी तूंचि त्रैलोक्य जीव तारणा ॥ तूंचि कर्ता करविता सर्व कारणा ॥ जी तूं समर्थ मी एका आनना ॥ किती वाखणूं ॥१०६॥
ऐसी त्या धर्म रायाची स्तुती ॥ परिसोनि तोषला पशुपती ॥ तंव विमान उतरलें क्षितीं ॥ शत एक संख्या ॥१०७॥
प्रथम विमानीं घातलीं पांखरें ॥ समस्तांचीं केली दिव्य शरीरें ॥ कैला समार्गें लाविलीं शंकरें ॥ गणां करवीं ॥१०८॥
ऐसा या त्रिलोचनेश्वराचा महिमा ॥ तुज निरूपिला म्यां धर्मा ॥ आतां जे पूजिती धर्मेश्वरा उत्तमा ॥ ते तुज अजित ॥१०९॥
धर्म कूपीं करिती स्नानदान ॥ न्यायिक द्र्व्यें सत्पात्रीं भोजन ॥ ते पुत्र कलत्रेंसीं पावन ॥ होतील काशी वासी ॥११०॥
तरी याचि लिंगा जवळी मी आतां ॥ अहो रात्र असेन गा कृतांता ॥ मग शिव त्या धर्मा देखतां ॥ लीन झाला त्याचि लिंगीं ॥१११॥
तंव यमपुरीहूनि स्वभार ॥ चतुर्दश कोटी आले किंकर ॥ तिंहीं नमस्कारिला सूर्य कुमर ॥ स्थपिला यमनगरीं ॥११२॥
स्वामी म्हणे महा मुनी अगस्ती ॥ ते अगम्य शिवाची अवि मुक्ती ॥ मजही वाखाणितां नाहीं तृप्ती ॥ कथितां तुजलागीं ॥११३॥
विश्वनाथाचें प्रेम धैर्य जैसें ॥ तैसींचि लिंगें असती चतुर्दशें ॥ हीं काशीचे ठायीं महा प्रयासें ॥ मुक्तिदायक ॥११४॥
जैसा विश्वेश्वराचा पूर्ण महिमा ॥ तैसींचि हीं लिंगें पूर्णागमा ॥ ब्रह्मा इंद्रादिदेव पुरुषोत्तमा ॥ महा दुर्लभ हीं ॥११५॥
तीं चतुर्दश लिंगें तुज प्रती ॥ श्रवण करूं गा ऋषी अगस्ती ॥ त्यांचिया नाम स्मरणें अवि मुक्ती ॥ प्राप्त होय तक्ताळ ॥११६॥
ब्रह्मेश्वर अविमुक्तेश्वर ॥ विधीश्वर पिता महेश्वर ॥ गंगातीरीं दशाश्वमेधेश्वर ॥ हीं पांच लिंगे ब्रह्म याचीं ॥११७॥
आणिक लिंगें येथें चतुराननें ॥ कोटि एक स्थापिलीं विरिंचीनें ॥ पंचलक्ष स्थापिलीं नारायणें ॥ मणिकर्णिकेतीरीं ॥११८॥
शैलेश्वर दक्षेश्वर केदार ॥ यमेश्वर धर्मेश्वर अमृतेश्वर ॥ ज्योतिरूपेश्वर वीरेश्वर ॥ आणि वृद्धकाळेश्वर तीं ॥११९॥
आदित्य सोम मंगळ बुधेश्वर ॥ बृह स्पति शुक्र शनीश्वर ॥ चतुर्दश लिंगां मध्यें बडिवार ॥ त्या सप्त लिंगांचा ॥१२०॥
ऐसीं काशीच्या ठायीं लिंगें असती ॥ अपार शिवाची सामर्थ्य शक्ती ॥ ते मज न सांगवे रे अगस्ती ॥ षडाननीं पैं ॥१२१॥
शिव दास गोमा प्रार्थी श्रोतयां प्रती ॥ क्षमा कीजे माझिये अल्पमती ॥ आतां स्वामीसी प्रश्नील अगस्ती ॥ तें परिसा आतां ॥१२२॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे गयामाहात्म्यवर्णने चतुर्दशलिंगमाहात्म्यवर्णनं नाम पंचसप्ततितमाध्यायः ॥७५॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति पंचसप्ततितमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP