स्वं बालं रोदमानं चिरतरसमयं शान्तिमानेतुमग्रे ।
द्राक्षं खार्जूरमाम्रं सुकदलमथवा योजयत्यांबिकास्य ॥
तद्वचेतोऽतिमूढं बहुजननभवान्मौढ्यसंस्कारयोगाद्वा-
धोपायैरनेकैरवशमुपनिषद्वोधयामास साम्यक् ॥८॥
अन्वयार्थ-‘चिरतरसमयं रोदमानं स्वं बालं शांतिमानेतुं अस्य अग्रे अंबिका द्राक्षं खार्जूरं आम्रं अथवा सुकदलं योजयति-’ ज्याप्रमाणें पुष्कळ वेळपर्यंत रडत असलेलें बालक उगी रहावें म्हणून त्याची आई त्याच्यापुढें द्राक्ष, खजूर, आंबा किंवा उत्तम फळे ठेविते, ‘तद्वत् उपनिषद् बहुजननभवात् मौढ्यसंस्कारयोगात् अवशं सत् अतिमूढं चेतः अनेकैः बोधोपायैः सम्यक् बोधयामास-’ त्याचप्रमाणें उपनिषदांनीं, अनेक जन्म घेतल्यामुळें व त्यांतील अनेक मूढ संस्कारांमुळें चंचल झालेल्या मनाला, अनेक बोधोपायांनीं उत्तम उपदेश केला आहे. (ह्या श्लोकांत आत्मज्ञान होण्याकरितां अनेक उपाय योजणार्या श्रुतिमातेचें कौशल्य दाखविलें आहे. एखादि माता, पुष्कळ वेळापर्यंत कशाकरितां तरी हट्ट घेऊन रडणार्या आपल्या बालकाचे समाधान करण्याकरितां त्याच्यापुढें द्राक्ष-खजूर्ररादिक गोड पदार्थांपैकीं कांहीं पदार्थ टाकिते; आणि त्यांपैकीं एखाद्या तरी आवडीच्या पदार्थानें त्याचे समाधान व्हावें अशी तिची इच्छा असते. त्याचप्रमाणें अनादिकालापासून अनेक जन्म घेतल्यामुळें, व प्रत्येक जन्मांत अनेक मूढ संस्कार झाल्यामुळें अत्यन्त चंचल झालेल्या ह्या अज्ञानमय अंतःकरणाला श्रुतिमातेनें ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणें अनेकज्ञानोपायांनीं बोध केला आहे. आत्मज्ञानाचे अनेक उपाय सांगण्यामध्यें त्या अत्यंत कारुणिक माउलीचा हातच हेतु कीं, त्यापैंकीं एखाद्याचा तरी स्वीकार करून प्राण्यानें कृतार्थ व्हावें. लौकिक माता, आपल्या मुलाचा संताप दूर होऊन त्याला शांति मिळावी म्हणून जसें अनेक मिष्ट पदार्थांचें आमिष दाखविते, त्याचप्रमाणें श्रुतिमाउलीनेंही त्रिविध तापांनीं संपप्त झालेल्या मानवाला निरतिशय शांति प्राप्त व्हावी म्हणून भजन, पूजन, यम, नियम, ध्यान, धारणा, श्रवण, मनन इत्यादि, साधकाच्या इच्छेप्रमाणें, व अधिकाराप्रमाणें, अनेक उपाय योजिले आहेत.) ८.