आत्मानात्मप्रतीतिः प्रथममभिहिता सत्यमिथ्यात्वयोगात् ।
द्वेधा ब्रह्मप्रतीतिर्निगमनिगदिता स्वानुभूत्योपपत्त्या ॥
आद्या देहानुबन्धाद्भवति तदपरा सा च सर्वात्मकत्वाद् ।
आदौ ब्रह्माहमस्मीत्यनुभव उदिते खल्विदं ब्रह्म पश्चात् ॥३॥
अन्वयार्थ- ‘प्रथम सत्यमिथ्यात्वयोगात् आत्मानात्मप्रतीतिः अभीहिता-’ प्रथमतः सत्यत्व आणि मिथ्यात्व यांचे योगानें आत्मा आणि अनात्मा यांचा अनुभव सांगितला आहे. ‘स्वानुभूत्या उपपत्त्या (च इति) द्वेधा ब्रह्मप्रतीतिः निगमनिगादिता-’ स्वतःच्या अनुभवानें व युक्तीनें अशी दोन प्रकारांनी ब्रह्मप्रतीति येते, असें वेदामध्ये सांगितलें आहे. ‘आद्या (या प्रतीतिः) सा देहानुबंधात्-’ प्रथमतः जी प्रतीति येते ती देहाच्या योगानेंच येते. ‘तदपरा च (या) या सर्वात्मकत्वात् भवति-’ त्याचप्रमाणें दुसरी उपपत्तीनें जी प्रतीति येते, ती परमेश्वराच्या सर्वात्मकतेमुळें येते. ‘आदौ ब्रह्माहमास्मि इति अनुभवे उदिते (सति) पश्चात खलु इदं ब्रह्म (इति आत्मप्रतीतिः भवति-)’ प्रथम मी ब्रह्म आहें असा अनुभव आल्यानंतर मग हें सर्व ब्रह्म आहे, असा अनुभव येतो. ( आत्म्याची प्रतीति कशी व केव्हां येते हें ह्या श्लोकांत आचार्यांनी सांगितलें आहे. प्रथमतः विचार करूं लागलें असतां सत्य व मिथ्या अशा दोन कोटि आपल्या पुढें उभ्या रहातात. यास्तव सत्यत्वाचे योगानें आत्म्याची प्रतीति, मिथ्यात्वाचे योगानें अनात्म्याची प्रतीति येते. ‘‘सत्यं ज्ञानमनतं ब्रह्म’’ या श्रुतीप्रमाणें पाहिलें असतां सत्य हें ज्ञान व मिथ्या हें तद्विपरीत अज्ञान होय. त्या सत्यमिथ्यात्वाच्या योगानें सत्य ह्मणजे आत्मा व मिथ्या ह्मणजे तदितर सर्व जडवर्ग अशी दोन प्रकारची प्रतीति प्रत्येक विचारवानाला प्रथमतः येते; आणि असें झालें असतां ब्रह्माचा साक्षात्कारही दोन प्रकारांनी होतो; एक स्वतःच्या अनुभवानें व दुसरा युक्तीनें, असेंच वेदांनींही सांगितलें आहे. त्यांतील स्वानुभवसिद्ध अशी जी आद्य प्रतीति ती शरीरसंबंधानें ह्मणजे स्थूलदेहापासून अंतःकरणापर्यंत सर्व कार्यकरणसंघात व आत्मा यांच्या अनुषंगानें होते; व दुसरी युक्तिद्वारा होणारी जी प्रतीति ती परमेश्वराच्या समष्टिरूपामुळें होतें. सृष्टीतील प्रत्येक व्यक्ति ही व्यष्टि व त्या सर्व व्यक्तींचा समुदाय ही समष्टि. हिलाच सर्वज्ञ परमेश्वर, हिरण्यगर्भ, सूत्रात्मा इत्यादि ह्मणतात. ईश्वर सर्व चराचर पदार्थांचा समुदाय आहे. म्हणूनच तो सर्वात्मकही आहे.अर्थात् माझ्यामध्यें तें तत्त्व आहे तेंच सर्वत्र आहे, अशा युक्तिद्वारा ही प्रतीति येते. तात्पर्य पूर्वी देहद्वारा मी ब्रह्म आहें असा साक्षात्कार झाला असतां तदनंतर हें सर्वही दृश्यजात ब्रह्मच आहे असा, युक्तिद्वारा (अनुमानानें) साक्षात्कार होतो. सारांश ‘‘एकमेवाद्वितीयं ब्रह्म’’ असा साक्षात्कार होण्यापूर्वी मीच ब्रह्म आहें असा ह्या देहामध्येंच अनुभव आला पाहिजे. ] ३.