शतश्लोकी - श्लोक २९
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
आसीत्पूर्वं सुबुंधुर्भृशमवनिसुरो यः पुरोधाः
सनातेर्ब्राहूम्यात्कूटाभिचारात्स खलु
मृतिमितस्तन्मनोऽगात्कृतांतं तद्भाता श्रौतमंत्रैः
पुनरनयदिति प्राह सूक्तेन वेदस्तस्मादात्माभियुक्तं
व्रजति ननु मनः कर्हिचिन्नांतरात्मा ॥२९॥
अन्वयार्थ- ‘पूर्वं अवनिसुरः सुबंधुः भृशं आसीत्-’ पूर्वीं सुबंधुनांवाचा कोणी एक प्रसिद्ध ब्राह्मण होता. ‘यः सनातेः पुरोधाः-’ तो सनातिराजाचा पुरोहित (उपाध्याय) होता. ‘स खलु ब्राहम्यात् कूटाभिचारात् मृतिं इतः-’ तो ब्राह्मणांनी केलेल्या कपटास्त्रप्रयोगानें मरण पावला. ‘तन्मनः कृतांत अगात्-’त्याचें मन यमाकडे गेलें. नंतर ‘तद्भता श्रौतमंत्रैः (तत्) पुनः अनयत् इति वेदः सूक्तेन प्राह-’ त्या सुबंधूच्या भ्रात्यांनीं श्रौत मंत्रांनीं त्याच्या मनाला परत आणिलें असें वेदाने सूक्तानें सांगितलें आहे. ‘तस्मात् आत्माभियुक्तं मनः ननु व्रजति अंतरात्मा कर्हिचित् न (व्रजति)-’ तस्मात् आत्मप्रतिबिंबयुक्त मन मरणकालीं जातें. अंतरात्मा कधींही जात नाहीं. आत्मा गर्भामध्यें कोठूनही येऊन प्रवेश करीत नाहीं व मरणकालीं शरीरांतून कोठें निघून जात नाहीं; तर तें सर्व मन करित असतें. या विषयीं ऋृग्वेदांतील एका आख्यायिकारूप श्रुतीचा अनुवाद भगवान् आचार्यांनीं येथें केला आहे. ऋग्वेदाच्या आठव्या अष्टकामध्यें ‘‘यत्ते यम वैवस्वतं मनो जगाम दूरकं’’ इत्यादि श्रुतीमध्यें अशी आख्यायिका आहे कीं, पूर्वी सनातिनांवाच्या एका राजाच्या गृहीं बंधु, सुबंधु, श्रुतबंधु आणि विप्रबंधु असे चार भाऊ उपाध्ये होते. त्यांनी राजाच्या सांगण्यावरून त्याच्या शत्रूचा नाश होण्याकरितां अनेक उपाय केले; पण ते शत्रूची हत्त्या करणारें अभिचारक कर्म मात्र करीत ना. ह्मणून त्या राजानें त्यांच्यावर बहिष्कार घातला, आणि दुसर्या दोघां कपटपटूंना पुरोहित केलें. त्यामुळें बंधु इत्यादिक चारी भ्राते क्रुद्ध होऊन राजाचाच नाश करण्यास प्रवृत्त झाले ही गोष्ट त्या मायावी पुरोहितांना समजली असतां त्यांनी अभिचारक कर्म करून सुबंधुनांवाच्या पुरोहिताला मारिलें. पण त्याच्या भ्रात्यांनीं त्याला पुनः जिवंत करण्याकरितां ‘‘यत्ते यमं वैवस्वतें’’ इत्यादि पूर्वनिर्दिष्ट श्रुतिमंत्रानें प्रयत्न केला. त्या मंत्राचा अर्थ असा-‘‘हे सुबंधो, जें तुझें मन सूर्यपुत्र यमधर्माकडे दूर गेलें आहे, त्या तुझ्या मनाला ह्या लोकांमध्ये रहाण्याकरितां व व्यवहार करण्याकरितां (आम्ही) परत फिरवितों.’’ याप्रमाणें त्या तिन्हीं बंधूंनीं मंत्रद्वारा उपय केले असतां तो सुबंधु पुनः जीवंत झाला. ह्या श्रोत कथानकाला उद्देशून आचार्यांनीं हा श्लोक रचला आहे वेदामध्यें अभिचारक कर्म सांगितलें आहे.त्या कर्मानें ब्राह्मण लोक कधीं कधीं आपल्या शत्रूवर कपटास्त्रप्रयोग करीत असत. परंतु उपनिषदांनीं त्या कर्माचा, मद्यपान, कलंज-(एक प्रकारचें मांस-) भक्षण, ब्रह्महत्त्या इत्यादिकांप्रमाणें, निषेध केला आहे. अभिचारक कर्म निषिद्ध असल्यामुळें प्रथमतः राजाच्या आज्ञेप्रमाणें सुबंधु तें करीना; पण राजानें बहिष्कृत केलें असतां त्याला क्रोध येऊन राजावरच अभिचार प्रयोग करण्यास तो सिद्ध झाला. पण राजाच्या नूतन पुरोहितांस ही गोष्ट समजतांच त्याच अभिचारक कर्मानें त्यांनी सुबंधूला मारिलें; व त्याच्या बंधूंनीं त्याचें मन यमलोकाहून परत आणिलें. सारांश अंतरात्मा जन्मकालीं किंवा मृत्युसमयीं कोठेंही जात येत नसून, गति (जाणे) व अगति (येणें) ही केवल मनालाच आहे]२९.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP