शतश्लोकी - श्लोक २७
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
एकस्तत्रास्त्यसंगस्तदनु तदपरोऽज्ञानसिंधुं प्रविष्टो
विस्मृत्यात्मस्वरूपं स विविधजगदाकारमाभासमैक्षत् ।
बुद्ध्य़ांतर्यावदैक्षद्विसृजति तमजा सोपि तामेवमेकस्तावद्विप्रास्तमेकं
कथमपि बहुधा कल्पयन्ति स्ववाग्भिः ॥२७॥
अन्वयार्थ-‘तत्र एकः असंगः अस्ति-’ त्या दोघांपैकीं शिव कोठेंही आसक्त होत नाहीं; ‘तदनु तदपरः अज्ञानसिंधुं प्रविष्टः-’ पण त्याच्याचसारखा असणारा दुसरा जो जीव तो अज्ञानसागरांत
बुडाला आहे. ‘सः (च) आत्मस्वरूपं विस्मृत्य विविधजगदाकारं आभासं ऐक्षत्-’ तो स्वतःचेंच स्वरूप विसरून नानाप्रकारच्या आकारांनी युक्त असलेला हा जगाचा भास पाहूं लागला. ‘यावत् बुद्ध्य़ा अंतर् ऐक्षत् तावत् तं अजा विसृजति सः अपि तां (विसृजति इति अनुभवति)एवं-’ पण (ह्या जगदाकारावरून क्षणभर लक्ष काढून) तो आपल्या ह्या हृदयांत जों बुद्धिद्वारा पाहूं लागला तों ही माया जीवाला उत्पन्न करिते व जीव हिला उत्पन्न करितो असें ह्याला दिसलें. ‘एकः तावत् (अस्ति तथापि) विप्राः तं एकं कथं अपि स्ववाग्मिः बहुधा कल्पयन्ति-’ ह्याप्रमाणें तो एकच असतांना ब्राह्मण त्या एकाच विषयीं कशी तरी आपल्या वाणीनें अनेक प्रकारची कल्पना करितात. म्ह० तो एक असतांना त्याच्या ठिकाणीं अनेकत्वाचा आरोप करितात. जिव व परमात्मा हे व्यवहारतः भिन्न भिन्न भासले तरी परमार्थतः ते एकच आहेत; असें ह्या श्लोकांत सांगितलें आहे. पक्ष्यांप्रमाणें मायेचा आश्रय करून राहणार्या त्या
जीवशिवांपैकी शिव कोठेंच आसक्त न होता मायेला स्वाधीन ठेवून भोक्त्य़ांना कर्मफलें देत असतो; व वस्तुतः त्याच्याच सारखा असणारा दुसरा जीव अज्ञानसमुद्रांत बुडून व्याकुळ होतो. तो स्वतःचेंच स्वरूप विसरून जाऊन नानाप्रकारच्या व विलक्षण आकृतीच्या ह्या जगाचा अनुभव घेऊं लागतो. म्ह० ह्या बाह्य अनात्मभूत सृष्टपदार्थांमध्येंच तो गर्क होऊन रहातो. त्याला स्वतःचें भानही नाहीसें होऊन तो जड पदार्थांतीलच एखाद्याला ‘हा मी’ असें खोटेंच समजतो. पण दैववशात् एखादे वेळीं वैषयिकदृष्टि सोडून अंतर्दृष्टीनें व सूक्ष्म बुद्धीनें जर आपल्या अंतःकरणांतच काय भरलें आहे ह्याचा त्यानें विचार केला, तर माया जीवाला निर्माण करिते व जीव मायेला उत्पन्न करितो (म्ह० माया ज्याला केवळ कल्पनेनें बनविते तो, व ती स्वतः ज्याच्या आधारानें आहे तो, असे हे दोघे पृथक् नसून एकच आहेत ) असा त्याला अनुभव येतो. मायेचा व जीवशिवांचा खरोखर कांहींच संबंध नाहीं, असें त्याला निश्चयपूर्वक कळून आल्यानें चित्स्वरूपांत जीव व शिव असा खंड नसून तें अखंड एकरूपानें आहे असा त्याला दृढ प्रत्यय येतो. वस्तुतः अशी जरी स्थिति आहे तरी वेदवेदांगपारग विद्वान् ब्राह्मण, शिष्यांना बोध होण्यासारखा शब्दव्यवहार करिता यावा म्हणून, केवल शब्दांनीं त्या एकच असणार्या परमात्म्याला अनेक नांवें देऊन त्याचीं अनेक रूपें आहेत अशी कल्पना करितात; पण तें खरें नव्हे. ह्या व मागच्या श्लोकांत, भगवान् आचार्यांनीं ‘चतुष्कपर्दा युवतिः सुपेशा े विचेष्टे’ इत्यादि श्रुतीचा अर्थ, स्पष्टपणें आणिला आहे.] २७.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP