प्रायोऽकामोस्तकामो निरतिशयसुखायात्मकामस्तदासौ
तत्प्राप्तावाप्तकामःस्थितचरमदशस्तस्य देहावसाने ।
प्राणा नैवोत्क्रमन्ति क्रमविरतिमिताःस्वस्वहेतौ तदानीं
क्वायं जीवो विलीनो लवणमिव जलेऽखंड आत्मैव पश्चात् ॥४६॥
अन्वयार्थ-‘(जीवन्मुक्तः पुरुषः) प्रायः अकामः (यतः) अस्तकामः’ जीवन्मुक्त पुरुष बहुतकरून निष्काम असतो. कारण त्याच्या सर्वहि तृष्णा नष्ट झालेल्या असतात. ‘तदा असौ निरतिशयसुखाय आत्मकामः-’ व ती प्राप्ति झाली असतां त्याची अंत्यावस्था सिद्ध होऊन त्याच्या सर्वहि तृष्णा पूर्ण होतात. ‘देहावसाने तस्य प्राणाः नैव उत्क्रमन्ति (किंतु) सवस्वहेतौ क्रमविरतिं इतीः (भवन्ति-)’ मरणसमयीं त्याचे प्राण निघून जात नाहींत, तर आपापल्या कारणामध्यें ते क्रमानें लीन होतात. ‘तदानीं क्व अयं जीवः (न क्वपि यतः) जले लवणं इव विलीनः-’ तेव्हां हा जीव केाठें असतो? अर्थात् कोठेंहि नाहीं. कारण जलामध्यें लवण जसें विरून जातें, तसा तो स्वकारणामध्यें लीन होतो. ‘पश्चात् अखण्डः आत्मा एव-’ व असें झाल्यानंतर तो अखंड आत्माच होय. आतां निर्वाण मुक्ति कशी प्राप्त होते तें सांगतात- पूर्वीं ज्या जीवन्मुक्ताचें निरूपण केलें तो जीवन्मुक्त पुरुष नियमानें नाहीं, तरी बहुतकरून निष्कामच असतो. कारण दृढाभ्यासानें आत्मरूप झालेल्या मनाची विक्षेपशक्ति नाहींशी झाल्यामुळें तज्जन्य सर्व तृष्णाहि नाहींशा होतात, असें जरी आहे तरी परमानंदरूप आत्म्याची प्राप्ति झाली असतां हा पुरुष निरिच्छ होतो. कारण परमानंदामध्यें बाकीच्या सर्व क्षुद्र आनंदांचा अंतर्भाव होणें साहजिक आहे. भगवानांनींहि ‘यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । ज्या परमानंदरूप योगाची प्राप्ति झाली असतां त्याहून दुसरा एखादा अधिक लाभ आहे असें त्याला वाटत नाहीं. ’ असें ह्मटलें आहे. नंतर त्याची अगदी शेवटची अवस्था सिद्ध होते; ह्मणजे देहसंबंध असल्यामुळें मुख्य विदेह मुक्तीहून थोड्याशा अलीकडच्या अवस्थेमध्यें तो राहतो. अशा ह्या जीवन्मुक्ताचा मरणकाल प्राप्त झाला असतां त्याचे प्राण हें शरीर सोडून जात नाहींत. पुनः जन्म घेण्याकरितां संचिताचा सांठा बरोबर घेऊन ज्यावेळीं मन देहाला सोडून जातें, तेव्हां त्याला प्राणोत्क्रमण असें म्हणतात परंतु जीवन्मुक्त पुरुषाचें सर्व संचित व क्रियमाण कर्म ज्ञानाग्नीनें दग्ध झाल्यामुळें त्याला पुनर्जन्म घ्यावयाचा नसतो. ह्मणून त्याच्या प्राणांचें उत्क्रमणहि होत नाहीं. तर त्याची ज्या ज्या तत्त्वापासून उत्पत्ति झालेली असते, त्या त्या तत्त्वामध्यें ते उत्पत्तीच्या क्रमानेंच लीन होतात. त्यावेळीं मग हा जीव कोठून रहाणार? कारण उदकांत लवण जसें लीन होतें तसाच हा स्वतःच्या उपादानकारणांत लीन होतो. मग हा जीव आणि हा आत्मा, असा भेद पाडणारी त्याची उपाधि नष्ट झाल्यामुळें तो स्वतः अखण्ड आत्माच होऊन राहतो. ‘ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति जीव प्रथमतः ब्रह्मच असून मध्येंच जीवदशेंत येतो व पुनः ब्रह्माला मिळतो’ अशी श्रुतीहि आहे]४६.