क्षीयंते चास्य कर्माण्यपि खलु हृदयग्रंथिरुद्भिद्यते वै
छिद्यंते संशया ये जनिमृतिफलदा दृष्टमात्र परेशे ।
तस्मिंश्चिनमात्ररूपे गुणमलरहिते तत्त्वमस्यादिलक्ष्ये
कूटस्थे प्रत्यगात्मन्यखिलविधिमनोऽगोचरे ब्रह्मणीशे ॥९९॥
अन्वयार्थ- ‘तस्मिन् चिन्मात्ररूपे गुणमलरहिते तत्त्वमस्यादिलक्ष्येकूटस्थे प्रत्यगात्मनि अखिलविधिमनोऽगोचरे ब्रह्मणि ईशे परेशे दृष्टमात्रे सति-’ त्या केवल चैतन्यरूप, सत्त्वादि गुणकृत मलानें
रहित, तत्त्वमसि इत्यादि महावाक्यांचा लक्ष्यार्थ, निर्विकार, सर्वान्तर्यामी सर्व वैदिकविधि व मन यांना अगोचर, निरतिशय श्रेष्ठ व ईश अशा त्या परमेश्वराचें दर्शन होतांच ‘अस्य च कर्माणि क्षीयन्ते-’ साधकाची सर्व कर्में नष्ट होतात.खलु हृदयग्रंथिः अपि उद्भिद्यते-’ हृदयग्रंथि तेव्हांच तुटते; व ‘ये जनिमृतिफलदाः संशयाः ते छिद्यन्ते वै-’ जन्ममरणरूप फल देणारे जे आत्मविषयक संशय तेहि नष्ट होतात. िआतां येथें-ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणीं ज्ञानानें मिथ्या ठरलेल्या अहंकारादि सृष्टीची प्रतीति येत असून जरी तो तद्द्वारा कर्में करितो तरी त्यांच्यामुळें त्याला बंध उत्पन्न होत नाहीं, - अशाविषयीं ‘भिद्यते हृदयग्रंथिः’इत्यादि मुंडकश्रुतीचें प्रमाण देतात. वेदान्तामध्यें सांगितलेल्या सर्व लक्षणांनीं ज्ञात होणारें केवल चैतन्यरूप (म्ह० केवल विषयी, अहंकारादिकांप्रमाणें विषय नव्हे) केवल ज्ञान (ज्ञेय नव्हे) व निर्विकार असें जें ब्रह्म, तद्रूप ज्यांची अंतःकरणवृत्ति झाली आहे त्याला परमेश्वराचें दर्शन (ज्ञान, साक्षात्कार) झालें असतां तत्क्षणींच त्याची सर्वं संचित व क्रियमाण कर्में क्षीण होतात. ह्या ब्रह्मसाक्षात्कारवान् पुरुषाची हृदयस्थ चित् व जड यांचें ऐक्यरूप- अज्ञानग्रंथि (गांठ) निःसंशय सुटते. म्ह० अहंकारादि सर्व भाव जड आहेत व आत्माच एक चैतन्ययुक्त आहे असा निश्चय झाल्यानें पुनः पूर्वीप्रमाणें तो भ्रमानें जड-चैतन्यांचें तादात्म्य करीत नाहीं. आतां असा ग्रंथिभेद होतोच म्हणून कशावरून असें कोणी विचारतील म्हणून सांगतात-देहाहून आत्मा पृथक् आहे कीं ते दोघे एकच? अशा तऱ्हेचे त्याचे सर्व संशय नष्ट होतात. कारण हे संशय त्या अज्ञानग्रंथीपासून उद्भवणारे असल्यामुळें अज्ञानग्रंथि नष्ट झाली असतां तिचे कार्य (संशय-)हि नष्ट होतें हे आत्म्याविषयीचे संशयच पुनः पुनः जन्ममरणरूप फल देत असतात. म्हणून संशय नष्ट झाले असतां जन्ममरणपरंपराहि नाहीशी होते.सारांश ब्रह्मज्ञानानें सर्व अनर्थ टळतात. द्वितीयार्धांत अनेक विशेषणें योजून वेदान्तोक्त सर्व ब्रह्मलक्षणें सुचविलीं आहेत. रज व तम ह्या गुणांपासून उत्पन्न होणारे रागद्वेषादि मल ज्याच्या ठिकाणीं नाहींत; जो ‘तत्त्वमासि’ ‘अहं ब्रह्मास्मि’ सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ ‘प्रज्ञानधन एव’ ‘प्रज्ञानं ब्रह्म’ इत्यादि महावाक्यांनीं केवळ जहदजहल्लक्षणेनेंच लक्षित होतो; जो सर्वव्यापी आहे; माया व मायाकार्य अहंकारादि, यांचा त्याच्यावांचून निर्वाहच होत नसल्यामुळें जो ईश (नियन्ता) आहे; जो वेदांतील कोणत्याच विधींनीं प्रेरित न होणारा असून मनालाहि ज्याच्या विषयीं संकल्प करितां येत नाहीं; जो निर्विकार आहे; अंतर्मुख शुद्ध वृत्तीनें अज्ञानाचा नाश होतांच स्वतःच जो प्रकाशित होतो; व्यवहारामध्यें ब्रह्मादिकांचे व मायेचें नियमन करणारा असें ज्याला उगीच म्हणत असतात; म्ह० ज्याच्यावांचून त्यांचें किंवा त्यांच्या कार्यांचें अस्तित्वच सिद्ध होत नाहीं; तो परमेश होय. अशा त्या परमेशाचेंच दर्शन झालें असतां परमपुरुषार्थ प्राप्त होतो] ९९