अन्तः सर्वौषधीनां पृथगमितरसैर्गंधवीर्यैर्विपाकैरेकं
पाथोदपाथः परिणमति यथा तद्वदेवान्तरात्मा
नानाभूतस्वभावैर्वहति वसुमती येन विश्वं पयोदो
वर्षत्युच्चैर्हुताशः पचति दहति वा येन सर्वान्तरोऽसौ ॥५९॥
अन्वयार्थ-‘यथा एकं पाथोदपाथः सर्वौषधीनां अंतःअमितरसैः गंधवीर्यैः विपाकैः पृथक् परिणमति-’ एकच मेघोदक अनेक औषधींमध्यें अनेक रस, अनेक गंध, निरनिराळी शक्ति व पृथक् पाक इत्यादि निरनिराळ्या प्रकारांनीं परिणत होतें (म्हणजे एकच उदक निरनिराळ्या वनस्पतीमध्यें गेलें असतां जसें निरनिराळ्या गुणधर्मांनीं युक्त होतें) ‘तद्वत एव अंतरात्मा-’ त्याप्रमाणेंच हा अंतरात्मा (परिणाम पावतो) ‘नानाभूतस्वभावैः येन वसुमती वहति-’ नानाप्रकारच्या भूतस्वभावांनीं ही पृथ्वी ज्याच्यामुळें व्यवहारयुक्त होते, (येन) पयोदः विश्वं उच्चैः वर्षति-’ ज्याच्यामुळें मेघ पृथ्वीवर जलाचा मोठा वर्षाव करितो, ‘येन हुताशः पचति दहति वा (सः) असौ सर्वांतरः (अस्ति)-’ ज्याच्यामुळें अग्नि पाक व दाह करितो, तोच हा सर्वांच्या अंतर्यामीं रहाणारा परमात्मा होय.या श्लोकामध्यें ब्रह्मच सर्व सृष्ट पदार्थांमध्यें ओतप्रोत भरून राहिलें आहे, असें ‘‘यः पृथिव्यां तिष्ठन्’’ इत्यादि बृहदारण्यकाच्या तिसर्या अध्यायांतील सातव्या खंडामध्यें (बृ.भा.पृ.१७७) सांगितलें आहे; व आचार्यांनी तीच गोष्ट मेघोदकाच्या दृष्टांतानें येथें स्पष्ट केली आहे. जसें एकच उदक नानाउपाधींच्या संसर्गानें नानाप्रकारचे रस, रूप गंध इत्यादिकांनीं युक्त होतें, तसेंच अनेक उपाधींच्या योगानें एकच ब्रह्म अनेक प्रकारांनी भासतें] ५९