पिण्डीभूतं यदन्तर्जलनिधिसलिलं याति तत्सैंधवाख्यं
भूयः प्रक्षिप्तमस्मिन्विलयमुपगतं नामरूपं जहाति ।
प्राज्ञस्तद्वत्परात्मन्यथ भजति लयं तस्य चेतो हिमांशौ
वागग्नौ चक्षुरके पयसि पुनरसृग्रेतसी दिक्षु कर्णौ ॥४७॥
अन्वयार्थ-‘यत् पिण्डीभूतं अंतर्जलनिधिसलिलं तत् सैन्धवाख्यं याति-’ जें शुष्क होऊन खड्यासारखें घट्ट झालेलें समुद्राचें पाणीं, त्यालाच सैन्धव (मीठ) असें म्हणतात; ‘भूयः (तत्) अस्मिन् प्रक्षिप्तं विलयं उपगतं सत् नामरूपं जहाति-’ व तेंच पुनः पाण्यांत टाकिलें असतां विरघळून जाऊन आपलें नामरूप सोडितें. ‘तद्वत् प्राज्ञः परात्मनि लयं भजति-’ त्याचप्रमाणें जीव परमात्म्याचें ठिकाणीं लय पावतो. ‘अथ तस्य चेतः हिमांशौ वाक् अग्नौ चक्षुः अर्के पुनः असृग्रतसी पयसि कर्णौ दिक्षु विलयं (भजतः)-’ तसेंच क्रमानें त्याचें अंतःकरण चंद्रामध्यें, वाणी अग्नीमध्यें, नेत्र सूर्यामध्यें, तर रक्त व रेत उदकामध्यें, आणि कर्ण दिशांमध्यें लय पावतात. मागच्या श्लोकांतील लवणाचा दृष्टान्त आतां येथें स्पष्ट करितात- समुद्रांतील उदकाचाच सैंधव हा एक विकार आहे. पण तो सैंधवरूपानें भासूं लागला असतां त्याचे पूर्व नामरूप जाऊन लवण हें नांव, पांढरें रूप व शुष्क खड्यासारखा आकार, हीं त्याला येतात. म्हणजे याची उत्पत्ति उदकापासून झाली असेल असें जरा सुद्धां कोणाला वाटत नाहीं. पण तेंच लवण कारणभूत उदकांत टाकिलें असतां पुनः आपल्या मूळच्या रूपाला मिळून आपलें नामरूप टाकितें. तसेंच प्राज्ञ-प्रत्यगात्मा सच्चिदानंदस्वरूपांत मिळतो; व त्याचें नाम, रूप, वर्ण, आश्रम इत्यादि सर्व नष्ट होतात; आणि असें झालें असतां त्या प्रत्यगात्म्याला जीवत्व प्राप्त करून देणारें अंतःकरण, वाणी, नेत्र, रक्त, रेत इत्यादिकांचा त्यांच्या त्यांच्या कारणांमध्यें लय होतो. सारांश ज्याप्रमाणें उदकांत टाकिलेला मिठाचा खडा त्यांत विरून गेला असतां, पुनः बाहेर काढून पृथक्पणें दाखवितां येत नाहीं, त्याचप्रमाणें चित्तादिक उपाधींचा लय होऊन प्रत्यगात्मा स्वरूपाला जाऊन मिळाला असतां त्याला पुनः जीवत्व दशा प्राप्त होत नाहीं, बृहदारण्यक श्रुतींत भगवान् याज्ञवल्क्यांनीं मैत्रेयीनामक ज्येष्ठ पत्नीला हाच जललवणाचा दृष्टान्त देऊन उपदेश केला आहे. त्याचप्रमाणें आर्तभाग नामक जरत्कारुपुत्रानें-‘‘जीवन्मुक्त पुरुष मृत झाला असतां, त्याची वाणी अग्नीमध्यें, नेत्र सूर्यामध्यें, मन चंद्रामध्यें, कर्ण दिशांमध्यें, इत्यादि आपल्या ह्मण्याप्रमाणें स्वस्वकारणामध्यें जर प्रविष्ट होत असतील तर त्यावेळी हा जीव कोठें राहतो’’-असा याज्ञवल्क्यांस प्रश्र्न केला आहे. शिवाय ऐतरेयोपनिषदामध्यें ‘‘अग्नि वाणी होऊन मुखांत, वायु प्राण होऊन नासिकेमध्ये, आदित्य चक्षु होऊन नेत्रांत, दिशा श्रोत्र होऊन कर्णांमध्यें, औषधि व वनस्पति लोम होऊन त्वचेमध्यें व आप रेत होऊन शिश्र्नामध्यें प्रविष्ट होतें,’’ असें स्पष्ट सांगितलें आहे ] ४७.