यद्वपीयूषरश्मौ दिनकरकिरणौर्बिबितैरेति सान्द्रं
नाशं नैशं तमिस्रं गृहगतमथवा मूर्छितैः कांस्यपात्रे
तद्वद्बुद्धौ परात्मद्युतिभिरनुपदं बिंबिताभिः समंताद्भासन्ते
हींद्रियास्यप्रयृतिभिरनिशं रूपमुख्याः पदार्थाः॥५३॥
अन्वयार्थ-‘यद्धत् पीयूषरश्मौ बिंबितैः दिनकरकिरणैः सांद्रं नैश तमिस्रं नाशं एति-’ ज्याप्रमाणें चंद्रामध्यें प्रतिबिंबित झालेल्या सूर्यकिरणांनीं रात्रीचा दाट अंधकार नाश पावतो; ‘अथवा कांस्यपात्रे मूर्च्छितैः (दिनकरकिरणैः) गृहगतं (तमिस्रं नाशं एति)-’ किंवा कांशाच्या भांड्यामध्यें प्रतिबिंबित झालेल्या सूर्यकिरणांनीं गृहांतील अंधकार नाहींसा होतो; ‘तद्वत् बुद्धौ बिंबिताभिः अनुपदं अंद्रियास्यप्रसृतिभिः परात्मद्युतिभिः रूपमुख्याः पदार्थाः समंतात् अनिशं भासन्ते-’ त्याप्रमाणें बुद्धीमध्यें प्रतिबिंबित होणार्या व तत्काल इंद्रियमुखांनीं प्रसार पावणार्या परमात्मज्योतींनीं रूपादिक सर्व विषय चोहोंकडून सर्वदा भासतात. मिागच्या श्लोकांतील प्रतिपादनावर आतां कोणी कदाचित्-जलादि उपाधीमध्यें दिसणारें सूर्यप्रतिबिंब स्वतःचें रूप मात्र प्रकट करितें; अन्य पदार्थांना प्रकट करीत नाहीं. तेव्हां आत्मप्रतिबिंबभूत जीव तरी अन्य पदार्थांना प्रकाशित कसा करणार (ह्मे त्याला त्यांचें ज्ञान कसें होणार ) -अशी शंका घेतील ह्मणून दृष्टान्त देऊन समाधान करितात-जलमय असणार्या चंद्राच्या ठिकाणीं सूर्यकिरणें पडून त्या किरणांच्या परावर्तनानें रात्रीचा निबिड अंधार नाहींसा होतो; किंवा कांशाचे भांडे, आरसा इत्यादिकांमध्यें प्रतिबिंबित झालेल्या सूर्यकिरणांचें परावर्तन घरामध्यें झालें असतां घरांतील अंधकार नाहींसा होतो; ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाची आहे. तसेंच, किंवा संसर्गानें अग्नींतील दाह जसा लोखंडांत येतो त्याचप्रमाणें परमात्म्याची प्रकाशन शक्ति त्याच्याशी उपाधिरूपानें संबद्ध झालेल्या बुद्धीमध्यें येते. हेंच बुद्धींतील प्रतिबिंब होय. ह्याप्रमाणें संसर्गद्वारा परामात्म्याची ज्ञानशक्ति अंतःकरणांत आली असतां अंतःकरणाशीं संबंद्ध असणार्या इंद्रियांमध्येंहि ती येते. सारांश अशा त्या इंद्रियांच्या द्वारा आसपास पसरणार्या आत्मज्योतीनें शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादि विषयांचें ज्ञान होतें ॥५३॥