शतश्लोकी - श्लोक ३२
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
नासीत्पूर्वं न पश्चादतनुदिनकराच्छादको वारिवाहो दृश्यः
किं त्वंतरासौ स्थगयति स दृशं पश्यतो नार्कबिम्बम् ।
नो चेदेवं विनार्क जलधरपटलं भासते तर्हि कस्मात्तद्विश्वं
पिधत्ते दृशमथ न परं भासकं चालकं स्वम् ॥३२॥
अन्वयार्थ-‘वारिवाहः अतनुदिनकराच्छादकः (भवति)-’ मेघ अत्यंत विस्तीर्ण सूर्याला झांकून टाकितो. ‘सः पूर्वं न आसीत् पश्चात् च न (आसीत्) किं तु असौ अंतरा दृश्यः-’ ता पूर्वीं नसतो व मागूनही नसतो. तर हा कांहीं काल मध्येंच दिसतो. ‘सः पश्यतः दृशं स्थगयति अर्कबिंबं न (स्थगयति)-’ तो पहाणार्यांच्या दृष्टीला आच्छादित करितो; सूर्यबिंबाला आच्छादित करीत नाहीं. कारण ‘एवं नो चेत् तर्हि अर्कविना जलधरपटलं कस्मात् भासते?-’असें जर नाहीं तर मघेसमुदाय सूर्यावांचून अन्य कोणत्या प्रकाशानें दिसतो? ‘तद्वत् विश्वं दृशं पिधत्ते.’ त्याप्रमाणेंच हें विश्व लोकांच्या दृष्टीला झांकतें. ‘अथ परं भासकं चालकं स्वं न-’ पण सर्वश्रेष्ठ, सर्वांचा भासक, सर्वांचा चालक, असा जो आत्मा त्याला झांकित नाहीं. ह्यिा श्लोकांत आचार्यांनीं आवरणशक्तीचें स्पष्टीकरण केलें आहे. हा सूर्य स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांना प्रकाश देणारा आहे. त्याअर्थीं तो मेघापेक्षां किती तरी पटीनें मोठा असला पाहिजे. परंतु मेघ अशा प्रचंड सूर्यालाही झांकून टाकितोसा दिसतो. तो वर्षाकालापूर्वी ग्रीष्मर्तूंत नसून पुढें वर्षाकालानंतर शरत्काली सुद्धां नसतो; तर तो वर्षर्तूमध्यें मात्र दिसत असतो. असा हा मध्येंच कांहीं काल दिसणारा मेघ, सूर्याकडे पहाणार्या लोकांच्या दृष्टींना आच्छादित करितो, परंतु मेघापेक्षां सूर्य किती तरी विस्तृत असल्यामुळें त्याला आच्छादित करीत नाहीं. असे आहे तरी मेघानें सूर्याला झाकिलें, अशी जी प्रतीति लोकांना येते, ती भ्रममूलक आहे. कारण सूर्यच जर खरोखर मेघांकडून आच्छादित झाला असता, तर मेघ दिसलेच नसते. कारण, सूर्याच्या प्रकाशावांचून नेत्रांना कोणत्याही पदार्थांचें ज्ञान होत नाहीं. तसेंच उत्पत्तीच्या पूर्वीं न नाशानंतर हें जगत् नसून मध्येंच कांहीं काल व्यक्त होतें; व तें आत्मस्वरूपाकडे पहाणार्या लोकांच्या दृष्टींना झांकून टाकितें. पण आत्मस्वरूपाला झांकीत नाहीं. म्हणजे सूर्य व त्याकडे पहाणारा पुरुष यांच्यामध्यें मेघ येऊन पुरुषाची दृष्टि जशी आवृत होते, त्याप्रमाणेंच ब्रह्म व प्राणी यांच्यामध्यें हें नश्वर विश्व येऊन, प्राण्यांची दृष्टि आवृत झाल्यामुळें त्यांना ते दिसत नाहीं. ह्मणजे नश्वर विश्वाच्या पलीकडे दुसरी सत्स्वरूप अशी कांहीं वस्तु आहे अशी त्यांना कल्पनाच होत नाहीं. पण तेवढ्यावरून हें परब्रह्मस्वरूप नाहीं असें कधींही ह्मणतां येणार नाहीं. कारण आपला स्वतःचा व्यवहार त्याच्याच सत्तेमुळें होतो व हें विचित्ररूप जगत्ही त्याच्याच सत्तेमुळें भासते, तर अशा ह्या सर्वचालक परमात्म्याला हें भ्रामक जगत् परमार्थतः कधीं तरी आच्छादित करील काय? सर्वभासक ब्रह्मच आच्छादित झाल्यास सर्व व्यवहाराचाच लोप होईल. सारांश जगाचा आदि, मध्य व अंत ह्या तिन्ही अवस्थांमध्यें असणारें ब्रह्मच सत्य आहे, आणि त्याच्याच अज्ञानामुळें उत्पन्न होणारा हा जगाचा आकार शुक्तिरजताप्रमाणें केवळ प्रतिभासिक आहे] ३२.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP