यत्नप्रीत्या प्रीतिपात्रं तनुयवतितनूजार्थमुख्यं स तस्मात्
प्रेयानात्माथ शोकास्पदमितरदतः प्रेय एतत्कथं स्यात् ॥
भार्याद्यं जीवितार्थी वितरति च वपुः स्वात्मनः श्रेय इच्छं
स्तस्मादात्मानमेव प्रियमधिकमुपासीत विद्वान्न चान्यत् ॥९॥
अन्वयार्थ- ‘यत्प्रीत्या तनुयुवतितनूजार्थमुख्यं प्रीतिपात्रं (भवति) सः आत्मा तस्मात् प्रेयान् ’ ज्याच्या प्रीतीनें शरीर, स्त्री, अपत्य, व सर्वही विषयजात हीं प्रीतिपात्र होतात, तो आत्मा त्या सर्वांहून जास्त प्रेमास्पद ‘अर्थ इतरत् शोकास्पदं-’ आणि त्याहून अन्य सर्वही शोकास्पद होय; ‘अतः एतत् प्रेयः कथं स्यात्-’ तेव्हां तें प्रीतिपात्र कसें होणार ? ‘जीवितार्थी भार्याद्यं वितरति-’ स्वतःचें जीवित रहावें अशी इच्छा करणारा भार्या-पुत्र-मित्रादिकांना सोडतो. ‘स्वात्मनः श्रेयः इच्छन् वपुः (वितरति)-’ आपल्या कल्याणाची इच्छा करून शरीराचाही त्याग करितो. तस्मात् विद्वान् आत्मानमेव अधिकं प्रियं उपासीत-’ तस्मात् विद्वान् पुरुषानें सर्वांपेक्षा अधिक प्रिय असलेल्या आत्म्याचीच उपासना करावी. ‘ न चान्यत्’ अनात्म्याची करूं नये िआत्मा सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहे; हें ह्या नवव्या श्लोकांत आचार्यांनी दाखविलें आहे. ज्या आत्म्याच्या प्रीतीमुळें शरीरादि सर्वही विषयजात प्रीतिपात्र होतें तो आत्माच खरें प्रेमाचें स्थान होय. सुख किंवा दुःख यांपैकीं कशाचा तरी अनुभव येणें याला भोग असें म्हणतात. तो भोग आत्म्यालाच होणें युक्त आहे; म्हणून विषयभोग घेण्याकरितां प्रवृत्त झालेल्या पुरुषाला प्रथमतः आत्म्याचीच प्रतीति होते आणि त्या मूलभूत आत्मप्रतीतिद्वारा सर्व विषय प्रिय होतात. त्यांतही शरीर हें भोगसाधन असल्यामुळें त्याचे ठिकाणी प्रथम प्रेम जडतें. तदनंतर भोगांतील उत्तम भोग जी स्त्री तिच्यावर प्रीति बसते. पुढें स्त्रीपुरुषांच्या प्रेमापासून उत्पन्न होणार्या पुत्राविषयीं प्रेम उत्पन्न होतें. त्यानंतर या सर्वांचा निर्वाह व्हावा, म्हणून द्रव्यार्जनाविषयीं लोभ उत्पन्न होतो; आणि शेवटीं द्रव्यापासून साध्य होणारे अन्न-पान-वस्त्र-तांबूलादिक पदार्थ आवडूं लागतात. एकंदरींत आत्म्याची प्रीति मुख्य व त्याच्या अपेक्षेनें अन्य सर्वांविषयींची प्रीति गौण, हें प्रत्यक्षसिद्ध आहे. ज्याच्याविषयीं खरी व मुख्य प्रीति तो आत्माच सर्वांपेक्षा अधिक प्रिय होय. याप्रमाणें आत्मा सर्वांपेक्षा अधिक प्रिय जरी असला, तरी प्राण्यांची विषयांविषयींची जी प्रीति आपल्याला अनुभवाला येते ती खरी प्रीति नव्हे, तर तो प्रीतीचा आभास आहे. दुःख हेंच विषयांचें खरें स्वरूप आहे, असें आचार्यांनीं ‘‘इतरत्’’ इत्यादि पदानें सुचविलें आहे. उत्पत्ति, स्थिति व लय या तीन अवस्थांमध्यें जें दुःखद तें सर्वदा दुःखरूपच असतें असा न्याय आहे. शिवाय सर्व अनात्मजात दुःख देणारें आहे ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. ‘‘अर्जने रक्षणे नाशे क्लेशदो विषयो भवेत् । सुखार्थे सज्जते तत्र मूढधीरितिविस्मयः-’’ विषय प्राप्त करून घेतांना, प्राप्त झाल्यानंतर, त्याचें रक्षण करितांना, व तो नष्ट झाला असतां क्लेश देतो. पण मूढबुद्धि पुरुष त्याचे ठिकाणीं सुखाकरितां आसक्त होतो, हें मोठें आश्चर्य होय; असें एके ठिकाणीं म्हटलें आहे. ह्या वचनाप्रमाणें व अन्वय-व्यतिरेकन्यायानें सर्व विषयजात दुःखास्पद आहे, असें सिद्ध झालें असतां त्याच्याविषयीं प्रेम कसें वाटणार ? आता अत्मा सर्वांपेक्षां अधिक प्रिय कसा हें ‘‘भार्याद्यं’’ इत्यादि चरणांत सांगितलें आहे. स्वतः जीवंत रहावें अशी इच्छा करणारा पुरुष, भार्या-पुत्रमित्रादिकांचाही त्याग करून स्वतःचें रक्षण करितो. शिवाय ‘‘आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि’’ अशी लौकीक म्हणही आहे. फार काय पण शरीरसुद्धां आत्मा नव्हें असें ‘वपु०’ इत्यादि पदांनीं आचार्य सांगतात. स्वतःचें अत्यंत कल्याण व्हावें ह्मणून लोक स्वशरीराचेंही गंगेंमध्यें संतपर्ण करून किंवा क्षात्रधर्माप्रमाणें तें धारातीर्थी ठेवून स्थूलदेहाचा नाश करून घेतात. त्याअर्थीं शरीरापेक्षां आात्मा अधिक प्रिय आहे; व त्याच्याकरितां शरीरादिक अन्य सर्व अनात्मजात प्रिय वाटत असतें. तस्मात् विद्वान् पुरुषानें सर्वांपेक्षां अत्यंत प्रिय असणार्या आत्म्याचीच उपासना करावी; देहादिक जडवर्गाची परिणामीं निष्फल होणारी सेवा करूं नये] ९.