काशीखंड - अध्याय ७४ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्री गणेशाय नमः ॥ अगस्ति वदे जी शिवसुता ॥ शास्त्रसमुद्राचा विधियुक्त वक्ता ॥ माझ्या वियोगंद्रुमाचा उत्पाटिता ॥ वातस्वरूप तूं ॥१॥
मज क्षमा कीजे जी शिवकुमरा ॥ माझ्या पृच्छे चिया पूर्णपरिहारा ॥ त्रिकाळ पूज्य जंगम स्थावरां ॥ माझिया इच्छेसी तूं ॥२॥
तरी एक असे पृच्छेचा अवधारा भाव ॥ झालासे माझे ह्रदयीं उद्भव ॥ तो निरूपा जी अभिप्राव ॥ द्वादशभुजा ॥३॥
जें शिवासी प्रश्नी दाक्षायणी ॥ भविष्य कथिलें स्कंद्पुराणीं ॥ साक्षात विष्णूरूप तो व्यासमुनी ॥ जो पराशरसुत ॥४॥
जेणें चहूं वेदांचीं केली मंथनें ॥ कथिलीं अष्टादश पुराणें ॥ तो बांधला कवणिया लांछनें ॥ तें निरूपा मज स्वामिया ॥५॥
काशीमध्यें तॊ असोनि ऋषि ॥ अद्यापि प्रतीति नाहीं त्यासी ॥ जोडिलें तेणें कवण्या द्रोहासी ॥ तें निरूपा जी एकदां ॥६॥
मग स्वामी वदे गा महामुनी ॥ तूं शिवकथारत्नांची पूर्ण खाणी ॥ ज्या लांछनें बांधला व्यासमुनी ॥ तें परिसें आतां ॥७॥
जेव्हां येतसे विनाशकाळ संधी ॥ तैं शरीरीं उद्भवे विपरीतबुद्धी ॥ तेव्हां विमुख होतसे साध्यसिद्धी ॥ ब्रह्मा दिकांसी ॥८॥
हें स्वर्ग मृत्यु पाताळविवर ॥ एवढें एक ब्रह्मांड थोर ॥ तो साक्षात एकचि विश्वंभर ॥ भवानीकांत जो ॥९॥
तो परमेश्वर होता निर्गुण अक्षर ॥ परी इच्छेकरूनि झाला क्षर ॥ हरि विरिंचि हे मायांकुर ॥ इच्छा उद्बवीत ॥१०॥
ऐसी वेदाज्ञा असे पुरातन तरी ॥ जपतां मुक्त झाले ब्रह्मचारी ॥ अठ्ठयायसीं सह्स्त्र मुनिवरीं ॥ अंगीकारिलें हें वाक्य ॥११॥
शास्त्रवाक्य जे न मानिती कोणी ॥ ते प्रतिसाक्ष पाहिजे पुराणीं ॥ तेंचि चतुर्वेद मथूनी ॥ काढिलें व्यासें ॥१२॥
मग तेणें निषेधिलें वेदा ॥ केली परमेश्वराची निंदा ॥ देखता झाला द्वैतभाव भेदा ॥ हरि हरांसी ॥१३॥
हरि हरांमाजी देखती द्वैत ॥ तें पंचमहादोषी निभ्रांत ॥ त्यांसी कल्पातीं नाहीं प्रायश्चित्त ॥ ऐसी वेदाज्ञा असे ॥१४॥
म्हणोनि व्यासें निंदिलें विश्वनाथा ॥ निर्भर्त्सिलें शुद्ध वेदार्था ॥ स्वामी म्हणे ते आदि अवसानकथा ॥ परियेसीं गा अगस्ती ॥१५॥
संख्या आनंदवनापासून ॥ सप्त सहस्त्र गणित योजन ॥ तें बदरिकाश्रम तप स्थान ॥ महा ऋषींचें असे ॥१६॥
त्या बदरिकाश्रमा गेला व्यासमुनी ॥ ऋषीचीं पुरें देखतसे नयनीं ॥ अवघी हेमरत्नांची उभवणी ॥ ऋषिमठ मंडप ॥१७॥
गुंफा देखिल्या ऋषीश्वरां चिया ॥ त्यांवरी कल्पवृक्षांची छाय ॥ तेथें विरिंचि ऋषीची भार्या ॥ कन्याकुमरेंसीं ॥१८॥
त्या उत्तुंगपर्वता चिया पाठारीं ॥ ऋषिगुंफा वसती पुण्यपुरीं ॥ हेमरत्नमंडिल बरब्या प्रकारीं ॥ ऋषीं चिया शाळा ॥१९॥
तेथें सूक्ष्म मुक्तां चिया चौका ॥ मध्यें सुरंग रत्नां चिया टांकणिका ॥ मरकत माणिकां चिया पाकोळिका ॥ वैदूर्यैं वेष्टिलिया ॥२०॥
तें बद्रिकाश्रम तपस्थान ॥ गुंफा वसलिया शतयोजन ॥ भूमिका बांधलिया ऋषि अंगण ॥ अवघ्या हेममय ॥२१॥
मठाग्रें चुंबिती व्योमाकाशा ॥ रविरश्मी फाकती दाही दिशा ॥ होतसे वेदध्वनीं चिया निर्घोषा ॥ तेणें व्योम ॥२२॥
ऋषि मंडप शोभले सोमकांतीं ॥ तयां गर्भीं शशी बिंबती ॥ मग ते प्रीतीनें जीवन स्त्रवती ॥ ते मिळती तडागीं ॥२३॥
शुभ मंडपीं मिरवती सुधामें ॥ जीं बिंबे त्रयोदशांचीं सुगमें ॥ हेममय बद्ध उत्तमें ॥ ध्वज धूम्र गज आय ते ॥२४॥
ऐसे शुभ आय त्या मंदिरा ॥ विरिंचि ऋषीची भार्या सुंदरा ॥ एक वृषभा आय शुभकरा ॥ मंडळी ऋषींची ॥२५॥
स्तंभमदिरें शोभती पद्मरागीं ॥ द्वादश योजनें उच्चता योगीं ॥ दिव्य कुमुदिनी मिरवती तडागीं ॥ रवि शशि आदिकरूनी ॥२६॥
तेथें कळसाग्रीं चिया दिव्य ध्वजा ॥ अंबुगर्भीं दिसती तेजा ॥ जैशा सौदामिनींपुटीं सहजा ॥ विधुप्रभा ॥२७॥
तेथें तडागा चिया पुण्यपाळीं ॥ दिव्यद्रुमांचिया लावण्य पोवळीं ॥ अग्रीं विकासिल्या दिव्य कमळीं ॥ आणिक इच्छाफळ देती ॥२८॥
आतां असो त्या महातप स्थानीं ॥ ऋषी तपासी बैसले महा ज्ञानी ॥ एक ते प्रळय इच्छिती मुनी ॥ निर्गुणातें ॥२९॥
एक ते बैसले पक्षोपवासी ॥ एक मासव्रतें वर्तती ऋषी ॥ कंदमुळें आहार एकांसी ॥ एक ते पवनाहारी ॥३०॥
एकांसी व्रतें अग्निहोत्रांचीं ॥ एकांसी पूज्यमान तो विरिंची ॥ एकांसी पूजा भवानीची ॥ वेदप्रसिद्ध जे ॥३१॥
एक ते ऊर्ध्वपाद अधोवन ॥ कवण एक उभे अंगुष्ठांचें प्रमाण ॥ एक व्रत करिती चांद्रायण ॥ कवण एक तापसी ॥३२॥
एक बैसले दर्भाग्रतोयपानीं ॥ एकांसी धूम्रपान अनुदिनीं ॥ एक निद्रित जाहाले शयनीं ॥ सरांटेवल्लीफळीं ॥३३॥
ऐसें तें तप स्थळ बद्रिकाश्रम ॥ जेथें पूर्वीं तप करीत होता पुरुषोत्तम ॥ तेथें लिंग स्थापी तो मेघश्याम ॥ त्या नाम शार्ङ्गधरेश्वर ॥३४॥
तें लिंग पूजिती मुनिजन ॥ साधिती कल्पवरी अनुष्ठान ॥ तरी ते आतां कवण कवण ॥ सांगों संकलित ॥३५॥
भृगुमुनि नारद दधीची ॥ वाल्मीकि नामदेव मरीची ॥ पराशर मार्कंडेय मांडव्याची दीर्घत पसिद्धी ॥३६॥
बैसला परशराचा पितर ॥ जो शक्ति नामें वसिष्ठ कुमर ॥ आणिक दुर्वास प्रळयायुषी मुनिवर ॥ बकदाल्भ तो ॥३७॥
सर्व देवा सुरांचा जो पितर ॥ तो काश्यपराज मरीचि कुमर ॥ कणिक प्रलयायुषी मुनिवर ॥ लोक हर्षण ॥३८॥
ऐसे दीर्घ तपस्वी महा ऋषी ॥ कवण एक द्विप्रल्या युषी ॥ विश्वनाथ पूजितां एकाशी ॥ कल्पब्रह्मायु ॥३९॥
ऐसें जेथें महा ज्ञानी ॥ तेथें अवचित आला व्यास मुनी ॥ तो नमस्कारिला श्रेष्ठ मुनिजनीं ॥ श्रेष्ठ वक्ता जो कां ॥४०॥
मग समस्त ऋषींनीं प्रतिमा धरिल्या ॥ मग तो पूज्य स्थानीं बैसविला ॥ वेदविधीनें मृगाजिनीं पूजिला ॥ वयो वृद्धादिकीं ॥४१॥
मग व्यास वदे मुनि सवळां ॥ तुम्ही प्रहारा त्या रुद्राक्षमाळा ॥ भाळीं विभूतीचा त्रिपुंड्र लावितां टिळा ॥ तो अव्हेरावा तुम्हीं ॥४२॥
प्रहारा शिवाचें पूजन ॥ साक्षात ब्रह्म तो नारायण ॥ तुळ सीमाळा गोपीचंदन ॥ अंगीकार तुम्ही ॥ ॥४३॥
मी जाणें चतुर्वेदांचा गर्भभाव ॥ साक्षात ब्रह्म तो वैकुंठराव ॥ आजिपर्य़ंत पूजिला सदाशिव ॥ तें वृथाचि स्मरण ॥४४॥
ऐसी व्यासऋषीची शब्दवाणी ॥ श्रवणीं परिसिली ऋषिजनीं ॥ शिव निंदिला हरि स्थापुनी ॥ त्या ऋषींमाजीं ॥४५॥
क्षण एक जाहालें देहविसर्जन ॥ क्षितीं पडिले मूर्च्छा येऊन ॥ मृगाजिनीं बैसले होते जाण ॥ जाहाले ते देहगलित ॥४६॥
तंव एक ऋषी बोले वेदवाक्यें ॥ जीं शिव भक्ति संवादके ॥ केवीं शिव निंदिला ऋषि नायकें ॥ कृष्णद्वैपायनें ॥४७॥
अरे जो मंत्र न पुसतां ब्रह्मसाक्ष ॥ जेणें प्राप्त होय सायुज्य मोक्ष ॥ तो केवीं निंदिला विरूपाक्ष ॥ विश्वंभर जो ॥४८॥
मार्कंडेय वदता जाहाला व्यासा ॥ पडलासी योगमाये चिया वळसा ॥ वेदार्थ प्रहारूनि पिसा ॥ भ्रमसी अहंममतामार्गें ॥४९॥
तुज पडलें योगमायेचें भुलेरें ॥ खंडिलासी विनाशकाळ फणिवरें ॥ तेणें विषाग्नीचीं लहरें ॥ प्रवर्तलीं तुजलागीं ॥५०॥
प्रळय क्रमिले शिव पूजितां ॥मुक्ति प्राप्ता जाहा लिया स्वस्थ असतां ॥ हा योग कां निर्भार्त्सितोसी आतां ॥ भ्रांतिबद्धत्वें तूं ॥५१॥
म्ग व्यास वदे मार्कंडेयो ॥ माझेंचि कर्तव्य वेद निश्चयो ॥ आतांचि प्राप्त करीन जयो ॥ मुक्तीचा तुम्हांसी ॥५२॥
केलें चतुर्वेदांचें मथन ॥ कथिलीं अष्टा दशापुराणें पूर्ण ॥ तुम्हांसी मुक्ति जाहाल्या पावन ॥ त्या माझेचि शास्त्रार्थें ॥५३॥
आतां हेंचि कथितों तुम्हांसी ॥ जेणें प्राप्त व्हाल मुक्तिपदासी ॥ तंव एक बोलता जाहाला महा ऋषी ॥ व्यासासी प्रति उत्तर ॥५४॥
बकदाल्भ्य म्हणे व्यसमुनी ॥ तूं जरी जाहालासी तत्त्वज्ञानी ॥ तरी आम्ही स्मरतों शार्ङ्गपाणी ॥ वैकुंठवासी तो ॥५५॥
हें तंव विपरीत केलें गा महाकविका ॥ केवीं प्रवर्त विसी या त्रिलोका ॥ तरी आम्हांसी दीजे लिखित पत्रिका ॥ मुक्ति स्थळाची ॥५६॥
मरीचि म्हणे कृष्ण द्वैपायना ॥ महामुक्ति स्थळ निर्मिलें त्रिभुवना ॥ जेथें वास भवानी पंचाननां ॥ तें काशी स्थळ जाण ॥५७॥
तरी तेथींचें आम्हां लिखितपत्र ॥ व्यासा तुवां आणावें वेगवत्तर ॥ तरी आम्ही समूळ मानूं मंत्र ॥ तुझी आज्ञा जे कां ॥५८॥
मग व्यास वदे जी तथास्तु ॥ तुम्हांसी पतिका आणीन बहुतु ॥ तरीचि मी सत्यवतीसुतु ॥ पराशरपुत्र ॥५९॥
मग तो ब्रह्मचारी संन्यासी ॥ मार्ग क्रमिता जाहाल वाराणसी ॥ दहा सह्स्त्र शिष्यवर्गेंसीं ॥ आला आनंदवना ॥६०॥
न घेचि भागीरथीचें दर्शन ॥ केलें विष्णुपादोदकें तीर्थस्नान ॥ तेथेंचि पूजिला तो नारायण ॥ आदिकेशव मूर्ती ॥६१॥
मग पंचगंगेसी स्नान करूनी ॥ बिंदुमाधवीं आला व्यासमुनी ॥ तेथें पंचरात्र क्रमोनी ॥ पूजिला बिंदुमाधव ॥६२॥
मग काय करी तो काशी निवासी ॥ तेथें शिव आज्ञा जाहाली भवानीसी ॥ भिक्षा न द्यावी शिव निंदकांसी ॥ वाराणसी मध्यें ॥६३॥
क्षुधें पीडिजे जंव प्राणान्त ॥ ऋषी मध्यें निंदक महा द्भुत ॥ हा अमंगळ पराशरसुत ॥ पावेल पीडा ॥६४॥
ऐसी आज्ञा जाहाली भवानी प्रती ॥ मग नंदीगणांसी बोले पशुपती ॥ अरे व्यासें निंदिली अविमुक्ती ॥ त्यासी कीजे दोषद्रोह ॥६५॥
मग काय करी तो व्यासमुनी ॥ काशी मध्यें उभारिला दक्षिणपाणी ॥ अरे न पूजावा हा पंचाननी ॥ नाहीं देव विष्णुपर ॥६६॥
तंव काशीमध्यें शिवव्रती एक ॥ त्रिकाळ शिवाचा उपासक ॥ पूजिलियाविण त्र्यंबक ॥ तो अन्न पान ग्रहण न करीच ॥६७॥
म्हणोनि विश्वनाथासी तो तापसी ॥ आला पूजाव्रत कारवयासी ॥ मुक्तिमंडपीं उभा राहोनि ऋषि ॥ काय पां वदता जाहाला ॥६८॥
तेथेंही दक्षिण भुजा उभारी ॥ व्यास आला शिवालयद्वारीं ॥ मग उच्चारिता जाहाजा वैखरीं ॥ नाहीं देव विष्णुपर ॥६९॥
स्वामी म्हणे गा अगस्ति ऋषी ॥ विनाशकाल क्षोभला त्यासी ॥ म्हणोनि निर्भर्त्सिली तेणें काशीं ॥ तें निरोपूं तुजलागीं ॥७०॥
अरे जे अनुवादले शिवींनंदा ॥ ज्यांहीं निभर्त्सिलें चतुर्वेदां ॥ ते प्राप्त होती महा आपदा ॥ प्राण ऐश्वर्यांसी ॥७१॥
तरी परियेसीं गा ऋषि कुंभजा ॥ शिवनिंदेनें गेला दक्षराजा ॥ अंतसमय पावला पुत्र प्रजा ॥ विनाशलिया ॥७२॥
आणिक काशीनिंदा केली ब्रह्मयानें ॥ त्याचें शिर छेदिलें काळानें ॥ मग ब्रह्मा रचिला पंचाननें ॥ तो चतुर्मुख पैं ॥७३॥
आणिक शिव निंदा केली नारायणें ॥ म्हणे मी उभा हा बैसला श्रेष्ठपणें ॥ त्याचें शिर कापिलें पंचाननें ॥ कुरुक्षेत्रीं तुझ्या यागीं ॥७४॥
म्हणोनि महादोषी तो शिवनिंदक ॥ त्यासी प्रायश्चित्त नसे धुंडितां त्रिलोक ॥ जैसा अस्तमानीं जाय अर्क ॥ तो न ये पुनरपि ॥७५॥
तैसा शिव निंदक जाहाला मुनिवर ॥ तेथें मुक्तिमंडपीं होता नंदिकेश्वर ॥ तेणें स्तंभिला व्यासाचा कर ॥ घ्राणस्वेंर पैं ॥७६॥
तो शिवद्वारीं भुजस्तंभ केला ॥ मग तेणें विष्णु स्तविला ॥ स्मरणकरितांचि पावला ॥ व्यासाजवळिकें ॥७७॥
व्यासचिया स्मरणांतीं ॥ कैसा धांविन्नला तो लक्ष्मीपती ॥ शिवद्वारीं आला बद्धहस्तीं ॥ क्षितीं मौळीं स्पर्शीत ॥७८॥
व्यासाजवळी आला श्रीअनंत ॥ म्हणे धांवा केलासी किंनिमित्त ॥ तंव हरीनें देखिला बद्धहस्त ॥ शिवद्वारीं व्यास ॥७९॥
मग श्रीहरि म्हणे रे मूढज्ञानी ॥ त्रैलोक्या अगम्य तो शूलपाणी ॥ अनंत ब्रह्मांडें राहिला व्यापुनी ॥ तो अविना शरूप ॥८०॥
त्याची सर्व स्वइच्छा हे अविमुक्ती ॥ हे अविनाश महाकल्पांतीं ॥ त्याचें कर्तव्य त्या पशुपती ॥ केवीं पां दोष ॥८१॥
म्हणोनि सगुण निगुण तो एकची ॥ जें आम्हांसी प्रतिवादला तो विरिंची ॥ तैं काळ भैरवें आमुची उभयांची ॥ भंगिली भ्रांति ॥८२॥
तैं विरिंचि गेलासे मुकुटा ॥ आम्ही गेलों होतों पाताळपुटा ॥ मग पाताळकंड गुरूनें द्रष्टा ॥ दाखविला शिव ब्रह्म ॥८३॥
ब्रह्मे जाहाले असंख्यवरी ॥ एक कोटी संख्या जाहाले हरी ॥ परी हा विश्वंभर त्रिपुरारी ॥ एकचि असे ॥८४॥
तुज क्षोभला रे विनाशकाळ ॥ म्हणोनि निंदिला त्वां जाश्वनीळ ॥ हें बंधबमुक्त करावया सबळ ॥ नव्हेंचि मी व्यास ॥८५॥
मी सेवेसी सावधान असें बद्धकरी ॥ त्याचे सेवकासी मी अशक्त हरी ॥ कैसी भ्रष्ट जाहली रे तूझी वैखरी ॥ जिनें निंदिला शिव ॥८६॥
आतां तुज केलें ह्स्तबंधन ॥ तरी त्याचेंचि करावें स्मरण ॥ हें बंधन मुक्त करावया कवणा ॥ दुजा त्रिलोकीं समर्थ ॥८७॥
ऐसें अनुवादला मुरारी ॥ मग स्वस्थाना गेला मौनाचारी ॥ तंव तो व्यास स्तुति उच्चारी ॥ नंदिकेश्वराची ॥८८॥
आतां सावधान जी परम श्रोता ॥ स्तुति उच्चार करी व्यास वक्ता ॥ तिच्या श्रवणपठनें होय मुक्तता ॥ महाकल्मषापासाव ॥८९॥
जय जया जी सर्वेश्वरा ॥ जय जया जी त्रिमूर्ति अवतारा ॥ तूं विश्वव्यापका विश्वंभरा ॥ संहारकर्ता तूंचि ॥९०॥
महातपस्विया षडंगयोगा ॥ महासाधूचिया सत्संगा ॥ जे तूं शिवासी प्रियगतिभृंगा ॥ समर्पणा स्वामिया ॥९१॥
तूं शुद्ध श्री गुरुचा कटाक्षू ॥ साही दर्शनी शुद्ध पक्षू ॥ स्मरारीचा जो तमचक्षू ॥ तो तूं नंदिकेश्वरा ॥९२॥
जय जया जी स्थूललिंगकारणा ॥ जी या त्रिशरीरांसी आवरणा ॥ जी तूं यासी अतिनिर्गुणा ॥ परमात्मलिंगा ॥९३॥
जी तूं सर्व सुखा चिया निवासा ॥ जी तूं सर्वांघटीं स्वयंप्रकाशा ॥ पिपीलिका विहंगम स्थावरेशा ॥ जंगम तूंचि ॥९४॥
जी तूं लक्ष्यामाजीं सुलक्ष्यवीरेशा ॥ स्मरणमात्रें तत्काळ साभासा ॥ तरी मज पाणिबंध व्यासा ॥ मुक्त करीं स्वामिया ॥९५॥
जी तूं सर्व सिद्धीं चिया छिद्रा ॥ जी तूं शद्धांमाजी सुशब्द भद्रा ॥ जी तूं रुद्रांमाजी महारुद्रा ॥ निर्गुणाकारा ॥९६॥
जी तूं सर्वव्यापका ॥ त्रिपुरहंता कैलासनायका ॥ भक्तांसी देसी अक्षयसुखा ॥ श्रीमहादेव शंभू तूं ॥९७॥
आतां असो व्यसस्तुती संस्कृत ॥ ते म्यां निर्मिली उघड प्राकृत ॥ संकलित निवेदिली किंचित ॥ यथामति श्रोतयांसी ॥९८॥
ऐसी परिसोनि व्यासस्तुती ॥ ह्रदयीं तोषला तो त्रिविधमूर्ती ॥ व्यासंबधन केलें ज्या हस्तीं ॥ तो मुक्त केला तत्काळ ॥९९॥
मग तो मौनाचारी व्यासमुनी ॥ शिष्यांसह आला आपुले स्थानीं ॥ सप्त अहोरात्रें जाहालीं परी कोणी ॥ नेदीचि भिक्षा ॥१००॥
व्यास म्हणे आपुले शिष्यांसी ॥ श्रेष्ठ शिष्य वैशंपायना परियेसीं ॥ सप्त अहोरात्र मी उपवासी ॥ करावें भिक्षाटन ॥१०१॥
मग व्यासमुनीचे शिष्य वेगेंसीं ॥ काशीमध्यें भ्रमती भिक्षेसी ॥ तेथें भवानीची आज्ञा सर्व लोकांसी ॥ जे व्यासासी भिक्षा न दीजे ॥१०२॥
प्रातःकालापासूनि सायंकाळवरी ॥ शिष्य भ्रमती ते काशीपुरीं ॥ परी भिक्षा नेदी कवण द्वारीं ॥ जवमात्र तेही ॥१०३॥
मग व्यास वदे शिष्यांनो आतां ॥ भिक्षा अप्राप्त तुम्हां काशी भ्रमतां ॥ परिपूर्ण भिक्षा आणिका अतीता ॥ येतसे कैसी ॥१०४॥
आणि तुम्हांसी भिक्षा केवीं अप्राप्त ॥ जाहाली वीस अहोरात्रपर्यंत ॥ तेथें भवानी कैसी देतसे मुक्त ॥ हें अनृत सर्वही ॥१०५॥
मग तो एक विसावे दिनीं ॥ भिक्षेसी निघाला व्यासमुनी ॥ काशी भ्रमण ॥ जंव अस्तमानीं ॥ सविता जाय तों ॥१०६॥
भ्रमण करितां श्रमला ऋषी ॥ काशीचे चौबारी आला वेगेंसीं ॥ बहु आतुर जाहाला मानसीं ॥ क्षुधेचेनि ज्वाळें ॥१०७॥
भिक्षापात्र होतें जें करतळीं ॥ तें अति क्रोधें ताडिलें भूतळीं ॥ मग काशीसी शापिता जाहाला ते काळीं ॥ महा क्रोधें पैं ॥१०८॥
म्हणे अधर्म प्रवर्तो ये काशीसी ॥ आणि क्षय होईल वाराणशीसी ॥ पृथ्वीचें दुर्भिक्ष हे भूमीसी ॥ प्रकटेल सत्य ॥१०९॥
तंव है भवानीसी जाहालें श्रुत ॥ मग आरंभिलें मावेचें मत ॥ काशीशाप जाणोनि अनुचित ॥ अपमानिलें शंकरें ॥११०॥
मग शिवें आज्ञा केली भवानीसी ॥ इच्छा भोजन देईं व्यासमुनीसी ॥ यासी अप्राप्त करूं वाराणसी ॥ हा नव्हे काशी योग्य ॥१११॥
मग भवानी आली काशीचे चौबारीं ॥ महालावण्य शिवांगना सुंदरी ॥ व्यासें येतां देखिली सामोरी ॥ आश्चर्य करी मनीं ॥११२॥
दिव्यस्वरूप देखिली वनिता ॥ म्हणे हे कवण्या गृह स्थाची कांता ॥ हे काशी मध्यें पति व्रता ॥ आणि भिक्षा नाहीं आम्हां ॥११३॥
अलंकारें मिरवीतसे दिव्य शोभा ॥ कीं उतरली जैसी गंधर्वगर्भा ॥ माझिया स्वामी पद्मनाभा ॥ ऐसी नाहीं अंगना ॥११४॥
ऐसिया काशी गृह स्थांचिया स्त्रियां ॥ परी या किमर्थ कवण कार्या ॥ आम्हां भिक्षुका अतीतां चिया ॥ न राहाती क्षुधा ॥११५॥
तंव भवानी म्हणे अतीतासी ॥ माझा गृहस्थ असे उपवासी ॥ पंक्ति भोजना अतीत त्यासी ॥ पाहिजे नित्य नित्य ॥११६॥
एकवीस अहोरात्र पर्यंत ॥ मी उपवासी माझा गृहस्थ ॥ तंव तुज देखिला आजि अतीत ॥ पाहतां या समयीं ॥११७॥
आतां त्वरावंत माझ्या मंदिरीं ॥ वेगीं चाल इच्छा भोजन करीं ॥ येरू म्हणे मी सहपरिवारीं ॥ शिष्यां सहित असें ॥११८॥
भवानी म्हणे तथास्तु बरवें ॥ तुझिया शिष्यांसह तुवां यावें ॥ मी तितुकेही पूजीन स्वभावें ॥ पुण्यस्वार्थास्तव ॥११९॥
आतां विलंब न करीं सर्वथा ॥ माझा गृहस्थ पीडतसे क्षुधार्ता ॥ मग जे तुझी विपत्तिव्यथा ॥ त्यासी करीं निरूपण ॥१२०॥
मग दहा सहस्त्र शिष्यांसह मुनी ॥ व्यासासी घेऊनि गेली भवानी ॥ पांक्ति केली आपुल्या मंदिरस्थानीं ॥ एकीकडे जवनिका ॥१२१॥
त्या जवनिकेमध्यें सिंहासनीं ॥ गृहस्थ बैसलासे शूलपाणी ॥ मग इच्छा भोजनें व्यासमुनी ॥ तृप्त केला भवानीनें ॥१२२॥
मग जवनिके आडूनि गृहस्थ ॥ व्यासासी करिता जाहाला मात ॥ आपण राहोनि अलिप्त ॥ पृच्छा आरंभिली ॥१२३॥
गृहस्थ म्हणे गा ऋषीश्वरा ॥ कांहीं एक प्रश्न असे मुनिवरा ॥ आम्हां अल्पमतियांसी क्षमा करा ॥ सांगिजे नीतिमार्ग ॥१२४॥
आम्ही लक्ष्मीवंत कोधी तामसी ॥ काम दंभ दुर्भन विवसी ॥ कलह करीतसों साधुजनांसी ॥ पाखंडमतें ॥१२५॥
तरी हें द्रव्य नीतिमार्गीं वेंचिजे ॥ ऐसा उपदेश आम्हांसी सांगिजे ॥ तें पुण्यफळ पाविजे ॥ कैशियापरी ॥१२६॥
मग व्यास वदे गृहस्था ॥ हें बरवें पुशिलें गा नीतिवंता ॥ तरी इत्यादि आचरण करिता ॥ मीचि त्रिभुवनीं ॥१२७॥
वेदार्थ मथूनि कथिलीं पुराणें ॥ तीर्थयात्रा व्रतें महादानें ॥ याग विधि नित्य आचरणें ॥ हें माझेंचि कर्तव्य ॥१२८॥
भूत भविष्य त्रिकाळ पूजा विधी ॥ नित्यमार्ग मंत्रसिद्धी ॥ षंडगयोग अष्ट महासिद्धी ॥ हें माझेंचि कर्तव्य ॥१२९॥
तंव गृह्स्थ म्हणे गा व्यासा ॥ अष्टदादश पुराणें वेदव्यवसा ॥ त्रिलोकीं रहस्यमार्ग हा भरंवसा ॥ तुझेचिपासाव ॥१३०॥
ऐसा तूं त्रिलोकीं महावक्ता ॥ तुजपरता नाहीं दीर्घ ज्ञाता ॥ तरी आणिक पृच्छा असे आतां ॥ ते कथिजे आम्हां ॥१३१॥
आम्ही हीनविवेकी मंदमती ॥ लक्ष्मीचे अंगीं क्षमा शांती ॥ सद्बुद्धि नाहीं शास्त्रीं अल्पमती ॥ यास्तव प्रश्न करितों तुम्हां ॥१३२॥
मग व्यास वदे गृह स्थासी ॥ आतां विलंब न कीजे पृच्छेसी ॥ गृहस्थ म्हणे गा मुनि परियेसीं ॥ आतां पृच्छा ते ऐसी ॥१३३॥
कोणी कवणासी दोषोंविण ॥ वाचे अशुभ वदे वचनशापदान ॥ विपरीत करी वेदांचें आवरण ॥ हा वेदीं कैसा निश्चय ॥१३४॥
मग व्यास म्हणे गा गृहस्था ॥ तरी वेदांची आज्ञा परिसें आतां ॥ कवणें कवणा वृथा शाप देतां ॥ तो भोगी त्याचा तोचि ॥१३५॥
जैसा आपुला वाजी सुंदरवर्ण ॥ तो रणीं टाकी स्वामी अकारण ॥ तैसा विनादोषें देतां शापदान ॥ तें संघटे आपणांसी ॥१३६॥
कीं वातसन्मुख टाकितां धुळी ॥ ते आपुल्याचि प्रवेशे चक्षुमंडळीं ॥ आहुति समर्पितां अग्निज्वाळीं ॥ तो नव्हेचि कृपाळु ॥१३७॥
ऐसा परोपकार करितां ॥ कृपा न उद्भवे त्या महाहुता ॥ तरी विनादोषें शाप देतां ॥ तो केवीं न बाधे ॥१३८॥
वेदवाक्य शास्त्रर्थ विचार ॥ हा विपरीत करी जो अविचार ॥ त्यासी प्रायश्चित्त नाहीं संवत्सर ॥ ब्रह्मकल्पवरी ॥१३९॥
ऐसें तीन वेळ प्रश्निलें व्यासासी ॥ मग शिव म्हणे गा संन्यासी ॥ तुवां दोषेंविण शापिलें काशीसी ॥ तें भोगिसी तुझा तूंचि ॥१४०॥
तुवां निंदिल्या वेदश्रूती ॥ हरिहरां देखिली भेदभ्रांती ॥ शुद्ध न होसी कल्पप्रायश्चित्तीं ॥ तूंचि खर होई आतां ॥१४१॥
स्वर्गसरितेचे पूर्वपारीं ॥ अपवित्र देशीं कीकटा माझारी ॥ तेथें गंधर्वतीर्थीं अनाचारी ॥ होशील व्यासा ॥१४२॥
परोपकार करी जो आपणासी ॥ त्याचें न्यून केवीं सांगिजे लोकांसी ॥ अरे देवां मानवां हे दुर्लभ काशी ॥ ते केवीं शापिली तुवां ॥१४३॥
प्रलयीं अविनाश काशीचें हें सौभाग्य ॥ ऋषी तूं नव्हेसी काशी वासासी योग्य़ ॥ शिवनिंदा केलीस आतां तुझें भाग्य ॥ अप्राप्त झालें ॥१४४॥
ऐसें विश्वनाथाचें प्रत्युत्तर ॥ व्यासें परिसिलें अति क्रूर ॥ तेव्हां ऋषीसी झाला स्मर ॥ कीं हा शंकर हे भवानी ॥१४५॥
जवनिके आड पंचानन ॥ नेदीचि व्यासाप्रती दर्शन ॥ मग ऋषीनें घातलें लोटांगण ॥ भवानीचरणांसी ॥१४६॥
करुणा भाकीतसे विनंती ॥ म्हणे जय जय वो मंगल मूर्ती ॥ मी महा अपराधी हीनमती ॥ देखिला भेद हरिहरां ॥१४७॥
मी शिवनिंदक महा अपराधी ॥ मज अप्राप्तन करीं काशीसिद्धी ॥ मी अनाचारी दुष्टबुद्धी ॥ क्षमा करीं मजलगीं ॥१४८॥
तंव बोलती जाहाली भवानी ॥ मी पतिव्रता शिवाची गृहिणी ॥ मज अतिप्रिय तो शूलपाणी ॥ विश्वकर्ता संहारिता ॥१४९॥
जें जें प्रिय माझिया स्वामीसी ॥ तेंचि अतिप्रिय माझे मानसीं ॥ तरी मी पतिव्रता कैसी ॥ असें स्वामिशब्दाधीन ॥१५०॥
जेथें माझें स्वामीचें शापदान ॥ तें अत्यंत प्रिय मजकारण ॥ हें विपरीत करी ऐसा कवण ॥ समर्थ असे तिहीं लोकीं ॥१५१॥
तुवां केला रे वेदनिषेध ॥ असत्य नव्हे शापशब्द ॥ येथें शिवा विरहित निर्बंध ॥ नाहीं सूत्र कवणाचें ॥१५२॥
तंव किंचित वदली भवानी ॥ म्हणे परियेसीं निंदका व्यासमुनी ॥ हे तुज अप्राप्त शिवधामिनी ॥ प्रायश्चित्त नाहीं कोणे काळीं ॥१५३॥
आतां तुवां केलें माझें स्मरण ॥ तरी ये काशीं होईल शिवदर्शन ॥ अष्टमी चतुर्दशी तुज येणें ॥ मुक्त केलें काशीमध्यें ॥१५४॥
तंव धांविन्नले शिवाचे दूत ॥ भृंगी रिटी नामें महाद्भुत ॥ त्यांहीं व्यास करूनि पाणिबंधित ॥ काढिला काशीबाहेरी ॥१५५॥
त्यांहीं खराचें रूप देऊनि व्यासा ॥ सद्बुद्धि हरूनि केला पिसा ॥ प्राप्त केला कीटकदेशा ॥ शिवनिंदेस्तव ॥१५६॥
मग भागीरथीच्या पूर्वपारीं ॥ कीटकनामें देश दुराचारी ॥ तेथें टाकिला तो ब्रह्मचारी ॥ स्थापिला गंधर्वतीर्थीं ॥१५७॥
अगस्ति वदे जी षडानना ॥ तो अपवित्र कीटकदेश जाणा ॥ तेथें पुण्यपवित्र पितृपावना ॥ गया तीर्थ असे ॥१५८॥
आणि तो तैसा अपवित्र देश ॥ तेथें नारायणें केला वास ॥ स्वामी म्हणे गातो आयास ॥ परियेसीं आतां ॥१५९॥
नातरी जैसे जळजंतु कर्माचारी ॥ वर्तत असती जळामाझारी ॥ तरी एक उत्तम त्यांभीतरी ॥ निपजती मुक्तमणी ॥१६०॥
कीं जैंसा शोभे श्वेतरंग ॥ कीं पशूंमध्यें कस्तूरीमृग ॥ कीं वनस्पतींमध्यें योग ॥ सुगंध चंदनाचा पैं ॥१६१॥
तरी कीकट देशीं तीर्थ गया विख्यात ॥ हें त्रिदेवीं निमिलें समर्य ॥ तें आतां कैसें यथार्थ ॥ निरोपूं संकलित तुम्हां ॥१६२॥
गया सुरदैत्य महा बळी ॥ तेणें उग्र तप केलें भूतळीं ॥ भक्तीसी मानवले चंद्र्मौळीं ॥ तया असुराच्या पैं ॥१६३॥
पाहा हो एवढा भक्तीचा प्रताप ॥ भक्तिनें देव जाहाला सानरूप ॥ जैसा मंत्रें आकर्षिजे सर्प ॥ गारुडियें तेणें ॥१६४॥
नातरी देव जैसा अग्नीसमान ॥ तृप्त कीजे हवितां अवदान ॥ परी तो यज्ञकारकां अमान्य ॥ कोणे काळीं नव्हे ॥१६५॥
ऐसा तो वैश्वानर अंगार ॥ तोही भक्तीनें प्राशितो योगीश्वर ॥ म्हणोनि भक्तीविण प्रीत थोर ॥ नाहीं जी देवांसी ॥१६६॥
म्हणोनि गया सुराचिये भक्तीं ॥ तयासी प्रसन्न जाहाले पशुपती ॥ षडानन म्हणे गा अगस्ती ॥ परियेसीं आतां ॥१६७॥
मग शिव म्हणे गा भक्तवरा ॥ माझिया वरद सुताचिया वरद कुमरा ॥ मी प्रसन्न जाहालें तुज असुरा ॥ मागें इच्छा तुझीं ॥१६८॥
मग गया स्रुर विचारी मनीं ॥ म्हणे जय जया जी शूलपाणी ॥ जे वाराणसी तुझी निजधामिनी ॥ तेथें क्वचित् दानी ॥१६९॥
हर म्हणे गा बाणा सुरसुता ॥ ते काशीमध्यें मी सायुज्यदाता ॥ मुक्ति होतसे सर्व जंतां ॥ पंचत्वानंतरें ॥१७०॥
मग असुर वदे महादेवा ॥ तूं जरी प्रसन्न जाहालासी पूर्व भावा ॥ तरी माझी सफळ मनोरथ व्हावा ॥ तुम्हां देखिलिया हरा ॥१७१॥
तरी माझी हेचि कीजे कामना आतां ॥ म्यां पूर्ण पूजिलें भवानीं ॥ विश्वनाथां ॥ तरी माझिया द्दष्टीं सर्व जंतां ॥ व्हावी मुक्ती ॥१७२॥
ऐसा माझिया द्दष्टीचा विलास ॥ श्रेष्ठ दुष्ट जीवां वैकुंठवास ॥ पाहोनि माझा तप आयास ॥ ऐसा दीजे वर शिवा ॥१७३॥
मग शिव पाहे तपाची युक्ती ॥ तंव देखिली अपार शक्ती ॥ अनिर्वाच्य राहिला पशुपती ॥ असंभाव्य पुण्य तुझें ॥१७४॥
शिव म्हणे महा असुरा अवधारी ॥ तूं कीकटीं राहें फल्गुतीरीं ॥ कल्पिला मनोरथ पावसी झडकरी ॥ सत्य वाचा माझी ॥१७५॥
ऐस वर देऊनि शूलपाणी ॥ मग क्रमिते झालें काशी स्थानीं ॥ असुर बैसला शिवध्यानीं ॥ फल्गूच्या तीरीं ॥१७६॥
तेणें हांकारिलें त्रैलोक्यजंतां ॥ झाला सर्व जीवांसी मुक्तीदाता ॥ गया सुराची द्दष्टि वरी पडतां ॥ होतसे मुक्तिपावन ॥१७७॥
पूर्वीं शिवालयें जैसा कर्मजंत ॥ जलचर स्थलचर समस्त ॥ ते कैवल्यपद झाले आप्त ॥ शिव प्रसादें ॥१७८॥
तैसें प्रयत्निलें गया सुरें ॥ तेणें उद्भरिलीं कैकटकरें ॥ द्दष्टि पडतांचि एक सरें ॥ वैकुंठ प्राप्त होतसे ॥१७९॥
ब्रह्मा अल्प झाला उत्पत्तीसी ॥ प्रतिपाळितां संतोषला ह्रषीकेशी ॥ परी संहार करितां रुद्रासी ॥ न लगे क्षण जैसा ॥१८०॥
तैसें कैवल्यपद प्राप्त करितां ॥ क्षण न लगे तया बाणसुता ॥ त्याची पूर्वराज्या स्थिति सांगतां ॥ वाढेल पाल्हाळ ॥१८१॥
खुंट्ला यमदूतांचा व्यापार ॥ उद्वस झाले कुंभीपाक अघोर ॥ चिंतातुर झाला सूर्यकुमर ॥ यमराव तो ॥१८२॥
मग यम आला सत्यलोकासी ॥ सर्व मात जाणविली विधीसी ॥ येरू म्हणे मी मंद झालों सृष्टीसी ॥ उत्पत्ति करितां ॥१८३॥
आतां सावधान श्रोतोत्तमा ॥ कैसे कार्य प्रयोजील ब्रह्मा ॥ आतां प्रार्थावया पुरुषोत्तमा ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१८४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे व्यासशापवर्णनें नाम चतुःसप्ततितमाध्यायः ॥७४॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP