आदौ मध्ये तथांते जनिमृतिफलदं कर्ममूलं विशालं
ज्ञात्वा संसारवृक्षं भ्रममदमुदिताशोकतानेकपत्रम् ।
कामक्रोधादिशाखं सुतपशुवनिताकन्यकापक्षिसंघं
छित्त्वासंगासिनैनं पटुमतिरभितश्चिंतयेक्षसुदेवं ॥१००॥
अन्वयार्थ-‘आदौ मध्ये तथा अंते (असन्नपि) जनिमृतिफलदं-’ उत्पत्तीपूर्वी, उत्पत्तीनंतर व तसेंच नाशानंतर (असद्रूप असूनहि) जन्ममरणरूप फल देणारा; ‘कर्ममूलं-’ कर्मापासून उत्पन्न होणारा; ‘विशालं-’ महान् ‘भ्रममदमुदिताशोकतानेकपत्रं-’ काम, क्रोध, इत्यादि शाखावान् व ‘सुत-पशु-वनिता-कन्यकापक्षिसंघं संसारवृक्षं ज्ञात्वा-’ पुत्र, पशु, स्त्री, कन्या, इत्यादि पक्षिसमुदाययुक्त असा हा संसारवृक्ष (निस्तत्त्व आहे असें) जाणून ‘एनं असंगानिना छित्त्वा पटुमतिः अभितः वासुदेवं चिंतयेत्-’ शहाण्या पुरुषानें त्याला असंग शस्त्रानें तोडून सतत वासुदेवाचें चिंतन करावें.आतां अशा ज्ञान्याची ‘ब्रह्मच आत्मा आहे’ अशी सतत वृत्ति (शेवटची वासना उत्पन्न होईतों ती) दृढ करण्यास्तव त्यानें ध्यान, व ध्यानापूर्वींहि अवश्य कर्तव्य कर्म करावें असें येथें सांगतात.-हा संसारवृक्ष तिन्ही कालीं खोटा असून जन्ममरणफल देणारा आहे. प्राण्यांचें कर्म हेंच त्याचें मूळ आहे. तो फार विस्तीर्ण आहे विपरीतज्ञान, मी श्रेष्ठ आहें असा गर्व, हर्षवृत्ति, खेदवृत्ति इत्यादि त्या वृक्षाचीं जणुं काय अनेक पर्णें (पाने) आहेत. काम (प्रिय विषयांविषयीं इच्छा), क्रोध (इच्छेला प्रतिबंध झाला असतां उत्पन्न होणारी रेषावृत्ति), लोभ (विषयसंरक्षणमति) इत्यादि जशा कांहीं त्याला शाखा (खाद्या) आहेत. पुत्र, गायी, बैल इत्यादि पशु, स्त्रिया, कन्या, हेच जणु काय त्यावर राहणारे पक्षी आहेत. हा संसार ज्ञानानें नष्ट होत असल्यामुळें किंवा व्यवहारांतहि तो क्षणिक असल्याचें सर्वांच्या प्रत्ययाला येत असल्यामुळें त्याला वृक्ष असें म्हटलें आहे. ‘ऊर्ध्वमूलोऽवाक्शाखे’ ही श्रुति व ‘ऊर्ध्वमूलमधःशाखें’ ‘ह्या संसारवृक्षाचें मूळ वर-श्रेष्ठ असून शाखा खालीं-कमी प्रतीच्या आहेत’ ही स्मृति या रूपकाला प्रमाण आहे. अशा अश्वत्थ-(क्षणिक) संज्ञक संसारवृक्षाचें यथार्थ ज्ञान करून घेऊन मननादि अनुष्ठानानें ज्याची बुद्धि सूक्ष्म झाली आहे, अशा मुमुक्षूनें, मी असंग आहें (मी कोठेंच आसक्त नाहीं) असा अनुभव हेच असंगशास्त्र घेऊन त्याच्या योगानें या वृक्षाचा छेद करावा. संसाराचा क्षय करावा आणि नंतर सतत वासुदेवाचें चिंतन करावें. वासुदेव म्हणजे भगवान् गोपालकृष्ण अथवा वा+असु+देवः म्हणजे ‘वा’ विकल्पानें, पर्यायानें; ‘असूनां’प्राण व इंद्रियें यांचा ‘देवः-’ प्रकाशक-सर्व प्राणेंद्रियांना प्रकाशित करणारा आत्मा असा अर्थ करावा.]१००