मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय २६ वा

काशी खंड - अध्याय २६ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
मग शिवशर्मा आणि गण ॥ ऊर्ध्व क्रमिते जाहाले विमानीं बैसून ॥ मग विलोकिती अधोवदन ॥ भूमंडळ संतोषें ॥१॥
सप्तद्वीपें कुळाचळ ॥ गंगा सरिता आणि सिंधुजळ ॥ ऐसें देखिलें तें भूमंडळ ॥ गोष्पदासमान ॥२॥
पुनरपि क्रमितां विमानीं ॥ पुढें आश्चर्य देखिलें नयनीं ॥ प्रकाशे महादीपमणी ॥ अलक्ष्य तेज अपार ॥३॥
तंव देखिलें वैकुंठभुवन ॥ कीं तें चतुराननाचें जन्मस्थान ॥ द्श लक्ष योजनें प्रमाण ॥ तया विष्णुपुरीचें ॥४॥
जेथें बैसती सिंधुसुता आणि हरी ॥ किती वाखाणावी ते पुरी ॥ गुण वर्णितां वैखरी ॥ शिणला तो सहस्त्रमुख ॥५॥
आणिका भुवनींचा जो महिमा ॥ तया दीजे वैकुंठाची उपमा ॥ जो प्रिय लक्ष्मीपुरुषोत्तमा ॥ तो वर्णू कवण्या वाचेनें ॥६॥
तरी जें स्कंदपुराणींचें कथन ॥ वाखाणिलें हरीचें भुवन ॥ तें संकलितमार्गें आतां श्रवण ॥ करवूं श्रोतयांसी आदरें ॥७॥
तेथें दश लक्ष योजनें क्षिती ॥ अवघ्या जांबूनदभूमि शोभती ॥ त्यांवरी फांकतसे दिव्य दीप्ती ॥ सुरंगरत्नमाणिकांची ॥८॥
गण आणि शिवशर्मा विमानीं ॥ त्यांद्दीं देखिलें विष्णुभुवन नयनीं ॥ तें आतां श्रोतयां श्रवणीं ॥ सांगू संकलित मार्गानें ॥९॥
कैसी देखिली विष्णुपुरी ॥ विश्वकर्म्यानें रचिलें स्वकरीं ॥ त्या सुवर्णाचळाचिया पाठारीं ॥ हरीभुवन साजिरें ॥१०॥
कल्पद्रुमांचीं उपवनें ॥ कामधेनूंचीं गोठणें ॥ चिंतामणींचीं अंगणें ॥ धामीं धामीं विराजती ॥११॥
सहस्त्र योजनें मंदिरस्थान ॥ तेथें लक्ष्मीचें भोगभवन ॥ चौसष्टिक जें सुवर्णवर्ण ॥ कमाविलें कुशलत्वें ॥१२॥
आणिक पंचशत योजनें संपूर्ण ॥ हेमहुडे शोभती व्योमीं विस्तीर्ण ॥ त्यावरी प्रभा फांकती शुद्ध-संकीर्ण ॥ पद्मराग-गोमेदांचिया ॥१३॥
जैसीं जळीं नक्षत्रें बिंबती ॥ तरणी आणि तारापती ॥ तैसीं अवनिगर्भीं दिसती ॥ बिंबें प्रतिबिंबांचीं ॥१४॥
शत योजनें द्देमस्तंभा ॥ जडल्या त्या इंद्र्नीलांच्या प्रभा ॥ ध्वजाग्रें चुंबिती नभा ॥ जैशा गंधर्वगर्भीं दामिनी ॥१५॥
भरलिया पीयूषाच्या सरिता ॥ तेथें मृत्यु नसे तत्त्वतां ॥ जेथें निरंतर राहाणें लक्ष्मीकांता ॥ तें स्थळ किती वर्णावें ॥१६॥
सप्तखणी शोभती दिव्यतेजा ॥ सोमकांत जडिले बरव्या वोजा ॥ मंडपाग्रीं मिरवती ध्वजा ॥ जेवीं सिंधूच्या लहरी ॥१७॥
तरी ते लक्षितां विष्णुपुरी ॥ रवि काळवटती कोटिवरी ॥ अजरामर नरनारी ॥ घरोघरीं पतिव्रता ॥१८॥
त्या संपूर्ण जी चंद्रवदना ॥ रूपलावण्यें दुजें तुळेना ॥ दिव्य बरें जयांसी परिधाना ॥ दिव्यसुगंधा सर्वही ॥१९॥
सर्व शास्त्रीं त्या प्रवीण ॥ त्रिग्रामीं आळविती गायन ॥ कंठ कोकिळाध्वनी पूर्ण ॥ पंचमस्वरें बोलती ज्या ॥२०॥
अवघिया सिंधूच्या कुमरी ॥ अवघे चतुर्भुजचि हरी ॥ सरिता प्रवाहती पीयूषापरी ॥ घृत-मधूंचिया सुस्वाद ॥२१॥
तेथें सर्व लोक गरुडवाहनी ॥ अवघे पीतांबरधारी शेषशयनी ॥ मेघवर्ण कौस्तुभमणी ॥ सर्वकंठीं शोभती समान ॥२२॥
अवघे चक्रधारी वैकुंठवासी ॥ तेथें उपमा दीजे ती कायसी ॥ लक्ष कोटी सविता शशी ॥ अधिक्र प्रभा त्यांहूनही ॥२३॥
आतां असो हें वर्णन ॥ जेथें वसती लक्ष्मीनारायण ॥ तेथें ऋद्धिसिद्धी संपूर्ण ॥ ओळंघती त्रिकाळ ॥२४॥
त्रैलोक्यभुवनांसी श्रृंगार ॥ पुरोनि उरला शार्ङ्गधर ॥ वाखाणितां कद्रुकुमर ॥ शिणला तो सहस्त्रमुखें ॥२५॥
म्हणोनि मानवी काय जाण ॥ जैसा लोहार नेणे हिरण्यगुण ॥ कीं मृगेंद्राचें गुणप्रमाण ॥ काय जाणे जंबुक ॥२६॥
कीं मैलागिरीचा गुण ॥ पांगारा जाणेल कोठून ॥ कामधेनूचें दुग्धपान ॥ मंडूकें काय वर्णावें ॥२७॥
नातरी मार्तंडाची दीप्ती ॥ खद्योत कैसे प्रकाशूं जाणती ॥ मुक्तें केवीं प्रसवती ॥ शुक्तिका ग्रामसरितेचिया ॥२८॥
म्हणोनि देवांसी जें अगम्य ॥ तें मानवांसी केवीं गम्य ॥ तरी पूर्वार्जितावीण निःसीम ॥ न पवे जाण मानवा ॥२९॥
आतां असो हे द्दष्टांतयुक्ती ॥ कथेसी विलंब होतसे पुढती ॥ तंव बोलिला द्विजमूर्ती ॥ गणांप्रती ॥३०॥
शिवशर्मा वदतसे गणां ॥ तुम्ही जाणतां भूत-भविष्य-वर्तमानां ॥ तरी प्रश्न असे जी सगुणा ॥ पुसणें तुम्हांसी ॥३१॥
देवदिक्पतींच्या भविष्योत्तरीं ॥ अनुवादली तुमची वैखरी ॥ परी माझें होणार पुढारी ॥ तें कथावें जी मजप्रती ॥३२॥
मज वैकुंठीं काय जी भोग ॥ पुढें कोण जन्म कोण मार्ग ॥ हा कथावा जी प्रसंग ॥ तुम्ही ज्ञाते गणोत्तमा ॥३३॥
गण म्हणती हो द्विजनाथा ॥ या भूतभविष्यांची जी कथा ॥ ती न म्हणावी गा वृथा ॥ कथित असे पुराणांतरीं ॥३४॥
म्हणोनि हें विपरीत न करी ॥ जें अनुवादलीं असती हरगौरी ॥ तेंचि सर्व पुराणांतरीं ॥ कथित असे सर्व ॥३५॥
तरी तें भविष्योत्तर ॥ तुज कथूं सविस्तर ॥ जें स्कंदपुराणीं शंकर ॥ अनुवादला गौरीसी ॥३६॥
श्रोते सावधान जी एकाग्र ॥ परिसा शिवशर्म्याचें होणार ॥ गण सांगते झाले सविस्तर ॥ जें शिवशर्म्यासी ॥३७॥
विमान पावलें वैकुंठभुवनीं ॥ आतां भेटेल चक्रपाणी ॥ शिवशर्म्यासी विष्णुगणीं ॥ नेलें हरिसभेसी ॥३८॥
तंव शिवशर्मा आश्चर्य करी ॥ लोक देखिले सभेमाझारी ॥ अवघे चतुर्भुज दिसती हरी ॥ कोणा करावें अभिवंदन ॥३९॥
मग तो भक्तांचा अंकित ॥ भक्त जाणोनि श्रीअनंत ॥ वेगें उठिला जी धांवत ॥ भेटीकारणें तयाच्या ॥४०॥
मग हरीनें ते समयीं ॥ शिवशर्मा आलिंगिला ह्रदयीं ॥ त्या आनंदाची नवायी ॥ काय वर्णावी एकमुखें ॥४१॥
शिवशर्म्यानें देखिलें अनंता ॥ तेव्हां उचंबळली चित्तसरिता ॥ कीं देखोनि मेघसघनता ॥ जैसा चातक आनंदे ॥४२॥
जेवीं रंकासी प्राप्त सुखासन ॥ कीं दुर्बळाचे शेतीं वर्षे घन ॥ कीं महादोषियासी प्राप्त जीवन ॥ जान्हवीचें अंतकाळीं ॥४३॥
कीं निर्दैवा सांपडे चिंतामणी ॥ कीं अभाग्या जोडे कामधेनु येऊनी ॥ तैसा देखोनि नारायण ते क्षणीं ॥ आनंदला तो शिवशर्मा ॥४४॥
आरोग्य होय रोगियाप्रती ॥ कीं अमृता वरपडा होय क्षुघार्थी ॥ कीं वंध्यागृहीं पुत्रसंतती ॥ शिवशर्म्यासी झालें तैसें ॥४५॥
कीं सांपडे पूर्वजांचा ठेवा ॥ कीं परीस प्राप्त होय हतदैवा ॥ ऐसें देखोनि माधवा ॥ वर्तलें शिवशर्म्यासी ॥४६॥
शर्कराघृताचें करितां भोजन ॥ तृप्त होय अनाथ दीन ॥ कीं व्योमीं भासला पूर्ण ॥ चकोरां चंद्र जैसा कां ॥४७॥
देखिला चतुर्भुज श्रीहरी ॥ कौमोदकी गदा कठिण करीं ॥ छत्र त्राहाटिलें मस्तकावरी ॥ सहस्त्र योजनें ॥४८॥
शत सहस्त्र रविशशी ॥ तैसें दिव्य तेजोराशी ॥ रत्नें जडिलीं तया कळसासी ॥ अमित प्रभा जयांची ॥४९॥
कंठीं कौस्तुभ विजयंती माळा ॥ कमळनयन घनसांवळा ॥ कपाळावरी पिंवळा ॥ तिलक शोभला सुंदर ॥५०॥
शंखचक्रांकित तमाळनीळ ॥ जैसा तो सुवर्णाचळ ॥ शिवशर्मा प्रेमें व्याकुळ ॥ जाहाला देखोनि श्रीहरीसी ॥५१॥
म्हणोनि त्या आनंदाचा पूर ॥ सत्त्वें दाटला जी थोर ॥ सद्नदित झाला तो द्विजवर ॥ देखोनि हरिमूर्तीतें ॥५२॥
लोपामुद्रेसी म्हणे अगस्ती ॥ ऐसा देखिला चक्रपती ॥ मग करिता झाला स्तुती ॥ शिवशर्मा तो ॥५३॥
म्हणे जयजयाजी पूर्णभरिता ॥ सर्वव्यापका सदोदिता ॥ मी उद्धरलों जी अनंता ॥ गाविंदा माधवा सर्वेशा ॥५४॥
तुझे चरण स्मरूनि मानसीं ॥ देह ठेविला मायापुरीसी ॥ देखीवया वैकुंठासी ॥ दैत्यमर्दना तुज आलों ॥५५॥
हरी तुझे नामस्मरणेंकरून ॥ महापातकांचें होय दहन ॥ जैसा तो चंद्र करी विध्वंसन ॥ अंधतमासी ॥५६॥
जैसा तो तम ग्रासी भास्कर ॥ कीं तृण दाही विश्वानर ॥ तैसे दग्धले दोषांकुर ॥ तुझिया नामाग्नीनें ॥५७॥
स्नान घडे गंगानीरीं ॥ यग कीजेती कोटिवरी ॥ तरीच तूं चक्रधारी ॥ द्दश्य होसी भक्तांकाणें ॥५८॥
तंव बोलिला तो कमळापती ॥ म्हणे गा ब्रह्मवत्सा द्विजमूर्ती ॥ तुझी अगाध अनुपम भक्ती ॥ ते मज आधींच पावली ॥५९॥
मग शिवशर्मा करीं धरूनी ॥ बैसविला विष्णूनें सिंहासनीं ॥ जैसा सर्वाभरणीं चक्रपाणी ॥ तैसाचि केला शिवशर्मा ॥६०॥
लोपामुद्रेसी म्हणे कुंभज ॥ मायापुरीसी निमाला द्विज ॥ म्हणोनि तयासी गरुडध्वज ॥ भेटला साक्षात वैकुंठीं ॥६१॥
ऐसा दशलक्ष वर्षेंवरी ॥ शिवशर्म्यासी विष्णुपुरी ॥ दिव्यभोग बरव्यापरी ॥ भोगी दिव्य देवांगनांतें ॥६२॥
पुण्यभोग सरल्यावरी ॥ मग जन्म देता जाहाला श्रीहरी ॥ नंदिवर्धन देशामाझारी ॥ केला तो भूपती ॥६३॥
तो महाराज भूपाळ ॥ धर्मवृत्ति पुण्यशीळ ॥ तया नाम ठेविलें ऊर्ध्वकमळ ॥ तो चालवीराज्यपद ॥६४॥
ऐसा तो कर्मनीतिमार्गें पवित्र ॥ तयासी दश सहस्त्र पुत्र ॥ आणि तीन शतें कलत्र ॥ धर्ममूर्ती केवळ तो ॥६५॥
आणि शत एक दुहिता ॥ गृही सर्व संपति तत्त्वतां । मदोन्मत्त गज असंख्याता ॥ ऐरावतीसमान ॥६६॥
साठ लक्ष रहंवर ॥ वारू जुंपिले चार चार ॥ जैसे भ्रमती गगनोदर ॥ सूर्यरथींचे साक्षात ॥६७॥
चार कोटी त्याचा परिवार ॥ ऐसा तो संपन्न नृपवर ॥ सदा पुण्यशील नित्याचार ॥ धर्मपरायण ॥६८॥
गण म्हणती हो द्विजा ॥ ऐसा तूं नंदिवर्धनींचा राजा ॥ पीडा नाहीं तुझिया प्रजा ॥ आधिव्याची नसेचि ॥६९॥
अवघे तुझे लोक धनाढय ॥ कोणासही नसे दरिद्र ॥ सुशब्द वाणी बोलती भद्र ॥ नाहीं तेथें पापवासना ॥७०॥
अवघ्या पतिव्रता कामिनी ॥ पुण्यशील स्वामिभक्तिणी ॥ परपुरुषाचे मातश्रवणीं ॥ बधिरत्व तयांसी ॥७१॥
तंव त्या गणांसी पुसतसे द्विजवर ॥ म्हणे उर्ध्वकमळाचें राष्ट्र ॥ तरी त्या लोकांमध्यें गर्व अहंकार ॥ विशेष असेल सर्वांहूनी ॥७२॥
लटिकें आणि अबद्ध भाषण ॥ वांकडें आणिक दंडन ॥ दंभ मद मत्सर हे गुण ॥ कैसे लोकांमाजी ॥७३॥
भाव आणि कृपा ॥ शुभ आणि क्षमारूपा ॥ हे सर्वही भाव त्या नृपा ॥ राज्यमदें कैसे पैं ॥७४॥
तंव गण म्हणती द्विजोत्तमा ॥ बरवें प्रश्निलें भविष्य आम्हां ॥ तरी राज्य करितां उत्तमा ॥ हे भाव नसती त्या स्थानीं ॥७५॥
तरी त्या नगरीं पतिव्रता कामिनी ॥ स्वामिदास्यत्वें शुभलक्षणीं ॥ गर्व असे त्यांचे कुचस्थानीं ॥ आणिक कोठें नसेचि ॥७६॥
राजसुखें जनसंतुष्टी ॥ जैसे जळजंतु अंबुपोटीं ॥ तरी अहंकार असे करितां वृष्टी ॥ मेघांपासीं तुषारांतें ॥७७॥
शरीर जाणोनियां अनित्य ॥ लटिकें म्हणती संसारकृत्य ॥ आणिका ठायीं असत्य ॥ नसे कोठेंही पाहातां ॥७८॥
मंदिरीं स्तंभ नानारंग ॥ कदंब वृक्ष चुंबिती नभं ॥ तेथें महाउंच तो मातंग ॥ आणिक उंच नसेचि ॥७९॥
महायोगी जे एकनिष्ठ ईश्वरीं ॥ महाज्ञानी ब्रह्मचारी ॥ दंड असे त्यांचेचि करीं ॥ आणिक दंड कोठें नसेचि ॥८०॥
त्या देशामाजी विचरतां ॥ वांकडे दिसती मार्ग सरिता ॥ वांकडी दांडी सुखासनीं बैसतां ॥ आणिक वांकडें कोठें नसे ॥८१॥
धान्य पेरिल्या शेतीं ॥ सरिता जळें खोलावती ॥ त्यांसी दांभिक जन म्हणती ॥ आणि दंभ कोठें नसे ॥८२॥
महाप्रचंड मदोन्मत्त ॥ गिरि जैसे नभचुंबित ॥ महाभद्रजाती नित्य मस्त ॥ आणिक मस्ती कोठें नसे ॥८३॥
शुभवासना लोकशरीरीं ॥ जैसे योगीश्वर ब्रह्मचारी ॥ काम चोरिती देखोनि परनारी ॥ आणिक चोरी कोठें नसेचि ॥८४॥
कुशब्द श्रवणीं बधिर ॥ पापासी आळस थोर ॥ कामक्रोधांचा संहार ॥ करिती महाप्रयत्नें ॥८५॥
दानें करिती महासुंदरी ॥ नित्य पूजिती त्रिपुरारी ॥ याविषयीं स्वार्थ भारी ॥ आणिक स्वार्थ नसे कोठें ॥८६॥
पठन करावयासी वेदशास्त्रें ॥ स्तुति बोलावया शिवस्तोत्रें ॥ शिव पूजावया दिव्यमंत्रें ॥ हव्यास थोर निजमानसीं ॥८७॥
बरविया शिवस्थाना ॥ बरव्या पूजिती कुलांगना ॥ बहु अष्टगंधं पंचानना समर्पिती सद्भावें ॥८८॥
भावभक्तींत अंतर नसे लवलेश ॥ भय थोर मानिती ऐकतां दोष ॥ दीनांवरी दया बहुवस ॥ करिताती नित्य नित्य ॥८९॥
व्यापार असे सर्व जनीं ॥ शिवकथा ऐकती श्रवणीं ॥ साक्षेप मोठा भजनीं ॥ शिवनामाचा सर्वदा ॥९०॥
हरिगण म्हणती गा द्विजा ॥ ऐसिया देशींच्या राजा प्रजा ॥ दानाविरहित सहजा ॥ न क्रमिती सर्वथा ॥९१॥
ऐसा तूं संपन्न नृपती ॥ नंदिवर्धनींचा भूपती ॥ ऐसें राज्य करितां गभस्ती ॥ क्रमील बहुकाळ ॥९२॥
मग कोणे एके अवसरीं ॥ कापडी जात होते काशीपुरीं ॥ ते प्रवेशले नगरद्वारीं ॥ ऊर्ध्वकमळाचिया ॥९३॥
ते कापडी भेटले रायासी ॥ रायें बहु सन्मानिलें तयांसी ॥ मग षोडशोपचारेंसीं ॥ पूजिले ते सर्वही ॥९४॥
केले अष्टगंध उपचार ॥ दिधलीं दिव्यवस्त्रें अलंकार ॥ आणिक अनेक वस्तु सपरिकर ॥ दिधल्या तयांसी बहुसाल ॥९५॥
मग कापडी बोलती आशीर्वचन ॥ राया तुज घडेल आनंदवन ॥ करिसी विश्वनाथाचें स्नपन ॥ मंदाकिनीजळेंकरूनियां ॥९६॥
तुम्हांसी होईल काशीवास ॥ चिंतिलें कार्य करील महेश ॥ आणि जोडेल कैलास ॥ पूर्वजांसहित पैं ॥९७॥
ऐसें दिधलें आशीर्वचन ॥ मग रायें अर्पिलें दिव्य हिरण्य ॥ मग कापडियें आज्ञा घेऊन ॥ केलें गमन काशीपुरा ॥९८॥
मग कोणेएके काळीं ॥ उर्ध्वकमळ बैसला भद्रस्थळीं ॥ मंत्री पाचारोनि जवळी ॥ आज्ञा करीतसे तयासी ॥९९॥
आपुले जे दश सहस्त्र पुत्र ॥ त्यांमाजीं जो असेल परम पवित्र ॥ साक्षु नामा त्यासी छत्र ॥ दीजे आतां राज्यपदाचें ॥१००॥
केला सर्व भांडाराचा अधिपती ॥ अश्व कुंजर राज्यस्थिती ॥ तीन शतें भार्या असती ॥ त्या निरविल्या तयासी ॥१०१॥
मग जे मुख्य राजांगना ॥ जी नामें सदाचारिणी जाणा ॥ तियेसह निघाला आनंदवना ॥ ऊर्ध्वकमळ तेधवां ॥१०२॥
सवें द्र्व्य घेटलें अपार ॥ भरले अमित रथ कुंजर ॥ रत्नमणी घेतले परिकर ॥ नाना जातींचे अमूल्य ॥१०३॥
ऐसा राजा आनंदवना ॥ आला त्या अविमुक्तिस्थाना ॥ देखता जाहाला जीवना ॥ जान्हवीचिया ॥१०४॥
मग राजा आला चक्रपुष्करिणीं ॥ जे मणिकर्णिका काशीभुवनीं ॥ तेथें स्नानविधि सारूनी ॥ अर्चिला शिव विश्वनाथ तो ॥१०५॥
नाना रत्नें मुक्तें अविंध ॥ शुद्धवर्ण कमळें सुगंध ॥ नाना जातींचीं पुष्पें अगाध ॥ सहस्त्र एक आणिलीं ॥१०६॥
मग मणिकर्णिकेचें जें जळ ॥ तेणें राजा स्नपी जाश्वनीळ ॥ मग तपीं बैसला ऊर्ध्वकमळ ॥ घेतलें अनशनव्रत ॥१०७॥
मग रायें केली लिंगस्थापना ॥ उभविलें हेममय भुवना ॥ महाउंच तें चुंबित गगना ॥ रत्नखचित स्वर्गपर्यंत ॥१०८॥
रचिला सुवर्णाचा प्रासाद ॥ वरी जोडिले हिरे गोमेद ॥ पद्मरागांचे किरणभेद ॥ पताकाप्रभा शोभिवंत ॥१०९॥
ऐसा प्रासाद केला थोर ॥ लिंग स्थापिलें ऊर्ध्वकमळेश्वर ॥ मग दानें करीतसे नृपवर ॥ ऊर्ध्वकमळ तो स्वकरेंसीं ॥११०॥
ऐसी केली दिव्यरचना ॥ अश्व गज अर्पिले ब्राह्मणां ॥ हिरण्य महारत्नें पूर्ण दाना ॥ दिधलीं तयानें अपार ॥१११॥
दिधलीं वस्त्रें अलंकार ॥ द्रव्य वेंचिलें तेव्हां अपार ॥ सुखी केले द्विजवर ॥ नाना दानें देऊनियां ॥११२॥
घेतलें व्रत अनशन ॥ नित्य कमळकूपोदकीं स्नान दान ॥ मणिकर्णिकाजळें पूजन ॥ त्रिकाळ करी हराचें ॥११३॥
ऐसें तप करितां दंपती ॥ क्रमिले बहुत गभस्ती ॥ तंव तेथें प्रवर्तली प्रतीती ॥ कांहीं एक प्रासादीं ॥११४॥
स्नान करूनि कमळकूपीं ॥ लिंग पूजूनि बैसला जपीं ॥ तंव चमत्कार जाहाला मंडपीं ॥ तो कैसा काय परिसावा ॥११५॥
तंव प्रासादाहूनि एकसरां ॥ पुरुष आला म्हातारा ॥ तेणें देखोनि उर्ध्वकमळेश्वरा ॥ वर्तलें आश्चर्य थोर पैं ॥११६॥
अंगीं भस्माचें लेपन ॥ जटा भूमंडळीं रुळती पूर्ण ॥ विशाळ रूप विकट आनन ॥ दशन अधरीं विशाळ ॥११७॥
वृद्ध परम जर्जर ॥ घांटी घरघरी दीर्घ स्वर ॥ प्रासादी अवलोकीतसे ऊर्ध्वदिग्वक्त्र ॥ पाहातसे रचना नेत्रीं तो ॥११८॥
स्तंभ देखूनि रत्नखचित ॥ प्रासादाग्रें नभचुंबित ॥ कळसीं ध्वज पताका मिरवत ॥ दिव्य पट्टांबरांचिया ॥११९॥
ऐसा देखोनि प्रासाद ॥ मग तो वृद्ध बोलिला शब्द ॥ करिता जाहाला अनुवाद ॥ ऊर्ध्वकमळासी ॥१२०॥
म्हणे कैसी दिव्यरचना ॥ आणि कैसी बरवी लिंगस्थापना ॥ कमळकूपाचिया जीवना ॥ अमृताची असे समता ते ॥१२१॥
ऐसें देखोनियां रम्य स्थळ ॥ म्हणे कवणें रचिलें हें देऊळ ॥ कोणें निर्मिलें हें कमळकूपजळ ॥ अमृतासमान सदय तो ॥१२२॥
तंव ऊर्ध्वकमळ बोलिला वचन ॥ कर्ता करविता एक पंचानन ॥ जयाचिया आधारें त्रिभुवन ॥ चाले हा सर्व सृष्टिक्रम ॥१२३॥
ऐसे बोलिला नृपवर ॥ तेणें परम तोषला दिगंबर ॥ मग तो निघाला स्नानासी सत्वर ॥ कमळकूपामाझारीं ॥१२४॥
स्नान करूनि आला बाहेरी ॥ तंव तारुण्यदशा झळकली शरीरीं ॥ ऊर्ध्वकमळ मनीं आश्चर्य करी ॥ मग प्रश्न करी तयासी ॥१२५॥
तुम्ही वृद्ध ते झाला तरुण ॥ काया दिसे जैसें दिव्य हिरण्य ॥ हा सांगावा जी कोणाचा गुण ॥ दिगंबरा स्वामिया ॥१२६॥
मग रायासी बोलिला दिंगबर वचन हें ऐसेंचि असे काशीस्थान ॥ हें विश्वनाथाचें निजभुवन ॥ भूकैलास प्रत्यक्ष ॥१२७॥
या कमळकूपीं स्नान करितां ॥ क्षण न लागे वृद्धाचा तरुण होतां ॥ व्याधि व्यथा दुःख दरिद्रवार्ता ॥ स्वन्पींही सर्वथा नेणेंचि ॥१२८॥
येथें करील जो स्नान दान ॥ ऊर्ध्वकमळेश्वरी पूज्यपूजन ॥ तरी त्यासी होईजे पावन ॥ कैलासपद जें ॥१२९॥
आतां फलश्रुति सांगों कायी ॥ तेथें वर्तलें काय ते समयीं ॥ दिगंबरें ऊर्ध्वकमळराव ह्रदयीं ॥ धरिला करें निजप्रीतीं ॥१३०॥
आणि त्याची जे कामिनी ॥ तीतें आलिंगी शूलपाणी ॥ ऊर्ध्वकमळ सहपत्नी ॥ लिंगामाजीं गुप्त जाहाला ॥१३१॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसें उद्धरिले उर्ध्वकमळासी ॥ तो पूर्वजांसह कैलासवासी ॥ केला शिवें तत्काळ ॥१३२॥
ऐसें तुझें गा होणार ॥ तें तुज कथिलें सविस्तर ॥ मग शिवशर्मा भविष्योत्तर ॥ पावला जाण तैसेंचि ॥१३३॥
लोपामुद्रेसी सांगे अगस्ती ॥ ऐसीं हीं तीर्थें मोक्ष देती ॥ हें पठण केल्या अविमुक्ती ॥ प्राप्त वाराणसी साक्षात ॥१३४॥
हा प्रसंग महापुण्यपावन ॥ शिवालयीं करी जो श्रवण पठण ॥ तो पूर्वजांसहवर्तमान ॥ वसे शिवसभेसी ॥१३५॥
आतां स्वामी अगस्तीची भेटी ॥ श्रवण करितां होय तुष्टी ॥ हे कथा कर्मकाष्ठांची आगटी ॥ परिसा श्रोते हो आदरें ॥१३६॥
शिवदास गोमा दीनवदन ॥ प्रार्थीतसे श्रोतयांकारण ॥ हे कथा परिसावी पुण्यपावन ॥ होय उद्धरण पूर्वजांचे ॥१३७॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे विष्णुलोकवर्णनं नाम षडिंवशतितमाध्यायः ॥२६॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
श्रीरस्तु ॥ ॐ ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 28, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP