कामो बुद्धावुदेति प्रथममिह मनस्युद्दिशत्यर्थजातं
तद्गृह्णातीन्द्रियास्यैस्तदनधिगमतः क्रोध आविर्भवेच्च ।
प्राप्तावर्थस्य संरक्षणमतिरुदितो लोभ एतत्त्रयं स्यात्सर्वेषां
पातहेतुस्तदिह मतिमता त्याज्यमध्यात्मयोगात् ॥१८॥
अन्वयार्थ- ‘इह प्रथमं बुद्धौ कामः उदेति-’ या व्यवहारामध्यें प्रथमतः बुद्धींत कामना उत्पन्न होते. ‘मनसि अर्थजातं उद्दिशति-’नंतर विषयांविषयीं मनामध्यें पुरुष कल्पना करितो. ‘तत् इंद्रियास्यैः गृह्णति-’ ते सर्वही विषय इंद्रियद्वारा अनुभवितो.‘च तदनधिगमतः क्रोधः आविर्भवेत्-’ पण त्यांची प्राप्ति न झाल्यानें क्रोध उत्पन्न होतो. ‘च अर्थस्य प्राप्तौ या संरक्षणमतिः स एव लोभः उदितः-’ विषयांची प्राप्ति झाली असतां त्यांच्या संरक्षणाविषयींची जी बुद्धि तोच लोभ उत्पन्न झाला (आहे असें समजावें. सारांश )‘एतत् त्रयं सर्वेषां पातहेतुः (स्यात्)-’ हे तिन्ही दोष सर्वांच्या अधःपाताला कारण होतात. ‘तत् इह मतिमता अध्यात्मयोगात् त्याज्यं-’ म्हणून बुद्धिमान् पुरुषानें आत्म्याकडे लक्ष्य ठेवून त्यांचा त्याग करावा. िआतां ह्या अठराव्या श्लोकांत काम, क्रोध आणि लोभ हे तीन दोष सर्व प्राण्यांना पतित करण्यास कारण होतात असें सांगितलें आहे. प्रथमतः बुद्धीमध्यें विषयाभिलाष उत्पन्न होतो. त्यामुळें मनामध्यें रूप-रसादि विषयांचें चिंतन होतें. तद्नंतर प्राणी आपल्याला अमुक विषयाची प्राप्ति व्हावी असा विषयाविषयीं संकल्प करितो. नंतर चक्षुरादिक इंद्रियांच्या द्वारा त्या त्या विषयाचें ग्रहण करण्याचा तो प्रयत्न करितो. ह्याप्रमाणें प्रयत्न करूनही मध्यें अनेक विघ्नें आल्यामुळें विषयांची प्राप्ति न झाल्यास बुद्धीमध्यें क्रोधाचा प्रादुर्भाव होतो. भगवंतांचेंही ‘‘कामात्क्रोधोऽभिजायते’’ असें वाक्य आहे. दैववशात् विषयाची
प्राप्ति झाली असतां हा माझा विषय आहे; याचा माझा कधींही वियोग होऊं नये अशी किंवा त्याच्या रक्षणाविषयींची जी बुद्धि,तिलाच लोभ म्हणतात. ह्याप्रमाणें काम, क्रोध व लोभ हे तीन दोष सर्वही प्राण्यांना अधोगतीला नेण्याला व दुःखरूप संसार देण्याला कारण होतात. म्हणून बुद्धिमान पुरुषानें बुद्धीच्याही पलीकडे असलेल्या आत्म्याकडे अनुसंधान ठेवून म्हणजे मनाचा सर्वही ओघ निरंतर आत्मचिंतनाकडे लावून या दोषांचा त्याग करावा. ‘काम क्रोध व लोभ हें त्रिविध नरकद्वार आहे’ असें गीतेंतही ह्मटलें आहे] १८.