ओतः प्रोतश्च तंतुष्विह विततपटश्चित्रवर्णेषु
चित्रस्तास्मिञ्जिज्ञास्यमाने ननु भवति पटः सूत्रामात्रावशेषः ।
तद्वद्विश्वं विचित्रं नगननगरनरग्रामपश्वादिरूपं प्रोतं वैराजरूपे
स वियति तदपि ब्रह्मणि प्रोतमोतम् ॥४९॥
अन्वयार्थ-‘इह चित्रवर्णेषु तंतुषु चित्रः विततपटः ओतः प्रातश्च (दृश्यते)-’ ह्या व्यवहारांत रंगीबेरंगी तंतूमध्यें (धाग्यांमध्यें) रंगीबेरंगी विस्तृत वस्त्र ओतप्रोत (भरून राहिलेलें) दिसतें. ‘तस्मिन् जिज्ञास्यमाने ननु पटः सूत्रमात्रावशेषः भवति-’ पण त्या वस्त्राविषयीं विचार करून पाहूं लागलें असतां त्यामध्यें खरोखरच केवल धागे मात्र हातीं लागतात (ह्मे धाग्यांवांचून दुसरें कांही त्यांत दिसत नाहीं.) ‘तद्वत् नगनगरनरग्रामपश्वादिरूपं विचित्रं विश्वं वैराजरूपे प्रोतं-’ त्याचप्रमाणें पर्वत, नगरें, पुरुष, लहान लहान गांव, पशु इत्यादि रूप हें विचित्र जगत् विराडात्म्याच्या शरीरामध्यें ओविलेलें आहे. ‘सः वियति (प्रोतः)-’ तो विराडात्मा आकाशांत ओविलेला व ‘तत् अपि ब्रह्मणि ओतं प्रोतं (दृश्यते)-’ तें आकाशहि ब्रह्मामध्यें ओंविलेलें आहे. हि विश्व परंपरेनें ब्रह्मामध्येंच ओंविलेलें आहे, असें ह्या श्लोकांत दाखवितात-व्यवहारामध्यें बहुतेक सर्व मनुष्यांच्या परिचयाचें लांबरुंद वस्त्र तंतुमय असतें. वस्त्रोत्पत्तीच्या पूर्वी, वस्त्ररूपाला प्राप्त झाल्यावर व वस्त्रत्वाचा नाश झाला असतां तें तंतुरूपच असतें; व जसे धागे असतील तशा प्रकारचें तें होतें. चित्रविचित्र धागे असल्यास वस्त्रहि तसेंच होतें. पण वस्त्र या नांवानें व लांबीरुंदीच्या आकारानें भासणारें जें वस्त्र तो केवळ तंतुंचा विकार आहे. उभ्या तंतूंमध्यें आडवे तंतु विशेष प्रकारानें ओंवून विणले असतां त्याच तंतूंस वस्त्र ही संज्ञा प्राप्त होते. म्हणून पटाविषयीं विचार करून पाहूं लागलें असतां त्यामध्यें तंतूंवांचून दुसरें कांहीहि नाहीं, असा आपला निश्चय होतो. त्याचप्रमाणें सत्त्वादि गुण व पापपुण्य उत्पन्न करणारीं कायिक, वाचिक, मानसिक कर्में यांच्या वैचित्र्यामुळें विचित्र झालेलें हें जगत् विराड्नांवाच्या स्थूल समष्टीमध्यें ओंविलेलें आहे; ती स्थूल समष्टि सूक्ष्म आकाशामध्यें ओंविलेलें आहे; (म्हणजे ती आकाशाच्या आधारानें रहाते) व तें सर्वहि स्थूल सूक्ष्म प्रपंचाला आधार असणारें आकाश ब्रह्माच्या आश्रयानें राहतें. याविषयीं बृहदारण्यकोपनिषदामध्यें ‘‘सहोवाच यदूर्ध्वं तदश्र्नाति कश्चन’’ या श्रुतीमध्यें प्रश्र्नप्रतिवचनरूपानें सविस्तर प्रतिपादन केलेलें आहे.] ४९.